Read best Marathi online gudh katha love story free मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
इच्छा - भाग १
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
सर, आमची काही चूक झाली का?
एवढ्या लांब आमची ट्रान्स्फर का केलीत?
केयुर आणि अनन्या, परांजपे सरांना विचारत होते.
परांजपे सर - नाही, आपल्या कोकणातील प्रोजेक्ट्साठी डायरेक्टर बोर्डाने तुमची स्पेशल नेमणूक केली आहे. तुम्हाला दोघांना प्रमोशनदेखील दिले आहे. तुम्हाला जावेच लागेल.
केयुर आणि अनन्या एका नामांकित फूड इंडस्ट्रीमध्ये कामाला होते. इंडस्ट्री ठाणे शहराच्या बाजूला होती.
दोघांचे बालपणापासून शिक्षण एकत्रच झाले. दोघांचे वडील चांगले मित्र होते. पुढे केयुर मेकॅनिकल इंजिनिअर झाला व अनन्या ने इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग केले.
केयुर आणि अनन्या दोघांची खूप चांगली मैत्री होती.
योगायोगाने एकाच कंपनीत दोघेजण नोकरीला लागले.
प्रमोशनमुळे केयुर व अनन्या आता कोकणातील प्लॅन्टचे हेड बनले होते.
केयुरला प्रोडक्शन बघायचे होते, तर अनन्याला मेन्टेनन्स.
अचानक कोकणात झालेल्या ट्रान्फरमुळे केयुर व अनन्या खुश नव्हते. कारण लहानपणापासून दोघेही ठाण्यातच वाढले होते. पण करिअरमुळे इलाज नव्हता.
संध्याकाळी दोघेही घरी पोहचले आणि ट्रान्स्फरबाबत आई वडिलांना सांगितले.
केयुरची आई - अरे थोडे दिवस काढ कोकणात. कोकण पण खूप सुंदर आहे बरं. आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इंटरनेट मुळे सर्व आता जवळ आले आहे. माझे आजोळ कोकणातलेच.
केयुरचे वडिल - अरे अनन्या पण आहे ना बरोबर? जा बिनधास्त. आम्ही येऊ मध्येच तुम्हाला भेटायला.
अनन्याच्या घरूनसुद्धा केयुर बरोबर आहे म्हणून परवानगी मिळाली.
शनिवारी दोघांनी कंपनीत सर्वांचा निरोप घेतला. या दोघांच्याबरोबर अजून थोडा स्टाफ ट्रान्सफर केला होता. बरोबर अनुभवी माणसे पाहिजेत म्हणून.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी, केयुरने त्याची ४ व्हीलर काढली. घरच्यांचा निरोप घेऊन दोघेही निघाले. बाकीचे सामान टेम्पोमध्ये टाकले.
साधारण ६ तासांचा प्रवास होता. कोकणातील "नागलोली" या गावी प्लॅन्टचे काम चालू असते. बांधकाम पूर्ण झाले होते. आता मशिनरी बसवणे व प्रोडक्शन चालू करणे बाकी होते. गावातील २ बंगले रिकामे होते. त्यांचे मालक शहरात रहात. त्यामुळे कंपनीने तेथे दोघांची तात्पुरती व्यवस्था केली होती. बाकी स्टाफची देखील गावातच सोय झाली होती.
ए, आपल्याला तिकडे कंटाळा नाही ना येणार? अनन्याने विचारले.
केयुर - अग, कंपनीमध्ये बराचसा वेळ निघून जाईल. फक्त रूमवर आल्यावर कसा वेळ घालवायचा ते बघायला हवं. यापूर्वी मी कोकणात काहीवेळा गेलो आहे, पण ते पिकनिकला. त्यामुळे खूप मजा यायची. पण आता रहायला कसे काय जमते ते बघु .
जून महिना असल्यामुळे पावसाला सुरुवात झाली होती. शहराची हद्द संपून आता बाकीची गावे लागू लागली. बाहेर सर्व हिरवेगार दिसत होते.
थोडे पुढे आल्यावर हायवेवरील एका चांगल्या हॉटेलात दोघेजण चहा नाश्त्यासाठी थांबले. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे दोघांनी गरमा गरम भजी व नंतर मसाला चहा घेतला. केयुरने पैसे पेड केले. परत पुढचा प्रवास सुरु झाला. अजून निम्मा प्रवास बाकी होता.
अनन्या - केयुर, मी थोडे ड्राईव्ह करू का? तू कंटाळला असशील.
केयुर - केलंस तर खूप बर होईल. मला आता कंटाळा आलेला आहे.
अनन्याने ड्रायव्हिंग सुरु केले.
आता कोकणची हद्द सुरु झाली.
पावसामुळे छोटे झरे सुरु झाले होते. गर्द झाडितुन प्रवास करायला खुप मजा येत होती.
हायवेवरील एका हॉटेलात दुपारचे जेवण उरकले.
आता "नागलोली" गाव जवळ आले.
अनन्या - केयुर, हे "नागलोली" नाव का पडले असेल रे?
केयुर - अग, तिथे ना भरपुर नाग आहेत. खुप विषारी.
अनन्या - ए, काहिपण फेकु नकोस हं.
केयुर (हसत) - मग, मला काय माहित? अग, खुप नावे अशी असतात. त्यांचा काही संबंध नसतो.
दुपारी २ वाजेपर्यंत, दोघेजण "नागलोली" गावात पोहचतात.
बंगले शोधायला वेळ लागत नाहि. दोघांचे बंगले शेजारी शेजारी नसले तरी एकाच एरियात असतात.
दोन्ही बंगल्यांच्या बाजुला वाडी (म्हणजे नारळ, पोफळी, आंबा अशी बाग) असते. त्यामुळे या बागा संभाळायला दोन्ही मालकांनी एक जोडपे ठेवले असते. अमोल व शोभना अशी त्यांची नावे असतात. दोघेही त्याच गावचे असतात. घरची शेती संभाळुन दोघेजण येथे काम करायचे. तेवढेच थोडे जास्त पैसे मिळत. कंपनीने या दोघांचीच नेमणूक केयुर व अनन्या च्या बंगल्यात कामासाठी केलेली असते. त्यामुळे अमोल व शोभना खुश असतात.
अमोल व शोभना, या दोघांची वाट बघत असतात.
केयुर व अनन्याला दोघांचे बंगले उघडून देऊन चावीदेखील त्यांच्या हातात देतात. बंगले साफ करून ठेवलेले असतात. मागोमाग सामानाचा टेम्पो येतो. अमोलने गावातील ४ गडी अजून बोलावून ठेवलेले असतात. केयुर व अनन्या दोघांच्याही बंगल्यात त्यांचे सामान उतरवून नीट लावले जाते. टेम्पो ड्रायव्हर व बाकी सर्वांना दोघेजण पैसे देतात. सर्वजण आपापल्या वाटेने निघून जातात.
शोभना तिच्या घरून सर्वांसाठी चहा आणते.
सर्वजण चहा पितात. केयूर व अनन्या आपापल्या घरी खुशालीचा फोन करतात.
केयुर - अमोल, अरे आमच्या जेवणाच्या सोयीचं काहीतरी बघ.
अमोल - साहेब, येथे जोशी काकांकडे तुमची जेवणाची चांगली सोय होईल. त्यांची घरगुती खानावळ आहे.
अनन्या - हे बरे झाले, जेवणाचेच कसे करायचे याचे टेन्शन होते.
शोभना - तुम्ही आता आराम करा. संध्याकाळी आम्ही तुम्हाला जोशी काकांकडे नेऊ.
केयुर व अनन्या आपापल्या बंगल्यात थोडा वेळ झोपतात.
संध्याकाळी अमोल येतो. केयुर व अनन्याला घेऊन तो जोशी काकांकडे जातो.
अमोल - जोशी काका, पाहुणे आलेत ठाण्याहून.
जोशी काका व काकु त्यांना या बसा करतात.
केयुर व अनन्या यांची ओळख अमोल करून देतो.
जोशी काका - गावच्याबाहेर कंपनीचे काम चालू आहे. तुम्ही तिथेच नोकरीला आहात का?
केयुर - हो काका, आमची ठाण्याहून इथे बदली झाली आहे.
जोशी काका - तुमची येथे पोस्ट काय आहे?
केयुर - आम्ही दोघे प्लॅन्ट हेड म्हणून येथे आलेले आहोत. मी प्रोडक्शन हेड व अनन्या मेन्टेनन्स हेड आहे.
तोपर्यंत जोशी काकु तळलेले गरे घेऊन येतात.
अनन्या - अहो काकु , हे कशाला?
जोशी काकु - हा कोकणातला खाऊ आहे, घ्या अहो. ताजे आहेत.
केयुर आणि अनन्या तळलेले गरे खातात. गरे खूप छान असतात.
त्यामागोमाग चहा येतो.
अनन्या - काकु, आम्ही तुमच्याकडे जेवणाची सोय होईल का म्हणून विचारायला आलो आहोत. अमोल दादा आम्हाला म्हणाले, कि तुमची खानावळ आहे.
जोशी काकु - हो, नक्कीच. तसे आमच्या येथे रोजची ठरलेली माणसे नसतात. फक्त जे कोणी पर्यटक येतात त्यांची जेवणाची सोय आम्ही करतो. सुट्टीत येथे खूप गर्दी असते. पण आमचा मुलगा व सून देखील येथेच असतात. त्यामुळे कामाचे काही वाटत नाही. आत्ता दोघेजण बाहेर गेलेत. पराग आणि प्राची त्यांचे नाव.
केयुर - काकु, सकाळी कामावर जाताना आम्ही डबा घेऊन जाऊ. रात्री येथे जेवायला येऊ. सकाळी डबा द्यायला जमेल ना?
जोशी काकू - हो, आम्ही सर्वजण लवकरच उठतो. काही अडचण नाही.
नंतर पैशाची बोलणी होऊन, आजपासूनच खानावळीत जेवणाची सुरुवात होते.
सोमवार उजाडतो. केयुर व अनन्या सकाळीच गाडीतून निघतात. जोशी काकुंकडून डबा घेऊन ते कंपनीत पोहोचतात. ठाण्यावरून आलेला स्टाफ देखील वेळेवर हजर होतो. मशिनरी ज्या कंपन्यांकडून घेतली असते, त्यांची माणसेदेखील यायला सुरुवात होते.
सर्वजण मन लावून उभारणीचे काम करत असतात.
कामावरून आल्यावर सोमवारी संध्याकाळी केयुर व अनन्याला कंटाळा येतो. दोघेजण टी. व्ही. घ्यायचे
ठरवतात. बंगल्यात बाकी फर्निचर असते.
संध्याकाळचे सहा वाजलेले असतात. दोघेजण अमोलला
घेऊन तालुक्याच्या गावी जातात. अर्धा तासाचेच अंतर असते. एका चांगल्या शोरूममधून २ स्मार्ट टी. व्ही. व
जोडीला २ डिश विकत घेतात. डिलिव्हरीसाठी पत्ता
देऊन परत येतात.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी टी. व्ही. व डिश येतात. अमोल व शोभना बंगल्यावरच असतात. ते सर्व
फिटिंग करवून घेतात व दोन्ही टी. व्ही. बरोबर चालत असल्याची खात्री करतात.
अमोल - आज साहेब आणि मॅडम घरी आले कि खुश होतील.
शोभना - खरं आहे, दोघांना शहरात रहायची
सवय. इथे कसा वेळ जाणार त्यांचा?
अहो, पण मला सारखं वाटत ...
अमोल - काय?
शोभना - जेव्हा दोघांना मी पहिल्यांदा बघितले, तेव्हा
मला तर ते नवरा - बायकोच वाटले. एकमेकांशी किती प्रेमाने बोलतात ते? आणि नेहमी एकत्रच असतात.
अमोल - अग, नाही. दोन वेगवेगळे बंगले भाड्याने गेले तेव्हाच मला समजले कि साहेब आणि मॅडम अविवाहित आहेत. पण दोघेजण एकमेकांना शोभून दिसतात बघ.
शोभना - जाऊ दे, आपण कशाला त्यांच्या खाजगीत पडा?
संध्याकाळी आल्यावर केयुर आणि अनन्या दोघेजण खुश होतात. टी. व्ही. व्यवस्थित चालू होतात.
आता २ आठवडे होतात. कंपनीतून काही माणसे परत जाणार असतात. कारण काही दिवसांपुरतेच त्यांना येथे पाठवले असते. तिकडेदेखील माणसांची गरज असतेच. केयुर आणि अनन्या यांच्या हाताखाली आता फक्त २० जुनी माणसे असतात.
२ आठवडे झाले म्हणून शनिवारी दोघांचे आई - वडील भेटायला येतात. २ दिवस राहून परत जातात.
आता येथील प्लॅन्टसाठी नवीन माणसांची भरती करायची असते. अजुन २ आठवड्यांत प्रोडक्शन सुरु होणार असते. शिक्षित तसेच अकुशल दोन्ही प्रकारच्या लोकांची गरज असते. साधारण १०० माणसांची आत्ता गरज असते. प्रोडक्शन जोरात सुरु झाल्यावर अजून लोकांची गरज पडणार असते. सर्व नियुक्त्यांचे अधिकार केयुर आणि अनन्याला असतात.
गावातील तसेच आजुबाजुच्या गावातील लोकांचा शेती व बाग हा प्रमुख व्यवसाय असतो. तसेच पर्यटन व इतर जोडधंदेदेखील असतात. त्यामुळे नोकरीसाठी फार अर्ज येत नाहीत.
एके दिवशी रात्री जोशीकाकांकडे जेवताना विषय निघतो -
केयुर - पराग व प्राची वहिनी तुमचे शिक्षण किती झाले आहे?
पराग - मी बी.कॉम. आहे व बरोबर कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेले आहे. अकौंटसाठीचा वेगळा कोर्स देखील केलेला आहे.
प्राची - मी देखील बी.कॉम आहे. माझा देखील कॉम्प्युटरचा कोर्स झाला आहे.
अनन्या - मग तुम्ही दोघांनी आमच्या कंपनीत अॅप्लाय का केला नाहित?
पराग - अहो मॅडम, कसे आहे कि आमचे उद्योग बरेच आहेत. येथील कंपनीत नोकरी करायची आमची खुप इच्छा आहे. पण आमची कंपनीत ओळख नाही.
जोशी काका (हसत) - पराग, आम्ही बोलायचेच विसरलो, अरे हे दोघे तेथील हेड आहेत. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही करा नोकरी. मी आणि आई घरचे बघु.
पराग व प्राचीचा बायो - डेटा टाईप केलेला नसतो.
परंतु ओळख व विश्वासातले म्हणून त्यांचा साध्या कागदावर बायो - डेटा लिहून घेतला जातो व त्यांना २ दिवसांनी कामावर रुजू व्हायला सांगितले जाते.
पूर्ण जोशी फॅमिली दोघांचे आभार मानते.
१ महिन्याच्या आत प्रोडक्शन सुरु होते.
आता केयुर व अनन्या दोघांचे काम वाढते.
ठाण्यावरून आलेली २० माणसे १ - १ डिपार्टमेंट सांभाळत असतात. पराग अकाउंट, तर प्राची पर्चेस डिपार्टमेंट बघत असते.
केयुर व अनन्या १ महिन्यात घरी म्हणजे ठाण्याला गेलेली नसतात. आता त्यांना घरची आठवण येऊ लागते. पण दोघांनी एकदम जाऊन उपयोग नसतो. कारण प्लॅन्ट २४ तास चालू असतो. एकाला गावातच थांबावे लागणार असते. त्यामुळे आधी अनन्या ठाण्याला जाऊन येईल व त्यानंतर केयुर जाईल असे दोघांचे ठरते.
येत्या शनिवारी हाफ डे टाकुन अनन्या ठाण्याला जायला निघते. एवढे लांबचे ड्रायव्हिंग कसे करायचे म्हणून अनन्या बसनेच निघते.
संध्याकाळी घरी आल्यावर केयुरला खूप कंटाळा येतो. कारण आज अनन्या बरोबर नसते. अमोल व शोभना अजून गेलेले नसतात. त्यांचे बागेत काम चालू असते. घरी आल्यावर केयुर फ्रेश होतो व चहा ठेवतो. घरात काहि लागलेच तर, म्हणून दोघांच्या घरात इलेक्ट्रिक शेगडी असते. चहा बनवून केयुर त्या दोघांना हाक मारतो.
शोभना - साहेब, चहा छान झाला आहे. तुम्हाला बाकीचे पण पदार्थ बनवता येतात का?
केयुर (हसून) - अहो ताई, थोडं थोडं जमत. जास्त काही येत नाही.
अमोल - साहेब, उद्या आम्हाला दोघांना बाजूच्या गावात नातेवाईकांकडे जायचे आहे. त्यामुळे उद्या आम्ही दोघे नाही आलो तर चालेल ना?
केयुर - अरे उद्या तर रविवार आहे. तुमचा सुट्टीचा दिवस. मग विचारतोस का?
शोभना - तस नव्हे, उद्या तुम्ही एकटे आहात. मॅडम नाहीत.
केयुर - तुम्ही दोघे काळजी करु नका. जा तुम्ही.
नंतर शोभना व अमोल घरी जातात.
रात्री जेवण झाल्यावर केयुरला अनन्याचा कॉल येतो. ती सुखरूप ठाण्याला पोहोचली असते. थोडे बोलून झाल्यावर केयूर झोपतो. सकाळी ७ वाजेपर्यंत त्याला जाग येते. ब्रश करून तो चहा पितो आणि बरोबर बिस्किटे खातो.
सकाळचे ९ वाजलेले असतात. थोडा फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडतो. पाऊस पडत असल्यामुळे बरोबर छत्री असतेच. गावाच्या बाहेर एक नदी वाहत असते. बाजूला भरपूर झाडे असतात. केयुर ते सर्व निसर्गसौंदर्य पहात पहात मोबाईलवर फोटो शूट करत असतो. केयुर नदीच्या जवळ येऊन पोहोचतो. पावसामुळे नदीला भरपूर पाणी असते.
तेव्हड्यात कोणत्या तरी स्त्रीचा आवाज त्याच्या कानावर पडतो. "वाचवा, वाचवा".
एक तरुण स्त्री नदीच्या मध्यभागी बुडत असते.
क्रमशः
कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा