मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह | Read best Marathi online gudh katha | Marathi love story free
मोहिनीविद्या - भाग २
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
किशोरी वहिनी - अजिंक्य जास्त जागू नको
बरं. विवेक किती वेळ जाईल तुमचा तिकडे.
विवेक मामा - काही नाही गं, आमच्या मंडळाचे
रोजचे प्रॅक्टिसचे भजन असते. एक ते दीड तासच जाईल फक्त. अकरा - साडे अकरा पर्यंत
आटोपेल.
अजिंक्य दोघांबरोबर भजनाला जातो. भजन
अकरा पर्यंत आटोपतं. त्यानंतर आरती आणि नंतर कॉफी होते. भजन ऐकल्यामुळे अजिंक्यला
खूप बरे वाटते. सर्वजण भजन आटोपल्यावर घरी येतात. अजिंक्यला देखील आता झोप आली
असते. तो झोपी जातो.
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे
अजिंक्यला जाग येते. अजिंक्यचे दात घासून होईपर्यंत मामा धारोष्ण दूध काढून आलेला
असतो. घरच्याच गाई म्हशी असल्यामुळे दूधाला भरपूर फेस आलेला असतो. मामी मोठा ग्लास
भरून दुध अजिंक्यच्या समोर ठेवते.
अजिंक्य - एवढा मोठा ग्लास? मला नाही
संपणार.
मामी - तुला जाडजूड करून घरी पाठवू
म्हणून सांगितले आहे तुझ्या मामाने ताईंना. तू आजारी होतास. त्यामुळे एवढे दूध तर
प्यायलाच पाहिजे.
मामा - ए अजिंक्य, तेवढे दूध पिऊन टाक
बरे. जरा गावात फिरून आलास की कुठल्या कुठे पचून जाईल.
नाईलाजाने अजिंक्य तेवढे सगळे दूध
पितो. थोडावेळ मोबाईल घेऊन सोशल अकाउंट चेक करत बसतो. काल मामाकडे आल्यापासून
त्याला मोबाईल उघडून बघायला वेळच झालेला नसतो. थोडावेळ मित्रांबरोबर चॅटिंग
झाल्यावर तो मामाच्या मागोमाग वाडीत जातो.
( नारळी-पोफळीच्या झाडांना कोकणात काही
ठिकाणी वाडी तर काही ठिकाणी बाग असे म्हणतात).
मामा नारळी-पोफळीच्या बागेला शिपणे करत
असतो.
अजिंक्यला लहानपणीचे दिवस आठवतात.
तेव्हा बैल रहाट असायचा. बैलाच्या डोळ्याला झापड बांधले जायचे. तो बैल गोल फिरत
राहायचा. शाफ्ट, गिअर आणि रहाट लाकडाचा बनवलेला असे. रहाट हा जत्रेतल्या आकाश
पाळण्यासारखा असे. रहाटाला दोरीच्या
सहाय्याने मडकी बांधलेली असत. रहाट गोल फिरू लागला की दोरीला बांधलेली मडकी
विहिरीतील पाण्यात बुडत असत. वर येताना मडकी पाण्याने भरून येत. एकदम वरच्या
बाजूला पन्हळ लावलेला असे. पाण्याने भरून आलेली मडकी खाली जाण्यापूर्वी त्या
पन्हळात रिकामी होत असत. त्यातून येणारे पाणी बागेला वळवले जाई. रहाटाचा येणारा
आवाज अजिंक्यच्या कानात अजून देखील फिट बसलेला होता. जसजशी वर्षे सरत गेली तसतसे
काम करण्याच्या पद्धती बदलत गेल्या. आता बैल रहाटाच्या जागी इलेक्ट्रिक पंप आले.
लहानपणी अजिंक्य मामाकडे आला की त्याचा
बराचसा वेळ मामाच्या मागे फिरण्यात जाई. वाडी, शेत, गोठा कुठे कुठे मामा जाई तिथे
तिथे अजिंक्य त्याच्यामागे असे. प्राची, प्रणाली आणि प्रणालीचा धाकटा भाऊ विशाल हे
सर्व अजिंक्यशी खेळायला येत. ते देखिल त्यामुळे मामाच्या मागे असत. मामा काम करता
करता त्यांना छान छान गोष्टी सांगत असे.
थोडावेळ काम करता करता मामाशी गप्पा
मारून झाल्यावर आतून मामीची हाक आली, कि नाश्ता तयार आहे खायला चला. मामा आणि
अजिंक्य घरात आले. मामीने घावन केले होते. सगळ्यांनी घावन खाल्ले. त्यानंतर मामीने
मस्तपैकी चहा केला.
मागच्या दारी चुलीवर पाणी तापत ठेवले होते. अजिंक्यने पाणी ओतून घेऊन आंघोळ करून घेतली. इतके शिकून देखील अजिंक्य देवभक्त होता. आंघोळ झाल्यावर थोडा वेळ त्याने देवाचे नामस्मरण केले आणि मनःशांतीसाठी ध्यानधारणा केली. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यामुळे साधारण आठवडाभर अजिंक्यचा या सर्व गोष्टींना खंड पडला होता.
साधारण सकाळचे दहा वाजले होते.
तेवढ्यात प्राची इकडे आली. अजिंक्य तिला कॉंम्प्युटर मधील पुढचे ज्ञान देणार होता.
दोघेजण अंगणात खुर्च्या टाकून बसले. बेसिक गोष्टी तर तिला येतच होत्या. त्यामुळे
अजिंक्यने पुढचे शिकवण्यास सुरुवात केली. एक तास होऊन गेला. त्यानंतर दोघांनी
अभ्यास थांबवला.
प्राची - घरी चल आईने पन्ह केलेले आहे.
तुला आवडते ना?
अजिंक्य - पन्ह्याचे नाव काढलंस आणि माझ्या तोंडाला पाणी
सुटलं.
अजिंक्य प्राचीच्या घरी गेला. दोघंही
पडवीत बसले. प्राची दोन मोठे ग्लास भरून पन्ह घेऊन आली.
अजिंक्य - आपले तालुक्याचे टॉकीज चालू आहे ना गं?
प्राची - आता नुसते टॉकीज नाही राहिले,
तर मल्टिप्लेक्स झाले आहे. खूप सुधारणा झाली आहे तिथे.
अजिंक्यच्या आवडत्या हिरो चा मूवी
रिलीज होणार असतो. त्यामुळे त्याबाबत तो विचारणा करतो.
प्राची - अरे हो, तो मुव्ही उद्याच
येणार आहे आपल्या मल्टीप्लेक्सला. कालच
पेपरला ॲड आली होती.
अजिंक्य - बरं झालं बोललीस. उद्याच मी
जातो दुपारी तीन ते सहा शोला.
बोलता बोलता दोघांचे पन्ह पिऊन होते.
प्राचीची आई - अजिंक्य, येत जा मधून
मधून आहेस ना महिनाभर.
अजिंक्य - हो काकु, नक्कीच येईन.
अजिंक्य निघण्यापूर्वी, प्राची त्याचा
कॉन्टॅक्ट नंबर घेते आणि स्वतःचा नंबर त्याला देते.
प्राची आणि प्रणाली दोघीजणी
अजिंक्यच्या बाल मैत्रिणी. दोघीजणी दिसायला खूप सुंदर. परंतु लहानपणी अजिंक्यचे
प्रणाली बरोबर जास्त पटायचे. कळायला लागल्यावर मनाच्या कोपर्यात कुठेतरी
प्रणालीचे चित्र कोरलेले होते. कारण मुळातच प्रणालीचा स्वभाव शांत आणि चांगला
होता. प्राची मात्र थोडीशी लबाड होती. अजिंक्यची दोघीं बरोबर चांगली मैत्री होती.
परंतु आता अजिंक्य प्राची कडे आकर्षित होऊ लागला होता. त्याला प्राची आवडू लागली
होती. अजिंक्यची दोलायमान स्थिती झाली होती. दुसरे मन मात्र सांगत होते की ती फक्त
तुझी मैत्रीण आहे.
संध्याकाळी अजिंक्यची आई आळी मध्ये
जाऊन नातेवाईकांना भेटून येते. अजिंक्यचा एक चुलत मामा देखील आळीतच राहत असतो.
सुरेश मामा. हा मामा अजिंक्यचा खूप आवडता असतो. सुरेश मामा गावातील एका शाळेवर
शिक्षक असतो. त्याच बरोबर ज्योतिष विद्येत पारंगत असतो. अजिंक्य आईबरोबर बाकी कुठे
जात नाही, परंतु सुरेश मामाकडे मात्र जातो. मामा - मामी दोघेजण त्यांचे स्वागत
करतात. सुरेश मामाला भेटल्यामुळे अजिंक्यला खूप बरं वाटतं.
आज रात्री देखील नेहमीप्रमाणे भजन
असते. मामा आणि आजोबांबरोबर अजिंक्य निघतो. आजचे भजन प्रणालीच्या घरी असते.
प्रणालीच्या घरातील वातावरण अत्यंत पवित्र असते. भजनाला सुरुवात होते. घरीच भजन
असल्यामुळे प्रणाली देखील एक अभंग म्हणते. सुमधुर आवाजात म्हटलेला तो अभंग ऐकून
अजिंक्यला छान वाटते. अजिंक्य प्रणालीकडे बघत असतो. परंतु ती मात्र त्याच्या
नजरेला नजर देत नसते. भजन आटोपल्यावर देखील अजिंक्य तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न
करतो. परंतु ती जेवढ्यास तेवढंच बोलते.
प्राची किती माझ्याशी नीट बोलते, आणि
या प्रणालीला काय झाले? मी काही परका आहे का? अजिंक्यच्या मनात विचार येऊ लागतात.
रात्री अकरा वाजेपर्यंत सर्वजण घरी
येतात. सगळ्यांना झोपा लागतात. अजिंक्यला मात्र एवढ्या लवकर झोपायची सवय नसते.
शहरी जीवनामुळे झोपायला त्याला नेहमीच उशीर होत असे. त्यांची कंपनीदेखील तीनही शिफ्टमध्ये
चालत असे. त्यामुळे मशिनरी मध्ये काही गडबड झाल्यास रात्री देखील तो कंपनीत जाऊन
येत असे. अजिंक्य थोडावेळ नेट सर्फिंग करतो. खेडेगाव असले तरी देखील मामाच्या
गावात रेंज चांगली असते.
थोड्यावेळाने अजिंक्यला झोप लागते.
रात्री त्याला एक भितीदायक स्वप्न पडते.
स्वप्नामध्ये त्याला एक हिरवी साडी नेसलेली सुंदर स्त्री दिसते. तिच्या हातामध्ये
एक जाळे असते. अजिंक्य त्या जागेवरून पळायचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला पळता
येत नसते. जणू काही त्याचे पाय जमिनीला चिकटून गेलेले असतात. ती सुंदर स्त्री
तिच्या हातामधील जाळे अजिंक्यवर फेकते. अजिंक्य त्यातून सुटायचा प्रयत्न करत असतो.
परंतु त्याला सुटता येत नसते. स्वप्न बघितल्यामुळे अजिंक्य जोरजोरात ओरडू लागतो.
घरातील सर्वजण जागे होतात. सर्वजण हाका मारून अजिंक्यला जागं करतात.
किशोरी वहिनी - अजिंक्य काय झाले तुला?
अजिंक्य - काही नाही स्वप्न पडलं.
अजिंक्यचा डोळ्यावर खूप झोप असते.
त्यामुळे एवढे बोलून तो लगेच झोपतो.
दुसर्या दिवशी सकाळी आईची आवराआवर
सुरू होते. तिला परत नवी मुंबईला जायचे असते. किशोरी वहिनी आई-वडिलांना नमस्कार
करतात. औषधे वेळेवर घे, उगाच दगदग करू नको, असे अजिंक्यला सांगून किशोरी वहिनी
गाडीमध्ये बसतात. ड्रायव्हर काका गाडी सुरू करतात. किशोरी वहिनी सर्वांना अच्छा
करतात.
आंघोळ करून अजिंक्य तयार होतो.
नेहमीप्रमाणे देवाचे नामस्मरण आणि ध्यान धारणा तो करतो. थोड्याच वेळात प्राची
कॉम्प्युटर शिकण्यासाठी येते. तिला तो शिकवतो.
त्यानंतर तो मामाला मूव्ही बघायला
जाणार असल्याचे सांगतो. तीन ते सहा शो आहे तू येतोस काय असे तो मामाला विचारतो.
दुधाच्या धंद्यामुळे मामाला वेळ नसतो. आजोबांची टू व्हीलर घेऊन जा असे तो
अजिंक्यला सुचवतो.
तालुक्याचे ठिकाण गाडीने साधारण
अर्ध्या तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे जेवण झाल्यावर सव्वादोन वाजता अजिंक्य
घराच्या बाहेर पडतो. थोडं पुढे गेल्यावर बस स्टॉप वर प्राची उभी दिसते. तिला बघून
अजिंक्य गाडी थांबवतो.
अजिंक्य - काय ग कुठे निघालीस?
प्राची - तालुक्याच्या गावी जात आहे.
मैत्रिणी कडे जायचे आहे. तसेच लायब्ररीमध्ये पण जायचे आहे.
अजिंक्य - मग चल, मी सोडतो तुला.
प्राची लगेचच गाडीच्या मागच्या सीटवर
बसते. अजिंक्य गाडी चालवू लागतो.
अजिंक्य - तुला माहित होतं ना मी आज
तीनच्या शोला जाणार आहे ते. मग मला आधीच का नाही सांगितलेस तुला तालुक्याच्या गावी
जायचे आहे ते?
प्राची - अरे माझं नक्की नव्हतं.
थोड्याच वेळात दोघेजण तालुक्याच्या
गावी पोहोचतात.
अजिंक्य - सांग आता तुला कुठे सोडु?
प्राची - टॉकीजला
अजिंक्य - काय?
प्राची (गालात हसत) - ऐकू नाही का येत? टॉकीजला.
अजिंक्य - अग पण तुला मैत्रिणीकडे
जायचे होते ना?
प्राची - असा कसा रे तू? एवढी सुंदर
मैत्रीण तुझ्याबरोबर टू व्हिलर वर आली, आणि आता एकटाच टॉकीजला जातोस. मी आले तर
काही अडचण होणार आहे का?
अजिंक्य गांगरतो.
अजिंक्य - मला काहीच प्रॉब्लेम नाही.
मी दोन तिकिटे काढतो. पण गावातील लोक काय म्हणतील?
प्राची - त्यांना कोण सांगायला जातंय?
अजिंक्य दोन प्लॅटिनम तिकीटे काढतो.
मुव्ही डिटेक्टिव्ह टाईप असते. दोघांना मूव्ही खूप आवडते. इंटरवलला अजिंक्य
पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन येतो. काल पडलेले स्वप्न अजिंक्य प्राचीला सांगतो.
प्राचीला हसू येऊ लागते. अशी कशी रे स्वप्न तुला पडतात म्हणून ती त्याला विचारते.
साडेपाच वाजेपर्यंत मूव्ही संपतो. त्यानंतर अजिंक्य आणि प्राची लायब्ररीमध्ये
जातात. प्राची तिला हवे असलेले पुस्तक बदलून घेते.
प्राची आणि अजिंक्य दोघेही गाडीवरून
परत गावाकडे यायला निघतात. फाट्यावर प्रणाली उभी दिसते. अजिंक्य गाडी थांबवतो.
अजिंक्य - प्रणाली आज क्लास लेट होता
का?
प्रणाली - हो.
अजिंक्य - मी प्राचीला गावातील बस
स्टॉप पर्यंत सोडतो आणि परत तुला न्यायला येतो. येऊ का?
प्रणाली - नको अजिंक्य, मला मिळेल शेअर
रिक्षा.
अजिंक्य प्राचीला गावातील बस स्टॉप
पर्यंत आणून सोडतो, उगाच कोणी बघितल्यास प्रॉब्लेम नको म्हणून. पुढे प्राची चालत
चालत घरी येते.
मामा - काय रे, कसा होता पिक्चर?
अजिंक्य - मामा, मुव्ही एकदम मस्त
होता. टॉकीज मध्ये पण खूप सुधारणा झालेली आहे.
त्यानंतर दोन-तीन दिवस जातात. रोज
रात्री अजिंक्यला तसेच स्वप्न पडे. तीच सुंदरी स्त्री, अजिंक्य वर जाळे टाकत आहे.
त्यातून सुटण्यासाठी अजिंक्य धडपड करे. हे सर्व झाल्यावर अजिंक्यला दचकून जाग येत
असे. घरात हा प्रकार सांगून सर्वांचे टेन्शन कशाला वाढवायचे? असे वाटल्यामुळे
अजिंक्यने घरामध्ये आजी-आजोबा, मामा-मामी कोणालाच काही सांगितले नाही. परंतु सुरेश
मामावर मात्र त्याचा विश्वास असतो. शिवाय तो ज्योतिषी असतो. त्यामुळे एके दिवशी
सकाळी तो सुरेश मामाच्या घरी जातो. मे महिना असल्यामुळे मामाच्या शाळेला सुट्टी
लागलेली असते. भाच्याला बघून सुरेश मामाला आनंद होतो.
सुरेश मामा - त्यादिवशी आईबरोबर आलास,
त्यानंतर तीन-चार दिवस कुठे गायब झाला होतास?
अजिंक्य - नाही रे मामा, इकडे तिकडे
वेळ गेला. पण मी आत्ता वेगळ्याच कामासाठी आलो आहे
सुरेश मामा - बोल काय काम काढलेस?
अजिंक्य - मला ना, रोज रात्री स्वप्न पडतंय.
सुरेश मामा - काय दिसते स्वप्नात?
अजिंक्य - मला स्वप्नामध्ये एक सुंदर
स्त्री दिसते. तिच्या हातामध्ये जाळे असते. तिला बघून मी तेथून पळण्याचा प्रयत्न
करतो. परंतु मला पळता येत नाही. जणू काही माझे पाय जमिनीला चिकटलेले असतात.
ती स्त्री ते जाळे माझ्यावर टाकते. मी
त्या जाळ्यामध्ये गुरफटत जातो. सुटण्याचा खूप प्रयत्न करून देखील मला त्यातून
सुटता येत नाही. त्यानंतर घाबरून मला जाग येते. सतत चार दिवस मला हेच स्वप्न पडत
आहे. घरात कोणाला टेन्शन नको म्हणून मी बोललो नाही, तुझ्याकडे आलो.
सुरेश मामा अजिंक्यचा हात बघतो. त्याचे
डोळे बघतो. त्यानंतर त्याला आत मधल्या एका खोलीत नेतो. त्या खोलीमध्ये भिंतीला एक
पांढरा शुभ्र पडदा बांधलेला असतो. भिंतीच्या समोर एक खुर्ची ठेवलेली असते. सुरेश
मामा अजिंक्यला त्या खुर्ची मध्ये बसायला सांगतो. मामा अजिंक्यच्या समोर बसतो.
थोडावेळ ध्यान धरून, नंतर मामा अजिंक्य कडे एकटक बघत बसतो.
सुरेश मामा - अजिंक्य घाबरू नकोस. बरे
झाले तू माझ्याकडे आलास. तुझ्यावर कोणीतरी मोहिनी विद्येचा प्रयोग केलेला आहे.
अजिंक्य - मामा, तू काय सांगत आहेस?
सुरेश मामा - मी खरे तेच सांगत आहे. मी
तुझा ऑरा चेक केला. शिवाय तुझा हात आणि डोळे देखील बघितले. माझ्या अभ्यासानुसार
हेच झालेले आहे.
अजिंक्य - हा काय प्रकार आहे? मला
यासंबंधी काहीही माहीत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा