Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग१"

Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग१"

Read best Marathi online gudh katha love story free मराठी



( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही.)
 

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)


मोहिनीविद्या - भाग १ 

 

भाग

डॉक्टर - अजिंक्य चे सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. तो आता बरा झालेला आहे. आता दुपारीच मी त्याला डिस्चार्ज देईन. परंतु त्याला आरामाची आणि हवापालटाची गरज आहे.

 

किशोरी वहिनी ( अजिंक्यची आई) - डॉक्टर, कोकणात माझे माहेर आहे तिकडे अजिंक्यला पाठवलेले चालेल का?

 

डॉक्टर - अरे वा, उत्तम. कोकणातील हवा खूपच छान आहे. शिवाय प्रदूषणमुक्त. चांगला एक महिना आराम करू दे त्याला तिकडे.

 

अविनाश काका (अजिंक्यचे वडील) - आम्ही पाठवू त्याला तिकडे, पण त्याने ऐकले पाहिजे ना? तिकडे पण तो आराम करणार नाही. लॅपटॉप घेऊन बसेल. आता तुम्हीच सांगा.

 

डॉक्टर - काय रे अजिंक्य, आई बाबा काय बोलत आहेत? मामाच्या गावाला गेल्यावर एक महिना आराम करायचा. साथीच्या तापामुळे तुला खूप विकनेस आलेला आहे. त्यामुळे मी दिलेली सर्व औषधे व्यवस्थित घ्यायची. तिकडे तू फिरू शकतोस, परंतु तेही कंट्रोलमध्ये. ऐकशील ना सर्व?

 

अजिंक्य - काका, तुम्ही काही काळजी करू नका. मामाच्या गावाला एन्जॉय करायला, मला बऱ्याच वर्षांनी मे महिन्यात एवढी मोठी सुट्टी मिळत आहे. अभ्यासाचा आणि त्यानंतर कामाचा व्याप वाढत गेला, त्यामुळे मी इतके दिवसांची सुट्टी, बऱ्याच वर्षात तिकडे एन्जॉय केलेली नाही.

 

डॉक्टर - छान. लवकर रिकव्हर हो.

 

किशोरी वहिनी - डॉक्टर, पण पथ्य काय पाळायचं? कारण तिकडे गेल्यावर आंबे आणि काजू खाल्ल्याशिवाय तो राहणार नाही.

 

डॉक्टर - अहो तो आता बरा झालेला आहे. खाऊ द्या त्याला सर्व. एन्जॉय करेल, तर लवकर रिकव्हर होईल.

 

अजिंक्य हा बी. ई. मेकॅनिकल मुलगा. दोनच वर्षांपूर्वी इंजिनियर झालेला. नवी मुंबई येथील वडिलांच्या  मालकीच्या कंपनीत त्यांना तो मदत करत असे. अजिंक्य खूप मेहनती होता. नुकताच त्याला साधाच परंतु साथीचा ताप आला. नुसत्या औषधाने फरक पडेना. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. त्यानंतर त्याला हळूहळू फरक पडत गेला. आठ दिवसात तो पूर्ण बरा झाला.

 

दुपारी अजिंक्यला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. नवी मुंबईतच त्यांचा एक छोटासा बंगला होता. अजिंक्यच्या घरी त्याचे आई-वडील आणि बहीण अंजली होती. बहिणीचे कॉलेजचे शिक्षण अजून चालू होते. दादा घरी आला म्हणून अंजलीला देखील खूप आनंद झाला. परंतु आता सुट्टीत दादा एकटाच मामाच्या गावाला जाणार आणि मला जाता येणार नाही म्हणून ती हिरमुसली. कारण तिच्या कॉलेजच्या फायनल परीक्षा मे महिन्यातच होत्या.

 

अजिंक्य - मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा तू नाही का मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे जायचीस. तेव्हा माझ्या परीक्षा असायच्या म्हणून मला जाता यायचं नाही. तू जून मध्ये जा मामाच्या गावाला. पावसाळ्यात पण खूप मजा येते तिकडे.

 

अंजली (हसत) - पण आता तू तिकडे एन्जॉय करणार आणि मी मात्र येथे अभ्यास करत बसणार. थोडीशी ज्वेलसी तर होणारच ना?

 

संध्याकाळी अजिंक्य चे मित्र त्याला भेटायला येतात. कंपनीतले काही लोक देखील भेटून जातात.

 

किशोरी वहिनी - अहो मी काय म्हणते, अजिंक्यला माझ्या माहेरी सोडायला मी जाते बरोबर आपली गाडी घेऊन. एक दिवस तिकडे राहते मग येईन परत.

 

अविनाश काका (हसत) - हे तुम्हा बायकांच बरं आहे, माहेरी जायला तुम्हाला काही ना काही कारणे मिळतातच.

 

किशोरी वहिनी - मुलं मोठी झाल्यावर कुठे हो मला जमलं माहेरी जाऊन राहायला? आधी अजिंक्यच कॉलेज आणि आता अंजलीच कॉलेज. माहेरी गेले तरी धावत जाऊन पळत यावं लागतं.

 

अविनाश काका - जा बाई, तू माहेरी जा. दोन दिवस मी आणि अंजली करू ऍडजस्ट. तू इकडली काळजी करू नकोस.

 

कोकणातील "जलापुर" हे किशोरी वहिनींचे माहेर. माहेरी जायचे म्हणून किशोरी वहिनींनी बॅग भरायला घेतली. उन्हाळ्यात देखील तेथील विहिरी पाण्याने भरलेल्या असत. पाण्याची कमतरता जाणवत नसे. म्हणून गावाचे नाव "जलापुर" असे पडले होते. गाव समुद्रकिनारी होते. गावात वेगवेगळी फळ झाडे भरपूर होती. तसेच नारळी-पोफळीच्या बागा देखील होत्या.

 

दोन दिवसांनी अजिंक्य आणि त्याची आई "जलापुरला" फोर व्हीलरने जायला निघाले. अजिंक्यने बरोबर लॅपटॉप घेतला होता. लॅपटॉप बरोबर घेतला आहेस, परंतु कंपनीचे काम तिकडे काहीही करायचे नाही असे त्याच्या वडिलांनी त्याला निक्षून सांगितले.

सहा-सात तासाचा प्रवास असल्यामुळे सकाळीच प्रवास सुरू केला. बरोबर ड्रायव्हर काका होते. गरम खूप होत असल्यामुळे ए.सी. चालू केला होता. दोन-तीन तासाच्या प्रवासानंतर गाडी एका चांगल्या हॉटेल समोर थांबली.

 

किशोरी वहिनी - अजिंक्य, जास्त स्पायसी फूड खायचे नाही बरं.

 

अजिंक्य - नाही गं आई.

 

तिघांनी इडली सांबार खाल्ले. त्यानंतर स्पेशल चहा घेतला. पुढचा प्रवास सुरु झाला. अजिंक्यच्या मामीने कॉल करून सर्वजण कुठपर्यंत आले आहेत असे विचारले. तसेच वाटेत हॉटेलमध्ये जेवु नका, दुपारचे जेवण तयार होत आले आहे म्हणून देखील सांगितले. किशोरी वहिनींनी देखील घरी जेवायला येणार असल्याचे सांगितले. ड्रायव्हर काकांना अजिंक्यच्या आजोळचा रस्ता चांगलाच माहिती होता. कारण अधून-मधून किशोरी वहिनी एक-दोन दिवसांसाठी तरी माहेरी जाऊन येत असत. दुपारपर्यंत तिघेजण "जलापुरच्या" फाट्यावर पोहोचले.

 

तेवढ्यात अजिंक्यने ड्रायव्हर काकांना गाडी थांबवायला सांगितली.

अजिंक्य - आई, ती बघ प्रणाली. बहुतेक शेअर रिक्षाची वाट बघत उभी आहे.





किशोरी वहिनी - अरे मग बोलाव तिला. आपल्याच आळीत तर राहते ती. आपण सोडू या ना तिला तिच्या घरी जाता जाता.

 

अजिंक्य (ओरडून) - प्रणाली, ए प्रणाली. इकडे बघ.

 

आपल्याला अचानक कोण हाक मारत आहे हे बघून प्रणाली गांगरली. तेवढ्यात तिने किशोरी वहिनी आणि अजिंक्यला बघितले.

 

किशोरी वहिनी - प्रणाली ये गाडीत बस. माझ्या बाजूला जागा रिकामी आहे.


अजिंक्य ड्रायव्हर काकांच्या बाजूला बसलेला होता. प्रणाली मागच्या सीटवर किशोरी वहिनींच्या बरोबर बसली. गाडी सुरू झाली.

 

प्राची, प्रणाली आणि प्रणालीचा धाकटा भाऊ विशाल हे सर्व जण मामाच्या आळीतच राहायचे. लहानपणी अजिंक्य तिकडे गेला की या सर्वांबरोबर खेळायचा.

 

अजिंक्य - कुठे गेली होतीस?

 

प्रणाली - या वर्षी आमच्या परीक्षा लवकर झाल्या. सुट्टी आहे ना, त्यामुळे कॉम्प्युटर चा क्लास लावलाय तालुक्याला.

 

अजिंक्य - तुझे हे लास्ट इयर असेल ना?

 

प्रणाली- हो.

 

किशोरी वहिनी - कोणती साइड आहे गं तुझी?

 

प्रणाली - बी. एस्. सी. फिजिक्स.

 

किशोरी वहिनी - आणि प्राची पण तुझ्याच वर्गात का ग?

 

प्रणाली - नाही, म्हणजे ती पण लास्ट ईयरलाच आहे. पण ती बी. एस. सी. मॅथेमॅटिक्सला आहे.

 

प्रणाली जास्त काही बोलत नसते. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असते. बोलता-बोलता गाडी गावात येते. प्रणालीचे घर वाटेतच असते. तेथे ती उतरते.

 

अजिंक्य - आई, अशी काय ग ही. आम्ही लहानपणी खेळायचो आणि आता बोलत पण नाही.

 

किशोरी वहिनी - अरे आता ती मोठी झाली. लाजत असेल बोलायला.

 

गाडी आता अजिंक्यच्या मामाच्या घरापर्यंत येऊन पोहोचते. अजिंक्यच्या आजोळी त्याचे आजी - आजोबा, मामा - मामी आणि लहान मामेभाऊ होता. मामाचा शेतीवाडी आणि दुग्ध व्यवसाय होता. गोठ्यात भरपूर गाई-म्हशी होत्या. दुधाच्या विक्रीबरोबरच इतर दुग्धजन्य पदार्थ देखील मामा विकत असे. कामाचा व्याप मोठा असल्यामुळे कामाला माणसेदेखील ठेवलेली होती. मामेभाऊ शाळेत शिकत होता. या तिघांना बघून सर्वांना आनंद झाला.

 

किशोरी वहिनी आणि अजिंक्य वरून आजीने तांदूळ - पाणी ओवाळून टाकले. मामाचे घर दुमजली होते आणि वरती टेरेस होती. बांधकामासाठी जांभा दगडाचा देखील वापर केलेला होता. सर्वांनी घरात प्रवेश केला. ड्रायव्हर काका नेहमी येत असल्यामुळे घरच्या सारखेच होते.

 

आजोबा - अरे अजिंक्य, खूपच वाळला आहेस रे.

 

मामा - बाबा तुम्ही काही काळजी करू नका. रोज सकाळ संध्याकाळ गाईचे धारोष्ण दूध त्याला देतो. एक महिन्यात बघा कसा जाडजूड करून पाठवतो. घरी गेल्यावर ताई त्याला ओळखणारच नाही.

 

किशोरी वहिनी (हसत) - विवेक, त्याला जास्त जाडा करू नको बरं. थोड्या दिवसांनी मी त्याच्यासाठी मुली बघायला लागणार आहे.

 

आजी - किशोरी, एकदा त्याची जन्म कुंडली पाठवून दे, मी देखील इकडे बघते.

 

अजिंक्य - आजी, एवढ्यात नको. अजून काही दिवस थांब.

 

मामी - का रे? कोणी कॉलेजमध्ये बघून ठेवली होतीस की काय?

 

अजिंक्य - तसं नाही. मला थोडं सेटल होऊ द्या.

 

मामा - अरे माणूस लग्नानंतरच सेटल होतो.

 

मामाचा मुलगा आर्यसाठी किशोरी वहिनींनी खाऊ आणलेला असतो. किशोरी वहिनी त्याला खाऊ देतात.

 

किशोरी वहिनी - आर्य, झाली का परीक्षा?

 

आर्य - हो आत्या, झाली.

 

अजिंक्य - आर्य आता कितवीला जाणार?

 

आर्य - दादा, आता मी सहावीला जाणार.

 

मामी - आता सर्वांनी हात पाय धुऊन जेवायला चला. जेवायची वेळ झालेली आहे.

 

मामी सर्वांची जेवायची पाने घेते.

 

किशोरी वहिनी (मामीला) - वैशाली तुझे पण पान आमच्याबरोबरच घे.

 

वैशाली आत्ता नको म्हणत असते. परंतु किशोरी वहिनी तिला सगळ्यांबरोबर जेवायला बसवतात.

मामीने हापूस आंब्यांचा रस काढलेला असतो. जोडीला सांडगी मिरची आणि भोकराचे लोणचे असते. अजिंक्यला आंब्याचा रस आणि भोकराचे लोणचे खूपच आवडायचे. सर्वजण पोटभर जेवतात. किशोरी वहिनी अजिंक्यला जेवणानंतरची औषधे देतात. आजी आणि मामीला औषधे दाखवून देखील ठेवतात.

 

अजिंक्य - आई माझी मी घेईन औषधं, मी काय लहान आहे का आता?

 

आजी - असू दे गं, बरं झालं दाखवून ठेवलंस. एखाद औषध घ्यायला हा विसरला तर व्याप नको.

 

किशोरी वहिनी - उद्यापर्यंत आहे मी लक्ष ठेवायला, परवापासून मात्र तुम्ही लक्ष ठेवा.

 

आजी - का ग एवढ्या लवकर का चाललीस? मला वाटलं राहशील आठवडाभर आता.

 

किशोरी वहिनी - राहायचं होतं गं मला, पण आता अंजलीची परीक्षा आहे ना. त्यामुळे जावे लागेल.

 

सर्वजण दुपारी थोडी वामकुक्षी करतात. साधारण एक तास झोपल्यावर सर्वांनाच चार वाजेपर्यंत जाग येते. मामी सर्वांसाठी चहा करते. चहा पिऊन मामा गोठ्यात दूध काढायला जातो.

 

तेवढ्यात आर्य बाहेरून येतो.

 

आर्य - आत्या, तुला आणि अजिंक्य दादाला प्राची ताईच्या आईने बोलावले आहे.

 

आजी - जा भेटून ये प्राचीच्या आईला.

 

प्राचीचे घर मामाच्या घराच्या बाजूलाच होते.

थोड्यावेळाने किशोरी वहिनी अजिंक्यला घेऊन प्राचीच्या घरी जातात. प्राचीची आई दोघांचे चांगले स्वागत करते. प्राचीच्या आईने नाश्त्याला कांदेपोहे केलेले असतात. कांदेपोहे खाताखाता गप्पा रंगतात.

 

प्राचीची आई - मला वैशाली बोलली होती की किशोरीताई यायच्या आहेत म्हणून. अजिंक्यला काय बरं नव्हतं का?

 

किशोरी वहिनी - हो त्याला ताप आला होता. ताप उतरत नव्हता म्हणून एडमिट करावं लागलं. साधा साथीचा ताप होता. डॉक्टरांनी हवापालट करायला सांगितले आहे. म्हणून आता एक महिना इकडेच मुक्काम आहे त्याचा.

 

प्राची - अजिंक्य, तू आता काकांच्या कंपनीतच कामकाज बघतोस का?

 

अजिंक्य - हो.

 

प्राचीची आई - हल्ली तुझे पूर्वीसारखा इकडे राहणे होत नाही.

 

अजिंक्य - हो काकू, आधी कॉलेज चालू होते आणि आता कंपनीचे काम.

 

कांदेपोह्यांच्या पाठोपाठ प्राची चहा घेऊन आली.

 

अजिंक्य - तू बी. एस.सी. मॅथेमॅटिक्स च्या फायनल ईयर ला होतीस ना? येताना फाट्यावर प्रणाली भेटली होती ती म्हणाली.

 

प्राची - हो.

 

अजिंक्य - मग पेपर कसे गेले?

 

प्राची - छान गेले. या वर्षी परीक्षा लवकरच झाली.

 

अजिंक्य - मग तू नाही का कॉम्प्यूटरचा क्लास लावलास प्रणाली सारखा.

 

प्राची - नाही, मी आत्ता नाही लावला नंतर बघेन. थोडं बेसिक कॉलेज मध्ये झालेल आहे.

 

किशोरी वहिनी - अजिंक्य तू लॅपटॉप आणला आहेस ना? मग तू शिकव ना तिला पुढचं. काय हो प्राचीची आई चालेल ना?

 

प्राचीची आई - हो चालेल ना. बरंच होईल. तस पण आम्ही बाजूलाच तर राहतो.

 

प्राची - मग काय सर उद्यापासून शिकवायला सुरुवात करता काय?

 

अजिंक्य (हसत) - ए, हे सर वगैरे काय? लहानपणीचा खोडकरपणा अजून गेला नाही तुझा. पण मला आवडेल तुला शिकवायला.

 

किशोरी वहिनी - प्राची, याच्यावर लक्ष ठेव बरं. कारण येथे हा आराम करायला आला आहे. नाहीतर उनाडत बसेल गावभर. तू त्याची लहानपणीपासूनची मैत्रीण ना म्हणून सांगते.

 

प्राची - काकु, तुम्ही काही काळजी करू नका. मी बरोबर लक्ष ठेवेन त्याच्यावर.

 

थोडावेळ गप्पा झाल्यावर किशोरी वहिनी आणि अजिंक्य तेथून निघाले. निघताना प्राचीने किशोरी वहिनींना वाकून नमस्कार केला.

 

किशोरी वहिनींना प्राची खूप आवडली होती. तिला सून करून घ्यावे असे त्यांना वाटू लागले. या महिन्याभरात अजिंक्यला प्राची आवडते का ते बघू असा त्यांनी मनात विचार केला. किशोरी वहिनींनी आपल्या मनातील विचार घरी आल्यावर अजिंक्यच्या आजीजवळ (म्हणजेच स्वतःच्या आईजवळ) आणि वैशाली वहिनी जवळ गुपचूप बोलून दाखवला.

 

आजी - तुझा विचार चांगला आहे. पण दोघांची कुंडली जुळते का ते देखील बघायला हवे. तसेच अजिंक्यच्या मनात काय आहे ते देखील जाणून घ्यायला हवे.

 

किशोरी वहिनी - कुंडली वगैरे जाऊ दे. मला तर प्राची खूप पसंत आहे. मला वाटत आहे, अजिंक्य तिच्याशीच लग्न करेल.


क्रमशः


कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

२ टिप्पण्या:

  1. सर मानवी जीवनाचे गुढ रहस्य ही कादंबरी शेअर करु शकाल का ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मानवी जीवनाची गूढ रहस्ये - (लेखक - दत्तावधूत )
      या पुस्तकाचे अंदाजे ७ भाग आहेत. पुस्तक छान आहे. तुम्ही ते विकत घ्या किंवा ओळखीत कोणाकडे असल्यास अवश्य वाचा.

      हटवा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...