Read best Marathi online gudh katha love story free मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग १
भाग १
कुणाल एका नॅशनल बँकेत नोकरीला होता. तो सध्या खुशीत होता. कारणसुद्धा तसेच होते. कुणालची हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या " वनराई " गावात बदली झालेली असते. असिस्टंट मॅनेजर या पोस्टवरून त्याचे मॅनेजर या पोस्टवर प्रमोशन झालेले असते.
हा आनंद प्रमोशनचा असतोच, पण आता मला हिमालयाच्या जवळ राहून, तो परिसर जवळून बघता येईल याचा जास्त असतो. लहानपणापासून कुणालला हिमालयाची ओढ असते. आई - वडिलांबरोबर लहानपणी सुट्टीत तो खूप ठिकाणी फिरला होता. पण अजून हिमालयात जायचा योग आलेला नव्हता.
पण या आनंदाबरोबरच थोडे दुःख होते. आई वडिलांना व लहान बहिणीला सोडून कुणाल फार दिवस कुठे एकटा राहिलेला नव्हता. आई-वडील आणि बहीण कुणालची समजूत काढतात. ते सांगतात कि, तू तिकडे जाऊन सेटल हो, त्यानंतर आम्ही तुला भेटायला येऊ.
ऑफिस मध्ये कुणालचा सेंड ऑफ होतो. कुणाल घरी परत येतो. चार ते पाच दिवसात कुणालला ड्युटीवर जॉईंट व्हायचं असतं. फ्लाईटचे बुकिंग झालेले असते. घरातील सर्वांचा, तसेच मित्रांचा निरोप घेऊन कुणाल निघतो. सिमला पर्यंत फ्लाईट असते. पुढचा वनराईपर्यंतचा प्रवास बसने असतो.
"वनराई" हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक गाव होते. गाव बऱ्यापैकी मोठे होते. बाजूला एक नदी वहायची. गावातील लोक शेतीवरच मुखत्त्वेकरून अवलंबून होते. गहू आणि जव हि तेथील मुख्य पिके होती. तसेच तेथे सफरचंद आणि लिची या फळांच्या मोठ्या बागा होत्या. एकंदरच "वनराई" हे गाव संपन्न होते. गावातील निसर्गसौंदर्य तर छानच होते, शिवाय बाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा होत्या. सभोवती मोठी मोठी जंगले होती.
बँकेने कुणालची रहाण्याची सोय एका बंगल्यात केलेली असते. बंगला मोठा असतो. बंगल्याचे मालक सिमल्यात स्थायिक झालेले असतात. त्यामुळे बंगला भाडयाने मिळतो. सर्व काही नवीन असते. पण गावातील निसर्ग सौंदर्य पाहून, कुणाल खुष होतो. जवळच एक घरगुती खानावळ असते. तेथे जेवणाची सोय होते. अर्थात जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीचे नसते. पण जेवण अत्यंत रुचकर असते. "वनराईला" सुखरूप पोहोचल्याचा, कुणाल घरी फोन करतो. प्रवासाचा शीण आल्यामुळे रात्री कुणालला लवकर झोप लागते. थंडीसुद्धा छान पडलेली असते.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कुणालला जाग येते. सर्व आटोपून कुणाल रेडी होतो. एक जागा भाड्याने घेतलेली असते. तेथे ऑफिसच्या फर्निचरचे काम चालू असते. २ ते ३ दिवसात बँकेच्या शाखेचे उदघाट्न असते. बाहेरून बदली होऊन अजून चार लोकांचा स्टाफ देखील कामावर रुजू झालेला असतो.
एक चांगला मुहूर्त बघून बँकेमध्ये पुजा केली जाते. गावच्या प्रमुखांकडून बँकेचे उद्घाटन केले जाते. गावामध्ये अजून पर्यंत बँक नसल्यामुळे लोकांना पैशाच्या व्यवहारासाठी बाजूच्या शहरात जावे लागे. थोडीफार जी काही कमाई होत असे, ती कमाई बरेचसे लोक घरातच ठेवत असत. सेविंग अकाउंट काय असते हे बऱ्याच लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे गावात बँक सुरू झाली हे पाहून लोकांना आनंद झाला. पहिल्याच दिवशी सेविंग अकाउंट ओपन करायला सुरुवात होते.
स्टाफमधील चौघांपैकी दोघेजण कुणाल पेक्षा वयाने लहान असतात तर दोघेजण कुणाल पेक्षा वयाने मोठे असतात. मोहिनी मॅडम कुणाला पेक्षा वयाने थोड्या मोठ्या असतात, तर गोविंद सरांना रिटायर व्हायला अजून दहा वर्षे बाकी असतात. विपुल आणि संजय कुणाल पेक्षा वयाने लहान असतात. कुणालचे वय अठ्ठावीस वर्षे असते. कुणालचे उच्च शिक्षण पूर्ण झालेले असते. त्याचबरोबर त्याने बँकिंगच्या वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या असतात. त्यामुळे बँकेत नोकरीला लागताना मुळातच तो वरच्या पोस्टवर लागतो. चांगल्या कामामुळे चार ते पाच वर्षात त्याचे ब्रांच मॅनेजर पोस्टवर प्रमोशन होते. तरी देखील या सर्व गोष्टींचा कुणालला गर्व नसतो. स्टाफ मधील चारही लोकांशी कुणाल प्रेमाने वागत असतो. मोहिनी मॅडम आणि गोविंद सरांचा तो मान राखत असतो. बँकेला गावातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. आठवड्याभरात बरीच सेविंग अकाउंट ओपन होतात. बरेच व्यापारी लोक करंट अकाउंट देखील ओपन करतात.
एक दिवस एक सुंदर तरुणी बँकेमध्ये प्रवेश करते. तिला सेविंग अकाउंट ओपन करायचे असते. त्यासाठी ती मोहिनी मॅडम कडे जाते. मोहिनी मॅडम फॉर्म काढून भरू लागतात. तेव्हा ती तरुणी मोहिनी मॅडम चे आभार मानून सांगते की फॉर्म मी भरू शकते. आत्तापर्यंत गावकऱ्यांचे बँकिंगचे फॉर्म स्टाफने भरलेले असतात. ही तरुणी फॉर्म स्वतःच भरते हे ऐकून मोहिनी मॅडमना आश्चर्य वाटते. ती तरुणी फॉर्म इंग्लिश मध्ये व्यवस्थित भरून खाली सही करून मोहिनी मॅडम कडे जमा करते. पेहरावावरून ती तरुणी गावातीलच दिसत असते. परंतु ती नीटनेटकी व सुसंस्कृत दिसत असते. स्टाफ मधील चौघांना देखील तिचे आश्चर्य वाटते. त्यानंतर ती तरुणी लोन विषयी चौकशी करते. एवढी वयाने लहान असलेली तरुणी लोन विषयी चौकशी करते हे पाहून मोहिनी मॅडम गार पडतात. परंतु लोन विषयीचे डिसिजन घेण्याचा अधिकार कुणाल सरांना असल्यामुळे त्या तिला कुणाल सरांच्या केबिनमध्ये जाण्यास सांगतात.
कुणाल केबिन मध्ये काम करत बसलेला असतो. सर आत येउ का? ती तरुणी विचारते.
कुणाल डोकं वर करून केबिनच्या दाराकडे बघतो. एक गोरीपान सुंदर तरुणी केबिनच्या दारात उभी असते. तो तिला आत येण्याची परवानगी देतो.
कुणाल - या मॅडम बसा
तरुणी - थँक्यू
कुणाल - बोला मॅडम मी आपली काय मदत करू शकतो?
तरुणी - सर मला लोन विषयी माहिती हवी होती
कुणाल - मॅडम, तुमचे नाव काय?
तरुणी - सर, माझे नाव माला.
कुणाल- माझे नाव कुणाल. कोणाला हवे आहे लोन?
माला - माझ्या चुलत भावाला
कुणाल - काय करतात ते? त्यांचा उद्योग - धंदा, नोकरी काय?
माला - त्याची शेती आणि सफरचंदाची बाग आहे. त्याची एक एकर पडीक जमीन आहे तेथे त्याला अजून एक सफरचंदाची बाग लावायची आहे. त्यासाठी त्याला कर्ज हवे आहे.
कुणाल - तुम्ही काय करता?
माला - मी बी. एस. सी. एग्रीकल्चर आहे. माझ्या वडिलांची देखील शेती आणि सफरचंदाची बाग आहे. शिवाय आमचा दुधाचा व्यवसाय देखील आहे. या सर्व कामांसाठी मी वडिलांना मदत करते.
कुणाल - तुमच्या भावाला कर्ज मिळेल. त्याला एक दिवस बँकेमध्ये घेऊन या.
माला - ठीक आहे मी एक-दोन दिवसात त्याला घेऊन येते.
जी काही कागदपत्र कर्जासाठी लागतील त्यांची यादी कुणाल मालाला देतो. त्यानुसार माला दोन दिवसांनी तिच्या चुलत भावाला घेऊन बँकेमध्ये येते. सर्व विचारपूस केल्यावर कुणाल मालाच्या भावाकडून लोन चा फॉर्म भरून घेतो. जास्तीत जास्त एक आठवड्यात तुमचे लोन पास होईल असा विश्वास कुणाल त्या दोघांना देतो.
माला आणि तिचा भाऊ कुणालचे आभार मानतात.
कुणाल - अहो बँकेला ज्या प्रकारे ठेवींची गरज असते त्याच प्रकारे कर्जदारांची देखील गरज असते. फक्त कर्जदार बुडव्या तर नाही ना याची आम्हाला खात्री करावी लागते. तुम्हाला कर्ज देण्यास बँकेला काहीच प्रॉब्लेम नाही.
संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन, फिरायला म्हणून कुणाल बाहेर पडतो. जवळच एक देऊळ असते. तेथे जाऊन कुणाल देवाचे दर्शन घेतो. थोडा वेळ देवळात बसून कुणाल बाहेर पडतो. वाटेत कुणालला एक दुधाची डेअरी दिसते. "मुरारी डेअरी" असे त्या डेअरीचे नाव असते. खानावळीत जरी जेवण होत असले तरी चहा कॉफी पिण्यासाठी कुणालला दुधाची गरज असते. येथील दूध घेऊन तर बघूया म्हणून कुणाल आत शिरतो. तेथे एक काका बसलेले असतात.
काका - या साहेब काय पाहिजे तुम्हाला?
कुणाल- काका तुम्ही मला कसे ओळखता?
काका - अहो तुमच्या बँकेच्या उद्घाटनाला मी आलो होतो.
कुणाल - मला अर्धा लिटर म्हशीचे दुध हवे आहे.
काका अर्धा लिटर दुधाची थैली कुणालला देतात. दूध घेऊन कुणाल घरी येतो. इलेक्ट्रिक शेगडी वर दूध तापत ठेवतो. दूध तापून त्यावर घट्ट साय येते. कुणाल चहा करुन पितो. आजचा चहा एकदम मस्त झालेला असतो. कारण दूध एकदम चांगले असते. एवढे चांगले दूध आणि ते देखील कमी किमतीत मिळालेले पाहून कुणालला आनंद होतो. आता रोज मुरारी डेअरी इथूनच दूध घ्यायचे असे कुणाल ठरवतो. आता रोजच्या रोज संध्याकाळी कुणाल काकांच्या डेअरीत जाऊ लागतो. हळूहळू त्याची काकांबरोबर चांगली ओळख होते.
"वनराई" ची थंडी कुणालला सूट होत नाही. त्याला बारीक ताप येऊ लागतो. पण नुकतेच बँकेचे ओपनिंग झालेले असल्यामुळे कुणाल सुट्टी घेत नाही. जवळची गोळी घेऊन कुणाल ड्युटीवर जातो.
संध्याकाळी कुणाल काकांच्या डेअरीमध्ये जातो. कुणालला डेअरी मध्ये काका दिसत नाहीत. तेथे माला बसलेली दिसते.
कुणाल - अरेच्या तुम्ही?
माला - हो ही माझ्या वडिलांची डेअरी आहे.
कुणाल - काका कुठे गेले आहेत?
माला - ते शेतावर गेले आहेत. पण तुम्ही असे आजारी असल्यासारखे का दिसत आहात?
कुणाल - मला थोडा ताप येत आहे.
माला - मग डॉक्टरांकडे गेला होतात का?
कुणाल - माझा इथे कोणाशी परिचय नसल्यामुळे चांगले डॉक्टर कोणते आहेत ते मला माहीत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार म्हणून मी माझ्या जवळची गोळी घेतली. पण इकडली हवा मला सूट होत नसल्यामुळे मला फरक पडला नाही.
माला - आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत. म्हणजे ते वैद्य आहेत. त्यांचा गुण चांगला येतो. मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते. त्यांचे नाव धनंजय आहे.
माला कुणालला डॉक्टरांचा पत्ता देते तसेच चुलत भावाचे लोन पास झाल्यामुळे आभार देखील मानते.
कुणाल- आभार कसले मानता? उलट मीच तुमचा आभारी आहे. मला तुम्ही डॉक्टरांचा पत्ता दिलात.
दूध घेऊन कुणाल घरी येतो. त्यानंतर तो डॉक्टरांकडे जातो. दवाखान्यात थोडीशी गर्दी असते. थोडावेळ थांबल्यावर कुणालचा नंबर लागतो.
कुणाल - डॉक्टर आत येऊ का?
डॉक्टर - या आत या.
कुणाल आत मध्ये जातो व खुर्चीवर बसतो.
डॉक्टर - तुम्ही ब्रँच मॅनेजर ना? कालच मी तुमच्या बँकेत घेऊन सेविंग अकाउंट ओपन केले आहे. तुम्ही केबिन मध्ये काम करत बसलेले होतात, तेव्हा मी तुम्हाला बाहेरून बघितले. पहिल्या दिवशी उद्घाटनाला मात्र मला येता आले नाही. सांगा तुम्हाला काय होत आहे?
कुणाल - मला काल रात्री पासून थोडा ताप येत आहे.
डॉक्टर - खाण्यामध्ये काही बदल झाला आहे का?
कुणाल - नाही, खाण्यामध्ये काही बदल झालेला नाही. पण इथली थंडी मला मानवली नाही.
डॉक्टर - बरोबर. तुम्ही महाराष्ट्रातले. त्यामुळे तुम्हाला इथली हवा मानवली नाही. मी तुम्हाला औषध देतो. दोनच दिवसात तुम्हाला बरे वाटेल.
जडीबुटी पासून बनवलेल्या गोळ्या आणि लिक्विड डॉक्टर कुणालला देतात. औषध कसे घ्यायचे ते डॉक्टर समजावून सांगतात. कुणाल डॉक्टरांची फी देतो.
डॉक्टरांच्या इथून निघून कुणाल खानावळीत जातो. जेवण झाल्यावर कुणाल घरी परततो. घरी येईपर्यंत कुणालला सणकून ताप भरतो. डॉक्टरांनी दिलेले औषध घेऊन कुणाल झोपी जातो. कुणालला छान झोप लागते आणि भरपूर घाम येऊन कुणालचा ताप उतरतो. सकाळी उठल्यावर कुणालला बरं वाटत असते. थोडा अशक्तपणा मात्र जाणवत असतो. कुणाल तयार होऊन ऑफिसला जातो. बँकेत जाताना देखील बरोबर औषध घेऊन तो जातो. आज संध्याकाळी फिरायला जाण्याची ताकद कुणाल मध्ये नसते. त्यामुळे बँकेतून सुटल्यावर तो परस्पर मुरारी डेअरीमध्ये जातो. आज देखील डेअरीमध्ये काका नसतात. तेथे माला असते.
कुणाल - थँक्यू. काल मी डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांच्या औषधाने मला खूप फरक पडलेला आहे.
माला - अहो त्यात आभार कसले मानता? तुम्हाला बरे वाटले ना मग चांगलं झालं. या डॉक्टरांचा चांगलाच गुण येतो. माझ्या वडिलांचे ते चांगले मित्र आहेत.
कुणाल - आज काका कुठे दिसत नाहीत?
माला - आज शेतावर कामाला गेलेले असताना ते वाटेमध्ये पडले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेले आहे. बाजूच्या शहरात जाऊन प्लॅस्टर घातले. १ महिना आराम करायला सांगितले आहे.
कुणाल - अरे बापरे मला काकांना भेटायला पाहिजे.
माला - मग भेटाना, डेअरीच्या मागच्या बाजूलाच आमचे घर आहे.
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा