Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग३"

Read share best Marathi katha free "मोहिनीविद्या-भाग३"

 

लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)


मोहिनीविद्या - भाग ३ 


भाग ३

 

सुरेश मामा - या विद्येच्या सहाय्याने एक माणूस दुसऱ्या माणसाला वश करतो. म्हणजेच एक माणूस दुसऱ्या माणसाला कंट्रोल करू शकतो, त्याला ऑर्डर देऊ शकतो. या ऑर्डर डायरेक्ट दिल्या पाहिजेत असे नाही. घरी बसून देखील एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मनात आपले विचार बिंबवु शकतो.

 

अजिंक्य - पण माझ्याशी असे वागून कोणाला काय फायदा? मी तर कोणाच्या अध्यात ना मध्यात.

 

सुरेश मामा - तुझे वडील कंपनीचे मालक आहेत. म्हणजेच तु देखील इनडायरेक्टली कंपनीचा मालक झालास. तेथे तुमच्या कोणी वाईटावर असू शकते. अगदी असेच असेल असं पण नाही. आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याकडून देखील हा प्रकार होऊ शकतो. परंतु आजच्या विज्ञान युगात याबाबत फारशी कुणाला माहिती नाही.

 

अजिंक्य - अजून तरी मला कोणाकडून काही ऑर्डर आलेल्या नाहीत किंवा माझे नुकसान झालेले नाही.

 

सुरेश मामा - अरे आत्ता तर सुरुवात आहे. ज्या कोणी तुझ्यावर या विद्येचा वापर केला आहे, त्याला अजून पुढचे प्रयोग करायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला या कामासाठी भेटलास हे कोणालाही सांगू नकोस. असे झाल्यास ती व्यक्ती सावध होईल.

 

अजिंक्य - मामा, यावर उपाय काय?

 

सुरेश मामा - कोणताही मोठा निर्णय मला विचारल्याशिवाय, तसेच आपल्या जवळच्या नातेवाईकांना विचारल्याशिवाय घेऊ नकोस. तुझ्यावर झालेल्या प्रयोगासाठी एका बाहुलीचा वापर केला असण्याची शक्यता आहे. ती बाहुली वाहत्या पाण्यात सोडली, की हा प्रयोग नष्ट होईल. परंतु तुझ्यावर मोहिनी विद्येचा वापर कोणत्या व्यक्तीने केला आहे हे शोधणे खूप महत्त्वाचे आहे, तसेच ते अवघड देखील आहे. उगाचच मनात आले म्हणून कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे पूर्णतः चुकीचे आहे. आपल्याला त्या व्यक्तीला काहीही करायचे नाही, त्या व्यक्तीचा वाईटपणा मोडून काढायचा आहे.

 

अजिंक्य - मी आता काय करू?

 

सुरेश मामा - तू थोडेफार जे देवादिकाचे नामस्मरण करतोस, ध्यानधारणा करतोस त्यामुळेच तुला माझ्याकडे येण्याची बुद्धी झाली. नाहीतर तू या विद्येमध्ये गुरफटत गेला असतास. मी तुला अंगारा देतो, तो अंगारा रोज सकाळी आणि रात्री कपाळाला लाव. कुणाला कळणार नाही इतपतच लाव. तसेच तो अंगारा असलेली पुडी झोपताना उशाजवळ ठेवून झोप. दर दोन दिवसांनी येऊन मला भेट. तू काहीही काळजी करू नकोस, तुला काही पण होणार नाही.

 

लगेचच अजिंक्य त्या पुडीतील थोडासा अंगारा कपाळाला लावतो आणि सुरेश मामाला थँक यु म्हणून बाहेर पडतो.

 

अजिंक्य घरी परततो. तोपर्यंत प्राची कॉम्प्युटर शिकण्यासाठी घरी आलेली असते. दुसर्‍या दिवशी प्राची येणार नसते. तिला कुठेतरी बाहेर जायचे असते. तो दिवस असाच निघून जातो. रात्री मात्र अजिंक्य ला चांगली झोप लागते. कुठलेही स्वप्न त्याला पडत नाही. सुरेश मामाने सांगितलेला उपाय चांगला लागू पडलेला असतो.

 

सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉक साठी म्हणून अजिंक्य घराबाहेर पडला. आज तो समुद्रकिनाऱ्यावर आला होता. समुद्रामध्ये एक बेट होते. बेट खूप मोठे होते. बेटाच्या एका बाजूला एक मोठा किल्ला होता आणि दुसऱ्या बाजूला बागायती जमीन होती. परंतु हे बेट किनाऱ्यापासून अगदी जवळ होते. इतके जवळ की ओहोटी लागली की चालत चालत त्या बेटावर जाता येत असे. परंतु एकदा का भरतीला सुरुवात झाली की तिथून परत किनाऱ्यावर येणे अशक्य असे.

 

त्या किल्ल्यामध्ये एक प्राचीन मंदिर होते. तसेच बेटावरील परिसर देखील अतिशय सुंदर होता. इतके सुंदर ठिकाण असून देखील पर्यटनापासून वंचित होते. ज्या काही थोड्या लोकांच्या बागायती जमिनी त्या बेटावर होत्या तेवढेच लोक तेथे जात असत. परंतु ते सुद्धा बागेमध्ये काम करण्यापुरतेच. किल्ल्यामध्ये क्वचितच कोणी जाई. कारण रोज रोज बघण्यासारखे असे तिथे काहीच नव्हते.

 

अजिंक्यला लहानपणापासूनच त्या बेटाचे आकर्षण होते. लहानपणी एकदा आजोबांबरोबर तो त्या किल्ल्यामध्ये जाऊन आला होता. आज मात्र अजिंक्य खूपच सकाळी किनार्‍यावर आलेला होता. घरातून निघताना तरी, त्या बेटावर जाण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात नव्हता. किनार्‍यावरून समोर दिसणारा किल्ला बघून अजिंक्यला मात्र तिथे जावेसे वाटू लागले. ओहोटी लागली असल्यामुळे बेटावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. किनार्‍यावर शुकशुकाट होता. अजिंक्य चालत चालत त्या बेटाकडे निघाला. खारा वारा अंगावर घेत, त्या ओल्या मातीतून चालायला अजिंक्यला छान वाटत होते. मध्ये-मध्ये मोबाईलवर फोटो शूटिंग चालू होते. साधारण पंधरा मिनिटांतच तो त्या बेटावर पोहोचला.

 

बेटावर पोहोचल्यावर दोन पायवाटा होत्या. एक वाट बागायती जमीनींकडे जात असे, तर दुसरी किल्ल्याकडे. अजिंक्य किल्ल्याच्या दिशेने निघाला. किल्ला थोडासा उंचावर होता. तेथील चढ चढून अजिंक्य किल्ल्यापर्यंत पोहोचला. किल्ल्याचा काही भाग आता मोडकळीस आलेला होता. मुख्य दरवाजा मात्र शाबूत होता. मुख्य दरवाजामधून आत शिरून अजिंक्य किल्ल्याचा एक एक भाग न्याहाळू लागला. थोडे पुढे गेल्यावर अजिंक्यला देऊळ दिसले.

 

देवळाच्या बाहेर तलाव होता. तलाव खूप मोठा होता. त्याच्यामध्ये लाल आणि निळी कमळे उमललेली होती. देवळात जाण्यापूर्वी एखादे कमळ तोडून ते देवाला वहावे असे त्याला वाटू लागले. हातातील मोबाईल पाण्यात पडू नये म्हणून त्याने तो काठावरील एका मोठ्या दगडावर ठेवला. कमळ काढण्यासाठी म्हणून अजिंक्य आत पाण्यामध्ये शिरला. त्याने एक निळे कमळ तोडले. परंतु तलावामध्ये असलेल्या दलदलीचा त्याला अंदाज आला नाही. तो त्या दलदलीमध्ये रुतु लागला. आता काय करावे ते त्याला सुचे नाहीसे झाले. तो मदतीसाठी हाका मारू लागला.

 

तेवढ्यात तेथे आवाज ऐकून प्रणाली धावत आली. समोरील दृश्य बघून ती घाबरून गेली. अजिंक्यला हात देण्यासाठी ती प्रयत्न करु लागली. परंतु अजिंक्य तलावाच्या काठापासून आत मध्ये दूर गेला होता. तेवढ्यात प्रणाली देवळाच्या दिशेने धावत गेली. आता आपण या चिखलात गुदमरून मरणार असे अजिंक्यला वाटू लागले. देवळाच्या मागे असलेल्या विहिरीला एक रहाट होता. त्या रहाटाला बांधलेली सुंभाची दोरी प्रणाली घेऊन आली. प्रणालीने दोरी अजिंक्यच्या दिशेने फेकली.  अजिंक्यने दोरी पकडली. प्रणालीने दोरीचे एक टोक बाजूच्या एका झाडाला बांधले. आता ती अजिंक्यला दोरीच्या साह्याने खेचायचा प्रयत्न करु लागली. खेचल्या मुळे अजिंक्य चिखलातून थोडासा मोकळा झाला. आता त्याचा तो पुढे येण्याचा प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात अजिंक्य त्या तलावातून पूर्ण बाहेर आला.

 

अजिंक्य - प्रणाली, आज तू होतीस म्हणून मी वाचलो. नाहीतर माझे काही खरे नव्हते. तुझे आभार कसे मानू ते मला कळे नाहीसे झाले आहे.

 

प्रणाली - मैत्रीत आभार कसले मानतोस? आता आधी आंघोळ करून घे. चिखलाने किती माखला आहेस बघ.

 

अजिंक्य - इथे कुठे आंघोळ करु?

 

प्रणाली - थांब देवळाच्या मागच्या विहिरीवर बादली आहे. ती मी घेऊन येते.

 

प्रणाली पटकन जाऊन बादली घेऊन येते. तलावातील पाणी काठावरून घेऊन अजिंक्यच्या अंगावर ओतते. त्यामुळे अजिंक्यला लागलेला चिखल धुवुन निघतो. बराच वेळ पाण्यात राहिल्यामुळे आता अजिंक्यला थंडी वाजू लागते.

 

प्रणाली - माझ्याबरोबर आमच्या फार्महाऊसवर चल.

 

अजिंक्य - तुमचे फार्महाऊस इकडे कुठे?

 

प्रणाली - जास्त बोलू नकोस, माझ्याबरोबर पटकन चल. तुला खूप थंडी वाजत आहे.

 

मोबाईल घेऊन अजिंक्य प्रणालीच्या मागोमाग जाऊ लागतो. किल्ल्याचा दरवाजा ओलांडून प्रणाली बागायत जमीनीच्या तिकडे जाऊ लागते. थोडे पुढे गेल्यावर प्रणाली एका नारळी-पोफळीच्या बागेमध्ये शिरते. तिथे एक छोटेसे कच्चे बांधकाम केलेले घर असते. प्रणाली तिच्या जवळच्या चावीने घराचे लॉक उघडते.

 

प्रणाली - ये आत मध्ये ये.

 

अजिंक्य घरामध्ये शिरतो. घरात फारशा काही वस्तू नसतात. प्रणाली कपाटातून एक टॉवेल आणि काही कपडे काढते.

 

प्रणाली - हे माझ्या धाकट्या भावाचे म्हणजे विशालचे कपडे आहेत. बाजूच्या रूम मध्ये जा आणि चेंज कर.

 

अजिंक्य बाजूच्या रूममध्ये जाऊन टॉवेलने अंग पुसतो. विशालचे कपडे देखील घालतो. कपडे थोडे घट्ट होत असतात, परंतु बसतात. अजिंक्य रूममधून बाहेर येतो. प्रणाली एका खुर्चीमध्ये  बसलेली असते. समोरच्या खुर्चीत ती अजिंक्यला बसायला सांगते.

 

अजिंक्य - प्रणाली तू इकडे कशी?

 

प्रणाली - अरे आमची इकडे देखील बागायत जमीन आहे. या आठवड्यात बाबांना आणि विशालला दोघांनाही वेळ नव्हता. आमचे तालुक्याच्या गावी हॉटेल आहे ना, तिकडेच रिनोवेशनचे काम चालू आहे. बागेला शिपणे करणं जरुरी होतं. त्यामुळे बाबांना सांगून मी इकडे आले.

 

अजिंक्य - मुलगी असून देखील तुला एकटीला इकडे यायला भीती नाही का वाटत?

 

प्रणाली - मी अधून मधून इकडे येते, बागेची देखभाल करायला. इकडे तशी कुणाची भीती नाही. आपल्या गावातील काही बाकीच्या स्त्रियादेखील त्यांच्या त्यांच्या बागांची देखभाल करायला इकडे येतात. परंतु एकंदरीतच इकडे वर्दळ खूपच कमी असते. अरे पण तू इकडे कुठे आलास आणि त्या तलावामध्ये कशासाठी गेलास?

 

अजिंक्य - मॉर्निंग वॉक साठी मी किनार्‍यावर आलो होतो. तेव्हा किल्ल्यामध्ये यावे असे मला वाटू लागले. लहानपणी एकदाच आजोबांच्या बरोबर इकडे आलो होतो. देवाला एक कमळ वहावे यासाठी मी तलावामध्ये शिरलो होतो. खरे म्हणजे मी खूप आत मध्ये शिरलो नव्हतो. परंतु चिखलामध्ये माझा पाय कधी फसला ते मला कळलेच नाही. परंतु आता आपल्याला निघायला हवे, त्या तलावात अडकल्यामुळे माझा बराच वेळ नुसताच इकडे फुकट गेला. घरी सर्वजण वाट बघत असतील.

 

प्रणाली (हसत) - आता सहा-सात तास तरी आपली येथून सुटका नाही.

 

अजिंक्य - काय बोलतेस तु? सुटका नाही म्हणजे काय?

 

प्रणाली - अरे आता हळूहळू भरती सुरू झाली आहे. आता भरती संपून ओहोटी सुरू व्हायला अजून सहा-सात तास तरी जातील. इकडे यायचं म्हणजे भरती ओहोटीची वेळ बघूनच यावं लागतं. ओहोटी सुरू होऊन पाणी ओसरू लागलं की लगेचच या बेटावर यावे लागते.   पुन्हा भरती सुरू व्हायच्या आत येथील काम आटोपून बाहेर पडावे लागते.

 

अजिंक्य - अरे बापरे, म्हणजे माझ्यामुळे तू देखील उगाचच अडकलीस. परंतु त्यामुळे माझे प्राण मात्र वाचले.

 

प्रणाली - असू दे रे, माझे बाबा किंवा विशाल इकडे आल्यावर काम जास्त असल्यास कधीकधी अडकतात इकडे. मग पाणी ओसरल्यावर जातात परत. पण आता मात्र आपण आपापल्या घरी फोन करून इकडे अडकल्याचे सांगु. फक्त तु तलावामध्ये बुडत होतास आणि आपण एकमेकांना भेटलो हे मात्र आत्ता सांगूया नको. सर्वजण उगाचच काळजीत पडतील.

 

किनारा जवळच असल्यामुळे बेटावर थोडीशी रेंज होती. दोघेही आपापल्या मोबाईल वरून कॉल करून सुखरूप असल्याचे सांगतात. अजिंक्यची आजी मात्र रागावून आत्ता त्या बेटावर कशाला गेला होतास म्हणून विचारते. तसेच पाणी पूर्ण ओसरल्याशिवाय येऊ नकोस असे देखील सांगते. प्रणालीची आईदेखील इतका वेळ काम कशासाठी करत राहिलीस म्हणून विचारते. तीदेखील पाणी ओसरल्यावरच ये असे प्रणालीला सांगते.

 

तोपर्यंत अजिंक्य त्याचे कपडे बाहेर उन्हात वाळत घालतो.

 

अजिंक्य - शी बुवा.. , आता इतका वेळ इथे काय करायचे?

 

प्रणाली (खोचकपणे) - का, आत्ता प्राची इथे असती तर तुझा वेळ छान गेला असता ना?

 

अजिंक्य - ए, काहीतरी काय बोलतेस? ती बिचारी माझ्याशी नीट बोलते तरी. मी आल्यापासून तू माझ्याशी नीट बोललीस तरी काय?

 

प्रणाली - गेल्या पाच-सहा वर्षांपासून तू इकडे सुट्टीत पूर्वीसारखा राहायला येत नाहीस. एकदम अचानक असे आता भेटल्यावर मी काय बोलणार तुझ्याशी? काही मुलींना लाज वाटते असं बोलायला.

 

अजिंक्य - अगं त्या दिवशी मी तालुक्याच्या गावी मुव्ही बघायला गेलो होतो. येताना वाटेत प्राची भेटली म्हणून मी तिला घेऊन आलो.

 

प्रणाली - खोटं बोलू नकोस, मी त्यादिवशी कॉम्प्युटर क्लासला गेले असताना तुम्हाला दोघांनाही टॉकीज मध्ये बघितले.

 

आता अजिंक्यला काय बोलावे ते कळे नाहीसे होते. कारण त्याने प्राचीला स्वतःहून मूव्ही बघायला तर नेलेले नसते. तो प्रणालीला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. शेवटी आम्हाला दोघांना तिकडे बघितले हे कुणालाही प्लीज सांगू नकोस अशी तिला रिक्वेस्ट करतो.

 

प्रणाली - नाही सांगणार कुणाला, तू काळजी करू नकोस.

 

प्रणाली आत मधील एका रूम मध्ये जाऊन केळ्याचा घड आणि एक बिस्कीटचा पुडा घेऊन येते.

 

प्रणाली - सकाळपासून तू काही खाल्लेले नसशील ना? हि आमच्याच येथील बागेतील केळी आहेत. इथे थोडे बिस्कीटचे पुडे आम्ही नेहमीच ठेवून देतो. तू थोडं खाऊन घे.

 

अजिंक्य - मला भूक लागलीच होती. बरे झाले तू खायला घेऊन आलीस. तू पण माझ्याबरोबर थोडेसे खा.

 

दोघेजण थोडी केळी आणि बिस्किटे खातात. प्रणाली तिच्या वॉटर बॅग मधील पाणी अजिंक्यला प्यायला देते.

 

प्रणाली - आता नुसते येथे बसून राहण्यापेक्षा आपण किल्ल्यामध्ये फिरून येऊ. तुला त्या देवळात देखील जायचे आहे ना?

 

अजिंक्य - चांगली कल्पना आहे. मला तसे पण किल्ल्यामध्ये फिरायचेच होते.

 

दोघेजण परत फिरत फिरत किल्ल्यापाशी येतात. प्रणालीला त्या किल्ल्याच्या इतिहासाविषयी थोडीफार माहिती असते. फिरता फिरता ती त्याला माहिती सांगू लागते. दोघेजण किल्ल्यातील देवळापाशी पोहोचतात.

 

प्रणाली - तुला देवाला कमळ व्हायचे आहे ना?

 

अजिंक्य - नको पण आता, झाला तेवढा प्रकार पूरे झाला.

 

प्रणाली - थांब रे.

 

देवळाच्या बाहेरच्या भिंतीला टेकून एक आकडी उभी केलेली असते, प्रणाली ती घेऊन येते. त्या आकडीच्या सहाय्याने प्रणाली जवळची दोन कमळे तलावातून खेचून घेऊन तोडते.

 

प्रणाली - अरे मी येते इथे कधी कधी, त्यामुळे ही आकडी इथे जपून ठेवली आहे. घे एक कमळ तू वहा, एक कमळ मी वहाते.

 

अजिंक्य - थँक यु.

 

प्रणाली - फॉर्मॅलिटी नको.

 

दोघेजण देवळामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतात. देवाला कमळ अर्पण करतात. देवळामध्ये गेल्यामुळे अजिंक्यला खुपच प्रसन्न वाटते. दोघेजण देवळातील एका कठड्यावर थोडावेळ बसतात.

 

अजिंक्य - तुझा आवाज खूप छान आहे गं. त्यादिवशी भजनाच्या वेळी तु जो अभंग गायलास, तो खूप सुरेख गायलास.

 

प्रणाली - नाही रे उगाच स्तुती करू नकोस. मला मात्र गायनाची आवड आहे.

 

अजिंक्य - मी खोटी स्तुती करत नाही आहे. तुझ्याकडे खरंच कला आहे.

 

थोडा वेळ देवळात बसून झाल्यावर, दोघेजण परत एकदा देवाला नमस्कार करुन बाहेर पडतात.

 

प्रणाली - आपण आता पलीकडल्या बुरुजावर जाऊ.

 

अजिंक्य तिच्या मागोमाग चालु लागतो.

 

प्रणाली - अजिंक्य एक विचारू, रागावणार तर नाहीस ना?

 

अजिंक्य - बोल की

 

प्रणाली - तुझ्यात आणि प्राची मध्ये काय चालू आहे?

 

प्रणालीच्या प्रश्नाचा रोख अजिंक्यच्या लक्षात येतो. अजिंक्य आता विचारात पडतो. त्याचे त्यालाच कळत नसते की त्याचे प्राची वर प्रेम आहे किंवा नाही. मैत्रीण म्हणून त्याला प्राची आवडायची, पण फक्त मैत्रीण म्हणूनच. कळायला लागल्यापासून, त्याच्या मनाच्या एका कोपर्‍यात प्रणालीचा चेहरा कोरला गेलेला असतो.

 

प्रणाली - एवढा विचार का करतोस? नक्कीच काहीतरी तुमच्या दोघांमध्ये सिरीयस मॅटर चालू आहे.

 

अजिंक्य - नाही ग, तु प्रश्नच असा काही विचारलास की मी गांगरुन गेलो.

 

प्रणाली - म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही नाही आहे का?

 

हि एवढी मला खोदुन खोदुन प्रश्न का विचारत आहे हे अजिंक्यला कळे नाहीसे होते.

 

अजिंक्य - नाही.

 

बोलत बोलत दोघेजण पलीकडच्या बुरुजावर पोहोचतात. हा बुरुज किनाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असतो. त्या बाजूने समुद्र खूपच भयाण दिसत असतो. मोठमोठ्या लाटा येऊन किल्ल्याच्या तटबंदीवर आदळत असतात.

 

प्रणाली - काल सकाळी तू सुरेश काकांकडे गेला होतास का?

 

अजिंक्य (हसत) - तू काय माझी हेरगिरी करत आहेस का?

 

प्रणाली - काल मी बाहेर जात होते, तेव्हा तुला त्यांच्या घरात जाताना बघितले.

 

अजिंक्य - हो, माझा लाडका मामा आहे तो.

 

प्रणाली - सावध रहा रे बाबा त्यांच्यापासून. तो माणूस काही बरोबर नाही आहे. ज्योतिषाच्या नावाखाली तो काळ्या जादूचे प्रयोग करतो.

 

अजिंक्य - काही पण बोलू नकोस. तो खूप सज्जन माणूस आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो.

 

प्रणाली - प्लीज माझे ऐक, त्यांच्या नादाला लागू नकोस.

 

अजिंक्य - हे सर्व तुला कोणी सांगितले?

 

प्रणाली - प्राचीने.


क्रमशः


कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -

"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...