Read best Marathi online story free | Moral story | मराठी कथा | नीति कथा मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
लेखक - केदार शिवराम देवधर
रॅगिंग - एक दुष्टचक्र
ओंकार एक हुषार मुलगा होता. दिसायला देखणा, तब्बेतीने दणकट आणि मनमिळाऊ असा ओंकार सगळ्यांचा लाडका होता. अभ्यासात देखील ओंकार नेहमीच पुढे असायचा. ओंकार च्या घरी त्याचे आई - बाबा आणि आजी - आजोबा होते. घरातील सर्वजण सुसंस्कृत आणि सज्जन होते. त्यांचा चांगला मोठा बंगला होता. वडील चांगल्या पोस्टवर नोकरीला होते. आजोबा रिटायर पेन्शनर होते.
एवढे सगळे चांगले असून देखील आजी आणि आई मध्ये थोडी भांडणे होत. खरे म्हणजे सासु-सुना दोघीजणी स्वभावाला खुप चांगल्या होत्या. परंतु एकमेकींशी त्यांचे पटत नसे. बऱ्याच वेळा सुन गप्प बसत असे, त्यामुळे भांडण विकोपाला जात नसे. परंतु कधीकधी तिचा देखील कंट्रोल सुटत असे. सुनेशी तुझे का पटत नाही? असे सासर्यांनी विचारल्यावर सासुबाईंचे उत्तर ठरलेले असे, की माझी सासू मला सासुरवास करायची तेव्हा नाही बोललात कधी? मग सासुबाईंची कहाणी सुरू होत असे – माझ्यासारखा सासुरवास कोणी सहन केला नसेल. सासुबाई सर्व काम माझ्याकडून करून घ्यायच्या. वर भरपूर रागवायचा देखील. सासुबाईंना उलट उत्तर करायची आमची हिंमत नव्हती. आमचे हे देखील एका अक्षराने बोलले नाहीत सासुबाईंना. नाहीतर आज कालच्या सुना, जरा काही सासु बोलली की सांग नवऱ्याला. तेव्हा आम्ही सहन केलं, आता वय झालं आमचं, आम्हाला मान नको का मिळायला. जरा सासु म्हणून काही अधिकाराने बोललं तर कुठे बिघडलं.
ओंकार आता मोठा झालेला होता. आजीचे काहीतरी चुकत आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागले होते. परंतु आजी वाईट नाही, हे देखील त्याला माहिती होते. तो त्याबद्दल आजोबांशी बोलत असे. आजोबा सांगत अरे, सुन म्हणून तिच्यावर झालेला अन्याय तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात नोंदविला गेलेला होता. त्यामुळे तिचे अंतर्मन आता तिला स्वस्थ बसू देत नाही. त्याचा वचपा आता ती काढत आहे.
ओंकार त्याच्या आजोबांना विचारत असे की, आजीवर अन्याय तिच्या सासूने केला होता. मग त्याचा त्रास ती सुनेला का देत आहे. तिथल्या तिथेच सासूला उलट बोलून जाब विचारायची हिंमत का नाही दाखविली?
आजोबा सांगत, अरे हे दुष्टचक्र असंच चालू राहणार. माणसाच्या मनाचे खेळ याला कारणीभूत आहेत.
ओंकार आणि घरातील सगळ्यांना या सर्व गोष्टींची सवय झाली होती. त्यामुळे आजीच्या वागण्याकडे सर्वजण दुर्लक्ष करत.
काही वर्षांनी ओंकार ची बारावी सायन्स ची परीक्षा झाली. ओंकारला इंजिनिअरिंगला जायचे होते. बारावी सायन्सच्या परीक्षेनंतर इंजिनिअरिंग साठी आवश्यक त्या सर्व पूर्व परीक्षांची तयारी ओंकारने केली आणि त्या परीक्षा त्याने दिल्या. सर्व परीक्षांमध्ये ओंकारला घवघवीत यश मिळाले. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.
ओंकारला मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा होता. या ब्रँचचे कॉलेज दुसऱ्या शहरात होते. ते शहर दोन तासाच्या अंतरावर होते. मार्क चांगले मिळालेले असल्यामुळे ओंकारला त्या कॉलेजमध्ये सहज ऍडमिशन मिळाली. कॉलेज दूर असल्यामुळे रोज जाऊन येऊन करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या शहरातच ओंकारची राहण्याची सोय करायचे त्याच्या आई-वडिलांनी ठरविले. ओंकारला बाहेर राहण्याची सवय नव्हती. आता हा तिकडे कसा राहील याचेच टेन्शन घरातील सर्वांना होते. परंतु उच्च शिक्षण देखील आवश्यक होते.
ओंकारची राहण्याची सोय झाली. त्याच्या मित्राने अमोलने देखील त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती. त्यामुळे दोघांच्या वडिलांनी एक वन रूम किचन चा फ्लॅट भाड्याने घेऊन दोघांना दिला. एका घरगुती खानावळीत जेवणाची देखील सोय झाली.
ओंकारचे वडील – हे बघ ओंकार, तुझ्या शिक्षणासाठी मी खुप खर्च करत आहे. आपली परिस्थिती चांगली असल्यामुळे मला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, पण आता तू एकटा राहणार आहेस. त्यामुळे नीट मन लावून अभ्यास कर. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. मी जो पैसा खर्च करत आहे त्याचे चीज कर. तू इंजिनियर व्हावा अशी तुझ्या आजी-आजोबांची देखील खूप इच्छा आहे.
ओंकार - काय हो बाबा, आत्ता कशाला लेक्चर देत आहात? तुम्ही काळजी करू नका. मी भरपूर अभ्यास करेन.
एक आठवड्याने आम्ही परत भेटायला येऊ असे सांगून वडील निघून गेले.
अमोल – अरे ओंकार, दोन दिवसांनी आपले कॉलेज सुरू होईल. मी ऐकले आहे सीनियर मुले येथे रॅगिंग करतात.
मनाची तयारी ठेवली आहेस ना?
ओंकार - हे बघ अमोल, मी कोणाला भीत नाही.
काय होईल त्याला सामोरे जायची माझी तयारी आहे.
अमोल - एवढा कसा रे तू बिनधास्त?
ओंकार - उगाच कशाला टेन्शन घ्यायचं? आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू.
दोन दिवसांनी कॉलेज सुरू होते.कॉलेजची वेळ सकाळची असते. कॉलेज खूप मोठे असते. अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व अद्ययावत सोयी तेथे असतात.
नवीन शहर, नवीन कॉलेज त्यामुळे अमोल खूप घाबरून गेलेला असतो.
परंतु ओंकार बरोबर असल्यामुळे त्याला खूप आधार वाटत असतो. फर्स्ट इयरच्या बाकीच्या बॅचची मुले देखील कॉलेजमध्ये आलेली असतात. यातील काही मुले अमोल प्रमाणेच भेदरलेली असतात.
सर्व मुले आपापल्या क्लासरूम मध्ये जातात. नवीन मित्र-मैत्रिणींशी ओळख होऊ लागते. तु कुठल्या गावचा / गावची?, तुला बारावीला किती मार्क मिळाले? वगैरे गोष्टींची विचारणा एकमेकांना होऊ लागते. लेक्चर घ्यायला प्रत्येक विषयाचे प्रोफेसर येऊ लागतात. पहिल्या दिवशी सर्व मुलांची ओळख करून घेऊन नंतर त्या त्या विषयाचे प्राथमिक ज्ञान देण्यास सुरुवात होते.
रिसेस् मध्ये मात्र सिनियर मुलांचा एक ग्रुप वर्गात प्रवेश करतो. ग्रुपमध्ये मुले आणि मुलीसुद्धा असतात. मुलांचा ग्रुप मुलांना एका बाजूला घेतो. मुलींचा ग्रुप मुलींना एका बाजूला घेतो. प्रत्येकाची नावे विचारली जातात. त्यानंतर गाणी म्हणून दाखवा, नाच करून दाखवा असे हुकूम सोडले जातात. नवीन असल्यामुळे फर्स्ट इयर ची मुले बिचारी खूप घाबरून गेलेली असतात. ओंकार मात्र, सिनियर मुलांच्या नजरेला नजर देऊन गाणी म्हणून दाखवत असतो.
एक सिनियर मुलगा - तुला काय जास्त मस्ती आली आहे काय?
ओंकार - दादा नाही रे, तुम्ही गाणं म्हणायला सांगितलं म्हणून म्हणतोय.
आपल्याला कोणीतरी दादा म्हटलं आहे हे पाहून तो मुलगा शांत होतो.
सिनियर मुलगा - ठीक आहे, ठीक आहे जास्त बोलू नकोस. आम्ही सांगू ती कामे करायची, जास्त हुशारी दाखवायची नाही.
ओंकारला जास्त काही फरक पडत नाही हे बघुन सिनियर मुले बाकीच्या मुलांकडे मोर्चा वळवतात आणि त्रास देऊ लागतात. यात सिनियर मुली देखील मागे नसतात. त्यांच्या त्रासामुळे तर काही मुली रडु लागतात. पंधरा-वीस मिनिटांनी सिनियर मुला-मुलींचा ग्रूप क्लास रूम मधून बाहेर पडतो.
त्यानंतर काही मुले कॅन्टीनमध्ये जाऊन चहा नाष्टा करतात. रिसेस् संपल्यावर पुढची लेक्चर होतात. कॉलेज सुटते.
दुसऱ्या दिवशी पासून त्रासात अजून वाढ होते. सिनियर मुले पर्सनल कामे सांगु लागतात.
मध्येच ओंकाराचे आणि अमोलचे आई-वडील येऊन दोघांना भेटून जातात.
आता कॉलेज सुरू होउन पंधरा-वीस दिवस झालेले असतात. फर्स्ट ईयरच्या मुलांशी ओंकारची बऱ्यापैकी मैत्री झालेली असते. एकदा ओंकारच्या रूमवर काही मित्रांचा ग्रुप जमतो. सर्वजण होणाऱ्या रॅगिंगला वैतागलेले असतात. ओंकार मात्र शांत असतो.
अमोल - तुझ्या कसे कोणी जास्त वाट्याला जात नाही.
ओंकार (हसुन) - अरे माझ्या पण ती मुलं वाट्याला जातात, पण मी तिकडे जास्त लक्ष देत नाही. ती मुलं सिनियर असल्यामुळे त्यांचा मान राखण्यापुरता मी त्यांचे थोडेसे ऐकतो. अति व्हायला लागलं तर मात्र मी सडेतोडपणे बोलून दाखवतो, आम्ही तुमचा मान राखतो, तुम्ही देखील तसेच वागा. मी त्यांचा कधी अपमान देखील करत नाही, त्यामुळे माझ्याशी वाद घालत बसून त्यांना काहीच फायदा नाही. उगाचच प्रकरण वाढत जाईल, हे ते ओळखून आहेत.
तुला बरं हे सगळं जमतं, आम्हाला नाही बुवा जमतं असं सर्व मुले बोलू लागली.
अमोलला थोडा जास्तच त्रास होत होता. दिवसेंदिवस अमोल चे टेन्शन वाढु लागले. एकदा तर अमोल, कॉलेज सोडून देण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचला. परंतु ओंकार, अमोलच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याला त्याने व्यवस्थित समजावले. त्याला मानसिक पाठबळ दिले. एका सिनियर मुलाशी ओंकारची चांगली मैत्री झाली होती. त्याला जाऊन ओंकार भेटला.
सिनियर मुलगा - अरे आमच्या सिनिअरनी तर आम्हाला खूप त्रास दिला. आम्हीदेखील आमच्या सिनियर ची भरपूर कामे केली. आम्ही त्या मानाने तुम्हाला काहीच कामे सांगत नाही. आम्ही नाही का आमच्या सिनिअरचे ऐकले, आता तुम्ही देखील आमचे ऐकले पाहिजे.
ओंकार - अमोल ने जर कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि जाताना त्याने जर तुमच्या विरुद्ध कम्प्लेंट केली तर ती तुम्हाला महागात पडू शकते, तुमचे करिअर धोक्यात येऊ शकते. मला तुम्हाला काही घाबरवायचे नाही. पण हे असे जर काही झाले तर यात अमोलचा आणि तुमचा दोन्हींचा तोटा आहे.
असे ओंकारने त्या सिनियर मुलाला समजावले. ओंकारच्या समजावण्यामुळे फरक पडला. सर्व सिनियर मुलांनी रॅगिंगचे प्रमाण हळूहळू कमी केले. ओंकारच्या अशा चांगल्या वर्तनामुळे त्याचा कॉलेजमधील दबदबा वाढू लागला.
ओंकारने मात्र अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. हळूहळू फर्स्ट इयर पूर्ण झाले. आता ओंकारची बॅच सेकंड इयरला गेली. पुढचं वर्ष चालू झालं. परत रॅगिंगचे दुष्टचक्र चालू झालं. ओंकारची बॅच सेकंड इयरला असल्यामुळे यात विशेष गुंतलेली नव्हती. परंतु थर्ड इयर लास्ट ईयरची मुले मात्र फर्स्ट इयर च्या मुलांचे रॅगिंग घेत होती. ओंकार हे सर्व दुरून बघत असायचा. परंतु अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे तो या बाकीच्या भानगडीत पडत नसे. परंतु कॉलेजच्या बाकीच्या ॲक्टिविटी मध्ये मात्र सहभाग घेत असे. गॅदरिंग, गेम, लेखन स्पर्धा यातदेखील ओंकार अग्रेसर होता. सेकंड इयर पासून तो सी. आर. म्हणून निवडून येऊ लागला.
आता ओंकारची बॅच लास्ट इयर ला गेली. आता आपण सिनियर आहोत, आता फर्स्ट ईयरची ऍडमिशन होईल. त्यांच्याकडून ना, आपण देखील कामे करून घेऊयात. ओंकारच्या बॅचची मुले एकमेकांशी या विषयावर बोलत होती. यात अमोल देखील होता. मुली देखील मागे नव्हत्या. ओंकारने मात्र दुरूनच या सर्वांचे बोलणे ऐकले. परंतु प्रतिक्रिया मात्र दिली नाही.
नवीन ऍडमिशन झाल्या. फर्स्ट इयर ला प्रवेश घेऊन मुले कॉलेजमध्ये आली. लास्ट इयर ची मुले त्यांचे रॅगिंग घ्यायला जाऊ लागली. सर्व नवीन मुले घाबरलेली होती. रिसेस् मध्ये सिनियर मुलांनी, ज्युनियर चा वर्ग ताब्यात घेतला.
तेवढ्यात ओंकार तेथे आला.
यांना सर म्हणायचं, हे आपल्या सर्व सी. आर. चे लीडर आहेत, असे सिनियर मुले ज्युनियर मुलांना सांगू लागली.
ज्युनियर मुले हो म्हणु लागली.
अमोल - ओंकार ये, तुझा मान पहिला.
आता नवीन बॅचची मुले अजूनच घाबरून गेली. ओंकार काय बोलतोय याकडे त्या सर्वांचे लक्ष लागले.
ओंकार - मित्रांनो मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आता तुमचे रॅगिंग होणार या भीतीने तुम्ही घाबरलेले असणार. पण या वर्षीपासून या कॉलेजमध्ये रॅगिंग होणार नाही. कोणीही सिनियर मुले कुठल्याही ज्युनियर मुलाला / मुलीला त्रास देणार नाहीत.
हा पण रॅगिंगचा एक प्रकार तर नाही ना? असे वाटून नवीन मुले बुचकळ्यात पडली.
अमोल - अरे ओंकार, हे काय तू बोलत आहेस?
ओंकार - बरोबर तेच बोलत आहे.
ओंकारचा दुसरा मित्र - अरे, आपल्या सिनियरनी नाही का घेतली आपली रॅगिंग? आपण नाही का केली त्यांची कामे? मग यांना आता करू दे आपली थोडी सेवा.
ओंकार - अरे इथेच तर आपण चुकतोय. आपल्या सिनियरनी असे केले, म्हणून आपण पण तसेच करायचे हा कुठचा न्याय? हे दुष्टचक्र कुठेतरी थांबायला नको का? आपला अमोल तर रॅगिंगला कंटाळून कॉलेज सोडायला निघाला होता. तुम्हाला सर्वांना आठवत असेलच, तेव्हा मीच आपल्या एका सिनियरला भेटलो. तुम्ही सर्वजण आता काय करत आहात? मागच्याच घटनांची पुनरावृत्ती होत आहे. यातील एखाद्या मुलाने किंवा मुलीने जर कम्प्लेंट केली तर तुमचे सर्व करियर उद्ध्वस्त होईल. तीन वर्षे मेहनत घेऊन केलेला अभ्यास फुकट जाईल. गंमत करताना आयुष्याचे कधी वाटोळे होईल कळायचे नाही.
ज्युनियर मुलांनी, सिनियर मुलांना मोठा भाऊ/बहिण म्हणून म्हणून रिस्पेक्ट द्या, पण त्यांच्या चुकीच्या मागण्या मान्य करू नका. अजून तीन वर्षांनी तुम्ही देखील लास्ट ईयरला याल. आत्ता माझ्यासमोर तुम्ही सर्वांनी शपथ घ्या की तुम्ही देखील ज्युनियरची रॅगिंग घेणार नाही.
सर्व फर्स्ट ईयरच्या मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला. आम्हीदेखील पुढे कधी कुणाची रॅगिंग घेणार नाही असे ज्युनियर मुलांनी कबूल केले. सर्व सिनियर मुलांनी ज्युनियर मुलांशी फ्रेंडशिप केली. काही अडल्यास नक्की मदत करू असे आश्वासन दिले.
बघता बघता ही बातमी पुर्ण कॉलेजमध्ये पसरली. ओंकार ने सांगितलेली गोष्ट सेकंड आणि थर्ड इयरच्या मुलांनी देखील मान्य केली. सर्व प्राध्यापक आणि प्रिंन्सिपल पर्यंत ही वार्ता पोहोचली. प्रिंन्सिपलनी ओंकारला आणि बाकीच्या सी. आर. ना केबिनमध्ये बोलावून घेतले.
प्रिंन्सिपल - ओंकार तुझ्यामुळे यावर्षीपासून आमच्या डोक्याची डोकेदुखी गेली असे मानायला आता हरकत नाही. आम्ही कितीही लक्ष घातले तरी कॉलेजमध्ये कुठे ना कुठे तरी थोड्याफार प्रमाणात रॅगिंग होत राहत होते. बरीचशी मुले घाबरून कंप्लेंट देखील करत नसतात. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत आम्हाला लक्ष घालता येत नाही. पण आता सर्व मुलांना तु एक नवीन आदर्श घालून दिलास. आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण देखील दुसर्यावर अन्याय करायचा हे कसे चुकीचे आहे हे तु सर्वांना पटवून दिलेस. या फर्स्ट इयर च्या मुलांची रॅगिंग न झाल्यामुळे, त्यांच्या मनात आता कुठेही सल राहणार नाही. त्यामुळे हीच मुले पुढे भविष्यात दुसऱ्या मुलांची रॅगिंग देखील करणार नाहीत.
प्रिंन्सिपलनी आणि बाकीच्या प्रोफेसरनी ओंकार चे भरपूर कौतुक केले. प्रिंन्सिपलनी तर ओंकारच्या घरी कॉल केला. कॉलेजमधून कॉल आल्यामुळे ओंकारचे वडील प्रथम घाबरले. आपल्या मुलाने काय दिवे लावले आहेत असे वाटून ते चिंतेत पडले. परंतु प्रिंन्सिपलनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून त्यांना ओंकारचा खुप अभिमान वाटला. ओंकार च्या वडिलांनी ही गोष्ट घरातील सर्वांना सांगितली.
गोष्ट ऐकून ओंकारच्या आजीचे डोळे उघडले. माझ्या एवढ्याशा नातवाला एवढी मोठी अक्कल आहे, तर मला म्हातारीला ही गोष्ट का कळली नाही असे वाटून दिला दुःख झाले. आपण देखील सुनेवर थोडाफार अन्याय करत होतो हे तिला कळून चुकले. माझ्या सासूने माझ्यावर हुकूमत गाजवली म्हणून मी सुनेवर हुकूमत गाजवणे चुकीचे आहे हे देखील तिच्या लक्षात आले. लगेचच सासुने सुनेची माफी मागितली. सासुबाई तुम्ही कसली माफी मागत आहात, तुम्ही मोठ्या आहात असे सूनबाई बोलली. घरातील सर्वांना ओंकारचे कौतुक वाटले.