मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग ५
भाग ५
कुणाल - तुम्ही इथे रोज येता का? तुम्हीदेखील जडीबुटी न्यायला येता का?
पुर्वा - सर्वात आधी अहो वगैरे म्हणणे बंद कर. मी नाही का तुला नावाने हाक मारते, मग तू देखील मला नावानेच हाक मार.
कुणाल - म्हणजे आपण फ्रेंडशिप करू असे तुम्ही म्हणताय तर?
पुर्वा - काय बोललास?
कुणाल - "फ्रेंडशिप"
पुर्वा - ते काय असते?
कुणाल - तुम्हाला फ्रेंडशिप सुद्धा माहित नाही. तुम्ही शाळा-कॉलेजमध्ये गेला आहात की नाही?
पुर्वा - आमच्या इथे शाळेत वगैरे जावे लागत नाही. आमचे आईवडील आम्हाला घरीच शिकवतात.
कुणाल - अहो फ्रेंडशिप म्हणजे मैत्री
पुर्वा - असे सरळ बोल ना मग. ठीक आहे आपण फ्रेंडशिप करू.
कुणाल मनातच विचार करतो की ही मुलगी हुशार दिसते. आपण बोललेला "फ्रेंडशिप" शब्द तिने लगेचच उचलला.
कुणाल फ्रेंडशिप साठी हात पुढे करतो.
पुर्वा देखील त्याच्या हातात हात मिळवते.
तिचा हात अत्यंत नाजूक आणि मऊ असतो.
पुर्वा - आता तरी मला नावाने हाक मार.
कुणाल (हसत) - हो नक्कीच पुर्वा.
पुर्वा - चल आपण त्या सरोवरापाशी ते मोठे वडाचे झाड आहे ना त्याच्या खाली जाऊन बसू.
कुणाल - चालेल.
दोघेही झाडाच्या खाली जाऊन बसतात. आता मगाचचेच सृष्टीसौंदर्य कुणालला स्वर्गीय सौंदर्य वाटू लागते.
कुणाल - तुझा मोबाईल नंबर दे ना.
पुर्वा (विस्मयाने बघत) - ते काय असते?
कुणाल (डोक्याला हात लावत) - तुला मोबाईल नाही माहिती. अगं कुठच्या दुनियेत वावरते तू?
कुणाल तीला खिशातील मोबाईल काढून दाखवत सांगतो याला मोबाईल असे म्हणतात.
पुर्वा (हसत) - तसे बघितले तर मी वेगळ्याच दुनियेत राहते.
कुणाल - तसे पण तू आदिमानव किंवा अडाणी वाटत नाहीस. असे वाटत आहे की तुमच्या गावाचा या बाहेरील दुनियेशी संबंधच नाही. पण तुमच्या इथे ग्राम विकास अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी नक्कीच येत असतील ना?
पुर्वा - तू म्हणतोस तसे आमच्या येथे कोणीही येत नाही. पण आमचे जीवन व्यवस्थित चालू आहे.
कुणाल - हो ते तर तुझ्याकडे बघून कळतेच आहे. चांगली सुसंस्कृत आणि खात्यापित्या घरातील दिसतेस.
पुर्वा (हसत) - काहीपण बोलतोस रे?
कुणाल - खरं तेच बोलतोय, तु सुसंस्कृत नाहीस का?
बरं ते जाऊदे तुझ्या गावाचे नाव काय आहे?
पुर्वा - अलकानगरी
कुणाल - वा छान नाव आहे. एकदा यायला पाहिजे तिकडे.
पुर्वा - नाही, तुला नाही येता येणार तिकडे.
कुणाल - का बरं, तिकडे यायला काही पास वगैरे लागतो की काय?
पुर्वा - तसेच समज. बरं ते जाऊदे. तुला भूक लागली असेल ना? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. आता दुपार झाली आहे. थोडावेळ बस येथेच, मी पटकन येते.
कुणाल काही बोलणार इतक्यात पुर्वा तेथून निघून जाते.
दहा मिनिटांतच पूर्वा परत येते. तिच्या हातामध्ये एक मोठा बॉक्स असतो. त्याच्यावर कव्हर असते.
पुर्वा बॉक्सचे कवर उघडते आणि सुंदर अशा अन्नपदार्थांचा घमघमाट तिथे दरवळू लागतो.
बॉक्समधून ती जेवणाने भरलेली दोन चांदीची ताटे बाहेर काढते. त्यातील एक ताट ती कुणाल समोर ठेवते आणि एक स्वतःला घेते.
कुणाल आश्चर्याने तिच्याकडे बघत बसतो.
पुर्वा - पोटभर जेव आता.
कुणाल जेवणासाठी घास घेणार इतक्यात,
पुर्वा - अरे थांब असा रे कसा तू? जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवावे आणि देवाचे नाव घ्यावे. तेवढे सुद्धा तुला माहिती नाही?
कुणाल - सॉरी बरं.
कुणाल ताटाभोवती पाणी फिरवतो आणि देवाचे नाव घेतो.
कुणाल - हे सर्व काय ग?
पुर्वा - काय म्हणजे? जेवण आहे हे.
कुणाल (हसत) - तुझ्याकडे काही जादूची कांडी वगैरे आहे काय? तू गेलीस काय आणि दहा मिनिटात आलीस काय? आणि येताना हे चांदीचे ताट भरून जेवण घेऊन आलीस. हे कसं काय जमतं तुला? याचा अर्थ तू इथे जवळच कुठेतरी राहतेस.
पुर्वा - नाही रे, माझे घर लांब आहे. तू पहिले जेव बरं.
दोघेजण जेवू लागतात. जेवण अत्यंत सुग्रास झालेले असते. जेवणात अत्यंत सुंदर अशी पक्वान्ने देखील असतात. पुर्वा कुणालला आग्रह करून करून पदार्थ वाढत असते. कुणाल भरपूर जेवतो. जेवण झाल्यावर तेथील सरोवराचे पाणी पितो. यापूर्वी तो दोन तीन वेळा सरोवरावर येऊन गेलेला असतो, परंतु पाण्याची चव घेतलेली नसते. आता मात्र तहान लागल्यामुळे तो ते पाणी पितो. पाणी अत्यंत मधुर असते.
कुणालच्या मनाची चलबिचल चालू असते. एक आठवडाभर हिचाच विचार माझ्या मनात घोळत होता. हिने अशी कोणती जादू माझ्यावर केली आहे? पण हे सर्व पुर्वाला विचारायला कुणालला संकोच वाटत होता. तो तिच्याकडे एकटक बघत राहतो.
पुर्वा - काय बघतोयस?
कुणाल मनाचा हिय्या करून तिच्याशी सर्वकाही बोलायचं ठरवतो.
कुणाल - तू खूप सुंदर आहेस. तुझे मन देखील निर्मळ आहे. मला तू खूप आवडतेस.
पुर्वा (लाजून) - तू उगाचच माझी स्तुती करू नको.
यापूर्वी कुणालला प्रेमाचा वगैरे काही अनुभव नसतो. परंतु ही रागावली नाही आणि लाजली म्हणजे यातच सर्व काही आले, असे त्याच्या लक्षात येते.
बिचारी माला मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम करत असते. परंतु याची त्याला कल्पनाच नसते.
कुणाल - मी तुझी खोटी स्तुती करत नाही आहे. लवकरच मी माझ्या आई-वडिलांना तुझ्याविषयी सांगेन आणि आपण लग्न करू.
पुर्वा (गंभीर होऊन) - ते या जन्मी सुद्धा शक्य होईल की नाही याबाबत शंकाच आहे. त्याला कारण म्हणजे आपल्या मधील अंतर आहे. तुमचा प्रदेश वेगळा आणि आमचा प्रदेश वेगळा.
कुणाल - हे बघ, भलेही तू माझ्यासारखी शिकलेली नसशील. तरीपण तू जशी आहेस तशी मला पसंत आहेस. माझ्याबरोबर लग्न करुन तु शहरात आलीस की तिथल्या चालीरीती तू आपोआप शिकशील.
पुर्वा - शिक्षणाचे म्हणत असशील तर आम्ही तुमच्या पेक्षा खूप प्रगत आहोत. मला संस्कृत भाषा आणि इतर बऱ्याच विद्या येतात. फक्त तुमच्यासारखी आधुनिक शिक्षण पद्धती आमच्याकडे नाहीत.
कुणाल - मगापासून मी बघतोय, तू आमचा प्रदेश तुमचा प्रदेश असे काहीतरी म्हणत आहेस. पण तुम्ही देखील आमच्यासारखेच या पृथ्वीवर राहता ना? भाषादेखील तू माझ्यासारखीच बोलत आहेस. तू माझी गंमत तर करत नाहीस ना?
पुर्वा - आपल्या दोघांमध्ये एक मुख्य फरक आहे. तू मानव आहेस आणि मी ...
कुणाल - बोल तू काय बोलतेस? तू मानव नाहीस? मग कोण आहेस?
पुर्वा - मी यक्षकन्या आहे.
कुणालला दोन मिनिटे काय बोलावे ते कळे नाहीसे झाले.
कुणाल - ए आता गंमत भरपूर झाली. तुला मी आवडलो नसलो तर तसं सांग. मी आत्ता इथून निघून जातो. परत कधी तुला भेटणार नाही.
पुर्वा (काकुळतीला येऊन) - कुणाल, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी गंमत करत नाही आहे.
कुणाल - मग आतापर्यंत बाकी कोणाला कशी नाही दिसलीस? माला आणि मुरारी काका देखील येथे बऱ्याच वेळा येतात. त्यांनादेखील तू कधी भेटली नाहीस. मी तर येथे नवखा, मला कशी दिसतेस?
पुर्वा - कारण मी तुला आधीपासून ओळखते.
कुणाल - कसं शक्य आहे? मी तर इथून खूप लांब राहतो, आत्ता ट्रान्सफर झाल्यामुळे इकडे आलो.
पुर्वा - ही ओळख आत्ताची नाही. गतजन्मातील आहे. दोनशे वर्षांपूर्वीची.
कुणाल - माझा गत जन्मावर विश्वास नाही.
पुर्वा - गत जन्मातील आपल्या प्रेमामुळेच आज आपण एकत्र आहोत. प्रत्येकाचे कोणाशीतरी ऋणानुबंध असतात. त्यामुळे पुढील जन्मात आधीच्या जन्मातील व्यक्ती एकत्र येतात. त्यांच्यातील नाती वेगळी असू शकतात. तुला काही आठवत आहे का?
कुणाल - नाही, मला काहीच आठवत नाही.
पुर्वा - हे बघ तू दोन दिवस विचार कर. काही आठवते का ते बघ. ज्याअर्थी नियतीने या जन्मात तुझी माझ्याशी भेट घडवून आणली, त्याअर्थी तुला आधीच्या जन्मातील गोष्टी नक्की आठवतील. कारण मी जर का तुला काही सांगितले तर त्यावर तुझा विश्वास बसणे कठीण आहे.
कुणाल - जर मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असे ठरवलेच, तरी देखील एक प्रश्न पडतोच, की मला माझा गत जन्म एवढ्या लवकर कसा आठवेल?
पुर्वा - तुझ्या लक्षात येण्यासाठी एक छोटीशी माहिती मी तुला सांगते.
कुणाल - सांग
पुर्वा - गेल्या जन्मीचे तुझे नाव "अपुर्व" असे होते. तेव्हा तू वैद्य होतास. तेव्हादेखील तू असाच जडी - बुटी गोळा करायला इकडे यायचास. एवढेच मी आत्ता तुला सांगते.
कुणाल - हे बघ तू जे काही सांगत आहेस ते माझ्या आकलनाच्या पलीकडचे आहे. आत्ताच्या गुरुवारी हॉलिडे आहे, म्हणजे मला सुट्टी आहे. त्या दिवशी मी तुला परत भेटायला येईन.
पुर्वा - नक्की ये मी तुझी वाट बघेन.
आता पुर्वा परत त्या पांढऱ्या घोड्याला बोलावते. घोड्यावर दोघेजण स्वार होतात. घोडा परत त्या देवळापर्यंत बरोबर पोहोचतो. कुणाल आणि पुर्वा देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. माझे पुर्वाशीच लग्न होऊ दे अशी मागणी कुणाल मनातल्या मनात देवाकडे करतो. पुर्वा देखील मनातल्या मनात हेच मागणे मागते. कुणाल पुर्वा चा निरोप घेऊन घरी परततो.
कुणालच्या मनात प्रश्नांवर प्रश्न येत असतात. ही आपली गंमत तर करत नाही ना? असे कुणालला परत परत वाटत असते.
नाही, पुर्वा अशी नाही, मी तिच्या डोळ्यांत प्रेम बघितले आहे - अशीच समजूत कुणाल स्वतःच्या मनाची घालतो.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कुणाल बँकेत जातो. बँकेचे कामकाज चालू होते. सोमवार असल्यामुळे बँकेमध्ये थोडी जास्तच गर्दी असते. लंच टाईमला कुणाल आणि त्याचे स्टाफ मेम्बर्स डबा खायला एकत्र बसतात. नेहमीप्रमाणे त्यांच्या गप्पा सुरू होतात. इतक्यात मोहिनी मॅडम काहीतरी वेगळेच सांगतात.
मोहिनी मॅडम - सर, मी जिथे राहते ना, तिथे बाजूलाच एक आजी राहतात. त्या साधारण ८० वर्षांच्या आहेत. त्या सांगत होत्या की या गावाच्या बाजूला जे जंगल आहे तेथे एक साधू बाबा राहतात. त्यांना सिद्ध बाबा असे म्हणतात. ते खूप मोठे सिद्धपुरुष आहेत. त्यांचे वय देखील पाचशे वर्षांहून अधिक आहे. फक्त पुण्यात्म्यांनाच त्यांचे दर्शन होते. त्या आजींना संपूर्ण आयुष्यात ते चार वेळा भेटलेले आहेत.
सर्वजण कुतुहलाने मोहिनी मॅडम काय सांगत आहेत ते ऐकत असतात.
कुणाल (मुद्दामच) - मी देखील ऐकले आहे की त्या जंगलाच्या पलीकडे यक्षांची वस्ती आहे.
मोहिनी मॅडम - अय्या सर, तुम्हाला कसे माहिती? त्या आजी देखील असेच काहीसे सांगत होत्या.
कुणाल - नाही, तसे काही विशेष मला कळले नाही. परंतु इथले गावकरी म्हणतात म्हणून म्हणालो. पण या सर्व दंतकथा असणार.
लंच टाईम नंतर सर्वजण आपापल्या कामाला लागतात.
रात्रीचे जेवण झाल्यावर कुणाल डॉक्टर काकांकडे जातो. इकडले तिकडले विषयी झाल्यावर, कुणाल सहजच आज दुपारी लंच टाईम ला झालेला विषय काका काकुंच्याजवळ बोलतो.
डॉक्टरांची मिसेस - आता खरे-खोटे काय ते माहिती नाही. परंतु माझ्या सासूबाई देखील त्या सिद्ध बाबांविषयी सांगत असत. आमच्या एका पूर्वजांचे ते गुरू होते असे सासुबाई सांगत.
कुणाल - इंटरेस्टिंग आहे. एक एक नवीन माहिती पुढे येत आहे.
डॉक्टर - अरे ती माझ्या पणजोबांच्या विषयी सांगत आहे, म्हणजे माझ्या पणजोबांचे सख्खे भाऊ.
त्यांना तर जडीबुटी विषयी खूप ज्ञान होते. माझे आजोबा लहानपणी सांगायचे की त्या सिद्ध बाबांनी, त्यांच्या काकांना काही दिव्य जडीबुटी विषयी माहिती सांगितली होती. त्यांनी जडीबुटी वर आधारित एक छोटासा ग्रंथदेखील लिहिलेला होता. त्या ग्रंथाचे नाव "अपुर्वाई" माझ्याकडे तो ग्रंथ देखील आहे.
कुणाल (आश्चर्याने) - काय नाव म्हणालात? "अपुर्वाई"
का? हेच नाव का ठेवले?
डॉक्टर - का म्हणजे काय? त्यांचे नाव "अपुर्व" असे होते. त्यांच्या नावाशी संबंधित म्हणून त्यांनी असे ग्रंथाचे नाव ठेवले असणार.
"अपुर्व" हे नाव ऐकून कुणालला धक्का बसला. पुर्वा ज्या अपुर्व बद्दल बोलत होती तो हाच तर नाही ना असे त्याला वाटून गेले. पुर्वाच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असे कुणालला जाणवू लागले.
कुणाल - अरे वा काका, म्हणजे तुमचे पूर्वज खूपच हुशार होते. मग त्यांची पुढची पिढी कुठे असते?
डॉक्टर - अरे त्यांचे लग्न झाले नव्हते. वयाच्या साधारण ३०व्या वर्षी एका विषारी बाणामुळे त्यांचा मृत्यू झाला. तो बाण त्यांना कोणी आणि का मारला ते मात्र गुढच राहिले.
कुणाल - अरेरे वाईट झाले. अशा हुशार माणसाचा या पद्धतीने मृत्यू व्हायला नको होता.
थोडावेळ गप्पा मारून कुणाल तेथून निघतो. आता कुणालच्या मनाला त्या सिद्ध बाबांना भेटायची ओढ लागते. खरंच असे कोणी सिद्ध बाबा असतील का? आणि असले तर ते मला भेटतील का? कुणालच्या मनात विचार सुरू होतात. घरी पोहोचल्यावर कुणाल झोपी जातो.
रात्री कुणालला एक स्वप्न पडते. स्वप्नात त्याला एक दिव्य तेज दिसते. त्या तेजातून आवाज येत असतो की, "नदी पलीकडच्या देवळात ये". कुणाल दचकून जागा होतो. आपल्याला स्वप्न पडल्याचे त्याच्या लक्षात येते. थोड्यावेळातच त्याला परत झोप लागते.
सकाळी उठल्यावर कुणालला तेच स्वप्न आठवत असते. मला जे स्वप्न पडले, तो भास तर नव्हता ना? कुणाल विचार करत असतो. आज संध्याकाळी नदीपलीकडे च्या देवळात जाऊन येऊ का? कुणालला प्रश्न पडतो. संध्याकाळचे संध्याकाळी ठरवू असे कुणाल ठरवतो. बँकेत जायला उशीर होत असल्यामुळे कुणाल पटापट आटोपून तयार होतो.
संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल थेट नदी पलीकडच्या देवळात जातो. तो देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. इतर स्वप्नांच्या सारखेच ते एक स्वप्न होते. पण ठीक आहे, त्यामुळे माझे देवाचे दर्शन तर घेऊन झाले असे कुणाल स्वतःशीच पुटपुटतो. कुणाल देवळात बसून बाहेर बघत असतो. तेवढ्यात त्याला कोणीतरी एक साधू बाहेरून हात करत असताना दिसतो. कुणाल त्या साधूकडे जाऊ लागतो. तो साधू पुढे चालू लागतो. कुणाल त्यांना हात मारून थांबा थांबा असे सांगत असतो. परंतु तो साधू पुढे जंगलात चालतच राहतो. ही वाट त्या सरोवराकडे जाणारी नसते. कुणालसाठी हा परिसर अनोळखी असतो. आता रात्र होऊ लागली असते. थोड्याच वेळात तो साधू एका गुहेपाशी येऊन थांबतो.
कुणाल - महाराज, तुम्ही मला कुठे घेऊन आलात?
क्रमशः
- ऋणानुबंध - भाग ६ (शेवटचा भाग )
- हेर - भयामागचे कारण - भाग १
- हेर - भयामागचे कारण - भाग २
- हेर - भयामागचे कारण - भाग ३ (शेवटचा भाग )
- रॅगिंग - एक दुष्टचक्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा