लेखक – केदार शिवराम देवधर (पेण – रायगड)
मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)
अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात तो पडतो.
शर्मिष्ठा - कसला विचार करतोस? मी सुंदर दिसत नाही का? मी तुला आवडत
नाही का?
अमोद - शर्मिष्ठा, तू खूप सुंदर आहेस. तू मला आवडतेस देखील. पण .....
शर्मिष्ठा - मला माहित आहे, तुझ्या मनात अक्षताचा विचार सुरु आहे ना?
तुला ती आवडते ना? मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले ना? आता शर्मिष्ठा रडू लागते.
अमोद - अग, रडू नकोस. लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न असतो. असा घाईत
निर्णय घेऊ नये.
शर्मिष्ठा - अमोद, तू माझ्याशी लग्न केलेस तर मी तुला सुखात ठेवीन.
तू विचार देखील करू शकणार नाहीस, इतके ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोळण घेईल.
अमोद (हसत) - तू श्रीमंत आहेस हे मला माहित आहे. पण "ऐश्वर्य
पायाशी लोळण घेईल" हे अतीच होते आहे.
तू काय मोठी उद्योगसम्राज्ञी आहेस
का?
शर्मिष्ठा - तू मला उद्योगसम्राज्ञी समज किंवा काहीही. पण मी मात्र
खर तेच सांगितले.
अमोद - प्रेमाच्या नात्यात पैसा मोजायचा नसतो.
शर्मिष्ठा - अमोद, आपण लग्न करू आणि इथून दूर निघून जाऊ.
अमोद - दूर म्हणजे कुठे?
शर्मिष्ठा - माझ्या राज्यात.
अमोद - म्हणजे कुठे उत्तराखंडमध्ये मध्ये?
शर्मिष्ठा - म्हणजे साधारण तिकडेच. त्याच्यापुढे.
अमोदला आता हसू आवरत नाही. तो जोरात हसायला लागतो.
शर्मिष्ठा - तू का हसत आहेस?
अमोद - आपल्याकडे मुलगी लग्न
होऊन मुलाच्या घरी म्हणजे सासरी येते.
घरजावई बनायची पद्धत आपल्याकडे नाही.
शर्मिष्ठा - लग्न झाल्यावर मी इकडे राहू शकणार नाही. तुलाच तिकडे
यावे लागेल.
अमोद - लग्नाचा विचार मी अजून केलेला नाही. पण मला कळत नाही कि, तुला
उत्तराखंड मधून महाराष्ट्रात यायला काय व्हिसा काढावा लागणार आहे का? आणि मी तरी
माझ्या आई - वडिलांना सोडून दुसरीकडे येणार नाही. माझ्याशी लग्न करणाऱ्या मुलीला
इथेच आमच्याबरोबर रहावे लागेल. आम्ही काही कोणत्याही प्रकारे स्त्री हक्कांची
अवहेलना करत नाही. पण आई वडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. त्यांच्या म्हातारपणात
मीच त्यांच्याकडे बघितले पाहिजे.
आता शर्मिष्ठा चिडते.
शर्मिष्ठा - अमोद, तुझ्यासाठी इकडे मी आले. मला तुझ्या बरोबर लग्न करायची परवानगी नाही. जर मी
तुझ्याशी लग्न करून इकडे रहायला आले, तर
मला फार मोठे नुकसान सोसावे लागेल. एक सामान्य माणूस म्हणून जगावे लागेल. मला ते
अजिबात जमणार नाही. प्रेमासाठी एवढे मोठे बलिदान मला परवडणार नाही.
अमोद (आश्चर्याने) - आपण सर्व सामान्य माणसेच तर आहोत. डॉक्टर असलो
तरी मी एक सामान्य माणूसच आहे.
शर्मिष्ठा - मी काय बोलत आहे ते तुझ्या लक्षात इतक्या सहज येणार
नाही. मी सामान्य माणूस नाही. जर तू लग्न करून माझ्याबरोबर आलास तर मात्र मी आत्ता
ज्या पोझिशनला आहे तेथेच आरामात राहू शकते.
अमोद - तू एक श्रीमंत फॅशन डिझायनर आहेस हे मला ठाऊक आहे. पण शेवटी आपण सर्व सामान्य
माणूसच ना?
शर्मिष्ठा (चिडून) - अमोद, मी परत सांगते कि मी फक्त तुला मदत करायला
इकडे आले होते. पण मी तुझ्या प्रेमात पडले आहे. मला जर अव्हेरलेस तर तुला फार मोठी
किंमत चुकवावी लागेल.
अमोद - तुझे हे उग्र रूप मी प्रथमच पाहत आहे. तू मला सरळ सरळ धमकी
देत आहेस. तू अशी नाहीस. तुला काय झाले आहे?
आता शर्मिष्ठाचा राग थोडा निवळतो.
शर्मिष्ठा (काकुळतीला येऊन)
- अमोद, प्लिज माझा विचार कर. आपण लग्न करू. तू खरच विचार करू शकणार
नाहीस, इतक्या सुखात मी तुला ठेवेन. तू
थोडे दिवस विचार कर.
अमोद शर्मिष्ठाचा निरोप घेऊन घरी जातो. आज त्याला भूक नसते. त्यामुळे
थोडेसेच जेवून
तो उठतो. त्यामुळे रमाकाकू काळजीत पडतात.
अमोदला झोप देखील नीट लागत नाही.
दुसऱ्या दिवशी अक्षता भाऊकाकांना भेटायला जाते. अमोदने तिला
लग्नाबद्दल काहीच उत्तर न दिल्यामुळे ती काळजीत पडलेली असते.
भाऊकाका आणि संध्याकाकू तिचे स्वागत करतात. संध्याकाकू तिच्यासाठी चहा
ठेवतात.
अक्षता - भाऊकाका, मी अमोदशी लग्नाबद्दल बोलले.
भाऊकाका - व्वा, चांगलं केलस. मग काय बोलला तो?
अक्षता - तो माठ आहे. त्याला आपल कोण आणि परकं कोण हे काही कळत नाही.
तो नंतर सांगतो असं मला बोलला. ती बया त्याच्या आयुष्यात आली आहे ना आता.
तेवढ्यात संध्याकाकू चहा घेऊन येतात. तिघेजण चहा पिऊ लागतात.
भाऊकाका (चहा पिताना) - काल अमोद आणि शर्मिष्ठा आले होते. शर्मिष्ठा
चांगली मुलगी आहे.
अक्षता - तुम्हीदेखील तिच्या
बाजूने बोलत आहात?
भाऊकाका (हसत) - अग, तिला मी जर चांगलं म्हणालो, तर मी तिची बाजू
घेतली असा अर्थ तर होत नाही.
संध्याकाकू - आपण अक्षता आणि अमोदच्या घरी याविषयी बोलले पाहिजे का?
भाऊकाका - गरज पडल्यास हे त्यांना सांगावेच लागेल. पण मला तुम्हा
दोघींना काहीतरी वेगळे सांगायचे आहे.
संध्याकाकू - काय सांगणार आहात तुम्ही?
भाऊकाका - शर्मिष्ठा हि मानव वाटत नाही.
अक्षता (मध्ये बोलत) - काका आता तुम्ही बरोबर बोललात. माझ्या आणि
अमोदच्या मध्ये ती आली. ती काय माणूस म्हणून घेण्याच्या लायकीची आहे का? स्वतःला
जास्त शहाणी समजते ती.
भाऊकाका - अक्षता, मला पूर्ण बोलू देशील का? अग, तू म्हणतेस तो अर्थ
मला अभिप्रेत नाही.
संध्याकाकू - अहो, तुम्ही काय ते लवकर सांगा पाहू. आमची उत्कंठा
वाढवू नका.
भाऊकाका - शर्मिष्ठा हि बाहेरच्या जगातून आलेली आहे असे वाटते.
अक्षता - काका, तुम्ही हे कसे सांगू शकता? अहो विज्ञानालादेखील
पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र कुठे सजीवसृष्टी आहे का, याचा शोध लागलेला नाही.
भाऊकाका - काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नसल्या म्हणजे नाहीतच असे
नसते. मी अध्यात्मिक ज्ञानाच्या सहाय्याने
हे बोलत आहे. शर्मिष्ठाशी बोलतानाच माझ्या लक्षात आले कि हि मुलगी दिव्य आहे. हि
मानव नाही. माझ्या अंदाजाने हि मायालोकातून इकडे पृथ्वीवर आली आहे.
अक्षता - काका हे सर्व माझ्या कळण्यापलीकडचे आहे. जरा नीट सांगा.
भाऊकाका - तुमची ध्यानसाधना एकदा का सिद्ध झाली, कि कितीतरी सिद्धी
तुम्हाला प्राप्त होतात. ज्ञानचक्षूंच्या सहाय्याने या ब्रह्मांडातील घडामोडी
तुम्ही एका जागी बसून पाहू शकता. कोणत्याही मोठ्या दुर्बिणीची त्यासाठी गरज नाही.
अर्थात साधकाने यात गुंतून राहू नये. या सर्वांपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे
मुक्ती, त्या मुक्तीच्या दिशेने वाटचाल करावी. या ध्यानातून प्राप्त झालेल्या
सिध्दीने मला कळले कि शर्मिष्ठा हि मायालोकातून आली आहे. हिमालयाच्या वरती अनेक
गूढ लोक आहेत. हिमालयातून तेथे जायला गुप्त वाट आहे. त्यापैकीच एक मायालोक. जो
तुम्हाला दुर्बिणीने दिसणार नाही. पण
अस्तित्वात आहे.
संध्याकाकू - अहो पण ती इकडे का आली? अमोदलाच का भेटली?
भाऊकाका - त्यासाठीच मी अमोदला एकटयाला बोलावले आहे. त्याच्याशी
बोलल्यावर मला सर्व गोष्टींचा उलगडा नीट होईल.
अक्षता - म्हणजे अमोदला हे सर्व माहित आहे?
भाऊकाका - माझ्या अंदाजाने त्याला हे माहित नसेल. पण मला वाटते हे
सर्व विद्याधर महाराजांनी सांगितलेल्या साधनेचे फळ आहे.
संध्याकाकू - ते विद्याधर महाराज अशा कशा हो काहीतरी साधना सांगतात?
भाऊकाका - विद्याधर महाराज हे सात्विक आहेत. पण सिद्धींमध्ये फसलेले
आहेत. आत्मोद्धाराची वाट चुकलेले साधक आहेत. त्यांच्या साधनांमुळे आत्मोद्धार जरी
झाला नाही तरी या सर्व साधना सात्विक आणि उच्च दर्जाच्या आहेत. आता यासंबंधी आपण
अमोदशीच बोलू.
इकडे अमोद देखील सकाळी लवकरच उठतो. रात्रीची झोप नीट झालेली नसते.
तोंड धुवून झाल्यावर चहा द्यायला तो आईला सांगतो.
डॉ. केशव न्युज पेपर वाचत असतात. रमाकाकू चहा घेऊन येतात.
अमोद (चहा पिताना बोलतो) - बाबा, त्यांच्याशी आज तुम्हीच बोला. मला
आज बरं वाटत नाही आहे. मी आज आराम करणार आहे. त्यामुळे मी आज हॉस्पिटलमध्ये येऊ
शकत नाही.
रमाकाकू (घाबरून) - तुला आता काय झालं? ताप आलाय का? अहो तपासाना
याला.
डॉ. केशव - रमा, तो काय आता लहान आहे का? त्याचा तो औषध घेऊ शकतो.
सर्जन आहे तो.
पण अमोद तुला होतंय तरी काय?
अमोद - थोडं डोकं जड झालं आहे.
डॉ. केशव - काल कोणाशी भांडण झालं का?
अमोद - नाही. पण आज मला फ्रेश वाटत नाही आहे. मी आज भाऊकाकांकडे
जातो. तिथे गावातील वातावरण कसे शांत आणि प्रसन्न आहे. तेथे हिरव्यागार झाडीत
फिरलो कि कसे फ्रेश वाटते.
रमाकाकू - अरे पण डोकं दुखत आहे ना? गोळी घेऊन जरा झोप. नंतर जा.
डॉ. केशव - रमा, जाऊ दे त्याला. तुझ्या समाधानासाठी एखादी गोळी खाऊ
दे त्याला, पण त्याला जाऊ दे. गावाकडील वातावरण प्रसन्न असते. तिकडे त्याला बरं
वाटेल.
अमोद चहा नाश्ता करून औषध घेऊन बाहेर पडतो. तो
थेट भाऊकाकांकडे पोहोचतो.
अमोदला अचानक आलेला पाहून
संध्याकाकू आणि अक्षताला आश्चर्य वाटते.
भाऊकाका - अमोद, ये बस. मी आत्ता तुलाच कॉल करणार होतो. बरं झालं, तू
एकटाच आलास.
अमोद घरात येऊन बसतो. अक्षताला बघून त्याला संकोचल्यासारखे होते.
भाऊकाका - अरे, संकोच वाटून घेऊ नकोस. तुला काय बोलायचे ते बिनधास्त
बोल. मला आणि संध्याला याबद्दल कल्पना आहे. अक्षताशी आमचे बोलणे झाले आहे.
अमोद - अरे बापरे, म्हणजे अक्षताने सर्व काही तिच्या आणि माझ्या घरी
पण सांगितले कि काय?
अक्षता - ए, मी फक्त भाऊकाका आणि संध्याकाकूंनाच बोलले.
आता अमोद या सर्वांना शर्मिष्ठा आणि त्याच्यात जे काही बोलणे काल
झाले ते सर्व सांगतो.
अमोद - काका, शर्मिष्ठा जे काही बोलत होती ते मला नीट कळले नाही.
तिने मला लग्नासंबंधी विचारले येथवर ठीक
आहे. पण लग्न झाल्यावर मला तिच्याबरोबर कुठे जावे लागेल याचा मला काही उलगडा
झालेला नाही.
यावर भाऊकाकांनी असे सांगितले, कि ते तिघेजण आत्ता शर्मिष्ठाबद्दलच
बोलत होते. त्या तिघांमध्ये जे काही बोलणे
झाले ते सर्व भाऊकाकांनी अमोदला सांगितले.
अमोद - अरे बापरे, म्हणजे शर्मिष्ठा मायालोकातून आलेली आहे?
त्यामुळेच ती मला तिच्याबरोबर येण्यासंबंधी बोलत होती.
अक्षता - हे सर्व किती भयंकर आहे !
भाऊकाका - विद्याधर महाराजांनी सांगितलेली साधना सुरु केल्यावर ज्या
काही विशेष गोष्टी घडल्या त्या सर्व नीट आठवून मला सांग.
विद्याधर महाराजांना भेटल्यापासूनची एक एक गोष्ट अमोद आठवू लागतो.
अमोद - काका, साधना सुरू केल्यावर मला झोपेत प्रकाश किरण दिसू लागले.
तसेच वेगवेगळे सुगंध येऊ लागले. साधना पूर्ण झाल्यावर मी आजारी पडलो. मला माझ्या
मित्रांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. एका सकाळी तिथे मला तपासायला एक सुंदर नर्स
आली होती. आत्ता मला आठवलं कि ती शर्मिष्ठासारखीच दिसत होती. तिने मला फळांचे
ज्यूस प्यायला दिले. त्यानंतर माझी तब्येत झपाट्याने सुधारू लागली. शर्मिष्ठाने
मला शेअर मार्केटचे नॉलेज दिले. मला त्यात भरपूर फायदा झाला. एकदा गुंडांशी
झालेल्या वादात तिने फाईट देखील केली. शर्मिष्ठाने सतत मला वाचवलेले आहे. मीदेखील
तिच्याकडे आकर्षित झालो होतो. पण माझी आणि अक्षताची मैत्री लहानपणापासून आहे. तिने
सुखदुःखात नेहमीच मला साथ दिली आहे. दोघींनी मला प्रपोज केले आहे. या सर्व गोष्टी
खूप गुंतागुंतीच्या झालेल्या आहेत. पण आता शर्मिष्ठा माझ्याशी असे का वागत आहे ते
कळत नाही. ती मला का नेणार आहे?
भाऊकाका - अमोद, तुला विद्याधर महाराजांनी जी उपासना करायला सांगितली
होती, ती मायालोकाशी संबंधित आहे. तुझ्या
कठोर तपश्चर्येमुळे मायालोकांतील मुख्य देवता प्रसन्न झाली. त्याचे फळ देण्यासाठी
त्या देवतेने तेथीलच एका दिव्य मुलीची म्हणजे शर्मिष्ठेची नेमणूक केली. त्यानुसार
शर्मिष्ठा तुझी काळजी घेऊ लागली. तुझा सात्विक स्वभाव, पूर्वजन्मातील घोर
तपश्चर्या आणि या जन्मातील तपश्चर्या या सर्व गोष्टींमुळे तुझ्याभोवती एक तेजोवलय
निर्माण झाले आहे. तू आता सामान्य माणूस नसून दिव्य पुरुष या कॅटेगेरीच्या जवळ
पोहोचला आहेस. या सर्व गोष्टी शर्मिष्ठेला नक्कीच कळल्या असणार. ती तुझ्या प्रेमात
पडली. मायालोकातील
व्यक्ती पृथीवरील मानवाला मदत करू शकतात. परंतु मानवाबरोबर संसार करून येथे कायम
वास्तव्याची त्यांना परवानगी नाही. असे जर कोणी केले तर त्या मायालोकातील
व्यक्तीचे दिव्यत्व संपून तिला या पृथ्वीवर रहावे लागेल. त्यामुळेच शर्मिष्ठाने
असे सांगितले असणार कि ती लग्नानंतर इथे राहू शकत नाही.
संध्याकाकू - अहो, पण ती अमोदला तिकडे न्यायचे असे काहीतरी बोलत आहे
ना?
भाऊकाका - बरोबर बोलली ती. आता अमोदचे तेजोवलय इतके वाढले आहे कि
शर्मिष्ठाने शिफारस केल्यास त्याला तिकडे प्रवेश मिळू शकतो.
अमोद - नाही, मला असल्या कोणत्याही दुसऱ्या दुनियेत जायचे नाही. मी
माझ्या आई - वडिलांना आणि मित्र मैत्रिणींना सोडून तिकडे राहू शकत नाही.
अक्षता - अमोद, तू आम्हाला सोडून खरंच कुठे जाऊ नकोस. तू शर्मिष्ठाला
सांगून टाक कि तू तिच्याबरोबर कुठेच जाणार नाहीस.
भाऊकाका - हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. प्रकरण नाजूक आहे.
प्रेमाचा विषय आहे. शर्मिष्ठा जरी चांगल्या दुनियेतून आली असली तरी ती आता
सहजासहजी अमोदला सोडणार नाही. कारण ती आता त्याच्या प्रेमात पडली आहे. जोपर्यंत ती
भानावर येत नाही तोपर्यंत कठीण परिस्थिती आहे.
संध्याकाकू - म्हणजे तिचे आई - वडील वारलेत हि थापच असेल ना?
भाऊकाका - हो तसेच असेल.
संध्याकाकू - अहो, त्या मायालोकाच्या मुख्य देवतेला तुम्ही प्रार्थना
करून शर्मिष्ठेची तक्रार करू शकत नाही का?
भाऊकाका - हि गोष्ट सोपी नाही. मला विद्याधर महाराजांशी संपर्क करावा
लागेल. पण त्यापूर्वी मी अमोद आणि अक्षता तुम्हा दोघांना एक स्तोत्र आणि
ध्यानधारणा शिकवणार आहे. ह्या स्तोत्राचा जास्तीतजास्त पाठ करा. तुमच्या दोघांच्या
घरी देखील, म्हणजे
तुमच्या आई - वडिलांनादेखील या स्तोत्राचा जास्तीत जास्त पाठ करायला सांगा. संकट
आहे आणि मी सांगितले आहे एवढेच सांगा. म्हणजे ते ऐकतील.
अक्षता - काका, पण धोका तर फक्त अमोदला आहे ना? मग आम्हाला स्तोत्र
वाचायला तुम्ही का सांगितले? तुम्ही सांगितले तसेच आम्ही करू, पण शंका विचारली.
भाऊकाका - आता शर्मिष्ठा काहीही करू शकते. तुम्ही सर्वजण अमोदच्या
जवळच्या व्यक्ती आहेत. त्यात तुझे आणि अमोदचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे
तूदेखील शर्मिष्ठाच्या टार्गेटवर असणार.
अक्षता (आनंदाने) - काका, तुम्ही काय म्हणालात? अमोदचे देखिल
माझ्यावर प्रेम आहे?
संध्याकाकू (हसत) - अग, तो वेडा आहे. मला आणि यांना हि गोष्ट कधीच
लक्षात आली होती कि तुमचे एकमेकांवर प्रेम आहे. यासाठी कोणत्या वेगळ्या
ज्ञानचक्षुंची गरज नाही. फक्त त्याला अजून ते प्रेम सांगता येत नाही आहे. त्याला
थोडा वेळ दे. एवढेच काय पण तुमच्या दोघांच्या घरीदेखील हि गोष्ट माहित आहे. फक्त
तुमच्या घरचे लोक तुम्ही स्वतःहून हे कधी सांगणार याची वाट पहात आहेत.
भाऊकाका - अमोद आणि अक्षता, तुम्हा दोघांना आता मी ध्यान क्रिया
शिकवणार आहे. आत्मोद्धाराचा हा राजमार्ग आहे. संसार करून परमार्थ करावा. फक्त
सिद्धींच्या मागे लागू नये.
त्यानंतर भाऊकाका दोघांना ध्यान क्रिया शिकवतात. तसेच
स्तोत्राची २ छोटी पुस्तके दोघांना देतात.
या स्तोत्रामुळे तुम्हाला सर्वांना एक भक्कम कवच लाभेल असे भाऊकाका सांगतात.
अमोद आणि अक्षता दोघेही भाऊकाका आणि संध्याकाकूंचा निरोप घेऊन घरी
परततात. घरी गेल्यावर ते आपापल्या घरी
भाऊकाकांनी जे स्तोत्र म्हणायला दिले होते
ते देतात.
दोन दिवसांनी सकाळी शर्मिष्ठा अमोदच्या घरी येते. रमाकाकू आणि डॉ.
केशव तिचे स्वागत करतात.
रमाकाकू - शर्मिष्ठा, बस हं अमोदसाठी चहा ठेवला आहे. तू पण घे.
शर्मिष्ठा - काकू, मी आत्ताच चहा पिऊन आले. परत नको.
रमाकाकू - लाजतेस कि काय? चहाला नाही काय म्हणतेस. अर्धा कप घे.
रमाकाकू दोघांना चहा आणतात. अमोद आणि शर्मिष्ठा दोघेही चहा पिऊ
लागतात.
शर्मिष्ठा - काका आणि काकू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे.
डॉ. केशव - सांग ना, तू काय सांगणार आहेस?
शर्मिष्ठा - मी आणि अमोद लग्न करणार आहोत.
रमाकाकू (आश्चर्याने) - शर्मिष्ठा, तू काय सांगते आहेस?
शर्मिष्ठा - का काकू? मी दिसायला सुंदर नाही का? मी गुणवान नाही का?
डॉ. केशव - अग, तस नाही. तू
रूपवान आणि गुणवान आहेस. पण हे अचानक ऐकून आम्हला दोघांना आश्चर्य वाटले.
अमोद - शर्मिष्ठा, एक मिनिट थांब. मी तुला कधी होकार दिला?
शर्मिष्ठा - अमोद, तुझ्यासाठी मी इकडे आले. तुला आठवत आहे का? तिकडे
उत्तराखंडच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतास तेव्हादेखील मीच आले होते मदतीला.
रमाकाकू (आश्चर्याने) - अमोद, हि काय सांगत आहे? म्हणजे तुम्ही दोघे
एकमेकांना उत्तराखंडमध्ये भेटला होतात काय? तुमची आधीपासून ओळख आहे का?
डॉ. केशव - अग, थांब त्याला बोलू दे. एक एक प्रश्न विचार.
अमोद - आई, हि म्हणते त्याप्रमाणे तिकडे हॉस्पिटलमध्ये हि आली होती.
तिने दिलेल्या फळांच्या ज्यूस मुळे
मी लवकर बरादेखील झालो. पण मी हिला तेव्हा ओळखत नव्हतो.
रमाकाकू - अस्स, म्हणजे नंतर ओळख झाली.
अमोद - नाही आई, नंतरदेखील तिकडे माझी हिच्याशी ओळख झाली नाही. कारण
तिकडे हि नर्स म्हणून आली होती. ती इकडे आल्यावरच आमची ओळख झाली.
डॉ. केशव - अमोद, ते सर्व ठीक आहे. पण आता तुमच्यात काय सुरु आहे?
अमोद - बाबा, आमच्यात काहीही नाही. हीच मला फसवत आहे. लग्नानंतर मला
ती तिच्याबरोबर नेणार आहे. तुम्हाला सर्वांना सोडून मी कुठेही जाणार नाही.
त्यानंतर रागाने अमोद शर्मिष्ठाला जायला सांगतो.
शर्मिष्ठा - अमोद, मी आत्ता जाते आहे. पण हे सर्व प्रकरण तुम्हाला
सर्वांना महागात पडेल. मी तुझी शत्रू नाही. माझे म्हणणे ऐक. अजून विचार कर.
शर्मिष्ठा रागाने तेथून निघून जाते.
रमाकाकू - अमोद, आम्हाला सर्वांना वाटत होते कि, तुझे आणि अक्षताचे
एकमेकांवर प्रेम आहे. तुम्ही दोघेजण लग्न
कराल. पण आम्ही आज हे काय ऐकत आहोत? परंतु
जर शर्मिष्ठाचे आणि तुझे एकमेकांवर प्रेम असेल, तर तसं सांग. आम्ही तुमचे लग्न
लावून देऊ.
त्यानंतर अमोद या दोघांना खरी हकीगत सांगतो. हे सर्व ऐकून रमाकाकू
आणि डॉ. केशव आश्चर्यचकित होतात.
अमोद - माझे अक्षतावर अगोदरपासूनच खूप प्रेम आहे. पण मला ते कधीच
लक्षात आले नाही. अक्षताचे देखील माझ्यावर प्रेम आहे. पण या शर्मिष्ठाने सर्व
गोंधळ केला आहे.
रमाकाकू - ती जर खरोखर मायालोकातून
आली असेल, तर तिच्या विरोधात जाणे हे महागात पडू शकते.
डॉ. केशव - हि शर्मिष्ठा जरी सिद्धींनी संपन्न असली, तरी
परमेश्वरपेक्षा श्रेष्ठ नक्कीच नाही. आपण सर्वजण परमेश्वरावर श्रद्धा ठेऊ या. तो
नक्कीच आपले रक्षण करेल.
रमाकाकू - भाऊकाकांनी दिलेले स्तोत्र आजच आपण वाचायला सुरुवात करू.
इकडे अक्षतादेखील तिच्या घरी
शर्मिष्ठाबद्दल सांगते. तिच्या आई वडीलांचा आधी विश्वासच बसत नाही. त्यांना वाटते
कि अक्षता गंमत करत आहे. म्हणून ते भाऊकाकांना फोन करतात. तेव्हा त्यांचादेखील या
गोष्टीवर विश्वास बसतो.
आता अमोद आणि अक्षता दोघेजण भाऊकाकांनी सांगितल्याप्रमाणे दररोज
ध्यानधारणा करू लागतात. तसेच अक्षताचे आई
- वडील (दामोदर काका, मालती काकू) आणि अमोदचे आई - वडील (डॉ. केशव, रमाकाकू) हे
सर्वजण भाऊकाकांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त वेळा स्तोत्र वाचू लागतात.
भाऊकाका सूक्ष्म शरीराने विद्यधार महाराजांशी संपर्क साधतात. घडलेला
प्रकार त्यांना सांगतात. विद्याधर महाराज काळजीत पडतात. एक दिव्य अनुष्ठान मांडून
ते मायालोकाच्या मुख्य देवतेशी संपर्क
साधण्याचा प्रयत्न करतील, असे भाऊकाकांना विद्याधर महाराज सांगतात. पण तो पर्यंत या दोन्ही कुटुंबांच्या जीवाला
धोका असू शकतो असेही ते सांगतात.
अमोद आता शर्मिष्ठाला भेटणे टाळू लागतो. त्याच्या आणि
अक्षताच्या भेटीगाठी परत सुरु होतात.
एका रविवारी दुपारी दोघेजण भाऊकाकांना भेटायला जातात. गप्पागोष्टी
होतात. भाऊकाका त्यांना परिस्थितीतून
मार्ग निघेपर्यंत सावध रहा असे सांगतात. भाऊकाका आणि संध्याकाकूंना नमस्कार करून
दोघेजण बाहेर पडतात. बाहेर पडताना, पुढे असलेल्या देवीच्या देवळात जाणार असल्याचे
अमोद आणि अक्षता सांगतात. आत्ता फक्त ४ वाजलेले असतात. रात्र होण्याच्या अगोदर घरी
जा असे संध्याकाकू दोघांना सांगतात.
भाऊकाकांच्या घरापासून काही अंतरावर एका टेकडीवर देवीचे देऊळ असते.
तेथे दर्शनासाठी अमोद आणि अक्षता जातात. टेकडीवर जायला एक छोटा रस्ता असतो. टेकडी
जास्त उंच नसते परंतु आकाराने मोठी असते. देवळाच्या बाजूला गर्द झाडी असते. तसेच
एक तळेदेखील असते. गाडी देवळापर्यंत जाते. देवळात गर्दी कमी असते.
अमोद आणि अक्षता देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या तळ्यावर
जातात. तळ्याच्या बाजूने दोघेजण राउंड मारतात. पलीकडील काठावर जाऊन बसतात. इथे
कोणीच नसते.
अमोद - अक्षता, सॉरी हं. शर्मिष्ठाच्यामुळे मी तुला नकळत दुखावले.
माझेदेखील तुझ्यावर आधीपासूनच प्रेम होते. पण नीट सांगता येत नव्हते. शर्मिष्ठा
मध्येच आली. त्यामुळे मी तिच्याकडे खेचला गेलो. त्यामुळे माझी द्विधा मन:स्थिती
झाली. पण माझे तुझ्यावरच खरे प्रेम आहे. मी शर्मिष्ठाला कधीच असे सांगितले
नव्हते, कि माझे तिच्यावर
प्रेम आहे.
अक्षता - असू दे रे. मला माहित आहे कि तू माझाच आहेस.
अमोद - अक्षता, आपण लग्न कधी करायचे?
तेवढ्यात तेथे शर्मिष्ठा येते.
शर्मिष्ठा (रागाने) - अमोद, तिची लायकी नाही आहे तुझ्याशी लग्न
करण्याची. तुझ्या साधनेने तुला उच्च लोकात प्रवेश मिळत आहे आणि तुला काय हे
दळिद्रं सुचत आहे. ऐक माझे. चल माझ्याबरोबर.
अमोद - शर्मिष्ठा, प्रेमात स्वार्थ चालत नाही. जर तुझे माझ्यावर
खरोखर जीवापाड प्रेम असते, तर तू तुझा लोक सोडून इथे सामान्य आयुष्य जगायला तयार
झाली असतीस. पण नाही. तुला तुझ्या शक्ती जातील हि भीती आहे. अक्षताचे तसे नाही.
भलेही ती सामान्य माणूस असेल. तरीपण तिचे लहानपणापासून माझ्यावर प्रेम आहे. माझ्या
प्रत्येक सुख - दुःखात तिने मला साथ दिली आहे. त्यामुळे तू प्लिज जा. तुला तुमच्या
लोकात कोणीतरी चांगला जोडीदार मिळेल.
हे सर्व ऐकून शर्मिष्ठा रागाने लाल होते. तू माझा नाही झालास तर
कोणाचाच होऊ शकणार नाहीस. असे म्हणून ती डोळे मिटते. काहीतरी मंत्र पुटपुटताच
तिच्या हातात तेजस्वी आणि अणुकुचीदार शक्ती येते. त्या शक्तीतून दिव्य किरणे बाहेर
पडत असतात. भोग आता मला अव्हेरल्याचे फळ, असे बोलून शर्मिष्ठा ती शक्ती अमोदवर
फेकते.
ती शक्ती अमोदच्या दिशेने येऊ लागते. ते पाहून अक्षता मध्ये येते.
अक्षता अमोदच्या समोर अशी उभी रहाते, कि त्यामुळे अमोद पूर्ण
झाकला जातो. आता ती
शक्ती झेलायला
अक्षता तयार असते.
हे पाहून अमोद चपळाईने त्याचा उजवा हात पुढे करतो. ती शक्ती अक्षतावर
आदळायच्या आधीच अमोद ती शक्ती उजव्या हातात झेलतो. प्रचंड प्रकाश निर्माण होतो.
अमोदच्या हाताला खूप दुखापत होते. तरी देखील सर्व जोर एकवटून अमोद ती शक्ती
शर्मिष्ठाच्या पायावर फेकतो. त्या शक्तीच्या प्रभावामुळे अक्षता आणि अमोद खाली
कोसळतात.
अमोदने केलेल्या अनपेक्षित उलटवारामुळे शर्मिष्ठा गांगरते. तरीपण ती
तो वार चुकवण्याचा प्रयत्न करते. पण ती शक्ती शर्मिष्ठाच्या पायाला थोडीशी घासून
जाते. त्यामुळे शर्मिष्ठादेखील तोल जाऊन
खाली पडते.
अक्षता आणि अमोदला दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध येते. तेव्हा ते
अमोदच्या हॉस्पिटलमध्ये एका रूममध्ये ऍडमिट असतात. बाजूला डॉ. केशव, रमाकाकू,
दामोदर काका, मालती काकू, भाऊकाका, संध्याकाकू, कुणाल आणि शेखर एवढे सगळेजण उभे
असतात. या दोघांना शुद्ध आलेली पाहून
सर्वांना बरे वाटते.
मालती काकू - तुम्हाला नक्की काय झाले? तुम्ही दोघे बेशुद्ध कसे काय
पडलात? तुमच्यावर हल्ला कोणी केला?
अक्षता - शर्मिष्ठाने.
त्यानंतर घडलेला सर्व प्रकार अमोद सांगतो. तसेच त्याचे प्राण
वाचवण्यासाठी अक्षता कशी मध्ये आली ते पण सांगतो.
अक्षता - पण अमोदने त्या शक्तीचा प्रहार माझ्यावर होऊ नये म्हणून
सर्व ताकदीने ती शक्ती उजव्या हातात झेलली. त्यानंतर तीच शक्ती शर्मिष्ठाच्या
पायावर उलट भिरकावली. इथपर्यंत मला आठवत आहे. नंतर आम्ही दोघेजण खाली कोसळलो.
संध्याकाकू - पण अमोद, तू शर्मिष्ठाच्या पायावरच का ती शक्ती उलट
फेकलीस?
अमोद - मला कोणतीही हत्या नको होती. फक्त शर्मिष्ठाला रोखण्यासाठी
उलट प्रहार करणे गरजेचे वाटले. तिच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मी ती शक्ती
तिच्या पायावर फेकली. ती माझी एक चांगली मैत्रीणच होती. तिचे वाईट मी कसे करू?
भाऊकाका - व्वा, तुम्ही दोघांनी दाखवलेले धैर्य आणि पराक्रम असामान्य
आहे.
अमोद - पण आम्हाला इथे ऍडमिट केले कोणी?
डॉ. केशव - अरे, कोणीतरी एक तरुण मुलगी होती. कदाचित तुमच्या
कॉलेजमधील तुमची मैत्रीण असेल. तिने तातडीने तुम्हाला इथे ऍडमिट केले. खूप काळजीत
दिसत होती.
कुणाल - अमोद, आपल्या कॉलेजमधील कोणत्या मैत्रिणीने तुम्हाला इथे
हॉस्पिटलमध्ये आणले असेल?
शेखर - अरे त्यांना काय ठाऊक असेल?
कुणाल - अरे मी अंदाज विचारत आहे.
तेवढ्यात एक सुंदर तरुण मुलगी तिथे येते.
डॉ. केशव - हिच ती मुलगी. हिने या दोघांना इथे वेळेवर आणले म्हणून
बरे झाले. तुझे नाव देखील काल गडबडीत
विचारायचे राहून गेले. तुझे नाव काय?
त्या सुंदर मुलीने दोन काचेचे ग्लास भरून फळांचे ज्युस आणलेले असते.
ती अक्षता आणि अमोदला सांगते कि तुम्ही दोघेजण आधी हे ज्युस प्या. त्यामुळे
तुम्हाला बरे वाटेल. दोघेजण ज्युस पितात. ज्युस खूपच मधुर असते. ते पिताच दोघांना ताजेतवाने वाटू लागते. ते
ज्युस पिताना अमोदला उत्तराखंडमधील हॉस्पिटलमध्ये त्या नर्सने (म्हणजे
शर्मिष्ठाने) दिलेले फळांचे ज्युस आठवते.
अमोद - आम्हाला वाचवल्याबद्दल थँक यु. पण तू कोण आहेस? आम्ही तुला
ओळखत नाही.
सुंदर मुलगी - शर्मिष्ठाला झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटले.
अमोदला वाचवण्यासाठी अक्षता मध्ये आली. तसेच अक्षताला वाचवण्यासाठी अमोदने हात मध्ये घातला. यावरून
दोघांचे एकमेकांवरचे निःस्वार्थी प्रेम तिला कळले. तसेच अमोदने जी शक्ती झेलली, ती
साधीसुधी शक्ती नव्हती. हवं तर त्या शक्तीच्या सहाय्याने अमोद शर्मिष्ठाला ठार
मारू शकत होता. परंतु त्याने मैत्री आणि माणुसकी दोन्ही सांभाळली. या सर्व चुकांचा
शर्मिष्ठाला पश्चाताप झाला आहे. ती तुमच्या सर्वांची माफी मागू इच्छित आहे. काय
तुम्ही तिला माफ कराल का?
अमोद आणि अक्षता दोघेजण शर्मिष्ठाला माफ केल्याचे सांगतात.
अमोद (आश्चर्याने) - पण तू कोण आहेस? हे सर्व तुला कसे माहित?
सुंदर मुलगी (स्मित हास्य करून) - मी शर्मिष्ठाची बहिण धनिष्ठा आहे. झाल्या प्रकारामुळे मायालोकाच्या
प्रमुखांनी शर्मिष्ठाला परत तिकडे बोलावले आहे. आता माझी इथे अमोदची देखरेख
करण्यासाठी नियुक्ती केली आहे.
अमोद - अरे देवा, कुठे फसलो मी. एक शर्मिष्ठा काय कमी होती? जी अजून
धनिष्ठा आली.
सर्वजण हसू लागतात.
सुंदर मुलगी (हसत) - ए, काळजी करू नकोस मी गंमत केली. मी शर्मिष्ठाच
आहे. पण आता मी तुला सोडून जात आहे. तू आणि अक्षता लग्न करा. सुखाने संसार करा.
असे म्हणत असतानाच तिचे रूप बदलते. तिथे शर्मिष्ठा दिसू लागते.
अक्षता - शर्मिष्ठा, हा काय प्रकार आहे?
शर्मिष्ठा - अमोद आणि अक्षता मला माफ करा. रागाच्या भरात मी अमोदवर
हल्ला केला. माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला आहे. अमोदने माझ्या पायावर जो
शक्तीचा वर केला, तो मी चुकवण्याचा प्रयत्न केला. पण ती शक्ती माझ्या पायाला घासून
गेली आणि मी पडले. माझीच शक्ती माझ्यावर उलटवल्यामुळे काही वेळासाठी माझ्या दिव्य
शक्ती बंद पडल्या. परंतु यातून सावरून मी
उभी राहिले. रागाच्या भरात मी किती मोठा अपराध केला ते माझ्या लक्षात आले. तुम्ही दोघे
बेशुद्ध पडला होतात. माझ्या विशेष शक्ती तात्पुरत्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे
तुम्हाला दोघांना तुझ्याच गाडीत घालून मी इकडे हॉस्पिटलमध्ये आणले. कशी तरी शक्ती
एकवटून माझे रूप मी बदलले. त्यासाठी मला विशेष शक्ती लागत नाही.
कारण त्या क्षणी तरी माझ्या मूळ रूपात तिथे डॉ. केशव काकांना
भेटण्याची मला लाज वाटत होती. डॉ. केशव काका नशिबाने हॉस्पिटलमध्येच होते.
तुम्हाला दोघांना तेथे ऍडमिट केल्यावर मी एकांतात गेले. आमच्या
मायलोकाच्या प्रमुखांशी संपर्क केला. झालेला वृत्तांत सांगून त्यांची माफी
मागितली. एरवी मी अशी दुष्टपणाने कोणाशीच वागलेली नसल्याने त्यांनी थोडेसे रागावून
मला माफ केले. महत्वाचे म्हणजे तुमच्या दोघांची माफी मागायला सांगितली.
अमोद आणि अक्षता दोघेही तिला माफ करतात.
शर्मिष्ठा बाकीच्यांची देखील माफी मागते. सर्वजण तिला माफ करतात.
शर्मिष्ठा - अमोद, तुझ्या शक्ती इतक्या वाढल्या आहेत कि आता तुला
माझी गरज लागणार नाही. तरीपण कधी गरज पडली तर माझे स्मरण कर, मी एक मैत्रीण म्हणून
तात्काळ हजर होईन. मी आता मायालोकात परत जात आहे. तुमच्या लग्नाला मात्र मला नक्की
बोलव.
अमोद - हो शर्मिष्ठा, आमच्या लग्नाला तुला मी नक्की बोलवेन. रागाच्या
भरात मी सुद्धा काही उलटसुलट बोललो असेन,
तर मला माफ कर.
शर्मिष्ठा सर्वांचा निरोप घेऊन निघून जाते.
कुणाल (अमोदला) - अरे वेड्या, त्या शर्मिष्ठामुळे तुला कळले कि तुझे
आणि अक्षताचे एकमेकांवर किती प्रेम आहे. अरे तू अक्षताला प्रपोज करण्याऐवजी गप्प
बसून होतास. शेवटी अक्षतालाच ते काम करावे लागले.
सर्वजण हसू लागतात.
डॉ. केशव (गंमतीत) - भाऊकाका आता तुम्ही एक लवकरचा मुहूर्त बघा. या
दोघांचे लग्न वेळीच लावून देऊ. नाहीतर कोणी धनिष्ठा खरंच यांच्या आयुष्यात यायची.
सर्वजण परत हसू लागतात.
विद्याधर महाराजांनादेखील कळून चुकते कि सिद्धी आल्या तरी आपण तटस्थ
रहावे. खरे हित आत्मोद्धारातच
आहे. तेदेखील भाऊकाकांचा अनुग्रह घेतात.
एका शुभमुहूर्तावर अमोद आणि अक्षताचे लग्न होते. लग्नाला
शर्मिष्ठादेखील येते आणि शुभेच्छा देऊन परत जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा