मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग ६ (शेवटचा भाग)
भाग ६ (शेवटचा भाग)
साधू खुणेनेच त्याला गुहेच्या आत मध्ये जाण्यास सांगतो.
कुणाल गुहेमध्ये शिरतो. तेथील परिसर अत्यंत पवित्र वाटत असतो. एक दिव्य गंध तेथे दरवळत असतो. गुहेच्या आत मध्ये ठिक-ठिकाणी मशाली पेटवलेल्या असतात. गुहा खूप मोठी असते. थोडे पुढे गेल्यावर कुणालला एका मोठ्या शिळेवर एक तेजःपुंज साधु बसलेले दिसतात. ते ध्यानस्थ असतात. कुणाल तेथे पोहोचल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते त्याला हाक मारतात.
साधु - ये कुणाल, बस त्या समोरच्या शिळेवर.
कुणाल त्या साधु बाबांना नमस्कार करतो आणि शिळेवर बसतो.
कुणाल - तुम्ही मला कसे ओळखता?
साधु - आपली काय फक्त याच जन्मातील ओळख आहे का?
कुणाल - मला समजले नाही, तुम्ही काय म्हणता ते.
साधु (हसत) - आपली आधीच्या जन्मापासूनची ओळख आहे. तू माझा शिष्य आहेस. त्यामुळेच मी तुला इकडे बोलावून घेतले.
कुणाल - म्हणजे पुर्वा जे काही म्हणत होती, तसेच तर तुम्हाला काही म्हणायचे नाही ना?
साधु - ती बरोबरच सांगत होती.
कुणाल - मग मला काहीच कसे आठवत नाही.
साधु - मृत्यूनंतर परत परत जन्म होत असतो, परंतु सर्वांनाच काही आधीच्या जन्मातले आठवत नाही. खूपच थोड्या लोकांना पूर्वजन्म आठवू शकतो.
कुणाल - महाराज, मी आता काय करू.
साधु - मी तुला मागील जन्मताच सांगितले होते, की मायेमध्ये फसू नकोस. मागच्या जन्मात तुझी ध्यान - साधना व्यवस्थित चालू होती. परंतु तू तेव्हा पुर्वाच्या प्रेमामध्ये फसलास. नाहीतर गेल्या जन्मातच मृत्यूनंतर तुला मुक्ती मिळाली असती. परंतु गेल्या जन्मात अधुऱ्या राहिलेल्या प्रेमामुळे आणि इतर कर्मामुळे हा जन्म धरून तुला एकूण दोन जन्म घ्यावे लागतील. शिवाय ध्यानसाधना व्यवस्थित चालू ठेवावी लागेल. या दोन जन्मामध्ये जर काही अडचण आली नाही, तर तू मोक्ष पदाला पोहोचू शकतोस.
कुणाल - मुक्ती मोक्ष वगैरे प्रकार मी कधीकधी प्रवचनांमधून ऐकले आहेत. परंतु याबद्दल मला काही माहिती नाही. ध्यान कसे धरावे ते मला काही माहीत नाही. तुम्ही रागावणार नसलात आणि गैरसमज करून घेणार नसलात तर मला एक प्रश्न विचारायचा आहे.
साधु - विचार. मनात काही ठेऊ नकोस.
कुणाल - लोक म्हणतात ते सिद्ध बाबा तुम्हीच का? मी असे ऐकले आहे की तुमचे वय पाचशे वर्षांहून अधिक असेल. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही माझे गुरु आहात. तर मग तुम्हाला अजून मुक्ती वगैरे कशी मिळाली नाही?
साधु (स्मित हास्य करून) - प्रश्न विचारण्याचा तुझा स्वभाव अजून बदललेला नाही. मागच्या जन्मात देखील असेच प्रश्न विचारून मला तू भंडावून सोडायचास. अरे आम्ही कधीच मुक्त झालेले असतो. परंतु जनकल्याणासाठी आम्हाला येथे पृथ्वीतलावर वास्तव्य करावे लागते. लोक म्हणतात तो सिद्ध बाबा मीच बरं. तुला गेल्या जन्मातील काही आठवत नसेल तरी काहीच हरकत नाही. मी तुला परत ध्यानसाधना शिकवतो. पण त्याआधी फलाहार करून घे. कारण आता जेवणाची वेळ झाली आहे.
तेवढ्यात साधू महाराजांचा एक शिष्य फळे आणि कंदमुळे घेऊन येतो. बाकीचे शिष्य देखील तेथे गोळा होतात. मगाशी कुणालला घेऊन आलेला शिष्य देखील त्यामध्ये असतो. सर्वजण फळे आणि कंदमुळे खातात. त्यानंतर सर्व शिष्य गुहेमधून बाहेर जातात.
आता सिद्ध बाबा, कुणालला मुक्ती म्हणजे काय, ध्यान धारणा कशी करावी वगैरे सर्व गोष्टी समजावून सांगू लागतात. या सर्व उपदेशामुळे कुणालला संसाराबद्दल विरक्ती वाटू लागते. तसे तो सिद्ध बाबांना सांगतो देखील.
सिद्ध (साधु) बाबा - अरे ही विरक्ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तुला या जन्मी आणि पुढच्या जन्मी संसार हा करावाच लागेल. संसार करता करता ध्यानसाधना चालू ठेव. ध्यान साधनेमुळे तुला ज्ञानप्राप्ती होईल आणि तू मोक्ष पदाला पोहोचशील. आता रात्र बरीच झालेली आहे. त्यामुळे थोडावेळ ध्यानधारणा करून या गुहेमध्येच तू झोप. उद्या सकाळी उठून तू तुझ्या घरी जा.
त्यानुसार कुणाल ध्यानधारणा करतो. बराच वेळ त्याचे ध्यान लागते. त्यानंतर त्याला शांत झोप लागते. सकाळी लवकर उठून कुणाल सिद्ध बाबांना नमस्कार करतो आणि त्याच्या रूमवर परततो.
आज संध्याकाळी बँक सुटल्यावर कुणाल, मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. मुरारी काका टेन्शनमध्ये दिसत असतात.
कुणाल - काका, माला कशी आहे. काल तिचा मोबाईल कव्हरेजच्या बाहेर होता आणि मलादेखील इकडे यायला जमले नाही.
मुरारी काका (रडत) - साहेब काय सांगू तुम्हाला? मालाला ब्रेन ट्युमर झालेला आहे.
हे ऐकून कुणालला धक्का बसतो.
कुणाल - काका, सांगताय तरी काय? माला कुठे आहे?
मुरारी काका - काल संध्याकाळीच ती शहरातून इकडे आली. तिकडे हॉस्पिटल मध्ये तिच्या सर्व टेस्ट झाल्या. त्यावरून डॉक्टरांना हे असे कळले. डॉक्टरांनी औषधे दिली आहेत. काही दिवसांनी ऑपरेशन करू असे ते म्हणाले आहेत. परंतु ऑपरेशनचा कितपत उपयोग होईल याची त्यांना खात्री नाही.
कुणाल - काका, मी मालाला जाऊन भेटतो.
मुरारी काका - जा भेट. तिला थोडं बरं वाटेल.
कुणाल मालाच्या घरी जातो. घरामध्ये काकू आणि माला दोघीजणी असतात. दोघीजणी उदास बसलेल्या असतात. कुणालला बघून माला रडू लागते.
कुणाल (समजावत) - माला अग रडू नकोस, तुला बरे वाटेल. आता सायन्स किती पुढे गेले आहे, तुला माहिती आहे ना? तुझे ऑपरेशन नक्की यशस्वी होईल.
माला - कुणाल, मला नक्की बरे वाटेल ना रे. मी आयुष्याची कितीतरी सुंदर स्वप्ने बघितली आहेत.
कुणाल - काळजी करू नकोस. तुला नक्की बरे वाटेल.
कुणाल थोडा वेळ तिथेच बसतो आणि दोघींशी गप्पा मारतो. कुणालच्या येण्यामुळे वातावरणात थोडा बदल होतो आणि दोघींना थोडे बरे वाटते. काकू जेवणाचा आग्रह करतात. त्यामुळे तेथेच जेऊन कुणाल घरी परततो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे गुरुवारी कुणालला बँक हॉलिडे असतो. त्यामुळे एकीकडे गुरुवारी पुर्वाला भेटण्याची ओढ मनाला लागलेली असते, तर दुसरीकडे आपल्या प्रिय मैत्रिणीची ही अवस्था बघून मनाला दुःख देखील होत असते. त्यामुळे मनःशांतीसाठी कुणाल थोडावेळ ध्यानधारणा करतो.
गुरुवार उजाडतो. कुणाल लवकर आटोपून तयार होतो. पुर्वाला भेटण्याच्या ओढीमुळे कुणाल लवकरच घरातून बाहेर पडतो आणि चालतच सरोवराच्या दिशेने निघतो. नदी ओलांडून नेहमीप्रमाणे तो देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. देवळातून बाहेर पडल्यावर त्याला समोर पुर्वा दिसते. ती त्याच पांढऱ्या घोड्यावर बसून आलेली असते.
पुर्वा - कुणाल, चल आपण त्या सरोवरावर जाऊन बोलू.
पुर्वा कुणालला घोड्यावर बसवून सरोवराच्या दिशेने जाते.
इकडे त्याच देवळात माला दर्शनासाठी आलेली असते. ती एका दरवाजातून देवळात प्रवेश करते आणि देवाचे दर्शन घेते. तोपर्यंत दुसऱ्या दरवाजातून कुणाल बाहेर पडतो. माला देवाचे दर्शन घेऊन, पाठीमागे वळते तेव्हा तिला कुणाल देवळाच्या बाहेर पडलेला दिसतो. त्याच बरोबर पुर्वा देखील दिसते.
कुणाल बरोबर ही सुंदर मुलगी कोण आहे? ही आपल्या गावातील तर नक्कीच नाही - मालाच्या मनात विचार चालू होतात.
माला कुणालला हाक मारणार, तेवढ्यात कुणाल पूर्वा बरोबर घोड्यावर बसून सरोवराच्या दिशेने जातो.
माझे तर कुणालवर प्रेम आहे. परंतु कुणालच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी माला त्या दोघांचा पाठलाग करू लागते. परंतु पुर्वा आणि कुणाल दोघे जण घोड्यावर असतात. माला चालत असते. अर्थातच त्यामुळे ती भरपूर मागे पडते.
इकडे पुर्वा आणि कुणाल दोघेजण सरोवरावर पोहोचतात. एका झाडाखाली बसून दोघेजण बोलू लागतात.
पुर्वा - मला तर वाटले होते तू आज येणारच नाहीस. कारण रविवारी मी तुला जे काही सांगितले त्यामुळे तुझा गैरसमज होण्याची शक्यता जास्त होती. परंतु तुझ्या वरील प्रेमामुळे मी त्या देवळापर्यंत आले आणि तुझी वाट बघू लागले. तेवढ्यात तू देवळातून दर्शन घेऊन बाहेर आलास. त्यामुळे मला खूपच आनंद झाला.
कुणाल - हे बघ, तु जे काही सांगितलेस त्यातील मला काहीही आठवत नाही. तू खरोखरच यक्षकन्या आहेस, की कोण आहेस ते मला माहिती नाही. परंतु तुझ्यावरील प्रेमामुळे मी इथपर्यंत आलो आहे. जर तू माझ्याशी लग्न करायला तयार असशील तर आजच मी माझ्या आई-वडिलांना तुझ्याबद्दल सांगतो.
पुर्वा - आईवडिलांना माझ्या बद्दल काय सांगशील? असे सांगशील कि मी एक यक्षकन्या आहे?
कुणाल - तू बाजूच्या गावात राहतेस असे मी घरी सांगेन. लग्नानंतर एकदा सर्व खरे सांगेन.
पुर्वा - आपले लग्न होणे कठीण आहे.
कुणाल - का? असे नकारात्मक का बोलतेस?
पुर्वा - माझ्या काकांपासून तुला धोका आहे.
कुणाल - का?
पुर्वा - त्यासाठी मला, आपल्या गतजन्मातील कहाणी तुला सांगावी लागेल.
साधारण दोनशे वर्षांपूर्वी मी या सरोवरावर नेहमीप्रमाणे आले होते. आमच्या इथे एक उत्सव असल्यामुळे मी बरेचसे सोन्याचे दागिने घातलेले होते. त्याच वेळी शहरातील दोन माणसे येथे आली होती. मला साधारण तरुणी समजून त्यांनी मला पकडायचा प्रयत्न केला. त्या माणसांना इजा पोहोचावी असा माझा हेतू नव्हता. माझ्या दिव्य शक्ती वापरून मी तेथून गायब झाले. थोड्यावेळाने ती दोन्ही माणसे निघून गेल्याचा अंदाज आल्यामुळे मी परत सरोवरावर फिरू लागले. परंतु ती दोन्ही माणसे गेलेली नव्हती. ते दोघे जण मलाच शोधत होते. मी बेसावध आहे असे बघून, त्यातील एका माणसाने माझ्या पायावर बंदुकीची गोळी मारली. मी वेदनेने किंचाळून खाली पडले. त्या वेदनेमुळे मला चक्कर येऊ लागली.
पण तेवढ्यात तू म्हणजे त्या जन्मीचा "अपुर्व" पुढे आलास. तू जडीबुटी गोळा करण्यासाठी जंगलात आला होतास. माझ्या किंचाळण्यामुळे तू आवाजाच्या दिशेने आलास. त्या दोन माणसांना काही कळायच्या आत, त्यांच्या बंदुका तू हिसकावून घेतल्यास आणि त्यांना पळवून लावलेस.
त्यानंतर तू माझ्या पायात घुसलेली गोळी काढलीस आणि झाडपाल्याचा लेप माझ्या पायाला लावलास. त्यानंतर आपल्या भेटीगाठी वाढत गेल्या. आपले एकमेकांवर प्रेम बसले. परंतु मी यक्षकन्या असल्यामुळे माझ्या मोठ्या काकांचा या लग्नाला विरोध होता. मनुष्यांबद्दल त्यांच्या मनात राग आहे. त्यामुळे एक दिवस विषारी बाण मारून त्यांनी तुला मारून टाकले. मी खूप रडले. एक दिवस सिद्ध बाबा (म्हणजे तुझे मागच्या जन्मीचे गुरु) भेटले. काही वर्षांनी अपुर्वचा पुनर्जन्म होईल आणि तो तुला भेटेल असे सिद्ध बाबांनी मला सांगितले. त्या आशेवर तुझी वाट पहात मी राहिले.
कुणाल - तू यक्ष कन्या आहेस आणि तुझ्याकडे काही दिव्य शक्ती आहेत यावर आता माझा हळूहळू विश्वास बसू लागला आहे. त्या दिवशी जेव्हा मला नागाने दंश केला तेव्हा या सरोवरावरून तू मला दुसऱ्या एका झऱ्यापर्यंत नेलेस. एकट्या-दुकट्या मुलीला ते शक्य नव्हते. तेव्हा तिथे दुसरे तर कोणीच नव्हते. मग तेव्हा तू मला कसे नेलेस? तसेच जडीबुटी च्या साह्याने तू माझा प्राण वाचवलास.
त्यादिवशी तू मला काही क्षणांतच फळे आणून दिलीस. दुसऱ्या वेळेस जेव्हा मी येथे आलो तेव्हा तू माझ्यासाठी दहा मिनिटांतच सुग्रास जेवणाने भरलेली २ चांदीची ताटे घेऊन आलीस. इथे जवळपास तर कुणाची वस्ती दिसत नाही. तरी देखील इतक्या लवकर तू ते पदार्थ कसे घेऊन आलीस. तसेच तुझ्याकडे बघितल्यावर दिव्यत्वाचा भास होतो.
या सर्व गोष्टी माझ्या अगोदर ध्यानात आल्या नाहीत. अजून देखील मला काही आठवत नसले, तरी आता काही गोष्टी मला समजू लागल्या आहेत. तुझ्याकडे खरोखरच काही दिव्य शक्ती आहेत हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे.
पुर्वा - जन्ममृत्यू माझ्या हातात नाही. ते देवाच्या हातात आहे. देवाची इच्छा होती म्हणून तू यावेळी नागाच्या त्या विषारी दंशापासून देखील वाचलास. मी फक्त निमित्तमात्र झाले. नाहीतर गेल्या जन्मात मी तुला मरू दिले असते का? तेव्हा तो विषारी बाण तुझ्या हृदयात आरपार घुसला होता. त्यामुळे तेव्हा मी तुला वाचवू शकले नाही.
कुणाल - माझे हे खरंच भाग्यच आहे, की तुझ्या सारखी सुंदर आणि दिव्य पत्नी मला लाभणार आहे.
पुर्वा - तू साधारण मनुष्य असतास तर आपले कुठल्याच जन्मात प्रेम शक्य नव्हते. मला सिद्ध बाबांकडून नंतर समजले की ध्यान साधनेमुळे मागच्या जन्मातच तू दिव्यत्वाला पोहोचला होतास. तेव्हादेखील तु साधारण मनुष्य राहिला नव्हतास. त्यामुळे हा आपला विवाह शक्य होता. परंतु माझ्या काकाला हे समजत नव्हते. माझ्या प्रेमात पडल्यामुळे तू मायेमध्ये फसत गेलास.
एवढ्यात बाजूच्या झाडीमध्ये कोणीतरी वावरत असल्याचा भास कुणाल आणि पुर्वाला झाला.
पुर्वा - कुणाल सावध रहा. माझा काका बहुतेक परत तुझा घात करण्यासाठी आलेला आहे.
तेवढ्यात एक बाण झाडीमधून सुटतो. तो बाण कुणालच्या दिशेने येऊ लागतो. अचानक एका मुलीची आर्त किंकाळी आसमंतात घुमते. बाण मालाला लागलेला असतो.
कुणाल (चिडून) - एका निष्पाप मुलीचा जीव घेऊन कुणाला काय मिळाले? कोण आहे त्याने पुढे यावे. माझ्या प्रिय मैत्रिणीचा जीव घेणाऱ्या त्या पापी व्यक्तीला मी सोडणार नाही.
एवढ्यात तिथे एक दिव्य पुरुष प्रकट होतो. त्याच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वहात असतात.
पुर्वा (चिडून) - काका मनुष्यांवरील तुमच्या रागामुळे आज एका निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे. आता यावेळी जर माझा आणि कुणालचा म्हणजेच अपुर्वचा विवाह झाला नाही तर मी या जगात अजिबात राहणार नाही.
पुर्वाचे काका - मनुष्या वरील रागामुळे मी आज खूप मोठे पापकर्म केले आहे. मी या मुलाला मारू इच्छित होतो. कारण आज पर्यंत मला वाटत होते की मनुष्य हा दुष्टच असतो. तो प्रेम करूच शकत नाही.
परंतु या मुलीने मध्ये येऊन हे सिद्ध केले की मनुष्यामध्ये अजून देखील प्रेम शिल्लक आहे. आपल्या माणसांसाठी मनुष्य स्वतःचा जीव देखील धोक्यात घालू शकतो. मानवांमध्ये अशा व्यक्ती देखील अजून शिल्लक आहेत. याच तर दिव्य व्यक्ती आहेत. मी चुकलो. मला माफ करा. पुर्वा मागच्यावेळी त्या मुलाला मारून मी किती मोठे पाप केले, हे आता मला जाणवू लागले आहे.
कुणाल रडत रडत मालाच्या जवळ जाऊन बसतो.
कुणाल - माला, तुझे प्रेम मला समजलेच नाही ग. मला माफ कर. माझ्यासाठी तू का तुझा प्राण दिलास?
आणि तू येथे कशी काय आलीस?
माला (धाप टाकत) - कुणाल, तुझ्या बरोबर संसार करण्याची मी खूप स्वप्न पाहिली होती रे. परंतु नंतर मला ब्रेन ट्यूमर झाल्याचे कळले. त्यामुळे आता आपले स्वप्न पूर्ण होणार नाही हे मला कळून चुकले. त्या कठीण परिस्थितीत देखील तू मला धीर देत होतास.
मगाशी देवाचे दर्शन घेण्यासाठी मी नदी पलीकडच्या देवळात आले होते. देवाचे दर्शन घेऊन बाहेर बघितले. तेव्हा तू देवळाच्या बाहेर पडलेला होतास. तुझ्याबरोबर एक तरुणी होती. तुम्ही दोघे जण घोड्यावर बसून इकडे निघुन आलात. तुझ्या मनात नक्की काय आहे हे मला समजून घ्यायचे होते. त्यामुळे मी तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आले. चालत आल्यामुळे माझा थोडा वेळ गेला. मी तुमचे दोघांचे बोलणे ऐकले.
मी अशी पण ब्रेन ट्यूमर मुळे मरणारच होते. पण मृत्यूपूर्वी मी तुझ्या कामी आले याचा मला आनंद वाटत आहे.
कुणाल, तुझे भाग्य थोर आहे. त्यामुळे पुर्वा सारखी सुंदर यक्ष कन्या तुला पत्नी म्हणून मिळत आहे.
कुणाल - माला, मी तुला काही होऊ देणार नाही. पूर्वा हिला वाचव गं. नाहीतर तुझा तो घोडा बोलव. आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.
तोपर्यंत पुर्वा बाजूचा झाडपाला घेऊन तेथे हजर होते. मालाच्या पोटात रुतलेला बाण ती बाहेर काढते. तेथे झाडपाला लावते.
माला - पुर्वा, याचा आता काही उपयोग नाही आहे गं. माझा प्राण आता चालला. फक्त एकच इच्छा आहे. कुणाल या जन्मी आपला संसार होऊ शकला नाही. निदान पुढच्या जन्मी तरी आपला संसार होऊ दे.
कुणाल खूप रडू लागतो.
झालेला प्रकार कुणाल, माला आणि डॉक्टर काकांच्या घरी समजतो. सर्वांना खूप दुःख होते. परंतु आता याची वाच्यता कुठे करायची नाही असे ते ठरवतात.
एका चांगल्या मुहूर्तावर कुणाल आणि पुर्वा चा विवाह होतो.
आत्तापर्यंत कुणालच्या लक्षात आलेले असते की सिद्ध बाबांनी अजून एक जन्म घ्यावा लागेल असे का सांगितले... (अर्थात माला बरोबरचे ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी)
कुणाल (मनात) - बस्स. आता आणि पुढच्या जन्मात सावध रहायचे. फक्त मालाबरोबरचे मुख्य आणि इतरांबरोबरचे शिल्लक ऋणानुबंध पूर्ण करायचे. जर पुढच्या जन्मात अजुन एखादी नवीन माला किंवा पुर्वा भेटली तर या चक्रामध्ये मी असाच खोल खोल अडकत जाईन....
समाप्त
- हेर - भयामागचे कारण - भाग १
- हेर - भयामागचे कारण - भाग २
- हेर - भयामागचे कारण - भाग ३ (शेवटचा भाग )
- रॅगिंग - एक दुष्टचक्र
- कृष्णविवर - भाग १
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा