Read best Marathi online gudh katha love story free मराठी
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग २
भाग २
कुणाल काकांना जाऊन भेटतो. काकू कुणालसाठी चहा करतात. थोडावेळ काकांशी गप्पा मारून कुणाल घरी परत येतो.
औषध वेळेवर घेतल्यामुळे कुणाल दोन दिवसांनी ठणठणीत बरा होतो. परत जाऊन तो डॉक्टर धनंजयना भेटतो. तुमच्या औषधांमुळे मला चांगले बरे वाटत आहे असे त्यांना सांगतो. आज दवाखान्यामध्ये गर्दी नसते. त्यामुळे डॉक्टर मोकळे असतात. त्यामुळे इतर विषयांवर देखील डॉक्टर थोडावेळ कुणालशी बोलतात. डॉक्टरांना पुस्तक वाचनाची आवड असते. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरची भरपूर पुस्तके वाचलेली असतात. कुणालला देखील वाचनाची भरपूर आवड असते. त्यामुळे डॉक्टर त्याला अध्यात्मावर आधारित एक पुस्तक वाचायला देतात. डॉक्टरांना कुणाल फार आवडलेला असतो. दोघांनाही वाचनाची आवड असते. त्यामुळे एक दिवस माझ्या घरी गप्पा मारायला या असे डॉक्टर कुणालला सांगतात. सकाळ-संध्याकाळ दवाखान्यात वेळ जात असल्यामुळे रात्री नऊच्या नंतर जरी आलात तरी चालेल असे ते कुणालला सांगतात. नक्की येईन असे सांगून कुणाल तेथून निघतो.
दोनच दिवसात कुणाल चे पुस्तक वाचून पूर्ण होते. रात्री खानावळीत लवकर जेवून कुणाल डॉक्टरांच्या बंगल्यावर जातो. डॉक्टरांच्या बंगल्याची डोअरबेल तो वाजवतो.
डॉक्टर - या कुणाल साहेब या.
कुणाल - डॉक्टर, मी तुमच्या पेक्षा वयाने खूप लहान आहे. त्यामुळे मला साहेब वगैरे म्हणू नका. फक्त कुणाल म्हणा.
डॉक्टर - जशी तुझी मर्जी.
डॉक्टरांचे वय देखील साठीच्या आसपास असते. डॉक्टर त्यांच्या मिसेसशी कुणालची ओळख करून देतात. डॉक्टरांची मिसेस देखील स्वभावाला खूप चांगली असते. इथे गावामध्ये दोघेचजण बंगल्यामध्ये राहत असतात. त्यांचा मुलगा परदेशामध्ये प्रॅक्टीस करत असतो.
डॉक्टर आणि कुणाल एकमेकांना कोणती कोणती पुस्तके वाचली याबद्दल माहिती देत असतात. दोघांचे वाचन अफाट असते. बोलता बोलता मुरारी काकांचा विषय निघतो.
डॉक्टरांची मिसेस - अहो तुम्हाला आता जडीबुटी कोण आणून देईल?
डॉक्टर - हो ते एक मोठे टेन्शनच आहे.
कुणाल - का काय झाले? कसलं टेन्शन आहे?
डॉक्टर - अरे काही औषधे बनवण्यासाठी मला जडीबुटींची ची गरज पडते. त्यासाठी बाजूच्या जंगलांमध्ये फिरावे लागते, डोंगर रांगा ओलांडाव्या लागतात. माझे आता वय होत आले असल्यामुळे एवढे मला चालवत नाही. अर्थात मुरारी देखील माझ्याच वयाचा आहे, परंतु त्याची शारीरिक कपॅसिटी चांगली आहे. त्यामुळे अजून देखील तो डोंगर-दर्या, जंगल यांमध्ये फिरू शकतो. त्यालादेखील वनस्पती शास्त्राचे ज्ञान आहे. पण आता त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
सर्वच औषधे मी काही घरी बनवत नाही. काही औषधांचे प्रिस्क्रिप्शन मी लिहून देतो. ती मेडिकल स्टोअर मधून विकत घेता येतात. पण बर्याचशा जडीबुटींची औषध बाजारात उपलब्ध नाहीत.
कुणाल - डॉक्टर मला सांगाल का? मी तुमच्यासाठी जडीबुटी आणीन.
डॉक्टर - अरे, पण तुला जडीबुटी विषयी काही माहिती आहे का?
कुणाल - नाही, पण तुमच्या औषधाने मला खूप लवकर फरक पडला. त्यामुळे तुमच्या औषधी, समाजासाठी चालू राहाव्यात असे मला वाटते.
डॉक्टर - पण तुला जडीबुटी विषयी माहितीच नाही. त्यामुळे मी तुला कसं सांगू की काय म्हणून?
डॉक्टरांची मिसेस - अहो पण मालाला माहिती आहे ना जडीबुटी विषयी?
डॉक्टर - पण ती तिच्या वडीलांबरोबर म्हणजे मुरारी बरोबर जंगलात जायची. आता ती एकटी कशी जाईल? अशा तरुण मुलीला मी एकटीला कसं पाठवू?
डॉक्टरांची मिसेस - हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण तिच्या सोबतीला जर कोणाला पाठवले तर जमू शकेल.
डॉक्टर - आता तिच्या सोबतीला कोण जाणार?
हां, एक करता येईल. मुरारीची आणि मालाची जर हरकत नसेल तर, कुणालला तिच्याबरोबर पाठवता येईल.
काय कुणाल जाशील ना माला बरोबर जंगलात जडीबुटी आणायला?
असं परक्या मुलीबरोबर जंगलात जायचं म्हणजे कुणालला बरं वाटत नव्हतं. तो जरासा विचारातच पडला.
त्याच्या मनातील चलबिचल डॉक्टरांनी बरोबर ओळखली.
डॉक्टर - हे बघ कुणाल मी तुला काही फोर्स करणार नाही. पण या जडीबुटींमुळे गावातील गोरगरीब जनतेला स्वस्तात मेडिकलची सेवा उपलब्ध होत आहे. त्यामुळे तू काय ते ठरव.
कुणाल - डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जर मुरारी काका आणि मालाने परवानगी दिली, तर मी मालाबरोबर जंगलात जाऊन जडीबुटी घेऊन येईन.
डॉक्टर - ठीक आहे. तसेच घाबरू देखील नको. वाघ, अस्वल अशा हिंस्त्र श्वापदांचा येथील जंगलांमध्ये वावर नाही. ही श्वापदे दुसऱ्या जंगलांमध्ये आहेत. बाकीचे पशुपक्षी मात्र तुला भरपूर बघायला मिळतील. फक्त जाताना पायाखाली नीट बघून जा. कारण साप आणि विंचू मात्र तिथे थोड्याफार प्रमाणात आढळतात.
कुणाल - काका, हे मात्र आश्चर्यच आहे. एवढ्या मोठ्या
जंगलामध्ये हिंस्त्र पशु कसे नाहीत?
डॉक्टर - आश्चर्य आहे, परंतु हे मात्र खरं आहे. तरीदेखील तुम्ही काळजी मात्र घ्या.
उद्या माला आणि मुरारी, दोघांशी मी बोलेन. थँक यु.
कुणाल - डॉक्टर थँक्यू म्हणून मला लाजवू नका.
तेवढ्यात डॉक्टरांची मिसेस तिघांसाठी गरमागरम कॉफी घेऊन येते. तिघेजण कॉफी पितात. आता बराच उशीर झाल्यामुळे कुणाल घरी परततो.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर धनंजय, मुरारी काकांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करतात. तसेच कुणाल बरोबर झालेले बोलणे देखील सांगतात. आता मुरारी काका आणि कुणाल ची ओळख झालेली असल्यामुळे, मुरारी काकांचा कुणाल वर विश्वास बसलेला असतो. चांगल्या कामासाठी दोघांना एकत्र पाठवायचे असल्यामुळे ते त्यांना परवानगी देतात. आता प्रश्न राहिला तो मालाचा. डॉक्टर काका मालाला देखील विचारतात. कारण कुणाल बरोबर जंगलात जडीबुटी आणायला तिला जायचे असते. तिला जर कुणाल बरोबर जंगलात जायला सुरक्षित वाटत नसेल तर तिला तसेच पाठवणे बरोबर नाही असे डॉक्टर काकांना वाटत असते.
परंतु पहिल्या भेटीतच मालाने कुणालचा स्वभाव ओळखलेला असतो. तो एक सज्जन मुलगा आहे याची तिला खात्री असते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो तिला पहिल्या भेटीतच आवडलेला असतो.
परंतु हे शेवटचे कारण, अर्थातच ती कोणालाच सांगत नाही. कुणाल बरोबर फिरता येईल म्हणून ती मनातून आनंदून जाते.
कुणाल बरोबर जंगलात जाऊन जडीबुटी आणायला मला काहीच हरकत नाही असे ती सांगून टाकते.
माला च्या आईला मात्र या गोष्टीची चिंता वाटत असते. ती मुरारी काकांना खुणेने किचनमध्ये बोलावते. मुरारी काका लंगडतच किचनमध्ये जातात.
तरुण मुलीला अस, त्या मुलाबरोबर जंगलात जडीबुटी आणायला पाठवणे बरं दिसत नाही असं ती सांगते.
मुरारी काका हसत तिला सांगतात अगं आपला तर दोन्ही मुलांवर विश्वास आहे. यामध्ये जे काही होईल ते चांगलेच होईल. जावई शोधायला आपल्याला वहाणा तर झिजवाव्या लागणार नाहीत ना? कुणाल पेक्षा चांगला जावई आपल्याला शोधून तरी सापडेल का?
मालाची आई - अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. एका मुलीचे बाप आहात तुम्ही आणि असं वाटेल तसं कसं बोलता?
मुरारी काका - अगं गंमत केली मी. दोन्ही मुलं खरंच सज्जन आहेत. जाऊ दे त्यांना, चांगल्या कामासाठी जात आहेत.
माला च्या आईला देखील मुरारी काकांचे बोलणे पटते. ती देखील परवानगी देते.
त्यानंतर डॉक्टर काका त्यांच्या दवाखान्यात जातात. तेथून ते कुणालला फोन करतात. माला त्याच्या बरोबर जायला तयार असल्याचे ते सांगतात.
त्यानंतर शनिवारी संध्याकाळी डॉक्टर, त्या दोघांनाही दवाखान्यात बोलावून घेतात. शनिवार असल्यामुळे कुणालचा हाफ डे असतो. सांगितलेल्या वेळेत माला आणि कुणाल दोघेही डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचतात. कोणत्या जडीबुटी आणायचे आहेत याची यादी डॉक्टरांनी केलेली असते. ती यादी ते माला कडे देतात. तसेच दोघांच्याही मोबाईलवर जडीबुटींचे फोटो व थोडी माहिती ते पाठवतात. उद्या जाताना माझी बाईक घेऊन जा असे ते कुणालला सांगतात.
रविवार उजाडतो. कुणाल आणि माला दोघेजण बाईक वर बसून जंगलाच्या दिशेने निघतात. बरोबर मालाने थर्मास मध्ये चहा, दुपारच्या जेवणाचा डबा आणि पिण्यासाठी पाणी घेतलेले असते. नदीपलीकडे, जंगलात व हिमपर्वतांवर जास्त थंडी असल्यामुळे दोघांनीही जाकीट घातलेले असते. दोघेजण ब्रीजवरून नदी क्रॉस करतात. पुढे कच्चा रोड असतो. अजून थोडं पुढे गेल्यावर एक देऊळ लागतं. दोघेजण देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. आता तिथून पुढे बाईक चालवायला रस्ता नसल्यामुळे, कुणाल देवळाच्या बाहेर बाईक पार्क करतो. तेथून पुढे दोघेजण चालतच निघतात.
माला - मला या देवळात यायला खूप आवडते. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी हे देऊळ आहे. हे जागृत देवस्थान आहे.
कुणाल - हो मला देखील इथे दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. मला देखील निसर्गाच्या सहवासात राहायला खूप आवडते. तुम्ही येथे नेहमी येता का?
माला - तुम्ही मला अहो वगैरे म्हणू नका मला कसंतरीच वाटतं. फक्त माला म्हणा. मी तुमच्या पेक्षा काही मोठी नाही.
कुणाल - ठीक आहे, मग आज पासून आपण फ्रेंडशिप करू. तू देखील मला कुणालच म्हण. आपल्याला साधारण किती वेळ लागेल आजचे काम पूर्ण करायला?
माला - साधारण महिन्यातून दोन ते तीन वेळा मी आणि माझे बाबा या जंगलात येतो. डॉक्टर काकांना हव्या असलेल्या जडीबुटी आम्ही येथून घेऊन जातो. त्यावेळी आम्ही न चुकता या देवळात दर्शन घेऊन जातो. एरवी आमचे काम एक ते दोन तासात आटोपतं. पण विशेष जडीबुटी हव्या असतील तर सरोवरा पर्यंत जावे लागते मग मात्र बराच वेळ जातो. आज आपल्याला विशेष जडीबुटी आणायच्या असल्यामुळे वेळ लागेल.
कुणाल - काही हरकत नाही आपण सर्व जडीबूटी घेऊनच घरी जाऊ. तुला जडीबुटी आणि औषधांची बरीच माहीती झालेली असेल. तू डॉक्टर व्हायला हवे होतेस.
माला - खरे म्हणजे मला शेती आणि बागायती ची आवड आहे. त्यामुळेच तर मी बी. एस. सी. ॲग्रीकल्चर केले. माझ्या वडिलांना जडीबुटींची आवड आहे. मी डॉक्टर काकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी हे सर्व करते. तुला कसली आवड आहे?
कुणाल - मला वाचनाची आवड आहे. त्यामुळे डॉक्टर काकांनी मला एक अध्यात्मिक पुस्तक वाचायला देखील दिले. दोनच दिवसात मी ते पुस्तक वाचून काकांना परत केले. आता त्यांनी मला दुसरे पुस्तक दिले आहे. काकांकडे भरपूर पुस्तके आहेत.
दोघेजण गप्पा मारत मारत पुढे चालत असतात. अचानक कुणालच्या पायात काटा रूततो. शूज असून देखील एक अणुकुचीदार काटा कुणालच्या पायात शिरतो. कुणाल वेदनेने ओरडून खाली बसतो. कुणालच्या पायात काटा रुतला हे मालाच्या लक्षात येते. ती पटकन खाली वाकते आणि कुणालच्या पायातील काटा अलगद काढते. ती इतक्या हळूवारपणे काटा काढते की त्यामुळे कुणालला वेदना जाणवतच नाही. ती कुणालचे शूज आणि सॉक्स काढते. शूज असल्यामुळे काटा खोलवर रुतलेला नसतो. परंतु तरी सुद्धा पायातून रक्त येऊ लागले असते. माला पटकन इकडे तिकडे बघते. बाजूच्या एका वनस्पतीची थोडी पाने ती तोडून आणते. पाने हातामध्ये रगडून त्या पानांचा रस ती कुणालच्या पायावर सोडते. त्यानंतर ती पाने कुणालच्या काटा लागलेल्या जागेवर दाबून धरते. पाचच मिनिटांत कुणालला बरे वाटते. आता रक्त देखील थांबते. ती पाने पायाला तशीच चिकटवून ठेवून, माला कुणालच्या पायात सॉक्स आणि शूज घालते.
कुणाल - थँक्यू माला.
माला - कुणाल, मैत्रीमध्ये थँक्यू नाही. चल आता आपण गरमागरम चहा पिऊ.
त्यानंतर माला थर्मास ओपन करते आणि त्यातून वाफाळलेला चहा, २ युज अँड थ्रो कपमध्ये ओतते. त्या थंडीत चहा प्यायला खूप छान वाटत असते. दोघेजण चहा पितात.
माला - कुणाल तुझा पाय आता बरा आहे ना? आपण पुढे चालायला लागायचे ना?
कुणाल - होय माला, आता माझा पाय ठीक आहे. शूज होते म्हणून बरे झाले, काटा खोलवर रुतला नाही.
त्यानंतर दोघेही पुढे चालू लागतात. आता झाडी गर्द होत चाललेली असते. वाटेतून चालताना माला, वेगवेगळ्या वनस्पती दाखवत असते. तसेच त्या वनस्पतींची नावे आणि त्यांचे उपयोग सांगत असते. जसजसे ते जंगलात आत आत जातात, तस तसे त्यांना वेगवेगळे पशुपक्षी दिसायला लागतात. त्यामध्ये मोर, ससे, हरणं, हत्ती, गरुड, भारद्वाज, कोकीळ आणि अनेक पशु पक्षी दिसू लागतात.
माला - पायाखाली नीट बघून चाल रे, इकडे साप, विंचू देखील कधी कधी असतात.
कुणाल - हो, डॉक्टर काका मला तसे बोललेले आहेत.
वाटेतून चालत असताना हव्या असलेल्या जडीबुटी आणि औषधी वनस्पती माला तोडून घेऊ लागते. कुणाल देखील तिला मदत करू लागतो. येताना दोघांनी मोठ्या मोठ्या गोणी फोल्ड करून आणलेल्या असतात.
आता थोडं पुढे आल्यावर हिमाच्छादित पर्वत रांगा सुरू होतात. पर्वतांची उंची फार नसते. दोघेजण पर्वत चढू लागतात. या सर्व निसर्गसौंदर्याचे कुणाल मोबाईलवर फोटो काढत असतो.
माला - बापरे किती फोटो काढतोस? आपण घरातून बाहेर पडल्यापासून तुझे फोटो शूट चालूच आहे.
कुणाल - अगं हा निसर्ग, हे सृष्टीसौंदर्य मला नवीन आहे. आमच्या तिकडे अशी बर्फाच्छादित हिमशिखरं, अशी जंगले शहरातून बघायला मिळत नाहीत. मला लहानपणापासूनच बर्फाच्छादित हिमशिखरांची, हिमालयाची ओढ होती.
एकीकडे मालाचे जडीबुटी शोधण्याचे आणि औषधी वनस्पती शोधण्याचे काम चालूच असते. हळूहळू तो पर्वत ओलांडून दोघेजण पलीकडे जातात.
पलीकडे एक सुंदर सरोवर असते. त्या सरोवरात सुंदर कमळे उमललेली असतात. कुणाल तिकडे बघतच बसतो.
माला - कुणाल, आता आपण जेवून घेऊया का?
कुणाल - चालेल, खूप भूक लागली आहे.
दोघे जण एका झाडाखाली जेवायला बसतात. एवढे चालल्यामुळे दोघांनाही खूप भूक लागलेली असते. तेवढ्यात एक राजहंसाचा थवा उडत उडत सरोवरावर येतो. जेवत असतानाच ते सुंदर दृश्य टिपण्यासाठी कुणाल मोबाईल बाहेर काढतो आणि त्याचे शूटिंग करतो.
कुणाल - काय ग इथे इतके पशुपक्षी पाहिले, पण हिंस्त्र पशु कसे दिसले नाहीत?
माला - खरं म्हणजे हे एक आश्चर्यच आहे, पण सत्य परिस्थिती आहे. इथला एरिया सोडला तर बाकीच्या जंगलांमध्ये हिंस्त्र पशु देखील आढळतात.
कुणाल - पण याचे कारण काय?
माला - नक्की माहित नाही, पण असं म्हणतात की या एरियात यक्षांची वस्ती आहे. त्यामुळे हिंस्त्र पशु इथे राहत नाहीत.
कुणाल - कोण यक्ष? म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये ज्यांचा उल्लेख असतो तेच तर तुला नाही ना म्हणायचे?
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
पुढच्या भागाची उत्सुकता ��
उत्तर द्याहटवा