Read best Marathi suspense story free मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा
लेखक - केदार शिवराम देवधर
हेर - भयामागचे कारण [भाग ३ ( शेवटचा भाग )]
भाग ३ ( शेवटचा भाग )
अनय - गार्गी तू खूपच उपयुक्त माहिती आणली आहेस. गोविंदरावांच्या बाजूच्या बंगल्यात ज्या काकू राहतात, त्यांनी देखील गोविंदरावांच्या बागेत मशाली आणि पांढर्या आकृत्या पाहिल्या आहेत असेदेखील तू म्हणालीस.
सखाराम काका - साहेब, म्हणजे नक्की भुताटकी आहे बघा.
गार्गी - अहो काका, काय तुमचं आपलं भुताटकी भुताटकी. काही भूत वगैरे नाही आहे.
अनय - काका, तुम्हाला आता एक्स्ट्रा ड्युटी करायची आहे.
सखाराम काका - बोला की मग, मला काय कंटाळा आहे काय?
अनय - गोविंदरावांना बॉडीगार्ड ची गरज आहे. तुम्हाला त्यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करायचे आहे.
सखाराम काका - का हो साहेब, माझं काही चुकलं की काय? मला नोकरीवरून का काढताय?
अनय - काका, तुम्हाला कोण नोकरीवरून काढेल? हा नोकरीचाच भाग आहे. एवढी साधी गोष्ट तुमच्या कशी लक्षात आली नाही? तुम्हाला काम माझेच करायचे आहे, पण त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काही दिवस नाटक करायचे आहे.
सखाराम काका - साहेब, त्या भूत बंगल्यात मला नका पाठवू. बाकी कोणाशीही मी लढू शकेन, पण भुतांशी कसे लढायचे?
अनय - काका, तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे एक माळ आहे. ती मी तुम्हाला देतो. एका चांगल्या माणसाने ती मला दिली आहे. ती गळ्यात घाला म्हणजे तुम्हाला कसलीच भीती नाही.
सखाराम काका - अरे वा साहेब, तुमचा देखील विश्वास बसला यावर. पण बरं झालं तुम्ही मला ही माळ दिलीत.
सखाराम काका आनंदाने ती माळ गळ्यात घालतात.
त्यानंतर अनय गोविंदरावांना फोन करतो.
गोविंदराव - अनय, बोल काय म्हणतोस?
अनय - काका, आता मी काय सांगत आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका. या गोष्टी कोणाला देखील सांगू नका, घरात देखील नाही.
गोविंदराव - तू सांगशील तसंच होईल.
अनय - माझा एक माणूस मी तुमच्याकडे पाठवीत आहे. तो तुमचा बॉडीगार्ड आहे म्हणून वावरेल. ही केस सॉल्व्ह होईपर्यंत तो तिथेच राहील. हा माझा माणूस आहे असे कुणालाच कळता कामा नये. तुमच्या कुठल्यातरी मित्राच्या ओळखीने तो येथे बॉडीगार्ड म्हणून कामाला लागला आहे असे तुम्ही सांगू शकता. त्यांचे नाव सखाराम काका असे आहे. ओळखीसाठी त्यांचा फोटो मी तुम्हाला फॉरवर्ड करतो.
गोविंदराव - बरं होईल की, तुमचा माणूस इथे आला म्हणजे मला टेन्शन नाही.
अनय फोन ठेवतो.
अनय - काका, गोविंदराव ऑलरेडी घाबरलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील भुतांची भीती वाटते असे सांगून त्यांना अजून घाबरवू नका. तसेच मी दिलेल्या माळे विषयी कोणाला सांगू नका.
सखाराम काका - हो साहेब, तुम्ही चिंता करू नका. मी आधी घरी जातो. अनय साहेबांनी एस्ट्रा ड्युटी लावली आहे असे बायकोला सांगतो. नंतर गोविंदरावांकडे जातो.
अनय - ठीक आहे.
सखाराम काका निघून जातात.
गार्गी - सर तुमचा कधीपासून यावर विश्वास बसू लागला. तुम्ही चक्क सखाराम काकांना माळ दिलीत?
अनय - अगं ती माळ साधीच आहे. एका चांगल्या माणसाने मला ती दिली आहे. सखाराम काकांचा विश्वास आहे ना म्हणून मी त्यांना ती दिली. त्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळेल. नाहीतर काही कारण नसताना उगाचच ते घाबरून राहतील.
गार्गी - सर तुम्ही ग्रेट आहात.
अनय - आता मला विद्याचा मित्र संदिप, त्याच्या मागावर राहायला हवे. तिकडे काही माहिती मिळते का ते बघतो. गार्गी तू आता घरी जा. उद्या परत तुला गोविंदरावांच्या माणसांवर लक्ष ठेवायचे आहे.
दोन दिवस होतात.
गोविंदरावांच्या बंगल्यावर होणारे भास आता बंद झालेले असतात. परंतु गोविंदरावांची तब्येत ढासळू लागते. ते पूर्वीपेक्षा जास्त घाबरू लागतात.
अनय, संदिपच्या आणि कंपनीतील काही लोकांच्या मागावर राहतो. संदीप आणि विद्या ला लग्न करायचे आहे, एवढीच माहिती अनयला कळू शकते. बाकी विशेष काही माहिती अनयच्या हाती लागत नाही.
गार्गी मात्र गोविंदरावांच्या बंगल्यावर लक्ष ठेवून असते. एकदा गोविंदरावांचा नोकर शरद, बंगल्याच्या बाहेर पडतो. गार्गी त्याच्या पाठलागावर असते. थोडे पुढे गेल्यावर एका चौकात निनाद गाडी घेऊन आलेला असतो. एक पिशवी तो शरदच्या हातात देतो. त्या दोघांच्या बोलण्यावरून गार्गीच्या लक्षात येते की त्या पिशवीमध्ये औषधे आहेत. ती औषधे गोविंदरावांसाठी होती.
अजून काहीच ठोस माहिती हातात न आल्यामुळे अनय चिंतेत पडलेला असतो. तेवढ्यात गार्गी चा फोन येतो.
अनय - बोल गार्गी.
गार्गी - सर विशेष काही नाही. पण तुम्ही प्रत्येक घडणाऱ्या घडामोडी मला सांगण्यास सांगितले होते. आज शरद, निनाद साहेबांना भेटला. निनाद साहेबांनी त्याला काही औषधे गोविंदरावांना देण्यासाठी दिली.
अनय - छान. नीट लक्ष ठेव तेथे. फालतू माहिती जरी वाटली, तरी मला सांगत रहा.
गार्गी - हो सर.
अनय गोविंदरावांच्या बंगल्यावर येतो. तेथील परिसर परत एकदा बघून घ्यावा असे त्याला वाटतं असते.
गोविंदराव - ये अनय, आत ये.
अनय - काका, तुमची तब्येत ठीक दिसत नाही आहे.
गोविंदराव - मला खूप एकटं एकटं वाटत आहे. खूप टेन्शन आलं आहे. घराबाहेर पडलो तर कोणीतरी मला ठार मारेल असे सारखे वाटत आहे.
अनय - काका तुम्ही आधी ज्या डॉक्टरांकडे गेला होतात त्यांचे नाव काय? त्यांची ट्रीटमेंट तुम्ही कंटिन्यू चालू ठेवली आहे की कसे?
गोविंदराव - त्यांचे नाव डॉक्टर सुनील. त्यांचीच ट्रीटमेंट मी कंटिन्यू चालू ठेवली आहे. फरक पडला नव्हता म्हणून मी परत दुसऱ्या वेळेस त्यांच्या कडे गेलो होतो. माझी मुलगी विद्या आणि माझा पार्टनर निनाद मला घेऊन गेले होते.
तेवढ्यात विद्या दोघांसाठी चहा घेऊन येते.
दोघेजण चहा पिऊ लागतात.
अनय - विद्या, डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन दिले आहे, ते मला दाखवशील का?
विद्या - थांबा जरा, घेऊन येते.
दोन वेळा डॉक्टर सुनीलनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन विद्या घेऊन येते.
अनय - सर्व औषधे व्यवस्थित आणली आहेत ना? औषधे कोण आणतं?
विद्या - निनाद दादा औषधे घेऊन येतो. कारण ही औषधे आमच्या जवळच्या मेडिकलमध्ये मिळत नाहीत. आणि तसं पण निनाद दादाचा फार्मासिस्ट चा कोर्स देखील झालेला आहे.
अनय - पहिल्या वेळची सर्व औषधे संपली का?
विद्या - हो. आता दुसऱ्या वेळी डॉक्टरांनी बदलून दिलेली औषधे चालू केली आहेत.
अनय - जरा मला ती औषधे दाखव.
विद्या - थांबा हं, चित्राला बोलावते. कारण तीच सर्व औषधे बाबांना देते. आता औषध घ्यायची वेळ झालीच आहे.
चित्रा सर्व औषधे घेऊन येते.
अनय - काय चित्राताई, सर्व औषधे व्यवस्थित देता ना?
चित्रा - हो साहेब.
गोविंदराव - अरे थोड्या वेळापूर्वीच शरद जवळ निनादने औषधे पाठवून दिली. औषधे संपली होती रे.
चित्रा पाणी घेऊन आलेली असते. औषधांचा डोस ती गोविंदरावांना देते. नवीन आणलेली औषधे ती गोविंदरावांच्या रूम मध्ये ठेवून निघून जाते.
अनय दोन्ही प्रिस्क्रिप्शन चे आणि सर्व औषधांचे फोटो काढून घेतो.
अनय - माझा एक मित्र देखील मानसोपचार तज्ञ आहे. त्याला दाखवून बघतो. सेकंड ओपिनियन घ्यायला काय हरकत आहे?
विद्या - बरोबर आहे तुमचं. मला देखील असेच वाटत होते.
अनय गोविंदरावांच्या येथून बाहेर पडतो. तो थेट डॉक्टर सुनील यांच्या क्लिनिक मध्ये जातो.
पहिल्या प्रिस्क्रिप्शन मधील औषधे तर संपलेली असतात. परंतु दुसऱ्या प्रिस्क्रिप्शन पेक्षा एक औषध जास्तीचे असते. त्यामुळेच अनयला संशय येत असतो.
क्लिनिक मध्ये फार गर्दी नसते.
रिसेप्शनवरची मुलगी - फार गर्दी नाही आहे, थोडा वेळ बसा.
अनय - नाही, मी पेशंट नाही आहे. फक्त माझे हे कार्ड डॉक्टरांना द्या.
रिसेप्शनिस्ट हे कार्ड घेऊन डॉक्टरांकडे जाते. बाहेर येऊन ती सांगते की सरांनी तुम्हाला बोलावले आहे. फक्त आत गेलेला पेशंट बाहेर येऊ द्या.
अनय - थँक यु.
पेशंट बाहेर आल्यावर अनय केबिनच्या दारात जातो.
अनय - सर, आत येऊ का?
डॉ. सुनील - अरे अनय, ये आत ये. काय काम काढलेस?
अनय आत जाऊन बसतो.
अनय - सर, गोविंदराव नावाचे पेशंट तुमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत ना?
डॉ. सुनील - हो, त्यांचे काय?
अनय - त्यांची केस मी हातात घेतली आहे. त्यांची थोडी माहिती हवी होती.
डॉ. सुनील - सांग काय माहिती हवी आहे.
अनय त्यांच्यापुढे गोविंदरावांसाठी लिहून दिलेले प्रिस्क्रिपशन व औषधे ठेवतो.
अनय - डॉक्टर, तुम्ही लिहून दिलेले प्रिस्क्रिपशन आणि औषधे बघा.
डॉ. सुनील (नीट बघुन) - प्रिस्क्रिपशन तर मीच लिहिलेले आहे. पण प्रिस्क्रिपशनपेक्षा १ औषध जास्त आणलेले आहे. हे औषध कोणी दिले. हे एक घातक रसायन आहे. याच्यामुळे माणसाचा स्वतःवरील कंट्रोल सुटतो. हे औषध गोविंदरावांना चालू आहे काय? माझ्या औषधांच्या बरोबर उलट ते काम करेल. हे औषध देणे पहिले बंद करा.
अनय - मला संशय आलाच होता म्हणून मी तुमच्याकडे आलो.
डॉ. सुनील - ही काय भानगड आहे?
अनय - गोविंदरावांना दिसणार्या गोष्टी सत्य आहेत, ते भास नाहीत. त्यांना मनोरुग्ण बनवणे हे कोणाचे तरी कारस्थान आहे.
डॉ. सुनील - अरे बापरे? बरे झाले तू त्यांची केस हातात घेतलीस.
अनय डॉक्टरांचा निरोप घेऊन गोविंदरावांच्या बंगल्यावर पोहोचतो.
अनय - काका, विद्याला आणि काकूंना लगेचच बोलवा. मला तुम्हा सर्वांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे.
गोविंदराव, त्यांची पत्नी आणि विद्या असे सर्वजण अनय काय सांगतो ते बघण्यासाठी एकत्र जमतात.
अनय, त्या सर्वांना घडलेला सर्व वृत्तांत सांगतो.
गोविंदराव - म्हणजे निनाद, शरद आणि चित्रा असे सर्वजण मिळून हा उद्योग करत आहेत तर. पण ते असे का करतील?
अनय - निनाद खूप महत्त्वाकांक्षी आहे. तुम्हाला असं घाबरवण्यामागे त्याचा नक्की काय हेतू आहे, ते त्यालाच माहीत असणार. तुम्ही आधी शरद आणि चित्राला इकडे बोलवा. त्यानंतर आपण निनादशी बोलू.
शरद आणि चित्राला गोविंदरावांनी बोलावुन घेतले.
अनय - शरद आणि चित्रा तुम्ही दोघे जण खाल्ल्या मिठाला जागले नाहीत.
शरद - साहेब, आम्ही काय केले?
अनय - पोलिसांना बोलावु का? म्हणजे सर्व लक्षात येईल.
पोलिसांचे नाव काढल्यावर शरद आणि चित्रा दोघेजण घाबरतात. निनाद साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही हे सर्व केलं असे ते सांगतात. रात्रीच्या वेळी मशाली फिरवणे आणि पांढऱ्या आकृत्या फिरवणे हे आमचे उद्योग होते, असे देखील दोघे मान्य करतात. निनाद साहेबांनी आम्हाला या कामासाठी भरपूर पैसे दिले होते असेही ते सांगतात.
गोविंदराव खूप चिडतात. ते निनादला बंगल्यावर बोलावून घेतात.
झाल्या प्रकाराचा गोविंदराव त्याला जाब विचारतात.
आपले बिंग बाहेर पडले म्हणून निनाद घाबरून जातो.
निनाद - काका, मला माफ करा. माझ्या महत्वाकांक्षेमुळे मी असे केले.
विद्या - दादा, तु असा कसा वागलास?
निनाद - मला आपल्या कंपनीला टॉपला न्यायचे होते. परंतु प्रत्येक ठिकाणी काकांची तत्वे मध्ये येत असत. रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट विक्री पर्यंत काका क्वालिटीकडे प्रथम बघत असत. प्रॉडक्ट ची प्राईज फार प्रमाणात वाढवायला देखील काका तयार नसत. मला ते वडिलांच्या ठिकाणी असल्यामुळे मी त्यांना फार विरोध करू शकत नसे.
गोविंदराव - अरे पण आपल्याला प्रॉफिट काही कमी होत नव्हता. आपलं व्यवस्थित चालू होतं की.
निनाद - पण काका, जर तुमच्या काही तत्त्वांना मुरड घातली असती तर हाच प्रॉफिट तिप्पट-चौपट वाढणार होता. खरं म्हणजे माझं चुकलं होतं. मला पैशाची हाव चढली होती. तुम्हाला मारण्याचा माझा हेतू नव्हता. फक्त तुम्हाला घरी बसवून ठेवणे एवढीच माझी इच्छा होती. तुमच्या दोन्ही मुलांना तर आपल्या साबणाच्या कंपनीत इंटरेस्ट नाही. तुम्ही एकदा घरी बसलात, की सर्व काम माझ्या हातात येणार होतं.
अनय - पण तुमच्या अशा वागण्यामुळे गोविंदरावांना गरज नसलेली औषधे पाजली गेली. याचे काही दुष्परिणाम झाले असते तर कोण जबाबदार होते?
निनाद - मी केलेल्या चुकीची शिक्षा मला भोगायलाच हवी. तुम्ही मला पोलिसांकडे द्या.
गोविंदराव - तुझ्या हातून चूक तर झाली आहे. पण मला ठार मारण्याचा तुझा हेतू नव्हता. तु माझ्या मित्राचा मुलगा आहेस. त्यामुळे तुला मी माफ करतो.
शरद आणि चित्रा देखील गोविंदरावांकडे गयावया करु लागतात.
गोविंदराव त्यांनादेखील माफ करतात.
गोविंदराव - सर्वांनी लक्षात ठेवा. आपापला नोकरीधंदा नेहमी प्रामाणिकपणे करा. नेहमी सत्याने वागा.
अनय, तुझे आभार मी कसे मानू ते मला कळत नाही. तुझ्यामुळे मला खरे काय ते कळले. नाहीतर मला खरंच वेड लागायची पाळी आली होती.
अनय - काका, थांबा जरा. मला अजून देखील काही सांगायचे आहे.
गोविंदराव - आता काय बाकी राहिले?
अनय - ही केस सॉल्व्ह करताना अजून एक केस सॉल्व्ह झाली आहे. खरं म्हणजे तुमच्या खाजगी गोष्टींमध्ये मी लक्ष घालू नये. परंतु मला कळलेली माहिती तुमच्या पासून लपवणे देखील मला चुकीचे वाटते.
काकु - अगोबाई आता काय?
अनय - काका - काकू आता विद्याच्या लग्नाचं तुम्हाला बघायला हवं.
काकु - हो चांगला नवरा - मुलगा मिळणं हे देखील एक टेन्शनच आहे.
अनय - अहो टेन्शन कसलं घेताय? विद्याने ऑल रेडी ते काम केलेले आहे. संदिप असे नाव आहे त्याच.
गोविंदराव - अरे पण मुलगा कसा आहे ते आम्हाला बघायला नको का? काय ग विद्या तू पण काही बोलली कसे नाहीस?
विद्या -अनय सर, तुम्हाला हे कसं कळलं?
अनय - गोविंदरावांची केस सोडवताना माझी माणसे सर्वांवर लक्ष ठेवून होती. काका, संदिप साठी मात्र माझा ग्रीन सिग्नल आहे बरं. त्याचा या कारस्थानात काही हात तर नाही ना हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. तुमच्या कुटुंबीयांच्या संपर्कात जे जे कोणी येत होते त्या सर्वांवरच आम्ही लक्ष ठेवून होतो. परंतु संदिप चांगला मुलगा आहे. तरी पण तुम्ही एकदा त्याला प्रत्यक्ष भेटा आणि मग ठरवा.
विद्या - थँक यु सर. घरी चालू असलेल्या या टेन्शनमुळे संदिप इकडे येत नव्हता. बाबांना अजून टेन्शन नको म्हणून. पण तुम्ही प्रमाणपत्र दिलेत ते बरे केलेत.
एका चांगल्या मुहूर्तावर विद्याचे आणि संदिप चे लग्न होते. अनयलादेखील लग्नाचे आमंत्रण दिले जाते.
गोविंदराव (लग्नाच्या हॉलवर हसत) - आता तुझा देखील एकदा बार उडवला पाहिजे. आता ही केस तुझी तुच सॉल्व्ह करतो, की मी करायला पाहिजे ते सांग.
अनय (स्मित हास्य करून) - काका तुमच आपलं काहीतरीच.
समाप्त
- रॅगिंग - एक दुष्टचक्र
- कृष्णविवर - भाग १
- कृष्णविवर - भाग २
- कृष्णविवर - भाग ३
- कृष्णविवर - भाग ४ (शेवटचा भाग )
- सासू विरुद्ध सून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा