Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "इच्छा(शेवटचाभाग७)"

Read share best Marathi katha free "इच्छा(शेवटचाभाग७)"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी

इच्छा - भाग ७ (शेवटचा भाग)

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


केयुरचे  वडील - काय ग? 

अनन्या - केयुर लग्न करत आहे. 

केयुरचे वडील (आनंदाने) - आम्ही वाटच बघत होतो, कि तुम्ही दोघेजण हे स्वतःहून कधी सांगताय? पण काय ग, हे त्याने कॉल करून का नाही आम्हाला सांगितले? लाजतोय कि काय तो? 

अनन्या - काका, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. केयूर माझ्याशी नाही, तर दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय.

केयुरचे  वडील - तुझे आई - वडील, मी आणि माझी मिसेस आम्ही आधीच ठरवलेले होते, कि तुमच्या दोघांचे  लग्न लावून द्यायचे. तुमचे एकमेकांवर प्रेम आहे. फक्त तुम्ही दोघे तसे बोललात नाहीत. 

अनन्या - काका, पण मी तुम्हाला असे सांगितले हे तुम्ही केयुरला बोलू  नका. तुम्ही प्रत्यक्ष इकडे या. ती मुलगी मला चांगली वाटत नाही. गुंतागुंत असल्यामुळे फोनवर काही बोलता येत नाही आहे. 

केयुरचे वडील - लवकरच आम्ही तिकडे येतो. 

रात्रीचे दहा वाजले होते. अनन्या केयुरच्या बंगल्यावर जाऊन येते. पण केयुर अजून आलेला नसतो. तिला केयुरशी महत्वाचे बोलायचे असते. ती परत घरी परतून झोपी जाते.

इकडे केयुर आणि उषा जवळच्या एका बेटावर गेलेली असतात. बेट किनाऱ्यापासून खूप जवळ असते. पर्यटनासाठी दिवसरात्र तेथे पर्यटकांची गर्दी असते. एका  चांगल्या हॉटेलमध्ये दोघेजण जाऊन डिनर करत असतात. केयुर त्याच्या आई - वडिलांना कॉल करतो. दिवसभर कंपनीत वेळ गेल्याने त्याला कॉल करायला वेळ झालेला नसतो. उषा समोरच बसलेली असते. परंतु आई - वडिलांना अनन्याने आधीच कॉल करून कल्पना दिलेली असते. त्यामुळे आई - वडील केयुरचे बोलणे आधी ऐकून घेतात. 

केयुरची आई  -  तू आणि अनन्या दोघांचे लग्न व्हावे अशी आमची तसेच तिच्या आई - वडिलांची इच्छा आहे. अनन्या आणि तुझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. ती खूप चांगली मुलगी आहे. तिला सोडून तू या कोणत्या मुलीच्या फंदात पडलास? या घरची सून होईल तर ती फक्त अनन्याच.  आम्ही २ दिवसांनी तिकडेच येत आहोत. तेव्हा बोलू. तू या मुलीचा नाद सोडून दे.

केयुर मात्र ऐकायला तयार नसतो. आई - वडील त्याला समजावत असतात. शेवटी नंतर बोलू म्हणून रागाने केयुर कॉल कट करतो. 

उषा - काय झाले? 

केयुर - तू बोललीस तसेच झाले. आई - बाबा आपल्या लग्नाला विरोध करत आहेत. त्यांना अनन्या सून म्हणून हवी आहे. 

उषा (काळजीने) - केयुर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. मी तुला सांगत होते ना, कि तुझ्या आई - वडिलांना सांगू नकोस. आपण गुपचूप लग्न करू. 

केयुर - पण मला असे वाटले नव्हते, कि माझे आई - वडील परवानगी नाकारतील. हे बघ ते २ दिवसांनी येत आहेत. ते आले कि मी तुझी आणि त्यांची भेट करून देईन. तुला बघितल्यावर ते आनंदाने लग्नाला परवानगी देतील. 

उषा - नाही, आता माझ्याकडे वेळ नाही. मी थांबू शकत नाही. आपण उद्याच लग्न करू. नंतर तुझ्या आई वडिलांना भेटू. प्लिज माझे म्हणणे मान्य कर. 

केयुर - असं काय करतेस. मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. माझे लग्न थाटात करण्याची त्यांची नक्कीच इच्छा असणार. 

उषा - पाहिजे तर रिसेप्शन मोठया प्रमाणात करू. पण आपण उद्याच लग्न करू. जर आई - वडिलांनी इमोशनली तुला धमकावले आणि तुझा विचार बदलला तर मी काय करू? 

केयुर - मी तुला सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीबरोबर लग्न करणार नाही. खात्री बाळग. 

उषा - तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर तुला उद्याच माझ्याशी लग्न करावे लागेल. नाहीतर मी जीवाचे काहीतरी बरे - वाईट करून घेईन. 

केयुर - तुझा हट्टच आहे तर आपण करू उद्या लग्न. पण आपली लग्नासाठी लागणारी तयारी कुठे झाली आहे. 

उषा - त्याची तू चिंता करू नको. उद्या आपण तालुक्याच्या गावापुढे जे "चिंचली" गाव आहे, तेथे जाऊ. तिथल्या एका भटजींशी मी बोलले आहे. आम्हाला फक्त विवाहविधी पार पाडायचा आहे, असे मी त्यांना सांगितले आहे. ते त्यांच्या घरीसुद्धा सर्व सोय करून विवाह पार पडतात. त्यांच्या घरापुढे चांगला कुडाचा मंडप आहे. (नारळाच्या झाडाला जे झाप येतात, ते झाप विणून कुड तयार करतात. ते आयताकृती असतात. त्याचा उपयोग मंडप, पडवी इ. साठी करतात. ) 

केयुर - हे सर्व तू कधी केलेस?

उषा - आजच जाऊन त्यांना भेटून आले. घरून लग्नाला परवानगी नाही, पण आम्ही सज्ञान आहोत. असे सर्व मी त्यांना सांगितले. आधी ते तयार होत नव्हते, पण तुझे नाव सांगितल्यावर तयार झाले. तू आणि अनन्या दोघेजण या प्लॅन्टचे सर्वेसर्वा असल्यामुळे ते तुला ओळखतात.

केयुर - ठीक आहे, उद्या निघू. मी उद्या कंपनीत येत नसल्याचे अनन्याला कळवतो. बाहेर जात आहे, एवढेच सांगेन. 

उषा - उद्या सकाळी लवकर उठ. तुझे ड्रेस बॅगेत भरून तयार हो. आपण सकाळी ७ वाजता निघू. सकाळचा ११  चा मुहूर्त आहे. 

केयुर आणि उषा घरी परततात. 

रात्रीचा १ वाजतो. अनन्याच्या  बंगल्याची डोअरबेल वाजते. एवढ्या रात्री कोण आले म्हणून अनन्या झोपेतून उठते. आय हॉलमधून बघते, तर बाहेर उषा उभी दिसते. हि आत्ता इथे कशी हा प्रश्न अनन्याला पडतो. घाबरतच ती दार उघडते. दार उघडताच उषा आत येते. दाराची कडी लावून घेते. उषा खूप रागावलेली असते. 

उषा - माझ्याशी मैत्री करून दगा देऊ नकोस. माझ्या आणि केयुरच्यामध्ये  कोणी आल्यास मी कुणालाच सोडणार नाही. उद्या मी आणि केयुर लग्न करणार आहोत. आमच्या मध्ये येऊ नकोस. 

अनन्या (घाबरत) - तू नक्की कोण आहेस ते सांग? तूच उलट माझ्या आणि केयुरच्या मध्ये आलीस. 

उषा - जास्त बोलू नकोस. आमचे लग्न पार पडू दे, मग तुला कळेल. मी मनात आणले तर तुला आत्ता संपवू शकेन. पण मी इतकी दुष्ट नाही. फक्त तुझा तात्पुरता बंदोबस्त मला करावा लागेल.
असे सांगून उषा कसलेतरी भस्म अनन्यावर फ़ुंकरते. त्यामुळे  अनन्या बेशुद्ध होऊन पडते. त्यानंतर उषा निघून जाते. 

बुधवार उजाडतो. केयुर लवकर उठून तयार होतो. आज दुसरे घरगुती काम असल्यामुळे अमोल आणि शोभना लवकरच आलेली असतात.

अमोल - साहेब, आज सकाळीच कुठे?

केयूर - मी आणि उषा आज चिंचलीला जाऊन लग्न करणार आहोत. एक आठवडा बाहेर फिरून नंतर परत येऊ. बंगल्याकडे नीट लक्ष ठेव.

अमोल - अचानक? तयारी वगैरे काही....?

केयुर - जास्त  काही विचारू नकोस. चल, मला लेट  होत आहे.
केयुर उषाला नेण्यासाठी फार्म हाऊसवर पोहोचतो. दोघेही "चिंचलीला" जायला निघतात. त्यापूर्वी केयुर चिंचलीच्या भटजींना कॉल करून तयारी कुठपर्यंत झाली ते विचारतो. भटजी तयारच असतात.

Beautiful nature



"चिंचलीला" दोघेजण साडे आठ पर्यंत पोहोचतात. भटजी त्यांचे स्वागत करतात. दोघांनाही २ वेगवेगळ्या चेंजिंग रूम दिल्या. थोड्याच वेळात दोघेही छानपैकी नटून येतात. केयुरने निळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न घातला होता. उषाने पिवळ्या रंगाचे अत्यंत सुंदर वधूवस्त्र नेसले होते. दोघेजण खूपच सुंदर दिसत होते. भटजींनी लग्न लावायला सुरुवात केली. भटजींच्या मदतीला त्यांच्या घरचे होतेच. एक वेगळाच विवाह सोहळा होता तो. वधू पक्ष, वर पक्ष दोघांकडून कोणीच नसते. मंगलाष्ट्के म्हणायला व अक्षता टाकायला भटजी व त्यांच्या घरातीलच ८ - १० माणसे असतात. सर्व विधी नीट पार पडतात. दुपारचे जेवण होते. जेवणात श्रीखंड असते. भटजींची पत्नी कौतुकाने उषाला व केयुरला नाव घ्यायला सांगते. उषा नाव घेते, पण केयुरला नेटवर सर्च मारून नाव घ्यायला लागते. दोघेही भटजी आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडतात. दोघेही उभयतांना  आशिर्वाद देतात. भटजींच्या  मुलाने केयुरच्या विनंतीवरून केयुर आणि उषाचे वेगवेगळ्या विधींचे फोटो, केयूरच्या मोबाईलमध्ये काढलेले असतात.

नंतर दोघेजण "चिंचलीच्या" बीचवरील एका चांगल्या लॉजमध्ये जातात. तेथे रूम भाड्याने घेतात. आज उषा खूपच खूष असते. 

इकडे अनन्याच्या  बंगल्यावर गोंधळ उडतो. केयुरच्या बंगल्यातील व बागेतील काम आटोपून अमोल व शोभना अनन्याच्या बंगल्यावर सकाळी १० वाजेपर्यंत येतात. बंगल्याला बाहेरून कुलूप नसते. ते पाहून मॅडम आज कामावर गेल्या नसतील, असे दोघांना वाटते. शोभना बंगल्याची डोअरबेल वाजवते. २ - ३ वेळा डोअरबेल वाजवूनदेखील दार न उघडल्यामुळे दोघेजण काळजीत पडतात. हाक मारून, मोबाईलवर कॉल करून बघतात. पण उपयोग शून्य. शेवटी अमोल, जोशी काकांना कॉल करुन बोलावतो. जोशी काका, काकु व आसपासचे लोक गोळा होतात. जोशी काका, पराग व  प्राचीला कॉल करून अनन्या व केयुर कंपनीत आहेत का ते विचारतात. आज दोघेजण कंपनीत आलेले नाहित, असे त्यांना कळते. 

अमोल - केयुर साहेब तर आज सकाळीच "चिंचली" गावात लग्न करायला गेलेत. ते आणि उषा मॅडम लग्न करणार आहेत. 

जोशी काका - हे असे कुणालाच न सांगता, केयुर साहेब कसे लग्न करू शकतात. आधी आपण अनन्या मॅडमना काय झाले ते पाहू. अमोल तू मागच्या गॅलरीत जाऊन खिडकीत हात घाल. आतुन कडी निघते का ते बघ. 

जोशी काकांनी सांगितल्याप्रमाणे अमोल बंगल्यात प्रवेश मिळवतो. त्यानंतर तो बंगल्याच्या मुख्य दाराची कडी काढतो. सर्वजण आत जातात. अनन्या बेडवर बेशुद्ध पडलेली असते. जोशी काकू तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. पण ती काही शुद्धीवर येत नाही. शेवटी तिला गावातील एका हॉस्पिटलमध्ये नेतात. ती कशामुळे बेशुद्ध पडली आहे, ते डॉक्टरांना कळत नाही. परंतु ते उपाय चालू करतात. थोड्याच वेळात अनन्या शुद्धीवर येते. जोशी काका आणि काकू तेथेच असतात. पराग, प्राची आणि कंपनीतील हाताखालचे काही अधिकारीदेखील तिची विचारपूस करायला आलेले असतात. ती काळजीने जोशी काकांना विचारू लागते, केयुर कुठे आहे? तेवढ्यात अमोल तिला सकाळचा वृत्तांत सांगतो. अनन्या रात्री घडलेला प्रकार सगळ्यांना सांगते. तब्येतीमध्ये काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे काळजी घ्यायला सांगून डॉक्टर तिला सोडतात. केयुरला कॉल करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. परंतु तो नॉट रिचेबल येतो. जोशी काकांना सांगून अनन्या केयुरकडे जायला निघते. संध्यकाळ झाल्यामुळे तिला सोबत म्हणून पराग आणि प्राची निघतात.परागची फोर व्हीलर घेऊन ते "चिंचलीला" निघतात. 

संध्याकाळी उषा आणि केयुर लॉजच्या बाहेर बीचवर येऊन बसतात.
केयुर - आज तू वधू वस्त्रात खूप सुंदर दिसत होतीस.

उषा (डोळ्यात पाणी येऊन) - तू माझ्यावर खूप प्रेम करतोस का रे?

केयुर - हे काय विचारणे झाले? माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. 

उषा - एवढा जीव नको लावूस केयुर. मी जर हे जग सोडून गेले तर काय करशील?

केयुर - आजच्या या शुभ दिवशी हे काय अशुभ बोलत आहेस? 

उषा (डोळे पुसत) - नाही रे मन भरून आलं.

संध्याकाळी बीचवर दोघांचा वेळ कुठेच निघून जातो. रात्री डिनर घेऊन दोघेजण लॉजच्या रूमवर येतात. रात्रीचे साधारण दहा वाजलेले असतात. उषाला अस्वस्थ वाटायला लागते. केयुरला तिची काळजी वाटायला लागते. 

केयुर - उषा, तुला काय होत आहे? 

उषा - केयुर, मी आता चालले रे. 

केयुर - कुठे? 

उषा - तुला सोडून लांब चालले. 

हि अशी काय बोलते आहे आणि हिला काय होत आहे या काळजीने केयुरला रडू कोसळते. तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजतो. कुणाची तरी मदत मिळेल म्हणून केयुर पटकन दरवाजा उघडतो. अनन्या, प्राची  आणि पराग पटकन आत येतात आणि दरवाजा लागतो.

केयुर - अनन्या, बघ ना उषा कसे करत आहे. 

उषाची हि अवस्था बघून अनन्या बघतच बसते. तिने काल रात्री अनन्यावर  हल्ला केला असला तरी तिचा जीव घेतलेला नसतो. ती अनन्याला मैत्रीण मानत असते. तिची अवस्था बघून अनन्या राग विसरते. 

उषा - अनन्या, बरे झाले तू वेळेवर आलीस. आता तू केयुरला सांभाळ. माझी निघायची वेळ जवळ आली.

अनन्या - उषा, तू नक्की कोण आहेस? तू आमच्याशी अशी का वागत आहेस? तुला बरे वाटत नसेल तर आम्ही आत्ता तुला              हॉस्पिटलला  नेतो. काय झाले सांग तरी. 

उषा - सर्वांनी ऐका. न घाबरता मन घट्ट करून ऐका. 
माझे नाव उषाच आहे. मी माझ्या वडिलांबरीबर "नागलोलीला" रहात होते. माझी आई लहानपणीच वारली. म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केले. प्राची, तुझी आई ती माझी सावत्र बहीण. पण आमच्यात सावत्रपणा नव्हताच. माझ्या सावत्र आईने मला चांगले सांभाळले. पुढे मी शहरात जाऊन १९७० साली आर्किटेक्ट झाले. तिथेच माझे माझ्या वर्गातील एका मुलावर प्रेम बसले. शिक्षण पूर्ण होताच आम्ही दोघांनी काम सुरु केले. काही दिवसांनी आम्ही आमच्या घरी सर्व सांगितले. माझ्या घरून लग्नाला परवानगी मिळाली. पण त्या मुलाच्या आई वडिलांनी दुसरे श्रीमंत स्थळ बघून ठेवले होते. त्यामुळे आमचे लग्न होऊ शकले नाही. मी खूप दुःखी झाले. माझ्या वडिलांनी मला परत गावाला आणले. तोपर्यंत गावात सर्व बातमी पसरली होती. तो जुना काळ  होता. लोकांनी मला नावे ठेवायला सुरुवात केली. मी मनाने खचले होते. त्यातच एक दिवस कळले कि त्या मुलाचे लग्न झाले. मी ते दुःख पचवू शकले नाही. एक दिवशी सकाळी मी आपल्या गावातील नदीत जीव दिला. वाटले जीव दिला कि सर्व दुःख संपेल. पण नाही. मला मुक्ती मिळाली नाही. उलट अजूनच त्रास वाढला. मी ज्या तिथीला जीव दिला त्या प्रत्येक तिथीला मला त्याच प्रसंगाला सामोरे जावे लागे, जेव्हा मी जीव दिला. बुडून गुदमरून मरतानाच्या सर्व यातना दरवेळी होऊ लागल्या. शेवटी मी आमच्या कुटुंबाच्या आध्यत्मिक मार्गदर्शकांकडे गेले. त्यांची मदत मागितली.
 
गुरुजी  - देवाने जन्माला घातले तो देह असा संपवण्याचा अधिकार आपल्याला नाही. तू आत्महत्या केलीस त्यामुळे तुझी अशी गत झाली आहे. 

मी - माझी चूक झाली. मला मुक्ती द्या. 

गुरुजी  - या परिस्थितीतून मुक्ती देण्याइतके माझे सामर्थ्य नाही. 

मी - गुरुजी, काहीतरी करा. जे काही जीवन जगले त्यात देवाची भक्ती केली, कुणाला त्रास दिला नाही. मला यातून सोडवा.

गुरुजी - मी काही गोष्टी करू शकतो. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे इतर भुतांसारखी तुझी अवस्था होणार नाही. तहान भूक तुला लागणार नाही. मी एक हवन करतो. दर महिन्याला तुला येणारा मृत्यूचा अनुभव माझ्या हवनामुळे १ वर्षाने येईल. पण बरीच वर्षे तुझी यातून सुटका नाही. पण जर या मृत्यूच्या अनुभवाचेवेळी, कोण्या व्यक्तीने तुला पाण्यातून बाहेर काढले, तर या यातनांमधून तुझी सुटका होईल. त्यानंतर  जर तुला खरे प्रेम मिळून तुझी लग्नाची इच्छा पूर्ण झाली तर तू या अवस्थेतूनदेखील मुक्त होशील.

त्या दिवशी बुडताना केयूरने मला वाचवले आणि दरवर्षी होणाऱ्या त्या यातनांतून मी मुक्त झाले. मला वाचवल्यामुळे माझे केयुरवर प्रेम बसले. आता आमचे लग्न झाल्यामुळे या अवस्थेतूनदेखील  मी मुक्त होत आहे. 

केयुर (रडत)  - उषा तू मला सोडून जाऊ नकोस. 

उषा - अरे वेड्या, मी गेले तरी दुःखी होऊ नकोस. तू आणि अनन्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. फक्त तुमच्या दोघांच्यामध्ये मी आले. मला माफ करा. आता तू आणि अनन्या लग्न करा आणि सुखी व्हा. 
प्राची तू देखील माझ्यासारखीच दिसतेस ग. माझ्या बहिणीची मुलगी बघून बरे वाटले. तुम्ही दोघंनीदेखील छान संसार करा. 

उषाने केयुरचा हात हातात घेतला. केयुरनेदेखील रडत रडत तिचा हात घट्ट धरून ठेवला. 

उषा - आपले काहीतरी ऋणानुबंध होते. म्हणून आपली भेट झाली. या जन्मी आपण संसार करू शकलो नाही. पण विधात्याच्या मनात असल्यास पुढच्या कुठल्यातरी जन्मी आपण भेटु आणि सुखाचा संसार करू. काळजी घ्या सर्वांनी. 

आता केयुरच्या हाताला तिचा होत असलेला स्पर्श विरळ होत गेला. ती बघता बघता नाहीशी झाली. या अवस्थेतून मुक्त झाली.

हा धक्का सहन न होऊन केयुर बेशुद्ध पडला. त्याला तातडीने तालुक्याच्या गावी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. रातोरात केयूर व अनन्याच्या  आई - वडिलांना बोलावले. अनन्या रात्रभर केयुरच्या उशाशी बसून देवाचे नाव घेत होती.सकाळी तो शुद्धीवर आला. अनन्या रात्रभर त्याच्या उशाशी बसून होती हे त्याला कळले. दोघांचे आई - वडील आले होते. झालेला प्रकार पराग आणि प्राचीने त्यांना सांगितला होता. त्यांचा विश्वासच बसत नव्हता. 

केयुर - अनन्या, तू झोपली नाहीस? 

अनन्या - तुला अशा अवस्थेत सोडून कशी झोप लागेल?

केयुर - किती मूर्ख आहे मी. एकमेकांबद्दल असणारे प्रेम माझ्या लक्षात आले नाही.

अनन्या - उषा तुझ्या आयुष्यात आली नसती तर मला देखील प्रेमाची जाणीव झाली नसती. 

केयुर - मला माफ कर. मी आपल्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम ओळखू शकलो नाही. माझ्याशी लग्न करशील? 

अनन्या (गंमतीने) - मी बिजवराशी लग्न नाही करणार.

दोघांचे आई - वडील सांगतात कि आम्ही हे आधीच ओळखले होते. आता तयारीला लागावे लागेल. एका चांगल्या मुहूर्तावर दोघांचे लग्न लावले गेले.

समाप्त


या ब्लॉगवरील पुढील कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

४ टिप्पण्या:

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...