Read best Marathi suspense story free मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
लेखक - केदार शिवराम देवधर
हेर - भयामागचे कारण ( भाग १ )
भाग १
वेळ संध्याकाळची, डिटेक्टिव्ह अनयचे ऑफिस -
एक वयस्कर सद्-गृहस्थ - मॅडम आत येऊ का?
गार्गी - साहेब, आत या ना, बसा.
ते सद्-गृहस्थ डिटेक्टिव अनयच्या ऑफिसमध्ये येऊन बसतात.
सद्-गृहस्थ - मला अनय साहेबांना भेटायचे आहे.
गार्गी - तुम्हाला पंधरा मिनिटे बसावे लागेल. साहेब एका कामासाठी बाहेर गेले होते, ते आता ऑफिसमध्ये परत यायला निघाले आहेत.
सद्-गृहस्थ - काही हरकत नाही. मी थांबतो येथे.
गार्गी - मी तुमच्यासाठी चहा मागवते हं.
सद्-गृहस्थ - अहो नको, कशाला उगाच.
गार्गी - नाही कसं? मला साहेब ओरडतील, तुमचं स्वागत केलं नाही म्हणून. आणि तस पण आमची चहा प्यायची हीच वेळ आहे.
गार्गी फोन करून बाजूच्या हॉटेलमधून चहा मागवते.
दोघांचा चहा होईपर्यंत अनय ऑफिसमध्ये येतो आणि खुणेनेच त्या सद्-गृहस्थांना केबीन मध्ये पाठव असे गार्गीला सांगतो.
ते सद्-गृहस्थ अनयच्या केबिनमध्ये जातात.
अनय - या साहेब बसा. आपलं काय काम आहे?
सद्-गृहस्थ - साहेब, मी गोविंदराव. पोफळगावच्या भास्कररावांनी मला तुमच्याविषयी सांगितलं. ते माझे चांगले मित्र आहेत. मी खूप मोठ्या अडचणीत आहे. आता तुमच्या कडूनच मला आशा आहे.
अनय - ओह, पोफळगावचे भास्करराव राव, त्यांची केस मी गेल्याच महिन्यात सोडवली. हे बघा काका तुम्ही मला साहेब वगैरे म्हणू नका. तुमच्यासारख्या वयस्कर माणसांनी मला असे म्हटले की, संकोचल्यासारखे होते. तुम्ही मला फक्त अनय म्हणा. भास्करराव बोलले नाहीत का तुम्हाला?
गोविंदराव - भास्कर राव मला बोलले होते यासंबंधी. पण हा तुझा मोठेपणा आहे. आपली यापूर्वी कधीही भेट झालेली नव्हती. त्यामुळे एकदम तुला नावाने हाक मारायला संकोच वाटत होता. पण ठिक आहे तु म्हणतोस तर मी तुला अनयच म्हणेन.
अनय - हां काका, आता कसं बरं वाटतं. आता तुमची अडचण सांगा.
गोविंदराव - मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तीन वेळा माझ्यावर तर खुनी हल्ला देखील झाला आहे.
अनय - मग तुम्ही पोलिसांत कंप्लेंट केली का? तुमचा कुणावर संशय आहे का? तुमचे कुणाशी वैर आहे का?
गोविंदराव - हो, पहिला हल्ला झाल्यावर लगेचच मी पोलिसांत कम्प्लेंट केली. पोलिसांनी मला चांगले सहकार्य देखील केले. माझं कुणाशी वैर नाही आणि माझा कोणावर संशय देखील नाही.
अनय - काका तुमच्यावर पहिला हल्ला कधी आणि कसा झाला ते जरा सांगा.
गोविंदराव - साधारण एक महिन्यापूर्वी माझ्यावर पहिला हल्ला झाला. तेव्हा मी मॉर्निंग वॉक साठी तळ्यावर गेलो होतो. तेवढ्यात बाईक वर बसून काळा मास्क घातलेला माणूस समोरून आला. त्याने माझ्यावर गोळी चालवली. परंतु त्याचा नेम चुकला. गोळी माझ्या खूप जवळून गेली. मी घाबरून आरडाओरडा केला, त्यामुळे तो बाईकवाला पळाला. आजूबाजूला नेमकं कोणी नव्हते.
अनय - त्यानंतर पोलिसांनी काय केले.
गोविंदराव - पोलिसांनी कसोशीने तपास केला. एक आठवडाभर मीदेखील बंगल्याच्या बाहेर पडलो नाही. आळीपाळीने एक पोलीस शिपाई आमच्या बंगल्यावर त्यांनी माझ्या संरक्षणासाठी ठेवला. परंतु त्यानंतर काही घडलेच नाही. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण काढून घेतले आणि तपास मात्र चालू ठेवला.
अनय - नंतर काय झाले?
गोविंदराव - त्यानंतर मला काही भास होऊ लागले.
अनय - भास? कसले भास?
गोविंदराव - रात्रीच्या वेळेस, आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मला मशाली फिरताना दिसू लागल्या. तसेच काही पांढऱ्या आकृत्या दिसू लागल्या.
अनय - तुमच्या घरी कोण कोण असते?
गोविंदराव - मी माझी पत्नी आणि माझी मुलगी. माझा मुलगा परदेशात असतो. तिकडे त्याचे स्वतःचे सॉफ्टवेअर फर्म आहे.
अनय - म्हणजे घरी तुम्ही तिघेच असता. बाकी नोकर वगैरे कोणी?
गोविंदराव - हो, एक नवरा बायकोचे जोडपे आमच्या इथे कामाला आहे. घरातली सर्व देखरेख आणि बागकाम ते दोघे करतात. माझ्या बंगल्याच्या बाजूला दोन रूम आहेत, तेथे ते दोघे जण राहतात.
अनय - तुम्हाला जे भास होतात, ते घरातील सर्वांनाच होतात का?
गोविंदराव - नाही हो! मलाच एकट्याला हे सर्व भास होतात. कारण मी जेव्हा माझ्या मुलीला आणि पत्नीला याबाबत सांगतो, तेव्हा त्या दोघींना काहीच दिसत नाही. कुणी नसताना मला एकट्याला हे थोडा वेळ दिसते.
अनय - म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडतच नाही की काय आता?
गोविंदराव - होय अनय. खरं म्हणजे माझी भरपूर कामे राहून गेलेली आहेत. परंतु आता जो काही मला त्रास होत आहे, त्या भीतीमुळे मला बाहेर पडता येत नाही.
अनय - काका, माझ्या अंदाजाने तुम्ही आता नोकरीतुन रिटायर झालेले असणार.
गोविंदराव - नाही. माझी छोटीशी कंपनी आहे. सध्या माझा पार्टनरच सर्व कामे बघतो.
अनय - अरे वा चांगलंच आहे, तुमची स्वतःची कंपनी आहे ते. तुम्ही एखादा बॉडीगार्ड का नाही ठेवला हा सर्व प्रकार सुरु झाल्यावर?
गोविंदराव - अरे एक चांगला मजबूत बॉडीगार्ड मी ठेवला होता या प्रकारानंतर. दिवसभर तो माझ्याबरोबर असायचा. रात्री गेस्ट हाऊसमध्ये रहायचा. जेमतेम एक आठवडाच होता. परंतु नंतर त्याला देखील माझ्या सारखेच भास होऊ लागले. इथे काहीतरी भुताटकी आहे असे सांगून तो पळून गेला.
अनय - आश्चर्यच आहे फक्त तुम्हाला दोघांनाच भास व्हायचे बाकी कुणाला नाही?
गोविंदराव - माझ्या मिसेस चा आणि मुलीचा भुताखेतांवर विश्वास नाही ना.
अनय - पुढे काय झाले?
गोविंदराव - हल्ला तर माझ्यावर एकदाच झाला होता. त्या भितीमुळे तुम्हाला बाकीचे सर्व भास होत आहेत, असे माझ्या मिसेस ने आणि मुलीने मला समजावले.
त्यामुळे एक दिवस परत मी कंपनीत जायला सुरुवात केली. त्याच दिवशी संध्याकाळी कंपनीतून परतताना माझ्यावर दुसरा हल्ला झाला. मी माझी फोर व्हिलर चालवत होतो. पहिल्या वेळ सारखीच काळा मास्क घातलेली व्यक्ती बाईक वर बसून समोरून आली. रस्त्यावर सामसूम होती. परत त्या व्यक्तीने गोळी चालवली. गोळी माझ्या कार च्या अगदी जवळून गेली आणि माझे प्राण वाचले. ती व्यक्ती मात्र पसार झाली.
अशाच प्रकारे तिसरा हल्ला देखील कंपनीतून परतत असतानाच झाला. सुदैवाने तेव्हादेखील मी वाचलो.
अनय - मग परत तुम्ही पोलिसांत कंप्लेंट केली का?
गोविंदराव - हो परत च्या वेळेस माझ्या बरोबर कम्प्लेंट करण्यासाठी माझी मुलगी आली होती. तेव्हा मला होत असणारे भास देखील मी पोलिसांना सांगितले. तीन वेळा माझ्यावर हल्ला होऊन देखील कुठल्याही वेळी मला साधे खरचटले सुद्धा नाही, तसेच मला वेगवेगळे भास देखील होत होते. त्यामुळे पोलिसांना वेगळीच शंका येऊ लागली. माझ्या डोक्यावर तर परिणाम झालेला नाही ना? असे त्यांना वाटू लागले. पोलिसांनी अधून मधून माझ्या बंगल्यावर येऊन तपास चालूच ठेवला, परंतु मला मानसोपचार तज्ञांना दाखवावे असा माझ्या मुलीला त्यांनी सल्ला दिला.
अनय - मग पोलिसांना तपासात काही मिळाले का?
गोविंदराव - नाही, त्यानंतर मी खूपच कमी वेळा घराबाहेर पडू लागलो. त्यानंतर माझ्यावर अजिबात हल्ला झाला नाही. परंतु रात्रीचे भास होणे मात्र मधे मधे चालूच राहिले. त्यामुळे पोलिसांनी देखील वारंवार तपास करणे बंद केले. त्यात त्यांची काही चूक नाही.
माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या आग्रहामुळे मी मानसोपचार तज्ञांकडे त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी काही औषधे दिली. साधारण दहा-बारा दिवस मी औषधे घेतली. पण काहीच फरक पडला नाही.
अनय - या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते? कशामुळे हे सर्व होत आहे असे तुम्हाला वाटते?
गोविंदराव - मला तर काही कळे नाहीसे झाले आहे. मला ही सर्व भुताटकी वाटत आहे. माझ्या नात्यातील एक व्यक्ती अध्यात्माशी निगडित आहेत. माझ्या विनंतीमुळे ते उद्या सकाळी दहा वाजता माझ्याकडे येणार आहेत. तेव्हा तू देखील उद्या माझ्याकडे तेव्हाच ये.
अनय - काका तुम्हाला असे तर म्हणायचे नाही ना, की भूतांना पकडायला मी तुमच्या नातेवाईकाला मदत करु.
मी हे असले काही करू शकत नाही.
गोविंदराव - अनय, माझा भास्कररावांवर पूर्ण विश्वास आहे. ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. ज्या अर्थी त्यांनी तुझे नाव मला सुचवले, त्याअर्थी तू मला नक्की मदत करू शकतोस. प्लीज तु माझी केस हातात घे.
अनय - काका तुम्ही माझ्यावर रागवू नका, परंतु मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगू इच्छितो.
गोविंदराव - तुला जे काही सांगायचे आहे ते नि:संकोचपणे सांग.
अनय - मी अद्याप पर्यंत भूत पाहिले नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. घडणार्या सर्व घटना हे जर तुमच्या मनाचे खेळ असतील तर मी काहीच करू शकत नाही. घडणाऱ्या घटना जर का सत्य असतील तर मी तुम्हाला मदत करू शकतो.
गोविंदराव - ठीक आहे, उद्या मात्र नक्की ये.
त्यानंतर गोविंदराव घरचा पत्ता अनयला देऊन त्यांच्या घरी निघून जातात.
त्यानंतर अनय, गार्गीला आणि सखाराम काकांना केबिनमध्ये बोलावतो.
अनय - आपल्याकडे एक नवीन केस आली आहे, गोविंदरावांची. त्यामुळे सखाराम काकांना घेऊन, उद्या सकाळी मी गोविंदरावांच्या बंगल्यावर जाणार आहे. गार्गी उद्या सकाळच्या वेळेत तु ऑफिस सांभाळ. अनय दोघांनाही केसचे स्वरूप थोडक्यात सांगतो.
सखाराम काका - बापरे साहेब, म्हणजे तुम्ही आता भूत-खेत शोधण्याच्या केस पण हातात घेऊ लागलात?
गार्गी - काका, काही पण बोलू नका. सरांनी केस सोडवायला घेतली आहे म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल.
अनय - गार्गी बरोबर बोलत आहे. आपण प्रयत्न तर करून बघू.
दुसर्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अनय आणि सखाराम काका, गोविंदरावांच्या बंगल्यावर पोहोचतात.
सखाराम काकांना अनय गाडीतच थांबवून ठेवतो.
दहा वाजायला अजून पाच मिनिटे बाकी असतात.
गोविंद्राव अनयचे स्वागत करतात. बरोबर दहा वाजता गोविंदरावांचे नातेवाईक येतात. त्यांचे नाव माधव असे असते. ते देखील वयस्कर असतात.
गोविंदरावांची पत्नी सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन येते. अनय आणि माधव दोघेही नको नको म्हणत असताना देखील गोविंदराव त्यांना चहा नाष्टा घ्यायला लावतात.
त्यानंतर माधव त्यांच्या कामाला सुरुवात करतात. ते थोडावेळ ध्यान लावतात. त्यानंतर सर्व परिसर फिरून येतात. बंगला आणि बाजूचा एरिया मोठा असतो. साधारण अर्धा तास परिसर फिरून झाल्यावर तिघेजण परत गोविंदरावांच्या बंगल्यात येतात. फिरताना अनय त्याच्या पद्धतीने काम करत असतो.
माधव - हे बघ गोविंद, तुझ्या बंगल्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात मी पूर्णपणे फिरून आलेलो आहे. परंतु कुठल्याही वाईट शक्तीचे अस्तित्व मला येथे जाणवले नाही.
अनय - माफ करा माधव काका पण मी एक बोलू का?
माधव - बोल, बिनधास्त बोल.
अनय - माझा खरा म्हणजे या सर्व गोष्टींवर विश्वास नाही, परंतु मला देखील येथे फिरतांना काहीच विचित्र जाणवले नाही. तुम्हाला असे काही दिसते का?
माधव - कित्येक गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. पण त्यामुळे त्या अस्तित्वातच नाहीत असे म्हणून चालत नाही. त्या जरी डोळ्यांनी दिसल्या नाहीत तरी त्यांचे अस्तित्व वेगळ्या प्रकारे जाणवते.
अनय - तुम्हाला काय म्हणायचे आहे? ही सर्व भुताटकी आहे असे तर तुम्हाला वाटत नाही ना?
माधव - निदान मला तरी आत्ता तसे काही जाणवले नाही. यामुळे दोन शक्यता निर्माण झाल्या आहेत. पहिली शक्यता म्हणजे इथे घडणाऱ्या गोष्टी माझ्या आकलनशक्तीच्या बाहेर असू शकतात. त्यामुळे त्या मला कळू शकत नाहीत. दुसरी शक्यता म्हणजे येथे काहीच नसेल, फक्त भास असेल.
गोविंदराव - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? ही सर्व भुताटकी नाही का?
माधव - तेच तर मी तुला सांगत आहे. तुझ्या इथे घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत मी कन्फ्युज आहे. मला तर वाटते अनयने त्याच्या पद्धतीने आता शोध करावा.
अनय - माझे काम तर मी मगाशीच चालू केले आहे. बंगल्यात आणि बंगल्याभोवती फिरताना माझे सर्वत्र बरोबर लक्ष होते. पण सध्यातरी मला देखील काही पुरावा मिळालेला नाही.
गोविंदराव निराश होत डोक्याला हात लावून बसतात.
अनय - काका निराश होऊ नका. मी प्रयत्न करत आहे.
आता मला तुमच्या कुटुंबीयांशी बोलावे लागेल, तसेच तुमच्या कंपनीत येऊन देखील चौकशी करावी लागेल.
गोविंदराव - तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती सर्व करा, माझी काहीच हरकत नाही.
अनय - प्रथम मी तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी बोलून घेतो.
अनय दोघींची भेट घेतो. त्यावेळी मात्र तो गोविंदरावांना तेथून जायला सांगतो. गोविंदराव, दोघींची ओळख अनयशी करून देतात, आणि तेथून निघून जातात.
अनय - काकू तुम्हाला काय वाटतंय गोविंदरावांना भास होतात त्याविषयी?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा