Read best Marathi online gudh katha | Marathi love story free | मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह
इच्छा - भाग २
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
केयुर क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात उडी घेतो. केयुरला पोहता येत असते, पण एवढ्या मोठ्या नदीत तो कधी पोहलेला नसतो. तरीपण पोहत पोहत तो तिच्यापर्यंत पोहोचतो. तिला पकडून कसा तरी तो काठावर येतो. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे ती स्त्री बेशुद्ध पडलेली असते. आजूबाजूला कोणाची मदत मिळते का ते तो पहात असतो. परंतु तो भाग निर्जन असतो. घरी स्वतःच्या विहिरी असल्यामुळे कोणी नदीवर फार फिरकत नसत. काय करावे ते केयुरला सुचत नसते. पण सुदैवाने ती स्त्री डोळे उघडते.
स्त्री - थँक यु, तुम्ही मला वाचवलेत.
केयुर - तुम्हाला बर वाटतंय ना? कि डॉक्टरांकडे जायचे?
स्त्री - मी ठीक आहे. डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही.
केयुर - तुम्ही येथे पोहायला आला होतात का?
स्त्री - नाही हो, मी फिरत फिरत नदीकाठावर आले, तेव्हा माझा पाय घसरून मी पडले. तुम्ही होतात म्हणून मी वाचले. तुमचे आभार कसे मानु ते कळत नाहि.
केयुर - आभार वगैरे राहु दे, तुम्ही आधी सांगा तुमचे घर कुठे आहे? तुमच्या घरी कोण आहे?
स्त्री - तशी मी मूळची इथली नाही. मी पुण्यात असते. पण नदीच्या पलीकडे माझे फार्म हाऊस आहे. माझ्या घरी कोणीच नाही.
केयुर - अरे बापरे. पण नदीला आता भरपूर पाणी झाल्यामुळे येथील छोट्या पुलावरून पलीकडे जाणे शक्य नाही. मोठा पूल दूर आहे.
आपण असे करू, तुम्ही माझ्या रूमवर चला. तेथे फ्रेश व्हा, मग मी तुम्हाला तुमच्या फार्म हाऊसवर सोडतो.
स्त्री - ठीक आहे.
केयूर त्या स्त्रीला घेऊन प्रथम अनन्याच्या बंगल्यावर जातो. त्याच्याजवळ दुसरी चावी असते. अनन्याचा एक ड्रेस व टॉवेल घेऊन तो बाहेर येतो.
ती स्त्री साडी नेसलेली असते. पण पाण्यामुळे पूर्ण भिजली असते, त्यामुळे थंडीने कुडकुडत असते.
केयुर - ओह, आय अॅम सॉरी. अनन्या साडी वापरत नाही. त्यामुळे हा ड्रेस चालेल ना?
स्त्री - अहो काही हरकत नाही.
केयुर बाहेरच थांबतो. ती स्त्री चेंज करून बाहेर येते.
ती स्त्री मुळातच दिसायला अतिशय सुंदर असते. अनन्याचा ड्रेस तिला शोभून दिसत असतो. दोन क्षण केयुर तिच्याकडे बघतच बसतो. पण लगेचच भानावर येतो.
बंगल्याला परत लॉक करून केयुर त्याच्या बंगल्यावर येतो.
केयुर - या ना, आत या. बसा आरामात. मी मस्त आलं घालून चहा करतो.
स्त्री - अहो, तुम्ही कशाला त्रास घेताय?
केयुर - अहो, त्रास कसला? चहा लगेच तयार होईल.
पाच मिनिटांत चहाचे कप घेऊन केयूर बाहेर येतो.
स्त्री - चहा छान झालाय. आलं घातलेला गरम चहा प्यायल्यामुळे माझी थंडी कुठेच पळून गेली.
केयुर - अहो, या सर्व गडबडीत आपली ओळख करायची राहून गेली.
मी केयुर. ठाण्याला असतो. पण आता इकडे नागलोलीत आमचा दुसरा प्लॅन्ट सुरु झाला आहे. त्यामुळे माझी इकडे बदली झाली आहे.
स्त्री - माझे नाव उषा. मी पुण्याला असते. मी आर्किटेक्ट आहे. काही वर्षांपूर्वी माझे आई वडील वारले. आम्ही नदीपलीकडचे फार्म हाऊस काही वर्षांपूर्वी विकत घेतले आहे. मी कधीतरीच इकडे येते. त्यामुळे मला इथे कोणी विशेष ओळखत नाही.
चहा पिऊन झाल्यावर केयुर त्याची गाडी काढतो.
केयुर व उषा गाडीतून नदीपलीकडे जातात. उषाच्या फार्म हाऊसवर गाडी येते. उषा आभार मानून आत जाते, केयुर परत माघारी फिरतो.
उषाला कुठेतरी बघितले आहे असे वाटत आहे.
हो बरोबर प्राची वहिनी (जोशी काकांची सून), त्या थोड्या तशाच दिसतात. अगदी सेम टू सेम नाही पण काहीतरी साम्य आहे.
या सर्व प्रकारात दुपारचा १ वाजतो. आता जेवायची वेळ झाल्यामुळे केयुर गाडीने थेट जोशी काकांच्या घरी जातो.
जेवताना घडलेला प्रकार तो जोशी काकांच्या घरी सांगतो.
जोशी काका - तुम्ही सत्कार्य केलेत बघा.
केयुर - अहो काका, माझ्या जागी कोणीही असते तरी हेच केले असते.
जोशी काकु - नाही अहो, तुम्हाला असे वाटत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आजकाल कोणी कोणाच्या मदतीला जात नाही. नदीला आता पूर आलेला आहे. भलेभले पट्टीचे पोहणारे या पुरात उडी घ्यायला घाबरतात.
प्राची - सर, ती मुलगी कुठे रहाते म्हणालात?
केयुर - ते नदीच्या पलीकडे मोठे फार्म हाऊस आहे बघा, बाजूला काजूची खूप झाडे आहेत. तिथे राहतात त्या.
म्हणजे त्या पुण्याला रहातात, पण ते फार्म हाऊस त्यांनी विकत घेतले आहे.
प्राची - अहो, ते माझे आजोळ.
म्हणजे पूर्वी होते. माझे आजी आजोबा तेथे रहात. नंतर मामा बंगलोरला स्थायिक झाल्यामुळे आजी - आजोबांच्या पश्चात त्याने ते काही वर्षांपूर्वी विकले.
फार्म हाऊस विकत घेणारे अमेरिकेत सेटल झालेले होते.
त्यामुळे ते फार कधी इकडे आलेले नाहीत. आले तरी आम्हाला कशाला माहित पडणार. ते मूळचे पुण्याचे असतील. आमची त्यांच्याशी ओळख नाही.
आज जेवणात डाळींब्यांची भाजी होती. केयुरला डाळींब्या फार आवडत.
केयुर - काकु, भाजी मस्त झाली आहे हो. मला डाळिंब्या फार आवडतात.
जेवण झाल्यावर केयुर बंगल्यावर गेला.
बाहेर पाऊस पडत असल्यामुळे त्याला छान झोप लागली. थोड्या वेळाने त्याला जाग आली ती डोअर बेल वाजल्यामुळे.
दुपारचे ४ वाजले होते. डोळे चोळतच केयुर उठला.
दार उघडून बघतो तर समोर उषा.
केयुर - अरेच्या, तुम्ही होय? या आत या.
उषा - सॉरी, तुम्ही झोपलेले होतात का? मी तुम्हाला उगाचच डिस्टर्ब केलं.
केयुर - नाही हो. आता मी उठणारच होतो.
उषा आत येऊन सोफ्यावर बसते. तिने निळ्या रंगाची साडी नेसलेली असते.
उषा - हा ड्रेस आणि टॉवेल घ्या. चांगला धुऊन आणि ड्राय करुन आणला आहे. इस्त्रीसुध्दा केली आहे.
सकाळचा ड्रेस उषा परत करते.
केयुर - अहो एवढी घाई कशाला केलीत? नंतर चालले असते. तसेपण अनन्या, ती त्या बंगल्यात रहाते. ती आणि मी एकाच कंपनीत आहोत. ती ठाण्याला गेली आहे. ती २ दिवसांनी येईल. तिचाच हा ड्रेस आहे.
उषा - मी इकडे आलेली तुम्हाला आवडलेले दिसत नाही.
केयुर - तस नाही हो. तुम्हाला उगाच त्रास.
उषा - अहो मी फिरायलाच निघाले होते, त्यामुळे आले.
केयुर - कुठे?
उषा - बीचवर. तुम्ही येता? चला ना. मला एकटीला कंटाळा आलेला आहे. माझे इथे ओळखीचेपण कोणी नाही.
खरे म्हणजे केयुरला असं मुलींबरोबर फिरायची सवय नव्हती. पण उषाचा आग्रह त्याला मोडवेना. त्यालादेखील कंटाळा आला होता.
केयुर - जरा थांबा. मी रेडी होऊन येतो.
१० मिनिटांतच केयुर तयार होतो. त्याने चॉकलेटी टी शर्ट आणि डार्क ब्लु जीन्स पॅण्ट घातलेली असते. दोन्ही ड्रेस ब्रँडेड असतात. शिवाय त्याच्या आवडीचा बॉडी स्प्रे मारुन घेतो.
उषा त्याच्याकडे पहातच बसते. केयुरच्या नजरेतुन हे सुटत नाही. पण तो दुर्लक्ष करतो. उषा देखील सावरुन घेत विषय बदलते.
उषा - मला बीचवर फिरायला फार आवडते. बर झाल तुम्ही येत आहात ते.
केयुर - माझा आज विकली ऑफ आहे. मला एकट्याला कंटाळा आला होता. तेवढेच फिरणे होइल. कामाच्या व्यापामुळे मी इथल्या बीचवर गेलेलो नाही.
केयुर बंगल्याला लॉक करुन गाडी काढतो.
उषा पुढच्याच सीटवर बसते. दोघेजण ५ वाजेपर्यंत बीचवर पोहोचतात. पर्यटकांची थोडी गर्दी असते.
उषा वाळूत किल्ला करते. केयुरलादेखील गंमत वाटते. करिअरच्या नादात या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणापासून आपण किती लांब राहिलो याची त्याला जाणीव होते. तोदेखील किल्ला बनवायला तिला मदत करतो. वाळू थापताना त्याच्या हाताचा तिच्या हाताला चुकून स्पर्श होतो. पण लाजून पटकन तो हात मागे घेतो.
केयुर - सॉरी.
उषा - इट्स ओके.
१० मिनिटे कोणीच काही बोलत नाही.
क्रमशः
कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
इंटरेस्टिंग कथानक
उत्तर द्याहटवा