Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग४"

Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग४"

 

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)



मोहिनीविद्या - भाग ४ 



भाग


अजिंक्य - धन्य आहात तुम्ही दोघी, काय पण मला मैत्रिणी मिळाल्या आहेत!

 

किल्ल्याचा बराचसा भाग आता बघून झाला होता.

 

प्रणाली - अजिंक्य, आता आपण हळूहळू बाहेर पडू. कारण आता पाणी ओसरू लागेल.

 

अजिंक्य - हो चालेल. तुझ्याबरोबर वेळ कुठे निघून गेला ते कळलेच नाही.

 

दोघेजण किल्ल्या मधून बाहेर पडतात. प्रथम ते प्रणालीचा फार्महाऊसवर जातात. अजिंक्यने वाळत घातलेले कपडे आता उन्हामुळे सुकलेले असतात. अजिंक्य त्याचे कपडे घालतो.

 

अजिंक्य - प्रणाली, मी विशालचे कपडे धुऊन परत करतो.

 

प्रणाली - वेडा आहेस का? तु विशालचे कपडे का घातले? तू इकडे का आलास? आपण दोघे किल्ल्यावर एकत्र होतो का? अशा गप्पांना गावामध्ये ऊत येईल. इकडे आपण कसे अडकलो हे कोणालाही सांगायचे नाही.

 

अजिंक्य - अगं पण मी इतका वेळ विशालचे कपडे वापरले, ते धुवायला नकोत का?

 

प्रणाली - मी एका पिशवीतून ते कपडे घरी घेऊन जाते. बरेच दिवस कपडे तिथेच पडून आहेत, त्यामुळे आज धुवायला आणले असे घरी सांगेन. वाशिंग मशीन मध्ये पटकन धुऊन निघतील.

 

अजिंक्य - आपण इथे अडकलेले होतो हे नंतर कोणाला कळले तर काय करायचे?

 

प्रणाली - तसं कळणं अशक्यच आहे. तरीपण कळलेच तर तेव्हाचं तेव्हा बघू.

 

दोघेजण समुद्र तटापर्यंत येतात. पाणी अजून पूर्णपणे ओसरलेले नसते.

 

प्रणाली -  आपण अजून पंधरा मिनिटे थांबू. ओहटीच्या पाण्याला ओढ असते. उगाच रिस्क नको.



पंधरा मिनिटांतच पाणी पूर्णपणे ओसरते. दोघेही पटापट चालू लागतात आणि किनाऱ्यावर पोहोचतात. दोघेही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवतात.

 

प्रणाली - आता मी पुढे जाते. दहा मिनिटांनी मागाहून तू ये.

 

दोघांनाही आपापल्या घरी पोहोचेपर्यंत दुपारचे दोन वाजतात.

 

इकडे प्रणालीची आई आणि तिकडे अजिंक्यची आजी दोघीही दोघांची चांगलीच हजेरी घेतात.

 

आंघोळ करून अजिंक्य जेवून घेतो. आज अजिंक्यचे चित्त थाऱ्यावर नसते. प्रणाली बरोबर बेटावर घालवलेले क्षण त्याला आठवत असतात. परंतु त्याचबरोबर दुसरीकडे प्राचीची देखील आठवण येत असते. रात्री झोपण्यापूर्वी सुरेश मामाने दिलेला अंगारा मात्र तो न विसरता लावतो. अंगार्‍याची पुडी उशाखाली ठेवतो. अजिंक्य अंथरुणावर आडवा पडतो. सुरेश मामा बद्दल प्रणाली असे का बोलली असेल, असे त्याला सारखे वाटू लागते. विचार करता करता त्याला झोप लागते. त्या रात्री देखील त्याला काही स्वप्न पडत नाही.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्राची कॉम्प्युटर शिकण्यासाठी येते. साधारण एक तास अभ्यास होतो.

प्राची - आज आईने आंबे-डाळ केलेली आहे. आंबेडाळ खाण्यासाठी आईने तुला घरी बोलावले आहे.

 

अजिंक्य - पण आंबेडाळीच्या जोडीला पन्ह पण पाहिजे बरं.

 

प्राची - हो रे, पन्ह पण देईन.

आंबेडाळ खूपच छान झालेली असते. अजिंक्य आंबेडाळ खाऊन त्यावर पन्ह पितो. थोडावेळ तेथील सर्वांशी गप्पा मारुन अजिंक्य घरी परततो.

 

दुपारी अजिंक्य थोडावेळ आराम करतो. तेवढ्यात प्रणालीचा सोशल मीडियावर मेसेज येतो.

 

प्रणाली - अजिंक्य, कुठे आहेस?

 

अजिंक्य - घरीच आहे.

 

प्रणाली - आज संध्याकाळी मोकळा आहेस का?

 

अजिंक्य - हो. तसं पण सध्या मला काहीच काम नाही. बोल तुझं काय काम आहे?

 

प्रणाली - त्यादिवशी भजनाला आलास, परंतु बरोबर सगळेजण होते. घरातील कोणाशी तुला काही बोलता आले नाही. विशाल देखील तुझी आठवण काढत होता.

 

अजिंक्य - बर मग?

 

प्रणाली - आज संध्याकाळी ये आमच्या घरी. विशालदेखील भेटेल.

 

अजिंक्य - मग हे विशालला नाही का सांगता आलं? त्याची वकिली तू का करत आहेस?

 

प्रणाली - असं काय करतोस? तुला यायचं नसेल तर येऊ नकोस, मी ऑफलाईन जाते.

 

अजिंक्य - थांब थांब अशी रागवू नकोस. मी येतो संध्याकाळी.

 

प्रणाली - पण मी तुला बोलले असे मात्र त्याला सांगू नकोस.

 

अजिंक्य - बरं बाई, अजून काही?

 

प्रणाली - अजून काही नाही. मात्र नक्की ये.

 

संध्याकाळी घरी सांगून, अजिंक्य प्रणालीच्या घरी जातो. विशाल घरातच असतो. अजिंक्यला बघून विशालला आनंद होतो.

विशाल - ये अजिंक्य, आत मध्ये ये. बस ना.

 

अजिंक्य तेथील एका सोफ्यावर बसतो.

 

विशाल - अजिंक्य सॉरी हं, आमच्या हॉटेलचे रिनोवेशन चालू असल्यामुळे तू आल्यापासून, तुला भेटायला आलो नाही. भजनाच्या दिवशी आलास तेव्हा तर सगळी गडबड होती. बरं झालं तू आलास ते.

 

तेवढ्यात स्वयंपाकघरातून प्रणालीची आई बाहेर येते आणि अजिंक्यची विचारपूस करते. तसेच अजिंक्यला चहा नाष्टा करण्याचा आग्रह करते. ती प्रणालीला गोडाचा शिरा करण्यासाठी सांगते. अजिंक्य थोडावेळ विशालशी गप्पा मारत बसतो. तेवढ्यात प्रणाली गोडाचा शिरा घेऊन येते. साजूक तुपातला बदाम आणि काजू घालून केलेला शिरा खूपच छान झालेला असतो.

 

अजिंक्य - प्रणाली, शिरा खरंच छान झाला आहे बरं.

 

प्रणालीची आई - अरे शिराच काय, पण सर्व स्वयंपाक ती छान करते. हळूहळू मी तिला सर्व काही शिकवून ठेवले आहे.

 

अजिंक्य - अरे वा, मग चांगलंच आहे की.

 

शिर्‍याच्या मागोमाग चहा येतो. थोडावेळ बसून सर्वांचा निरोप घेऊन अजिंक्य तेथुन निघतो. घरी परतण्यापूर्वी अजिंक्य सुरेश मामाला भेटून येतो. सुरेश मामाच्या म्हणण्यानुसार अजिंक्य वरील मोहिनी विद्येचा प्रभाव आता अंगाऱ्यामुळे कमी झालेला असतो. तरीदेखील सुरेश मामा त्याला सावध राहण्यास सांगतो.

 

असेच अजून पाच-सहा दिवस जातात. प्राचीचे अजिंक्य कडे कॉम्प्युटर शिकणे चालूच असते. अधून मधून काही काम असल्यास प्राची सुट्टी घेत असे. असेच एक दिवस प्राचीने दुसऱ्या दिवशी ती येणार नसल्याचे सांगितले.

 

मध्येच एकदा किशोरी वहिनी वैशाली मामीच्या मोबाईलवर ईमेल करून अजिंक्यची कुंडली पाठवून देतात. त्यानंतर वैशाली मामीला कॉल करून अजिंक्य आणि प्राचीचे कसे काय चालू आहे याबाबत विचारणा करतात. अजिंक्य आणि प्राचीची चांगलीच गट्टी जमलेली आहे असे वैशाली मामी सांगते. प्राची दररोज अजिंक्य कडे कॉम्प्युटर शिकायला येत आहे असे देखील वैशाली मामी सांगते.

 

रात्री अंथरुणावर पडल्यावर प्रणालीचा मेसेज येतो-

प्रणाली - जागा आहेस का?

 

अजिंक्य - हो

 

प्रणाली - उद्या देखील मी बेटावरील आमच्या बागेत जाणार आहे.

 

अजिंक्य - का ग? विशाल आणि तुझे बाबा अजून हॉटेलच्या कामातच गुंतलेले आहेत का?

 

प्रणाली - हो रे. तुला उद्या जमेल का माझ्याबरोबर सोबत यायला?

 

अजिंक्य - खरं म्हणजे आपण तिकडे अडकल्यापासून आजीने मला त्या बेटावर जायला बंदी केलेली आहे. पण तुझ्यासाठी मी तिकडे येईन.

 

प्रणाली - फक्त कोणाला सांगू नकोस. उद्याच्या तिथीनुसार सकाळी सात वाजल्यापासून ओहोटी लागून पाणी ओसरायला सुरुवात होईल. आपण साडेसात पर्यंत किनाऱ्यावरून बेटाकडे निघू.

 

अजिंक्य - ठीक आहे.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी अजिंक्य लवकरच उठतो. मॉर्निंग वॉकला जात असल्याचे सांगून तो समुद्रकिनाऱ्यावर जातो. मागोमाग प्रणाली देखील येते. साडेसात वाजेपर्यंत पाणी बऱ्यापैकी ओसरू लागल्यामुळे दोघेही बेटावर जाण्यास निघतात. प्रथम दोघेही प्रणालीच्या नारळी-पोफळीच्या बागेमध्ये जातात.  सोलर पंपाच्या सहाय्याने प्रणाली बागेला शिपणे चालू करते. त्या बेटावर वीज येणे शक्यच नव्हते. अजिंक्यदेखील हातात फावडे घेऊन प्रणालीला मदत करत असतो. नारळी-पोफळीच्या एका रांगेतील झाडांना पाणी घालून झाल्यावर तिथे दगड आणि मातीचा छोटासा बांध घालायचा असतो. पुढे पाणी ज्या रांगेला हवे असेल तेथील दगड मातीचा बांध काढायचा असतो. अशा प्रकारे एक एक रांग पूर्ण करत शिपणे पूर्ण करायचे असते. एक तासाभरात शिपणे आटोपते.

 

प्रणाली - मी इकडे आले कि किल्ल्यावरच्या देवळात न चुकता जाते. खूप प्रसन्न वाटते तिथे. आज पण आपण तिकडे जाऊया का?

 

अजिंक्य - मला पण त्या देवळात खूप प्रसन्न वाटते. आपण जाऊ या तिथे. पण गेल्या वेळ सारखी भरती तर चालू नाही ना होणार?

 

प्रणाली - गेल्यावेळी पाणी ओसरल्यावर तू उशिरा आला होतास, त्यामुळे भरती चालू होउन आपण अडकलो. आज आपल्याला भरपूर वेळ आहे.

 

नेहमीप्रमाणे प्रणाली तलावातून दोन कमळे तोडून आणते. दोघेही देवळात दर्शनाला जातात. देवाचे दर्शन घेऊन देवाला कमळे अर्पण करतात. प्रणाली डोळे मिटून मनापासून देवाला काहीतरी प्रार्थना करत असते.

 

अजिंक्य - एवढी काय डोळे मिटून प्रार्थना केलीस?

 

प्रणाली - ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली ती गोष्ट मिळाली की सांगेन तुला. तू काय मागितलं देवाकडे?

 

अजिंक्य - मी ज्या काही संकटात आहे त्यातून मला वाचव, असे मी देवाकडे मागणे मागितले.

 

प्रणाली - संकट! कसले संकट?

 

अजिंक्य - खरं म्हणजे सुरेश मामाने मला कोणालाही काहीही सांगू नको म्हणून सांगितले आहे. पण फक्त तुला म्हणून सांगतो.

 

प्रणाली - एवढं काय घडलं आहे?

 

रोज रात्री पडणाऱ्या त्या भयानक स्वप्नापासून ते सुरेश मामाला भेटल्या पर्यंतचा सर्व वृत्तांत अजिंक्य प्रणालीला सांगतो.

 

प्रणाली - मोहिनीविद्या! किती भयानक आहे हे सगळे? पण मी तुला सांगितले होते ना त्या सुरेश काकांकडे जाऊ नकोस म्हणून? आणि त्यांनी हा प्रकार कोणाला सांगू नको असे सांगितले असताना तू मला कसे काय हे सगळे सांगितलेस?

 

अजिंक्य - तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. उलट त्यांनी दिलेल्या अंगाऱ्यामुळेच मला ते वाईट स्वप्न पडायचे बंद झाले आहे. तू तर माझी बालपणीची खूप जवळची मैत्रीण आहेस. नुकतेच तू माझे प्राण देखील वाचवले आहेस. तुझ्या पासून मी काय लपवणार.

 

प्रणाली - तुझा कोणावर संशय आहे का?

 

अजिंक्य - माझे कोणाशीच भांडण नाही. तसेच मी कोणाचे कधी वाईट देखील केलेले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार माझ्या बाबतीत का आणि कोण करतय हे मला कळे नाहीसे झाले आहे.

 

प्रणाली - तुझा माझ्यावर इतका विश्वास आहे हे पाहून मला खूप बरं वाटलं.

 

अजिंक्य - ते सर्व जाऊ दे. आपण गेल्या वेळेला संपूर्ण किल्ला बघितलेला नव्हता, आता उरलेला किल्ला बघायचा का?

 

प्रणाली - हो बघूया की.

 

किल्ल्याचा उत्तरेकडील भाग बघायचा राहिलेला असतो. त्यामुळे दोघेही त्या बाजूला जातात. उत्तरेकडचा बुरुज चढून दोघेही वर जातात. दोघांच्या गप्पा चालू असतात.

बुरुजाच्या खाली किल्ल्यामध्ये थोडी झाडे देखील उगवलेली असतात. तेवढ्यात दोघांचेही लक्ष खालच्या बाजूला जाते. दोन स्त्रिया किल्ल्यातील एका खोलीमध्ये जाताना त्यांना दिसतात. एका स्त्रीच्या हातात एक काळी बाहुली असते. झाडी असल्यामुळे त्या स्त्रिया व्यवस्थित दिसत नसतात. दोघीही पाठमोर्‍याच असतात. एक म्हणजे प्राची असते आणि दुसरी तिची आई असते.

 

प्राची इथे काय करत आहे? अजिंक्य स्वतःशीच पुटपुटतो.

तो प्राचीला हाक मारण्यासाठी तोंड उघडतो. तेवढ्यात प्रणाली त्याचे तोंड हाताने दाबून धरते.

 

प्रणाली - थांब, एक अक्षर पण बोलू नकोस. त्या काय करत आहेत ते आधी बघ.

 

त्या दोघींनी बरोबर पूजेचे साहित्य देखील आणलेले असते. त्या दोघीजणी आत मध्ये जातात. प्रणाली आणि अजिंक्य थोडे अंतर ठेवून त्या काय करत आहेत ते बघू लागतात.

 

दोघींनी येताना दोन चार्जेबल लॅम्प आणलेले असतात. आत मधल्या खोलीमध्ये एक तळघर असते. तळघराच्या वरती जमिनीला लागून एक लाकडी दरवाजा असतो. दोघीजणी दरवाजा उघडून खाली पायर्‍या उतरून जातात. खाली एक मोठी खोली असते. तिथे दिसायला भयानक अशी एक मूर्ती असते. दोघीजणी त्या मूर्तीची पूजा करू लागतात. त्या मूर्तीच्या समोर, बरोबर आणलेली काळी बाहुली आडवी ठेवतात. दोघीजणी काहीतरी मंत्र पुटपुटु लागतात. अर्धा तासात दोघींची पुजा आटोपते. काळी बाहुली तिथेच आडवी ठेवून त्या बाहेर येतात. अजिंक्य आणि प्रणाली आडोशाला लपून राहतात. प्राची आणि तिची आई दोघीजणी लगबगीने किल्ल्यातून बाहेर पडतात. त्या निघून गेल्याची खात्री झाल्यावर अजिंक्य आणि प्रणाली दोघेही एकमेकांशी बोलू लागतात.

 

अजिंक्य - हे सर्व काय चालू होते?

 

प्रणाली - एवढे सर्व होऊन देखील तुला काहीच कसे कळले नाही रे?

 

अजिंक्य - खरंच मला काही कळले नाही. तूच सांग तुला काय कळलं ते.

 

प्रणाली - आता माझ्या एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली आहे. तुझे सुरेश मामा बोलत आहेत ते खरे आहे. ती काळी बाहुली, मोहिनीविद्या, तुला पडणारे स्वप्न या सर्वांच्या मागे या दोघीजणीच आहेत.

 

अजिंक्य - प्राची आणि तिची आई असे काही करतील यावर माझा विश्वासच बसत नाही.

 

प्रणाली - आधी तू येथील प्रकाराचा फोटो काढून सुरेश मामांना कळव आणि त्यांना कॉल कर.

 

अजिंक्य लगेचच तेथील सर्व भागाचा फोटो काढून सुरेश मामाला पाठवतो. तसेच त्याला कॉल देखील करतो.

 

सुरेश मामा - मला काही दिवसांपासूनच शंका येऊ लागली होती की, आपल्याच गावातील कोणीतरी असल्या विद्यांचे प्रयोग करत आहे. परंतु प्राची आणि प्राचीची आई हे असले काही करत असतील असे वाटले नव्हते. तू आता लगेचच मोबाईल प्रणालीकडे दे. मला तिच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.

 

अजिंक्य - थांब, देतो तिच्याकडे.

 

अजिंक्य प्रणालीकडे मोबाईल देतो.

 

प्रणाली - काका, हा सर्व प्रकार बघून मला खूपच भीती वाटू लागली आहे.


क्रमशः


कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...