Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "कृष्णविवर(भाग४शेवटचा)"

Read share best Marathi katha free "कृष्णविवर(भाग४शेवटचा)"

मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free



लेखक - केदार शिवराम देवधर ( पेण - रायगड )


कृष्णविवर - भाग ४ (शेवटचा भाग)


भाग ४ (शेवटचा भाग) 


आशिषचे वडील लगेचच विशाखाच्या घरी फोन करतात. विशाखा कुठे आहे ते विचारतात? विशाखाचे वडील घडलेला प्रकार सांगतात. आशिषचे वडीलदेखील, आशिष गायब असल्याचे सांगतात. दोन्ही फॅमिली लगेचच डॉक्टर वामनांच्या घरी एकमेकांना भेटायचे ठरवतात.


आशिषचे आई-वडील लगेचच गाडीने डॉक्टर वामनांच्या घरी पोहोचतात. विशाखाचे आई-वडील देखील तिथे येतात. डॉक्टर वामनांना घडलेला प्रकार समजतो.


डॉ. वामन - आपलं सर्वांचं चुकलं. आपण आशिष आणि विशाखाला लग्नाविषयी विचारायला हवं होतं. वेळीच त्या दोघांचे लग्न न केल्यामुळे ती दोघे जण पळून गेली असणार. घरून विरोध होईल अशी भीती कदाचित त्यांना वाटली असेल. 


आशिषची आई - आशिष लग्नाला तयार नव्हता. विशाखा आणि आशिष दोघांची व्यवस्थित ओळख झाल्यावर, त्या दोघांना एकमेकांविषयी काय वाटते ते आम्हाला बघायचे होते. आधी जर आम्ही काही त्याला विचारले असते तर कदाचित त्याने विशाखा बरोबर भेटीगाठी करणे सोडून दिले असते.


विशाखाची आई - आम्हाला देखील विशाखा स्वतःहून काय सांगते ते बघायचे होते. 


विशाखाचे वडील - परंतु ही एवढी मॉडर्न मुलं, एकमेकांवर प्रेम आहे हे आपल्याला सांगायला घाबरली कशी? आपण त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नाही असे त्यांना कसे वाटले?


आशिषचे वडील - पण आता त्या दोघांना शोधायचे कसे? दोघांचे थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न मी बघत होतो.


डॉ. वामन - हे बघा तुमची काळजी मी समजू शकतो. परंतु तुम्ही काळजी करणे सोडून द्या. कारण दोन्ही मुलांनी पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, ती दोघेजण पंधरा दिवसांमध्ये परत येणार आहेत. आता लग्न करूनच ती परत येतील. मागाहून तुम्ही मोठ्या थाटात रिसेप्शन करा.


सर्वांनाच डॉक्टर वामनांचे बोलणे पटते. सर्वजण आपापल्या घरी जातात. परंतु दोघांच्या आई-वडिलांनी केलेली शोधाशोध बघून, दोघांच्या आजूबाजूला बातमी वाऱ्यासारखी पसरते की, आशिष आणि विशाखा पळून गेले.


तिकडे आशिष आणि विशाखाचा अंतराळ प्रवास चालू असतो. सूर्यमालेतील एक एक ग्रह ओलांडून ते दोघेजण पुढे जात असतात. आपण स्वप्नात तर नाही ना असे दोघांना वाटत असते. सूर्यमालेच्या शेवटी काही स्पेस शिप फिरताना त्यांना दिसतात. याचा अर्थ या विश्वामध्ये दुसरीकडे देखील वस्ती आहे, असे दोघांच्या लक्षात येते. सूर्यापासून दूर गेल्यामुळे तिथे सर्वत्र अंधार पसरलेला दिसत असतो. त्या अंधारात देखील ग्रहतारे चमकत असतात. अंतराळात वेळ मोजण्यासाठी अशिष ने बरोबर स्पेशल वॉच घेतलेले असते. आता साधारण एक दिवस उलटलेला असतो.


आशिष - विशाखा आता आपल्याला सावध रहायला हवे. आपल्या मंदाकिनी आकाशगंगेची हद्द आता संपत आहे. लवकरच कृष्णविवर (ब्लॅक होल) लागेल. आपल्याला ज्या व्यक्तीने माहिती दिली आहे ती जर खरी असेल तर ठीक, नाहीतर एकदाका कृष्णविवरात शिरले की परतीचा मार्ग बंद. आयुष्यभर आपण असेच अडकून राहू.


विशाखा - पण आपल्याला असे फसवून त्या व्यक्तीला फायदा काय? तिच्या आवाजावरून तरी ती व्यक्ती मला विश्वासार्ह वाटली. 


ते दोघेजण कृष्णविवरात कधी शिरतात, ते त्यांनाच कळत नाही. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरलेला असतो. काहीच दिसत नसते. विशाखा घाबरून जाते. आशिष तिला धीर देतो. दोघे जण पुढे सरकत असतात. परंतु अंधार मात्र संपत नसतो. सतत एक दिवस प्रवास करून देखील कृष्णविवर संपत नसते. तेवढ्यात दोघांना एक निळा स्पॉट दिसतो. दोघांना हायसे वाटते. दोघेजण त्या निळ्या स्पॉटच्या दिशेने जातात. तो निळा स्पॉट म्हणजे एक मोठी वाट असते. बाहेर असलेल्या प्रकाशामुळे तो निळा स्पॉट दिसत असतो. आशिष आणि विशाखा त्या निळ्या स्पॉटमधून बाहेर येतात. आता थोडासा प्रकाश अंतराळात पसरलेला दिसत असतो. त्यामध्ये ग्रहतारे  चमकत असतात. 


विशाखा - आपण बहुतेक कांचनगंगा आकाशगंगेत प्रवेश केलेला आहे. पण आता पुढे कसे जायचे?


तेवढ्यात त्यांचा ऑडियो कॅचर व्हायब्रेट होऊ लागतो.


आशिष - बघ काहीतरी मेसेज आलेला दिसतोय.


विशाखा तो ऑडिओ मेसेज ऐकते - "कांचनगंगा आकाशगंगेत तुमचे स्वागत आहे. तुमची पृथ्वी अंतराळातून जशी दिसते त्याचप्रमाणे परंतु आकाराने मोठा असा,आमचा ग्रह तुम्हाला दिसेल. सरळ येत राहा." 


या मेसेज चा अर्थ विशाखा आशिष ला सांगते. दोघेजण सरळ जात राहतात. खरोखरच दुरून पृथ्वी सारखाच परंतु आकाराने मोठा ग्रह त्यांना थोड्या अंतरावर दिसतो. आशिष आणि विशाखा त्या ग्रहावर उतरतात.

PLANET AT STORY KRUSHNVIVAR


तेवढ्यात तेथे पृथ्वीवरील माणसांसारखीच परंतु थोडी जास्त सुदृढ अशी माणसे येतात. आशिष आणि विशाखा इन्स्ट्रुमेंट च्या साह्याने आपल्या मूळ रूपात परत येतात.

त्या माणसांमध्ये एक थोडासा वयस्कर परंतु चेहऱ्यावर तेज असलेला एक माणूस असतो. तो या दोघांचे स्वागत करतो. तेथे एक हेलिकॉप्टर सारखे दिसणारे वाहन असते. आशिष आणि विशाखा त्या सर्व माणसांबरोबर त्या वाहनामध्ये बसतात. हेलिकॉप्टर आकाशात उडू लागते. परंतु त्याची उडण्याची सिस्टीम पृथ्वीवरील सिस्टीम पेक्षा वेगळी असते. त्याच्या पंख्याचा आवाज देखील येत नसतो. तो माणूस स्वतःची ओळख मोरेश्वर अशी करून देतो. थोड्याच वेळात ते हेलिकॉप्टर एका बिल्डिंगच्या टेरेसवर लँड होते. सर्वजण उतरतात. मोरेश्वर त्या दोघांना घेऊन एका रूममध्ये जातात.


आशिष - काका तुम्ही पृथ्वीवरील दिसताय, तुम्ही कोण? इथे कसे? मला बरेच प्रश्न पडलेले आहेत.


मोरेश्वर - आमची मूळची भाषा संस्कृत आहे. परंतु तुला संस्कृत कळत नाही असे दिसते. त्यामुळे मी मराठी मध्ये बोलतो. तुम्ही जी मराठी बोलत आहात ती काळानुरूप बदललेली आहे. परंतु आमची मराठी भाषा तशीच जुनी आहे. येथील काही शब्द तुला वेगळे वाटतील. हजारो वर्षांपुर्वी आमचे पुर्वज पृथ्वीवरून इकडे आले. तेव्हा बऱ्यापैकी प्रगत असलेले पृथ्वीवरील तंत्रज्ञान काळाच्या ओघात लुप्त झाले. या ग्रहाला त्यांनी "माया" असे नाव दिले. इथेच आमची वस्ती वाढत गेली. तसेच प्रगती देखील होत गेली. पुढे गरज नसल्यामुळे आमचा पृथ्वीशी असलेला संबंध तुटला. तसेच निर्माण झालेले कृष्णविवर हादेखील दळणवळणासाठी मोठा अडथळा होता. आता झालेल्या प्रगतीमुळे आम्ही पृथ्वीपर्यंत परत येऊ शकतो. परंतु येथील राहणीमान अत्यंत उच्च दर्जाचे असल्यामुळे आम्ही येथेच राहणे पसंत करतो. 


विशाखा - काका, उपेंद्र आणि रूपाली कोण? आम्हाला इथे बोलावण्यामागचे कारण काय? 


मोरेश्वर - तुम्ही दोघे जण उपेंद्र आणि रुपाली आहात.


विशाखा - काका हे तुम्ही काय सांगत आहात?


मोरेश्वर - ती खूप मोठी गोष्ट आहे. उपेंद्र आणि रूपाली माझा मुलगा आणि सून. ते दोघेजण शास्त्रज्ञ होते. आमच्या येथील शास्त्रज्ञांच्या एका समूहाने एक संशोधन केले होते. माणूस हा माती पासून बनलेला आहे असे म्हणतात, मृत्युनंतर देखील तो मातीतच मिसळतो. त्यामुळे माणसाची प्रतिकृती बनवायची असे त्या समूहाने ठरविले. अथक परिश्रमानंतर त्यांना यश देखील मिळाले. परंतु नैसर्गिक रित्या मानवाच्या चलनवलनासाठी त्याच्या शरीरात आत्मा असणे गरजेचे आहे. मानवाने कितीही जरी प्रगती केली तरी आत्मा बनवणे त्याला शक्य नाही. ती सर्व देवाची लीला आहे.


आशिष - काका, मग त्यासाठी काय केले?


मोरेश्वर - फार पूर्वी पृथ्वीवरील मानवाचे आयुष्य फक्त शंभर वर्षे नव्हते. परंतु काळाच्या ओघात पृथ्वीवरील मानवाचे आयुष्य कमी होत गेले. परंतु "माया" हा ग्रह दिव्य लोकांच्या जवळ असल्यामुळे येथील आयुष्यमान मात्र हजारो वर्षे राहिले. येथील पवित्र आचरणामुळे मृत्यूनंतर आत्मा थेट पुढच्या जन्माला किंवा मोक्ष पदाला जातो. तो भटकत राहत नाही. तसेच येथे विज्ञानात प्रगती होत गेली, परंतु तंत्रविद्या मात्र मागे पडली. त्यामुळे या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील तांत्रिकांशी संधान साधले. खरे म्हणजे परब्रह्माच्या कार्यात हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. तीच चूक नडली. उपेंद्र आणि रुपालीने त्यांना विरोध केला होता. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. 


आशिष - हे सर्व अविश्वसनीय आहे.


मोरेश्वर - परंतु हे सर्व खरे आहे. जसे आमच्या येथील शास्त्रज्ञांना तंत्रविद्या माहिती नव्हती, तसेच पृथ्वीवरील तांत्रिकांना प्रगत विज्ञान माहीत नव्हते. आमच्या शास्त्रज्ञांनी मनुष्य देहाच्या प्रतिकृती आणि त्या बनवण्याचे तंत्रज्ञान त्या तांत्रिकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर उपयोग संपल्यामुळे त्या दुष्ट तांत्रिकांनी आमच्या शास्त्रज्ञांना बंदिस्त केले. गेल्या काही वर्षांमध्ये, त्या प्रतिमानवी देहांमध्ये भटकते आत्मे भरण्यात त्या तांत्रिकांना यश आले आहे. त्यांना काबूत ठेवून ते त्यांचा दुरुपयोग करत आहेत. सध्या पृथ्वीवरील सागरी हद्दीत  होणारी लूटमार ही त्यांच्याकडूनच केली जात आहे. उपेंद्र आणि रूपाली तुम्ही दोघे जण त्या शास्त्रज्ञांना वाचवण्यासाठी गेला होतात, परंतु पृथ्वीच्या वातावरणात शिरताच त्या तांत्रिकांनी तुम्हाला नष्ट केले.


विशाखा - परंतु त्यांचाच पुनर्जन्म होऊन आशिष आणि विशाखाच्या रुपात आम्ही जन्माला आलो हे तुम्हाला कसे कळले?


मोरेश्वर - फक्त बाह्य खुणा नव्हे, तर आत्म्या वरून ओळख पटविण्याचे तंत्रज्ञान आमच्या येथे विकसित झालेले आहे. जेव्हा तुम्ही दोघे जण अंतराळात आलात तेव्हाच आम्हाला कळले की, उपेंद्र आणि रूपालीचा पुनर्जन्म झालेला आहे.


विशाखा - येथील तंत्रज्ञान जर इतके प्रगत आहे तर तुम्ही त्या तांत्रिकांचा बंदोबस्त का करू शकत नाही?


मोरेश्वर - आमचे शास्त्रज्ञ त्यांच्या ताब्यात आहेत. शिवाय त्यांना मिळालेले तंत्रज्ञान डीएक्टिवेट करणे हे फक्त उपेंद्र, रूपाली आणि त्या शास्त्रज्ञांना माहित आहे. शिवाय पृथ्वीच्या वातावरणात शिरताच ते तांत्रिक आम्हाला नष्ट करू शकतात.


आशिष - पण आम्हाला तर काहीच आठवत नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून माझे मन काहीतरी शोधत होते. इथे आल्यावर मला जे शोधत आहे ते मिळाले असे वाटले. 


मोरेश्वर - तुम्ही दोघेजण  फिजिक्स मधील शास्त्रज्ञ आहात. त्याशिवाय मनुष्यदेहाला कॉम्प्रेस करून त्याचे गॅस ऍटम मध्ये कन्व्हर्ट करण्याचा तुझा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे. या अशा स्थितीमध्ये ते तांत्रिक कोणाला ओळखू शकणार नाहीत.


विशाखा - कशावरून आमचा उपयोग करून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी खोटे बोलत नाही?


मोरेश्वर - तुझे बोलणे बरोबर आहे. कसं आहे की, पूर्वस्मृती या आत्म्यामध्ये साठवलेल्या असतात. पुनर्जन्म झाल्यामुळे तुमचा मेंदू त्या स्मृती आत्म्याकडून ग्रहण करू शकत नाही. तुम्ही दोघे जण माझ्याबरोबर प्रयोगशाळेत चला. तिथे प्रक्रिया करून तुमच्या मेंदूला आत्म्याकडे असलेल्या पूर्व स्मृती ग्रहण करण्यास सक्षम बनवता येईल. त्यानंतर तुमचे तुम्ही काय ते ठरवा.


आशिष आणि विशाखा या कामासाठी तयार होतात. प्रयोगशाळेत दोघांच्या मेंदुवर प्रक्रिया केली जाते. हळूहळू दोघांच्या पूर्व स्मृती जागृत होतात. खरोखरच आपण माया ग्रहावरचे रहिवाशी आहोत हे त्यांना कळून चुकते. पृथ्वीच्या वातावरणात मृत्यू आल्यामुळे त्यांचा पुनर्जन्म देखील पृथ्वीवरच झाला हे त्यांना कळून चुकते. 


मोरेश्वर - उपेंद्र, आता तू तुझ्या आईला आणि इतर भावंडांना देखील भेटून घे. रूपाली तुदेखील तुझ्या आई वडिलांना भेटून घे. त्यानंतर आपल्या अध्यक्षांना भेटा.


आशिष आणि विशाखा सर्वांना भेटून घेतात. त्यानंतर तेथील अध्यक्षांची ते भेट घेतात. शास्त्रज्ञांना सोडविण्यासाठी काही निवडक संरक्षक अधिकारी पृथ्वीवर घेऊन जाण्याविषयी अध्यक्ष सुचवतात. 


आशिष - पृथ्वीवरील संरक्षण यंत्रणांना कल्पना देऊन नंतरच आपल्याला आपले काम करता येऊ शकेल. मला पृथ्वीवरील आमच्या यंत्रणांशी संपर्क साधुन द्या. त्यांना या परिस्थितीची पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.


अध्यक्ष - तुझे म्हणणे बरोबर आहे. आपण वैश्विक लहरींद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू.


विशाखा - पण आपण सांगितलेल्या गोष्टींवर पृथ्वीवरील संरक्षण यंत्रणांचा विश्वास बसेल काय?


आशिष - येथून पाठवलेल्या लहरी या निश्चितच वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्या लहरी पृथ्वीवर कॅच होऊ शकतील. परंतु या लहरी पृथ्वीवरील नाही हे त्यांच्या त्वरित लक्षात येईल. त्यामुळे आपण सांगितलेल्या गोष्टी त्यांना थोड्याफार प्रमाणात तरी पटतील.


त्वरित माया ग्रहावरून एक संदेश पृथ्वीवर प्रक्षेपित केला जातो. त्या तांत्रिकांचे सागरातील स्थान देखील कळविले जाते. वेगळ्या स्वरूपात आलेला संदेश बघून पृथ्वीवरील संरक्षण यंत्रणा चकित होतात. एका पृथ्वीवासीयानेच दुसऱ्या ग्रहावर जाऊन हा संदेश पाठविला आहे, हे ऐकून त्यांचा विश्वासच बसत नाही. परंतु संदेश लहरी या बाहेरून आलेल्या आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना विषयाचे गांभीर्य कळून येते.


अध्यक्ष - जाण्यापूर्वी आपट्याच्या झाडाला वंदन करून जा. आपल्या येथील ती परंपरा आहे. आपट्याचे झाड आपल्या इथे अत्यंत पवित्र मानले जाते.


आशिष आणि विशाखा बरोबर संरक्षण अधिकारी तयार होतात. प्रथम आपट्याच्या झाडाला वंदन केले जाते. आशिष आणि विशाखा त्यांची इन्स्ट्रुमेंट सज्ज करतात. सर्वजण प्रत्येकी एका सूक्ष्म गॅस ऍटम मध्ये परिवर्तित होतात. आधी लागलेले कृष्णविवर परत पार करावे लागते. मंदाकिनी आकाशगंगेत प्रवेश करून सर्वजण पृथ्वीच्या दिशेने झेपावतात. 


सर्वजण तांत्रिक असलेल्या बेटावर पोहोचतात. या सर्वांच्या येण्याची चाहूल तांत्रिकांना लागत नाही. त्यामुळे ते तंत्रविद्येचा वापर करू शकत नाहीत. लवकरच मूळ रूपात येऊन आशिष आणि विशाखा संरक्षण अधिकाऱ्यांच्या सहाय्याने त्या तांत्रिकांच्या मुसक्या आवळतात. तोपर्यंत पृथ्वीवरील संरक्षण यंत्रणा तेथे दाखल होतात. आता प्रश्न राहतो तो प्रतीमानवी घातक  जीवांचा. हजारोंच्या संख्येने ते समुद्रात धुडगुस घालत असतात. तांत्रिकांना पकडल्याची बातमी अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते. लवकरात लवकर त्या प्रतिमानवांचा बंदोबस्त करणे गरजेचे असते.


बंदिस्त असलेल्या शास्त्रज्ञांची आशिष भेट घेतो. माया ग्रहावरून तुम्हाला सोडवण्यासाठी संरक्षक अधिकारी आणि मी आलो असल्याचे सांगतो. लगेचच या शास्त्रज्ञांना सोडविले जाते. शास्त्रज्ञांच्या मदतीने त्या बेटावर स्थापन केलेले प्रतिमानव बनविण्याचे तंत्रज्ञान डिएक्टिव केले जाते. त्याच वेळी प्रतिमानव नष्ट होतात. आता ही मशिनरी देखील नष्ट करा असे आशिष त्या शास्त्रज्ञांना सुचवितो. नाहीतर परत त्या मशिनरीचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. परंतु प्रतिमानव बनविण्याची ती मशिनरी सहजासहजी नष्ट करणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. कारण अत्यंत स्पेशल अशा माया ग्रहावरील धातूंपासून ती मशिनरी बनविलेली असते. 


विशाखाला एक युक्ती सुचते. ती सुचवते की ही मशिनरी जर कृष्णविवरामध्ये ढकलून दिली, तर कालांतराने ती आपोआपच नष्ट होत जाईल. सर्वांनाच विशाखाची युक्ती आवडते. 


आशिष (शास्त्रज्ञांना) - आपण जसे कृष्णविवरामधून प्रवास करू शकतो, तसे इतर कुठल्या ग्रहावरून कोणी कृष्णविवरात गेले आणि जर त्यांनी त्या मशिनरीचा दुरुपयोग केला तर काय करायचे?


शास्त्रज्ञांचा प्रमुख - आम्ही त्या कृष्णविवराचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. मंदाकिनी आणि कांचनगंगा या दोन्ही आकाशगंगांच्या एका टोकाला हे कृष्णविवर आहे. समज, एखाद्या बादलीला वरच्या बाजूला जर समोरासमोर दोन भोके पाडली, तर एका भोकातून टाकलेली काडी दुसऱ्या भोकातून बाहेर पडू शकते. त्या बादलीला पडलेली समोरासमोरील दोन भोके म्हणजेच आपल्या दोन्ही आकाशगंगांची दोन टोके आहेत असे समज. त्यामुळेच आपण एकमेकांच्या आकाशगंगांमध्ये त्या कृष्णविवराच्या आतून सरळ प्रवास करून बाहेर पडू शकतो. ऊर्ध्वदिशेने ते कृष्णविवर बंद आहे. खालच्या दिशेने मात्र त्या कृष्णविवराला अंत नाही. त्या कृष्णविवराच्या खालच्या बाजूने दूर-दूर पर्यंत आम्ही मानवरहित याने पाठवुन अभ्यास केला. परंतु त्यातून खालच्या बाजूने बाहेर पडायला कुठेच मार्ग नाही. आपल्याला हि मशिनरी खालच्या बाजूला ढकलून द्यायची आहे. पुढे पुढे जात राहून ही मशिनरी हळूहळू नष्ट होत जाईल. अशा प्रकारे या मशिनरीचा कोणीही दुरुपयोग करु शकणार नाही.


शास्त्रज्ञांनी समजावल्यावर आशिषला ही गोष्ट पटते.

माया ग्रहावरून स्पेशल यान बोलाविले जाते. त्याच्या सहाय्याने ती अवजड मशिनरी उचलून कृष्णविवरामध्ये खालच्या बाजूला ढकलून दिली जाते. शास्त्रज्ञ देखील सर्वांचा निरोप घेऊन माया ग्रहावर परत जातात.


सर्व न्यूज चॅनेल वर ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. आशिष आणि विशाखाच्या सर्वत्र मुलाखती दिसू लागतात. दोघांच्या संशोधनासाठी त्यांना फार मोठे पारितोषिक मिळते.


आशिष आणि विशाखा आपापल्या घरी पोहोचतात. हे दोघेजण लग्न करण्यासाठी नव्हे तर दुसऱ्या कामासाठी घरातून पळून गेले होते, हे आता घरच्यांना कळून चुकते. मुलांनी केलेल्या कामगिरीचा त्यांना अभिमान वाटतो.  


दोन्ही मुले डॉक्टर वामन यांची भेट घेतात. 

आशिष - काका, माझ्या आणि विशाखाच्या हातावर तुम्ही असेल काय पाहिले, की त्यामुळे आमचे लग्न जुळवून आणावे असे तुम्हाला वाटले?


डॉ. वामन - आता तुमच्या लक्षातच आले आहे, तर तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. प्रथम मी तुझ्या हस्तरेषा जेव्हा बघितल्या तेव्हा तुझ्या हातावर मला छोटेसे आपट्याच्या पानाचे चिन्ह दिसले. असे चिन्ह मी आजपर्यंत कोणाच्याच हातावर बघितलेले नाही. काही दिवसांनी जेव्हा मी विशाखाला तपासत होतो, तेव्हा तिच्या हातावर देखील तसेच चिन्ह मला दिसले. हा योगायोग नसणार हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे तुमचे दोघांचे लग्न जुळवावे असे मला वाटू लागले. परंतु तुम्ही दोघे जण तर माया ग्रहापर्यंत जाऊन आलेले आहात. त्यामुळे तुला या चिन्हाविषयी काही कळले असल्यास मला सांग.


आशिष आणि विशाखा दोघेजण घडलेला सर्व वृत्तांत डॉक्टरांना कथन करतात. आता आपट्याच्या पानाचे चिन्ह आशिष आणि विशाखाच्या हातावर कसे आले हे त्या तिघांनाही कळून चुकते.


आता दोघांच्याही घरचे लोक लग्नाच्या तयारीला लागतात. एका चांगल्या मुहूर्तावर आशिष आणि विशाखाचे लग्न पार पडते. लग्नासाठी माया ग्रहावरून देखील निवडक लोक येतात.


समाप्त


या ब्लॉगवरील पुढील कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...