Read best Marathi online gudh katha love story free मराठी
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग ३
भाग ३
माला - हो हो, तेच ते.
कुणाल - तू बघितले आहेस का त्यांना?
माला - नाही रे, मला तर या सर्व दंतकथा वाटतात.
कुणाल - माझा सुद्धा अशा सर्व गोष्टींवर विश्वास नाही. पण काही गोष्टी मात्र खऱ्या असतात.
मग तुमच्या गावातील कोणी यक्षांना बघितले आहे का?
माला - छे छे, असे काही अस्तित्वातच नसेल तर कोण काय बघेल?
दोघांचे जेवण पूर्ण होते. पाणी पिऊन थोडावेळ दोघे विश्रांती घेतात. त्यानंतर दोघेही चालायला सुरुवात करतात. कुणाल बरोबर फिरताना मालाला खूप बरे वाटत असते. हाच आपल्याला जीवनसाथी मिळाला तर खूप बरे होईल असे तिला वाटू लागते. पण कुणालच्या मनात काय आहे? याचा ती विचार करू लागते.
माला कोणत्यातरी विचारात गुंग झाली आहे हे कुणालच्या लक्षात येते.
कुणाल - काय ग कसला विचार करतेस?
माला - काही नाही रे, अजून कोणत्या जडीबुटी राहिल्या आहेत त्याचा विचार करत आहे.
कुणाल - आता आपले किती काम बाकी आहे?
माला - का रे माझ्याबरोबर काम करताना कंटाळा आला का?
कुणाल - तसं नाही गं, तुझ्यासारख्या हुशार मुली बरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार?
कुणालच्या या स्तुतीमुळे माला थोडीशी लाजते आणि कुणालच्या नजरेला नजर ती देऊ शकत नाही.
माला (खाली बघत) - अरे जास्त नाही आता थोडेसेच काम बाकी आहे. या सरोवराच्या भागात ज्या जडीबुटी आणि वनस्पती मिळतात त्या बाहेरच्या ठिकाणी मिळणे खूप कठीण आहे. तेवढ्या जडीबुटी, वनस्पती आपण गोळा करू आणि आपण निघू.
कुणाल - हे बघ आपण सावकाश काम करू. काकांनी सांगितलेल्या सर्व जडीबुटी आपण गोळा करू आणि मगच निघू. फक्त संध्याकाळ व्हायच्या आत घरी पोहोचू, कारण घरी तुझे आई बाबा तुझी वाट बघत असतील.
कुणालला आपली एवढी काळजी वाटते हे पाहून मालाला बरे वाटते. दोघेजण जडीबुटी, औषधी वनस्पती गोळा करून आता माघारी फिरतात. या सरोवराच्या परिसरात आल्यापासून, आपल्यावर कोणीतरी टेहळणी करत आहे असे कुणालला सारखे वाटत असते. तो तसे मालाला सांगतो देखील.
माला - हे बघ उगाच माझी मस्करी करू नको. मी आणि माझे बाबा कितीदा तरी या परिसरात येतो. आमच्या नाही कोणी मागे लागले ते?
कुणाल - अगं मी तुझी मस्करी नाही करत, पण या परिसरात नव्याने आल्यामुळे कदाचित मला असे वाटले असेल.
माला - अरे तुला भास झाला असेल.
कुणाल - हे आपले एक प्रकारे पिकनिकच झाले.
दोघेजण बोलत बोलत देवळा पर्यंत येतात. परत देवळात जाऊन दोघेजण दर्शन घेतात. त्यानंतर बाहेर पार्क केलेल्या बाईक वर दोघे जण बसतात. त्यानंतर दोघे जण डॉक्टर काकांच्या बंगल्यावर येतात. डॉक्टर काका दोघांची वाट बघत असतात. डॉक्टर दोघांनाही आत मध्ये बोलावतात.
डॉक्टरांची मिसेस - बसा दोघेजण, दमला असाल खूप. चहा ठेवते तुमच्यासाठी.
कुणाल आणि माला नको नको म्हणत असतात.
पण डॉक्टरांची मिसेस ऐकत नाही. ती चौघां साठी आलं आणि पातीचहा घालून मस्त गरमागरम चहा घेऊन येते.
सर्वजण चहा पितात.
डॉक्टर - काय रे, वाटेत काही त्रास झाला नाही ना?
कुणाल - नाही काका, उलट आम्ही तर एक प्रकारे पिकनिक एन्जॉय केलं. मला या जंगलांची आणि हिमाच्छादित पर्वतांची लहानपणापासूनच ओढ होती. तुमच्यामुळे आणि मालाने मला तिकडे नेल्यामुळे माझा योग जुळुन आला. पुढच्या वेळेस सुद्धा जडिबुटि आणायला मी जाईन.
डॉक्टर - तुमच्या दोघांचे आभार कसे मानू ते मला कळत नाही.
माला - काका, असं बोलून आम्हाला लाजवू नका बरं. आम्ही आता निघतो. संध्याकाळ झाली आहे आई-बाबा माझी वाट बघत असतील.
डॉक्टरांची मिसेस - सावकाश जा गं. अंधार पडलाय.
कुणाल - काकू तुम्ही काळजी करू नका मी तिला घरापर्यंत सोडतो.
डॉक्टर आणि डॉक्टरांच्या मिसेस चा निरोप घेऊन दोघेही निघतात आणि मालाच्या घरी पोहोचतात.
माला - घरात चल ना.
कुणाल - माला, अगं आत्ता नको. मला आता खानावळीत जेवायला जायचे आहे.
माला - अरे, आज आमच्या घरी जेव.
कुणाल - नको परत कधीतरी येईन.
आपली मुलगी वेळेत परतली हे पाहून मुरारी आणि त्यांच्या मिसेसला बरे वाटते. वाटेत काय काय घडले ते माला अत्यंत उत्साहाने सांगत असते. त्यानंतर सर्वजण जेवतात. मालाला आज रात्री झोपेमध्ये, ती कुणाल बरोबर जंगलात फिरत आहे असेच दिसते.
तिकडे कुणाल मात्र एवढे फिरण्याची सवय नसल्यामुळे, खूप दमून गेलेला असतो. जेवण झाल्यावर लगेचच त्याला झोप लागते.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी उठून तो बँकेत जातो. मोहिनी मॅडम आणि गोविंद सरांना तो कालची सुट्टी कशी एन्जॉय केली ते सांगतो. कुणालच्या या कामाचे दोघांनाही कौतुक वाटते.
बँकेच्या कामाला सुरुवात होते. थोड्यावेळाने लंच टाईम होते. लंच टाईम ला माला एक डबा घेऊन बँकेत येते. ती कुणालच्या केबिनमध्ये जाते.
कुणाल - ये माला आत ये. आमच्या बरोबर चल आम्ही आता डबा खायला बसतोय.
माला - अरे मी आत्ताच घरून जेऊन आले आहे. मला भूक नाही. हा डबा घे.
कुणाल - हे ग काय?
माला - मुगाच्या डाळीचे पकोडे आहेत. आत्ताच जेवणासाठी घरी केले होते. आमचे खाउन झाल्यावर तुझ्यासाठी गरम-गरम तळून आणले आहेत मी.
कुणाल - अगं पण आम्ही चौघे जण आहोत एकत्र डबा खायला बसतो.
माला - काळजी करू नकोस. भरपूर पकोडे आणले आहेत.
कुणाल - अगं एवढं कशासाठी? तुम्हाला उगाचच त्रास.
माला - ए, जास्त बोलू नकोस. हा आणलेला डबा निमूटपणे घे.
कुणाल - पण तुला देखील आमच्याबरोबर थोडेसे काहीतरी खावे लागेल. नाही म्हणू नकोस. तुझे जेवण झाले असले तरी आमच्या बरोबर थोडेसे खा, आम्ही जास्त आग्रह करणार नाही.
कुणाल च्या आग्रहामुळे माला त्या सर्वांबरोबर डबा खायला बसते.
सर्वांनाच मुगाच्या डाळीचे पकोडे खूप आवडतात. सर्वजण मालाचे कौतुक करतात. डबा खाऊन झाल्यावर सर्वांचा निरोप घेऊन माला घरी परत जाते.
संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल त्याच्या बंगल्यावर येतो. फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे तो मुरारी काकांच्या डेअरीवर दूध आणण्यासाठी जातो. माला त्याची आतुरतेने वाट बघत असते. थोडावेळ मालाशी बोलून कुणाल रूमवर परत जातो.
रूमवर आल्यावर कुणाल त्याच्या घरी व्हिडिओ कॉल करतो. काल दमलेला असल्यामुळे रात्री फोन करायचा राहून गेलेला असतो. कालची सुट्टी कशी एन्जॉय केली, ते तो त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणीला देखील सांगतो.
आई - कुणाल असा जंगलांतून वगैरे फिरू नकोस बर. इकडे आम्हाला टेन्शन येते.
कुणाल - आई तुला माहिती आहे ना, मला हिमालयात फिरायचे होते. आपला कधीच योग जुळून आला नाही. आता नोकरीनिमित्त मी इकडे आलो आहे तर मला फिरू दे ना. तू काही काळजी करू नकोस. मी सुरक्षितपणे फिरेन. बाबा सांगा ना हो आईला.
बाबा - अग, तू काळजी करू नकोस. कुणाल पण आई म्हणते ते अगदीच खोटं नाही. जंगलातून फिरताना कोणीतरी अनुभवी माणूस बरोबर असू दे. आणि बिनधास्त फिरू नको.
काव्या (कुणालची बहीण हसत बोलते) - अहो बाबा, दादाने तर अनुभवी माणूस बरोबर पटवले आहे. दादा आता जंगलात जाताना मालालाच बरोबर ने. ती खूपच चांगली दिसते रे. ती तुझे काटे काढेल, कुठे दुखलं-खुपलं तर बघेल.
आता तर बहीण आणखीनच हसू लागते.
कुणाल - बाबा, काव्याला सांगा. माला माझी चांगली मैत्रीण आहे.
बाबा - तुम्ही दोघांनी भांडू नका बरं.
त्यानंतर थोडेसे बाकीचे बोलून कुणाल फोन ठेवतो.
आता अधून मधून दुपारच्या वेळेत माला कुणाल साठी बँकेत डबा घेऊन जाऊ लागली.
अजून पुढच्या रविवारी देखील कुणालला आणि मालाला जंगलात जडीबुटी आणायला जावे लागते. यावेळचे काम जास्ती नसते. त्यामुळे सकाळच्या वेळेत दोन तासांतच त्यांचे काम आटोपते. आज देखील कुणाल तिकडले निसर्गसौंदर्य एन्जॉय करतो.
आज मुरारी काका आणि काकूंनी कुणालला दुपारी घरी जेवायला बोलावले असते.
माला आणि कुणाल वेळेतच घरी परततात.
काकू, मुरारी काकांचे आणि कुणालचे जेवणाचे पान वाढतात.
कुणाल - हे काय आम्ही दोघंच जेवणार की काय? तुमच्या दोघींचे जेवणाचे पान का नाही घेतलेत?
काकू - तुम्ही दोघे अगोदर जेवा, त्यानंतर आम्ही दोघी बसतो.
कुणाल - ते काही नाही काकू. तुम्ही दोघींनी देखील आमच्याबरोबरच जेवायचं.
कुणालच्या खूपच आग्रहामुळे काकू आणि माला दोघीजणी जेवायला बसतात.
काकूंनी आजचे जेवण स्पेशल बनवलेले असते. बाकीच्या जेवणाबरोबरच त्यांच्या प्रदेशातील फेमस असे "मखाना मठडी" आणि "अळशी चे लाडू" देखील बनवलेले असतात. कुणालला हे दोन्ही पदार्थ खूपच आवडतात.
मुरारी काका आणि काकू कुणाल शी बोलताना त्याला नेहमी साहेब असे बोलायचे. कुणालला त्यामुळे अवघडल्यासारखे होत असे. माला देखील, मला फक्त कुणाल म्हणूनच हाक मारते. त्यामुळे तुम्ही देखील तसेच म्हणा असे तो त्यांना समजावतो.
काका आणि काकू मात्र सांगतात की, तुम्ही नवीन पिढीतील मुलं. त्यामुळे तुम्हाला ते जमते. परंतु आम्हाला तसे जमणार नाही. तुम्ही मानाने मोठे आहात.
असेच काही दिवस जातात. एकदा शुक्रवारी रात्रीचे जेवण झाल्यावर कुणाल डॉक्टर काकांच्या घरी जातो.
डॉक्टर - काय रे कुणाल चार-पाच दिवसात इकडे फिरकला नाहीस?
कुणाल - काका, बँकेत काम भरपूर होते त्यामुळे घरी आल्यावर दमायला होत असे. आता थोडा रिलॅक्स आहे. गेल्या रविवारी तुम्हाला जडीबुटी नको होत्या, त्यामुळे आम्ही जंगलात गेलो नव्हतो. आता परवाच्या रविवारी तुम्हाला हवे असेल तर आम्ही जंगलात जाऊ.
डॉक्टर - अरे या रविवारी मला जडीबुटी हव्या आहेत. पण आता कसं जमेल ते कळत नाही?
कुणाल - का हो काका, नेहमीप्रमाणे माला आणि मी जाऊ की.
डॉक्टर - अरे मालाला थोडे बरे वाटत नाही आहे.
कुणाल - तिला काय धाड भरली आहे? आज संध्याकाळी दूध आणायला गेलो तेव्हा तर ठणठणीत होती.
डॉक्टर - गेले चार-पाच दिवस तिचे डोके दुखत आहे. मी औषधे दिली आहेत. तात्पुरते तिला बरे वाटते. परंतु डोकेदुखी काही पुर्ण थांबत नाही. आता औषध बदलून दिले आहे. दोन दिवस वाट बघायला सांगितली आहे. जर फरक पडला नाही तर शहरात जाऊन चष्म्याचा नंबर तर आला नाही ना? असे बघायला तिला सांगितले आहे.
कुणाल - पण ती मला काहीच कसे बोलली नाही?
डॉक्टर - तिचे डोके सारखे दुखत नाही मध्येमध्ये दुखते. त्यामुळे ती कदाचित बोलली नसेल.
कुणाल - काका, मग या रविवारी मी एकटाच जातो जंगलातून जडीबुटी आणायला. मी दोन वेळा मालाबरोबर गेलेलो आहे. आता मला जडीबुटींची बऱ्यापैकी माहिती झाली आहे. समजा एखादी जडीबुटी चुकीची आणली तर तुम्ही ओळखालच.
डॉक्टर - आश्चर्यच आहे तुला एवढ्या लवकर सर्व जडीबुटी कशा ओळखू यायला लागल्या?
तेवढ्यात डॉक्टरांची मिसेस तिघांसाठी कॉफी घेऊन येते.
कुणाल - तुमच्या एवढ्या किंवा माला एवढ्या सर्वच्या सर्व जडीबुटी मला काही ओळखता येत नाहीत. हां बस थोडीफार माहिती झाली आहे.
डॉक्टर - तरीसुद्धा तुला लवकर माहिती झाली. पण मी तुला एकट्याला जंगलात पाठवू शकत नाही.
कुणाल - काका तुम्ही चिंता करू नका. मी सुखरूप घरी परत येईन.
कुणालने खूपच आग्रह केल्यामुळे डॉक्टर काका त्याला परवानगी देतात.
बोलता-बोलता तिघांची कॉफी पिऊन होते.
कुणाल - काकू, कॉफी मस्तच झाली होती बरं.
काकू - थँक यु.
त्यानंतर कुणाल घरी परत येतो. रात्र बरीच झाली असल्यामुळे त्याला झोप येते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बँकेतून परतल्यावर कुणाल मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. डेअरीवर काकू असतात. काकूंकडे तो मालाची चौकशी करतो. मालाचे डोके दुखत असल्यामुळे ती घरी झोपून आहे असे काकू त्याला सांगतात. त्यामुळे मालाला भेटायला कुणाला तिच्या घरी जातो. मुरारी काका लंगडत येऊन त्याचे स्वागत करतात.
कुणाल - काय काका पाय बरा आहे ना?
मुरारी काका - हो आता दुखत नाही. अजून साधारण पंधरा दिवसांनी डॉक्टर प्लास्टर काढणार आहेत.
कुणाल - काका, माला कुठे आहे?
मुरारी काका - ती औषध घेऊन बेडवर आडवी पडली आहे. तिचे डोके खूप दुखत आहे. जा भेट तिला.
कुणाल आतल्या रूम मध्ये जाऊन मालाला भेटतो. तिला झोप लागलेली नसते पण ती कण्हत असते. तिची ही अवस्था बघून कोणालला फार वाईट वाटते.
कुणाल - माला, फार डोकं दुखत आहे का ग?
माला - हो रे खूप डोकं दुखत आहे.
कुणाल - तू मला कधी बोलली नाहीस ते?
माला - सारखं डोकं दुखत नव्हतं. आज मात्र खूपच दुखत आहे. औषध घेतले आहे, पण झोप येत नाही आहे. तू आलास ते बरे झाले. काहीतरी बोल ना रे, म्हणजे मला छान वाटेल आणि झोप लागेल. पण तुला वेळ आहे ना रे? माझ्यामुळे तुला उगाचच त्रास.
कुणाल - तू माझी मैत्रीण आहेस ना? मग त्रासाचे काय बोलतेस. तुझ्यासाठी माझ्याजवळ भरपूर वेळ आहे.
कुणाल तिच्याशी थोडावेळ गप्पा मारतो. त्याच्याबरोबर बोलल्यामुळे मालाला बरे वाटते आणि तिला झोप लागते.
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा