Read best Marathi suspense story free मराठी
लेखक - केदार शिवराम देवधर
हेर - भयामागचे कारण ( भाग २ )
भाग २
काकु - पहिल्या वेळेस जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा आम्हाला देखील काळजी वाटत होती. परंतु हे असे सारखेच होऊ लागले आहे. यांना काहीतरी मानसिक टेन्शन आहे असेच मला वाटत आहे.
अनय ( गोविंदरावांच्या मुलीला) - विद्या, तुझे काय मत आहे याविषयी?
विद्या - बाबांचे हे सर्व मानसिकच आहे असे मला देखील वाटत आहे. कारण आम्ही तर असे काहीच बघितले नाही जे बाबा बघतात.
त्यानंतर अनय तेथे कामाला असलेल्या दोन्ही नोकरांची, म्हणजे नवरा-बायकोची विचारपूस करतो. त्या दोघांना देखील असे काही भास झालेले नसतात.
नंतर अनय, गोविंदरावांना त्यांच्या कंपनी विषयी माहिती विचारतो.
गोविंदराव - काल तुला सांगितल्याप्रमाणे माझी एक खूप जुनी साबणाची कंपनी आहे. ती कंपनी फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशिप मध्ये आहे. माझ्या पार्टनर चे नाव निनाद असे आहे.
अनय - नावावरून तरी तुमचा पार्टनर तरुण दिसतोय. काय वय आहे त्याचे?
गोविंदराव - होय त्याचे वय साधारण तीस वर्षे आहे.
अनय - तुमची कंपनी तर जुनी आहे, मग तुमचा पार्टनर तरुण कसा?
गोविंदराव - अरे खरे म्हणजे ती कंपनी माझी आणि माझ्या मित्राची आहे. पण तीन वर्षापूर्वी माझ्या मित्राचा मृत्यू झाला. निनाद साधारण सात-आठ वर्षांपासून कंपनीत कामकाज बघतो आहे. तो माझ्या मित्राचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे तोच आता माझा पार्टनर झाला. पण मुलगा खूप हुशार आहे बरं. आत्ता माझ्या या प्रकरणामध्ये त्याने खूप हुशारीने कंपनी सांभाळली आहे. विद्याने जेव्हा मला डॉक्टरांकडे नेले तेव्हा तोदेखील बरोबर आला होता. खूप मदत केली त्याने आम्हाला.
अनय - अजून कोण महत्त्वाच्या व्यक्ती तुमच्या कंपनीमध्ये आहेत, ज्या तिथला कारभार सांभाळतात?
गोविंदराव - रमण साहेब आमच्या इथले मॅनेजर आहेत. ते खूप जुने आणि विश्वासू आहेत.
अनय - तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला कामात मदत नाही करत का?
गोविंदराव - माझ्या मुलाची तर परदेशात सॉफ्टवेअर फर्म आहे. त्याला माझ्या साबणाच्या कंपनीत काहीच इंटरेस्ट नाही. इथल्या पेक्षा कितीतरी जास्त पटीने तो तिकडे कमवतो. माझ्या मुलीला फॅशन डिझाईनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे तिचा तो उद्योग चालू आहे. तिला माझ्या कंपनीत लक्ष द्यायला वेळ नाही.
अनय - आता मला तुमच्या कंपनीतील काही लोकांना भेटायचे आहे.
गोविंदराव - काही हरकत नाही. मी रमण साहेबांना फोन करून तसे सांगतो.
अनय - काका जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या जीवाला अजिबात धोका नाही.
गोविंदराव - अरे असे कसे म्हणतोस? तीन वेळा माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. माझे नशीब चांगले म्हणून मी वाचलो. काल तुझ्या ऑफिसमध्ये जीव मुठीत घेऊनच आलो होतो.
अनय - जर तुमचा मृत्यू व्हावा अशी कुणाची खरोखरच इच्छा असती, तर या तीन प्रयत्नात तुम्ही नक्की मारले गेला असता. तीन वेळा हल्ला करून देखील तुम्हाला साधे खरचटले देखील नाही याचा अर्थ ते हल्ले तुम्हाला मारण्यासाठी नव्हते, तर घाबरवण्यासाठी होते.
गोविंदराव - काय सांगतोस काय तू? हे असे कोण कशासाठी करेल.
अनय - कोणाचा कशात स्वार्थ आहे ते आत्ता सांगणे कठीण आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका, परंतु गाफील देखील राहू नका.
त्यानंतर अनय, गोविंदरावांच्या बंगल्यावरून बाहेर पडतो. सखाराम काकांबरोबर तो त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो.
अनय - गार्गी, तुझ्यासाठी आता कामगिरी आहे.
गार्गी - सांगा सर.
अनय - गोविंदरावांच्या घरातील माणसांवर नजर ठेवायची. ते कुठे जातात? काय करतात? त्याचा शोध घ्यायचा. मी तुला सर्वांचे फोटो देतो आणि त्यांची नावे सांगतो. आजूबाजूची देखील माहिती काढ.
गार्गी - ठीक आहे सर. मी आत्ताच कामाला लागते.
अनय - गार्गी, तू डबा खाल्लास का?
गार्गी - नाही सर, तुम्ही दोघे येणार होतात म्हणून थांबले होते.
अनय - सखाराम काका चला आपण सगळ्यांनी डबा खाऊन घेऊ. त्यानंतर आपल्याला दोघांना गोविंदरावांच्या कंपनीत जायचे आहे.
तिघेजण डबा खायला बसतात.
अनयच्या आईने पोळी आणि कारल्याची भाजी दिली असते.
डबा उघडताच अनय ओरडतो, आज आईने कारल्याची भाजी दिली. काका, मी किती वेळा आईला सांगितले आहे, की कारल्याची भाजी केली तर मला डबा देत जाऊ नको. मी बाहेरून पार्सल मागवेन. पण आई ऐकतच नाही. म्हणते की सर्व रस पोटात गेले पाहिजेत.
सखाराम काका - साहेब बरोबरच आहे. आता आईने भाजी दिलीच आहे तर थोडी तरी खा. बाकीची आम्ही दोघे खाऊ. मी डाळिंब्या आणलेत त्या तुम्ही खा. काय ग गार्गी, बरोबर आहे कि नाही?
गार्गी - सर मला देखील कारल्याची भाजी खूप आवडते. माझ्या आईने आज कर्टुल्याची भाजी केली आहे, ती मी तुम्हाला देईन हं.
अनय - आज काय झालंय तरी काय? कोणाची आई कारल्याची भाजी देते, कोणाची आई कर्टुल्याची भाजी देते. अग गार्गी, हे सगळे एकच आहे गं.
गार्गी - सर एकच कसं? वेगवेगळे आहे. मला तर दोन्ही भाज्या आवडतात.
सखाराम काका (हसत) - साहेब आता तुम्ही लग्नच करा. म्हणजे बायको तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या करून खायला घालेल तुम्हाला.
अनय - ओ काका, जेवणावरून डायरेक्ट लग्नावर कुठे पोहोचलात? आधि केस सॉल्व्ह करा. पण एक मात्र बरं झालं काकूंनी तुम्हाला डब्यात डाळिंब्या दिल्या. द्या त्यातल्या थोड्याशा डाळिंब्या मला.
सर्वांचे डबे खाऊन होतात. त्यानंतर तिघेही आपापल्या कामगिरीवर निघतात.
अनय आणि सखाराम काका गोविंदरावांच्या कंपनीत पोहोचतात. सखाराम काका गाडीतच बसून राहतात. गेटवर सिक्युरिटी कडून अनयला लगेचच आत घेतले जाते. कारण गोविंदरावांची तशी ऑर्डर असते.
अनय प्रथम तेथेच सर्व सिक्युरिटी डिपार्टमेंटची चौकशी करतो.
त्यानंतर अनय, रमण साहेबांकडे जातो. रमण साहेब त्याचे स्वागत करतात.
रमण साहेब - तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती नि:संकोचपणे विचारा.
अनय - गोविंदरावांच्या बाबतीत सध्या जे काही घडत आहे, ते तुम्हाला सर्व माहितीच आहे.
रमण साहेब - हो.
अनय - गोविंदरावांचा कोणी शत्रू असल्याचे तुम्हाला आठवत आहे का?
रमण साहेब - नाही हो. गोविंदराव तर देव माणूस आहेत.
अनय - तरीदेखील कंपनीमध्ये कळत-नकळत त्यांनी कोणाला दुखावले आहे का?
रमण साहेब - नाही. ते सर्वांशी प्रेमाने वागतात.
अनय - हे जे प्रकार घडत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे?
रमण साहेब - गोविंदरावांचा तर कोणी शत्रू नाही. त्यामुळे मला तरी वाटते की त्यांना कसले तरी टेन्शन आले असावे?
अनय - कसलं टेन्शन?
रमण साहेब - आता त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम आपल्याला कसे कळणार? पण त्यांचा मुलगा तिकडे परदेशात लांब आहे. गोविंदरावांचे आता वय झाले आहे. त्यामुळे इथला सर्व कारभार त्यांनाच सांभाळावा लागतो. मुलगा हाताशी असून उपयोग नाही. मुलगीदेखील लग्नाला आली आहे. त्याचे कदाचित त्यांना टेन्शन असू शकेल. नक्की काही सांगता येत नाही.
अनय - का निनाद नाही का सांभाळत कंपनी? गोविंदराव तर त्यांच्या पार्टनर चे खूप कौतुक करत होते.
रमण साहेब - निनाद साहेब खूप हुशार आहेत. ते कंपनी छान सांभाळतात. त्यांच्या खूप महत्त्वाकांक्षा आहेत. कंपनीला लवकरात लवकर टॉप लेवल ला नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण शेवटी स्वतःचा मुलगा आणि पार्टनर यात फरक पडतोच ना?
अनय अजून खोदून विचारू लागतो.
अनय - का? दोघांच्या मध्ये काही मतभेद आहेत का?
रमण साहेब - नाही हो, मतभेद कसले? गोविंदराव तर निनाद साहेबांना मुला सारखेच वागतात. फक्त एक ससा आहे, तर एक कासव आहे. नवीन पिढी आणि जुनी पिढी यात फरक पडणारच. त्यात काही विशेष नाही.
अनय, रमण साहेबांचा निरोप घेऊन निनादकडे जातो.
निनाद देखील अनयचे स्वागत करतो.
निनाद - या, तुमच्याबद्दल खूप ऐकले होते. आज तुम्हाला भेटायचा योग आला.
अनय - मी इथे का आलो आहे, हे गोविंदरावांनी तुम्हाला सांगितले असेलच ना?
निनाद - गोविंद काकांना किती वेळा सांगितले, की थोडा आराम करत जा. हे सर्व अति ताणाचे परिणाम आहेत.
अनय - कसला ताण?
निनाद - एवढी मोठी कंपनी सांभाळायची, म्हणजे ताण तर असणारच ना?
अनय - हो बरोबर म्हणताय. पण मी असं देखील ऐकलं, की त्यांच्या बंगल्यावर भुताटकी सुरु झाली आहे. म्हणजे हे सर्व कामाच्या अतिताणामुळे होत आहे कि भुताटकी मुळे? तुम्हाला काय वाटते?
निनाद - काय गंमत करता काय? तुमच्यासारखा डिटेक्टिव माणूस भुताटकी वर विश्वास कसा ठेवेल?
अनय - तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. परंतु माहिती ऐकताना समोरच्याचे विचार आम्हाला ऐकावेच लागतात. तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कदाचित एखादी गोष्ट अत्यंत फालतू वाटते, परंतु कधीकधी तीच गोष्ट सर्व केस उलगडू शकते.
निनाद - तुमची ही गोष्ट मात्र मला खूप आवडली. तुम्ही समोरच्याच्या विचारांचा मान ठेवता. बरं ते असु द्या. आपण आता मूळ मुद्दयाकडे वळू. मला तरी हे गोविंद काकांच्या मनाचेच खेळ वाटतात.
निनादला धन्यवाद देऊन अनय त्याचा निरोप घेतो.
कंपनीतल्या बाकी काही लोकांकडे देखील अनय चौकशी करतो. त्यानंतर तो त्याच्या ऑफिसमध्ये परत येतो.
इकडे गार्गी चे काम सुरू झालेले असते. तिची मैत्रीण डेली वापरायच्या वस्तू घरोघरी जाऊन विकत असे. गार्गीने तिचे काही प्रॉडक्ट्स विकण्यासाठी स्वतःकडे ठेवून घेतलेले असतात. विक्रीच्या बहाण्याने गार्गी तिला हवी असलेली माहिती समोरच्याकडून बरोबर काढत असे. त्याच बरोबर तिच्या मैत्रिणीच्या प्रोडक्टची विक्रीदेखील होत असे. हि गार्गीची नेहमीची पद्धत होती.
गार्गी, गोविंदरावांच्या राहत्या एरियात पोहोचते. एकेका घरात जाऊन तिथे प्रॉडक्ट विकू लागते. नेहमीप्रमाणे काही गृहिणी दरवाजा बंद करतात, तर काही गृहिणी कौतुकाने प्रॉडक्ट बघू लागतात. डेली वापराच्या वस्तू असल्यामुळे, विक्री चांगली सुरू होते.
माझी मैत्रीण सांगत होती की, या एरियात रात्रीचा भुताखेतांचा वावर सुरू झाला आहे. म्हणून मला इकडे यायला भीतीच वाटत होती. पण काय करणार? घरची गरीब परिस्थिती आहे. त्यामुळे हिंडावे लागते. अशा बाता मारून, ती तिथल्या गृहिणींना इमोशनली वश करू लागते.
गार्गीचा नेम अचूक लागलेला असतो. गोविंदरावांच्या बंगल्यावरील भुताटकिची बातमी त्या एरियात सर्वत्र पसरलेली असते. अशा बातम्या फारच लवकर पसरतात. परंतु गार्गीला नुसत्याच गोष्टी ऐकायला मिळतात. कोणीच प्रत्यक्ष भुताला बघितलेले नसते.
शेवटी गार्गीला यश मिळते. गोविंद रावांच्या बाजूच्या बंगल्यातील एक गृहिणी बोलता-बोलता सांगते की, तिलादेखील भूत दिसले आहे. ती गृहिणी देखील खूप घाबरून गेलेली असते. परंतु तिच्या नवऱ्याचा असल्या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे ती चूप बसून असते. गार्गी अजून थापा मारून तिला आपल्या वश मध्ये करते. त्यामुळे ती गृहिणी आपले मन गार्गी समोर मोकळे करू लागते.
गार्गी - अय्या मॅडम काय डेरिंगबाज आहात तुम्ही? प्रत्यक्ष भुताला बघून देखील तुम्ही अजिबात घाबरलेल्या दिसत नाही?
आपल्या स्तुतीमुळे ती गृहिणी हुरळून जाते आणि मग धीट पणाचा आव आणत तिला सर्व गोष्ट सांगू लागते.
गृहिणी - अगं आमची बेडरूम ची खिडकी गोविंद काकांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूलाच येते. तसा गोविंद काकांच्या बागेचा एरिया खूप मोठा आहे. पण आमच्या इथून काही भाग जवळून दिसतो. आठ दिवसापूर्वी तहान लागली म्हणून मी रात्रीची झोपेतून उठले. पाणी पिऊन अंथरुणावर आडवे पडणार तोच मला तिकडे मशाली फिरताना दिसल्या. माझे मिस्टर एकदा झोपले की ते लगेच उठत नाहीत. त्यामुळे त्यांना हाक मारून देखील काही उपयोग झाला नाही. मला वाटले की काही काम चालू असेल. परंतु एक-दोन दिवसांनी रात्री परत असाच प्रकार घडला. पांढऱ्या आकृत्या देखील नाचताना मला दिसू लागल्या. परंतु हे सर्व प्रकार काही क्षणांपुरतेच घडत असत. पाच मिनिटात सर्व गायब होत असे. त्या रात्री मी घाबरून किंचाळले होते. तसे मी घाबरत नाही, पण असं काही बघितल्यावर भीती वाटणारच ना?
गार्गी - हो काकू, मी असते तर बेशुद्धच पडली असते. मग पुढे काय झाले? अजून पण तुम्हाला रोजच्या रोज भुतं दिसतात?
गृहिणी - नाही गं, त्यानंतर रोज झोपताना मी अंगारा लावून झोपू लागले. त्यामुळे मला शांत झोप लागू लागली. आणि त्यानंतर भुतंखेतं काही दिसली नाही बरं.
गार्गी - मग काकू तुम्ही तो अंगारा बाजूच्या बंगल्यातल्या लोकांना देखील द्या ना. म्हणजे त्यांनादेखील त्रास होणार नाही.
गृहिणी - कसलं काय गं, त्या बाजूच्या बंगल्या मधील काकूंचा आणि त्यांच्या मुलीचा यावर विश्वासच नाही. मला माहित आहे ना, त्या खूप मॉडर्न आहेत. त्यामुळे मी त्या दोघींना काही सांगायला गेले नाही.
गार्गीचा चेहरा आता खुलला होता. जी माहिती हवी होती ती बरोबर मिळाली होती. काकूंचा निरोप घेऊन गार्गी तेथून निघाली. बाहेर आल्यावर लगेचच तिने ही महत्त्वाची बातमी अनय सरांना कॉल करून सांगितली. बातमी ऐकून अनय खूप खुष झाला.
गार्गी च्या पुढे आता दुसरे काम होते. गोविंदरावांच्या बंगल्यातील सर्व लोकांवर नजर ठेवण्याचे. बंगल्याच्या बाजूला एक बस स्टॉप असतो. कोणाला शंका येऊ नये म्हणून गार्गी तेथे जाऊन उभी राहते.
तेथे थांबून गार्गीला कंटाळा येऊ लागतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास विद्या बंगल्यातून बाहेर पडते. ती टू व्हीलर वर असते. गार्गी लगेच सावध होते. गार्गी देखील थोडे अंतर ठेवून टू व्हीलर वरून तिचा पाठलाग करू लागते. एका हॉटेलच्या बाहेर विद्या गाडी पार्क करते आणि हॉटेलमध्ये शिरते. तिच्या पाठोपाठ गार्गी देखील आत शिरते.
एका टेबलावर एक युवक विद्या ची वाट बघत बसलेला असतो. विद्या त्याच्या समोर जाऊन बसते. गार्गी विद्याच्या मागच्या टेबलावर जाऊन बसते.
विद्या - सॉरी संदिप, मला यायला थोडा लेट झाला.
म्हणजे या माणसाचे नाव संदिप आहे तर, गार्गीच्या लक्षात येते. तेवढ्यात एक वेटर ऑर्डर घ्यायला येतो. खरे म्हणजे गार्गीला भूक नसते, तरीपण ती वडा पाव, चहा ची ऑर्डर देते.
त्यानंतर वेटर विद्याच्या टेबलवर जाऊन त्यांची ऑर्डर घेतो.
संदिप - मी सुध्दा पाच मिनिटांपूर्वीच आलो. आज तू खूप छान दिसत आहेस. ड्रेस नवीन शिवलास काय? तसे पण तू काय फॅशन डिझायनर. तू लेटेस्ट ट्रेंड वापरणारच.
विद्या - म्हणजे तू कौतुक माझ्या सौंदर्याचे करतो आहेस कि माझ्या नवीन डिझाईनचे?
संदिप - दोन्हीचे. मुळात तू सुंदर दिसतेसच, त्यात नवीन लूक. म्हणजे दुग्ध शर्करा योग.
विद्या - ए, हे दुग्ध शर्करा वगैरे उदाहरणे तू लहानपणापासूनच देतोस कि कसे?
संदिप - माझ्या वडिलांना, अशा म्हणी किंवा उदाहरणे द्यायची सवय आहे. त्यामुळे मलादेखील अशीच सवय लागली.
तेवढ्यात दोन्ही टेबलवरच्या ऑर्डरनुसार पदार्थ घेऊन वेटर येतो. संदिप आणि विद्या खाताना गप्पा सुरूच ठेवतात. इकडे गार्गी देखील वडा पाव खाऊ लागते.
विद्या - आता कौतुक पुरे कर. तू माझ्या घरी कधी येणार ते सांग.
गार्गी दोघांचे बोलणे नीट ऐकत होती. मोबाईलचा कॅमेरा ऑफ ठेवून तिने हळूच संदीपचा फोटो काढला.
संदिप - तुझ्या घरातील परिस्थिती थोडी निवळू दे. मग मी नक्की येतो.
विद्या (चिडून) - तू मला एकदा खरे खरे सांग, कि तू माझ्याशी लग्न करणार आहेस कि नाही?
संदिप - अगं, चिडू नकोस. मी लवकरच येईन.
संदिप तिला हळू आवाजात काहीतरी समजावत असतो. पण ते गार्गीला नीट ऐकू येत नाही.
त्यानंतर गार्गी ऑफिसमध्ये परतते. घडलेल्या सर्व घटना आणि संदीपचा फोटो ती अनयला दाखवते.
क्रमशः
- हेर - भयामागचे कारण - भाग ३ (शेवटचा भाग )
- रॅगिंग - एक दुष्टचक्र
- कृष्णविवर - भाग १
- कृष्णविवर - भाग २
- कृष्णविवर - भाग ३
- कृष्णविवर - भाग ४ (शेवटचा भाग )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा