Read best Marathi suspense story free मराठी
( खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
हेर - अपराधी कोण? - भाग १
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
दिनांक ४ जुलै सकाळ
(टेलिफोनची रिंग वाजते .....)
पलीकडून - नमस्कार मी भास्करराव बोलतोय. पोफळगाववरुन. मला अनय साहेबांशी बोलायचे आहे. साहेब आहेत का?
गार्गी - एक मिनिट थांबा. मी सरांकडे फोन ट्रान्स्फर करते.
गार्गी (अनयची असिस्टंट ) अनयला कॉल रिसिव्ह करायला सांगते.
अनय - नमस्कार, मी अनय बोलतोय. आपण कोण बोलताय?
पलीकडून - नमस्कार मी भास्करराव बोलतोय. पोफळगाववरुन. साहेब, माझ्या मुलाचा खून झाला आहे. पोलीस चांगल्यापद्धतीने तपास करतच आहेत. पण तुम्हीदेखील हि केस तुमच्यापद्धतीने बघाल का?
अनय - तुम्ही तुमचा पत्ता मला एस. एम. एस. करा. मी येतो तिकडे.
अनय त्याचा मोबाईल नंबर भास्कररावांना देतो.
अनय केबिनमधून बाहेर येऊन,
अनय - गार्गी, सखाराम काका कुठे आहेत?
गार्गी - सर, ते चहा सांगायला खालती गेले आहेत. हॉटेलचा नंबर लागत नाही आहे.
अनय - ठीक आहे. ते आले कि आम्हाला पोफळगावला जायचे आहे. एक खुनाची केस आहे. आम्ही येईपर्यंत तू ऑफिस सांभाळ.
भास्कररावांचा मुलगा अनिकेत महामुंबई शहरात एक लहान उद्योगपती होता. वडिलांच्या व्यवसायाचे त्याने लहान कंपनीत रूपांतर केले होते. अनिकेत व त्याची पत्नी आर्या दोघेजण तेथील त्यांच्या बंगल्यात रहायचे. आई - वडील बाजूच्याच पोफळगावात रहायचे.
आर्या माहेरी गेलेली होती. २ जुलैला मध्यरात्री अनिकेतचा खून झाला. पोलीस तपासानंतर संशयित म्हणून आर्याचा मित्र सुशीलला अटक केली होती. कारण सुशीलचे पेन, अनिकेतच्या बॉडीजवळ सापडले होते.
भास्कररावांची मुलगी वैशाली हि आर्या व सुशीलवर आरोप करत होती. तिच्या मते आर्या व सुशीलचे एकमेकांवर प्रेम होते. अनिकेतचा काटा काढण्यासाठी सुशीलने त्यांचा खून केला. परंतु भास्कररावांना हे पटत नव्हते. खरे काय ते शोधून काढण्यासाठी त्यांनी डिटेक्टिव्ह अनयला बोलावले होते.
पोफळगावात भास्कररावांची खूप मोठी प्रॉपर्टी होती. काही वडिलोपार्जित होती तर बरीचशी स्वकष्टाने उभी केली होती.
सकाळी दहाच्या सुमारास अनय व सखारामकाका भास्कररावांच्या घरी पोहोचतात. सखारामकाका ड्राइवर + असिस्टंट होते. अनयने सांगितल्याप्रमाणे सखारामकाका गाडीतच थांबतात.
भास्करराव व पूर्ण फॅमिली खूप दुःखात होती. तरुण मुलगा गेल्यामुळे ते स्वाभाविकच होते. तरीदेखील खऱ्या अपराध्याला शिक्षा मिळवून देण्याचे भास्कररावांनी ठरवले होते.
भास्करराव - या साहेब, बसा.
अनय - काका, मी तुमच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. त्यामुळे अहो वगैरे नको. फक्त अनय म्हणा.
भास्करराव - आपण वरच्या खोलीत बसुया का? तेथे एकांतात बोलता येइल.
अनय - चालेल
दोघेजण वरच्या रुम मध्ये जातात.
भास्करराव - मला काही कळेनाहीसे झाले आहे. मुलाच्या खुनाचे दुःख आहेच, पण माझ्या मुलीने माझ्या सुनेवर व तिच्या मित्रावर गंभीर आरोप केले आहेत. माझी सून चांगली आहे. ती असे काही करेल असे वाटत नाही. तुमच्याविषयी मी खुप काही ऐकले आहे. त्यामुळे तुम्ही ही केस हाताळावी असे मला वाटते.
अनय - काका, मला घटनाक्रम सांगा.
भास्करराव - माझी सुन २ जुलैला माहेरी गेली. त्याच रात्री माझ्या मुलाचा गळा आवळून खून झाला. मुलाच्या बंगल्यावर सकाळी १ व रात्री १, असे एकूण २ गार्ड आहेत. रात्रीच्या गार्डच्या माहितीनुसार, रात्री १० वाजता सुशील माझ्या मुलाकडे आला होता. त्यानंतर १ तासाने तो बाहेर पडला. त्यानंतर बंगल्यावर कोणीच आले नाही. सकाळी दुसरा गार्ड आल्यावर रात्रीचा गार्ड निघून गेला. सकाळी ८ वाजता दूधवाला आला. माझा मुलगा दार उघडत नाही असे त्याने गार्डला सांगितले. बऱ्याच हाका मारूनदेखील दार न उघडल्यामुळे दोघेजण मागील बाजूस गेले. गॅलरीतून उडी मारून दोघांनी मागचा दरवाजा तोडला. आत जाऊन बघतात तो माझा मुलगा बेडरूममध्ये आडवा पडलेला. दोघांनी त्याला लगेचच हॉस्पिटलला नेले. तसेच माझ्या सुनेला कॉल केला. पण त्यापूर्वीच माझा मुलगा मेला होता.
नंतर पोलीस आले. तपास केला. माझ्या मुलाचा, हाताने गळा आवळून खून झाल्याचे कळले. पोस्टमार्टननुसार मृत्यूची वेळ १० ते १२ आली. या वेळेत फक्त सुशीलच आत आला होता. बंगल्याच्या मुख्य दरवाजावर एक कॅमेरा आहे. त्यानुसार पूर्ण रात्रीत सुशीलशिवाय बंगल्यात कोणीच प्रवेश केला नाही. बाहेरील गेटवरील कॅमेऱ्यानुसार गार्ड देखील रात्रभर बाहेरच उभा होता.
अनय - तुमचा कोणावर संशय? अनिकेतचे कोणाशी वैर?
भास्करराव - नाही. हे कसे झाले ते मला कळतच नाही.
अनय - मला तुमच्या घरातल्या लोकांशीदेखील बोलावे लागेल. शहरातील तुमच्या मुलाच्या बंगल्यावर जावे लागेल.
भास्करराव - साहेब, तुम्ही अल्पावधीतच नावाजलेले हेर आहात. तुम्ही तुमच्या पद्धतीने शोध घ्या. तुमची काय असेल ती फी मी देइन. पण खऱ्या गुन्हेगाराला शोधा.
अनय - मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. तुमच्या घरच्यांविषयी आता माहिती सांगा.
भास्करराव - मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेच येथे गावात रहातो. माझा मुलगा अनिकेत याने माझा उद्योग मोठा करून, शहरात बंगला बांधला. तो व त्याची पत्नी आर्या तिकडे रहायचे. आर्या फॅशन डिझायनर आहे.
माझी मुलगी वैशाली हि शिक्षिका आहे. ती व तिचे मिस्टर अमोल हे दोघे पण महामुबंईतच राहतात. ते एका कंपनीत नोकरीला आहेत.
आत्ता घरात माझी पत्नी, माझी सून,माझी मुलगी व जावई इतकी माणसे आहेत. तुम्ही प्रत्येकाशी बोला.
अनय - तुम्ही तुमचे मृत्यूपत्र केले आहे का? केले असल्यास मला त्याचे डिटेल्स सांगा.
भास्करराव - हो मी मृत्यूपत्र केले आहे. माझ्या मुलीने आमच्या मनाविरुद्ध लग्न केले. माझा जावई माझा वारस होण्यास मला लायक वाटत नाही. कष्टाने उभारलेली हि संपत्ती, तो वाट लावेल. त्यामुळे मी माझ्या मुलीच्या नावाने थोडी इस्टेट ठेवली. बाकी सर्व इस्टेट मी अनिकेतच्या नावे केली.
अनय - काका, तुमच्या मृत्युपत्राची हि गोष्ट अजून कोणाला माहित आहे?
भास्करराव - हि गोष्ट फक्त अनिकेत, त्याची पत्नी आर्या, माझी पत्नी आणि माझी मुलगी वैशाली यांनाच माहित आहे.
अनय - ठीक आहे. तुमची हरकत नसेल तर मी प्रत्येकाला एकेकट्याला भेटू इच्छितो.
भास्करराव - काहीच हरकत नाही.
प्रथम अनिकेतची पत्नी आर्या हिच्याशी अनय बोलतो.
अनय - नमस्कार मॅडम, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अनय. मला कल्पना आहे कि तुम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पण कृपया मला सहकार्य करा. त्यामुळे अनिकेत यांच्या खऱ्या खुन्यापर्यंत मी पोहोचू शकेन.
आर्या - मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन. विचारा, तुम्हाला जे काही विचारायचे ते विचारा.
अनय - तुमच्या व अनिकेतच्या लग्नाला किती वर्षे झाली. लव मॅरेज कि अरेंज.
आर्या - आमच्या लग्नाला २ वर्षे झाली. आमचे अरेन्ज मॅरेजच.
अनय - तुमच्यात काही भांडणे वगैरे.
आर्या - नवरा बायकोत होतात, तशीच आमच्यात पूर्वी भांडणे व्हायची. पण गेले काही दिवस अनिकेत माझ्यावर संशय घेत होता. कारण माझा जुना मित्र सुशील आमच्या शहरात रहायला आला होता. त्याचा व्यवसाय त्याने येथे चालू केला. तो माझ्या गृपमधीलच होता. त्यामुळे त्याला बघून मला आनंद झाला. आमची खूप चांगली मैत्री आहे. पण फक्त मैत्रीच. त्यामुळेच अनिकेतला माझ्यावर संशय होता. ४ दिवसांपूर्वी माझे आणि अनिकेतचे यावरूनच कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे २ जुलैला मी माझ्या माहेरी गेले.
हि बातमी सुशीलला रात्री उशिरा कळली. त्याला खूप वाईट वाटले. त्यामुळे अनिकेतची समजूत काढायला तो रात्री त्याच्याकडे गेला. थोडावेळ बोलल्यावर अनिकेतचा गैरसमज दूर झाला. नंतर सुशील तेथून घरी गेला. त्यानंतर अनिकेतचा मला फोन आला. त्याने माझी माफी मागून माझी समजूत काढली. उद्या तुला न्यायला येतो असे पण सांगितले.
पण (आर्या रडू लागली) , पण हे असे होईल असे वाटले नव्हते.
सुशीलदेखील चांगला आहे हो. त्याने खून केलेला नाही.
अनय - तुम्हाला अनिकेतने रात्री किती वाजता कॉल केला.
आर्या - २ जुलैला रात्री ११ वाजता साधारण.
अनय - तुम्ही तुमचा मोबाईल मला दाखवाल का?
आर्या - हा बघा.
अनय मोबाईलमधील कॉल लॉग चेक करतो. अनिकेतच्या नावाने ११:०५ ला कॉल येऊन गेलेला असतो. कॉल वर ५ मिनिटे बोलणे झालेले असते. अनय तो नंबर लिहून घेतो.
अनय - तुमचा कोणावर संशय?
आर्या - नाही. अनिकेतचे कोणाशीच भांडण नव्हते.
अनय - ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता.
त्यानंतर अनिकेतची बहिण वैशाली येते. ओळख करून अनय चौकशी सुरु करतो.
अनय - तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली?
वैशाली - ६ महिने.
अनय - लव्ह मॅरेज कि अरेंज?
वैशाली - लव्ह मॅरेज.
अनय - घरून परवानगी होती?
वैशाली (रागाने) - तुम्ही माझ्या भावाच्या खुनाचा तपास करायला आलात कि आमच्या पर्सनल गोष्टीत नाक खुपसायला?
अनय - मॅडम, माफ करा. पण तुमच्या भावाच्या खुन्याला शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर मला सहकार्य करा. काही गोष्टींची लिंक लागत पुढे माहिती मिळत जाते.
वैशाली - सॉरी, मी उगाच रागावले. पण माझी वाहिनी आर्या आणि तिचा मित्र सुशील खुनी आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. त्यांनीच माझ्या भावाला मारले.
अनय - तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
वैशाली - माझे व अमोल चे लव्ह मॅरेज आहे. मला घरून परवानगी नव्हती. अनिकेत दादाला, अमोल माझ्यासाठी योग्य वाटत नव्हता. पण मी माझ्या मतावर ठाम होते. त्यामुळे घरच्यांनी आमचे व्यवस्थित लग्न लावून दिले.
अनय - ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता.
त्यानंतर अनिकेतची आई आणि अमोल या दोघांची भेट अनय घेतो. अनिकेतच्या आईचा सुनेवर म्हणजे आर्यावर पूर्ण विश्वास असतो. पण अमोल मात्र आर्या वहिनी व सुशीलच खुनी आहेत असे ठामपणे सांगत असतो.
त्यानंतर अनय भास्कररावांना भेटून, अनिकेतच्या बंगल्यावर जाणार असल्याचे सांगतो.
भास्करराव लगेचच तेथील गार्डला अनय येणार असल्याची व त्याला सहकार्य करण्याची सूचना देतात.
अनय व सखाराम काका आता परत महामुंबईत येतात. येताना वाटेतील एका हॉटेलात दुपारचे जेवण करतात.
आता अनय, अनिकेतच्या बंगल्यावर पोहोचतो. तेथील गार्डला स्वतःची ओळख सांगतो.
गार्ड - मोठ्या मालकांनी मला सांगितले आहे, कि तुम्हाला मदत करायची आहे.
अनय - या बंगल्यात एकूण किती गार्ड आहेत? तुमची
ड्युटी कशी आहे?
गार्ड - साहेब, एकूण तिघेजण आहोत आम्ही. ८ तास आमची ड्युटी असते. पण एकमेकांच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही जास्तीची ड्युटी करतो.
अनय - ज्या रात्री तुमच्या अनिकेत साहेबांचा खून झाला तेव्हा ड्युटीवर कोण होते?
गार्ड - तेव्हा रात्रीचा गार्ड ड्युटीवर होता. त्याची ड्युटी रात्री १० ते सकाळी ६ होती.
अनय - तू त्या बाकीच्या गार्डनादेखील बोलावून घे. तोपर्यंत मला बंगला बघायचा आहे.
गार्ड - ठीक आहे साहेब.
गार्ड बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडून देतो.
अनय आत प्रवेश करतो. तो सर्व काही न्याहाळत असतो. बंगल्याला एकूण ४ खोल्या असतात. तेवढ्याच वरच्या मजल्यावर खोल्या असतात.
एका बेडरुमला गॅलरी असते. तिला मोठ्या स्लयडींग काचा असतात. बेडरूमचा दरवाजा तुटलेला असतो.
अनय - हा दरवाजा तोडला तेव्हा तू होतास का?
गार्ड - हो साहेब. मी सकाळच्या ड्युटीवर होतो. मी आणि दुधवाल्याने दरवाजा तोडला. कारण आतून साहेब दार उघडत नव्हते.
अनय - दरवाजा तोडल्यावर तू काय पहिले?
गार्ड - दरवाजा तोडल्यावर आम्ही आत आलो. या रूममध्ये साहेब नव्हते. बाजूच्या बेडरूममध्ये बेडवर साहेब आडवे पडले होते. त्यांचा श्वासोश्वास बंद पडला होता. आम्ही लगेचच साहेबांना हॉस्पिटलमध्ये नेले. पण साहेब वाचले नाहीत.
अनयने सर्व रूम बघितल्या. गॅलरीचा जो दरवाजा तोडला होता, त्याच्या कडीला काहीतरी ठोकल्यासारखे दिसत होते. बाजूच्या खिडकीला ग्रील होते. त्या ग्रीलमधून हात आत घालता येत होता, पण तो दरवाज्याच्या कडीपर्यंत पोहचू शकत नव्हता. परंतु काठी किंवा लोखंडी रॉड खिडकीच्या ग्रीलमध्ये घालून, गॅलरीची रूममधील कडी बाहेरून निघू शकत होती.
अनय (गार्डला) - तुम्ही इथे गॅलरीत आलात तेव्हा हि खिडकी उघडी होती का?
गार्ड - नाही साहेब.
अनय - तुम्ही दरवाजा का तोडला?
गार्ड - साहेब, आत जायला काहीच मार्ग नसल्यामुळे आम्ही मागचे गॅलरीचे दार तोडून आत शिरलो.
बंगल्यातील एक एक रूम फिरत अनय बाथरूममध्ये येतो. बाथरूमच्या खिडकीला ग्लास ओपन / क्लोज करायची फ्रेम होती. त्यात ग्लास बसवल्या होत्या. अनयला ती फ्रेम लूज वाटली. त्यामुळे त्याने ती फ्रेम निघते का बघितले. ती फ्रेम सहजतेने निघून बाथरूममधून बाहेर उडी टाकता येत होती. बाहेरून ग्रील नव्हते. अनयने आणखी काही कळते का ते बघण्यासाठी बाहेर जायचे ठरवले.
अनय बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला गेला. तो बाथरूमच्या खिडकीच्या खाली काही सुगावा लागतो का ते पाहू लागला. तेथे एक खेकड्याचे बिळ होते. त्यावर एक तांबड्या रंगाचा खेकडा मरून पडला होता. त्याला पायाने कोणीतरी चिरडले आहे असे वाटत होते. बाजूचे गवत देखील दबले गेले होते. याचा अर्थ कोणीतरी बाथरूमच्या खिडकीतून उडी मारल्यामुळे तेथील खेकडा मेला. पायाखाली काहीतरी आहे कळल्यामुळे त्या व्यक्तीने तेथे पाय दाबून चिरडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बाजूचे गवत दबले गेले होते. मेलेल्या खेकड्याची एक नांगी गायब होती. मातीत उमटलेल्या ठश्यांवरून त्या व्यक्तीने पायात शूज घातले होते असे अनयच्या लक्षात आले. कारण ठसे साध्या चपलेचा नव्हते. तो खेकडा अनयने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेतला. परत एकदा बंगला आतून व बाहेरून पाहून अनय बाहेर पडला.
गेटवर बाकीचे २ गार्ड येऊन उभे होते. त्यांची चौकशी करून अनय थेट पोलीस स्टेशनला गेला. तेथील अधिकारी अनयचे चांगले मित्र होते. अनयने त्यांच्याशी सुशीलची चौकशी केली. प्राथमिक तपासणीत सुशील दोषी आहे असे आढळून आल्यामुळे पोलिसांनी सुशीलला अटक केली असे अधिकारी बोलले. अनयने सुशिलशी बोलण्याची परवानगी मागितली. अधिकाऱ्यांनी परवानगी दिली.
कोठडीत सुशील उदास बसलेला होता. अनयने स्वतःची थोडक्यात ओळख करून देऊन सुशीलला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
अनय - तुम्ही त्या रात्री अनिकेतकडे का गेलात? त्या रात्री तेथे काय घडले.
सुशील - आर्या माझी कॉलेजपासूनची मैत्रीण. आमची खूप चांगली मैत्री आहे. अनिकेतला आमच्या मैत्रीवर संशय आला होता. त्यामुळे अनिकेत आणि आर्याचे भांडण झाले. म्हणून आर्या सकाळीच माहेरी निघून गेली. मला हि बातमी रात्री कळली. म्हणून मी लगेचच रात्री १० वाजता अनिकेतकडे गेलो. प्रथम तो रागातच होता. पण माझ्याशी बोलल्यावर त्याचा गैरसमज दूर झाला. एकीकडे तो काहीतरी काम करत होता. त्याच्या पेनातील शाई संपल्यामुळे त्याचे काम अडले. त्यामुळे मी माझे पेन त्याला दिले. बोलण्याच्या नादात माझे पेन तिथेच राहिले. त्यानंतर साधारण ११ च्या आधी मी बाहेर पडलो.
सुशील जे बोलत होता ते अनय लक्ष देऊन ऐकत होता. काळजीपूर्वक निरीक्षण करत होता. सुशीलच्या डाव्या हाताचा अंगठा अधू होता. अनयने त्याबाबत सुशिलला विचारले असता, १ महिन्यापूर्वी बाइकवरून पडलो असे त्याने सांगितले. अंगठ्याला जोरदार मार लागला होता. उपचारांनी थोडे बरे वाटले, पण अंगठा अजून नीट हलवता येत नव्हता. अजून काही महिने बरे वाटायला जाणार होते.
हे बघून अनयच्या लक्षात आले कि सुशीलने हा गुन्हा केल्याचे चान्स खूप कमी आहेत. पण सुशीलला तो याबाबत काहीच बोलला नाही. अजून काही विचारायचे असल्यास परत येईन असे सांगून अनय तेथून निघाला आणि तेथील अधिकाऱ्यांना भेटला.
अनय - नमस्कार साहेब, सुशीलला भेटू दिल्याबद्दल धन्यवाद.
अधिकारी - अहो, त्यात धन्यवाद कसले मागताय?
असो, ते जाऊदे. तुमच्या मनात काय आहे ते मला कळलंय. एक गोष्ट तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नसणार.
अनय - तुम्ही बरोबर म्हणताय. पण मग सुशीलला अटक का केली?
अधिकारी - सुशीलच्या हाताकडे बघून असे वाटत नाही, कि तो अधू असेल. जेव्हा त्याच्या बोटांची तो हालचाल करतो, तेव्हाच ते लक्षात येते. त्यामुळे त्याला अटक करताना हि गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. टेन्शनमुळे काय बोलावे, ते त्यालापण कळले नाही. त्याला काल आम्ही अटक केली. आज चौकशी करताना माझ्या हे लक्षात आले. थोड्याच वेळात आम्ही त्याला सोडणार आहोत. पण याच्या अटकेमुळे खरा खुनी गाफील असेल. त्यामुळे आम्ही सुशीलला १० - १५ दिवस या शहराबाहेर राहण्याची विनंती केली आहे. त्याने ते मान्य केले आहे.
अनय - साहेब, तुम्ही मला हे आधीच का नाही बोललात?
अधिकारी - तुम्हाला तुमच्या पद्धतीने तपास करता यावा म्हणून मी बोललो नाही.
तुम्हाला काही कळल्यास आम्हाला सांगा. आमची मदत लागल्यास सांगा. आमचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत.
त्यानंतर अनय तेथून निघाला. तो त्याच्या ऑफिसमध्ये परत आला.
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
- हेर - अपराधी कोण ? - भाग २ (शेवटचा भाग )
- ऋणानुबंध - भाग १
- ऋणानुबंध - भाग २
- ऋणानुबंध - भाग ३
- ऋणानुबंध - भाग ४
- ऋणानुबंध - भाग ५
- ऋणानुबंध - भाग ६ (शेवटचा भाग )
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा