मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
ऋणानुबंध - भाग ४
भाग ४
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डॉक्टर काकांची बाईक घेऊन कुणाल एकटाच जंगलाच्या दिशेने निघतो.
नेहमीप्रमाणे नदी क्रॉस केल्यावर देवळाच्या येथे कुणाल बाईक पार्क करतो. देवाचे दर्शन घेऊन कुणाल देवळातून बाहेर पडतो. आज माला बरोबर नसल्यामुळे कुणालला एकटे एकटे वाटत असते. थोडे पुढे गेल्यावर जडीबुटी आणि औषधी वनस्पती मिळायला सुरुवात होते. त्या सर्व जडीबुटी गोळा करत करत कुणाल पुढे चालत राहतो. आज सरोवराच्या परिसरात जायचे असते.
आज डॉक्टर काकूंनी चहा आणि डब्यामध्ये जेवण दिलेले असते. आज जंगलात जाणार असल्याचे कुणालने मुरारी काकांना सांगितलेले नसते. आधीच मुरारी काकांचा पाय फ्रॅक्चर झालेला आणि त्यात मालाचे डोके दुखत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपण कुठे त्रास द्यायचा? म्हणून आज जंगलात जाणार असल्याचे कुणाल त्यांना सांगत नाही.
थोडे पुढे आल्यावर कुणाल एका झाडाखाली बसून थर्मास मधील चहा कपात ओतुन पिऊन घेतो. नंतर परत तो पुढे चालू लागतो. दुपारी बारा वाजेपर्यंत तो सरोवराजवळ येऊन पोहोचतो. आता सपाटून भूक लागलेली असते. त्यामुळे डॉक्टर काकूंनी दिलेला डबा उघडून तो खाऊ लागतो. कुणाल डबा खाऊन झाल्यावर थोडावेळ विश्रांती घेतो.
थोड्यावेळातच कुणाल त्याचे काम परत सुरु करतो. औषधी वनस्पती काढत असताना, अचानक एक पिवळा जर्द नाग त्याच्या बोटाला कडाडून चावतो. आता पुढे काय करावे हे कुणालला कळत नाहीसे होते. तिथे मोबाईलला रेंज देखील नसते. दोनच मिनिटात कुणाल बेशुद्ध पडतो.
कुणाल डोळे उघडून बघतो. बाजूला थोडेसे धुके पसरलेले असते. मी मेलो तर नाही ना? मी आत्ता कुठे आहे? असे अनेक प्रश्न कुणालला पडतात. कुणाल उठून बसला राहतो आणि आजूबाजूला बघू लागतो. हा परिसर त्याला नवखा असतो. सभोवतालचे दृश्य अत्यंत दिव्य असते. जवळच्या एका हिमशिखरावरून आलेला एक झरा खाली वाहत गेलेला असतो. आयुष्यात कधी न बघितलेली सुंदर फुले तिथे उमललेली असतात. मी स्वप्नात तर नाही ना असे कुणालला वाटून जाते.
तितक्यात एक मधुर आवाज येतो, आता बरं वाटतंय ना तुला?
कुणाल मागे वळून बघतो, आणि बघतच बसतो. एक निळ्या रंगाची साडी परिधान केलेली अशी, सुंदर गोरीपान तरुणी त्याच्या मागे बसलेली असते. तिच्याकडे बघुन दिव्यत्वाचा भास होत असतो.
कुणाल - तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे? असे एकामागून एक प्रश्न तो त्या तरूणीला विचारू लागतो.
तरुणी (हसत) - अरे किती प्रश्न विचारशील? जरा सावकाश.
कुणाल (स्वतःच्या हाताकडे बघत) - मला नाग चावला होता ना? मग मी ठीक कसा झालो? माझ्या बोटाला हा पाला कसला लावला आहे?
तरुणी - तो नाग अत्यंत विषारी होता. बरे झाले मी वेळेतच तिथे आले. येथील औषधी वनस्पतींचा रस मी तुझ्या तोंडात घातला. तु बेशुद्ध पडला होतास. या झर्याच्या पाण्याने दंशाचा दाह कमी होतो, म्हणून मी तुला पटकन इथे घेऊन आले आणि तुझे हात झर्याच्या पाण्याने धुतले. त्यानंतर दिव्य वनस्पतींचा पाला, वेलींच्या साह्याने तुझ्या बोटाला बांधून ठेवला. आता धोका टळला आहे. थोड्याच वेळात तुझे विष पूर्णपणे उतरेल.
कुणाल - थँक यु. तुम्ही माझा जीव वाचवला, तुमचे आभार कसे मानू ते मला कळत नाही. पण मला काही प्रश्न पडले आहेत. एवढ्या निर्जन परिसरात तुम्ही इथे कशा? तुमचे नाव काय? तुम्ही राहता कुठे?
तरुणी - कसे रे तुला एवढे प्रश्न पडतात? पण ऐक, माझे नाव पुर्वा. मी येथील जवळच्या परिसरात राहते. येथे आमचे वरचेवर येणे-जाणे असते. तुझे नाव काय?
कुणाल - माझे नाव कुणाल. म्हणजे इथे सुद्धा लोकवस्ती आहे? मला गावातील कोणच कसे बोलले नाही?
पुर्वा - तू इथे नवीन आहेस, त्यामुळे तुला माहीत नाही. मी सुद्धा काही या सरोवराच्या जवळ राहत नाही. आमचे गाव सुद्धा येथून लांबच आहे.
कुणाल - इतका दिव्य परिसर मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
पुर्वा - हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा अजून दिव्य परिसर या हिमालयाच्या सभोवती आहेत.
कुणाल (आजूबाजूला बघत) - जडीबुटी गोळा करण्यासाठी मी गोणी आणलेल्या होत्या. काही गोणीमध्ये जडीबुटी आणि औषधी वनस्पती भरल्या देखील होत्या. माझ्या गोणी कुठे गेल्या?
पुर्वा - काळजी करू नकोस. तुझ्या सर्व गोणी सरोवराच्या बाजूला आहेत.
कुणालला पुर्वा खूप आवडली होती. तिच्याशी बोलतच राहावे असे त्याला वाटत होते. शिवाय पुर्वाने कुणालचा जीव देखील वाचवला होता. पहिल्या भेटीतच प्रेम होणे ते हेच का? असा प्रश्न कुणालला पडला.
कुठची कोण मुलगी, तिने माझा जीव काय वाचवला, आणि मी तिच्या प्रेमात पडायचे? हे वेड्यासारखे विचार माझ्या मनात का येत आहेत? अशाप्रकारे कुणालच्या मनात विचारचक्र सुरु झाले.
पुर्वा - कसला विचार करत आहेस?
कुणाल (भानावर येत) - नाही, काही नाही.
पुर्वा - थांब तुला भूक लागली असेल. तुझ्यासाठी मी थोडी फळे आणते.
कुणाल - अहो नको, तुम्ही कशाला त्रास घेत आहात?
पुर्वा - नको कसं? थांब जरा. मी आलेच.
पुर्वा पटकन तिथून निघून जाते. पाच मिनिटांतच ती परत येते. येताना ती केळी आणि डाळिंब घेऊन येते.
कुणाल - हि फळे कुठून आणलीत?
पुर्वा - इथे जवळच झाडे आहेत. तू खाण्याचे काम कर.
कुणाल - मी एवढी सगळी फळे नाही खाऊ शकत. पण तुम्ही आणलीच आहेत तर थोडीशी खातो.
कुणाल एक डाळिंब फोडतो त्याचे दाणे काढतो. थोडे दाणे तो खातो आणि थोडे पुर्वाला देतो. त्यानंतर थोडी केळी देखील खातो.
पुर्वा - अरे अजून खा ना, भरपूर फळे उरली आहेत.
कुणाल - नको, माझे पोट पूर्ण भरले. त्या सरोवरापाशी जाण्याचा मार्ग मला तुम्ही दाखवाल का? त्याच्यापुढे मी जाऊ शकेन.
पुर्वा - थांब जरा.
पुर्वा कुणालातरी हाक मारते. तेवढ्यात एक पांढरा शुभ्र घोडा तेथे हजर होतो. पूर्वा त्या घोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते.
पुर्वा - कुणाल, आता तु घोड्यावर बस. म्हणजे मग तो तुला नदीच्या जवळच्या देवळात पर्यंत येऊन जाईल.
कुणाल (विस्मयाने बघत) - हे पहा मला एकतर घोड्यावर बसता येत नाही आणि या घोड्याला तुम्ही काय प्रोग्रामिंग केले आहे का? म्हणजे तुम्ही इथून त्याला सांगितलेत आणि तो मला बरोबर ठिकाणी सोडेल? याने कुठे मला जंगलात भरकटवले तर मी काय करू?
पुर्वा - बिनधास्त बस या घोड्यावर, हा खूप गरीब आहे. तो तुला व्यवस्थित नेईल.
कुणाल - नाही मला नाही जमणार, मी आपला चालत जातो. मला फक्त त्या सरोवरा पर्यंत सोडा.
पुर्वा - अजून तुझ्या शरीरात विषाचा थोडा अंश आहे. जर चालत गेलास, तर ते कष्ट तुला सहन होणार नाहीत. आपण असं करू, तू घोड्यावर पुढे बस, तुझ्या मागे मी बसेन.
कुणालला ते तितकेसे पटले नाही, पण त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. पुर्वा घोड्यावर बसली आणि हात देऊन तिने कुणालला वर खेचून घेतले. घोडा दौडू लागला. आपण कुठून जात आहोत हे कुणालला काही कळत नव्हते. धुके थोडेथोडे विरळ होत गेले आणि घोडा सरोवरापाशी येऊन पोहोचला.
आता पुर्वा घोड्यावरून खाली उतरली आणि जवळच पडल्या असलेल्या कुणालच्या गोणी तिने उचलून घेतल्या.
अजून काही जडीबुटी गोळा करायच्या आहेत का? पुर्वाने त्याला विचारले
कुणालने मानेनेच नाही असे सांगितले.
पुर्वा परत घोड्यावर बसली आणि घोडा परत दौडू लागला.
खरे म्हणजे पुर्वाच्या बरोबर घोड्यावर बसायला कुणालला संकोच वाटत होता. पण नाईलाजाने तो तसाच बसून राहिला.
घोड्याने दौडत दौडत जंगल पार केले. आता घोडा या देवळापाशी येऊन पोहोचला. कुणाल आणि पुर्वा दोघेही घोड्यावरुन खाली उतरले.
कुणाल - मला देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आहे. तुम्ही पण येत आहात का?
पुर्वा - हो चल.
कुणाल आणि पुर्वा दोघेजण देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात. प्राण वाचवण्यासाठी पुर्वाला पाठवल्याबद्दल कुणाला देवाचे आभार मानतो.
दोघेही देवळाच्या बाहेर येतात.
कुणाल गोणी घेऊन बाईक वर बसतो आणि बाईक सुरू करतो.
कुणाल - आता येथून मी पुढे जाऊ शकेन. तुम्ही मला खूप मदत केली त्याबद्दल धन्यवाद.
पुर्वा - ते तर माझे कर्तव्य होते. आपण परत भेटू, अच्छा.
कुणाल पुर्वा चा निरोप घेतो आणि घरी परततो. रात्रीचे आठ वाजलेले असतात. बोटाला पाला बांधलेला असल्यामुळे कुणाल डॉक्टरांच्या घरी जात नाही.
उशीर झाल्यामुळे जडीबुटी मी माझ्या घरी नेत आहे, उद्या सकाळी मी त्या तुम्हाला आणून देईल असे कुणाल डॉक्टरांना फोन करून सांगतो.
पुर्वाने दिलेली फळे खाल्ल्यामुळे कुणालला जेवणाची भूक नसते. तो तसाच झोपतो. परंतु मनात मात्र पुर्वाचाच विचार येत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देखील कुणालच्या मनात पुर्वाच असते.
मी तर तिचा मोबाईल नंबर देखील घेतलेला नाही, मग तरीसुद्धा आपण परत भेटू असे ती कसे म्हणाली? कुणाल विचारात पडतो.
आता विचार करत बसून चालणार नाही. बँकेत वेळेवर पोहोचायचे आहे. त्यामुळे लवकर आटोपायला हवे - कुणाल स्वतःशीच पुटपुटतो. बोटाला बांधलेला पाला कुणाल काढून टाकतो आणि त्यानंतर आंघोळ वगैरे आटपून घेतो.
बँक सुटल्यावर संध्याकाळी, कुणाल प्रथम डॉक्टर काकांकडे जाऊन जडीबुटीच्या गोणी त्यांना देतो. त्यानंतर कुणाल मुरारी काकांच्या डेअरीवर जातो. डेअरीमध्ये मुरारी काका असतात.
कुणाल - काका तुमचा पाय आता ठीक आहे का? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितला आहे ना? मग तुम्ही डेअरीमध्ये का बसला आहात?
मुरारी काका - मालाची आई आणि तिचा चुलत भाऊ मालाला घेऊन शहरात गेले आहेत. तिथल्या डॉक्टरांना तिची तब्येत दाखवायची आहे. मालाचे डोके अजून देखील दुखतच आहे. मला खूप काळजी वाटत आहे.
कुणाल - काका, तुम्ही काळजी करू नका मालाला लवकरच बरे वाटेल.
कुणाल दूध घेऊन घरी परततो.
दुसऱ्या दिवशी डॉक्टर काकांकडून कुणालला कळते कि माला आणि तिची आई शहरातच नातेवाइकांकडे थांबली. आहेत कारण मालाची ट्रीटमेंट चालू आहे. साधे डोके तर दुखत होते, आता मालाला झाले तरी काय? असा कुणालला प्रश्न पडतो. एक दोन वेळा कॉल करून तो मालाची चौकशी देखील करतो. तेव्हा ती सांगते की इथल्या औषधांमुळे डोकेदुखी कमी झाली आहे, परंतु अजून टेस्ट बाकी आहेत.
असाच एक आठवडा संपत येतो. कुणालच्या मनातुन पुर्वा काही गेलेली नसते. या रविवारी परत त्या सरोवरापाशी जाऊन बघू का, पुर्वा भेटते का ते? कुणालच्या मनात विचार चालू असतो.
या रविवारी डॉक्टर काकांना जडीबुटी नको असतात.
रविवार उजाडतो. कुणाल लवकरच सकाळी उठतो. सर्व आटोपून कुणाल घराच्या बाहेर पडतो. बाहेरच एका हॉटेलात चहा नाष्टा करुन कुणाल देवळाच्या दिशेने चालू लागतो. आज कुणालकडे डॉक्टर काकांची बाईक नसते. कारण आज मी सरोवरावर का जात आहे याचे स्पष्टीकरण डॉक्टर काकांना देण्यासाठी त्याच्याजवळ नसते. देऊळ खूप लांब असते.
थोडे चालून गेल्यावर कुणालला एक बैलगाडीवाला दिसतो. बँकेमुळे बरेचसे गावकरी कुणालच्या ओळखीचे झालेले असतात.
बैलगाडीवाला - काय साहेब कुठे निघालात एवढ्या सकाळी?
कुणाल - नदीपलीकडे च्या देवळात चाललो आहे दर्शनाला.
बैलगाडीवाला - साहेब मी त्याच बाजूला चाललो आहे. माझ्या बैलगाडीत बसता का. तुम्ही शहरातील माणसं, तुम्हाला चालेल का बैलगाडीत बसलेले.
कुणाल - हो चालेल की, बरे झाले तुम्ही भेटलात.
कुणाल बैलगाडी मध्ये बसतो. खाली बसण्यासाठी घोंगडी अंथरलेली असते. खूप वर्षांनी कुणाल बैलगाडीत बसलेला असतो. त्यामुळे त्याला लहानपणीची मामाच्या गावाची आठवण येते. तिकडे देखील मामा किंवा आजोबा त्याला बैलगाडीतून फिरायला नेत असत.
१५ ते २० मिनिटांत बैलगाडी नदीच्या पलीकडे पोहोचते. कुणाल खाली उतरून बैलगाडीवाल्याचे आभार मानतो. बैलगाडीवाला दुसऱ्या दिशेने पुढे निघून जातो.
नेहमीप्रमाणे कुणाल देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो.
दर्शन घेऊन झाल्यावर तो जंगलाच्या दिशेने पुढे चालू लागतो. आज देखील पुर्वा तिथे आली असेल का? असा विचार त्याच्या मनात चालू असतो. आज जडीबुटी गोळा करायच्या नसल्यामुळे लवकरच तो सरोवरापाशी पोहोचतो. तिथे कोणीच नसते. कुणाल मनातून निराश होतो.
किती वेडा आहे मी. कुठे त्या पुर्वा चा शोध घेत इथपर्यंत मी आलो? तिचा आणि माझा काय संबंध? कुणाल चे विचार परत चालू होतात. आज सभोवतालच्या सौंदर्याचा कुणाल आनंद घेऊ शकत नसतो. आपले मनच जर स्थिर नसेल, शांत नसेल, तर सभोवती स्वर्गातील सृष्टीसौंदर्य जरी असले तरी त्याचा काही उपयोग नसतो. थोडावेळ तेथेच बसून कुणाल घरी निघू लागतो.
इतक्यात त्याला तोच मधुर आवाज येतो "कुणाल आलास तू?"
कुणाल मागे वळून बघतो. मागे पुर्वा उभी असते. तिला बघितल्यावर कुणालला अत्यानंद होतो.
पुर्वा - बर्याच दिवसांनी आलास? आज पण जडीबुटी न्यायला आला आहेस का?
आता हिला काय उत्तर द्यावे ते कुणालला कळत नाहीसे होते.
कुणाल - नाही सहज फिरायला आलो आहे.
पुर्वा गालातल्या गालात हसते.
आपले उत्तर पुर्वाला पटलेले दिसत नाही असे कुणालच्या लक्षात येते.
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा