Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi

Read share best Marathi katha free "हेर(भयामागचेकारणभाग१)"

Read best Marathi suspense story free मराठी


( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)

लेखक - केदार शिवराम देवधर 


हेर - भयामागचे कारण ( भाग १ )


भाग १

वेळ संध्याकाळची, डिटेक्टिव्ह अनयचे ऑफिस  -


एक वयस्कर सद्-गृहस्थ - मॅडम आत येऊ का?


गार्गी - साहेब, आत या ना, बसा.


ते सद्-गृहस्थ डिटेक्टिव अनयच्या ऑफिसमध्ये येऊन बसतात.


सद्-गृहस्थ - मला अनय साहेबांना भेटायचे आहे.


गार्गी - तुम्हाला पंधरा मिनिटे बसावे लागेल. साहेब एका कामासाठी बाहेर गेले होते, ते आता ऑफिसमध्ये परत यायला निघाले आहेत.


सद्-गृहस्थ - काही हरकत नाही. मी थांबतो येथे.


गार्गी - मी तुमच्यासाठी चहा मागवते हं.


सद्-गृहस्थ - अहो नको, कशाला उगाच.


गार्गी - नाही कसं? मला साहेब ओरडतील, तुमचं स्वागत केलं नाही म्हणून. आणि तस पण आमची चहा प्यायची हीच वेळ आहे.


गार्गी फोन करून बाजूच्या हॉटेलमधून चहा मागवते.

दोघांचा चहा होईपर्यंत अनय ऑफिसमध्ये येतो आणि खुणेनेच त्या सद्-गृहस्थांना केबीन मध्ये पाठव असे गार्गीला सांगतो.


ते सद्-गृहस्थ अनयच्या केबिनमध्ये जातात.


अनय - या साहेब बसा. आपलं काय काम आहे?


सद्-गृहस्थ - साहेब, मी गोविंदराव. पोफळगावच्या भास्कररावांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. ते माझे चांगले मित्र आहेत. मी खूप मोठ्या अडचणीत आहे. आता तुमच्या कडूनच मला आशा आहे.


अनय - ओह, पोफळगावचे भास्करराव राव, त्यांची केस मी गेल्याच महिन्यात सोडवली. हे बघा काका तुम्ही मला साहेब वगैरे म्हणू नका. तुमच्यासारख्या वयस्कर माणसांनी मला असे म्हटले की, संकोचल्यासारखे होते. तुम्ही मला फक्त अनय म्हणा. भास्करराव बोलले नाहीत का तुम्हाला?


गोविंदराव - भास्कर राव मला बोलले होते यासंबंधी. पण हा तुझा मोठेपणा आहे. आपली यापूर्वी कधीही भेट झालेली नव्हती. त्यामुळे एकदम तुला नावाने हाक मारायला संकोच वाटत होता. पण ठिक आहे तु म्हणतोस तर मी तुला अनयच म्हणेन.


अनय - हां काका, आता कसं बरं वाटतं. आता तुमची अडचण सांगा.


गोविंदराव - मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वेळा माझ्यावर तर खुनी हल्ला देखील झाला आहे. 


अनय - मग तुम्ही पोलिसांत कंप्लेंट केली का? तुमचा कुणावर संशय आहे का? तुमचे कुणाशी वैर आहे का?


गोविंदराव - हो, पहिला हल्ला झाल्यावर लगेचच मी पोलिसांत कम्प्लेंट केली. पोलिसांनी मला चांगले सहकार्य देखील केले.  माझं कुणाशी वैर नाही आणि माझा कोणावर संशय देखील नाही.


अनय - काका तुमच्यावर पहिला हल्ला कधी आणि कसा झाला ते जरा सांगा.


गोविंदराव - साधारण एक महिन्यापूर्वी माझ्यावर पहिला हल्ला झाला. तेव्हा मी मॉर्निंग वॉक साठी तळ्यावर गेलो होतो. तेवढ्यात बाईक वर बसून काळा मास्क घातलेला माणूस समोरून आला. त्याने माझ्यावर गोळी चालवली. परंतु त्याचा नेम चुकला. गोळी माझ्या खूप जवळून गेली. मी घाबरून आरडाओरडा केला, त्यामुळे तो बाईकवाला पळाला. आजूबाजूला नेमकं कोणी नव्हते.


अनय - त्यानंतर पोलिसांनी काय केले.


गोविंदराव - पोलिसांनी कसोशीने तपास केला. एक आठवडाभर मीदेखील बंगल्याच्या बाहेर पडलो नाही. आळीपाळीने एक पोलीस शिपाई आमच्या बंगल्यावर त्यांनी माझ्या संरक्षणासाठी ठेवला. परंतु त्यानंतर काही घडलेच नाही. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण काढून घेतले आणि तपास मात्र चालू ठेवला. 


अनय - नंतर काय झाले?


गोविंदराव - त्यानंतर मला काही भास होऊ लागले.


अनय - भास? कसले भास?


गोविंदराव - रात्रीच्या वेळेस, आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मला मशाली फिरताना दिसू लागल्या. तसेच काही पांढऱ्या आकृत्या दिसू लागल्या.


अनय - तुमच्या घरी कोण कोण असते?


गोविंदराव - मी माझी पत्नी आणि माझी मुलगी. माझा मुलगा परदेशात असतो. तिकडे त्याचे स्वतःचे सॉफ्टवेअर फर्म आहे.


अनय - म्हणजे घरी तुम्ही तिघेच असता. बाकी नोकर वगैरे कोणी?


गोविंदराव - हो, एक नवरा बायकोचे जोडपे आमच्या इथे कामाला आहे. घरातली सर्व देखरेख आणि बागकाम ते दोघे करतात. माझ्या बंगल्याच्या बाजूला दोन रूम आहेत, तेथे ते दोघे जण राहतात.

TREE IN THE GARDEN


अनय - तुम्हाला जे भास होतात, ते घरातील सर्वांनाच होतात का?


गोविंदराव - नाही हो! मलाच एकट्याला हे सर्व भास होतात. कारण मी जेव्हा माझ्या मुलीला आणि पत्नीला याबाबत सांगतो, तेव्हा त्या दोघींना काहीच दिसत नाही. कुणी नसताना मला एकट्याला हे थोडा वेळ दिसते.

 

अनय - म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडतच नाही की काय आता?


गोविंदराव - होय अनय. खरं म्हणजे माझी भरपूर कामे राहून गेलेली आहेत. परंतु आता जो काही मला त्रास होत आहे, त्या भीतीमुळे मला बाहेर पडता येत नाही.


अनय - काका, माझ्या अंदाजाने तुम्ही आता नोकरीतुन रिटायर झालेले असणार.


गोविंदराव - नाही. माझी छोटीशी कंपनी आहे. सध्या माझा पार्टनरच सर्व कामे बघतो.


अनय - अरे वा चांगलंच आहे, तुमची स्वतःची कंपनी आहे ते. तुम्ही एखादा बॉडीगार्ड का नाही ठेवला हा सर्व प्रकार सुरु झाल्यावर?


गोविंदराव - अरे एक चांगला मजबूत बॉडीगार्ड मी ठेवला होता या प्रकारानंतर. दिवसभर तो माझ्याबरोबर असायचा. रात्री गेस्ट हाऊसमध्ये रहायचा. जेमतेम एक आठवडाच होता. परंतु नंतर त्याला देखील माझ्या सारखेच भास होऊ लागले. इथे काहीतरी भुताटकी आहे असे सांगून तो पळून गेला.


अनय - आश्चर्यच आहे फक्त तुम्हाला दोघांनाच भास व्हायचे बाकी कुणाला नाही?


गोविंदराव - माझ्या मिसेस चा आणि मुलीचा भुताखेतांवर विश्वास नाही ना. 


अनय - पुढे काय झाले?


गोविंदराव - हल्ला तर माझ्यावर एकदाच झाला होता. त्या भितीमुळे तुम्हाला बाकीचे सर्व भास होत आहेत, असे माझ्या मिसेस ने आणि मुलीने मला समजावले.

त्यामुळे एक दिवस परत मी कंपनीत जायला सुरुवात केली. त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीतून परतताना माझ्यावर दुसरा हल्ला झाला. मी माझी फोर व्हिलर चालवत होतो. पहिल्या वेळ सारखीच काळा मास्क घातलेली व्यक्ती बाईक वर बसून समोरून आली. रस्त्यावर सामसूम होती. परत त्या व्यक्तीने गोळी चालवली. गोळी माझ्या कार च्या अगदी जवळून गेली आणि माझे प्राण वाचले. ती व्यक्ती मात्र पसार झाली.

अशाच प्रकारे तिसरा हल्ला देखील कंपनीतून परतत असतानाच झाला. सुदैवाने तेव्हादेखील मी वाचलो.


अनय - मग परत तुम्ही पोलिसांत कंप्लेंट केली का?


गोविंदराव - हो परत च्या वेळेस माझ्या बरोबर कम्प्लेंट करण्यासाठी माझी मुलगी आली होती. तेव्हा मला होत असणारे भास देखील मी पोलिसांना सांगितले. तीन वेळा माझ्यावर हल्ला होऊन देखील कुठल्याही वेळी मला साधे खरचटले सुद्धा नाही, तसेच मला वेगवेगळे भास देखील होत होते. त्यामुळे पोलिसांना वेगळीच शंका येऊ लागली. माझ्या डोक्यावर तर परिणाम झालेला नाही ना? असे त्यांना वाटू लागले. पोलिसांनी अधून मधून माझ्या बंगल्यावर येऊन तपास चालूच ठेवला, परंतु मला मानसोपचार तज्ञांना दाखवावे असा माझ्या मुलीला त्यांनी सल्ला दिला.


अनय - मग पोलिसांना तपासात काही मिळाले का? 


गोविंदराव - नाही, त्यानंतर मी खूपच कमी वेळा घराबाहेर पडू लागलो. त्यानंतर माझ्यावर अजिबात हल्ला झाला नाही. परंतु रात्रीचे भास होणे मात्र मधे मधे चालूच राहिले. त्यामुळे पोलिसांनी देखील वारंवार तपास करणे बंद केले. त्यात त्यांची काही चूक नाही. 

माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या आग्रहामुळे मी मानसोपचार तज्ञांकडे त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी काही औषधे दिली. साधारण दहा-बारा दिवस मी औषधे घेतली. पण काहीच फरक पडला नाही. 


अनय - या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते? कशामुळे हे सर्व होत आहे असे तुम्हाला वाटते?


गोविंदराव - मला तर काही कळे नाहीसे झाले आहे. मला ही सर्व भुताटकी वाटत आहे. माझ्या नात्यातील एक व्यक्ती अध्यात्माशी निगडित आहेत. माझ्या विनंतीमुळे ते उद्या सकाळी दहा वाजता माझ्याकडे येणार आहेत. तेव्हा तू देखील उद्या माझ्याकडे तेव्हाच ये.


अनय - काका तुम्हाला असे तर म्हणायचे नाही ना, की भूतांना पकडायला मी तुमच्या नातेवाईकाला मदत करु.

मी हे असले काही करू शकत नाही.


गोविंदराव - अनय, माझा भास्कररावांवर पूर्ण विश्वास आहे. ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. ज्या अर्थी त्यांनी तुझे नाव मला सुचवले, त्याअर्थी तू मला नक्की मदत करू शकतोस. प्लीज तु माझी केस हातात घे.


अनय - काका तुम्ही माझ्यावर रागवू नका, परंतु मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगू इच्छितो.


गोविंदराव - तुला जे काही सांगायचे आहे ते नि:संकोचपणे सांग.


अनय - मी अद्याप पर्यंत भूत पाहिले नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. घडणार्‍या सर्व घटना हे जर तुमच्या मनाचे खेळ असतील तर मी काहीच करू शकत नाही. घडणाऱ्या घटना जर का सत्य असतील तर मी तुम्हाला मदत करू शकतो. 


गोविंदराव - ठीक आहे, उद्या मात्र नक्की ये.


त्यानंतर गोविंदराव घरचा पत्ता अनयला देऊन त्यांच्या घरी निघून जातात.


त्यानंतर अनय, गार्गीला आणि सखाराम काकांना केबिनमध्ये बोलावतो.


अनय - आपल्याकडे एक नवीन केस आली आहे, गोविंदरावांची. त्यामुळे सखाराम काकांना घेऊन, उद्या  सकाळी मी गोविंदरावांच्या बंगल्यावर जाणार आहे. गार्गी उद्या सकाळच्या वेळेत तु ऑफिस सांभाळ. अनय दोघांनाही केसचे स्वरूप थोडक्यात सांगतो.


सखाराम काका - बापरे साहेब, म्हणजे तुम्ही आता भूत-खेत शोधण्याच्या केस पण हातात घेऊ लागलात?


गार्गी - काका, काही पण बोलू नका. सरांनी केस सोडवायला घेतली आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल.


अनय - गार्गी बरोबर बोलत आहे. आपण प्रयत्न तर करून बघू.


दुसर्‍या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अनय आणि सखाराम काका, गोविंदरावांच्या बंगल्यावर पोहोचतात.

सखाराम काकांना अनय गाडीतच थांबवून ठेवतो.

 

दहा वाजायला अजून पाच मिनिटे बाकी असतात. 

गोविंद्राव अनयचे स्वागत करतात. बरोबर दहा वाजता गोविंदरावांचे नातेवाईक येतात. त्यांचे नाव माधव असे असते. ते देखील वयस्कर असतात. 


गोविंदरावांची पत्नी सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन येते. अनय आणि माधव दोघेही नको नको म्हणत असताना देखील गोविंदराव त्यांना चहा नाष्टा घ्यायला लावतात.


त्यानंतर माधव त्यांच्या कामाला सुरुवात करतात. ते थोडावेळ ध्यान लावतात. त्यानंतर सर्व परिसर फिरून येतात. बंगला आणि बाजूचा एरिया मोठा असतो.  साधारण अर्धा तास परिसर फिरून झाल्यावर तिघेजण परत गोविंदरावांच्या बंगल्यात येतात. फिरताना अनय त्याच्या पद्धतीने काम करत असतो. 


माधव - हे बघ गोविंद, तुझ्या बंगल्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात मी पूर्णपणे फिरून आलेलो आहे. परंतु कुठल्याही वाईट शक्तीचे अस्तित्व मला येथे जाणवले नाही.


अनय - माफ करा माधव काका पण मी एक बोलू का?


माधव - बोल, बिनधास्त बोल.


अनय - माझा खरा म्हणजे या सर्व गोष्टींवर विश्वास नाही, परंतु मला देखील येथे फिरतांना काहीच विचित्र जाणवले नाही. तुम्हाला असे काही दिसते का? 


माधव - कित्येक गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. पण त्यामुळे त्या अस्तित्वातच नाहीत असे म्हणून चालत नाही. त्या जरी डोळ्यांनी दिसल्या नाहीत तरी त्यांचे अस्तित्व वेगळ्या प्रकारे जाणवते.


अनय - तुम्हाला काय म्हणायचे आहे? ही सर्व भुताटकी आहे असे तर तुम्हाला वाटत नाही ना?


माधव - निदान मला तरी आत्ता तसे काही जाणवले नाही. यामुळे दोन शक्यता निर्माण झाल्या आहेत. पहिली शक्यता म्हणजे इथे घडणाऱ्या गोष्टी माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर असू शकतात. त्यामुळे त्या मला कळू शकत नाहीत. दुसरी शक्यता म्हणजे येथे काहीच नसेल, फक्त भास असेल.


गोविंदराव - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? ही सर्व भुताटकी नाही का? 


माधव - तेच तर मी तुला सांगत आहे. तुझ्या इथे घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत मी कन्फ्युज आहे. मला तर वाटते अनयने त्याच्या पद्धतीने आता शोध करावा. 


अनय - माझे काम तर मी मगाशीच चालू केले आहे. बंगल्यात आणि बंगल्याभोवती फिरताना माझे सर्वत्र बरोबर लक्ष होते. पण सध्यातरी मला देखील काही पुरावा मिळालेला नाही. 


गोविंदराव निराश होत डोक्याला हात लावून बसतात. 


अनय - काका निराश होऊ नका. मी प्रयत्न करत आहे. 

आता मला तुमच्या कुटुंबीयांशी बोलावे लागेल, तसेच तुमच्या कंपनीत येऊन देखील चौकशी करावी लागेल.


गोविंदराव - तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती सर्व करा, माझी काहीच हरकत नाही.


अनय - प्रथम मी तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी बोलून घेतो. 


अनय दोघींची भेट घेतो. त्यावेळी मात्र तो गोविंदरावांना तेथून जायला सांगतो. गोविंदराव, दोघींची ओळख अनयशी करून देतात, आणि तेथून निघून जातात.


अनय - काकू तुम्हाला काय वाटतंय गोविंदरावांना भास होतात त्याविषयी?


क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -


Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग६शेवटचा)"

मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free



लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग ६ (शेवटचा भाग)


भाग ६ (शेवटचा भाग) 


साधू खुणेनेच त्याला गुहेच्या आत मध्ये जाण्यास सांगतो. 

कुणाल गुहेमध्ये शिरतो. तेथील परिसर अत्यंत पवित्र वाटत असतो. एक दिव्य गंध तेथे दरवळत असतो. गुहेच्या आत मध्ये ठिक-ठिकाणी मशाली पेटवलेल्या असतात. गुहा खूप मोठी असते. थोडे पुढे गेल्यावर कुणालला एका मोठ्या शिळेवर एक तेजःपुंज साधु बसलेले दिसतात. ते ध्यानस्थ असतात. कुणाल तेथे पोहोचल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते त्याला हाक मारतात.


साधु - ये कुणाल, बस त्या समोरच्या शिळेवर.


कुणाल त्या साधु बाबांना नमस्कार करतो आणि शिळेवर बसतो.


कुणाल - तुम्ही मला कसे ओळखता?


साधु - आपली काय फक्त याच जन्मातील ओळख आहे का? 


कुणाल - मला समजले नाही, तुम्ही काय म्हणता ते.


साधु (हसत) - आपली आधीच्या जन्मापासूनची ओळख आहे. तू माझा शिष्य आहेस. त्यामुळेच मी तुला इकडे बोलावून घेतले. 


कुणाल - म्हणजे पुर्वा जे काही म्हणत होती, तसेच तर तुम्हाला काही म्हणायचे नाही ना?


साधु - ती बरोबरच सांगत होती. 


कुणाल - मग मला काहीच कसे आठवत नाही. 


साधु - मृत्यूनंतर परत परत जन्म होत असतो, परंतु सर्वांनाच काही आधीच्या जन्मातले आठवत नाही. खूपच थोड्या लोकांना पूर्वजन्म आठवू शकतो. 


कुणाल - महाराज, मी आता काय करू. 


साधु - मी तुला मागील जन्मताच सांगितले होते, की मायेमध्ये फसू नकोस. मागच्या जन्मात तुझी ध्यान - साधना व्यवस्थित चालू होती. परंतु तू तेव्हा पुर्वाच्या  प्रेमामध्ये फसलास. नाहीतर गेल्या जन्मातच मृत्यूनंतर तुला मुक्ती मिळाली असती. परंतु गेल्या जन्मात अधुऱ्या राहिलेल्या प्रेमामुळे आणि इतर कर्मामुळे हा जन्म धरून तुला एकूण दोन जन्म घ्यावे लागतील. शिवाय ध्यानसाधना व्यवस्थित चालू ठेवावी लागेल. या दोन जन्मामध्ये जर काही अडचण आली नाही, तर तू मोक्ष पदाला पोहोचू शकतोस. 


कुणाल - मुक्ती मोक्ष वगैरे प्रकार मी कधीकधी प्रवचनांमधून ऐकले आहेत. परंतु याबद्दल मला काही माहिती नाही. ध्यान कसे धरावे ते मला काही माहीत नाही. तुम्ही रागावणार नसलात आणि गैरसमज करून घेणार नसलात तर मला एक प्रश्न विचारायचा आहे.


साधु - विचार. मनात काही ठेऊ नकोस. 


कुणाल - लोक म्हणतात ते सिद्ध बाबा तुम्हीच का? मी असे ऐकले आहे की तुमचे वय पाचशे वर्षांहून अधिक असेल. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही माझे गुरु आहात. तर मग तुम्हाला अजून मुक्ती वगैरे कशी मिळाली नाही?


साधु (स्मित हास्य करून) - प्रश्न विचारण्याचा तुझा स्वभाव अजून बदललेला नाही. मागच्या जन्मात देखील असेच प्रश्न विचारून मला तू भंडावून सोडायचास. अरे आम्ही कधीच मुक्त झालेले असतो. परंतु जनकल्याणासाठी आम्हाला येथे पृथ्वीतलावर वास्तव्य करावे लागते. लोक म्हणतात तो सिद्ध बाबा मीच बरं. तुला गेल्या जन्मातील काही आठवत नसेल तरी काहीच हरकत नाही. मी तुला परत ध्यानसाधना शिकवतो. पण त्याआधी फलाहार करून घे. कारण आता जेवणाची वेळ झाली आहे.


तेवढ्यात साधू महाराजांचा एक शिष्य फळे आणि कंदमुळे घेऊन येतो. बाकीचे शिष्य देखील तेथे गोळा होतात. मगाशी कुणालला घेऊन आलेला शिष्य देखील त्यामध्ये असतो. सर्वजण फळे आणि कंदमुळे खातात. त्यानंतर सर्व शिष्य गुहेमधून बाहेर जातात. 


आता सिद्ध बाबा, कुणालला मुक्ती म्हणजे काय, ध्यान धारणा कशी करावी वगैरे सर्व गोष्टी समजावून सांगू लागतात. या सर्व उपदेशामुळे कुणालला संसाराबद्दल विरक्ती वाटू लागते. तसे तो सिद्ध बाबांना सांगतो देखील. 


सिद्ध (साधु) बाबा - अरे ही विरक्ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तुला या जन्मी आणि पुढच्या जन्मी संसार हा करावाच लागेल. संसार करता करता ध्यानसाधना चालू ठेव. ध्यान साधनेमुळे तुला ज्ञानप्राप्ती होईल आणि तू मोक्ष पदाला पोहोचशील. आता रात्र बरीच झालेली आहे. त्यामुळे थोडावेळ ध्यानधारणा करून या गुहेमध्येच तू झोप. उद्या सकाळी उठून तू तुझ्या घरी जा. 


त्यानुसार कुणाल ध्यानधारणा करतो. बराच वेळ त्याचे ध्यान लागते. त्यानंतर त्याला शांत झोप लागते. सकाळी लवकर उठून कुणाल सिद्ध बाबांना नमस्कार करतो आणि त्याच्या रूमवर परततो. 


आज संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल, मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. मुरारी काका टेन्शनमध्ये दिसत असतात. 


कुणाल - काका, माला कशी आहे. काल तिचा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर होता आणि मलादेखील इकडे यायला जमले नाही. 


मुरारी काका (रडत) - साहेब काय सांगू तुम्हाला? मालाला ब्रेन ट्युमर झालेला आहे. 


हे ऐकून कुणालला धक्का बसतो. 


कुणाल - काका, सांगताय तरी काय? माला कुठे आहे? 


मुरारी काका - काल संध्याकाळीच ती शहरातून इकडे आली. तिकडे हॉस्पिटल मध्ये तिच्या सर्व टेस्ट झाल्या. त्यावरून डॉक्टरांना हे असे कळले. डॉक्टरांनी औषधे दिली आहेत. काही दिवसांनी ऑपरेशन करू असे ते म्हणाले आहेत. परंतु ऑपरेशनचा कितपत उपयोग होईल याची त्यांना खात्री नाही. 


कुणाल - काका, मी मालाला जाऊन भेटतो. 


मुरारी काका - जा भेट. तिला थोडं बरं वाटेल.


कुणाल मालाच्या घरी जातो. घरामध्ये काकू आणि माला  दोघीजणी असतात. दोघीजणी उदास बसलेल्या असतात. कुणालला बघून माला रडू लागते.


कुणाल (समजावत) - माला अग रडू नकोस, तुला बरे वाटेल. आता सायन्स किती पुढे गेले आहे, तुला माहिती आहे ना? तुझे ऑपरेशन नक्की यशस्वी होईल. 


माला - कुणाल, मला नक्की बरे वाटेल ना रे. मी आयुष्याची कितीतरी सुंदर स्वप्ने बघितली आहेत. 


कुणाल - काळजी करू नकोस. तुला नक्की बरे वाटेल.


कुणाल थोडा वेळ तिथेच बसतो आणि दोघींशी गप्पा मारतो. कुणालच्या येण्यामुळे वातावरणात थोडा बदल होतो आणि दोघींना थोडे बरे वाटते. काकू जेवणाचा आग्रह करतात. त्यामुळे तेथेच जेऊन कुणाल घरी परततो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुवारी कुणालला बँक हॉलिडे असतो. त्यामुळे एकीकडे गुरुवारी पुर्वाला भेटण्याची ओढ मनाला लागलेली असते, तर दुसरीकडे आपल्या प्रिय मैत्रिणीची ही अवस्था बघून मनाला दुःख देखील होत असते. त्यामुळे मनःशांतीसाठी कुणाल थोडावेळ ध्यानधारणा करतो. 


गुरुवार उजाडतो. कुणाल लवकर आटोपून तयार होतो. पुर्वाला भेटण्याच्या ओढीमुळे कुणाल लवकरच घरातून बाहेर पडतो आणि चालतच सरोवराच्या दिशेने निघतो. नदी ओलांडून नेहमीप्रमाणे तो देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. देवळातून बाहेर पडल्यावर त्याला समोर पुर्वा दिसते. ती त्याच पांढऱ्या घोड्यावर बसून आलेली असते. 


पुर्वा - कुणाल, चल आपण त्या सरोवरावर जाऊन बोलू. 


पुर्वा कुणालला घोड्यावर बसवून सरोवराच्या दिशेने जाते.


इकडे त्याच देवळात माला दर्शनासाठी आलेली असते. ती एका दरवाजातून देवळात प्रवेश करते आणि देवाचे दर्शन घेते. तोपर्यंत दुसऱ्या दरवाजातून कुणाल बाहेर पडतो. माला देवाचे दर्शन घेऊन, पाठीमागे वळते तेव्हा तिला कुणाल देवळाच्या बाहेर पडलेला दिसतो. त्याच बरोबर पुर्वा देखील दिसते. 


कुणाल बरोबर ही सुंदर मुलगी कोण आहे? ही आपल्या गावातील तर नक्कीच नाही - मालाच्या मनात विचार चालू होतात. 

माला कुणालला हाक मारणार, तेवढ्यात कुणाल पूर्वा बरोबर घोड्यावर बसून सरोवराच्या दिशेने जातो. 


माझे तर कुणालवर प्रेम आहे. परंतु कुणालच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी माला त्या दोघांचा पाठलाग करू लागते. परंतु पुर्वा आणि कुणाल दोघे जण घोड्यावर असतात. माला चालत असते. अर्थातच त्यामुळे ती भरपूर मागे पडते.


इकडे पुर्वा आणि कुणाल दोघेजण सरोवरावर पोहोचतात. एका झाडाखाली बसून दोघेजण बोलू लागतात. 


पुर्वा - मला तर वाटले होते तू आज येणारच नाहीस. कारण रविवारी मी तुला जे काही सांगितले त्यामुळे तुझा गैरसमज होण्याची शक्यता जास्त होती. परंतु तुझ्या वरील प्रेमामुळे मी त्या देवळापर्यंत आले आणि तुझी वाट बघू लागले. तेवढ्यात तू देवळातून दर्शन घेऊन बाहेर आलास. त्यामुळे मला खूपच आनंद झाला.


कुणाल - हे बघ, तु जे काही सांगितलेस त्यातील मला काहीही आठवत नाही. तू खरोखरच यक्षकन्या आहेस, की कोण आहेस ते मला माहिती नाही. परंतु तुझ्यावरील  प्रेमामुळे मी इथपर्यंत आलो आहे. जर तू माझ्याशी लग्न करायला तयार असशील तर आजच मी माझ्या आई-वडिलांना तुझ्याबद्दल सांगतो. 


पुर्वा - आईवडिलांना माझ्या बद्दल काय सांगशील? असे सांगशील कि मी एक यक्षकन्या आहे? 


कुणाल - तू बाजूच्या गावात राहतेस असे मी घरी सांगेन. लग्नानंतर एकदा सर्व खरे सांगेन. 


पुर्वा - आपले लग्न होणे कठीण आहे. 


कुणाल - का? असे नकारात्मक का बोलतेस?


पुर्वा - माझ्या काकांपासून तुला धोका आहे.


कुणाल - का? 


पुर्वा - त्यासाठी मला, आपल्या गतजन्मातील कहाणी  तुला सांगावी लागेल. 

साधारण दोनशे वर्षांपूर्वी मी या सरोवरावर नेहमीप्रमाणे आले होते. आमच्या इथे एक उत्सव असल्यामुळे मी बरेचसे सोन्याचे दागिने घातलेले होते. त्याच वेळी शहरातील दोन माणसे येथे आली होती. मला साधारण तरुणी समजून त्यांनी मला पकडायचा प्रयत्न केला. त्या माणसांना इजा पोहोचावी असा माझा हेतू नव्हता. माझ्या दिव्य शक्ती वापरून मी तेथून गायब झाले. थोड्यावेळाने ती दोन्ही माणसे निघून गेल्याचा अंदाज आल्यामुळे मी परत सरोवरावर फिरू लागले. परंतु ती दोन्ही माणसे गेलेली नव्हती. ते दोघे जण मलाच शोधत होते. मी बेसावध आहे असे बघून, त्यातील एका माणसाने माझ्या पायावर बंदुकीची गोळी मारली. मी वेदनेने किंचाळून खाली पडले. त्या वेदनेमुळे मला चक्कर येऊ लागली. 

पण तेवढ्यात तू म्हणजे त्या जन्मीचा "अपुर्व" पुढे आलास. तू जडीबुटी गोळा करण्यासाठी जंगलात आला होतास. माझ्या किंचाळण्यामुळे तू आवाजाच्या दिशेने आलास. त्या दोन माणसांना काही कळायच्या आत, त्यांच्या बंदुका तू हिसकावून घेतल्यास आणि त्यांना पळवून लावलेस. 

त्यानंतर तू माझ्या पायात घुसलेली गोळी काढलीस आणि झाडपाल्याचा लेप माझ्या पायाला लावलास. त्यानंतर आपल्या भेटीगाठी वाढत गेल्या. आपले एकमेकांवर प्रेम बसले. परंतु मी यक्षकन्या असल्यामुळे माझ्या मोठ्या काकांचा या लग्नाला विरोध होता. मनुष्यांबद्दल त्यांच्या मनात राग आहे. त्यामुळे एक दिवस विषारी बाण मारून त्यांनी तुला मारून टाकले. मी खूप रडले. एक दिवस सिद्ध बाबा (म्हणजे तुझे मागच्या जन्मीचे गुरु) भेटले. काही वर्षांनी अपुर्वचा पुनर्जन्म होईल आणि तो तुला भेटेल असे सिद्ध बाबांनी मला सांगितले. त्या आशेवर तुझी वाट पहात मी राहिले.


कुणाल - तू यक्ष कन्या आहेस आणि तुझ्याकडे काही दिव्य शक्ती आहेत यावर आता माझा हळूहळू विश्वास बसू लागला आहे. त्या दिवशी जेव्हा मला नागाने दंश केला तेव्हा या सरोवरावरून तू मला दुसऱ्या एका झऱ्यापर्यंत नेलेस. एकट्या-दुकट्या मुलीला ते शक्य नव्हते. तेव्हा तिथे दुसरे तर कोणीच नव्हते. मग तेव्हा तू मला कसे नेलेस? तसेच जडीबुटी च्या साह्याने तू माझा प्राण वाचवलास.

त्यादिवशी तू  मला काही क्षणांतच फळे आणून दिलीस. दुसऱ्या वेळेस जेव्हा मी येथे आलो तेव्हा तू माझ्यासाठी दहा मिनिटांतच सुग्रास जेवणाने भरलेली २ चांदीची ताटे घेऊन आलीस. इथे जवळपास तर कुणाची वस्ती दिसत नाही. तरी देखील इतक्या लवकर तू ते पदार्थ कसे घेऊन आलीस. तसेच तुझ्याकडे बघितल्यावर दिव्यत्वाचा भास होतो. 

या सर्व गोष्टी माझ्या अगोदर ध्यानात आल्या नाहीत. अजून देखील मला काही आठवत नसले, तरी आता काही गोष्टी मला समजू लागल्या आहेत. तुझ्याकडे खरोखरच काही दिव्य शक्ती आहेत हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. 


पुर्वा - जन्ममृत्यू माझ्या हातात नाही. ते देवाच्या हातात आहे. देवाची इच्छा होती म्हणून तू यावेळी नागाच्या त्या विषारी दंशापासून देखील वाचलास. मी फक्त निमित्तमात्र झाले. नाहीतर गेल्या जन्मात मी तुला मरू दिले असते का? तेव्हा तो विषारी बाण तुझ्या हृदयात आरपार घुसला होता. त्यामुळे तेव्हा मी तुला वाचवू शकले नाही.


कुणाल - माझे हे खरंच भाग्यच आहे, की तुझ्या सारखी सुंदर आणि दिव्य पत्नी मला लाभणार आहे. 


पुर्वा - तू साधारण मनुष्य असतास तर आपले कुठल्याच जन्मात प्रेम शक्य नव्हते. मला सिद्ध बाबांकडून नंतर समजले की ध्यान साधनेमुळे मागच्या जन्मातच तू दिव्यत्वाला पोहोचला होतास. तेव्हादेखील तु साधारण मनुष्य राहिला नव्हतास. त्यामुळे हा आपला विवाह शक्य होता. परंतु माझ्या काकाला हे समजत नव्हते. माझ्या प्रेमात पडल्यामुळे तू मायेमध्ये फसत गेलास. 


एवढ्यात बाजूच्या झाडीमध्ये कोणीतरी वावरत असल्याचा भास कुणाल आणि पुर्वाला झाला. 


पुर्वा - कुणाल सावध रहा. माझा काका बहुतेक परत तुझा घात करण्यासाठी आलेला आहे.


तेवढ्यात एक बाण झाडीमधून सुटतो. तो बाण कुणालच्या दिशेने येऊ लागतो. अचानक एका मुलीची  आर्त किंकाळी आसमंतात घुमते. बाण मालाला लागलेला असतो.


कुणाल (चिडून) - एका निष्पाप मुलीचा जीव घेऊन कुणाला काय मिळाले? कोण आहे त्याने पुढे यावे. माझ्या प्रिय मैत्रिणीचा जीव घेणाऱ्या त्या पापी व्यक्तीला मी सोडणार नाही. 


एवढ्यात तिथे एक दिव्य पुरुष प्रकट होतो. त्याच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वहात असतात. 


पुर्वा (चिडून) - काका मनुष्यांवरील तुमच्या रागामुळे आज एका निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे. आता यावेळी जर माझा आणि कुणालचा म्हणजेच अपुर्वचा  विवाह झाला नाही तर मी या जगात अजिबात राहणार नाही.


पुर्वाचे काका - मनुष्या वरील रागामुळे मी आज खूप मोठे पापकर्म केले आहे. मी या मुलाला मारू इच्छित होतो. कारण आज पर्यंत मला वाटत होते की मनुष्य हा दुष्टच असतो. तो प्रेम करूच शकत नाही.

परंतु या मुलीने मध्ये येऊन हे सिद्ध केले की मनुष्यामध्ये अजून देखील प्रेम शिल्लक आहे. आपल्या माणसांसाठी मनुष्य स्वतःचा जीव देखील धोक्यात घालू शकतो. मानवांमध्ये अशा व्यक्ती देखील अजून शिल्लक आहेत. याच तर दिव्य व्यक्ती आहेत. मी चुकलो. मला माफ करा. पुर्वा मागच्यावेळी त्या मुलाला मारून मी किती मोठे पाप केले, हे आता मला जाणवू लागले आहे.


कुणाल रडत रडत मालाच्या जवळ जाऊन बसतो. 


कुणाल - माला, तुझे प्रेम मला समजलेच नाही ग. मला माफ कर. माझ्यासाठी तू का तुझा प्राण दिलास? 

आणि तू येथे कशी काय आलीस?


माला (धाप टाकत) - कुणाल, तुझ्या बरोबर संसार करण्याची मी खूप स्वप्न पाहिली होती रे. परंतु नंतर मला ब्रेन ट्यूमर झाल्याचे कळले. त्यामुळे आता आपले स्वप्न पूर्ण होणार नाही हे मला कळून चुकले. त्या कठीण परिस्थितीत देखील तू मला धीर देत होतास. 

मगाशी देवाचे दर्शन घेण्यासाठी मी नदी पलीकडच्या देवळात आले होते. देवाचे दर्शन घेऊन बाहेर बघितले. तेव्हा तू देवळाच्या बाहेर पडलेला होतास. तुझ्याबरोबर एक तरुणी होती. तुम्ही दोघे जण घोड्यावर बसून इकडे निघुन आलात. तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला समजून घ्यायचे होते. त्यामुळे मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आले. चालत आल्यामुळे माझा थोडा वेळ गेला. मी तुमचे दोघांचे बोलणे ऐकले. 

मी अशी पण ब्रेन ट्यूमर मुळे मरणारच होते. पण मृत्यूपूर्वी मी तुझ्या कामी आले याचा मला आनंद वाटत आहे.

कुणाल, तुझे भाग्य थोर आहे. त्यामुळे पुर्वा सारखी सुंदर यक्ष कन्या तुला पत्नी म्हणून मिळत आहे. 


कुणाल - माला, मी तुला काही होऊ देणार नाही. पूर्वा हिला वाचव गं. नाहीतर तुझा तो घोडा बोलव. आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.


तोपर्यंत पुर्वा बाजूचा झाडपाला घेऊन तेथे हजर होते. मालाच्या पोटात रुतलेला बाण ती बाहेर काढते. तेथे झाडपाला लावते. 


माला - पुर्वा, याचा आता काही उपयोग नाही आहे गं. माझा प्राण आता चालला. फक्त एकच इच्छा आहे. कुणाल या जन्मी आपला संसार होऊ शकला नाही. निदान पुढच्या जन्मी तरी आपला संसार होऊ दे. 


कुणाल खूप रडू लागतो. 

झालेला प्रकार कुणाल, माला आणि डॉक्टर काकांच्या घरी समजतो. सर्वांना खूप दुःख होते. परंतु आता याची वाच्यता कुठे करायची नाही असे ते ठरवतात.


एका चांगल्या मुहूर्तावर कुणाल आणि पुर्वा चा विवाह होतो. 

आत्तापर्यंत कुणालच्या लक्षात आलेले असते की सिद्ध बाबांनी अजून एक जन्म घ्यावा लागेल असे का सांगितले... (अर्थात माला बरोबरचे ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी)  


कुणाल (मनात)  -  बस्स. आता आणि पुढच्या जन्मात सावध रहायचे. फक्त मालाबरोबरचे मुख्य आणि इतरांबरोबरचे शिल्लक ऋणानुबंध पूर्ण करायचे. जर पुढच्या जन्मात अजुन एखादी नवीन माला किंवा पुर्वा भेटली तर या चक्रामध्ये मी असाच खोल खोल अडकत जाईन....


समाप्त

 

या ब्लॉगवरील पुढील कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग५)"

मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free


लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग ५


भाग ५ 


कुणाल - तुम्ही इथे रोज येता का? तुम्हीदेखील जडीबुटी न्यायला येता का?


पुर्वा - सर्वात आधी अहो वगैरे म्हणणे बंद कर. मी नाही का तुला नावाने हाक मारते, मग तू देखील मला नावानेच हाक मार.


कुणाल - म्हणजे आपण फ्रेंडशिप करू असे तुम्ही म्हणताय तर?


पुर्वा - काय बोललास?


कुणाल - "फ्रेंडशिप" 


पुर्वा - ते काय असते?


कुणाल - तुम्हाला फ्रेंडशिप सुद्धा माहित नाही. तुम्ही शाळा-कॉलेजमध्ये गेला आहात की नाही?


पुर्वा - आमच्या इथे शाळेत वगैरे जावे लागत नाही. आमचे आईवडील आम्हाला घरीच शिकवतात.


कुणाल - अहो फ्रेंडशिप म्हणजे मैत्री


पुर्वा - असे सरळ बोल ना मग. ठीक आहे आपण फ्रेंडशिप करू.


कुणाल मनातच विचार करतो की ही मुलगी हुशार दिसते. आपण बोललेला "फ्रेंडशिप" शब्द तिने लगेचच उचलला.

कुणाल फ्रेंडशिप साठी हात पुढे करतो.

पुर्वा देखील त्याच्या हातात हात मिळवते. 

तिचा हात अत्यंत नाजूक आणि मऊ असतो.


पुर्वा - आता तरी मला नावाने हाक मार.


कुणाल (हसत) - हो नक्कीच पुर्वा. 


पुर्वा - चल आपण त्या सरोवरापाशी ते मोठे वडाचे झाड आहे ना त्याच्या खाली जाऊन बसू.


कुणाल - चालेल. 


दोघेही झाडाच्या खाली जाऊन बसतात. आता मगाचचेच   सृष्टीसौंदर्य कुणालला स्वर्गीय सौंदर्य वाटू लागते.


कुणाल - तुझा मोबाईल नंबर दे ना.


पुर्वा (विस्मयाने बघत) - ते काय असते? 


कुणाल (डोक्याला हात लावत) - तुला मोबाईल नाही माहिती. अगं कुठच्या दुनियेत वावरते तू?


कुणाल तीला खिशातील मोबाईल काढून दाखवत सांगतो याला मोबाईल असे म्हणतात.


पुर्वा (हसत) - तसे बघितले तर मी वेगळ्याच दुनियेत राहते. 


कुणाल - तसे पण तू आदिमानव किंवा अडाणी वाटत नाहीस. असे वाटत आहे की तुमच्या गावाचा या बाहेरील दुनियेशी संबंधच नाही. पण तुमच्या इथे ग्राम विकास अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी नक्कीच येत असतील ना?


पुर्वा - तू म्हणतोस तसे आमच्या येथे कोणीही येत नाही.  पण आमचे जीवन व्यवस्थित चालू आहे. 


कुणाल - हो ते तर तुझ्याकडे बघून कळतेच आहे. चांगली सुसंस्कृत आणि खात्यापित्या घरातील दिसतेस. 


पुर्वा (हसत) - काहीपण बोलतोस रे?


कुणाल - खरं तेच बोलतोय, तु सुसंस्कृत नाहीस का?

बरं ते जाऊदे तुझ्या गावाचे नाव काय आहे?


पुर्वा - अलकानगरी  


कुणाल - वा छान नाव आहे. एकदा यायला पाहिजे तिकडे. 


पुर्वा - नाही, तुला नाही येता येणार तिकडे.


कुणाल - का बरं, तिकडे यायला काही पास वगैरे लागतो की काय?


पुर्वा - तसेच समज. बरं ते जाऊदे. तुला भूक लागली असेल ना? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते.  आता दुपार झाली आहे. थोडावेळ बस येथेच, मी  पटकन येते.

कुणाल काही बोलणार इतक्यात पुर्वा तेथून निघून जाते.

दहा मिनिटांतच पूर्वा परत येते. तिच्या हातामध्ये एक मोठा बॉक्स असतो. त्याच्यावर कव्हर असते. 

पुर्वा बॉक्सचे कवर उघडते आणि सुंदर अशा अन्नपदार्थांचा घमघमाट तिथे दरवळू लागतो. 

बॉक्समधून ती जेवणाने भरलेली दोन चांदीची ताटे बाहेर काढते. त्यातील एक ताट ती कुणाल समोर ठेवते आणि एक स्वतःला घेते. 

कुणाल आश्चर्याने तिच्याकडे बघत बसतो. 


पुर्वा - पोटभर जेव आता. 


कुणाल जेवणासाठी घास घेणार इतक्यात,


पुर्वा - अरे थांब असा रे कसा तू? जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवावे आणि देवाचे नाव घ्यावे. तेवढे सुद्धा तुला माहिती नाही?


कुणाल - सॉरी बरं.

कुणाल ताटाभोवती पाणी फिरवतो आणि देवाचे नाव घेतो.


कुणाल - हे सर्व काय ग? 


पुर्वा - काय म्हणजे? जेवण आहे हे.


कुणाल (हसत) - तुझ्याकडे काही जादूची कांडी वगैरे आहे काय? तू गेलीस काय आणि दहा मिनिटात आलीस काय? आणि येताना हे चांदीचे ताट भरून जेवण घेऊन आलीस. हे कसं काय जमतं तुला? याचा अर्थ तू इथे जवळच कुठेतरी राहतेस. 


पुर्वा - नाही रे, माझे घर लांब आहे. तू पहिले जेव बरं.


दोघेजण जेवू लागतात. जेवण अत्यंत सुग्रास झालेले असते. जेवणात अत्यंत सुंदर अशी पक्वान्ने देखील असतात. पुर्वा कुणालला आग्रह करून करून पदार्थ वाढत असते. कुणाल भरपूर जेवतो. जेवण झाल्यावर तेथील सरोवराचे पाणी पितो. यापूर्वी तो दोन तीन वेळा सरोवरावर येऊन गेलेला असतो, परंतु पाण्याची चव घेतलेली नसते. आता मात्र तहान लागल्यामुळे तो ते पाणी पितो. पाणी अत्यंत मधुर असते. 


कुणालच्या मनाची चलबिचल चालू असते. एक आठवडाभर हिचाच विचार माझ्या मनात घोळत होता. हिने अशी कोणती जादू माझ्यावर केली आहे? पण हे सर्व पुर्वाला विचारायला कुणालला संकोच वाटत होता. तो तिच्याकडे एकटक बघत राहतो.


पुर्वा - काय बघतोयस?


कुणाल मनाचा हिय्या करून तिच्याशी सर्वकाही बोलायचं ठरवतो.


कुणाल - तू खूप सुंदर आहेस. तुझे मन देखील निर्मळ आहे. मला तू खूप आवडतेस.


पुर्वा (लाजून) - तू उगाचच माझी स्तुती करू नको.


यापूर्वी कुणालला प्रेमाचा वगैरे काही अनुभव नसतो. परंतु ही रागावली नाही आणि लाजली म्हणजे यातच सर्व काही आले, असे त्याच्या लक्षात येते.

बिचारी माला मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम करत असते. परंतु याची त्याला कल्पनाच नसते. 


कुणाल - मी तुझी खोटी स्तुती करत नाही आहे. लवकरच मी माझ्या आई-वडिलांना तुझ्याविषयी सांगेन आणि आपण लग्न करू.


पुर्वा (गंभीर होऊन) - ते या जन्मी सुद्धा शक्य होईल की नाही याबाबत शंकाच आहे. त्याला कारण म्हणजे आपल्या मधील अंतर आहे. तुमचा प्रदेश वेगळा आणि आमचा प्रदेश वेगळा.


कुणाल - हे बघ, भलेही तू माझ्यासारखी शिकलेली नसशील. तरीपण तू जशी आहेस तशी मला पसंत आहेस. माझ्याबरोबर लग्न करुन तु शहरात आलीस की तिथल्या चालीरीती तू आपोआप शिकशील. 


पुर्वा - शिक्षणाचे म्हणत असशील  तर आम्ही तुमच्या पेक्षा खूप प्रगत आहोत. मला संस्कृत भाषा आणि इतर बऱ्याच विद्या येतात. फक्त तुमच्यासारखी आधुनिक शिक्षण पद्धती आमच्याकडे नाहीत. 


कुणाल - मगापासून मी बघतोय, तू आमचा प्रदेश तुमचा प्रदेश असे काहीतरी म्हणत आहेस. पण तुम्ही देखील आमच्यासारखेच या पृथ्वीवर राहता ना? भाषादेखील तू माझ्यासारखीच बोलत आहेस. तू माझी गंमत तर करत नाहीस ना?


पुर्वा - आपल्या दोघांमध्ये एक मुख्य फरक आहे. तू मानव आहेस आणि मी ...


कुणाल - बोल तू काय बोलतेस? तू मानव नाहीस? मग कोण आहेस? 


पुर्वा - मी यक्षकन्या आहे. 


कुणालला दोन मिनिटे काय बोलावे ते कळे नाहीसे झाले.


कुणाल - ए  आता गंमत भरपूर झाली. तुला मी आवडलो नसलो तर तसं सांग. मी आत्ता इथून निघून जातो. परत कधी तुला भेटणार नाही.


पुर्वा (काकुळतीला येऊन) - कुणाल, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी गंमत करत नाही आहे. 


कुणाल - मग आतापर्यंत बाकी कोणाला कशी नाही दिसलीस? माला आणि मुरारी काका देखील येथे बऱ्याच वेळा येतात. त्यांनादेखील तू कधी भेटली नाहीस. मी तर येथे नवखा, मला कशी दिसतेस?


पुर्वा - कारण मी तुला आधीपासून ओळखते.


कुणाल - कसं शक्य आहे? मी तर इथून खूप लांब राहतो, आत्ता ट्रान्सफर झाल्यामुळे इकडे आलो.


पुर्वा - ही ओळख आत्ताची नाही. गतजन्मातील आहे. दोनशे वर्षांपूर्वीची.


कुणाल - माझा गत जन्मावर विश्वास नाही. 


पुर्वा - गत जन्मातील आपल्या प्रेमामुळेच आज आपण एकत्र आहोत. प्रत्येकाचे कोणाशीतरी ऋणानुबंध असतात. त्यामुळे पुढील जन्मात आधीच्या जन्मातील व्यक्ती एकत्र येतात. त्यांच्यातील नाती वेगळी असू शकतात. तुला काही आठवत आहे का?


कुणाल - नाही, मला काहीच आठवत नाही.


पुर्वा - हे बघ तू दोन दिवस विचार कर. काही आठवते का ते बघ. ज्याअर्थी नियतीने या जन्मात तुझी माझ्याशी भेट घडवून आणली, त्याअर्थी तुला आधीच्या जन्मातील गोष्टी नक्की आठवतील. कारण मी जर का तुला काही सांगितले तर त्यावर तुझा विश्वास बसणे कठीण आहे. 


कुणाल - जर मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा  असे ठरवलेच, तरी देखील एक प्रश्न पडतोच, की मला माझा गत जन्म एवढ्या लवकर कसा आठवेल?


पुर्वा - तुझ्या लक्षात येण्यासाठी एक छोटीशी माहिती मी तुला सांगते.


कुणाल - सांग 


पुर्वा - गेल्या जन्मीचे तुझे नाव "अपुर्व" असे होते. तेव्हा तू वैद्य होतास. तेव्हादेखील तू असाच जडी - बुटी गोळा करायला इकडे यायचास. एवढेच मी आत्ता तुला सांगते.


कुणाल - हे बघ तू जे काही सांगत आहेस ते माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे. आत्ताच्या गुरुवारी हॉलिडे आहे, म्हणजे मला सुट्टी आहे. त्या दिवशी मी तुला परत भेटायला येईन.


पुर्वा - नक्की ये मी तुझी वाट बघेन.


आता पुर्वा परत त्या पांढऱ्या घोड्याला बोलावते. घोड्यावर दोघेजण स्वार होतात. घोडा परत त्या देवळापर्यंत बरोबर पोहोचतो. कुणाल आणि पुर्वा देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. माझे पुर्वाशीच लग्न होऊ दे अशी मागणी कुणाल मनातल्या मनात देवाकडे करतो. पुर्वा देखील मनातल्या मनात हेच मागणे मागते. कुणाल पुर्वा चा निरोप घेऊन घरी परततो. 


कुणालच्या मनात प्रश्नांवर प्रश्न येत असतात. ही आपली गंमत तर करत नाही ना? असे कुणालला परत परत वाटत असते. 

नाही, पुर्वा अशी नाही, मी तिच्या डोळ्यांत प्रेम बघितले आहे - अशीच समजूत कुणाल स्वतःच्या मनाची घालतो.


दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कुणाल बँकेत जातो. बँकेचे कामकाज चालू होते. सोमवार असल्यामुळे बँकेमध्ये थोडी जास्तच गर्दी असते. लंच टाईमला कुणाल आणि त्याचे स्टाफ मेम्बर्स डबा खायला एकत्र बसतात. नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा सुरू होतात. इतक्यात मोहिनी मॅडम काहीतरी वेगळेच सांगतात.


मोहिनी मॅडम - सर, मी जिथे राहते ना, तिथे बाजूलाच एक आजी राहतात. त्या साधारण ८० वर्षांच्या आहेत. त्या सांगत होत्या की या गावाच्या बाजूला जे जंगल आहे तेथे एक साधू बाबा राहतात. त्यांना सिद्ध बाबा असे म्हणतात. ते खूप मोठे सिद्धपुरुष आहेत. त्यांचे वय देखील पाचशे वर्षांहून अधिक आहे. फक्त पुण्यात्म्यांनाच त्यांचे दर्शन होते. त्या आजींना संपूर्ण आयुष्यात ते चार वेळा भेटलेले आहेत. 


सर्वजण कुतुहलाने मोहिनी मॅडम काय सांगत आहेत ते ऐकत असतात.


कुणाल (मुद्दामच) - मी देखील ऐकले आहे की त्या जंगलाच्या पलीकडे यक्षांची वस्ती आहे.


मोहिनी मॅडम - अय्या सर, तुम्हाला कसे माहिती? त्या  आजी देखील असेच काहीसे सांगत होत्या.


कुणाल - नाही, तसे काही विशेष मला कळले नाही. परंतु इथले गावकरी म्हणतात म्हणून म्हणालो. पण या सर्व दंतकथा असणार. 


लंच टाईम नंतर सर्वजण आपापल्या कामाला लागतात.


रात्रीचे जेवण झाल्यावर कुणाल डॉक्टर काकांकडे जातो. इकडले तिकडले विषयी झाल्यावर, कुणाल सहजच आज दुपारी लंच टाईम ला झालेला विषय काका काकुंच्याजवळ बोलतो.


डॉक्टरांची मिसेस - आता खरे-खोटे काय ते माहिती नाही. परंतु माझ्या सासूबाई देखील त्या सिद्ध बाबांविषयी सांगत असत. आमच्या एका पूर्वजांचे ते गुरू होते असे सासुबाई सांगत. 


कुणाल - इंटरेस्टिंग आहे. एक एक नवीन माहिती पुढे येत आहे.


डॉक्टर - अरे ती माझ्या पणजोबांच्या विषयी सांगत आहे, म्हणजे माझ्या पणजोबांचे सख्खे भाऊ.

त्यांना तर जडीबुटी विषयी खूप ज्ञान होते. माझे आजोबा लहानपणी सांगायचे की त्या सिद्ध बाबांनी, त्यांच्या काकांना काही दिव्य जडीबुटी विषयी माहिती सांगितली होती. त्यांनी जडीबुटी वर आधारित एक छोटासा ग्रंथदेखील लिहिलेला होता. त्या ग्रंथाचे नाव "अपुर्वाई"   माझ्याकडे तो ग्रंथ देखील आहे. 


कुणाल (आश्चर्याने) - काय नाव म्हणालात? "अपुर्वाई"

का? हेच नाव का ठेवले? 


डॉक्टर - का म्हणजे काय? त्यांचे नाव "अपुर्व" असे होते. त्यांच्या नावाशी संबंधित म्हणून त्यांनी असे ग्रंथाचे नाव ठेवले असणार. 


"अपुर्व" हे नाव ऐकून कुणालला धक्का बसला. पुर्वा ज्या   अपुर्व बद्दल बोलत होती तो हाच तर नाही ना असे त्याला वाटून गेले. पुर्वाच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असे कुणालला जाणवू लागले. 


कुणाल - अरे वा काका, म्हणजे तुमचे पूर्वज खूपच हुशार होते. मग त्यांची पुढची पिढी कुठे असते?


डॉक्टर - अरे त्यांचे लग्न झाले नव्हते. वयाच्या साधारण ३०व्या वर्षी एका विषारी बाणामुळे त्यांचा मृत्यू झाला. तो बाण त्यांना कोणी आणि का मारला ते मात्र गुढच राहिले.


कुणाल - अरेरे वाईट झाले. अशा हुशार माणसाचा या पद्धतीने मृत्यू व्हायला नको होता.


थोडावेळ गप्पा मारून कुणाल तेथून निघतो. आता कुणालच्या मनाला त्या सिद्ध बाबांना भेटायची ओढ लागते. खरंच असे कोणी सिद्ध बाबा असतील का? आणि असले तर ते मला भेटतील का? कुणालच्या मनात विचार सुरू होतात. घरी पोहोचल्यावर कुणाल झोपी जातो.


रात्री कुणालला एक स्वप्न पडते. स्वप्नात त्याला एक दिव्य तेज दिसते. त्या तेजातून आवाज येत असतो की, "नदी पलीकडच्या देवळात ये". कुणाल दचकून जागा होतो. आपल्याला स्वप्न पडल्याचे त्याच्या लक्षात येते. थोड्यावेळातच त्याला परत झोप लागते. 


सकाळी उठल्यावर कुणालला तेच स्वप्न आठवत असते.  मला जे स्वप्न पडले, तो भास तर नव्हता ना? कुणाल विचार करत असतो. आज संध्याकाळी नदीपलीकडे च्या देवळात जाऊन येऊ का? कुणालला प्रश्न पडतो. संध्याकाळचे संध्याकाळी ठरवू असे कुणाल ठरवतो. बँकेत जायला उशीर होत असल्यामुळे कुणाल पटापट आटोपून तयार होतो. 


संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल थेट नदी पलीकडच्या देवळात जातो. तो देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. इतर स्वप्नांच्या सारखेच ते एक स्वप्न होते. पण ठीक आहे, त्यामुळे माझे देवाचे दर्शन तर घेऊन झाले असे कुणाल स्वतःशीच पुटपुटतो. कुणाल देवळात बसून बाहेर बघत असतो. तेवढ्यात त्याला कोणीतरी  एक साधू बाहेरून हात करत असताना दिसतो. कुणाल त्या साधूकडे जाऊ लागतो. तो साधू पुढे चालू लागतो. कुणाल त्यांना हात मारून थांबा थांबा असे सांगत असतो. परंतु तो साधू पुढे जंगलात चालतच राहतो. ही वाट त्या सरोवराकडे जाणारी नसते. कुणालसाठी हा परिसर अनोळखी असतो. आता रात्र होऊ लागली असते. थोड्याच वेळात तो साधू एका गुहेपाशी येऊन थांबतो. 


कुणाल - महाराज, तुम्ही मला कुठे घेऊन आलात?


क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग४)"

मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free



लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग ४


भाग ४ 


दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डॉक्टर काकांची बाईक घेऊन कुणाल एकटाच जंगलाच्या दिशेने निघतो.
नेहमीप्रमाणे नदी क्रॉस केल्यावर देवळाच्या येथे कुणाल बाईक पार्क करतो. देवाचे दर्शन घेऊन कुणाल देवळातून बाहेर पडतो. आज माला बरोबर नसल्यामुळे कुणालला एकटे एकटे वाटत असते. थोडे पुढे गेल्यावर जडीबुटी आणि औषधी वनस्पती मिळायला सुरुवात होते. त्या सर्व जडीबुटी गोळा करत करत कुणाल पुढे चालत राहतो. आज सरोवराच्या परिसरात जायचे असते. 

आज डॉक्टर काकूंनी चहा आणि डब्यामध्ये जेवण दिलेले असते. आज जंगलात जाणार असल्याचे कुणालने मुरारी काकांना सांगितलेले नसते. आधीच मुरारी काकांचा पाय फ्रॅक्चर झालेला आणि त्यात मालाचे डोके दुखत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपण कुठे त्रास द्यायचा? म्हणून आज जंगलात जाणार असल्याचे कुणाल त्यांना सांगत नाही. 

थोडे पुढे आल्यावर कुणाल एका झाडाखाली बसून थर्मास मधील चहा कपात ओतुन पिऊन घेतो. नंतर परत तो पुढे चालू लागतो. दुपारी बारा वाजेपर्यंत तो सरोवराजवळ येऊन पोहोचतो. आता सपाटून भूक लागलेली असते. त्यामुळे डॉक्टर काकूंनी दिलेला डबा उघडून तो खाऊ लागतो. कुणाल डबा खाऊन झाल्यावर थोडावेळ विश्रांती घेतो. 

थोड्यावेळातच कुणाल त्याचे काम परत सुरु करतो. औषधी वनस्पती काढत असताना, अचानक एक पिवळा जर्द नाग त्याच्या बोटाला कडाडून चावतो. आता पुढे काय करावे हे कुणालला कळत नाहीसे होते. तिथे मोबाईलला रेंज देखील नसते. दोनच मिनिटात कुणाल बेशुद्ध पडतो. 


कुणाल डोळे उघडून बघतो. बाजूला थोडेसे धुके पसरलेले असते. मी मेलो तर नाही ना? मी आत्ता कुठे आहे? असे अनेक प्रश्न कुणालला पडतात. कुणाल उठून बसला राहतो आणि आजूबाजूला बघू लागतो. हा परिसर त्याला नवखा असतो. सभोवतालचे दृश्य अत्यंत दिव्य असते. जवळच्या एका हिमशिखरावरून  आलेला एक झरा खाली वाहत गेलेला असतो. आयुष्यात कधी न बघितलेली सुंदर फुले तिथे उमललेली असतात. मी स्वप्नात तर नाही ना असे कुणालला वाटून जाते.

तितक्यात एक मधुर आवाज येतो, आता बरं वाटतंय ना तुला?
कुणाल मागे वळून बघतो, आणि बघतच बसतो. एक निळ्या रंगाची साडी परिधान केलेली अशी, सुंदर गोरीपान तरुणी त्याच्या मागे बसलेली असते. तिच्याकडे बघुन दिव्यत्वाचा भास होत असतो. 

कुणाल - तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे? असे एकामागून एक प्रश्न तो त्या तरूणीला विचारू लागतो. 

तरुणी (हसत) - अरे किती प्रश्न विचारशील? जरा सावकाश.

कुणाल (स्वतःच्या हाताकडे बघत) - मला नाग चावला होता ना? मग मी ठीक कसा झालो? माझ्या बोटाला हा पाला कसला लावला आहे?

तरुणी - तो नाग अत्यंत विषारी होता. बरे झाले मी वेळेतच तिथे आले. येथील औषधी वनस्पतींचा रस मी तुझ्या तोंडात घातला. तु बेशुद्ध पडला होतास. या झर्‍याच्या पाण्याने दंशाचा दाह कमी होतो, म्हणून मी तुला पटकन इथे घेऊन आले आणि तुझे हात झर्‍याच्या पाण्याने धुतले. त्यानंतर दिव्य वनस्पतींचा पाला, वेलींच्या साह्याने तुझ्या बोटाला बांधून ठेवला. आता धोका टळला आहे. थोड्याच वेळात तुझे विष पूर्णपणे उतरेल.

कुणाल - थँक यु. तुम्ही माझा जीव वाचवला, तुमचे आभार कसे मानू ते मला कळत नाही. पण मला काही प्रश्न पडले आहेत. एवढ्या निर्जन परिसरात तुम्ही इथे कशा? तुमचे नाव काय? तुम्ही राहता कुठे?

तरुणी - कसे रे तुला एवढे प्रश्न पडतात? पण ऐक, माझे नाव पुर्वा.  मी येथील जवळच्या परिसरात राहते. येथे आमचे वरचेवर येणे-जाणे असते. तुझे नाव काय?

कुणाल - माझे नाव कुणाल. म्हणजे इथे सुद्धा लोकवस्ती आहे? मला गावातील कोणच कसे बोलले नाही?

पुर्वा - तू इथे नवीन आहेस, त्यामुळे तुला माहीत नाही. मी सुद्धा काही या सरोवराच्या जवळ राहत नाही. आमचे गाव सुद्धा येथून लांबच आहे. 

कुणाल - इतका दिव्य परिसर मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. 

पुर्वा - हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा अजून दिव्य परिसर या हिमालयाच्या सभोवती आहेत. 

कुणाल (आजूबाजूला बघत) - जडीबुटी गोळा करण्यासाठी मी गोणी आणलेल्या होत्या. काही गोणीमध्ये जडीबुटी आणि औषधी वनस्पती भरल्या देखील होत्या. माझ्या गोणी कुठे गेल्या?

पुर्वा - काळजी करू नकोस. तुझ्या सर्व गोणी सरोवराच्या बाजूला आहेत. 

कुणालला पुर्वा खूप आवडली होती. तिच्याशी बोलतच राहावे असे त्याला वाटत होते. शिवाय पुर्वाने कुणालचा जीव देखील वाचवला होता. पहिल्या भेटीतच प्रेम होणे ते हेच का? असा प्रश्न कुणालला पडला. 

कुठची कोण मुलगी, तिने माझा जीव काय वाचवला, आणि मी तिच्या प्रेमात पडायचे? हे वेड्यासारखे विचार माझ्या मनात का येत आहेत? अशाप्रकारे कुणालच्या मनात विचारचक्र सुरु झाले.

पुर्वा - कसला विचार करत आहेस?

कुणाल (भानावर येत) - नाही, काही नाही.

पुर्वा - थांब तुला भूक लागली असेल. तुझ्यासाठी मी थोडी फळे आणते. 

कुणाल - अहो नको, तुम्ही कशाला त्रास घेत आहात?

पुर्वा - नको कसं? थांब जरा. मी आलेच.

पुर्वा पटकन तिथून निघून जाते. पाच मिनिटांतच ती परत येते. येताना ती केळी आणि डाळिंब घेऊन येते. 

कुणाल - हि फळे कुठून आणलीत? 

पुर्वा - इथे जवळच झाडे आहेत. तू खाण्याचे काम कर.

कुणाल - मी एवढी सगळी फळे नाही खाऊ शकत. पण तुम्ही आणलीच आहेत तर थोडीशी खातो. 

कुणाल एक डाळिंब फोडतो त्याचे दाणे काढतो. थोडे दाणे तो खातो आणि थोडे पुर्वाला देतो. त्यानंतर थोडी केळी देखील खातो. 

पुर्वा - अरे अजून खा ना, भरपूर फळे उरली आहेत.

कुणाल - नको, माझे पोट पूर्ण भरले. त्या सरोवरापाशी जाण्याचा मार्ग मला तुम्ही दाखवाल का? त्याच्यापुढे मी जाऊ शकेन. 

पुर्वा - थांब जरा. 

पुर्वा कुणालातरी हाक मारते. तेवढ्यात एक पांढरा शुभ्र घोडा तेथे हजर होतो. पूर्वा त्या घोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. 

पुर्वा - कुणाल, आता तु घोड्यावर बस. म्हणजे मग तो तुला नदीच्या जवळच्या देवळात पर्यंत येऊन जाईल. 

कुणाल (विस्मयाने बघत) - हे पहा मला एकतर घोड्यावर बसता येत नाही आणि या घोड्याला तुम्ही काय प्रोग्रामिंग केले आहे का? म्हणजे तुम्ही इथून त्याला सांगितलेत आणि तो मला बरोबर ठिकाणी सोडेल? याने कुठे मला जंगलात भरकटवले  तर मी काय करू?

पुर्वा - बिनधास्त बस या घोड्यावर, हा खूप गरीब आहे. तो तुला व्यवस्थित नेईल.

कुणाल - नाही मला नाही जमणार, मी आपला चालत जातो. मला फक्त त्या सरोवरा पर्यंत सोडा.

पुर्वा - अजून तुझ्या शरीरात विषाचा थोडा अंश आहे.  जर चालत गेलास, तर ते कष्ट तुला सहन होणार नाहीत. आपण असं करू, तू घोड्यावर पुढे बस, तुझ्या मागे मी बसेन. 

कुणालला ते तितकेसे पटले नाही, पण त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. पुर्वा घोड्यावर बसली आणि हात देऊन तिने कुणालला वर खेचून घेतले. घोडा दौडू  लागला. आपण कुठून जात आहोत हे कुणालला काही कळत नव्हते. धुके थोडेथोडे विरळ होत गेले आणि घोडा सरोवरापाशी येऊन पोहोचला. 

आता पुर्वा घोड्यावरून खाली उतरली आणि जवळच पडल्या असलेल्या कुणालच्या गोणी तिने उचलून घेतल्या. 
अजून काही जडीबुटी गोळा करायच्या आहेत का? पुर्वाने त्याला विचारले
कुणालने मानेनेच नाही असे सांगितले.
पुर्वा परत घोड्यावर बसली आणि घोडा परत दौडू लागला. 
खरे म्हणजे पुर्वाच्या बरोबर घोड्यावर बसायला कुणालला संकोच वाटत होता. पण नाईलाजाने तो तसाच बसून राहिला. 
घोड्याने दौडत दौडत जंगल पार केले.  आता घोडा या देवळापाशी येऊन पोहोचला. कुणाल आणि पुर्वा दोघेही घोड्यावरुन खाली उतरले. 

कुणाल - मला देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आहे. तुम्ही पण येत आहात का?

पुर्वा - हो चल.

कुणाल आणि पुर्वा दोघेजण देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. प्राण वाचवण्यासाठी पुर्वाला पाठवल्याबद्दल कुणाला देवाचे आभार मानतो. 
दोघेही देवळाच्या बाहेर येतात. 

कुणाल गोणी घेऊन बाईक वर बसतो आणि बाईक सुरू करतो.

कुणाल - आता येथून मी पुढे जाऊ शकेन. तुम्ही मला खूप मदत केली त्याबद्दल धन्यवाद.

पुर्वा - ते तर माझे कर्तव्य होते. आपण परत भेटू, अच्छा. 

कुणाल पुर्वा चा निरोप घेतो आणि घरी परततो. रात्रीचे आठ वाजलेले असतात. बोटाला पाला बांधलेला असल्यामुळे कुणाल डॉक्टरांच्या घरी जात नाही. 
उशीर झाल्यामुळे जडीबुटी मी माझ्या घरी नेत आहे, उद्या सकाळी मी त्या तुम्हाला आणून देईल असे कुणाल डॉक्टरांना फोन करून सांगतो. 

पुर्वाने दिलेली फळे खाल्ल्यामुळे कुणालला जेवणाची भूक नसते. तो तसाच झोपतो. परंतु मनात मात्र पुर्वाचाच  विचार येत असतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देखील कुणालच्या मनात पुर्वाच असते. 
मी तर तिचा मोबाईल नंबर देखील घेतलेला नाही, मग तरीसुद्धा आपण परत भेटू असे ती कसे म्हणाली? कुणाल विचारात पडतो. 
आता विचार करत बसून चालणार नाही. बँकेत वेळेवर पोहोचायचे आहे. त्यामुळे लवकर आटोपायला हवे  - कुणाल स्वतःशीच पुटपुटतो. बोटाला बांधलेला पाला कुणाल काढून टाकतो आणि त्यानंतर आंघोळ वगैरे आटपून घेतो.

बँक सुटल्यावर संध्याकाळी, कुणाल प्रथम डॉक्टर काकांकडे जाऊन जडीबुटीच्या गोणी त्यांना देतो. त्यानंतर कुणाल मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. डेअरीमध्ये मुरारी काका असतात.

कुणाल - काका तुमचा पाय आता ठीक आहे का? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितला आहे ना? मग तुम्ही डेअरीमध्ये का बसला आहात?

मुरारी काका - मालाची आई आणि तिचा चुलत भाऊ मालाला घेऊन शहरात गेले आहेत. तिथल्या डॉक्टरांना तिची तब्येत दाखवायची आहे. मालाचे डोके अजून देखील दुखतच आहे. मला खूप काळजी वाटत आहे.

कुणाल - काका, तुम्ही काळजी करू नका मालाला  लवकरच बरे वाटेल.
कुणाल दूध घेऊन घरी परततो.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर काकांकडून कुणालला कळते कि माला आणि तिची आई शहरातच नातेवाइकांकडे थांबली. आहेत कारण मालाची ट्रीटमेंट चालू आहे. साधे डोके तर दुखत होते, आता मालाला झाले तरी काय? असा कुणालला प्रश्न पडतो. एक दोन वेळा कॉल करून तो मालाची चौकशी देखील करतो. तेव्हा ती सांगते की इथल्या औषधांमुळे डोकेदुखी कमी झाली आहे, परंतु अजून टेस्ट बाकी आहेत. 

असाच एक आठवडा संपत येतो. कुणालच्या मनातुन पुर्वा काही गेलेली नसते. या रविवारी परत त्या सरोवरापाशी जाऊन बघू का, पुर्वा भेटते का ते? कुणालच्या मनात विचार चालू असतो. 

या रविवारी डॉक्टर काकांना जडीबुटी नको असतात.
रविवार उजाडतो. कुणाल लवकरच सकाळी उठतो. सर्व आटोपून कुणाल घराच्या बाहेर पडतो. बाहेरच एका हॉटेलात चहा नाष्टा करुन कुणाल देवळाच्या दिशेने चालू लागतो. आज कुणालकडे डॉक्टर काकांची बाईक नसते. कारण आज मी सरोवरावर का जात आहे याचे स्पष्टीकरण डॉक्टर काकांना देण्यासाठी त्याच्याजवळ नसते. देऊळ खूप लांब असते.

थोडे चालून गेल्यावर कुणालला एक बैलगाडीवाला दिसतो. बँकेमुळे बरेचसे गावकरी कुणालच्या ओळखीचे झालेले असतात.
बैलगाडीवाला - काय साहेब कुठे निघालात एवढ्या सकाळी?

कुणाल - नदीपलीकडे च्या देवळात चाललो आहे दर्शनाला.

बैलगाडीवाला - साहेब मी त्याच बाजूला चाललो आहे. माझ्या बैलगाडीत बसता का. तुम्ही शहरातील माणसं, तुम्हाला चालेल का बैलगाडीत बसलेले.

कुणाल - हो चालेल की, बरे झाले तुम्ही भेटलात.

कुणाल बैलगाडी मध्ये बसतो. खाली बसण्यासाठी घोंगडी अंथरलेली असते. खूप वर्षांनी कुणाल बैलगाडीत बसलेला असतो. त्यामुळे त्याला लहानपणीची मामाच्या गावाची आठवण येते. तिकडे देखील मामा किंवा आजोबा त्याला बैलगाडीतून फिरायला नेत असत. 
१५ ते २० मिनिटांत बैलगाडी नदीच्या पलीकडे पोहोचते. कुणाल खाली उतरून बैलगाडीवाल्याचे आभार मानतो. बैलगाडीवाला दुसऱ्या दिशेने पुढे निघून जातो.

नेहमीप्रमाणे कुणाल देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो.
दर्शन घेऊन झाल्यावर तो जंगलाच्या दिशेने पुढे चालू लागतो. आज देखील पुर्वा तिथे आली असेल का? असा विचार त्याच्या मनात चालू असतो. आज जडीबुटी गोळा करायच्या नसल्यामुळे लवकरच तो सरोवरापाशी पोहोचतो. तिथे कोणीच नसते. कुणाल मनातून निराश होतो.

किती वेडा आहे मी. कुठे त्या पुर्वा चा शोध घेत इथपर्यंत मी आलो? तिचा आणि माझा काय संबंध? कुणाल चे विचार परत चालू होतात. आज सभोवतालच्या सौंदर्याचा कुणाल आनंद घेऊ शकत नसतो. आपले मनच जर स्थिर नसेल, शांत नसेल, तर सभोवती  स्वर्गातील सृष्टीसौंदर्य जरी असले तरी त्याचा काही उपयोग नसतो. थोडावेळ तेथेच बसून कुणाल घरी निघू लागतो. 

इतक्यात त्याला तोच मधुर आवाज येतो "कुणाल आलास तू?"
कुणाल मागे वळून बघतो. मागे पुर्वा उभी असते. तिला बघितल्यावर कुणालला अत्यानंद होतो.

पुर्वा - बर्‍याच दिवसांनी आलास? आज पण जडीबुटी न्यायला आला आहेस का?

आता हिला काय उत्तर द्यावे ते कुणालला कळत नाहीसे होते.

कुणाल - नाही सहज फिरायला आलो आहे.

पुर्वा गालातल्या गालात हसते.
आपले उत्तर पुर्वाला पटलेले दिसत नाही असे कुणालच्या  लक्षात येते.

क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग३)"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी


लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग ३


भाग ३ 


माला - हो हो, तेच ते.

कुणाल - तू बघितले आहेस का त्यांना?

माला - नाही रे, मला तर या सर्व दंतकथा वाटतात.

कुणाल - माझा सुद्धा अशा सर्व गोष्टींवर विश्वास नाही. पण काही गोष्टी मात्र खऱ्या असतात.
मग तुमच्या गावातील कोणी यक्षांना बघितले आहे का?

माला - छे छे, असे काही अस्तित्वातच नसेल तर कोण काय बघेल?

दोघांचे जेवण पूर्ण होते. पाणी पिऊन थोडावेळ दोघे विश्रांती घेतात. त्यानंतर दोघेही चालायला सुरुवात करतात. कुणाल बरोबर फिरताना मालाला खूप बरे वाटत असते. हाच आपल्याला जीवनसाथी मिळाला तर खूप बरे होईल असे तिला वाटू लागते. पण कुणालच्या  मनात काय आहे? याचा ती विचार करू लागते. 
माला कोणत्यातरी विचारात गुंग झाली आहे हे कुणालच्या लक्षात येते.

कुणाल - काय ग कसला विचार करतेस?

माला - काही नाही रे, अजून कोणत्या जडीबुटी राहिल्या आहेत त्याचा विचार करत आहे.

कुणाल - आता आपले किती काम बाकी आहे?

माला - का रे माझ्याबरोबर काम करताना कंटाळा आला का?

कुणाल - तसं नाही गं, तुझ्यासारख्या हुशार मुली बरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार?

कुणालच्या या स्तुतीमुळे माला थोडीशी लाजते आणि कुणालच्या नजरेला नजर ती देऊ शकत नाही.

माला (खाली बघत) - अरे जास्त नाही आता थोडेसेच काम बाकी आहे. या सरोवराच्या भागात ज्या जडीबुटी आणि वनस्पती मिळतात त्या बाहेरच्या ठिकाणी मिळणे खूप कठीण आहे. तेवढ्या जडीबुटी, वनस्पती आपण गोळा करू आणि आपण निघू.

कुणाल - हे बघ आपण सावकाश काम करू. काकांनी सांगितलेल्या सर्व जडीबुटी आपण गोळा करू आणि मगच निघू. फक्त संध्याकाळ व्हायच्या आत घरी पोहोचू, कारण घरी तुझे आई बाबा तुझी वाट बघत असतील.

कुणालला आपली एवढी काळजी वाटते हे पाहून मालाला बरे वाटते. दोघेजण जडीबुटी, औषधी वनस्पती गोळा करून आता माघारी फिरतात. या सरोवराच्या परिसरात आल्यापासून, आपल्यावर कोणीतरी टेहळणी करत आहे असे कुणालला सारखे वाटत असते. तो तसे मालाला सांगतो देखील. 

माला - हे बघ उगाच माझी मस्करी करू नको. मी आणि माझे बाबा कितीदा तरी या परिसरात येतो. आमच्या नाही कोणी मागे लागले ते?

कुणाल - अगं मी तुझी मस्करी नाही करत, पण या परिसरात नव्याने आल्यामुळे कदाचित मला असे वाटले असेल. 

माला - अरे तुला भास झाला असेल.

कुणाल - हे आपले एक प्रकारे पिकनिकच झाले.

दोघेजण बोलत बोलत देवळा पर्यंत येतात. परत देवळात जाऊन दोघेजण दर्शन घेतात. त्यानंतर बाहेर पार्क केलेल्या बाईक वर दोघे जण बसतात. त्यानंतर दोघे जण डॉक्टर काकांच्या बंगल्यावर येतात. डॉक्टर काका दोघांची वाट बघत असतात. डॉक्टर दोघांनाही आत मध्ये बोलावतात. 

डॉक्टरांची मिसेस - बसा दोघेजण, दमला असाल खूप. चहा ठेवते तुमच्यासाठी.

कुणाल आणि माला नको नको म्हणत असतात. 
पण डॉक्टरांची मिसेस ऐकत नाही. ती चौघां साठी आलं आणि पातीचहा घालून मस्त गरमागरम चहा घेऊन येते.
सर्वजण चहा पितात.

डॉक्टर - काय रे, वाटेत काही त्रास झाला नाही ना?

कुणाल - नाही काका, उलट आम्ही तर एक प्रकारे पिकनिक एन्जॉय केलं. मला या जंगलांची आणि हिमाच्छादित पर्वतांची लहानपणापासूनच ओढ होती. तुमच्यामुळे आणि मालाने मला तिकडे नेल्यामुळे माझा योग जुळुन आला. पुढच्या वेळेस सुद्धा जडिबुटि आणायला मी जाईन.

डॉक्टर - तुमच्या दोघांचे आभार कसे मानू ते मला कळत नाही.

माला - काका, असं बोलून आम्हाला लाजवू नका बरं. आम्ही आता निघतो. संध्याकाळ झाली आहे आई-बाबा माझी वाट बघत असतील.

डॉक्टरांची मिसेस - सावकाश जा गं. अंधार पडलाय.

कुणाल - काकू तुम्ही काळजी करू नका मी तिला घरापर्यंत सोडतो.

डॉक्टर आणि डॉक्टरांच्या मिसेस चा निरोप घेऊन दोघेही निघतात आणि मालाच्या घरी पोहोचतात. 

माला - घरात चल ना.

कुणाल - माला, अगं आत्ता नको. मला आता खानावळीत जेवायला जायचे आहे.

माला - अरे, आज आमच्या घरी जेव. 

कुणाल - नको परत कधीतरी येईन. 

आपली मुलगी वेळेत परतली हे पाहून मुरारी आणि त्यांच्या मिसेसला बरे वाटते. वाटेत काय काय घडले ते माला अत्यंत उत्साहाने सांगत असते. त्यानंतर सर्वजण जेवतात. मालाला आज रात्री झोपेमध्ये, ती कुणाल बरोबर जंगलात फिरत आहे असेच दिसते. 

तिकडे कुणाल मात्र एवढे फिरण्याची सवय नसल्यामुळे, खूप दमून गेलेला असतो. जेवण झाल्यावर लगेचच त्याला झोप लागते. 

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी उठून तो बँकेत जातो. मोहिनी मॅडम आणि गोविंद सरांना तो कालची सुट्टी कशी एन्जॉय केली ते सांगतो. कुणालच्या या कामाचे दोघांनाही कौतुक वाटते.
बँकेच्या कामाला सुरुवात होते. थोड्यावेळाने लंच टाईम होते. लंच टाईम ला माला एक डबा घेऊन बँकेत येते. ती कुणालच्या केबिनमध्ये जाते. 

कुणाल - ये माला आत ये. आमच्या बरोबर चल आम्ही आता डबा खायला बसतोय.

माला - अरे मी आत्ताच घरून जेऊन आले आहे. मला भूक नाही. हा डबा घे.

कुणाल - हे ग काय?

माला - मुगाच्या डाळीचे पकोडे आहेत. आत्ताच जेवणासाठी घरी केले होते. आमचे खाउन झाल्यावर तुझ्यासाठी गरम-गरम तळून आणले आहेत मी.
 
कुणाल - अगं पण आम्ही चौघे जण आहोत एकत्र डबा खायला बसतो. 

माला - काळजी करू नकोस. भरपूर पकोडे आणले आहेत.

कुणाल - अगं एवढं कशासाठी? तुम्हाला उगाचच त्रास.

माला - ए, जास्त बोलू नकोस. हा आणलेला डबा निमूटपणे घे. 

कुणाल - पण तुला देखील आमच्याबरोबर थोडेसे काहीतरी खावे लागेल. नाही म्हणू नकोस. तुझे जेवण झाले असले तरी आमच्या बरोबर थोडेसे खा, आम्ही जास्त आग्रह करणार नाही.

कुणाल च्या आग्रहामुळे माला त्या सर्वांबरोबर डबा खायला बसते.
सर्वांनाच मुगाच्या डाळीचे पकोडे खूप आवडतात. सर्वजण मालाचे कौतुक करतात. डबा खाऊन झाल्यावर सर्वांचा निरोप घेऊन माला घरी परत जाते.

संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल त्याच्या बंगल्यावर येतो. फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे तो मुरारी काकांच्या डेअरीवर दूध आणण्यासाठी जातो. माला त्याची आतुरतेने वाट बघत असते. थोडावेळ मालाशी बोलून कुणाल रूमवर परत जातो.

रूमवर आल्यावर कुणाल त्याच्या घरी व्हिडिओ कॉल करतो. काल दमलेला असल्यामुळे रात्री फोन करायचा राहून गेलेला असतो. कालची सुट्टी कशी एन्जॉय केली, ते तो त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणीला देखील सांगतो.
आई  - कुणाल असा जंगलांतून वगैरे फिरू नकोस बर.  इकडे आम्हाला टेन्शन येते.

कुणाल - आई तुला माहिती आहे ना, मला हिमालयात फिरायचे होते. आपला कधीच योग जुळून आला नाही. आता नोकरीनिमित्त मी इकडे आलो आहे तर मला फिरू दे ना. तू काही काळजी करू नकोस. मी सुरक्षितपणे फिरेन. बाबा सांगा ना हो आईला.

बाबा - अग, तू काळजी करू नकोस. कुणाल पण आई म्हणते ते अगदीच खोटं नाही. जंगलातून फिरताना कोणीतरी अनुभवी माणूस बरोबर असू दे. आणि बिनधास्त फिरू नको.

काव्या (कुणालची बहीण हसत बोलते) - अहो बाबा, दादाने तर अनुभवी माणूस बरोबर पटवले आहे. दादा आता जंगलात जाताना मालालाच बरोबर ने. ती खूपच चांगली दिसते रे. ती तुझे काटे काढेल, कुठे दुखलं-खुपलं तर बघेल. 
आता तर बहीण आणखीनच हसू लागते.

कुणाल - बाबा, काव्याला सांगा. माला माझी चांगली मैत्रीण आहे.

बाबा - तुम्ही दोघांनी भांडू नका बरं.
त्यानंतर थोडेसे बाकीचे बोलून कुणाल फोन ठेवतो.

आता अधून मधून दुपारच्या वेळेत माला कुणाल साठी  बँकेत डबा घेऊन जाऊ लागली.



अजून पुढच्या रविवारी देखील कुणालला आणि मालाला जंगलात जडीबुटी आणायला जावे लागते. यावेळचे काम जास्ती नसते. त्यामुळे सकाळच्या वेळेत दोन तासांतच त्यांचे काम आटोपते. आज देखील कुणाल तिकडले निसर्गसौंदर्य एन्जॉय करतो.
आज मुरारी काका आणि काकूंनी कुणालला दुपारी घरी जेवायला बोलावले असते. 
माला आणि कुणाल वेळेतच घरी परततात.

काकू, मुरारी काकांचे आणि कुणालचे जेवणाचे पान वाढतात.

कुणाल - हे काय आम्ही दोघंच जेवणार की काय? तुमच्या दोघींचे जेवणाचे पान का नाही घेतलेत?

काकू - तुम्ही दोघे अगोदर जेवा, त्यानंतर आम्ही दोघी बसतो.

कुणाल - ते काही नाही काकू. तुम्ही दोघींनी देखील आमच्याबरोबरच जेवायचं. 
कुणालच्या खूपच आग्रहामुळे काकू आणि माला दोघीजणी जेवायला बसतात.
काकूंनी आजचे जेवण स्पेशल बनवलेले असते. बाकीच्या जेवणाबरोबरच त्यांच्या प्रदेशातील फेमस असे "मखाना मठडी"  आणि "अळशी चे लाडू" देखील बनवलेले असतात. कुणालला हे दोन्ही पदार्थ खूपच आवडतात.

मुरारी काका आणि काकू कुणाल शी बोलताना त्याला नेहमी साहेब असे बोलायचे. कुणालला त्यामुळे अवघडल्यासारखे होत असे. माला देखील, मला फक्त कुणाल म्हणूनच हाक मारते. त्यामुळे तुम्ही देखील तसेच म्हणा असे तो त्यांना समजावतो. 
काका आणि काकू मात्र सांगतात की, तुम्ही नवीन पिढीतील मुलं. त्यामुळे तुम्हाला ते जमते. परंतु आम्हाला तसे जमणार नाही. तुम्ही मानाने मोठे आहात.

असेच काही दिवस जातात. एकदा शुक्रवारी रात्रीचे जेवण झाल्यावर कुणाल डॉक्टर काकांच्या घरी जातो. 
डॉक्टर - काय रे कुणाल चार-पाच दिवसात इकडे फिरकला नाहीस?

कुणाल - काका, बँकेत काम भरपूर होते त्यामुळे घरी आल्यावर दमायला होत असे. आता थोडा रिलॅक्स आहे.  गेल्या रविवारी तुम्हाला जडीबुटी नको होत्या, त्यामुळे आम्ही जंगलात गेलो नव्हतो. आता परवाच्या रविवारी तुम्हाला हवे असेल तर आम्ही जंगलात जाऊ.

डॉक्टर - अरे या रविवारी मला जडीबुटी हव्या आहेत. पण आता कसं जमेल ते कळत नाही?

कुणाल - का हो काका, नेहमीप्रमाणे माला आणि मी जाऊ की.

डॉक्टर - अरे मालाला थोडे बरे वाटत नाही आहे.

कुणाल - तिला काय धाड भरली आहे? आज संध्याकाळी दूध आणायला गेलो तेव्हा तर ठणठणीत होती.

डॉक्टर - गेले चार-पाच दिवस तिचे डोके दुखत आहे. मी औषधे दिली आहेत. तात्पुरते तिला बरे वाटते. परंतु डोकेदुखी काही पुर्ण थांबत नाही. आता औषध बदलून दिले आहे. दोन दिवस वाट बघायला सांगितली आहे. जर फरक पडला नाही तर शहरात जाऊन चष्म्याचा  नंबर तर आला नाही ना? असे बघायला तिला सांगितले आहे. 

कुणाल - पण ती मला काहीच कसे बोलली नाही?

डॉक्टर - तिचे डोके सारखे दुखत नाही मध्येमध्ये दुखते. त्यामुळे ती कदाचित बोलली नसेल. 

कुणाल - काका, मग या रविवारी मी एकटाच जातो जंगलातून जडीबुटी आणायला. मी दोन वेळा मालाबरोबर गेलेलो आहे. आता मला जडीबुटींची  बऱ्यापैकी माहिती झाली आहे. समजा एखादी जडीबुटी चुकीची आणली तर तुम्ही ओळखालच. 

डॉक्टर - आश्चर्यच आहे तुला एवढ्या लवकर सर्व जडीबुटी कशा ओळखू यायला लागल्या?

तेवढ्यात डॉक्टरांची मिसेस तिघांसाठी कॉफी घेऊन येते.

कुणाल - तुमच्या एवढ्या किंवा माला एवढ्या सर्वच्या सर्व जडीबुटी मला काही ओळखता येत नाहीत. हां बस थोडीफार माहिती झाली आहे.

डॉक्टर - तरीसुद्धा तुला लवकर माहिती झाली. पण मी तुला एकट्याला जंगलात पाठवू शकत नाही.

कुणाल - काका तुम्ही चिंता करू नका. मी सुखरूप घरी परत येईन.

कुणालने खूपच आग्रह केल्यामुळे डॉक्टर काका त्याला परवानगी देतात.
बोलता-बोलता तिघांची कॉफी पिऊन होते.

कुणाल - काकू, कॉफी मस्तच झाली होती बरं.

काकू - थँक यु. 

त्यानंतर कुणाल घरी परत येतो. रात्र बरीच झाली असल्यामुळे त्याला झोप येते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बँकेतून परतल्यावर कुणाल मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. डेअरीवर काकू असतात. काकूंकडे तो मालाची चौकशी करतो. मालाचे डोके दुखत असल्यामुळे ती घरी झोपून आहे असे काकू त्याला सांगतात. त्यामुळे मालाला भेटायला कुणाला तिच्या घरी जातो. मुरारी काका लंगडत येऊन त्याचे स्वागत करतात.

कुणाल - काय काका पाय बरा आहे ना? 

मुरारी काका - हो आता दुखत नाही. अजून साधारण पंधरा दिवसांनी डॉक्टर प्लास्टर काढणार आहेत.

कुणाल - काका, माला कुठे आहे?

मुरारी काका - ती औषध घेऊन बेडवर आडवी पडली आहे. तिचे डोके खूप दुखत आहे. जा भेट तिला.

कुणाल आतल्या रूम मध्ये जाऊन मालाला भेटतो. तिला झोप लागलेली नसते पण ती कण्हत असते. तिची ही अवस्था बघून कोणालला फार वाईट वाटते. 

कुणाल - माला, फार डोकं दुखत आहे का ग?

माला - हो रे खूप डोकं दुखत आहे.

कुणाल - तू मला कधी बोलली नाहीस ते?

माला - सारखं डोकं दुखत नव्हतं. आज मात्र खूपच दुखत आहे. औषध घेतले आहे, पण झोप येत नाही आहे. तू आलास ते बरे झाले. काहीतरी बोल ना रे, म्हणजे मला  छान वाटेल आणि झोप लागेल. पण तुला वेळ आहे ना रे? माझ्यामुळे तुला उगाचच त्रास.

कुणाल - तू माझी मैत्रीण आहेस ना? मग त्रासाचे काय बोलतेस. तुझ्यासाठी माझ्याजवळ भरपूर वेळ आहे.

कुणाल तिच्याशी थोडावेळ गप्पा मारतो. त्याच्याबरोबर बोलल्यामुळे मालाला बरे वाटते आणि तिला झोप लागते. 

क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग२)"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी


लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग २


भाग २ 


कुणाल काकांना जाऊन भेटतो. काकू कुणालसाठी चहा करतात. थोडावेळ काकांशी गप्पा मारून कुणाल घरी परत येतो. 

औषध वेळेवर घेतल्यामुळे कुणाल दोन दिवसांनी ठणठणीत बरा होतो. परत जाऊन तो डॉक्टर  धनंजयना भेटतो. तुमच्या औषधांमुळे मला चांगले बरे वाटत आहे असे त्यांना सांगतो. आज दवाखान्यामध्ये गर्दी नसते. त्यामुळे डॉक्टर मोकळे असतात. त्यामुळे इतर विषयांवर देखील डॉक्टर थोडावेळ कुणालशी बोलतात. डॉक्टरांना पुस्तक वाचनाची आवड असते. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरची भरपूर पुस्तके वाचलेली असतात. कुणालला देखील वाचनाची भरपूर आवड असते. त्यामुळे डॉक्टर त्याला अध्यात्मावर आधारित एक पुस्तक वाचायला देतात. डॉक्टरांना कुणाल फार आवडलेला असतो. दोघांनाही वाचनाची आवड असते. त्यामुळे एक दिवस माझ्या घरी गप्पा मारायला या असे डॉक्टर कुणालला  सांगतात. सकाळ-संध्याकाळ दवाखान्यात वेळ जात असल्यामुळे रात्री नऊच्या नंतर जरी आलात तरी चालेल असे ते कुणालला सांगतात.      नक्की येईन असे सांगून कुणाल तेथून निघतो. 

दोनच दिवसात कुणाल चे पुस्तक वाचून पूर्ण होते. रात्री खानावळीत लवकर जेवून कुणाल डॉक्टरांच्या बंगल्यावर जातो. डॉक्टरांच्या बंगल्याची डोअरबेल तो वाजवतो.

डॉक्टर - या कुणाल साहेब या.

कुणाल - डॉक्टर, मी तुमच्या पेक्षा वयाने खूप लहान आहे. त्यामुळे मला साहेब वगैरे म्हणू नका. फक्त कुणाल म्हणा.

डॉक्टर  - जशी तुझी मर्जी.

डॉक्टरांचे वय देखील साठीच्या आसपास असते. डॉक्टर त्यांच्या मिसेसशी कुणालची ओळख करून देतात. डॉक्टरांची मिसेस देखील स्वभावाला खूप चांगली असते. इथे गावामध्ये दोघेचजण  बंगल्यामध्ये राहत असतात. त्यांचा मुलगा परदेशामध्ये प्रॅक्टीस करत असतो.
डॉक्टर आणि कुणाल एकमेकांना कोणती कोणती पुस्तके वाचली याबद्दल माहिती देत असतात. दोघांचे वाचन अफाट असते. बोलता बोलता मुरारी काकांचा विषय निघतो.

डॉक्टरांची  मिसेस - अहो तुम्हाला आता जडीबुटी कोण आणून देईल?

डॉक्टर - हो ते एक मोठे टेन्शनच आहे.

कुणाल - का काय झाले? कसलं टेन्शन आहे?

डॉक्टर - अरे काही औषधे बनवण्यासाठी मला जडीबुटींची  ची गरज पडते. त्यासाठी बाजूच्या जंगलांमध्ये फिरावे लागते, डोंगर रांगा ओलांडाव्या लागतात. माझे आता वय होत आले असल्यामुळे एवढे मला चालवत नाही. अर्थात मुरारी देखील माझ्याच वयाचा आहे, परंतु त्याची शारीरिक कपॅसिटी चांगली आहे. त्यामुळे अजून देखील तो डोंगर-दर्‍या, जंगल यांमध्ये फिरू शकतो. त्यालादेखील वनस्पती शास्त्राचे ज्ञान आहे. पण आता त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. 
सर्वच औषधे मी काही घरी बनवत नाही. काही औषधांचे प्रिस्क्रिप्शन मी लिहून देतो. ती मेडिकल स्टोअर मधून विकत घेता येतात. पण बर्‍याचशा  जडीबुटींची  औषध बाजारात उपलब्ध नाहीत.
   
कुणाल - डॉक्टर मला सांगाल का? मी तुमच्यासाठी जडीबुटी आणीन.

डॉक्टर - अरे, पण तुला जडीबुटी विषयी काही माहिती आहे का?

कुणाल - नाही, पण तुमच्या औषधाने मला खूप लवकर फरक पडला. त्यामुळे तुमच्या औषधी, समाजासाठी चालू राहाव्यात असे मला वाटते.

डॉक्टर - पण तुला जडीबुटी विषयी माहितीच नाही. त्यामुळे मी तुला कसं सांगू की काय म्हणून?

डॉक्टरांची  मिसेस -  अहो पण मालाला माहिती आहे ना जडीबुटी विषयी?

डॉक्टर - पण ती तिच्या वडीलांबरोबर म्हणजे मुरारी बरोबर जंगलात जायची. आता ती एकटी कशी जाईल? अशा तरुण मुलीला मी एकटीला कसं पाठवू?

डॉक्टरांची  मिसेस - हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण तिच्या सोबतीला जर कोणाला पाठवले तर जमू शकेल. 

डॉक्टर  - आता तिच्या सोबतीला कोण जाणार? 
हां, एक करता येईल. मुरारीची आणि मालाची जर हरकत नसेल तर, कुणालला तिच्याबरोबर पाठवता येईल. 
काय कुणाल जाशील ना माला बरोबर जंगलात जडीबुटी आणायला?

असं परक्‍या मुलीबरोबर जंगलात जायचं म्हणजे कुणालला बरं वाटत नव्हतं. तो जरासा विचारातच पडला.
त्याच्या मनातील चलबिचल डॉक्टरांनी बरोबर ओळखली.

डॉक्टर  - हे बघ कुणाल मी तुला काही फोर्स करणार नाही. पण या जडीबुटींमुळे गावातील गोरगरीब जनतेला स्वस्तात मेडिकलची सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे तू काय ते ठरव.

कुणाल  - डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर मुरारी काका आणि मालाने परवानगी दिली, तर मी मालाबरोबर जंगलात जाऊन जडीबुटी घेऊन येईन.

डॉक्टर - ठीक आहे. तसेच घाबरू देखील नको. वाघ, अस्वल अशा हिंस्त्र श्वापदांचा येथील जंगलांमध्ये वावर नाही. ही श्वापदे दुसऱ्या जंगलांमध्ये आहेत. बाकीचे पशुपक्षी मात्र तुला भरपूर बघायला मिळतील. फक्त जाताना पायाखाली नीट बघून जा. कारण साप आणि विंचू मात्र तिथे थोड्याफार प्रमाणात आढळतात.

कुणाल - काका, हे मात्र आश्चर्यच आहे. एवढ्या मोठ्या
जंगलामध्ये हिंस्त्र पशु कसे नाहीत?

डॉक्टर - आश्चर्य आहे, परंतु हे मात्र खरं आहे. तरीदेखील तुम्ही काळजी मात्र घ्या.
उद्या माला आणि  मुरारी, दोघांशी मी बोलेन. थँक यु.

कुणाल - डॉक्टर थँक्यू म्हणून मला लाजवू नका.

तेवढ्यात डॉक्टरांची मिसेस तिघांसाठी गरमागरम कॉफी घेऊन येते. तिघेजण कॉफी पितात. आता बराच उशीर झाल्यामुळे कुणाल घरी परततो. 

दुसऱ्या दिवशी डॉक्टर धनंजय, मुरारी काकांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करतात. तसेच कुणाल बरोबर झालेले बोलणे देखील सांगतात. आता मुरारी काका आणि कुणाल ची ओळख झालेली असल्यामुळे, मुरारी काकांचा कुणाल वर विश्वास बसलेला असतो. चांगल्या कामासाठी दोघांना एकत्र पाठवायचे असल्यामुळे ते त्यांना परवानगी देतात. आता प्रश्न राहिला तो मालाचा. डॉक्टर काका मालाला देखील विचारतात. कारण कुणाल बरोबर जंगलात जडीबुटी आणायला तिला जायचे असते. तिला जर कुणाल बरोबर जंगलात जायला सुरक्षित वाटत नसेल तर तिला तसेच पाठवणे बरोबर नाही असे डॉक्टर काकांना वाटत असते. 
परंतु पहिल्या भेटीतच मालाने कुणालचा स्वभाव ओळखलेला असतो. तो एक सज्जन मुलगा आहे याची तिला खात्री असते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो तिला पहिल्या भेटीतच आवडलेला असतो. 
परंतु हे शेवटचे कारण, अर्थातच ती कोणालाच सांगत नाही. कुणाल बरोबर फिरता येईल म्हणून ती मनातून आनंदून जाते. 
कुणाल बरोबर जंगलात जाऊन जडीबुटी आणायला मला काहीच हरकत नाही असे ती सांगून टाकते.

माला च्या आईला मात्र या गोष्टीची चिंता वाटत असते. ती मुरारी काकांना खुणेने किचनमध्ये बोलावते. मुरारी काका लंगडतच किचनमध्ये जातात.
तरुण मुलीला अस, त्या मुलाबरोबर जंगलात जडीबुटी आणायला पाठवणे बरं दिसत नाही असं ती सांगते.

मुरारी काका हसत तिला सांगतात अगं आपला तर दोन्ही मुलांवर विश्वास आहे. यामध्ये जे काही होईल ते चांगलेच होईल. जावई शोधायला आपल्याला वहाणा  तर झिजवाव्या लागणार नाहीत ना? कुणाल पेक्षा चांगला जावई आपल्याला शोधून तरी सापडेल का?

मालाची आई - अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. एका मुलीचे बाप आहात तुम्ही आणि असं वाटेल तसं कसं बोलता? 

मुरारी काका - अगं गंमत केली मी. दोन्ही मुलं खरंच सज्जन आहेत. जाऊ दे त्यांना, चांगल्या कामासाठी जात आहेत. 
माला च्या आईला देखील मुरारी काकांचे बोलणे पटते. ती देखील परवानगी देते. 

त्यानंतर डॉक्टर काका त्यांच्या दवाखान्यात जातात. तेथून ते कुणालला फोन करतात. माला त्याच्या बरोबर जायला तयार असल्याचे ते सांगतात. 
त्यानंतर शनिवारी संध्याकाळी डॉक्टर, त्या दोघांनाही दवाखान्यात बोलावून घेतात. शनिवार असल्यामुळे कुणालचा हाफ डे असतो. सांगितलेल्या वेळेत माला आणि कुणाल दोघेही डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचतात. कोणत्या जडीबुटी आणायचे आहेत याची यादी डॉक्टरांनी केलेली असते. ती यादी ते माला कडे देतात. तसेच दोघांच्याही मोबाईलवर जडीबुटींचे फोटो व थोडी माहिती ते पाठवतात. उद्या जाताना माझी बाईक घेऊन जा असे ते कुणालला सांगतात.




रविवार उजाडतो. कुणाल आणि माला दोघेजण बाईक वर बसून जंगलाच्या दिशेने निघतात. बरोबर मालाने थर्मास मध्ये चहा, दुपारच्या जेवणाचा डबा आणि पिण्यासाठी पाणी घेतलेले असते. नदीपलीकडे, जंगलात व हिमपर्वतांवर जास्त थंडी असल्यामुळे दोघांनीही जाकीट घातलेले असते. दोघेजण ब्रीजवरून नदी क्रॉस करतात. पुढे कच्चा रोड असतो. अजून थोडं पुढे गेल्यावर एक देऊळ लागतं. दोघेजण देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. आता तिथून पुढे बाईक चालवायला रस्ता नसल्यामुळे, कुणाल देवळाच्या बाहेर बाईक पार्क करतो. तेथून पुढे दोघेजण चालतच निघतात.

माला - मला या देवळात यायला खूप आवडते. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी हे देऊळ आहे. हे जागृत देवस्थान आहे. 

कुणाल - हो मला देखील इथे दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. मला देखील निसर्गाच्या सहवासात राहायला खूप आवडते. तुम्ही येथे नेहमी येता का?

माला - तुम्ही मला अहो वगैरे म्हणू नका मला कसंतरीच वाटतं. फक्त माला म्हणा. मी तुमच्या पेक्षा काही मोठी नाही.

कुणाल - ठीक आहे, मग आज पासून आपण फ्रेंडशिप करू. तू देखील मला कुणालच म्हण. आपल्याला साधारण किती वेळ लागेल आजचे काम पूर्ण करायला?

माला - साधारण महिन्यातून दोन ते तीन वेळा मी आणि माझे बाबा या जंगलात येतो. डॉक्टर काकांना हव्या असलेल्या जडीबुटी आम्ही येथून घेऊन जातो. त्यावेळी आम्ही न चुकता या देवळात दर्शन घेऊन जातो. एरवी आमचे काम एक ते दोन तासात आटोपतं. पण विशेष जडीबुटी हव्या असतील तर सरोवरा पर्यंत जावे लागते मग मात्र बराच वेळ जातो. आज आपल्याला विशेष जडीबुटी आणायच्या असल्यामुळे वेळ लागेल.

कुणाल - काही हरकत नाही आपण सर्व जडीबूटी घेऊनच घरी जाऊ. तुला जडीबुटी आणि औषधांची बरीच माहीती झालेली असेल. तू डॉक्टर व्हायला हवे होतेस.

माला - खरे म्हणजे मला शेती आणि बागायती ची आवड आहे. त्यामुळेच तर मी बी. एस. सी. ॲग्रीकल्चर केले. माझ्या वडिलांना जडीबुटींची आवड आहे. मी डॉक्टर काकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी हे सर्व करते. तुला कसली आवड आहे?

कुणाल - मला वाचनाची आवड आहे. त्यामुळे डॉक्टर काकांनी मला एक अध्यात्मिक पुस्तक वाचायला देखील दिले. दोनच दिवसात मी ते पुस्तक वाचून काकांना परत केले. आता त्यांनी मला दुसरे पुस्तक दिले आहे. काकांकडे भरपूर पुस्तके आहेत.

दोघेजण गप्पा मारत मारत पुढे चालत असतात. अचानक कुणालच्या पायात काटा रूततो. शूज असून देखील एक अणुकुचीदार काटा कुणालच्या पायात शिरतो. कुणाल वेदनेने ओरडून खाली बसतो. कुणालच्या पायात काटा रुतला हे मालाच्या लक्षात येते. ती पटकन खाली वाकते आणि कुणालच्या पायातील काटा अलगद काढते. ती इतक्या हळूवारपणे काटा काढते की त्यामुळे कुणालला वेदना जाणवतच नाही. ती कुणालचे शूज आणि सॉक्स काढते. शूज असल्यामुळे काटा खोलवर रुतलेला नसतो. परंतु तरी सुद्धा पायातून रक्त येऊ लागले असते. माला पटकन इकडे तिकडे बघते. बाजूच्या एका वनस्पतीची थोडी पाने ती तोडून आणते. पाने हातामध्ये रगडून त्या पानांचा रस ती कुणालच्या पायावर सोडते. त्यानंतर ती पाने कुणालच्या काटा लागलेल्या जागेवर दाबून धरते. पाचच मिनिटांत कुणालला बरे वाटते. आता रक्त देखील थांबते. ती पाने पायाला तशीच चिकटवून ठेवून, माला कुणालच्या पायात सॉक्स आणि शूज घालते.

कुणाल  - थँक्यू माला. 

माला - कुणाल, मैत्रीमध्ये थँक्यू नाही. चल आता आपण गरमागरम चहा पिऊ.

त्यानंतर माला थर्मास ओपन करते आणि त्यातून वाफाळलेला चहा, २ युज अँड थ्रो कपमध्ये ओतते. त्या थंडीत चहा प्यायला खूप छान वाटत असते. दोघेजण चहा पितात. 

माला - कुणाल तुझा पाय आता बरा आहे ना? आपण पुढे चालायला लागायचे ना?

कुणाल - होय माला, आता माझा पाय ठीक आहे. शूज होते म्हणून बरे झाले, काटा खोलवर रुतला नाही.

त्यानंतर दोघेही पुढे चालू लागतात. आता झाडी गर्द होत चाललेली असते. वाटेतून चालताना माला, वेगवेगळ्या वनस्पती दाखवत असते. तसेच त्या वनस्पतींची नावे आणि त्यांचे उपयोग सांगत असते. जसजसे ते जंगलात आत  आत जातात, तस तसे त्यांना वेगवेगळे पशुपक्षी दिसायला लागतात. त्यामध्ये मोर, ससे, हरणं, हत्ती, गरुड, भारद्वाज, कोकीळ  आणि  अनेक पशु पक्षी दिसू लागतात. 

माला - पायाखाली नीट बघून चाल रे, इकडे साप, विंचू देखील कधी कधी असतात.

कुणाल - हो, डॉक्टर काका मला तसे बोललेले आहेत.

वाटेतून चालत असताना हव्या असलेल्या जडीबुटी आणि औषधी वनस्पती माला तोडून घेऊ लागते. कुणाल देखील तिला मदत करू लागतो. येताना दोघांनी मोठ्या मोठ्या गोणी फोल्ड करून आणलेल्या असतात.

आता थोडं पुढे आल्यावर हिमाच्छादित पर्वत रांगा सुरू होतात. पर्वतांची उंची फार नसते. दोघेजण पर्वत चढू लागतात. या सर्व निसर्गसौंदर्याचे कुणाल मोबाईलवर फोटो काढत असतो. 

माला - बापरे किती फोटो काढतोस? आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुझे फोटो शूट चालूच आहे.

कुणाल - अगं हा निसर्ग, हे सृष्टीसौंदर्य मला नवीन आहे. आमच्या तिकडे अशी बर्फाच्छादित हिमशिखरं, अशी जंगले शहरातून बघायला मिळत नाहीत. मला लहानपणापासूनच बर्फाच्छादित हिमशिखरांची, हिमालयाची ओढ होती.

एकीकडे मालाचे जडीबुटी शोधण्याचे आणि औषधी वनस्पती शोधण्याचे काम चालूच असते. हळूहळू तो पर्वत ओलांडून दोघेजण पलीकडे जातात. 

पलीकडे एक सुंदर सरोवर असते. त्या सरोवरात सुंदर कमळे उमललेली असतात. कुणाल तिकडे बघतच बसतो.

माला - कुणाल, आता आपण जेवून घेऊया का?

कुणाल - चालेल, खूप भूक लागली आहे.

दोघे जण एका झाडाखाली जेवायला बसतात. एवढे चालल्यामुळे दोघांनाही खूप भूक लागलेली असते. तेवढ्यात एक राजहंसाचा थवा उडत उडत सरोवरावर येतो. जेवत असतानाच ते सुंदर दृश्य टिपण्यासाठी कुणाल मोबाईल बाहेर काढतो आणि त्याचे शूटिंग करतो. 

कुणाल - काय ग इथे इतके पशुपक्षी पाहिले, पण हिंस्त्र पशु कसे दिसले नाहीत?

माला - खरं म्हणजे हे एक आश्चर्यच आहे, पण सत्य परिस्थिती आहे. इथला एरिया सोडला तर बाकीच्या जंगलांमध्ये हिंस्त्र पशु देखील आढळतात.

कुणाल - पण याचे कारण काय?

माला - नक्की माहित नाही, पण असं म्हणतात की या एरियात यक्षांची वस्ती आहे. त्यामुळे हिंस्त्र पशु इथे राहत नाहीत.

कुणाल - कोण यक्ष? म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये ज्यांचा उल्लेख असतो तेच तर तुला नाही ना म्हणायचे?

क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "ऋणानुबंध(भाग१)"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी



( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


ऋणानुबंध - भाग १


भाग १ 


कुणाल एका नॅशनल बँकेत नोकरीला होता. तो सध्या खुशीत होता. कारणसुद्धा तसेच होते. कुणालची  हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या " वनराई " गावात बदली झालेली असते. असिस्टंट मॅनेजर या पोस्टवरून त्याचे मॅनेजर या पोस्टवर प्रमोशन झालेले असते. 

हा  आनंद प्रमोशनचा असतोच, पण आता मला हिमालयाच्या जवळ राहून, तो परिसर जवळून बघता येईल याचा जास्त असतो. लहानपणापासून कुणालला हिमालयाची ओढ असते. आई - वडिलांबरोबर लहानपणी सुट्टीत तो खूप ठिकाणी फिरला होता. पण अजून हिमालयात जायचा योग आलेला नव्हता. 

पण या आनंदाबरोबरच थोडे दुःख होते. आई वडिलांना व लहान बहिणीला सोडून कुणाल फार दिवस कुठे एकटा राहिलेला नव्हता. आई-वडील आणि बहीण कुणालची समजूत काढतात. ते सांगतात कि, तू तिकडे जाऊन सेटल हो, त्यानंतर आम्ही तुला भेटायला येऊ.

ऑफिस मध्ये कुणालचा सेंड ऑफ होतो. कुणाल घरी परत येतो. चार ते पाच दिवसात कुणालला ड्युटीवर  जॉईंट व्हायचं असतं. फ्लाईटचे बुकिंग झालेले असते. घरातील सर्वांचा, तसेच मित्रांचा निरोप घेऊन कुणाल निघतो. सिमला पर्यंत फ्लाईट असते. पुढचा वनराईपर्यंतचा प्रवास बसने असतो. 




"वनराई" हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक गाव होते. गाव बऱ्यापैकी मोठे होते. बाजूला एक नदी वहायची. गावातील लोक शेतीवरच मुखत्त्वेकरून अवलंबून होते. गहू आणि जव हि तेथील मुख्य पिके होती. तसेच तेथे सफरचंद आणि लिची या फळांच्या मोठ्या बागा होत्या. एकंदरच "वनराई" हे गाव संपन्न होते. गावातील निसर्गसौंदर्य  तर छानच होते, शिवाय बाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा होत्या. सभोवती मोठी मोठी जंगले होती. 

बँकेने कुणालची रहाण्याची सोय एका बंगल्यात केलेली असते. बंगला मोठा असतो. बंगल्याचे मालक सिमल्यात स्थायिक झालेले असतात. त्यामुळे बंगला भाडयाने मिळतो. सर्व काही नवीन असते. पण गावातील निसर्ग सौंदर्य पाहून, कुणाल खुष होतो. जवळच एक घरगुती खानावळ असते. तेथे जेवणाची सोय होते. अर्थात जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीचे नसते. पण जेवण अत्यंत रुचकर असते. "वनराईला" सुखरूप  पोहोचल्याचा, कुणाल  घरी फोन करतो. प्रवासाचा शीण आल्यामुळे रात्री कुणालला  लवकर झोप लागते. थंडीसुद्धा छान पडलेली असते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कुणालला जाग येते. सर्व आटोपून कुणाल रेडी होतो. एक जागा भाड्याने घेतलेली असते. तेथे ऑफिसच्या फर्निचरचे काम चालू असते. २ ते ३ दिवसात बँकेच्या शाखेचे  उदघाट्न असते. बाहेरून बदली होऊन अजून चार लोकांचा स्टाफ देखील कामावर रुजू झालेला असतो.

एक चांगला मुहूर्त बघून बँकेमध्ये पुजा केली जाते. गावच्या प्रमुखांकडून बँकेचे उद्घाटन केले जाते. गावामध्ये अजून पर्यंत बँक नसल्यामुळे लोकांना पैशाच्या व्यवहारासाठी बाजूच्या शहरात जावे लागे. थोडीफार जी काही कमाई  होत असे, ती कमाई बरेचसे लोक घरातच ठेवत असत. सेविंग अकाउंट काय असते हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे गावात बँक सुरू झाली हे पाहून लोकांना आनंद झाला. पहिल्याच दिवशी सेविंग अकाउंट ओपन करायला सुरुवात होते. 

स्टाफमधील चौघांपैकी दोघेजण कुणाल पेक्षा वयाने लहान असतात तर दोघेजण कुणाल पेक्षा वयाने मोठे असतात. मोहिनी मॅडम कुणाला पेक्षा वयाने थोड्या  मोठ्या  असतात, तर गोविंद सरांना रिटायर व्हायला अजून दहा वर्षे बाकी असतात. विपुल आणि संजय कुणाल पेक्षा वयाने लहान असतात. कुणालचे वय अठ्ठावीस वर्षे असते. कुणालचे उच्च शिक्षण पूर्ण झालेले असते. त्याचबरोबर त्याने बँकिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या असतात. त्यामुळे बँकेत नोकरीला लागताना मुळातच तो वरच्या पोस्टवर लागतो. चांगल्या कामामुळे चार ते पाच वर्षात त्याचे ब्रांच मॅनेजर पोस्टवर प्रमोशन होते. तरी देखील या सर्व गोष्टींचा कुणालला  गर्व नसतो. स्टाफ मधील चारही लोकांशी कुणाल प्रेमाने वागत असतो. मोहिनी मॅडम आणि गोविंद सरांचा तो मान राखत असतो. बँकेला गावातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. आठवड्याभरात बरीच सेविंग अकाउंट ओपन होतात. बरेच व्यापारी लोक करंट अकाउंट देखील ओपन करतात. 

एक दिवस एक सुंदर तरुणी बँकेमध्ये प्रवेश करते. तिला सेविंग अकाउंट ओपन करायचे असते. त्यासाठी ती मोहिनी मॅडम कडे जाते. मोहिनी मॅडम फॉर्म काढून भरू लागतात. तेव्हा ती तरुणी मोहिनी मॅडम चे आभार मानून सांगते की फॉर्म मी भरू शकते. आत्तापर्यंत गावकऱ्यांचे बँकिंगचे फॉर्म स्टाफने भरलेले असतात. ही तरुणी फॉर्म स्वतःच भरते हे ऐकून मोहिनी मॅडमना आश्चर्य वाटते. ती तरुणी फॉर्म इंग्लिश मध्ये व्यवस्थित भरून खाली सही करून मोहिनी मॅडम कडे जमा करते. पेहरावावरून ती तरुणी गावातीलच दिसत असते. परंतु ती नीटनेटकी व सुसंस्कृत दिसत असते. स्टाफ मधील चौघांना देखील तिचे आश्चर्य वाटते. त्यानंतर ती तरुणी लोन विषयी चौकशी करते. एवढी वयाने लहान असलेली तरुणी लोन विषयी चौकशी करते हे पाहून मोहिनी मॅडम गार पडतात. परंतु लोन विषयीचे डिसिजन घेण्याचा अधिकार कुणाल सरांना असल्यामुळे त्या तिला कुणाल सरांच्या केबिनमध्ये जाण्यास सांगतात. 

कुणाल केबिन मध्ये काम करत बसलेला असतो. सर आत येउ का? ती तरुणी विचारते.
कुणाल डोकं वर करून केबिनच्या दाराकडे बघतो. एक गोरीपान सुंदर तरुणी केबिनच्या दारात उभी असते. तो तिला आत येण्याची परवानगी देतो.
कुणाल - या मॅडम बसा

तरुणी - थँक्यू

कुणाल - बोला मॅडम मी आपली काय मदत करू शकतो?

तरुणी - सर मला लोन विषयी माहिती हवी होती

कुणाल - मॅडम, तुमचे नाव काय?

तरुणी - सर, माझे नाव माला.

कुणाल- माझे नाव कुणाल. कोणाला हवे आहे लोन?

माला -  माझ्या चुलत भावाला

कुणाल -  काय करतात ते? त्यांचा उद्योग - धंदा, नोकरी काय?

माला  - त्याची शेती आणि सफरचंदाची बाग आहे. त्याची एक एकर पडीक जमीन आहे तेथे त्याला अजून  एक सफरचंदाची बाग लावायची आहे. त्यासाठी त्याला कर्ज हवे आहे.

कुणाल - तुम्ही काय करता?

माला -  मी बी. एस. सी. एग्रीकल्चर आहे. माझ्या वडिलांची देखील शेती आणि सफरचंदाची बाग आहे. शिवाय आमचा दुधाचा व्यवसाय देखील आहे. या सर्व कामांसाठी मी वडिलांना मदत करते.

कुणाल  - तुमच्या भावाला कर्ज मिळेल. त्याला एक दिवस बँकेमध्ये घेऊन या.

माला - ठीक आहे मी एक-दोन दिवसात त्याला घेऊन येते.

जी काही कागदपत्र कर्जासाठी लागतील त्यांची यादी कुणाल मालाला देतो. त्यानुसार माला दोन दिवसांनी तिच्या चुलत भावाला घेऊन बँकेमध्ये येते. सर्व विचारपूस केल्यावर कुणाल मालाच्या भावाकडून लोन चा फॉर्म भरून घेतो. जास्तीत जास्त एक आठवड्यात तुमचे लोन पास होईल असा विश्वास कुणाल त्या दोघांना देतो.

माला आणि तिचा भाऊ कुणालचे आभार मानतात. 

कुणाल - अहो बँकेला ज्या प्रकारे ठेवींची गरज असते त्याच प्रकारे कर्जदारांची देखील गरज असते. फक्त कर्जदार बुडव्या तर नाही ना याची आम्हाला खात्री करावी लागते. तुम्हाला कर्ज देण्यास बँकेला काहीच प्रॉब्लेम नाही.

संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन, फिरायला म्हणून कुणाल बाहेर पडतो. जवळच एक देऊळ असते. तेथे जाऊन कुणाल देवाचे दर्शन घेतो. थोडा वेळ देवळात बसून कुणाल बाहेर पडतो. वाटेत कुणालला एक दुधाची डेअरी दिसते. "मुरारी डेअरी"  असे त्या डेअरीचे नाव असते. खानावळीत जरी जेवण होत असले तरी चहा कॉफी पिण्यासाठी कुणालला दुधाची गरज असते. येथील दूध घेऊन तर बघूया म्हणून कुणाल आत शिरतो. तेथे एक काका बसलेले असतात.

काका - या साहेब काय पाहिजे तुम्हाला?

कुणाल- काका तुम्ही मला कसे ओळखता?

काका - अहो तुमच्या बँकेच्या उद्घाटनाला मी आलो होतो.

कुणाल  - मला अर्धा लिटर म्हशीचे दुध हवे आहे.

काका अर्धा लिटर दुधाची थैली कुणालला देतात. दूध घेऊन कुणाल घरी येतो. इलेक्ट्रिक शेगडी वर दूध तापत ठेवतो. दूध तापून त्यावर घट्ट साय येते. कुणाल चहा करुन पितो. आजचा चहा एकदम मस्त झालेला असतो. कारण दूध एकदम चांगले असते. एवढे चांगले दूध आणि ते देखील कमी किमतीत मिळालेले पाहून कुणालला आनंद होतो. आता रोज मुरारी डेअरी इथूनच दूध घ्यायचे असे कुणाल ठरवतो. आता रोजच्या रोज संध्याकाळी कुणाल काकांच्या डेअरीत जाऊ लागतो. हळूहळू त्याची काकांबरोबर चांगली ओळख होते. 


"वनराई" ची थंडी कुणालला सूट होत नाही. त्याला बारीक ताप येऊ लागतो. पण नुकतेच बँकेचे ओपनिंग झालेले असल्यामुळे कुणाल सुट्टी घेत नाही. जवळची गोळी घेऊन कुणाल ड्युटीवर जातो.
संध्याकाळी कुणाल काकांच्या डेअरीमध्ये जातो.   कुणालला डेअरी मध्ये काका दिसत नाहीत. तेथे माला बसलेली दिसते. 
कुणाल - अरेच्या तुम्ही?

माला -  हो ही माझ्या वडिलांची डेअरी आहे.

कुणाल  - काका कुठे गेले आहेत?

माला  - ते शेतावर गेले आहेत. पण तुम्ही असे आजारी असल्यासारखे  का दिसत आहात?

कुणाल - मला थोडा ताप येत आहे.

माला  - मग डॉक्टरांकडे गेला होतात का?

कुणाल  - माझा इथे कोणाशी परिचय नसल्यामुळे चांगले डॉक्टर कोणते आहेत ते मला माहीत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार म्हणून मी माझ्या जवळची गोळी घेतली. पण इकडली हवा मला सूट होत नसल्यामुळे मला फरक पडला नाही.

माला  - आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत. म्हणजे ते वैद्य आहेत. त्यांचा गुण चांगला येतो. मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते. त्यांचे नाव धनंजय आहे.
माला कुणालला डॉक्टरांचा पत्ता देते तसेच चुलत भावाचे लोन पास झाल्यामुळे आभार देखील मानते.

कुणाल-  आभार कसले मानता? उलट मीच तुमचा आभारी आहे. मला तुम्ही डॉक्टरांचा पत्ता दिलात.

दूध घेऊन कुणाल घरी येतो. त्यानंतर तो डॉक्टरांकडे जातो. दवाखान्यात थोडीशी गर्दी असते. थोडावेळ थांबल्यावर कुणालचा नंबर लागतो.
कुणाल - डॉक्टर आत येऊ का?

डॉक्टर - या आत या. 

कुणाल आत मध्ये जातो व खुर्चीवर बसतो.

डॉक्टर  - तुम्ही ब्रँच मॅनेजर ना? कालच मी तुमच्या बँकेत घेऊन सेविंग अकाउंट ओपन केले आहे. तुम्ही केबिन मध्ये काम करत बसलेले होतात, तेव्हा मी तुम्हाला बाहेरून बघितले. पहिल्या दिवशी उद्घाटनाला मात्र मला येता आले नाही. सांगा तुम्हाला काय होत आहे?

कुणाल  - मला काल रात्री पासून थोडा ताप येत आहे.

डॉक्टर - खाण्यामध्ये काही बदल झाला आहे का?

कुणाल - नाही, खाण्यामध्ये काही बदल झालेला नाही. पण इथली थंडी मला मानवली नाही.

डॉक्टर  - बरोबर. तुम्ही महाराष्ट्रातले. त्यामुळे तुम्हाला इथली हवा मानवली नाही. मी तुम्हाला औषध देतो. दोनच दिवसात तुम्हाला बरे वाटेल.

जडीबुटी पासून बनवलेल्या गोळ्या आणि लिक्विड डॉक्टर कुणालला देतात. औषध कसे घ्यायचे ते डॉक्टर समजावून सांगतात. कुणाल डॉक्टरांची फी देतो.

डॉक्टरांच्या इथून निघून कुणाल खानावळीत जातो. जेवण झाल्यावर कुणाल घरी परततो. घरी येईपर्यंत कुणालला सणकून ताप भरतो. डॉक्टरांनी दिलेले औषध घेऊन कुणाल झोपी जातो. कुणालला छान झोप लागते आणि भरपूर घाम येऊन कुणालचा ताप उतरतो. सकाळी उठल्यावर कुणालला बरं वाटत असते. थोडा अशक्तपणा मात्र जाणवत असतो. कुणाल तयार होऊन ऑफिसला जातो. बँकेत जाताना देखील बरोबर औषध घेऊन तो जातो. आज संध्याकाळी फिरायला जाण्याची ताकद कुणाल मध्ये नसते. त्यामुळे बँकेतून सुटल्यावर तो परस्पर मुरारी डेअरीमध्ये जातो. आज देखील डेअरीमध्ये काका नसतात. तेथे माला असते.

कुणाल - थँक्यू. काल मी डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांच्या औषधाने मला खूप फरक पडलेला आहे.

माला - अहो त्यात आभार कसले मानता? तुम्हाला बरे वाटले ना मग चांगलं झालं. या डॉक्टरांचा चांगलाच गुण येतो. माझ्या वडिलांचे ते चांगले मित्र आहेत. 

कुणाल - आज काका कुठे दिसत नाहीत?

माला - आज शेतावर कामाला गेलेले असताना ते वाटेमध्ये पडले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेले आहे. बाजूच्या शहरात जाऊन प्लॅस्टर घातले. १ महिना आराम करायला सांगितले आहे.

कुणाल - अरे बापरे मला काकांना भेटायला पाहिजे.

माला  - मग भेटाना, डेअरीच्या मागच्या बाजूलाच आमचे घर आहे.

क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -


"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...