Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "हेर(अपराधी?भाग२शेवटचा)"

Read share best Marathi katha free "हेर(अपराधी?भाग२शेवटचा)"

Read best Marathi detective story free मराठी

हेर - अपराधी कोण? भाग २ (शेवटचा भाग)

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड) 


सखाराम काका, अनय व गार्गी एकत्र चहा पित बसले.  

अनय - सखारामकाका उद्या आपल्याला परत पोफळगावला जायचे आहे. 
गार्गी तुला देखील महत्वाची कामे करायची आहेत.

गार्गी - काय सर?

अनय - अनिकेतची पत्नी आर्या, सुशील, वैशाली व तिचे पती अमोल यांच्या जवळच्या मित्र - मैत्रिणींकडून काही माहिती मिळते का ते बघ. या ४ व्यक्तींचे फोटो व पत्ते मी तुला फॉरवर्ड करतो. हे सर्व कसे करायचे हे तुला माहित आहेच. पण तरीपण सांगतो, आत्ता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून जाऊ नकोस. 

गार्गी - सर, तुम्ही काळजी करू नका. मी काम व्यवस्थित पार पाडेन. 

दुसऱ्या  दिवशी गार्गी तिच्या एका मैत्रिणीकडे जाते. ती घरोघरी जाऊन डेली वापराच्या वस्तू विकत असे.
मैत्रीण - आज बऱ्याच दिवसांनी माझी आठवण आली. आता काय देऊ विकायला सांग?

गार्गी - ए, मी नेहमी काही तुझे प्रॉडक्ट विकण्यासाठी तुझ्याकडे येत नाही. पण बरोबर ओळखलस. आज मी  त्यासाठीच आले.

मैत्रीण - गंमत केली ग. थांब चहा ठेवते. 

गार्गी - अग नको, आत्ताच घरी चहा झालाय. मी उरलेल्या वस्तू परत करायला संध्याकाळी येईन ना, तेव्हा मात्र चहा पिऊन जाईन. 

मैत्रीण - ठीक आहे.

गार्गी - मला डेली यूझच्या जेन्टस व लेडीज दोघांना वापराच्या वस्तू दे. 

मैत्रीण थोड्याश्या वस्तू गार्गीच्या सॅकमध्ये भरून देते. प्रत्येकाची किंमत, डिस्काउंट व कशावर काय फ्री आहे ते सर्व ती गार्गीला थोडक्यात सांगते.

मैत्रीण - गार्गी, थँक यु हं. तुझ्या या जॉबमुळे माझे प्रॉडक्ट तु कधी कधी विकतेस. पण माझा फायदा होतो ग त्यामुळे. 

गार्गी - मीच तुला थँक्स म्हणते. तुझ्यावर  विश्वास आहे,  त्यामुळे मी तुझ्याकडून प्रॉडक्ट विक्रीसाठी घेते. या बहाण्याने मी मला हव्या असलेल्या गुप्त बातम्या काढू शकते. तुझी मदत चांगल्या कामासाठी होत आहे.

मैत्रीण - असू दे ग. संध्याकाळी मात्र नक्की चहा प्यायला ये. 

गार्गी मैत्रिणीकडून निघाली आणि अनिकेतचा  बंगला ज्या एरियात होता, तेथे पोहोचली. बंगल्याच्या बाजुच्या वस्तीमध्ये प्रोडक्ट विकायचा प्रयत्न करू लागली. मुळात सुंदर व चांगल्या घरातील अशी ती दिसत असल्यामुळे बऱ्याच गृहिणींनी तिच्याकडुन प्रोडक्ट खरेदी केले. बोलता बोलता, शेजारचा बंगला बंद का आहे? त्या मॅडम माझ्याकडून नेहमी प्रोडक्ट घेतात असे काहीतरी सांगायची. सहाजिकच काही गृहिणी अनिकेतच्या खुनाबद्दल बोलून मोकळ्या होत. मग अंदाज घेऊन गार्गी अजून चौकशी करे. 
आर्याबद्दल व अनिकेतबद्दल कोणी वाईट बोलले नाही. अनिकेतच्या अशा मृत्युबद्दल सर्वांना हळहळ वाटत होती. 
काहीजणी मात्र आर्या व सुशीलबद्दल बोलल्या. त्या दोघांचे प्रेम होते, त्यामुळे संशयावरून पोलिसांनी सुशीलला अटक केली आहे वगैरे गोष्टीदेखील गार्गीला ऐकायला मिळाल्या. 
सहज बोलताना एक बाई बोलून गेली, अनिकेतला अमोल पसंत नव्हता. अमोलनेदेखील वैशालीच्या 
बापाचा पैसा बघून लग्न केले. 

यानंतर गार्गीने तिचा मोर्चा अमोल व वैशाली रहात असलेल्या एरियाकडे वळवला. वैशाली तर माहेरी पोफळगावला होती आणि अमोल कुठेतरी बाहेर गेलेला होता. त्या एरियातदेखील  गार्गीने अमोल व वैशालीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. 
वैशाली वहिनींना मी चांगले ओळखते. त्या माझ्याकडून कॉस्मेटिक घेतात. मी एरवी  डोअर  टू  डोअर फिरत नाही. ऑर्डर आल्यावरच होम डिलिव्हरी करते. पण सध्या आमचा सर्व्हे चालू आहे.

तेथील बायका, वैशालीला चांगले म्हणत होत्या. पण अमोलबद्दल त्यांचे मत चांगले नव्हते. एक गृहिणी तर बोलताना पटकन बोलून गेली, कि आता अमोलची लॉटरी लागणार. 
गार्गी - वहिनी, का हो असं का बोलता? 

गृहिणी - तू वैशालीच्या ओळखीची म्हणून सांगते. अग,  वैशालीच्या वडिलांची खूप प्रॉपर्टी आहे. त्यांना दोनच मुले - अनिकेत आणि वैशाली. त्यातील अनिकेत मृत्यू पावला. त्याच्या बायकोवर वैशालीने आरोप केलेत. म्हणजे ती पण तिच्या मित्राबरोबर लॉकअप मध्ये जाणार. आता एवढ्या संपत्तीचा वारस कोण? वैशालीच  ना?

गार्गी - वहिनी, तुमचं काय सुपर डोकं चालत हो? तुम्ही डिटेक्टिव्ह व्हायला हवे होते. 
गार्गीने स्तुती करून त्या बाईला हरभऱ्याच्या झाडावर चढवले.

गृहिणी (हुरळून) - अग, तुला म्हणून सांगते, अमोलने वैशालीशी लग्न तिची प्रॉपर्टी बघूनच केले आहे. निदान मला तरी तसे वाटते. 

गार्गी नंतर तेथून निघून ऑफिसला गेली. तेथून कॉल करून, मिळालेली माहिती तिने अनयला  सांगितली. 
तिच्याकडची माहिती ऐकून अनय खूष झाला. 

इकडे अनय आणि सखारामकाका पोफळगावला पोहोचले. 

Beautiful nature


भास्करराव - या साहेब. 

अनय - काका, तुम्हला मी आधीच सांगितले कि फक्त अनय म्हणा. 

भास्करराव - ठीक आहे, अनय बोल काय प्रगती आहे? 

अनय - आमचे प्रयत्न चालू आहेत. जरा बोलायचे होते.

भास्करराव - चल आपण वरच्या रूममध्ये बसू. 

दोघेही वरच्या रूममध्ये जातात.

अनय - काका, तुमच्या मेन गेटवर कॅमेरा आहे, त्याच्या  फुटेजची कॉपी मला हवी आहे. त्या दिवशी अंत्यदर्शनाला किती लोक आले होते?

भास्करराव - खुनाची केस असल्यामुळे कमी लोक होते. पण मागाहून बरेचजण भेटायला येत आहेत. तरी त्या दिवशी ५० - ६० लोक आले होते. मी तुम्हाला फुटेजची  कॉपी देतो. 
भास्कररावांनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलावून फुटेजची कॉपी काढायला सांगितली. ती कॉपी अनयने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केली. आर्यालासुद्धा बोलावून घेतले. 
या व्हिडिओमधील जे लोक अनिकेतच्या बंगल्यावर  बऱ्याचवेळा येतात त्यांची  नावे व  पत्ता  मला  द्या, असे  अनयने  भास्करराव  व  त्यांच्या  सुनेला  म्हणजे  आर्याला  सांगितले.        
त्यानंतर अनयने  मोबाईलवर व्हिडिओ चालू केला. अनयने  सांगितल्याप्रमाणे सूचनेचे पालन भास्करराव आणि आर्याने केले.
एकूण २० लोक असे व्हिडिओ मध्ये दिसले, ज्यांचे अनिकेतकडे येणेजाणे होते. त्यातील नेहमी सुटा - बुटात  वावरणाऱ्या लोकांची वेगळी यादी अनयने, या दोघांना  विचारून केली. ती १४ लोकांची यादी झाली. सर्व लोक  शहरातीलच  होते.
अनयने  त्या सर्वांचे मोबाईलवर स्क्रीनशॉट घेतले, त्यांची नावे, पत्ते व इतर थोडी माहिती अनयने  व्यवस्थित लिहून घेतली, तसेच मोबाईलवरील स्क्रीन शॉटवर नावे सेव्ह केली. 
नंतर अनय तेथून निघाला.

सखाराम काकांना त्याने १ काम नेमून दिले. सखाराम काकांनी काम नक्की पूर्ण करणार म्हणून सांगितले.

दुपारी १ च्या सुमारास, १ बूट पॉलिशवाला घरोघरी फिरू लागला. बाहेरच्या दरापेक्षा तो स्वस्तात पॉलिश करत होता. बऱ्याच लोकांनी त्याच्याकडून बूट पॉलिश करून घेतले. बूट पॉलिश करणाऱ्याची चांगली कमाई होत होती. आज रविवार असल्यामुळे बरेच लोक घरात होते. 

अमोलदेखील त्याचे बाहेरचे काम आटोपून शहरातल्या घरी परतला होता. बूट पॉलिशवाला अनायसे एरियात  आल्यामुळे त्याने त्याला बोलावले. बूट पॉलिश करून तो माणूस परतला. हा माणूस दुसरा कोणी नसून, सखाराम काका होते. काम फत्ते झाल्याच्या आनंदाने ते ऑफिसमध्ये आले. जवळच्या छुप्या कॅमेरात शूट केलेला व्हिडिओ त्यांनी अनयला व गार्गीला दाखवला. अनय खुश झाला. त्याने लगेचच भास्कररावांना व आर्याला त्याच्या ऑफिसमध्ये  गुपचूप यायला सांगितले. 

पाऊण तासात दोघेही तेथे हजर झाले.
भास्करराव - अनय, काही माहिती कळली का?

अनय - काका, मन घट्ट करून ऐका. अनिकेतचा खुनी तुमचा जावई अमोल आहे. 

भास्करराव एकदम डोक्याला हात लावतात. 
भास्करराव - हे कस शक्य आहे? 

अनय - एक तर तुमच्या गडगंज संपत्तीचा तुमच्या पश्चात मालक हा अनिकेत होता. वैशालीने  तुमच्या  मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे तुम्ही तिच्या नावे मृत्युपत्रात फार काही दिले नव्हते. अनिकेतचा या लग्नाला कडाडून विरोध होता. याचा राग देखील अमोलच्या मनात होता. अनिकेतचा  काटा काढल्यावर, आर्याला  तुरुंगात पाठवायचे आणि त्यामुळे तुमच्या सर्व संपत्तीची मालकीण तुमची मुलगी वैशाली झाली असती. अर्थात वैशालीला या गोष्टी माहित नव्हत्या. खुनाच्या रात्री ती पोफळगावला तुमच्या घरी (माहेरी) आली होती. गार्गीनेदेखील तपास केला. तुमच्या शेजाऱ्यांना काय माहिती आहे, ते शोधले.

आर्या - पण याला पुरावा काय?

अनय - सांगतो. त्या व्यक्तीने बंगल्याच्या मागच्या गॅलरीत प्रथम प्रवेश केला. कारण पुढे सिक्युरिटी गार्ड 
आणि कॅमेरा आहे, हे त्या व्यक्तीला माहित होते. हवा येण्यासाठी तुमची तिकडची खिडकी उघडी होती. तुम्ही एरवीसुद्धा ती खिडकी उघडी ठेवता कि नाही?

आर्या - फक्त तीच नाही, तर बाकीच्या रूमच्या खिडक्या   हवा येण्यासाठी आम्ही उघड्या ठेवतो. ग्रील असल्यामुळे काही धोका नाही असे आम्हाला वाटायचे.
पण त्या खिडकीच्या ग्रीलमधून हात गॅलरीच्या दारापर्यंत पोहोचत नाही.

अनय - बरोबर आहे. पण त्या व्यक्तीने हातात एक छोटा रॉड घेतला असेल. त्याच्या सहाय्याने आधी कडी वर उचलली. त्यानंतर त्या कडीला हळूहळू रोडने ठोकले. त्यामुळे त्या कडीला छोट्या प्रमाणात ठोकल्याच्या खुणा दिसत आहेत. इकडून कोणी आले असा संशय न येण्यासाठी त्या व्यक्तीने ती खिडकी बंद केली. तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही कोणत्या खिडक्या बंद करत नाही, तर ती खिडकी मी गेलो तेव्हा बंद कशी होती? 
पुढे मी सर्व रूम चेक केल्या. त्यानंतर बाथरूममध्ये गेलो. तुमच्या बाथरूमच्या खिडकीची फ्रेम लूज आहे. ती व्यवस्थित फिट का नाही केलेली? 

आर्या - बंगल्याच्या डागडुजीचे काम १ महिन्यापूर्वी चालू होते. बाकी काम पूर्ण झाले. पण बाथरूमचे  काम बाकी होते. मुख्य काम करणाऱ्या माणसाचे वडील आजारी पडल्यामुळे, त्याला काम  चालू  असताना गावाला जावे लागले. त्यामुळे त्याने तात्पुरती फ्रेम बसवून दिली. पण खिडकीकडे बघून असे पटकन कळत नाही. शिवाय फ्रेमवर ओपन / क्लोज करण्यासाठी काचा व्यवस्थित फिट केलेल्या आहेत. आम्हाला त्यात काही धोका वाटला  नाही. 

अनय - तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तुमच्याकडे नेहमी येणाऱ्या माणसाला ते कळणारच ना? अनिकेतची बहीण, वैशाली अधूनमधून तुमच्याकडे रहायला येत असेलच ना? तुमचा बंगला देखील तिचे शहरातील माहेरचं ना? सहज बोलताना तिने हि गोष्ट तिच्या नवऱ्याला म्हणजे अमोलला सांगितली असणार. 

भास्करराव - पण त्या बाथरूमच्या खिडकीचा येथे काय संबंध आहे?

अनय - काका, संबंध आहे. कारण खुनी नंतर तेथूनच पळाला. यामुळे कोणालाच काही कळणार नाही असे त्या व्यक्तीला वाटले. 

आर्या - पण खुनी तेथूनच पळाला हे कशावरून?

अनय - मी तुमच्या बंगल्याला बाहेरूनदेखील राउंड मारला. तुमच्या बाथरूमच्या खिडकीच्या खाली एक खेकड्याचे बिळ आहे. खेकडा बिळातून अर्धवट बाहेर आलेला असताना, त्या व्यक्तीने बाथरूमच्या खिडकीतून उडी मारली व खिडकीची फ्रेम परत लावून ठेवली. ती उडी खेकड्याच्या बिळावर पडली. धक्का लागल्यामुळे खेकड्याने नांग्या पसरल्या. त्या व्यक्तीच्या बुटाच्या तळव्यावर व सोल वर नांगी बसली. पायाखाली काहीतरी आले म्हणून त्या व्यक्तीने खेकड्याला बुटाने चिरडले. तेथील गवत देखील दबलेले व चुरडलेले दिसत आहे. मी जेव्हा बघितले तेव्हा असे लक्षात आले कि खेकडा मेला होता, तेथे मुंग्यादेखील आल्या होत्या. पण खेकड्याची १ नांगी गायब होती. याचा अर्थ खेकड्याने नांगीच्या सहाय्य्यने बुटाला खालून जोरात पकडले होते. इतके जोरात पकडल्यामुळे, चिरडले गेल्यावर ती नांगी बुटाच्या सोल व तळव्याच्या मध्ये रुतून बसली. अर्थात हे त्या व्यक्तीच्या ध्यानीमनी देखील नव्हते. 

भास्करराव - पण ती नांगी कोणाच्या बुटात रुतली, हे तुम्ही कसे शोधले?

अनय - या सर्व प्रकारावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली, कि ती व्यक्ती कोणी अनोळखी नव्हती. कारण इतक्या सराईतपणे अनोळखी व्यक्ती बंगल्यात फिरू शकणार नाही. जर ती व्यक्ती चांगली ओळखीची आहे, तर ती व्यक्ती अनिकेतच्या अंत्यदर्शनाला येणे आवश्यक होते. नाहीतर चर्चेला वाव राहिला असता. त्यामुळे आपण काही केलेच नाही अशा थाटात ती व्यक्ती पोफळगावला अंत्यदर्शनाला आली. म्हणूनच अंत्यदर्शनाला कोण व्यक्ती आल्या ते मला बघायचे होते. अपराधी त्यातीलच एक असणार, असा माझा अंदाज होता. त्यामुळे मी त्यावेळचे फुटेज तुमच्याकडे मागवले व सगळ्यांचे पत्ते घेतले. पुढचे काम आमच्या सखाराम काकांनी केले. काका आता पुढचे तुम्ही सांगा.

सखाराम काका - अनय साहेबांनी मला १४ लोकांची यादी दिली. या लोकांचे बूट पॉलिश करून परतण्यास सांगितले. त्यामुळे त्या त्या एरियात फिरावे लागले. अशाप्रकारे खूप लोकांचे बूट मी पॉलिश केले. ज्यांचे करायचे नव्हते त्या लोकांचेदेखील बूट पॉलिश केले. फक्त यादीतील १४ लोकांचे बूट पॉलिश करण्यापूर्वी मी गुप्त कॅमेरा चालू करायचो. या १४ लोकांच्या यादीत तुमचे जावई अमोल यांचेदेखील नाव होते. बाकी १३ लोकांचे बूट पॉलिश करताना काही सापडले नाही. पण अमोल साहेबांचे बूट पोलिश करताना मागे खेकड्याची नांगी अडकलेली दिसली. तो व्हिडीओ आता अनय साहेबांकडे आहे. 

अनय - काका, आता माझ्या लॅपटॉपवर तो व्हिडिओ बघा.
अनय लॅपटॉप चालू करतो. व्हिडिओत सखाराम काका अमोलच्या घरी गेलेले दिसतात. अमोलदेखील दिसतो. त्याचे बूट पॉलिश करताना सखाराम काका बुटांची खालची बाजूदेखील शूट करतात.त्यामुळे एका बुटात अडकलेली खेकड्याची नांगी सहजतेने दिसते. अनय त्याला बंगल्याच्या आवारात मिळालेला मृत खेकडा सर्वांना दाखवतो. अमोलच्या बुटाखाली असलेली नांगी हि  या खेकड्याशी मॅच होत असते.

भास्करराव - माझा जावई इतका वाईट वागेल असं वाटलं नव्हतं.

आर्या - पण अमोलने या पुराव्यांना मान्य नाही केले तर?

अनय - मी जेव्हा तुमच्या बंगल्यात चौकशीसाठी गेलो, तेव्हा बरोबर १ छोटा गुप्त कॅमेरा घेऊनच गेलो होतो.
त्यामुळे मला तिथे जो मेलेला खेकडा दिसला, तोदेखील माझ्या कॅमेऱ्यात  शूट झालेला आहे. अमोलने जर हे पुरावे अमान्य केले, तरी  वरील पुरावे घेऊन मी त्याला अडकवू  शकतो. आता मी पोलीस स्टेशनला जाऊन हे पुरावे देऊन येतो.

भास्करराव - साहेब, तुमच्यामुळे खरा गुनहेगार मिळाला.

यानंतर अनय, भास्करराव आणि आर्या पोलीस स्टेशनला जातात. अनय सर्व परिस्थिती पोलीस अधिकाऱ्यांना समजावून सांगतो. 

अधिकारी  (कौतुकाने  हसत)  - व्वा, म्हणजे या वेळी तुम्ही बाजी मारलीत तर. ठीक आहे. आम्ही  अमोलकडे जाऊन चौकशी करतो. केस भक्कम करण्यासाठी अजून काही पुरावे कदाचित लागतील. बघतो काही पुरावे मिळतात का?

अनय - साहेब, हे सर्व तुमच्या सहकार्याने झाले. 

थोडयाच वेळात  भास्करराव, आर्या व पोलीस अमोलकडे पोहोचतात. प्रथम अमोल उडवाउडवीची उत्तरे देतो. पण खेकड्याचा हा पुरावा पाहून तो हबकतो. शेवटी, केलेला गुन्हा तो मान्य करतो. 

अमोल - भास्कररावांनी सर्व प्रॉपर्टी त्यांच्या पश्चात अनिकेतच्या नावे केली आहे, हे मला वैशालीकडून समजले. आधीच अनिकेतने आमच्या लग्नाला विरोध केला होता. त्यात हि बातमी ऐकून मला खूप राग आला. या अनिकेतलाच संपवून तो आळ आर्या वहिनींवर घातला कि आपले काम फत्ते होईल, असे मला वाटले. पण मी अशाप्रकारे पकडला जाईन,  असे मला वाटले नव्हते.
 
भास्करराव (रडत) - अरे तुला पैसेच हवे होते, तर मला सांगायचेस. मी दिले असते. पण हे असे नीच कृत्य का केलेस? आता माझ्या मुलीचे कसे होणार?

पोलीस अमोलला अटक करतात. 

अपराधी अशा वेगळ्याच पुराव्याने पकडला गेल्यामुळे सर्व लोक आश्चर्यचकित झाले व सर्वत्र अनयचे  कौतुक झाले.

समाप्त



या ब्लॉगवरील पुढील कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -


"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

२ टिप्पण्या:

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...