Read best Marathi online gudh katha | Marathi love story free | मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह
इच्छा - भाग ५
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
उषा - मला फोटो काढायला आवडत नाही.
केयुर - का?
उषा - एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर निघून गेली, आणि काही वर्षांनी तिचा फोटो आपल्या नजरेस पडला तर आपण ते दुःख आवरू शकत नाही.
केयुर - फोटो आवडत नाही असे म्हणणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच बघतोय. मी तुला आता माझ्यापासून दूर होऊ देणारच नाही. आपण लग्न करूयात.
उषा - तुझी इच्छा आहे ना, मग काढू सेल्फी.
केयुर दोघांचे सेल्फी काढतो. शिवाय उषाचे देखील काही फोटो काढतो. थोडावेळ दोघेजण तो दूरवर खवळणारा समुद्र बघत बसतात. नंतर एका चांगल्या हॉटेलमध्ये दोघांचे कॅंडल लाईट डिनर होते.
रात्रीचे ११ वाजतात. वेळ कसा गेला ते दोघांना कळतच नाही. उषा परत ड्रायव्हिंग करते. थोड्याच वेळात ते नागलोलीला परततात.
केयुर - आता मला बर वाटत आहे. आधी तुझ्या फार्म हाऊसवर जाऊ. नंतर मी एकटा माझ्या रूमवर जाईन.
उषा - ठीक आहे.
उषा तिच्या फार्म हाऊस पर्यंत ड्राइव्ह करते. तिला गुड नाईट करून, केयुर त्याच्या बंगल्यावर जातो.
बेडवर पडून केयुर मोबाईल बघु लागतो.
ओह नो. तो स्वतःशीच बोलतो. आज अनन्या ठाण्यावरून येणार होती असा तिचा मेसेज आलेला असतो. तिला तालुक्याच्या एस. टी. स्टँडवरून पीक अप करायचे असते. रात्री ८ वाजता तिचे ५ मिस कॉल आलेले असतात. आज दिवसभर उषाच्या नादात, केयुरने मोबाईल चेक केलेला नसतो. मोर्ली हिलवर जाताना डिस्टर्ब् नको म्हणुन केयुरने मोबाईल सायलेंट ठेवलेला असतो.
केयुर आता चिंतेत पडतो, कि अनन्या कशी आली असेल?
केयुर लगेचच तिला मेसेज पाठवतो.
अनन्याचा रिप्लाय येतो, कि ती ऑटोने गावात आली.
केयुर न्यायला न आल्याने ती खूप रागावली असते. उद्या बोलु म्हणून रिप्लाय पाठवून अनन्या झोपी जाते.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून केयुर आटोपून तयार होतो. अनन्याकडे जाऊन कंपनीत जाण्यासाठी तिला पीक अप करतो.
अनन्या (रागाने) - काल दुपारी ठाण्याहून निघताना तुला कॉल केला होता. पण नेटवर्क प्रॉब्लेम होता. म्हणून मेसेज करून ठेवला. रात्री तालुक्याला उतरल्यावर तू दिसला नाहीस. ५ वेळा कॉल केले. एकपण कॉल उचलला नाहीस. मग मी रिक्षेने जोशी काकांकडे आले. जेवताना काकांनी सांगितले, कि तू कुठेतरी डिनरला गेला आहेस. काय प्रकार आहे हा?
आता हिला काय सांगावे ते केयुरच्या लक्षात येत नाही. मित्राबरोबर बाहेर गेलो होतो सांगून केयुर मोकळा होतो.
हा नक्की काहीतरी लपवत आहे हे अनन्याच्या लक्षात येते.
प्लॅन्ट मध्ये गेल्यावर दोघांची कामे सुरु होतात. संध्याकाळी दोघे आपापल्या बंगल्यावर येतात. तेव्हा केयुर साहेबांकडे काल कोणीतरी मॅडम आल्या होत्या असे शोभनाकडून अनन्याला कळते. फ्रेश होऊन ती केयुरकडे जाते. केयुरच्या बंगल्याची डोअरबेल वाजवते.
दार उघडुन,
केयुर - ये अनन्या, आत ये. २ मिनिटे बस. चहा ठेवला आहे.
अनन्या हॉलमध्ये बसते.
केयुर २ कप मसालेदार चहा आणतो. दोघेही चहा पिऊ लागतात.
इतक्यात परत डोअरबेल वाजते. केयुर दार उघडतो. उषा आत येते.
केयुर - उषा ये. तुपण आम्हाला जॉईन हो, चहा आणतो.
शोभना ज्या मॅडमबद्दल बोलत होती ती हीच तर नाही ना? असे अनन्याला वाटते.
केयुर चहा घेऊन येतो. तिघेही चहा पितात.
केयूर दोघींची ओळख करून देतो.
उषा - केयुर, आज कुठे जायचे फिरायला?
अनन्या समोर हे बोलायचे कसे असा केयुरला प्रश्न पडतो.
केयुर - नाही, आज नको. मला कंटाळा आला आहे.
तरीसुद्धा आग्रह करून उषा त्याला घेऊन जाते. जाताना अनन्याला बरोबर चल म्हणून केयुर सांगत असतो. परंतु, मला दुसरे काम आहे सांगून अनन्या तिच्या बंगल्यावर जाते.
हिची आत्ताच काही दिवसांपूर्वी केयुरशी ओळख झाली, पण हिने केयुरला गटवला कि काय असे अनन्याला वाटु लागते. तिची चिडचिड होऊ लागते.
मी कशाला चिडचिड करू. केयुर माझा काय नवरा आहे काय? त्याचे लाईफ आहे. तो मोकळा आहे. अशी मनाशी समजुत अनन्या काढते.
हिला कुठेतरी बघितले आहे का? असे अनन्याला वाटत असते.
त्या रात्रीदेखील केयुर जोशीकाकांकडे जेवायला येणार नसतो.
अनन्या एकटीच जेवायला खानावळीत जाते.
प्राची वहिनींशी बोलताना तिच्या लक्षात येते कि, उषा आणि प्राची वहिनी दोघींमध्ये थोडेसे साम्य आहे. पण ती तिथे काही बोलत नाही.
हल्ली वरचेवर रात्रीचे, केयुर साहेब जेवायला नसतात असे जोशी काकूंच्या बोलण्यात येते.
दुसऱ्या दिवशी केयुर व अनन्या कंपनीत जातात.
कंपनीत देखील लंच टाईमला केयुरचे जेवणात लक्ष नसते. त्याचे चॅटिंग चालू असते. हे अनन्याच्या लक्षात
येते.
दिवसेंदिवस केयुर आणि उषाच्या भेटीगाठी वाढत जातात. आतामात्र अनन्याला कळून चुकते कि, केयुर हा उषाच्या प्रेमात पडलेला आहे. मनातल्यामनात ती उषावर जळू लागते. मी पण सुंदर आहे. मी तर केयुरची बालपणापासूनची मैत्रीण. आम्ही खूपवेळा एकत्र असतो. मग मला सोडून केयुर हिच्या प्रेमात कसा पडला? अनन्याच्या मनात विचारांचे वादळ उठते.
अनन्या स्वतःच स्वतःला समजावत असते, माझे कुठे याआधी केयुरवर प्रेम होते. मी कुठे त्याला असे सांगितले. मग मी त्याच्यावर का अधिकार सांगायचा?
आता अनन्या समजून जाते, या आधी नेहमी केयुर आपल्या बरोबरच असायचा. आम्ही खूप गोष्टी एकमेकांना सांगायचो. एकमेकांची काळजी घ्यायचो. हेच तर प्रेम होते. पण मला ते कळले नाही. मला ते सांगता आले नाही. आता माझ्या जागी उषा आल्यामुळे मला ज्वेलसी वाटू लागली आहे. पण मी आता काय करू शकते? मला केयुरशी बोलायला हवे.
एका सुट्टीच्या वारी सकाळी अनन्या टेरेसवर उभी असते. साधारण सकाळचे १० वाजलेले असतात. तिच्या टेरेसवरून केयुरचा बंगला दिसायचा.
उषा केयुरच्या बंगल्यातून बाहेर पडते. त्याला बाय करते. तिला बघुन अनन्याच्या डोक्यात सणक जाते. अनन्या टेरसवरून तिला बघत असते. पण खाली असल्यामुळे उषाचे लक्ष वरती जात नाही. थोडे अंतर पुढे गेल्यावर उषा दिसेनाहीशी होते. अनन्या विचारात पडते, हि गेली कुठे? कि हिला मी दिसले म्हणून लपून बसली? पण ती कशाला लपेल? माझ्या समोर केयुरला फिरायला नेते ती. ती कशाला मला घाबरेल?
अनन्याला एक दिवस केयुरशी सर्व काही बोलायचेच असते. त्यामुळे ती बंगल्याला लॉक करून केयुरकडे जाते.
आज रविवार असल्यामुळे अमोल व शोभनाला सुट्टी असते. पण नारळाच्या बागेचा पाडा करण्यासाठी (म्हणजे नारळ काढायला) आज पाडेकरी येणार असतात. त्यामुळे थोड्या वेळेपुरता अमोल येऊन केयूरच्या बंगल्याच्या मागच्या बागेत उभा असतो.
अनन्या बंगल्याची बेल वाजवते.
केयुर दार उघडतो.
केयुर - अनन्या, ये आत ये. बस.
अनन्या - केयुर, मी तुझ्याशी महत्वाचे बोलायला आले आहे.
केयुर - बोल ना.
अनन्या - सध्या तुझे हे काय चालू आहे?
केयुर - कुठे काय? तुला काय बोलायचे ते नीट सांग.
अनन्या - हेच उषाचे ...
केयुर - अनन्या, तू स्पष्ट बोल.
अनन्या - वेड गावाहून पेड गावाला जाऊ नकोस. मला काय म्हणायचे ते तुला नीट समजते आहे. तरीसुद्धा ऐक, उषाचे आणि तुझे काय नाते आहे?
केयुर - तू माझी जवळची मैत्रीण आहेस. त्यामुळे तुला ते विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही दोघे लग्न करणार आहोत.
अनन्या - घरच्यांना सांगितलेस?
केयुर - अजून तरी नाही सांगितले. पण लवकरच सांगेन.
अनन्याला आता रडू येऊ लागते.
अनन्या (रडत) - अरे मग माझे काय?
केयुर (गोंधळून) - तुझे काय म्हणजे?
अनन्या - अरे आपण लहानपणापासूनचे मित्र - मैत्रीण. एकत्र खेळलो. एकत्र शिकलो. एकमेकांना खूप मदत केली. एकमेकांच्या सुख - दुःखात एकमेकांना साथ दिली. हे सर्व काय उगाच केले का? अरे आपले एकमेकांवर प्रेम होते रे. पण आपल्या दोघांच्या हे लक्षातच आले नाही. एखादी गोष्ट आपल्या जवळ असली ना, कि तिचे महत्व कळत नाही. आपले पण तसेच झाले. नियतीने आपल्याला "मेड फॉर इच आदर" म्हणून पाठवले. पण आपण तिकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे हि उषा आपल्या मध्ये घुसली.
केयुर (समजुतीने) - अनन्या, रडु नकोस. माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त मैत्रीच आहे. बाकी काही नाही. तू सुंदर आहेस, हुशार आहेस. तुलादेखील चांगला जीवनसाथी मिळेल. हा वेडेपणा सोडून दे. उषा व माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
अनन्या - मी तुला सोडून नाही राहू शकत. प्लिज जरा नीट विचार कर. तुझ्या मनाला विचार कि, तुझे माझ्यावर प्रेम नाही का? या उषाला तर आपण नीट ओळखत पण नाही. मगाशी मला बघून लपून बसली. दिसेनाहीशीच झाली.
केयुर अनन्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. शेवटी दोघांचे कडाक्याचे भांडण होते. अनन्या रडत रडत बंगल्यातून बाहेर पडते.
अमोल मागच्या बागेत असल्यामुळे, भांडणाचे आवाज त्याला ऐकू येतात. तो पुढे जाऊन बघतो, तर अनन्या रडत जाताना दिसते. पाडेकऱ्यांचे काम थोडावेळच असते. ते आटोपल्यावर अमोल लगेचच घरी जाऊन शोभनाला या दोघांचे काहीतरी कडाक्याचे भांडण झाले म्हणून सांगतो.
आज रविवार असल्यामुळे केयुरचा पूर्ण दिवसाचा प्लॅन उषाबरोबर ठरलेला असतो. त्यामुळे तो आज जोशी काकांकडे जेवायला नसतो.
अनन्या तिच्या बंगल्यावर येऊन खूप रडते. तोपर्यंत शोभनाला भांडणाची बातमी कळल्यामुळे ती अनन्याकडे येते. तिची विचारपूस करते. अनन्या तिचे दुःख, शोभनाला सांगते.
शोभना सांगते कि, तुमचा जोडा खरा योग्यच आहे. तुम्हाला दोघांना पहिल्यांदा बघितल्यावर मला तर तुम्ही नवरा - बायकोच वाटलात. पण आता ती बया आली ना तुमच्यामध्ये. काही काळजी करू नका. सर्व व्यवस्थित होईल.
दुपारी जेवणाची वेळ झाली. त्यामुळे अनन्या जोशी काकांकडे जाते. आज अनन्या मॅडमचा चेहरा रडका दिसत असतो, हे जोशी काकांकडे सर्वांना कळते. जेवताना भविष्याचा विषय निघतो.
अनन्या - काका, तुम्ही भविष्य बघता का?
जोशी काका - मला ज्योतिष विषय माझ्या वडिलांनी शिकवला. त्यामुळे मला त्याचे बऱ्यापैकी ज्ञान आहे. पण माझे बाकीचे बरेच उद्योग असल्यामुळे मी याचा वापर करत नाही. घरच्यांपुरते ज्योतिष बघतो.
अनन्या - मग माझे भविष्य सांगाल?
जोशी काका - त्यासाठी मला तुमची कुंडली लागेल.
अनन्या - पण माझी कुंडली ठाण्याला आहे. तसेपण ई - मेल ने मागवता येईल.
जोशी काका - चालेल.
अनन्या बंगल्यावर आल्यावर लगेचच तिच्या घरी फोन करते, आणि आईला कुंडली पाठवायला सांगते. कधी देवादिकांचे पूजा - पाठ न करणारी हि मुलगी आज एकदम कुंडली पाठवायला काय सांगते? म्हणून तिची आई चक्रावून जाते. पण मुलीसाठी ती ई - मेल करून कुंडली पाठवते.
लगेचच अनन्या केयुरच्या घरी त्याच्या आईला कॉल करते. केयूरची कुंडली हवी असल्याचे सांगते.
केयुरची आई - का गं?
अनन्या - अहो काकू, येथे चांगले ज्योतिषी आहेत. माझी कुंडली मी त्यांना दाखवणार आहे. म्हणून केयुरची पण कुंडली दाखवते. तुमची कोणाची कुंडली दाखवायची असेल तर सांगा.
केयुरची आई - आता आमचे काय भविष्य बघायचे? तुम्हा तरुणांना त्याची गरज. मी पाठवते केयुरची कुंडली ई - मेलने.
अनन्या - काकू, पण केयुरला सांगू नका. तो माझ्यावर रागवेल. त्याचा विश्वास नाही.
केयूरची आई - काही काळजी करू नकोस. तसाच आहे तो. बाकी ठीक आहेस ना? केयूर बरा आहे ना? हल्ली शहाणा फोनच नाही करत.
अनन्या - सर्व काही ठीक आहे.
दुपारी ४ वाजता, अनन्या जोशीकाकांकडे जाते. मोबाईलवर मेल आलेला असतो. दोन्ही पत्रिका (कुंडली) ती जोशी काकांना दाखवते. जोशी काका दोन्ही पत्रिका कागदावर लिहून घेतात. अनन्या थोडावेळ तिथेच थांबते. १ तास दोन्ही पत्रिका अभ्यासुन, काका सांगू लागतात -
काका - पत्रिका (कुंडली) हि मनुष्याच्या आयुष्यात काय शक्यता आहेत, ते सांगते. पण मनुष्याने जर प्रयत्नच केले नाहीत, तर कुंडलीत किती पण चांगले असले तरी उपयोग नाही. आता मी तुमच्या दोघांच्या कुंडलीविषयी सांगतो.
तुमच्या दोघांचे भविष्य सुंदर आहे. तुम्ही राग मानू नका पण, या दोन्ही कुंडली परस्पर पूरक आहेत. म्हणजे "मेड फॉर इच आदर" आहेत. विवाहास योग्य असे गुण जुळत आहेत. पण या वर्षी केयुर साहेबांच्या आयुष्यात काही काळ्या शक्ती येऊ शकतात. त्यापासून सावध रहायला हवे. तुमच्या जीवाला देखील सध्या धोका दिसत आहे.
अनन्या - माझे तर कोणाशीच वैर नाही.
काका - हे मी माझ्या मनाने सांगत नाही. या कुंडलीतून मला जे काही समजले, ते मी सांगतोय.
अनन्या - यावर काही उपाय?
काका - मी तुम्हाला काही स्तोत्र म्हणायला सांगतो. ती तुम्ही दोघांनी म्हणा.
अनन्या - काका, मी स्तोत्र म्हणेन. पण केयुरचा यावर विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही त्याला काही सांगू नका. मला सांगा. मी त्याच्यासाठीपण उपाय करेन.
काका - असे नसते. ज्याचा त्यानेच उपाय करणे जास्त चांगले. तरीपण तुम्ही असं करा, तुम्ही सकाळी जे स्तोत्र वाचाल त्याचा अंगारा करा. निदान तो तरी केयुर साहेबांना लावा आणि तुम्हीपण लावा.
अनन्या - हे चांगले सांगितलेत तुम्ही. तुमची फी किती देऊ?
काका - मी तुम्हाला दुपारीच बोललो, ज्योतिष हा काही माझा व्यवसाय नाही. घरच्यांपुरते मी बघतो. खरंच काही फी वगैरे नको. काही अडचण आल्यास न संकोचता मला सांगा.
अनन्या काकांचे आभार मानून रूमवर परतते. निघताना काका तिच्याजवळ २ - ३ स्तोत्रांची छोटी पुस्तके देतात. लगेचच स्तोत्र वाचन ती चालू करते.
रात्री जेवणासाठी ती परत काकांकडे येते. एकटीच रूमवर असल्याने ती थोडी लवकरच येते. अंगणात प्राची जुने फोटो बघत बसलेली असते.
क्रमशः
कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा