Read best Marathi online gudh katha love story free मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
कृष्णविवर - भाग १
भाग १
एका छोट्याश्या शहरात आशिषचा जन्म झाला होता. आशिष जन्मतःच इतरांपेक्षा खूप वेगळा होता. दिसायला अत्यंत सुंदर आणि गोरापान होता. तसेच तो अत्यंत हुशार होता. तो शाळेत जाऊ लागल्यावर त्याची कुशाग्र बुद्धी बघून त्याचे शिक्षक अचंबित झाले. एकदा शिकवताच त्याच्या सर्व काही लगेचच लक्षात येत असे. पुढच्या वर्गातील मुलांची पुस्तके वाचून तो विषय त्याला लगेचच लक्षात येई. वर्गात त्याचा नेहमी पहिला नंबर असे. लहानपणापासून त्याला सायन्सची आणि विशेषतः फिजिक्स ची आवड होती. तसेच त्याला खगोलशास्त्राचे देखील आकर्षण असते.
परंतु थोडा मोठा झाल्यावर त्याला सर्व जीवन मिळमिळीत वाटू लागले. कारण त्याच्या जीवनात काही चायलेंज नव्हते. अभ्यासातील सर्व काही जणू आधीपासूनच त्याला माहीत होते. जीवनामध्ये कठीण असे त्याला काही वाटतच नव्हते. आशिषचा मित्र परिवार खूप मोठा होता. तो मित्रांमध्ये खूप कमी वेळा मिक्स होत असे. परंतु गरज पडल्यावर प्रत्येक मित्राच्या मदतीला धावून जात असे. त्यामुळे सर्वांचा तो लाडका होता. तुषार हा त्याचा जिवलग मित्र होता. त्याच्याबरोबर मात्र तो बराच वेळ गप्पा मारत असे.
बघताबघता आशिष उच्चशिक्षण घेत गेला. बायो फिजिक्स मध्ये त्याची पीएचडी पूर्ण झाली. शहरातीलच एका मोठ्या कॉलेजमध्ये त्याला प्रोफेसरची नोकरी मिळाली. आवड असल्यामुळे बंगल्यातीलच एका खोलीमध्ये त्याने त्याची प्रयोगशाळा सुरू केली होती. शिवाय एक मोठी दुर्बीण आणून त्याने टेरेसवर बसवली होती. रात्री थोडा वेळ तो ग्रहताऱ्यांचे देखील निरीक्षण करत असे.
बाजूलाच असलेल्या गावामध्ये आशिषच्या वडिलांची खूप मोठी शेतजमीन होती. सर्व प्रॉपर्टीचा आशिष एकुलता एक वारसदार होता.
आता आशिषच्या आई - वडिलांनी त्याला लग्न कर म्हणून सांगण्यास सुरुवात केली. परंतु अभ्यास आणि कॉलेजमध्ये मुलांना शिकवणे सोडले तर अशिषचे कुठेच लक्ष लागत नव्हते. आशिषचे मन काहीतरी शोधत होते, परंतु ते त्याला मिळत नव्हते. आपण काय शोधत आहोत हेच आशिषला कळत नव्हते. मूलाची अशी अवस्था बघून त्याच्या आई-वडिलांना खूप काळजी वाटू लागली.
बऱ्याच वेळा आशिषला स्वप्नामध्ये तारांगण दिसत असे. मात्र त्याच्या थोडसं पुढे काळाकुट्ट अंधार दिसत असे. त्या अंधारातून आशिष बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करीत असे, परंतु अंधाराशिवाय त्याला काहीही दिसत नसे. रात्री तासन्-तास त्या दुर्बिणीत डोकं घालून बसतोस, त्यामुळे असली स्वप्न पडतात असे त्याचे आई-वडील त्याला सांगत असत.
एकदा आशिषच्या वडिलांचे एक मित्र वामन काका घरी आले होते. ते बाजूच्या शहरात राहत असत. ते डॉक्टर असतात. परंतु कामाच्या व्यापामुळे बऱ्याच दिवसात ते आशिषच्या वडिलांना भेटू शकले नव्हते. त्यांच्या इकडल्या तिकडल्या गप्पा होतात.
वामन काका - अरे आशिष साठी स्थळ बघत आहेस की नाही?
आशिषचे वडील - अरे काय सांगु? या मुलाने डोक्याला ताप दिला आहे.
वामन काका - का रे, काय झाले?
आशिषची आई - अहो भावजी, स्वतःला जेव्हा मनापासून लग्न करावेसे वाटेल तेव्हाच लग्न करेन असे तो म्हणत आहे.
वामन काका - वहिनी, त्याने बाहेर कुठे मुलगी बघून ठेवली आहे का?
आशिषची आई - नाही हो. एखादी मुलगी त्याची त्याने पसंत करून आणली असती तरी चालले असते. पण हा कशात इंटरेस्ट घेत नाही आहे.
आशिषचे वडील - वामन, तू एकदा याचा हात बघ बरं, तु हस्त रेषांवरून ज्योतीष चांगले बघतोस ना?
वामन काका - माझा हा व्यवसाय नाही, परंतु मला आवड आहे. माझे वडील देखील हस्तरेषा तज्ञ होते.
आशिषचे वडील - आता येईल थोड्याच वेळात. दुपारी साडेबारा पर्यंत त्याची लेक्चर्स असतात. आता आलाच आहेस तर जेवूनच जा. बरेच दिवसांनी येणे झाले आहे तुझे. आशिषचे भविष्य देखील बघून घेशील.
वामन काका - मस्तच. वहिनींच्या हातची गरम आमटी बऱ्याच महिन्यांत खाल्लेली नाही.
थोड्याच वेळात आशिष येतो. वामन काका आशिषची चौकशी करतात. सर्वजण जेवायला बसतात. वामन काकांना गरम आमटी खूपच आवडते. जेवून सर्वजण हॉल मध्ये बसतात.
आशिषचे वडील - आशिष, वामन काका हस्तरेषा तज्ञ आहेत बरं का. तुझा हात दाखव त्यांना.
आशिष - काका, बरं झालं तुम्ही आलात. मला माझे भविष्य बघायचेच होते.
आशिष वामन काकांना हात दाखवतो. वामन काका त्यांच्या बॅगेतून भिंग बाहेर काढून त्याचा हात बघू लागतात. परंतु हातावरील एक चिन्ह बघून ते पूर्णतः गोंधळून जातात. आशिषच्या हातावर एक बारीकसे आपट्याचे पान असते. ते खूपच बारीक असल्यामुळे सहजासहजी दिसत नसते. परंतु भिंगामुळे वामन काकांना ते स्पष्ट दिसते. बाकी हस्त रेषा चांगल्या असतात. या आपट्याच्या पानाचा अर्थ मात्र वामन काकांना लागत नसतो. असे त्यांनी कुठल्याही ग्रंथात देखील वाचले नसते किंवा त्यांच्या वडिलांनीदेखील याबाबत त्यांना काही सांगितलेले नसते.
वामन काका - आशिष, तुझ्या हस्तरेषा तर अत्यंत उत्तम आहेत. तसे तुझ्या जीवनात काही अडचण दिसत नाही आहे, या हस्तरेषां वरून तरी. तुझी काही अडचण असल्यास मला सांग.
आशिष - काका मला मनःशांती मिळत नाही आहे. माझे मन कुणाला तरी शोधत आहे, परंतु ते काय ते मला कळत नाही. बाकी माझे शिक्षण व्यवस्थित झाले, मला नोकरी देखील चांगली मिळाली, घरची श्रीमंती देखील आहे. परंतु मन मात्र उदास आहे.
तसेच आशिष त्यांना त्याला पडत असलेल्या स्वप्नाविषयी देखील सांगतो.
वामन काका - माझ्या अभ्यासाप्रमाणे आणि तू सांगितलेल्या वर्णनानुसार तुला स्वप्नात कृष्णविवर दिसत आहे. तू तर खगोल अभ्यासक देखील आहेस. मग हे कृष्णविवर असल्याचे तुझ्या लक्षात आले नाही का?
आशिष - मला देखील ते कृष्णविवर असेल असे वाटत होते. परंतु आजपर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीने कृष्णविवर प्रत्यक्षात बघितलेले नाही. ती एक संकल्पना मात्र आहे. परंतु तेच तेच मला परत का दिसते?
वामन काका - मीदेखील माझा अंदाज सांगितला. आता यामध्ये दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे तुझे आई वडील सांगतात त्याप्रमाणे असू शकते. म्हणजे तु रात्रीचा तासन्-तास दुर्बिणीतून ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण करतोस. त्यामुळे तुला ते स्वप्नात दिसत असेल. दुसरी शक्यता म्हणजे तुझा त्या कृष्णविवराशी खरोखर काहीतरी संबंध असेल.
आशिष - काका त्या कृष्णविवराशी माझा काय संबंध असणार?
वामन काका - या ब्रह्मांडात कितीतरी अनाकलनीय अशा घटना असतात. पण जाऊ दे, तू आता बाकी कशाचा विचार करू नकोस. मी तुला एक नाममंत्र देतो. तुला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे देवाचे नाव घेत जा. यामुळे तुला मनःशांती मिळेल. तुझा देवावर विश्वास आहे ना?
आशिष - हो काका, माझा देवावर विश्वास आहे.
वामन काका आशिषला एक नाममंत्र देतात. थोडावेळ गप्पा मारून वामन काका निघून जातात.
आशिष, वामन काकांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण चालू करतो. आशिषचे त्याच्या प्रयोगशाळेत काम चालूच असते. कॉलेजमधुन आल्यावर आशिषचा तेथे तासन्- तास वेळ जात असे.
एक दिवस आशिषला भेटायला त्याचा बालमित्र तुषार येतो. तो सी. ए. झालेला असतो. शहरातच त्याचे एक ऑफिस असते. तुषारचे नुकतेच लग्न झालेले असते. कॉलेजमध्ये असताना त्याच्याच वर्गातील सुजाता नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम जडते. आता दोघे जण लग्न बंधनात अडकलेले असतात.
आशिष आणि तुषार बंगल्याच्या टेरेसवर जाऊन गप्पा मारत बसतात.
आशिष (हसत) - लग्न झालं आणि मित्राला विसरलास.
तुषार - नाही रे, लग्नानंतर आम्ही दोघे जण फिरायला गेलो होतो. जवळजवळ पंधरा दिवस ऑफिसकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. त्यामुळे फिरून आल्यावर ऑफिसच्या कामात गुरफटून गेलो.
आशिष - असू दे रे, मी गंमत केली.
तुषार - आता तू कधी लग्न करतो आहेस? आशिषला काही तरी कानमंत्र दे, म्हणून तुझे बाबा माझ्या मागे लागले आहेत. आशिषने कुठली मुलगी बघून तर ठेवली नाही आहे ना असे देखील तुझे बाबा विचारत होते.
आशिष - मग काय सांगितलंस त्यांना?
तुषार - मी त्यांना सांगून टाकले, या संपूर्ण आयुष्यात तरी आशिषला प्रेम प्रकरण झेपणार नाही. कारण तो नाकासमोर चालणारा मुलगा आहे.
आशिष - हे झेपणार नाही वगैरे काय रे?
तुषार - मग आहे का कोणी? असेल तर आत्ताच सांग. तुझ्या आई वडिलांना समजावयाची जबाबदारी माझी.
आशिष - नाहि रे, कोणीच नाही.
तुषार - मग तुझा प्रॉब्लेम काय आहे.
आशिष - जोपर्यंत एखाद्या मुलीशी लग्न करावे असे मला मनापासून वाटत नाही तोपर्यंत मी कसे काय करू?
तुषार (हसत) - मी म्हणतो तेच बरोबर, तुला प्रेम वगैरे काही झोपणारच नाही. तू अरेंज मॅरेजच कर.
आशिष - मला जेव्हा एखाद्या मुलीबद्दल प्रेम वाटेल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करेन.
तुषार - बघ, पण काय ते लवकरात लवकर कर. तुझे आई-वडील काळजीत आहेत.
एक दिवस वामन काका त्यांच्या क्लिनिक मध्ये बसलेले असतात. वामन काकांच्या औषधाचा चांगला गुण यायचा. त्यांचे रोगाचे निदान देखील व्यवस्थित होते. त्यामुळे काकांच्या दवाखान्यात नेहमीच गर्दी असे. एक दिवस दोन मायलेकी त्यांच्या दवाखान्यात येतात. मुलगी तरुण असते आणि तिला चक्कर येण्याचा त्रास होत असतो. त्या मुलीचे नाव विशाखा असे असते.
डॉ. वामन विशाखाला तपासतात. डॉक्टरांच्या असे लक्षात येते की कामाच्या ताणामुळे तिला चक्कर येत आहे, बाकी काही नाही. तिला तपासताना त्यांचे लक्ष तिच्या तळहाताकडे जाते. डॉक्टर ड्रावर मधुन भिंग काढतात. भिंगातून एक नजर तिच्या तळहाताकडे मारतात. डॉक्टरांनी भिंगातून का तपासलं हे त्या दोन्ही मायलेकींचा लक्षात येत नाही. तपासायची काही नवीन पद्धत असेल असे समजून त्या दोघी तिकडे दुर्लक्ष करतात.
त्याच वेळी डॉक्टरांची मिसेस तिथे काही कामासाठी आलेली असते. डॉक्टरांची मिसेस आणि विशाखा दोघीजणी त्या शहरातील एका कॉलेजमध्ये लेक्चरर असतात. विशाखा काही महिन्यांपूर्वीच कॉलेजवर प्रोफेसर म्हणून लागलेली असते. डॉक्टरांची मिसेस विशाखाची विचारपूस करते. त्यानंतर डॉ. वामन विशाखाला औषधे लिहून देतात आणि चार दिवसांनी परत येऊन कसे वाटते ते सांगायला सांगतात. दोघी मायलेकी डॉक्टरांची फी देऊन निघून जातात.
डॉक्टरांची मिसेस - ती मुलगी तुमच्याकडे औषध घेण्यासाठी आली होती, आणि तुम्ही तिच्या हस्तरेषा काय तपासत होतात?
डॉ. वामन - कारण तिच्या हातावर मला एक विशेष चिन्ह दिसले.
डॉक्टरांची मिसेस - कसले चिन्ह?
डॉ. वामन - आपट्याच्या पानाचे चिन्ह.
डॉक्टरांची मिसेस - हे काय नवीन? तुम्ही मला नीट काय ते सर्व सांगा.
डॉ. वामन - पाच-सहा दिवसांपूर्वी मी बाजूच्या शहरातील माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. माझ्या मित्राचा मुलगा आशिष लग्न करायला तयार नाही. जेव्हा लग्न करावे असे मनापासून वाटेल तेव्हाच लग्न करेन, असे तो म्हणतो आहे. माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी त्याच्या मुलाच्या हस्तरेषा बघितल्या. त्या मुलाच्या हातावर मला आपट्याच्या पानाचे चिन्ह दिसले. असे चिन्ह मी कधीच कोणाच्या हातावर बघितलेले नाही. परंतु आत्ता ही जी मुलगी पेशंट म्हणून आली होती, तिच्या हातावर सेम टू सेम तसेच आपट्याच्या पानाचे चिन्ह आहे. नुसत्या डोळ्यांनी ते चिन्ह अस्पष्ट दिसत होते. म्हणून मी भिंगाने ते चेक केले. हा योगायोग असूच शकत नाही.
डॉक्टरांची मिसेस - ही मुलगी आशिषची जीवनसाथी होऊ शकते, असे तर तुम्हाला सुचवायचे नाही ना?
डॉ. वामन - अगदी तसेच होईल असे नाही. पण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. ती मुलगी पण तुझ्याच कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. ती अविवाहित आहे ना? आता तूच तिच्याबद्दल मला माहिती सांग.
डॉक्टरांची मिसेस - विशाखा क्वांटम फिजिक्स मध्ये पीएचडी झालेली आहे. तिचा स्वभाव मनमिळावू आहे. ती सुसंस्कृत घरातील आहे. आशिष तिच्यासाठी योग्य आहे. मी बोलू का तिच्या आईशी?
डॉ. वामन - आपण असं आशिष साठी स्थळ सुचवून चालणार नाही. कारण तो लग्नाला तयार नाही. आपण त्या दोघांची दुसऱ्या कोणत्यातरी कारणाने भेट घडवून आणू शकतो.
डॉक्टरांची मिसेस - हि आयडीया चांगली आहे. पण भेट घडवणार कशी?
डॉ. वामन - आता पंधरा दिवसांनी माझा बर्थडे आहे. आपण माझ्या बर्थडे साठी एक छोटीशी पार्टी ठेवु. त्या पार्टीसाठी आपण खूप थोड्या लोकांना बोलावू. पण या दोघांना मात्र नक्की बोलावू.
डॉक्टरांची मिसेस - हो आपण असंच करू.
क्रमशः
- कृष्णविवर - भाग २
- कृष्णविवर - भाग ३
- कृष्णविवर - भाग ४ (शेवटचा भाग )
- सासू विरुद्ध सून
- मोहिनी विद्या - भाग १
- मोहिनी विद्या - भाग २
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा