Read best Marathi online gudh katha love story free मराठी
लेखक - केदार शिवराम देवधर ( पेण - रायगड )
कृष्णविवर - भाग ३
भाग ३
विशाखा - मला नक्की आवडेल. माझे इन्स्ट्रुमेंट सध्या मी इथेच ठेवते.
आशिष - नको ती तुझी मेहनत आहे. इथे जर त्याला काही हानी झाली तर मला अपराधीपणा वाटेल.
विशाखा - तू काळजी करू नकोस. सायन्स मधील अत्यंत साधी अशी तत्वे वापरून मी हे इन्स्ट्रुमेंट बनवलेले आहे. एकदा बनवल्यामुळे त्याचा फॉर्मुला मला नीट माहिती आहे, तसेच मी तो लिहून देखील ठेवलेला आहे. असे एक इन्स्ट्रुमेंट बनवायला मला आता जास्तीत जास्त आठ दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट येथेच ठेव. मी परत जेव्हा येईन तेव्हा आपण याच्या सहाय्याने अंतराळ प्रवास नक्की करू.
आता जेवणाची वेळ झाल्यामुळे दोघेजण जेवण्यासाठी घरामध्ये येतात.
आई - झाले का तुमचे प्रयोग?
आशिष - हो आई आता जेवायला वाढ. खूप भूक लागली आहे.
विशाखाला श्रीखंड आवडत असल्यामुळे, आशिषच्या आईने मुद्दाम श्रीखंड विकत आणलेले असते. त्याच्या जोडीला पुर्या देखील बनवलेल्या असतात. सर्वजण पोटभर जेवतात. विशाखा सर्वांचा निरोप घेऊन घरी परतते.
काही दिवसांनी आशिषला असा भास होऊ लागतो की, सूक्ष्म अशा कोणत्यातरी ध्वनिलहरी त्याच्या कानापर्यंत पोहोचत आहेत. परंतु त्यांचा अर्थबोध त्याला होत नसतो. खरंच कोणत्या ध्वनिलहरी येत आहेत की भास आहे ते तपासण्यासाठी तो प्रयोगशाळेमध्ये जातो. ध्वनिलहरी कॅच करण्यास सायंटिस्ट लोकांना उपयुक्त असे इंस्ट्रूमेंट (ऑडिओ कॅचर) त्याने विकत घेतलेले असते. इन्स्ट्रुमेंट ऑन करून तो चेक करू लागतो. खरोखरच त्याला एक मेसेज आलेला असतो. तो मेसेज संस्कृतमध्ये असतो. आता आली का पंचाईत - आशिष स्वतःशीच बोलतो. कारण त्याला संस्कृत नीटपणे कळत नसते. बाकी कोणाला विचारून उगाच गोंगाट करण्यात त्याला इंटरेस्ट नसतो. म्हणून तो, विशाखाला कॉल करून तिचा सल्ला घेण्याचे ठरवतो.
आशिष - हॅलो विशाखा, एक अडचण आली आहे.
विशाखा - काय अडचण आहे?
आशिष - संस्कृतमध्ये एक मेसेज आलेला आहे. मला त्याचा अर्थ कळत नाही. ध्वनिलहरी कॅच करून मला तो मेसेज समजला, परंतु अर्थ कळत नाही. मी त्याची ऑडिओ फाईल सेव्ह केलेली आहे.
विशाखा - मला थोडं फार संस्कृत कळतं. ती फाईल मला पाठव.
आशिष विशाखाला, त्या मेसेजची ऑडिओ फाईल पाठवतो. त्यात एक पुरुष बोलत असतो, ते खालील प्रमाणे -
उपेंद्र, पृथ्वीच्या वातावरण कक्षेच्या बाहेर आल्यामुळे आम्हाला तुझे अस्तित्व जाणवले. अजून तुला खूप अंतर कापून पुढे यायचे आहे. रूपाली तुला भेटली का? तुला काही आठवत आहे का?
हे सर्व ऐकून विशाखाला खूप आश्चर्य वाटते. ती लगेचच कॉल करून आशिषला सर्व काही सांगते.
आशिष - पण हे उपेंद्र आणि रुपाली दोघेजण कोण आहेत?
विशाखा - मला देखील माहित नाही. परंतु या मेसेज मध्ये उपेंद्रला उद्देशून असे सांगितले आहे की, तो पृथ्वीची वातावरण कक्षा भेदून बाहेर आलेला आहे. या उपेंद्र प्रमाणेच तुदेखील पृथ्वीची वातावरण कक्षा भेदून अंतराळात गेला होतास. कदाचित तुलाच त्या व्यक्तीने उपेंद्र असे संबोधिले आहे. पण का ते मात्र कळत नाही.
आशिष - याचा अर्थ मी अंतराळात गेल्यामुळे मला हा मेसेज आला. मी अत्यंत सूक्ष्म रुपात असून देखील, कोणाला तरी माझे अस्तित्व जाणवले. एकदा आपण दोघेही अंतराळात जाऊन येऊ. बघू परत काही मेसेज येतो का ते.
विशाखा - पर्वा रविवार आहे. मी परत एकदा तुझ्याकडे येते.
आशिष - चालेल नक्की ये.
विशाखा - मी अशी नेहमी नेहमी तुमच्याकडे आलेली तुझ्या आई-वडिलांना आवडेल का पण?
आशिष - तू त्यांची काळजी करू नकोस. ते खूप चांगले आहेत. घरी माणसे आलेली त्यांना आवडतात. तू आलीस तर त्यांना खूपच आवडेल, कारण तू त्यांच्या साठी स्पेशल आहेस.
विशाखा - का, मी का बरे स्पेशल?
आशिष - जसे काही तुला माहीतच नाही.
विशाखा - नाही माहित, सांग.
आशिष - ते तुला सून करून घेण्याच्या विचारात आहेत. फक्त मला ते अजून बोललेले नाहीत.
विशाखा - ते काहीपण पण विचार करतील, पण तू कोणाचातरी जावई व्हायला तयार आहेस का?
आशिष - म्हणजे?
विशाखा - माझ्या घरी पण तीच परिस्थिती आहे. माझ्या आई-बाबांना तू जावई म्हणून पसंत आहेस.
आशिष - अगदी खरं सांगू? जोपर्यंत मनापासून कोणाबद्दल प्रेम वाटत नाही, तोपर्यंत लग्न करायला मी तयार नव्हतो. तुला बघताक्षणीच तु मला आवडलीस. मी जे काही शोधत होतो त्यातील मला काहीतरी मिळालं.
विशाखा (हसत) - म्हणजे अजून अशा किती मुलींच्या प्रेमात पडायचे आहे तुला?
आशिष - तसं नाही गं, गेल्या काही वर्षांपासून माझी मनःशांती ढासळली होती. माझे मन कोणाला तरी शोधत होते. परंतु काय ते मात्र कळत नव्हतं. डॉक्टर वामन काकांनी माझा हात बघितला. ते हस्तरेषा तज्ञ देखील आहेत ना? त्यांनी मला नामस्मरण करायला सांगितले. त्यानंतर काही महिन्यांतच तू मला भेटलीस. त्यामुळे माझी मनःस्थिती ताळ्यावर आली.
विशाखा - आत्ता माझ्या लक्षात आले. मला तपासताना भिंगातून माझा हात डॉक्टर काकांनी का बघितला ते. आपल्याला दोघांना एकत्र आणण्यासाठीच त्यांनी पार्टी ठेवली. पण आपल्या दोघांच्या हातावर त्यांना असे काय दिसले, की त्यांनी आपल्याला एकत्र आणण्याचे ठरवले?
आशिष - तुझा हात देखील डॉक्टर काकांनी बघितला हे मला माहिती नव्हते. त्यांनाच एकदा विचारायला पाहिजे.
पण आपले रविवारचे नक्की.
विशाखा - हो नक्की.
ठरल्याप्रमाणे रविवारी विशाखा आशिष च्या घरी जाते. आशिषच्या आई-वडिलांना खूप आनंद होतो. चहापाणी झाल्यावर विशाखा आणि आशिष प्रयोगशाळेत जातात.
आशिष, त्याचे आणि विशाखाचे इन्स्ट्रुमेंट चालू करतो. दोघांचेही सूक्ष्म अशा गॅस ॲटम मध्ये रूपांतर होते. दोघेजण हवेत तरंगू लागतात. विशाखाला हा अनुभव खूपच नवीन असतो. सूक्ष्मरूपात असून देखील ते दोघे एकमेकांना बघू शकत असतात. लवकरच ते पृथ्वीची वातावरण कक्षा भेदून पार करतात. आता ते अंतराळात तरंगत असतात. थोड्या वेळात ते परत खाली येतात.
विशाखा - माझा तर विश्वासच बसत नाही आहे, की मी अंतराळात जाऊन आले. पण अंतराळात आपल्या श्वासोच्छवासाचे काय? तिथे तर ऑक्सिजन नाही. मग आपल्याला कसे जमले?
आशिष - आपण अंतराळात मनुष्य स्वरुपात नाही तर एका ॲटमच्या स्वरूपात गेलो होतो. त्यामुळे आपल्याला श्वासोच्छवासाची गरज पडली नाही. तुझ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने ॲटमला मिळालेली कॉस्मिक एनर्जी पुरेशी होती.
विशाखा - आता पुढे काय प्लॅनिंग आहे?
आशिष - तुझ्याकडे ऑडिओ कॅचर आहे ना?
विशाखा - हो.
आशिष - मग आता आपल्याला काही मेसेज येतो का ते बघत गप्प बसायचे.
विशाखा - तुला वाटते का रे, की आपल्याला काही मेसेज येईल?
आशिष - त्या मेसेज नुसार कोणीतरी मला पुढे बोलावत आहे. त्यामुळे आपण आत्ता अंतराळात गेलेले त्या व्यक्तीला नक्कीच कळले असणार. आपण वाट बघू आपल्याला काहीतरी मेसेज येईल.
दोघांचे बोलून होईपर्यंत आशिषच्या ऑडिओ कॅचरवर मेसेज येतो. परंतु तो मेसेज संस्कृत मध्येच असल्यामुळे आशिषला कळत नाही. विशाखा मात्र तिथेच असल्यामुळे त्या मेसेजचा अर्थ तिच्या लक्षात येतो.
विशाखा - ह्या मेसेज मधील व्यक्ती उपेंद्रला सांगत आहे की, उपेंद्र तू आणि रूपाली दोघेही एकमेकांना भेटलात हे खूप चांगले झाले. तुम्ही दोघे जण लवकरात लवकर अंतराळात ऊर्ध्वदिशेने वर या. आपल्या माणसांनी केलेला प्रयोग आता नुकसानकारक सिद्ध होत आहे. त्या लोकांनी समुद्रात खूप थैमान घातले आहे.
आशिष - मला वाटत आहे की दुसऱ्याच कोणालातरी पाठवायचा संदेश चुकून आपल्याला येत आहे.
विशाखा - समुद्रात अज्ञात टोळ्यांकडून होणाऱ्या लुटालूटीविषयी जी न्यूज सध्या गाजत आहे त्याच्याशी
संबंधित तर हा मेसेज नाही ना?
आशिष - शक्यता नाकारता येत नाही.
विशाखा - आपण परत अंतराळात ऊर्ध्वदिशेने जाऊन बघू या का?
आशिष - आपण यावर विचार करूया आणि मग काय ते ठरवू. आता आपली जेवणाची वेळ झाली आहे, त्यामुळे आपण जेवून घेऊ.
आशिष आणि विशाखा प्रयोगशाळेतून घरामध्ये येतात. सर्वांचे जेवण होते. थोडावेळ गप्पा मारून विशाखा परत तिच्या घरी जाते.
या गोष्टीला पाच-सहा दिवस होतात. विशाखा आणि आशिष दोघांनीही त्या मेसेजकडे आता दुर्लक्ष केलेले असते.
परंतु आता मात्र विशाखाला संदेश येतो - तुम्ही गप्प का आहात? आम्ही सर्वजण तुमची वाट बघत आहोत. तुम्ही आम्हाला प्रतिसाद का देत नाही आहात?
आपल्याशी कोण बोलत आहे? त्या व्यक्तीशी आपण कसा संवाद साधावा? असे प्रश्न विशाखाला पडतात.
विशाखा आशिषला कॉल करून झालेला प्रकार लगेच सांगते.
आशिष - आपल्या येथील टेक्नॉलॉजी अजून इतकी प्रगत नाही की मेसेज कुठून आला आहे त्याचा शोध घेऊन, त्याला परत रिप्लाय देऊ शकू. कारण हे सर्व मेसेज अंतराळातून म्हणजेच कुठल्यातरी परग्रहावरून येत आहेत.
विशाखा - आपण एक प्रयत्न करू शकतो. आलेल्या मेसेजलाच आपला मेसेज अटॅच करून अंतराळात प्रक्षेपित करून बघू. कदाचित त्यामुळे तो मेसेज त्याच्या आधीच्या पाथवरून रिटर्न जाईल.
आशिष - अशाप्रकारे मेसेज चा रिप्लाय जाईल का याबाबत मी साशंक आहे. पण प्रयत्न करायला हरकत नाही. तू ट्राय कर.
विशाखा खालील प्रमाणे संस्कृतमध्ये ऑडिओ मेसेज तयार करते आणि एका डिवाइस च्या सहाय्याने त्या ध्वनिलहरी, आधी आलेल्या ध्वनिलहरींना जोडून अंतराळात प्रक्षेपित करते - " आमचा हा मेसेज तुमच्या पर्यंत पोहोचेल किंवा नाही ते मला माहित नाही. परंतु आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची दोघांची नावे विशाखा आणि आशिष अशी आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आम्ही उपेंद्र आणि रूपाली नाही. तुम्ही कोण आहात?"
एक दिवसाने विशाखाला रिप्लाय येतो - आम्ही ज्या दोघांना शोधत आहोत, ती दोघेजण तुम्हीच आहात. तुमची मंदाकिनी आकाशगंगा ओलांडून पुढे या. कांचनगंगा आकाशगंगेत आपले प्लॅनेट आहे. तुमच्या आकाशगंगेच्या शेवटी असलेले कृष्णविवर तुम्हाला ओलांडावे लागेल. या विवरात प्रवेश केल्यावर सरळ मार्गक्रमणा करत रहा. कुठेहि वळु नका. पुढे जिथे कुठे निळा स्पॉट दिसेल तिथे जाऊन बाहेर पडा. अन्यथा कृष्णविवर कुठे संपत नाही. एकदा त्यात गेलेली वस्तू बाहेर पडू शकत नाही.
विशाखा लगेच कॉल करून अशिषला सांगते.
आशिष - ही काय भानगड आहे ते बघितलेच पाहिजे. कदाचित, मला ज्याचा शोध घ्यायचा होता, ते हेच तर नाही ना असे वाटू लागले आहे.
विशाखा - आशिष नुसते अंतराळात जाऊन फिरून परत येणे वेगळे आणि दुसऱ्या एखाद्या आकाशगंगेतील परग्रहावर जाणे वेगळे. यात खूप मोठा धोका आहे. कदाचित जीवावर देखील बेतू शकते.
आशिष - पण तरी तिथे आपण जाऊ. त्याशिवाय मला मनःशांती मिळणार नाही.
विशाखा - परंतु आपण अंतराळात गेल्यावर सूक्ष्म स्वरूपात असणार आणि आपली मशिनरी इथे असणार. मग आपण आपल्या मूळ रूपात तिथे प्रकट कसे होऊ शकतो?
आशिष - त्याची चिंता नको. मी इन्स्ट्रुमेंट बनवतानाच, त्यालादेखील सूक्ष्म रुपात कन्वर्ट करून हँडल करता येईल असे बनवले होते.
विशाखा - या सर्व प्रकारात आपला भरपूर वेळ जाईल. नोकरीचे काय करायचे आणि घरी देखील काय सांगायचे?
आशिष - आपण पंधरा दिवसांची रजा टाकू. तसेच इथून जाताना पंधरा दिवसात परत येत आहोत अशी चिठ्ठी घरी ठेवून जाऊ.
विशाखा - मला असे करायची भीती वाटत आहे. परंतु त्या मेसेजच्या मागील, त्या व्यक्तीचा शोध देखील घ्यायचा आहे. ती उत्सुकता देखील आहे. त्यामुळे तू म्हणतो तसेच आपण करू.
दोघेजण पंधरा दिवसांची रजा टाकतात. रजा मिळाल्यावर पहिल्याच दिवशी सकाळी, घरी चिठ्ठी लिहून दोघे जण बाहेर पडतात. दोन्ही शहरांच्या मध्ये एक खिंड असते. दोघेजण ठरल्याप्रमाणे तिथे भेटतात. ती जागा निर्जन असल्यामुळे दोघांनी ती जागा निवडलेली असते. दोघेजण आपापली इन्स्ट्रुमेंट चालू करतात. दोघांचेही इन्स्ट्रुमेंट सकट गॅस ऍटम मध्ये रूपांतर होते. दोघांचाही प्रवास सुरु होतो.
इकडे दोघांच्या घरच्या लोकांना वाटत असते की आपली मुले कॉलेजमध्ये गेलेली आहेत. परंतु कॉलेजची वेळ संपून गेल्यावर सुद्धा आपली मुले अजून का आली नाहीत, म्हणून त्यांचे आई-वडील चिंतेत पडतात. दोघांचे मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज एरिया असतात. कॉलेजमध्ये कॉल केल्यावर कळते की मुलांनी राजा टाकलेली आहे. रजा टाकून मुलं गेली कुठे म्हणून शोधाशोध सुरू होते. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना विचारले जाते. आशिषचे आई-वडील तुषारलादेखील विचारतात. परंतु त्यालादेखील काही माहीत नसते.
तेवढ्यात दोघांच्या घरी चिठ्ठी मिळते - "आम्ही दोघे जण सुखरूप आहोत. आमची चिंता करू नका. पंधरा दिवसांमध्ये आम्ही परत येऊ. उगाचच आमची शोधाशोध करू नका. आम्ही मिळणार नाही."
अजून पर्यंत दोघांच्या घरी हे माहित पडलेले नसते की आशिष आणि विशाखा दोघेजण गायब आहेत. परंतु चिठ्ठी वाचल्यावर दोघांच्या घरी शंका येऊ लागते की, आशिष आणि विशाखा हे दोघे जण तर एकत्र नाहीत ना?
क्रमशः
- कृष्णविवर - भाग ४ (शेवटचा भाग )
- सासू विरुद्ध सून
- मोहिनी विद्या - भाग १
- मोहिनी विद्या - भाग २
- मोहिनी विद्या - भाग ३
- मोहिनी विद्या - भाग ४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा