लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
मोहिनीविद्या - भाग ५ (शेवटचा भाग )
भाग ५ (शेवटचा भाग)
सुरेश मामा - अजिबात घाबरू नकोस. फक्त
मी आता जे सांगत आहे ते सर्व व्यवस्थित कर. आज अष्टमी आहे. आता थोड्याच वेळात
भांगाची भरती सुरू होईल. त्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव वाढेल. भरती सुरू
होण्याच्या आधी तुला काम करायचे आहे. तू देवाचे नाव घेऊन ती काळी बाहुली उचल. नंतर
किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन, दूरवर समुद्रात ती काळी बाहुली फेकून दे. अजिंक्यचा
स्पर्शदेखील त्या बाहुलीला होऊ देऊ नकोस. तुम्ही दोघे लवकरात लवकर तिथून निघा.
त्यानंतर आपापल्या घरी जाऊन अंघोळ करून मला येऊन भेटा.
प्रणाली - ठीक आहे काका, तुम्ही सांगत आहात तसेच मी करेन.
अजिंक्य - मामा काय बोलला?
प्रणाली - तू देवाचे नाव घेत बाजूला
उभा रहा. मी करते सर्वकाही.
प्रणाली लगेच तळघरात प्रवेश करते.
सुरेश मामाने सांगीतल्याप्रमाणे देवाचे नाव घेऊन ती काळी बाहुली उचलते. त्यानंतर
ती धावतच बुरुजावर जाऊ लागते. पण अचानक प्रणालीचे पाय बधीर होऊ लागतात. कोणीतरी
मागून खेचत असल्याचा भास तिला होऊ लागतो. तिची ही अवस्था बघून अजिंक्य तिच्या
दिशेने येऊ लागतो.
तू लांबच थांब, या बाहुलीला
स्पर्शदेखील करू नकोस असे प्रणाली ओरडूनच अजिंक्यला सांगते.
तेवढ्यात प्रणालीला तिची आई जे कवच
स्तोत्र म्हणायची ते आठवते. आईबरोबर दररोज म्हणून तिचे ते कवच स्तोत्र पाठ देखील
झालेले असते. प्रणाली सर्व जोर एकवटून मोठ्याने कवच स्तोत्र म्हणू लागते. त्या कवच
स्तोत्राच्या प्रभावामुळे हळूहळू प्रणालीला मोकळे वाटू लागते. जेवढ्या वेगाने शक्य
होईल तेवढ्या वेगाने प्रणाली बुरुजावर पोहोचते. सर्व जोर एकवटून प्रणाली ती काळी
बाहुली समुद्रात दूरवर फेकते.
आपल्या अंगावर एक जाळे होते आणि आता ते
अचानक हवेत उडून गेले असा भास अजिंक्यला होतो. तेवढ्यात प्रणाली बुरुजावरून खाली
उतरून येते.
प्रणालीचा हात हातात घेऊन अजिंक्य तिला
आनंदाने ओरडून सांगतो की, प्रणाली आज परत एकदा तू मला वाचवलंस. माझं तुझ्यावर खूप
प्रेम आहे. परंतु माझ्यावर पडलेल्या मोहिनी मुळे मी ते ओळखू शकलो नाही. माझ्यासाठी
तू तुझा जीव धोक्यात घातलास.
प्रणाली - अरे हेच तर मी मगाशी देवळात
देवाकडे मागितले होते. आपल्याला आता लवकर परतायला हवे. आता भरती चालू होईल.
त्याच्या आत आपण येथून सटकु. आपल्याला सुरेश काकांनी बोलावले आहे.
दोघेजण पळतच किल्ल्याच्या बाहेर पडतात.
अजून भरतीला सुरुवात झालेली नसते. झपाझप पावलं उचलत दोघेजण बेटावरून किनाऱ्याच्या
दिशेने जाऊ लागतात. दोघेजण मध्यावर येतात तोपर्यंत भरतीला सुरुवात होते. पाणी गुडघ्यापर्यंत चढते. तसेच पटापट चालत
दोघेजण किनार्यावर पोहोचतात.
दोघेजण आपापल्या घरी जातात. अंघोळ
उरकून सुरेश मामाच्या घरी जायला निघतात. आत्ताच तर आला / आली आहेस, आता कुठे जात आहेस? दोघांच्या घरून
विचारणा होते. मित्र / मैत्रिणी कडे जात आहे सांगून दोघेही बाहेर पडतात आणि सुरेश
मामा च्या घरी जातात. सुरेश मामाने एका पूजेची तयारी केलेली असते. होम - हवनासाठी
होमकुंड देखील तयार ठेवलेले असते. मामा दोघांच्या कडून पूजा आणि होम करून घेतो.
सुरेश मामा - ती काळी बाहुली समुद्रात
टाकल्या पासून अजिंक्यवरील मोहिनी विद्येचा प्रभाव तर नष्ट झालेला होता. परंतु
बेटावर तुम्ही त्या वाईट शक्तीच्या संपर्कात आलेले होतात. ही पूजा आणि होम
केल्यामुळे तुमचा धोका आता पूर्णपणे टळलेला आहे.
अजिंक्य - प्राची तर माझी
लहानपणापासूनची मैत्रीण. मग ती माझ्याशी असे का वागली असेल?
सुरेश मामा - लग्नासाठी.
अजिंक्य - म्हणजे? मला कळले नाही.
सुरेश मामा - तुझ्यासारखा स्वभावाला
चांगला आणि श्रीमंत मुलगा, नवरा म्हणून प्राचीला मिळावा अशी त्या मायलेकींची इच्छा
असणार. फक्त तुझ्यावरच नाही तर तुझ्या आईवर देखील त्या दोघींनी मोहिनी विद्येचा
प्रयोग केला असण्याची शक्यता आहे. कारण तुझ्या आईला प्राची पसंत पडली होती. तिने
मला तसे सांगितले देखील होते. तेव्हा तू तिथे नव्हतास. त्या दोघींनी तुमच्या
दोघांच्या खाण्यात किंवा पेय पदार्थात अंगारा मिसळला असणार.
प्रणाली - काका थँक यु. तुमचे ऐकले
म्हणून बरे झाले.
सुरेश मामा (हसत) - पण तुम्ही दोघे
त्या बेटावर कशासाठी गेला होतात?
अजिंक्य, सुरेश मामाला त्या बेटावर जे
काही घडले ते सर्व सांगतो. तसेच प्रणालीने त्याचे प्राण कसे वाचवले ते देखील
सांगतो.
अजिंक्य - माझे तर प्रणालीवर प्रेम
होते. परंतु ती संपर्कात नसल्यामुळे मला ते व्यक्त करता येत नव्हते. तसेच माझ्यावर
झालेल्या मोहिनी विद्येच्या प्रयोगामुळे मी प्राचीकडे आकर्षिला गेलो होतो. पण आता
मात्र मी आणि प्रणालीने लग्न करण्याचे ठरविले आहे. पण घरच्यांना कसे समजावू ते
मात्र कळत नाही आहे.
सुरेश मामा - तुम्ही दोघे जण त्याची
अजिबात चिंता करू नका. ती जबाबदारी आता माझी. आता घरी जा आणि निवांत रहा.
अजिंक्य आणि प्रणाली आपापल्या घरी
जातात.
तिकडे किशोरी वहिनींवर झालेला मोहिनी
विद्येचा प्रयोग देखील नष्ट झालेला असतो. मी प्राचीला कोणत्या कारणासाठी सून
म्हणून पसंत केली असा त्या विचार करु लागतात. प्राची, अजिंक्य साठी योग्य आहे का? असे त्यांना वाटू लागते.
सुरेश मामाकडून आल्यावर अजिंक्य जेवून
घेतो. थोडावेळ आराम करण्यासाठी तो अंथरुणावर आडवा पडतो. तेवढ्यात त्याला बाहेर
काही गडबड ऐकू येते. त्यामुळे तो उठून पुढच्या पडवीत येतो. बाहेर प्राचीचे वडील
विवेक मामाला रडतरडत काहीतरी सांगत असतात.
प्राचीचे वडील - दोघीजणी खरेदीसाठी
तालुक्याच्या गावी गेल्या होत्या. त्या आल्यावर जेवण झाले. आत्ता पर्यंत व्यवस्थित
होत्या. आणि आता अचानक दोघीजणी बेशुद्ध पडल्या आहेत.
अजिंक्यच्या घरातील सर्वजण त्यांच्या
घरी जातात. अजिंक्य देखील जातो. तोपर्यंत डॉक्टर देखील येतात. या दोघी का बेशुद्ध
पडल्या आहेत ते डॉक्टरांना देखील कळत नाही. त्या दोघींना तालुक्याच्या
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी डॉक्टर सांगतात. प्राचीच्या वडिलांबरोबर अजिंक्यचे
मामा मामी हॉस्पिटलमध्ये जातात.
त्या दोघींची अशी अवस्था बघून अजिंक्यला खूप वाईट वाटते.
अजिंक्य लगेचच प्रणालीला बोलावतो. दोघेही सुरेश मामाकडे परत जातात. अजिंक्य घडलेला
प्रकार मामाला सांगतो.
सुरेश मामा - असे काहीसे होईल, असे मला
वाटतच होते. त्या दोघींनी केलेला मोहिनी विद्येचा प्रयोग यशस्वी न झाल्यामुळे
त्यांच्यावरच उलटला.
प्रणाली - काका पण त्या दोघींना
वाचवायला पाहिजे. त्या दोघी जणी इतक्या पण वाईट नाहीत.
अजिंक्य - हो मामा, वाचव त्यांना. त्या
दोघींनी माझ्या जिवाला कोणताही धोका उत्पन्न केलेला नव्हता. माझ्या मनावर ताबा
मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे चुकलेच, पण प्राची माझी लहानपणापासूनची
मैत्रीण आहे. तिची अशी अवस्था मी बघू शकत नाही.
सुरेश मामा - ठीक आहे, तुमच्या
दोघांच्या आग्रहास्तव मी प्रयत्न करतो. आपल्याला गावातील तळ्याच्या बाजूला
असलेल्या देवळात जाऊन पूजा करावी लागेल.
अजिंक्य, प्रणाली आणि सुरेश मामा त्या
देवळात जाऊन भक्तिभावाने पूजा करतात. प्राची आणि प्राचीच्या आईला वाचवण्यासाठी
देवाकडे प्रार्थना करतात. सुरेश मामा अजिंक्य जवळ तीर्थ देतात आणि ते त्या दोघींना
पाजण्यासाठी सांगतात. प्राची साठी अजिंक्य पूजा करत आहे हे ऐकून त्याच्या
आजी-आजोबांना खूप कौतुक वाटते. परंतु त्यामागील गुप्त कारण कोणालाच माहीत नसते.
आजोबांची टू व्हीलर घेऊन अजिंक्य आणि प्रणाली हॉस्पिटलमध्ये जातात. बरोबर सुरेश
मामा देखील त्याची टू व्हीलर घेऊन जातो.
आजी (आजोबांना) - अहो किशोरीच्या
मनासारखे होणार असे दिसते.
आजोबा - म्हणजे काय ग?
आजी - अहो किशोरीला प्राची सून म्हणून
पसंत आहे. ती माझ्याजवळ आणि वैशाली जवळ बोलली देखील होती.
आजोबा - पण तुम्ही अजिंक्यला विचारले
आहे का?
आजी - आता विचारायला कशाला पाहिजे?
कृतीतून कळतंच की. तो प्राचीला रोज कॉम्प्युटर नव्हता का शिकवत? आता तर ती आजारी
पडली आहे हे बघून तिच्यासाठी पूजा देखील केली अजिंक्यने.
आजोबा - तू एका बाजूनेच विचार करत
आहेस. आत्ता सुरेशकडे तो प्रणालीला घेऊन गेला. पूजेला देखील त्याच्याबरोबर
प्रणालीच होती. आणि आता हॉस्पिटलमध्ये देखील तो तिलाच बरोबर घेऊन गेला आहे.
आजी - प्रणाली देखील मैत्रीण आहे त्या
दोघांची.
आजोबा - तू त्या दोघांकडे नीट बघितले
नाहीस. जणूकाही एकमेकांची मने जाणून आहेत असेच वागत होते दोघेजण. मी माझा अंदाज
सांगितला. आपण वाद कशाला घालायचा. आपण एकदा अजिंक्यलाच विचारू.
आजी - बरोबर बोलताय तुम्ही.
तेवढ्यात रस्त्यावर गाडी थांबते.
किशोरी वहिनी अविनाश काका आणि अंजली गाडीमधून उतरतात.
आजी - हे अचानक तिघेजण येथे कसे काय
आले?
आजोबा - या जावईबापू आत मध्ये या.
सर्वजण घरामध्ये जातात.
अविनाश काका - आज दुपारपासून किशोरीची
मनःस्थिती काही ठीक नव्हती. इकडे काय तुम्ही अजिंक्यसाठी मुलगी बघितली आहे का?
कारण किशोरी सारखी बडबडते आहे की, माझं काहीतरी चुकतंय, माझं काहीतरी चुकतंय. ती
मुलगी अजिंक्यला योग्य आहे की नाही कळत नाही. अजिंक्यला भेटायचे आहे म्हणून सारखी
ती म्हणत होती. तिला एकटीला इकडे पाठवणे आम्हाला बरोबर वाटले नाही, म्हणून मी आणि
अंजली देखील बरोबर आलो.
आजोबा - नाही बुवा, आम्ही इकडे काही
मुलगी वगैरे बघितलेली नाही.
किशोरी वहिनी - आई तू प्राचीच्या घरी
काही बोलली तर नाहीस ना मी काय बोलले ते?
आजी - नाही गं, मी प्राचीच्या आईला
काहीही बोलले नाही. पण का गं? तुला तर प्राची सून म्हणून पसंत आहे ना?
किशोरी वहिनी - नाही गं, आज दुपारपासून
माझ्या मनाची सारखी चलबिचल होत आहे. खूप भीती वाटत आहे. अजिंक्यच्या आयुष्याचा
प्रश्न आहे ना. अजिंक्य प्राचीच्या प्रेमात तर नाही ना पडलेला?
आजी - अगं किशोरी तुझं काय चाललंय? मला
तर काही कळतच नाही आहे.
अंजली - बघ ना आजी. आज दुपारपासून आई
डिस्टर्ब आहे. दुपारी जेवली देखील नाही नीट. सून म्हणून योग्य मुलगीच घरात आली
पाहिजे असं सारखं बडबडत आहे.
पण दादा कुठे आहे.
आजोबा घडलेली सर्व हकीकत या तिघांना
सांगतात. अर्थात मोहिनी विद्येबाबत कोणालाच काही माहिती नसते.
अजिंक्य ने केलेल्या पूजेचे फळ मिळते.
तिकडे प्राची आणि तिची आई शुद्धीवर येतात. त्यामुळे विवेक मामा आणि वैशाली मामी
हॉस्पिटल मधून परतायला निघतात. प्राचीचे
वडील औषधे आणण्यासाठी बाहेर जातात.
अजिंक्य पुढे होऊन दोघींना पूजेचे
तीर्थ पाजतो. आता त्या रूममध्ये फक्त प्राची, प्राचीची आई, प्रणाली, अजिंक्य आणि
सुरेश मामा एवढे पाचजणच असतात.
प्राचीच्या आईला आणि प्राचीला रडू येऊ
लागते. बेशुद्ध पडण्यापूर्वी प्राचीच्या आईच्या लक्षात आले असते की, आपलाच प्रयोग
आपल्यावर उलटलेला आहे. या सर्व गोष्टी नक्कीच अजिंक्यला कळलेल्या असतील हे देखील
त्या दोघींच्या लक्षात येते. आपण असे वागून देखील अजिंक्यने आपल्यासाठी पूजा केली
हे पाहून त्यांना पश्चात्ताप होतो.
प्राची (रडत) - अजिंक्य आम्हाला माफ
कर.
सुरेश मामा - प्राचीची आई, तुम्ही तर
देवभोळ्या, मग तुम्ही ही मोहिनी विद्या कधीपासून वापरू लागलात?
प्राचीची आई - माझ्या मावशीचा प्राची
वर खूप जीव. दोन महिन्यांपूर्वी मावशीकडे गेलेले असताना प्राचीच्या लग्नाचा विषय
निघाला. अजिंक्य माझ्या नजरेसमोर होता. प्राचीला देखील तो खूप आवडायचा. त्यामुळे
माझ्या मावशीने मला मोहिनी विद्या शिकवली. योगायोगाने किशोरीताई आणि अजिंक्य देखील
गावी आले होते. त्यावेळी आम्ही चहातून अंगारा मिक्स केला. मधून मधून प्राची देखील
अजिंक्यला घरी घेऊन येत होती. त्यामुळे आम्हाला आमचा प्रयोग अजून नीट करता आला.
खरं म्हणजे हे सर्व करण्यासाठी मला खूप भीती वाटत होती. परंतु चांगला जावई मिळत
आहे, म्हणून प्राची साठी मी हे सर्व केले.
सुरेश मामा - अहो, असे मनाविरुद्ध लग्न
लावून अजिंक्य आणि प्राचीचा संसार सुखाचा झाला असता असे तुम्हाला वाटते का? आणि या
असल्या गोष्टींच्या नादी लागून तात्पुरता फायदा मिळतो, परंतु शेवटी मात्र नुकसानच
होते.
प्राचीची आई - आता गावातील लोक आम्हाला
काय म्हणतील? आम्हाला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही.
सुरेश मामा - तुम्हाला पश्चाताप झाला
यातच सर्व आले. तसे पण तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला मिळालेली आहे. झाली तेवढी
शिक्षा भरपूर झाली. ही गोष्ट आपल्या पाच जणांमध्येच राहील. याची कुठेही वाच्यता
होणार नाही. यापुढे मात्र नीट वागा.
अजिंक्य - प्राची तु सुंदर आहेस,
चांगली शिकलेली आहेस. तुला नक्कीच चांगला जोडीदार मिळेल. मी आणि प्रणाली तुझ्या
पाठीशी आहोत. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्राची - थँक यु, अजिंक्य आणि प्रणाली.
तुम्हाला पुढील आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक.
तोपर्यंत अजिंक्यला अंजली चा फोन येतो.
आम्ही तिघे जण आजी-आजोबांकडे आलेलो आहोत असे ती त्याला सांगते.
तिघेजण गावाकडे परततात. प्रणाली तिच्या
घरी जाते. सुरेश मामा मात्र अजिंक्यच्या बरोबर त्याच्या घरी जातो. झाल्या प्रकारामुळे किशोरीताई ची मानसिक स्थिती
देखील ठीक नाही हे त्याच्या लक्षात येते. परंतु तो मूळ कारण काही बोलत नाही. तो
किशोरी वहिनींना समजावून शांत करतो. तसेच अजिंक्य आणि प्रणालीच्या लग्नाचा विषय
देखील बोलतो. तलावात बुडताना अजिंक्यला प्रणालीने कसे वाचविले हे देखील तो
सर्वांना सांगतो. ते ऐकून सर्वांना प्रणालीचे कौतुक वाटते.
किशोरी वहिनी - अरे पण दोघांची कुंडली
जुळते की नाही ते नको का बघायला? शिवाय अजिंक्यला ती पसंत आहे का?
सुरेश मामा (हसत) - ही दोन्ही मुलं
लबाड आहेत. या दोघांनी मनातून कधीच ठरवलं होतं. फक्त योग्य वेळ आली नव्हती. मी आजच
दोघांची कुंडली बघितली. कुंडली चांगली जुळत आहे, चिंता नको.
त्यानंतर अजिंक्यचे आई - वडील
प्रणालीच्या घरी जाऊन तिला मागणी घालतात. एका चांगल्या मुहूर्तावर अजिंक्य आणि
प्रणालीचे लग्न होते. मोहिनी विद्येचे गुपित मात्र त्या पाच जणांमध्येच राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा