Read best Marathi online gudh katha love story free मराठी
लेखक - केदार शिवराम देवधर
(पेण - रायगड)
जीवात्मा - एक प्रेममय भयकथा
दिवस पहिला
शारदा कॉलेज मध्ये आज बरीच मुले व प्रोफेसर उत्सुक होते. आज शनिवार, वीक एन्ड चा दिवस. महामुंबई शहरातील एक नावाजलेले कॉलेज, पोस्ट ग्रॅजुएशन - एम. एस. सी. साठी. एम. एस. सी. च्या बऱ्याच ब्रँच तेथे उपलब्ध होत्या.
रविवार व जोडून सुट्टी आल्यामुळे या डिसेंबर महिन्यात कॉलेज ची सहल निघाली होती. साधारण ७५ मुलं - मुली तयार होती. कोकणातील "नदीपुर" या समुद्र किनारी वसलेल्या गावात सहल निघाली होती. मोठ्या २ बस बुक केल्या होत्या.
प्रिन्सिपल नेहा मॅडम खूप टेन्शन मध्ये होत्या. कारण विशेष काही नाही, तर आजकालची अवखळ तरुण पिढी. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची हि पहिलीच सहल होती. मॅडम अहो काही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल - प्रोफेसर अजय सर व प्रोफेसर स्वाती मॅडम त्यांना समजावत होत्या.
प्रोफेसर अजय केमिस्ट्री, तर प्रोफेसर स्वाती फिजिक्स शिकवत. त्याच बरोबर प्रोफेसर विजय काळे व प्रोफेसर मालती काळे हे कपल देखील सहलीला येणार होते. जोडीला प्रोफेसर अतुल सर व प्रोफेसर सुवर्णा मॅडम होत्या. कॉलेजचा हे शिक्षक म्हणजे कॉलेजची शान होते.
कॉलेज सुटल्यावर सर्वजण घरी गेले. सहलीला येणाऱ्या सर्वानी आपापल्या बॅग्ज अगोदरच भरून ठेवल्या होत्या. दुपारी ४ वाजता दोन्ही बस सुटल्या. भेंड्या, गप्पा यांना उधाण आले. सर्व मूल - मुली जोशात होती. वाटेत एका हॉटेलात वडा - पाव व चहा झाला. थंडी चांगलीच पडली असल्यामुळे गरम गरम वडा पाव व चहा मस्तच वाटला.
या सर्व प्रकारात नवरा - बायको असूनही, एकमेकांपासून दूर होते ते श्री व सौ. काळे सर. दोघांच्यात भरपूर भांडणे झाली होती. काळे सरांचे दुसऱ्या स्त्री वर प्रेम बसले होते. त्यामुळे ते डिवोर्स मागत होते. पण काळे मॅडम डिवोर्स देत नव्हत्या.
मफलर का नाही आणला? स्वाती मॅडमनी, अजय सरांना विचारले. गेले २ दिवस अजय सरांना सर्दी झाली होती. स्वाती मॅडमनी त्यांचा मफलर सरांना दिला. अहो मॅडम नको नको. तुम्हाला ठेवा. मी विसरलो, पण फार थंडी नाही. अहो सर माझ्या जवळ स्कार्फ आहे. थंडी नाही कशी? ठेवाच मॅडम म्हणाल्या व मफलर सरांना दिला.
१५-२० मिनिटांनी बस परत सुटल्या, त्या कोकणच्या दिशेने. साधारण साडेसात वाजेपर्यंत बस " नदीपुरात " दाखल झाल्या.
समुद्रकिनारी असलेली २ लॉज भाड्याने घेतली होती. अर्थात एक मुलांसाठी व एक मुलींसाठी. सर्वानी आपापल्या बॅग्जस रूम मध्ये ठेवल्या व सर्वजण फ्रेश झाले. आता सर्वांना तेथील सरपंचांच्या घरी जायचे होते. सरपंच व त्यांची पत्नी दोघेही देवमाणसे. सरपंच हे कॉलेजच्या अध्यक्षांच्या नात्यातले. म्हणून सहल "नदीपुरला" जायची ठरताच अध्यक्षांनी त्यांना फोन करून सर्व सोय करायची विनंती केली. सरपंचानी सर्व सोय करायचे मान्य करून, पाहुणचाराची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन, आज रात्रीचे जेवण सरपंचांकडे होते.
सरपंचांच्या घरी पोहोचताच उभयतांनी, प्रिंसिपल नेहा मॅडम व सर्वांचे स्वागत केले. त्यांचा बंगला खूप मोठा होता. समोर मोठा मंडप घातलेला होता. तेथे टेबल - खुर्च्या मांडून तयार होत्या. एकाचवेळी १०० माणसे आरामात बसतील एवढा मंडप मोठा होता. सरपंचांच्या मदतीला गावातील अजून ४-५ जोडपी आली होती. पंगत सुरु झाली. आमटी - भात, तांदुळाच्या भाकऱ्या, वांग्याचे भरीत, कुळथाचे पिठलं व स्वीट डिश म्हणून गुलाबजाम असा बेत होता. घरचे दूध - दुभते असल्यामुळे खवा घरीच बनवून गुलाबजाम केले होते. एव्हाना थंडीचा कडाका खूपच वाढला होता. सर्वांनी जर्किन घातले होते. या थंडीत गरम तांदुळाच्या भाकऱ्या व वांग्याचे भरीत खाण्याची मजा काही औरच होती. गावकरी व सरपंच आग्रह करून परत परत वाढत होते. हळू हळू एक एक मेम्बर ढेकर देऊन उठू लागला. त्यानंतर गावकरी व घरातील लोक जेवले.
रात्रीचे अंदाजे १० वाजले. सर्वांचे ग्रुप जमा होऊन गप्पा रंगू लागल्या. होता होता भुताच्या गप्पा रंगू लागल्या. काही मुलांनी सरपंचांना विचारले कि काका, इथे काही भुताच्या गोष्टी आहेत कि नाही. भुताचे नाव ऐकताच सर्वजण सरपंचांकडे कान देऊन ऐकू लागले. सरपंच म्हणाले, मुलांनो आमच्या गावात भूत - बीत काही नाही. येथे सर्वजण देवभक्त आहेत. तसेच सर्वजण सुसंस्कारी आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर कोणाचा आत्मा भटकत रहात नाही. पण भूत योनी आहे यावर माझा विश्वास आहे. त्यानंतर गावकर्यांनी आजूबाजूच्या गावातील भुताच्या गोष्टी सांगितल्या.
गावकर्यांनी असे देखील सांगितले कि, जरी भुते नसली तरी खोल समुद्रात पोहायला जाऊ नका. कारण काही ठिकाणी समुद्राचा अंदाज येत नाही. तुम्ही नवीन आहात. पूर्वी एका मुलीचे प्राण वाचवताना, एका युवकाचा येथील समुद्रात प्राण गेलेला आहे.
हे ऐकून , सर्व कान टवकारून ऐकू लागले. कोण होता तो युवक ? येथीलच होता का? मग त्याचे काही भूत वगैरे? एकाने प्रश्न विचारला.
नाही, तो युवक येथील नव्हता. येथे मित्रांबरोबर फिरायला आला होता. पण त्याचे भूत वगैरे काही नाही. भला मुलगा होता तो. पण समुद्राचा अंदाज येत नाही. त्यामुळे तुम्ही समुद्रात फार आत जाऊ नका.
गप्पा रंगत गेल्या. बघता बघता रात्रीचा १ वाजला. सर्वांना झोप येऊ लागली. सरपंचांचा व गावकऱ्यांचा निरोप घेऊन सर्व जण लॉज वर निघाले.
रात्रीची वेळ असल्यामुळे बरेच जण घाबरले होते. कारण लॉज त्या समुद्रासमोरच होते, जेथे त्या युवकाचा जीव गेला होता. सर्व जण लॉज वर गेले. देवाचे नाव आज बऱ्याच मुला - मुलींच्या तोंडात होते. सर्वजण झोपी गेले.
दिवस दुसरा
दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता अजय सर जॉगिंगला बाहेर पडले. मुलींच्या लॉजमधून स्वाती मॅडम नेमक्या त्याच वेळी बाहेर जॉगिंग ला आलेल्या होत्या. गुड मॉर्निंग मॅडम - अजय सर म्हणाले.
गुड मॉर्निंग - मॅडमनी रिप्लाय दिला.
दोघांचे जॉगिंग सुरु झाले. जॉगिंग करत दूरवर गेल्यावर केवड्याचे बन लागले.
आपण जरा थांबूया का सर? मॅडमनी विचारले. अजय सरांनी बाजूला वळून बघायच्या आत मॅडम खडकावर जाऊन बसल्या. अजय सरांनी तिकडे बघितले आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मॅडम ज्या खडकावर बसल्या होत्या, त्याबाजूला एक मोठा काळा साप बसला होता. तो मॅडमच्या बाजूने सरपटत गेला आणि त्यांच्या पाठीवर चढला. पाठीवर साप बघून स्वाती मॅडमनी किंकाळी फोडली. त्वरितच अजय सरांनी धाव घेतली व क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तो साप झटकला. पण हाय रे दुर्दैव, त्या सापाने अजय सरांच्या हाताला विळखा घातला. डोळयांची पापणी लवते न लवते तोच साप, सरांच्या हाताला चावला. पण त्याही परिस्थितीत सरांनी त्याला झटकले. साप सरपटत वेगाने केवड्याच्या बनात नाहीसा झाला.
स्वाती मॅडम जोरात रडू लागल्या. मदतीसाठी ओरडू लागल्या. पण एवढ्या सकाळी तेथे कोण असणार. मग मॅडमनी त्यांचा डोक्याला बांधलेला स्कार्फ पटकन काढला व तो सरांच्या हाताला बांधला. जेणेकरून विष चढू नये. दोघेही हळूहळू लॉज कडे चालू लागले. मॅडमनी प्रिंसिपल नेहा मॅडमना त्वरित कॉल केला व घडलेला वृत्तांत सांगितला. दोन्ही लॉज वर धावपळ सुरु झाली. पटकन एका बसमधून अतुल सर, मालती मॅडम, नेहा मॅडम व काही विदयार्थी केवड्याच्या बनाकडे निघाले.
अतुल सर व काही विदयार्थ्यांनी अजय सरांना व स्वाती मॅडमना बसमध्ये घेतले. तोपर्यंत सरपंचांना हि बातमी कळली. त्यांच्या मदतीने अजय सरांना गावातील सरकारी रुग्णालयात ऍडमिट केले. अजूनतरी अजय सर शुद्धीवर होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले व सांगितले कि काळजी करण्याचे कारण नाही,कारण कि साप बिनविषारी होता, पण प्रिकॉशन म्हणून त्यांना दुपारपर्यंत इथे थांबू द्या. सरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सरांना एका वेगळ्या वार्ड मध्ये ठेवले होते. इतर पेशंट नव्हतेच. होते ते बाकीच्या वार्ड मध्ये ऍडमिट. स्वाती मॅडम तेथे थांबायला तयार झाल्या. मग बाकीचे सर्वजण लॉजवर निघून गेले.
तुम्ही स्वतःचा जीव का धोक्यात घातला? स्वाती मॅडम म्हणाल्या.
अहो मॅडम तो साप तुमच्या पाठीवर चढला होता, कोणत्याही क्षणी त्याने तुम्हाला दंश केला असता. अजय सर म्हणाले.
साधारण २ वर्षांपूर्वी दोघेही कॉलेजात रुजू झाले होते. सर चॉकलेट बॉय असल्यामुळे, बऱ्याच मुलींना ते आवडायचे. स्वाती मॅडम देखील काही कमी देखण्या नव्हत्या. दोघेही मनापासून शिकवत होते. दोघांचाही स्वभाव मनमिळावू होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली होती. पण बोलायची हिम्मत नव्हती.
पण नियतीने आज तो योग जुळवून आणला. दोघांना एकमेकांच्या डोळ्यात बघून, मनातले भाव समजले.
मला आयुष्यभर असेच वाचवाल? स्वाती मॅडमनी विचारले.
आधी तुमच्या घरी येऊन आई - वडिलांना विचारले पाहिजे, कि मी स्वातीला वाचवण्याचे कॉट्रॅक्ट घेऊ का? अजयने हसत विचारले.
सर, तुम्हीपण ना....
अजय म्हण आता. कॉलेजमध्ये सर - मॅडम.
ओके अजय, स्वाती बोलली आणि हसली.
मग बराच वेळ दोघांच्या गप्पा रंगल्या.
दुपारी सरपंचांनी गाडी पाठवून दोघांना आपल्या घरी जेवणासाठी आणले.
सरपंचांच्या बायकोने दोघांची दृष्ट काढली, आणि म्हणाली तुमचा जोडा अगदी लक्ष्मी - नारायणासारखा आहे हो. ते ऐकून सरपंच तिला डोळ्यांनी खुणावू लागले.
अजय व स्वाती हसत म्हणाले, अहो काकू आम्ही एकाच कॉलेजात शिकवतो, आमचं लग्न झालेलं नाही.
सरपंच व त्यांच्या बायकोला ओशाळल्यासारखे झाले.
अजय - स्वाती ने त्यांना वाईट वाटले नसल्याचे समजावून सांगितले. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा रंगल्या. तोपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले. चहा झाला. तोच सरपंचांचा एक नोकर धावत आला.
सर, समुद्र किनाऱ्यावर परत एक प्रकार घडलाय. कॉलेजचा एक मुलगा बुडता बुडता वाचलाय .
सर्वजण ताड्कन उभे राहिले.
अजय, स्वाती व सरपंच लॉजवर पोहोचले.
असं कस घडलं? सरपंचांनी प्रिंसिपल मॅडमना विचारले.
दुपारी झोपून उठल्यावर सर्वजण किनाऱयावर गेले. तेव्हा आमच्या कॉलेजची काही मुले पाण्यात गेली. एक मुलगा जास्त पुढे गेला होता. तेव्हड्यात तो तेथे पाण्यात पडला. त्याला पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही. तो बुडू लागला. आमची सर्वांची त्याला वाचविण्यासाठी धावपळ उडाली. परंतु त्या मुलाच्या सांगण्यानुसार एका लाटेबरोबर कोणीतरी त्याला जोरात ढकलले. काही कळायच्या आत तो लाटेबरोबर किनाऱ्यावर येऊन पडला. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो बेशुद्ध पडला. पण आता शुद्धीवर आला आहे. नेहा मॅडमनी घडलेला वृत्तांत सांगितला.
हे सगळं काय घडत आहे? सरपंच चिंतेने म्हणाले. सर्वांना काळजी घ्या सांगून ते परत घरी गेले.
आता माझे न ऐकल्यास आत्ताच्या आत्ता बस ने माघारी फिरावे लागेल. नेहा मॅडम मुलांवर भडकल्या. आता फक्त किनाऱ्यावरच फिरू, पाण्यात जाणार नाही याचे आश्वासन सर्व मुलांनी मॅडमना दिले. सर्व प्रोफेसरांनी मॅडमची समजूत काढली, तेव्हा कोठे त्यांचा राग शांत झाला.
संध्याकाळी सर्वांनी किनाऱयावर एन्जॉय केला. रात्रीचे जेवण लॉजवरच होते. जेवण झाल्यावर परत सर्वजण किनाऱयावर आले. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्रप्रकाश छान पडला होता. काही ग्रुप भेंड्या खेळत होते, काही बॅटमिंटन खेळत होते, काही गप्पा मारत होते. सर्वजण मजेत होते.
अजय - स्वाती मात्र सगळ्यांच्या नकळत लॉजच्या टेरेसवर जाऊन चांदण्याचा आनंद घेत होते. गार वारा सुटला होता. दोघेही भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होते.
रात्रीचे १२ वाजेपर्यंत सर्वांचा धिंगाणा चालू होता. मग मात्र अतुल सर व श्री काळे सर यांनी सर्व मुलांना लॉजवर परतण्यास सांगितले. सर्वजण आपापल्या रूमवर पोहोचले. अजय - स्वाती देखील आपापल्या लॉजवरील रूम मध्ये पोहोचले.
सर्वांना गाढ झोपा लागल्या. रात्रीचे ३ वाजले. तेवढ्यात एका काळा मास्क घातलेली व्यक्ती मुलींच्या लॉजमध्ये शिरली. ग्राउंड फ्लोअरला च्या एका बाल्कनीतून ती व्यक्ती रूममध्ये शिरली. तेथे रूमच्या भिंतीला मोठ्या स्लायडिंग काचा असल्यामुळे, बाल्कनीतून रूममध्ये सहज प्रवेश मिळाला. आतमध्ये सौ. मालती काळे गाढ झोपल्या होत्या. त्या व्यक्तीने त्यांचे तोंड दाबून त्यांना एक इंजेक्शन दिले. मालती मॅडमनी सुटण्याची भरपूर धडपड केली, पण व्यर्थ. इंजेक्शन देऊन ती व्यक्ती लॉजच्या गेट मधून पळाली.
अचानक दोन्ही लॉजमध्ये आरडाओरडा सुरु झाला. कारण प्रोफेसर सुवर्णा मॅडमच्या रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे सुवर्णा मॅडमच्या रूम मधून धूर येऊ लागला. सुवर्णा मॅडम धावत बाहेर आल्या. त्यामागोमाग सर्व लेडीज लॉजमधून बाहेर आल्या.
सुवर्णा मॅडमची रूम मालती मॅडमच्या रूमच्या बाजूला होती. आता धूर मालती मॅडमच्या रूममध्ये शिरू लागला. सर्व लेडीज बाहेर आल्या, पण मालती मॅडम का बाहेर आल्या नाहीत म्हणून सर्वजण काळजीत पडले.
अजय सर, अतुल सर व काही विदयार्थी लेडिजच्या लॉजमध्ये धावत शिरले. मालती मॅडमच्या रूमची बाल्कनी समोरच असल्याने त्यांनी आत उडी घेतली. स्लायडिंग काचा ओपन बघून सर्वजण आत शिरले. मालती मॅडम आत बेशुद्ध पडल्या होत्या. अजय सरांनी त्यांना उचलून घेतले व सर्वांनी रूमचा पुढील दरवाजा उघडून बाहेर प्रवेश मिळवला. तेथूनदेखील थोडा धूर येत होता. सर्वजण बाहेर आले. अतुल सरांनी तेथील सिक्युरिटी गार्डच्या मदतीने लॉजचे मेन स्विच ऑफ केले. तोपर्यंत लॉजचा मॅनेजर टेक्निशियन घेऊन आला.
जास्त धुरामुळे मालती मॅडम बेशुद्ध पडल्या असाव्यात, असे सर्वांना वाटले. पण त्या शुद्धीवर येईनात. तोपर्यन्त सरपंच गाडी घेऊन आले. मालती मॅडमना गावातील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रात्रीची वेळ असूनदेखील सर्व कर्मचारी व डॉक्टर तातडीने हजर झाले. आता मॅडमच्या तोंडातून फेस येऊ लागला होता.
डॉक्टर गोंधळले. कारण धुरामुळे माणसाच्या तोंडातून फेस कसा येऊ शकतो. पण डॉक्टर हुशार होते. हा विषप्रयोग असू शकतो हे त्यांनी ओळखले. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. त्याचबरोबर त्यांनी सरपंचांना याची कल्पना दिली. सरपंचांनी लगोलग पोलिसांना फोन केला.
लेडीज लॉजवर टेक्निशिअननी रिपेरिंग केली. मायनर फॉल्ट मुळे शॉर्ट सर्किट झाले होते. सर्व व्यवस्थित झाल्यावर सर्वांना लॉजमध्ये जाण्याची परवानगी दिली.
प्रिंसिपल नेहा मॅडम, अजय सर, अतुल सर, स्वाती मॅडम, सुवर्णा मॅडम व सरपंच रुग्णालयातील बाहेरच्या पॅसेज मध्ये उभे होते.
तुम्ही पोलिसांना का बोलावले आहे? नेहा मॅडमनी सरपंचांना विचारले.
अहो मॅडम, मला तसे डॉक्टरांनी करायला सांगितले. कारण त्यांना यात काहीतरी संशय येतोय.
तेव्हड्यात पोलीस हजर झाले. तोपर्यंत डॉक्टर रूममधून बाहेर आले.
डॉक्टर - ट्रीटमेंट चालू आहे, ब्लड रिपोर्ट चेकिंगला पाठवलेत. मला विषप्रयोगाचा संशय येतोय. तुम्ही अगदी वेळेवर त्यांना इथे आणलेत. त्या शुद्धीवर आल्या कि सर्व काही कळेल.
विषप्रयोग शब्द ऐकून सर्व चक्रावले.
अहो शॉर्ट सर्किट होऊन धूर झाला, त्यामुळे मालती मॅडम बेशुद्ध पडल्या ना? सुवर्णा मॅडमनी विचारले.
पोलीस इन्स्पेकटरना घडल्या प्रकाराचा हळूहळू अंदाज येऊ लागला.
मी मालती मॅडमना बघू शकतो का? इन्स्पेकटरनी डॉक्टरांना विचारले.
डॉक्टर - हो
मालती मॅडम वर कुणीतरी हल्ला करून त्यांना विष दिलंय , असा प्राथमिक अंदाज आहे - इन्स्पेक्टर म्हणाले.
सर्वांना काय होत आहे ते कळेनासे झाले.
इन्स्पेक्टर - यांचे कुणाशी वैर किंवा भांडण?
प्रिंसिपल नेहा मॅडम - नाही हो, खूप सुस्वभावी आहेत त्या. नवरा - बायकोची भांडणे होतात, पण ती तर सर्वच घरात होतात.
इन्स्पेक्टर - यांचे मिस्टर काय करतात?
नेहा मॅडम - अहो काय करतात असं काय विचारता? ते तर आमच्या बरोबर ..... (नेहा मॅडमनी आजूबाजूला बघितले, विजय सर कुठे दिसत नव्हते. या सर्व गडबडीत विजय सर नाहीत, हे कोणाच्याच लक्षात आले नव्हते.)
विजय सर कुठे आहेत? नेहा मॅडम ओरडल्या.
विजय सरांची शोधाशोध सुरु झाली. अतुल सर पोलिसांना घेऊन आधी लॉजवर गेले.
विजय सर झोपले असतील आणि झालेला प्रकार त्यांना माहित नसेल तर? अतुल सरांच्या मनात आले होते.
पण लॉजवर विजय सर नव्हते व कोणालाच ते कुठे आहेत यासंबंधी माहित नव्हते.
दिवस तिसरा
हे सर्व होताहोता सकाळचे ६ वाजले. आता सोमवार
उजाडला होता. अचानक विजय सर मिळाल्याची बातमी आली. ते पण बेशुद्ध. पोलिसांनी किनारपट्टी पिंजून काढल्यावर, केवडयाच्या बनात विजय सर बेशुद्ध पडलेले दिसले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. लगोलग त्यांनादेखील त्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, जिथे मालती मॅडम ऍडमिट होत्या.
लॉजवर आणि गावात एकच खळबळ माजली. हे अचानक असे काय होत आहे ते कोणालाच कळेना.
डॉक्टरांनी चेक केल्यावर कळले कि विजय सरांना विषारी साप चावला होता. साप बराच विषारी होता. विष पूर्ण अंगात भिनले होते.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. विजय सर दुपारपर्यंत शुद्धीवर आले. पण ते कुणाला नीट ओळखत नव्हते. त्यांना नीट काही आठवत नव्हते.
थोड्यावेळाने मालती मॅडम शुद्धीवर आल्या. त्यापण खूप घाबरल्या होत्या. मध्ये मध्ये त्यांना ग्लानी येत होती.
संध्याकाळी इन्स्पेक्टरनी डॉक्टरांना फोन केला आणि दोघांची चौकशी केली.
डॉक्टर - आता धोका टळला आहे, पण तुम्ही उद्या चौकशी करायला या. आत्ता दोघांनाही काहीच कळत नाही आहे. आत्ता त्यांच्या डोक्याला ताण देणे योग्य नाही.
इन्स्पेक्टर - ओके डॉक्टर.
संध्याकाळी नेहा मॅडम, अजय सर,स्वाती मॅडम, अतुल सर, सुवर्णा मॅडम, सरपंच व इतर गावकरी हॉस्पिटलमध्ये आले. पण डॉक्टरांनी त्यांना भेटायला मनाई केली. उद्या दोघांना सोडणार असल्याचे डॉक्टरांनी
सांगितले. आज रात्री दोघांजवळ कोणीतरी थांबणे जरुरी होते. अजय सर व स्वाती मॅडम तयार झाले.
या सर्व प्रकारांमुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडले होते. पण आता सर्व ठीक आहे कळल्यावर मुले आनंदली. पण जोश जरा कमीच होता. आज संध्यकाळी मुलांनी किनाऱ्यावर परत एन्जॉय केला.
मालती मॅडम व विजय सरांना रात्रीचे जेवण हॉस्पिटलमध्येच मिळाले. अजय सरांना व स्वाती मॅडमना सरपंचांनी आपल्या घरी जेवायला नेले.
अजय सर पुरुषांच्या वार्ड मध्ये व स्वाती मॅडम स्त्रियांच्या वार्ड मध्ये झोपल्या.
दिवस चौथा
आता मंगळवार उजाडला. सकाळी ९ वाजता मालती मॅडम व विजय सरांना सोडण्यात आले. सरपंचांनी त्यांची गाडी पाठवली होती. मालती मॅडम,विजय सर, अजय सर व स्वाती मॅडम गाडीत बसले. गाडी लॉजवर येऊन थांबली. मालती मॅडम व विजय सर गाडीतून उजव्या बाजूने उतरले.
एवढ्यात एक बैल शिंग रोखून धावत येताना दिसला. मालती मॅडम बाहेर उभ्या होत्या. तो बैल त्यांच्याच दिशेने पुढे आला. तो बैल मॅडमना उडवणार एवढ्यात, विजय सरांनी मॅडमना जोरात बाजूला खेचले. बैलाची मुसंडी चुकली. खरे म्हणजे तो चौखूर उधळलेला बैल तसाच पुढे जायला हवा होता. पण तो परत उलट फिरला - मालती मॅडमच्या दिशेने. विजय सर परत मध्ये पडले आणि त्याची शिंगे सर्व शक्तीनिशी पकडली.
हे काय घडते आहे ते पाहून सर्वजण गांगरून गेले. तोपर्यंत त्या बैलाचा मालक धावत तेथे आला. तो बैलाच्या वेसणीला धरून त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करू लागला. १०-१२ विदयार्थी मदतीला धावले. पण बैल कोणालाच आवरत नव्हता. तेव्हड्यात विजय सरांनी कोणता तरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात बैल शांत झाला. सर्वजण चकित झाले.
विजय सर - मालती तू ठीक आहेस ना? कुठे लागले तर नाही ना?
मालती मॅडम - हो, मी ठीक आहे.
मालती मॅडमना सरांच्या डोळ्यात प्रेम दिसत होते .
कालपर्यंत भांडणारे जोडपे ते हेच का? असा सर्वांना प्रश्न पडला.
सर्व विदयार्थ्यांनी विजय सर व मालती मॅडम सुखरूप लॉजवर आल्यामुळे त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
आता सकाळचे १० वाजले होते. पोलीस चौकशी साठी लॉजवर दाखल झाले. प्रथम मालती मॅडमची जबानी घेतली गेली.
इन्स्पेक्टर - मॅडम पर्वा रात्री काय घडले? न घाबरता सर्व खरं सांगा.
मालती मॅडम - मी रूम मध्ये झोपले होते. तेव्हड्यात एक काळा रुमाल बांधलेली व्यक्ती माझ्या रूममध्ये शिरली. त्या व्यक्तीने माझे तोंड दाबून धरले व मला कसलेतरी इंजेक्शन दिले. नंतरचे मला काहीच आठवत नाही.
इन्स्पेक्टर - त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का?
मालती मॅडम - नाही.
इन्स्पेक्टर - तुमचे कोणाशी वैर , भांडण वगैरे?
मालती मॅडम - नाही.
आता विजय सरांची जबानी घेतली गेली.
इन्स्पेक्टर - पर्वा रात्री तुमच्या पत्नीवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही केवड्याच्या बनात काय करत होतात?
विजय सर - माझ्या डोक्यावर खूप ताण येत आहे. मी एका व्यक्तीचा पाठलाग केला. ती व्यक्ती केवड्याच्या बनाच्या दिशेने पळाली. मी देखील मागोमाग पळालो. आणि तेथे नाग चावला....
मला बाकीचे काहीच आठवत नाही.
इन्स्पेक्टर - तुम्ही सांगू शकाल कि त्या व्यक्तीचा पेहराव कसा होता?
विजय सर - नाही.
इन्स्पेक्टर - तुमचे कोणाशी वैर , भांडण वगैरे?
विजय सर - नाही.
त्यानंतर सिक्युरिटी गार्डची जबानी झाली.
इन्स्पेक्टर - तू येथे किती वर्ष कामाला आहेस?
गार्ड - ६ वर्ष साहेब.
इन्स्पेक्टर - असला प्रकार यापूर्वी कधी घडलेला?
गार्ड - नाही साहेब. इथे कसलाच धोका नव्हता. असे
यापूर्वी कधीच झालेले नाही.
इन्स्पेक्टर - तू येथील गार्ड ना? मग तुला काहीच कसे कळले नाही?
गार्ड - साहेब, येथील दोन्ही लॉजवर रात्री मी पहाऱ्याला असतो. सर्व सामसूम होते. मी दुसऱ्या लॉजवर राउंड मारायला गेल्यावर हा प्रकार घडला असू शकतो.
बाकी काही लोकांच्या जबान्या देखील घेण्यात आल्या.
सर काही कळले का? नेहा मॅडमनी इंस्पेक्टरना विचारले.
इन्स्पेक्टर - गुन्हेगार कोण ते अजून तरी कळले नाही. पण त्या रात्री सुवर्णा मॅडमच्या रूममध्ये शॉर्ट सर्किट झाले ते एका अर्थी बरेच झाले. कारण त्यामुळे कोणाचे तसे विशेष नुकसान झाले नाही. पण त्यामुळेच तर मालती मॅडमना तेथून बाहेर काढले ना? आणि पुढे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केले गेले. नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या तशाच राहिल्या असत्या. त्यांना कोणीतरी विषारी इंजेकशन दिल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. जर वेळीच उपचार झाले नसते तर त्यांचा मृत्यू १००% झाला असता. पण विजय सरांवर त्यामानाने उशिरा उपचार झाले. कदाचित साप जास्त विषारी नव्हता. त्यामुळे ते वाचले.
नेहा मॅडम - थँक यु सर. तुमच्या टीमने विजय सरांना लवकर शोधलेत, त्यामुळे ते वाचले.
इन्स्पेक्टर - तुमचा मुक्काम किती आहे मॅडम?
नेहा मॅडम - आज संध्याकाळी आम्ही निघत आहोत.
इन्स्पेक्टर - या प्रकारात जीवित हानी झाली नाही ते चांगलेच झाले, नाहीतर मध्ये मध्ये तुमची सर्वांची चौकशी करत रहावे लागले असते. आता गरज आहे ती तो हल्लेखोर शोधण्याची. तो आम्ही शोधूच. पण जर गरज पडली तर आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल.
नेहा मॅडमनी त्यांचा व बाकी प्रोफेसरांचे मोबाइल नंबर इन्स्पेक्टरना दिलें .
इन्स्पेक्टर - विजय सर व मालती मॅडम, तुम्ही दोघांनीही झालेला प्रकार महामुंबईला गेल्यावर तुमच्या पोलीस स्टेशनला कळवा. कारण तुमच्या जीवाला धोका आहे. मी तिकडे फोन करून झालेला प्रकार कळवेनच.
दुपारचे जेवण झाले. आता प्रत्येकजण आपापल्या बॅग्जस बांधू लागला.
संध्याकाळी ५ वाजता सरपंच व गावकरी सर्वांना अच्छा करायला आले. घडल्या प्रकाराची इन्स्पेक्टरनी त्यांना कल्पना दिली होती. सर्वांना काळजी घ्यायला सरपंचांनी सांगितले.
आता दोन्ही बस सुटल्या. सर्वांनी सरपंच व गावकर्यांना अच्छा केला.
विजय सर व मालती मॅडम एकाच सीट वर बसले होते.
अजय सर व स्वाती मॅडम देखील एकाच सीट वर बसले होते.
आता मुलांनी परत धिंगाणा करायला सुरुवात केली. भेंड्या - गप्पा याचे उधाण आले.
दोन्ही बस साडे आठ वाजेपर्यंत महामुंबईत दाखल झाल्या. सर्वजण आपापल्या घरी पोहोचले.
सर्वांनी सहलीमध्ये मजा तर केलीच, पण जे अघटित घडले ते प्रत्येकाच्या मनात होतच.
इकडे महामुंबईत आल्यावर मालती मॅडमना विचित्र अनुभव आला. विजय सरांना स्वतःचा बांगला देखील आठवत नव्हता. सर पूर्वीसारखे मॅडमशी भांडत नव्हते, पण नीट बोलतही नव्हते. ते मॅडमपासून दूर रहात होते.
दिवस पाचवा
आज बुधवारी कॉलेजला श्रमपरिहारासाठी सुट्टी होती. भरपूर मौज मजा व धावपळ झाल्यामुळे सर्वजण दमले होते. आज सकाळी बरेचजण उशिराच उठले.
विजय सर व मालती मॅडमदेखील उशिरा उठले.
विजय सरांचे आई - वडील गावाला रहात. त्यांचा एक
भाऊ नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात रहात असे. त्यामुळे बंगल्यावर विजय सर व मॅडम दोघेच रहात असत. उठल्यावर चहा - नाश्ता झाला. विजय सरांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना चक्कर आली व ते पडले. मालती मॅडमना टेन्शन आले. त्यांनी लगेच पहिला फोन फॅमिली डॉक्टरांना केला व दुसरा फोन अजय सरांना केला. अजय सरांशी मालती मॅडमचे चांगले पटत असे. ते दोघे चांगले मित्र - मैत्रीण होते.
डॉक्टर आले. त्यापाठोपाठ अजय सरदेखील आले. डॉक्टरांनी तपासून सांगितले कि यांचे ब्लड प्रेशर वाढले आहे. डॉक्टरांनी विजय सरांना इंजेक्शन दिले व औषधांचे प्रिस्क्रिपशन मालती मॅडमकडे दिले.
डॉक्टर - यांना काहीतरी मानसिक टेन्शन आहे. यांची काळजी घ्या. यांना सध्या कामावर पाठवू नका. २ दिवसांनी माझ्या क्लिनिक मध्ये यांना घेऊन या.
मालती मॅडमनी हो म्हणून डॉक्टरांची व्हिजिट फी दिली.
अजय सर - मॅडम ते प्रिस्क्रिपशन माझ्याकडे द्या, तुम्ही सरांजवळ बसा.
अजय सर प्रिस्क्रिपशन घेऊन गेले व १५ मिनिटांनी औषधे घेऊन परत आले.
औषधांचा डोस विजय सरांना दिला गेला. थोडा वेळ सरांना झोप लागली.
अजय सर - मॅडम हे अचानक सरांना टेन्शन कसले आले.
मालती मॅडम - अरे त्यांना अजून देखील नीट काही आठवत नाही आहे. स्वतःचा बंगला देखील ते विसरलेत.
मालती मॅडम वयाने थोड्या मोठ्या म्हणजे ३१ वर्षांच्या होत्या. विजय सरांचे वय ३२ होते.
अजय सर व स्वाती मॅडम २८ वर्षांचे होते. त्यामुळे मालती मॅडम त्यांना एकेरी नावाने हाक मारत.
मालती मॅडमनी मग दोघांसाठी आलं घालून मस्त चहा केला. अजय व मालती मॅडम चहा पिताना बाकी विषय बोलले. परत काही लागले तर बोलवा असे सांगून अजय सर निघून गेले.
दिवस सहावा
गुरुवारी कॉलेज नेहमीप्रमाणे सुरु झाले. विजय सरांना घरीच ठेवून मालती मॅडम कॉलेजला आल्या. कॉलेज सकाळचेच असे.
मधल्या सुट्टीत चहा - नाश्ता करायला मालती मॅडम व अजय सर एकत्र बसले.
अजय - आता सर कसे आहेत?
मालती मॅडम - अरे काय सांगु , काल त्यांच्या मोठ्या भावाचा फोन आला, तर त्यांनी उचलला नाही. ते त्यांच्या भावालासुद्धा ओळखत नाहीत. नशीब माझे, मला तरी ओळखतात. कहर म्हणजे काल तिचा फोन सुद्धा आला होता, पण .... मॅडम आता रडू लागल्या.
माया सरांची एक्स मैत्रीण. महामुंबईतील एका कॉलेजातील प्राध्यपिका. २ महिन्यांपूर्वी एका समारंभाला सर तिकडे गेले असताना दोघांची ओळख झाली आणि दोघे प्रेमात पडले. मायाचे पती वारले होते. ती सरांपेक्षा ४ वर्षांनी मोठी होती. पण प्रेमाला कुठे वय कळते? विजय सर व मालती मॅडम दोघेही देखणे होते. दोघांचा जोडा अनुरूप होता. पण आता ३ वर्षांच्या संसाराला गालबोट लागले होते.
अजय - मग सर काय बोलले तिच्याशी?
मालती मॅडम - अरे मला ते बोलले, अग या कोण आहेत? बहुतेक रॉंग नंबर आहे. हे बोलले नाहीत म्हणून माया भरपूर चिडली.
अजय - मॅडम हा सर्व प्रकार काय चाललाय ते काहीच कळत नाही. आज सरांनी काही खाल्ले कि नाही?
मालती मॅडम - हो, मी येताना कांदे पोहे व चहा करून आले. ते आम्ही दोघांनी खाल्ले.
अजय - मग तुम्ही कॉलेजला आलात तेव्हा सर काय करत होते? हिंदी म्युझिक चॅनल बघत असतील ना? सरांना बॉलीवूड म्युझिक जाम आवडते.
मालती मॅडम - अरे नाही. ते कालपासून सारखे आरशासमोर उभे राहून स्वतःला न्याहाळत आहेत.
अजय - मॅडम, आपल्याला त्यांची विशेष काळजी घयायला हवी.
( अजय व मालती मॅडम कडे स्वाती मॅडम दुरून पहात होत्या. )
मधली सुट्टी संपली. सर्वजण आपापले लेक्चर घ्यायला निघून गेले.
दुपारी कॉलेज सुटल्यावर,
अजय - स्वाती आज संध्याकाळी मुव्ही बघायला जाऊ या का?
स्वाती चिडून - का? जा त्या मालती मॅडमना घेऊन मुव्ही बघायला.
अजय हसत - एवढा राग? यापूर्वी आम्ही दोघे बोलायचो तेव्हा नाही रागावलीस?
स्वाती - तेव्हा पण राग यायचा, पण आपलं कुठे काही ठरलं होत?
अजय हसत - लोक बोलतात ते काही खोटं नाही. लग्नानंतर पुरुष गुलाम होतो.
नंतर अजयने काल मालती मॅडमच्या घरी जे काही घडले ते सर्व स्वातीला सांगितले.
स्वाती - अजून सरांना काहीच आठवत नाही म्हणजे काळजीची गोष्ट आहे. आपण त्या दोघांना मदत केली पाहिजे.
अजय - पण संध्याकाळी मुव्हीचे नक्की ना?
स्वाती हसत - हो रे बाबा.
विजय सरांची १ आठवड्याची रजा मालती मॅडमनी टाकली.
दुपारी घरी आल्यावर मालती मॅडमनी जेवण केले.
दोघेजण जेवले. औषध घेऊन विजय सर झोपले. मालती मॅडमना झोप येत नसल्यामुळे त्या हॉल मध्ये बसून टी. व्ही. वर मराठी सिरीयल बघत बसल्या.
दुपारी ४ वाजता, डोअरबेल वाजली. मालती मॅडमनी दार उघडले. अय्या आई, बाबा तुम्ही? मॅडम आनंदाने म्हणाल्या. सहलीला गेल्यावर काय घडले ते मॅडमच्या आई - वडिलांना कळले होते.
महामुंबईच्या बाजूच्या फणसवली या शहरात मॅडमचे माहेर. त्यामुळे लेकीला व जावयाला भेटायला आई - वडील लवकरच आले.
घरात आल्यावर मॅडमनी आई वडिलांना चहा पाणी दिले.
नंतर मालती मॅडमनी सहलीचा सर्व वृत्तांत आई - वडिलांना सांगितला.
म्हणजे विजयराव आम्हाला ओळखतील कि नाही? आई वडिलांनी विचारले.
तेव्हड्यात विजय सरांना जाग आली. कोण बोलत आहे म्हणून ते बाहेर आले. मालती मॅडमच्या आई वडिलांना बघून विजय सरांनी त्यांना अदबीने नमस्कार केला आणि फणसवलीची खुशाली विचारली.
जावयाने त्याच्या भावाला ओळखले नाही, पण आपल्याला ओळखले हे पाहून आई - वडील बुचकळ्यात पडले.
त्यानंतर गप्पा रंगल्या.
विजय सर फणसवलीतील एक एक ओळखी सांगू लागले.
अविनाश अग्निपुत्रे तुम्हाला माहित आहे का? तो सध्या काय करतो? विजय सरांनी विचारले.
मॅडमचे वडील - तो त्याच्या वडिलांचे हॉटेल चालवतो. आमच्या एरियापासून तो खूप लांब रहातो. पण तुम्हाला तो कसा माहित? आणि तुम्ही यापूर्वी कधी बोलला नाहीत?
विजय - तो माझा मित्र आहे.
थोडा वेळ गप्पा झाल्या तोपर्यँत रात्र झाली. रात्रीचे जेवण झाले. विजय सरांना मालती मॅडमनी औषधें दिली. त्या औषधांच्या प्रभावाने सरांना झोप लागली.
मालती मॅडम आई वडिलांबरोबर दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपल्या.
सर्वांना गाढ झोप लागली होती.
मालती मॅडमना एक स्वप्न पडले -
बेडरूमचे दार उघडून विजय सर आत आले. त्यांनी आपल्या दोन हातांनी मालती मॅडमचा गळा दाबायला सुरुवात केली. मालती मॅडम ओरडू लागल्या. त्या आवाजाने सर्वजण जागे झाले. विजय सर देखील काय गोंधळ आहे ते बघायला धावत आले. मालती मॅडमना अर्धवट जाग आली होती. पण अजूनही कोणीतरी त्यांचा गळा दाबत आहे असे त्यांना वाटत होते.
विजय सरांनी पटकन मॅडमच्या डोक्यावर हात ठेवला व काहीतरी पुटपुटले.
काही क्षणात मॅडमना असे जाणवले, कि त्यांच्या गळ्याभोवतीची पक्कड सुटली आहे.
आईने पाणी आणून मालतीला पाजले.
विजय सरांनी कोणतेतरी देवाचे स्तोत्र म्हणून अंगारा केला व तो घरातील सर्वांच्या लावला.
देवावर विशेष श्रद्धा नसणारे विजय सर असे काय वागत आहेत, हे घरातील कुणाला कळेनासे झाले.
परत सर्व शांत झोपी गेले.
दिवस सातवा
शुक्रवार उजाडला. आज खरेतर मॅडमचे आई वडील घरी परत जाणार होते. पण रात्रीच्या प्रकारामुळे त्यांनी तेथेच काही दिवस रहायचे ठरवले. बर वाटत असल्यामुळे मालती मॅडम कॉलेजला गेल्या.
मधली सुट्टी झाली.
मालती मॅडम - अजय चल कॅंटीनमध्ये जाऊ.
अजय - थांबा मॅडम, पटकन स्वातीला सांगून येतो.
( नाहीतर परत कटकट करेल - अजय हळूच पुटपुटला.)
मालती मॅडम - काय रे?
अजय - काही नाही, जरा २ मिनिटांचे काम आहे.
असे सांगून अजय तेथून गेला.
तो काय पुटपुटला ते मालती मॅडमच्या तिखट कानांना ऐकू गेले.
५ मिनिटांत अजय परत आला.
दोघेजण कँटीनला गेले. नाश्त्याला पनीर मिसळ पाव मागवला.
मालती मॅडम - काल दुपारी माझे आई बाबा आले.
अजय - मॅडम सर कसे आहेत. खरं म्हणजे काल मी येणार होतो, पण आम्ही दोघे...
अजयने वाक्य अर्धवट ठेवले व विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागला.
अजय - म्हणजे मला जरा जावे लागले.
मालती मॅडम - कुठे?
अजय (थाप मारायचा प्रयत्न करून ) - ते मी बाजारात गेलो होतो.
मालती मॅडम - काय आणलेस बाजारातून विकत?
आता अजयला काय बोलावे ते सुचेना.
मालती मॅडम - अरे किती लाजशील? काल मुव्ही बघायला गेला होतास ना?
अजय (आश्चर्याने) - तुम्हाला कसे कळले?
मालती मॅडम - सुवर्णा बोलली.
अजय - अरे बापरे त्यांना कोणी सांगितले?
मालती मॅडम - अरे पुरुष असून इतका लाजतोस? स्वातीनेच सुवर्णाला सांगितले. ती इतकी बिनदास्त आहे, आणि तू असा कसा?
अजय (खाली मान घालून) - हो.
मालती मॅडम (हसत) - तसा मला सहलीला गेल्यावर थोडा अंदाज आलाच, पण म्हटलं तुझ्या तोंडून ऐकावं.
कीप इट अप.
अजय - ते जाऊ दे मॅडम, पण सरांची तब्येत कशी आहे?
मालती मॅडम - सर ठीक आहेत. पण मी खूप गोंधळून गेले आहे. मला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. पण इथे नको. आज संध्याकाळी आपण भेटूया का?
अजय - ठीक आहे मॅडम. आपण हॉटेल "स्वादिष्ट" येथे भेटू. आज संध्याकाळी ६ वाजता.
तोपर्यंत मधली सुट्टी संपली. दोघेही आपापली लेक्चर घ्यायला निघून गेले.
कॉलेज सुटल्यावर, अजय व स्वाती भेटतात.
अजय - ग्रेट आहेस, अजून दवंडी पिट.
स्वाती - का रे काय झाले?
अजय - मालती मॅडमना सुवर्णा मॅडमनी सांगितले, कि आपण मुव्ही बघायला गेलो होतो.
स्वाती - मग त्यात काय? मित्र मैत्रिणी नाही जात का मुव्ही बघायला?
अजय - तस नाही ग, पण मॅडमना आपल्यातील कळलंय .
स्वाती - अरे प्रेम केलं तर घाबरायचं काय? आज ना उद्या कळणारच. मी सर्वांना ओरडून सांगेन कि माझे अजयवर प्रेम आहे.
अजय - ए बाई शांत हो. आधी घरच्यांची परवानगी मिळवा, मग बोंबला.
स्वाती - ती तर मिळणारच, एवढा चांगला जावई व एवढी चांगली सून कोणाला नको आहे?
अजय - बर ते जाऊ दे. आज संध्यकाळी मी आणि मालती मॅडम हॉटेल "स्वादिष्ट " येथे भेटणार आहोत. त्या काहीतरी महत्वाचे सांगणार आहेत.
नंतर स्वाती व अजय बाय करून आपापल्या घरी गेले.
मालती मॅडम दुपारी घरी आल्या. आईने सर्व स्वयंपाक करून ठेवला होता. आज आईने कांद्याची खेकडा भजी केली होती (खेकडा भजी म्हणजे कांदा उभा चिरून केलेली भजी ). मालती मॅडमच्या आईचे माहेर कोकणातील त्यामुळे हा प्रकार त्यांना माहित. सर्वजण जेवायला बसले.
विजय - आई, भजी खूप छान झाली आहेत. माझी आई अशीच भजी बनवते. तिचे माहेर पण कोकणातीलच ना.
मालती - अहो काहीतरीच काय बोलता? सासूबाईंचे माहेर घाटावर ना? आणि त्या कुठे अशी भजी बनवतात.
पूर्वी त्या आलेल्या असताना मी अशी भजी बनवली होती. फार आवडली होती त्यांना. तेव्हा त्याच म्हणाल्या कि अशी भजी आमच्या गावाकडे नाही बनवत.
विजय सरांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते शांतपणे जेवू लागले.
जेवण झाल्यावर आई बाबा झोपले.
मालती मॅडमनी विजय सरांना औषध दिले.
विजय - मालती मी कोण आहे?
मालती - अहो असे काय विचारता? तुम्ही विजय आहात .
विजय - नाही मी विजय नाही. ते मालती मॅडमना काहीतरी सांगायचं प्रयत्न करत होते, पण त्यांना ते जमत नव्हते. त्यांना त्रास होऊ लागला व ते झोपले.
दुपारी ३:३० ला मॅडमनी सरांना उठवले. आज डॉक्टरांनी बोलावले होते. सर नकोच म्हणत होते.
आई बाबांना सांगून दोघेजण डॉक्टरांकडे गेले.
४ वाजता डॉक्टर क्लिनिकमध्ये आले. विजय सरांचा पहिलाच नंबर होता.
डॉक्टर - या सर, कस वाटतंय आता.
विजय सर - ठीक आहे.
डॉक्टरांनी सरांना तपासले आणि बाहेर बसायला सांगितले.
डॉक्टर - मॅडम, मला हा मानसिक आजार वाटत आहे. विजय सर स्वतःलाच विसरलेत व काहीतरी कल्पना करत आहेत. यांना मानसोपचार तज्ञाना दाखवावे लागेल. माझ्या ओळखीत एक आहेत. उद्या तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या.
डॉक्टरांनी मॅडमकडे एक मोबाईल नंबर दिला.
मालती मॅडम - मला तर खूप टेन्शन आलं आहे. यांना बर वाटेल ना?
डॉक्टर - काळजी करू नका. बाकी ते व्यवस्थित आहेत.
मॅडमनी डॉक्टरांची फी दिली व त्या बाहेर आल्या.
नंतर विजय सर व मॅडम घरी येतात.
संध्याकाळी ६ वाजता, अजय सर व मालती मॅडम हॉटेल "स्वादिष्ट" मध्ये भेटतात. बाहेर लॉनमध्ये एका साईडच्या टेबलावर दोघे बसले.
अजय - मॅडम काय मागवू? मसाला डोसा चालेल का?
मॅडम - अरे तू कशाला मागवतोस? मी तुला बोलावले आहे?
अजय - मॅडम फॉर्मॅलिटी नको. मी मसाला डोसा मागवतो.
अजयने ऑर्डर दिली.
मॅडम काय झाले ते सर्व सांगा. मी तुम्हाला सर्वप्रकारे मदत करीन. अजय म्हणाला.
मॅडम - काय खरं, काय खोटं ते मला कळेनासे झाले आहे. पण सर्व विचित्र आणि भयानक आहे. जे मी आई बाबांना सांगू शकत नाही. कारण या वयात त्यांना त्रास होईल.
अजय - मॅडम सांगा. जे असेल ते सर्व सांगा.
मॅडम - आपण सहलीला गेल्यावर रात्री माझ्यावर हल्ला करून मला इंजेक्शन दिले, ते कोणी दिले ते मला माहित आहे , म्हणजे ९५% तरी कॉन्फिडन्स आहे.
अजय - काय? मग तुम्ही तसे पोलिसांना का नाही सांगितले त्या दिवशी?
मॅडम - कारण त्या व्यक्तीच्या चांगल्या वागण्यामुळे मला प्रश्न पडला, कि खरंच हिच ती व्यक्ती होती?
अजय - मॅडम, कोड्यात बोलू नका. काय झाले ते सर्व सांगा.
मॅडम - त्या रात्री माझ्यावर विजय सरांनी हल्ला केला. पण काळा रुमाल तोंडाला बांधला असल्यामुळे मी त्यांचा चेहरा नीट बघू शकले नाही. पण डोळे ओळखीचे होते. बाकी हालचाली त्यांच्याच होत्या. मी माझ्या नवऱ्याला ओळखू शकणार नाही का?
अजय (आश्चर्याने) - काय सांगताय?
मॅडम - माझे तोंड दाबून, त्यांनी मला इंजेक्शन दिले. नंतर ते पळून गेले. देवाच्या कृपेने शॉर्ट सर्किट झाले, त्यामुळे तुम्ही लोक माझ्या रूममध्ये आलात. नाहीतर माझा मृत्यू नक्की होता.
अजय - मग तुम्ही हे सर्व आम्हाला का नाही सांगितले?
तोपर्यंत मसाला डोसा आला.
दोघांनी खायला सुरुवात केली.
मॅडम - अरे, कधी सांगणार? एकतर मी बेशुद्ध होते. नंतर शुद्धीवर आल्यावर कळले, कि विजय सरांना साप चावला आहे. मी हल्लेखोराचा चेहरा नीट बघितला नव्हता आणि यांची अशी अवस्था बघून मी गोंधळले.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आपण लॉजवर आलो. गाडीतून उतरताना माझ्यावर बैलाने दोनवेळा हल्ला केला. दोन्हीवेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून विजय सरांनी मला वाचवले.
जो माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवतो, तो मला मारायचा प्रयत्न कसा करेल?
अजय - मॅडम तुम्ही म्हणता ते खरे आहे. पण तुम्ही भोळ्या आहात . आपला प्लॅन फेल झाला, आता आपण पकडले जाऊ या भीतीने सर असे करत नसतील ना?
मॅडम - अरे पण त्यांना खरा विषारी साप चावला होता. यात काही नाटक असणे शक्यच नाही.
अजय - ते कदाचित खरे असेल, पण मला वाटते, एक तर सर त्या दुसऱ्या मॅडमच्या प्रेमात पडले होते. तुम्ही त्यांना डिवोर्स देत नव्हता व लाईनवर आणायचा प्रयत्न करत होतात. प्रेमात माणूस वेडा होतो. त्यामुळेच ते तुम्हाला संपवण्याच्या प्रयत्नात आहेत.
पण तुम्ही वाचल्यामुळे ते चांगुलपणाचा आव आणत आहेत. बाकीची न आठवणे हि सर्व नाटके आहेत.
मॅडम - अरे पण दुसरा प्रकार ऐक.
मॅडमनी काल रात्रीचे स्वप्न, तसेच स्वप्नातून बाहेर आल्यावर देखील गळा दाबल्यासारखे वाटले ते आणि विजय सरांनी काहीतरी मंत्र म्हणून कसे वाचवले ते सर्व अजयला सांगितले.
अजय - मी पण आता चक्रावून गेलो आहे. पण तुमच्या जीवाला धोका आहे. अजून काही दिवस तरी तुमच्या आई बाबांना परत जाऊ देऊ नका.
सर अजून काही विशेष बोलले का?
मॅडम - अरे सध्या ते जे काही करत आहेत त्यामुळे मीच काय पण माझे आई बाबा पण गोंधळले आहेत.
ते स्वतःच्या भावाला ओळखत नाहीत, पण माझ्या आई वडिलांना ओळखतात.
त्यांना माझे माहेर फणसवलीची, माहिती अचानक कशी झाली. माझ्या आई बाबांशी ते फणसवलीविषयी फार आत्मीयतेने बोलत होते. आमच्या गावातील अविनाश अग्निपुत्रे त्यांचा मित्र असे ते सांगत होते.
पण काय संबंध? तो माझ्या बॅचला होता. तशी मी पण त्याला फार काही ओळखत नाही.
अजय - एक अंधुक मार्ग दिसत आहे. उद्या शनिवारी कॉलेज सुटल्यावर मी फणसवलीला जातो आणि बघतो काही मार्ग सापडतो का?
मॅडम - अरे तुला उगाच त्रास.
अजय - मॅडम, तुमच्यासाठी मी एवढे नक्कीच करू शकतो.
मॅडम - मग फणसवलीला गेल्यावर आमच्या घरी रहा. माझा दादा - वहिनी घरी आहेत. मी त्यांना सांगेन कि तू कॉलेजच्या एका कामासाठी तिकडे जात आहेस.
मला उद्या यांना घेऊन मानसोपचार तज्ञांकडे जायचे आहे.
मॅडमनी माहेरचा पत्ता, मोबाईल नंबर अजयला सेंड केला.
मसाला डोसा खाऊन झाल्यामुळे वेटरने येऊन चहा कॉफी विचारले?
मॅडम - २ कप कॉफी . अजय चालेल ना?
अजय - हो.
५ मिनिटांत कॉफी आली.
दोघांनी गप्पा मारत कॉफी प्यायली.
मॅडम - अजय बेस्ट ऑफ लक .
अजय - थँक यु.
दोघेजण नंतर घरी निघून गेले.
रात्री अजय व स्वातीचे ऑनलाईन चॅटिंग सुरु झाले.
अजय - उद्या कॉलेज सुटल्यावर फणसवलीला जातोय.
स्वाती - काय?
अजय - खरच , मालती मॅडमचे काम आहे. पण कॉलेजमध्ये कुणाला बोलू नकोस.
स्वाती - मी पण येणार तुझ्याबरोबर.
अजय - वेड लागलंय का? मी तिकडे मॅडमच्या घरी रहाणार आहे. लोक काय म्हणतील? कॉलेजचे काम आहे असे मॅडमच्या घरी सांगायचे आहे.
स्वाती - मी पण त्याच कॉलेजात शिकवते. त्यामुळे आम्हाला दोघांना कॉलेजने पाठवले. असे सांगायचे. त्यात काय? घरी वहिनी आहेत ना मॅडमच्या? मग काय प्रॉब्लेम?
अजय - नाही तरी नको.
स्वाती - नवऱ्याबरोबर जायला काय हरकत?
(बरोबर स्माईल सेंड.)
अजय - अग अजून आपले लग्न कुठे झाले आहे? आणि घरच्यांना कुठे सांगितले आहे?
माझे आई बाबा आरवलीला रहातात. त्यांना अजून मी काही सांगितले नाही आहे.
( आरवली फणसपूरच्या व महामुंबईच्या जवळचे एक छोटे शहर होते.)
स्वाती - मी माझ्या आई बाबांशी आजच बोलले.
(स्वाती महामुंबईतच आई वडिलांबरोबर राहायची.)
अजय - एवढ्या लवकर?
स्वाती - तुला माझ्या आई वडिलांनी कधीच पसंत केलं आहे. कामानिमित्त तुझे माझ्याकडे येणे व्हायचे ना तेव्हा. फक्त त्यांनी मला विचारले नव्हते. माझ्या मनात काय आहे ते त्यांना जाणून घ्यायचे होते.
अजय - म्हणजे ५०% काम झाले.
स्वाती - पण उद्या मी येणार. आई बाबा देतील परवानगी, मॅडमच्या घरी जायचंय म्हणून. ते मॅडमना चांगलं ओळखतात.
शेवटी अजयने हार मानली.
अजय - ओके, गुड नाईट
स्वाती - दॅट्स लाईक ए गुड बॉय. गुड नाईट.
दिवस आठवा
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये अजय व स्वाती दोघेजण मालती मॅडमना भेटले. आम्ही दोघेजण जाणार असल्याचे त्यांना सांगितले.
मॅडम हसत म्हणाल्या, हे बर आहे, माझे काम आहे या कारणावर तुम्ही फिरून घेणार. जा अवश्य जा. माझा दादा व वहिनी दोघे चांगले आहेत.
कॉलेज सुटल्यावर अजय व स्वाती घरी गेले.
स्वातीने सकाळीच आई बाबांची परवानगी घेतली होती.
जेवण झाल्यावर दोघांनी पटापट बॅग भरली.
दुपारी ३:४५ ला एस. टी. स्टॅण्डवर पोहोचायचे ठरले होते. ४ वाजता फणसवलीला जायला ए. सी. बस होती.
दोघेजण वेळेवर एस. टी. स्टॅण्डवर पोहोचले. आज आपण दोघेच प्रवास करणार या कल्पनेने दोघांना वेगळेच फिलिंग आले होते.
बस वेळेत आली. गर्दी फार नव्हती. २ × २ च्या एका सीटवर दोघेजण बसली.
प्रवास सुरु झाला. फणसवली १ तासाच्या अंतरावर होते.
स्वाती विंडो सीट जवळ बसली होती. दोघांच्या गप्पा छान रंगल्या. मालती मॅडमनी अजयला जे सांगितले होते, ते त्याने स्वातीला सर्व सांगितले.
हे सर्व ऐकून स्वाती अचंबित झाली.
म्हणजे आता आपल्याला अविनाश अग्निपुत्रेंना भेटावे लागेल तर, स्वातीने विचारले.
होय, अजय उत्तरला.
बस ५ वाजेपर्यन्त फणसवलीला पोहोचली.
दोघेजण रिक्षा करून मालती मॅडमच्या माहेरी पोहोचले.
दादा वहिनींनी दोघांचे स्वागत केले.
वहिनींनी आलं घालून चहा केला. थोड्या गप्पा झाल्यावर, अजयने सांगितले कि आम्ही आमचे थोडे काम करून परत येतो. दादा वहिनींनी सांगितले कि उशीर झाला तरी रात्री जेवायला या व आज येथेच वस्ती करा. होकार देऊन अजय व स्वाती बाहेर पडले.
मालती मॅडमना अविनाशचे हॉटेल माहित होते. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर दोघेजण पोहोचले.
अविनाश अग्निपुत्रेंचे हॉटेल मोठे होते.
नमस्कार आम्हाला अविनाश अग्निपुत्रेंना भेटायचे आहे - अजयने काउंटरवर सांगितले.
मीच तो, बोला काय काम आहे? - काउंटरवरील व्यक्ती उत्तरली.
अजय - तुमच्या बॅचच्या मालती फणसे मॅडमकडून आम्ही आलो आहोत. आम्हाला तुमच्याशी खाजगी बोलायचे आहे.
अविनाश - ओह, म्हणजे महामुंबईला असते तीच ना मालती? आम्ही कॉलेजला एकाच बॅचला होतो.
अजय - हो, त्याच. त्या आम्हाला सिनिअर आहेत.
अविनाशने त्यांच्या एका माणसाला काउंटरवर बसवले आणि या दोघांना घेऊन तो वरच्या एका रूमवर गेला. जाताना चहा नाश्ता वर पाठव असे एका वेटरला सांगून गेला.
वरची रूम अविनाशने स्वतःसाठी ठेवली होती.
हॉटेल फक्त ग्राउंड फ्लोअरला होते.
अविनाश - या सर मॅडम, बसा.
प्रथम अजय व स्वातीने आपापला परिचय दिला.
नंतर -
अजय - तुम्ही मालती मॅडमचे मिस्टर विजय काळे सर याना ओळखता का?
अविनाश - नाही. त्यांच्याशी माझा कधीच संपर्क आलेला नाही. आमचे शिक्षण संपल्यावर मालती देखील कधी मला भेटली नाही.
अजय - हा फोटो बघा. बघा ओळखीचा वाटतो का?
अजयने विजय सरांचा फोटो मोबाईलवरून दाखवला.
अविनाश ( नीट बघून ) - कोण आहेत हे? मी यांना कधीच भेटलो नाही. तुम्ही हा फोटो मला का दाखवता आहात ?
स्वाती - हे विजय सर आहेत आणि त्यांचे असे म्हणणे आहे कि तुम्ही त्यांचे खास मित्र आहात.
अविनाश - कस शक्य आहे? हि काय भानगड आहे?
अजय - हे कोडे सोडवण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत.
तेवढ्यात वेटर ३ प्लेट इडली सांबर घेऊन येतो व
प्रत्येकाच्या समोर टेबलावर ठेवतो.
अजय - सर याची काय गरज होती?
अविनाश - नाही कसे, तुम्ही माझे खास पाहुणे आहात .
सर्वांनी खायला सुरुवात केली.
नंतर अजयने सहलीपासून ते आत्तापर्यंतचा प्रकार थोडक्यात सांगितला. फक्त विजय सरांवर असलेला संशय सांगितला नाही.
अविनाश - तुम्ही जे सांगतंय ते अचंबित करणारे आहे. मालती आमच्या क्लोज ग्रुप मध्ये नसली, तरी आमच्या बॅचला होती. सबमिशन पूर्ण करायला तिने बऱ्याच वेळा आम्हाला सर्वांना मदत केली आहे. त्यामुळे मला शक्य तेवढी सर्व मदत मी करेन.
आमच्या ग्रुपमधील प्रतोद साने तिचा चांगला मित्र होता.
मालती व प्रतोद हे आमच्या बॅचमधील टॉपर.
एखादी फाईल पूर्ण करण्यात अडचण आली, तर प्रतोद व मालती एकमेकांना मदत करीत. मग पूर्ण क्लास ची फाईल पूर्ण होई.
पण बिचारा ...
अविनाशच्या डोळ्यात पाणी आले.
स्वाती - सांभाळा सर, काय झाले? प्रतोदचे नाव घेतल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी का आले?
अविनाश - आम्ही सर्व एम. एस . सी. पर्यंत एकत्र होतो. मालतीने पि एच डी येथेच केली. प्रतोद पि एच डी ला बाहेर गेला. नंतर तो अरवलीच्या एका कॉलेजात प्रोफेसर म्हणून लागला. तो माझा लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळे आमचा नेहमी कॉन्टॅक्ट असे.
पण ३ वर्षांपूर्वी तो " नदीपुरला " कॉलेजच्या सहलीला गेला. तेथे समुद्रात बुडणाऱ्या त्याच्या विद्यार्थिनीचे प्राण वाचवताना त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या आई वडिलांना धक्का बसला. आता ते आरवलीतच त्यांच्या धाकट्या मुलाबरोबर रहातात.
अजय - काय सांगताय काय? हि अशी लिंक लागेल असे वाटले नव्हते. आम्हाला तेथील गावकरी बोलले होते. पण नाव वगैरे कळले नव्हते.
पण अजून तुमच्याशी विजय सरांचा काय संबंध ते कळले नाही.
तेव्हड्यात वेटरने ३ प्लेट भरून भजी आणली.
स्वाती - अहो सर खाणे पुरे आता. इडली सांबार मस्तच होते आणि पोटदेखील भरले.
अविनाश (आग्रहाने) - अहो हि खेकडा भजी , आमची स्पेशालिटी. पूर्ण फणसवलीत कुठल्याच हॉटेलात तुम्हाला अशी खेकडा भजी खायला मिळणार नाहीत. घ्या खरच घ्या.
प्रतोदची आई कोकणातली. ती नेहमी अशी भजी करायची. मला हि भजी जाम आवडतात. मला माझ्या वडिलांच्या हॉटेल व्यवसायात इंटरेस्ट असल्यामुळे मी गेली काही वर्षे स्वतः हॉटेल चालवतो. मी मुद्दाम प्रतोदच्या आईकडून हि भजी शिकून घेतली.
अजय व स्वातीने खेकडा भजी नाव ऐकले आणि ते उडाले.
अजयने काल विजय सर खेकडा भज्यांबद्दल जे काही बोलले ते सांगितले.
अविनाश - म्हणजे आता विजय सरांचा संबंध थेट प्रतोदच्या आईशी लागतो असे तर तुम्हाला नाही ना वाटत?
भजी खाताना स्वातीने सांगितले कि हे सर्व विचित्र आहे, पण मला आता यात वेगळाच संशय येतो आहे. आपल्याला प्रतोद सरांच्या आईला भेटायला हवं.
कारण हा सर्व योगायोग म्हणून सोडून देणे मला योग्य वाटत नाही.
अजय - एक गोष्ट चांगली आहे, कि त्या माझ्याच गावाला म्हणजे आरवलीला रहातात. पण आपण त्यांना कोणते कारण सांगून भेटूया?
स्वाती - हो ते पण खरेच आहे.
अविनाश - प्रतोदचे वडील संस्कृत शिक्षक होते. आता ते रिटायर आहेत. पण संस्कृत विषयाच्या अभ्यासात काही अडचणी आल्यास ते अजूनही विद्यार्थ्यांना मदत करतात.
वडिलांमुळे प्रतोदचे संस्कृतदेखील चांगले होते. त्याला त्यामुळे सर्व स्तोत्र, मंत्र ठाऊक होते. पण आता काय उपयोग? त्याच्या फक्त आठवणी राहिल्या आहेत.
अविनाशला रडू येऊ लागले.
रडता रडता तो स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आणि जे बोलायची इच्छा नव्हती ते बोलून बसला -
सर्व काही ठीक झाले असते तर आज प्रतोद आणि मालती सुखाने संसार करू शकले असते.
आता हि काय नवीन भानगड म्हणून अजय आणि स्वाती एकमेकांकडे डोळे विस्फारून पाहू लागले.
प्रश्न सुटायची ऐवजी अजून गुंतत चालले होते.
अजय - सर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
अविनाश - काही नाही. मी वेड्यासारखा बोललो. त्या मालतीच्या संसारात त्यामुळे मिठाचा खडा पडायला नको.
अजय - सर, आम्ही विजय सरांना काहीदेखील सांगणार नाही. पण तुम्ही विषय अर्धवट सोडू नका. प्रतोद सर आणि मालती मॅडमचे काय ते सांगा.
बराच आग्रह धरल्यामुळे अविनाश सर सांगू लागले -
मालतीचे माहेर भरपूर श्रीमंत होते. तिला कशाचीच कमी नव्हती.
आम्ही सर्वजण बरेच वर्ष एकाच बॅचला होतो.
मालतीचे प्रतोदवर प्रेम होते. एम.एस.सी. च्या शेवटच्या वर्षाला असताना तिनेच त्याला प्रपोज केले होते.
प्रतोदचे पण मालतीवर प्रेम होते. ते आम्हा मित्रांना माहित होते. पण तो तसे दर्शवत नव्हता.
कारण मुळात प्रतोदची घरची परिस्थिती मध्यम वर्गीय होती. त्याला त्याचे करिअर करायचे होते. चांगली नोकरी करायची होती. प्रेम वगैरे कथा कादंबरीतच बरे, संसार करताना या श्रीमंत मुलींची हौस मौज गरीब नवरा कशी पुरवणार? असे प्रतोदला वाटे. निदान व्यवस्थित सेटल होईपर्यंत तरी तो या भानगडीत पडू इच्छित नव्हता.
त्यामुळे माझ्या मनात तसे काही नाही - असे सांगून हा गडी मोकळा झाला.
त्यानंतर मालती खूप रडली. तिच्या मैत्रिणींनी तिला खूप समजावले. एवढेच नाही तर आम्ही सर्वानी प्रतोदला समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ.
पुढे प्रतोद पि एच डी करायला दुसरीकडे गेला. नंतर मालतीदेखील हळूहळू त्याला विसरली.
बोलता बोलता खेकडा भजी संपली. तोपर्यंत मसाला चहा आला. तिघेजण चहा प्यायले.
एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन झाले. अजयने मालती मॅडमचा मोबाईल नंबरदेखील अविनाशला दिला.
तिघांनी सेल्फी काढला.
अविनाश - आता तुमच्या विजय सरांना मला भेटावेच लागेल. ते मला कसे काय ओळखतात याची मला उत्सुकता लागली आहे.
अविनाशचा निरोप घेऊन दोघे निघाले. रात्रीचे आठ वाजले होते.
अजय व स्वाती दादा वहिनींकडे पोहोचले.
दादा वहिनी त्यांचीच वाट बघत होते. त्यांना या सर्व प्रकारबद्दल माहित नव्हते. फक्त सहलीला घडलेला प्रकार व आता विजयरावांना नीट काही आठवत नाही याबद्दल त्यांना आई बाबांकडून कळले होते.
थोडा वेळ गप्पा व टी . व्ही. बघून झाल्यावर रात्री ९ वाजता वहिनींनी जेवणाची ताटे वाढली.
अजय आणि स्वातीला भूक नव्हती, पण बळेच थोडे जेवावे लागले.
उद्या सकाळी आम्ही दोघे लवकर निघणार असल्याचे अजयने दादांना सांगितले.
उद्या रविवारची सुट्टीच आहे ना? मग रहा असा आग्रह दादा वहिनींनी केला.
पण उद्या मला माझ्या घरी आरवलीला जायचे आहे सांगितल्यावर दादा वहिनींनी मान्यता दिली.
अजय स्वातीला झोपायला वेगवेगळ्या बेडरूम दिल्या.
सकाळी कॉलेज व नंतरची प्रवासाची दगदग यामुळे दोघांना लवकर झोप लागली.
दिवस नववा
रविवार उजाडला. अजय स्वाती सकाळी ७ वाजेपर्यंत उठले.
वहिनींनी चहा नाश्ता केलाच होता.
सर्व आटोपून अजय स्वातीने दादा वहिनींचा निरोप घेतला. मालती मॅडमकडे आल्यावर आमच्याकडे नक्की या असे अजय स्वातीने सांगितले. दादा वहिनींनीदेखील दोघांना असेच परत एखाद्या वीक एंडला नक्की
या म्हणून सांगितले.
सकाळी साडे आठ वाजेपर्यंत दोघे एस. टी . स्टॅण्डवर पोहोचले. नुकतीच १ ए.सी. बस लागली होती. दोघे लगबगीने आत शिरले. २ × २ सीटवर जागा मिळाली. बसेस बऱ्याच असल्याने फार गर्दी नव्हती.
बस लगेच सुटली.
आज देखील विन्डोला स्वातीचं बसली होती.
अजय - आता मी आई बाबांना तुझी ओळख काय करून देऊ. ते तर म्हणतील डायरेक मुलगी आणून उभी केलीस. हे त्या प्रतोद सरांकडे जायचे नसते, तर आरवलीचा बेत माझ्या प्लॅनींग मध्ये नव्हता.
स्वाती मात्र आपल्या होणाऱ्या सासरी जायचे म्हणून खुश होती.
स्वाती - अजय, आपल्याला या प्रकरणात माझ्या बाबांची मदत घ्यावी लागेल असं मला वाटतंय.
अजय (घाबरून ) - आता कसलं प्रकरण? तुझ्या आई बाबांनी आपल्या लग्नाला संमती दिली आहे ना?
स्वाती (हसत) - अरे वेड्या घाबरतोस काय? मी आपल्या प्रकरणाबद्दल नाही बोलत आहे.
अजय - मग आता अजून कोणी काय प्रकरण केले?
स्वाती - मी विजय सर व प्रतोद सरांबद्दल बोलत आहे.
अजय - त्यांचा तुझ्या बाबांशी काय संबंध?
स्वाती - अरे माझे बाबा आध्यत्मिक क्षेत्रातील आहेत. ध्यानधारणा वगैरे ते बरीच वर्षे करत आहेत. हे प्रकरण साधे नाही असे मला कालपासून वाटू लागले आहे.
अजय - ते कसे?
स्वाती - प्रतोद सरांचा मृत्यू ३ वर्षांपूर्वी " नदीपुरच्या " समुद्रात झाला. कसा? तर एका मुलीला वाचवताना.
अरे आपल्या येथील एक मुलगा देखील तेथेच मरता मरता वाचला. तो सुद्धा म्हणत होता कि कोणीतरी त्याला लाटेबरोबर किनाऱ्यावर ढकलले.
अजय (हसत) - मग तुला काय म्हणायचंय प्रतोद सरांनी येऊन त्याला वाचवले?
स्वाती - तू माझे पूर्ण बोलणे एक पाहू.
अजय - सांग.
स्वाती - नंतर रात्री मालती मॅडमवर हल्ला झाला. पण शॉर्ट सर्किट झाले आणि सर्वजण जागे झाले. त्यामुळे त्या वाचल्या. त्यांना हल्लेखोर विजय सर वाटत होते.
त्याच रात्री विजय सरांना केवड्याच्या बनात साप चावला. ते वाचण्याची शक्यता खूप कमी होती, कारण साधारण रात्री अडीच ते ३ वाजता साप चावला. पोलिसांनी शोध घेईपर्यन्त म्हणजे सकाळी ६ वाजेपर्यंत ते तिथेच पडून होते. त्यानंतर उपचार सुरु होऊन ते वाचले. म्हणजे उपचारांना इतका लेट होऊनदेखील ते कसे वाचले?
शुद्धीवर आल्यावर ते मालती मॅडम व्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हते. तसेच त्यांच्या स्वभावात खूप बदल झालाय. मॅडमवर हल्ला करणारेच आता त्यांना पदोपदी
वाचवत आहेत.
मला त्यामुळे राहून राहून परकाया प्रवेशाचा धोका वाटत आहे.
अजय - अग बाई, तू सायन्स ची प्राध्यापिका आहेस. हि असली अक्कल पाजळु नकोस.
स्वाती - सर्वच गोष्टींकडे सायन्सच्या रुल ने बघायचे नसते. तुला थोड्याच वेळात पटेल. म्हणजे मी म्हणते अगदी तसेच असेल असं नाही, पण थोडंफार असच आहे.
थोड्याच वेळात बस आरवलीला पोहोचली.
अजय व स्वाती बसमधून उतरतात.
दोघेही रिक्षाने अजयच्या घरी जातात.
अजयची धाकटी बहीण दार उघडते.
दादा आज अचानक तू कसा काय ? बहिण विचारते.
अग फणसवलीला काम होते म्हणून आलो होतो.
अजय - ये स्वाती आत ये.
स्वाती देखील आत येते.
अजयची बहिण स्वातीला बघून - या बसा.
बहिण अजय व स्वातीसाठी पाणी आणते.
अजयचे बाबा व आई आतल्या रुममधुन बाहेर येतात.
दोघेजण विचारतात कि आज अचानक कसा?
अजय - फणसवलीला काम होते, तिकडुन इकडे आलो.
स्वाती पुढे होऊन आई वडिलांच्या पाया पडते.
अजय - हि स्वाती, हि देखील शारदा कॉलेजला प्राध्यपिका आहे.
आई - तुझे गाव कोणते?
स्वाती - मी महामुंबईचीच.
बाबा - तुझ्या घरी कोण असते?
स्वाती - माझे आई बाबा.
बाबा - तू कोणता सब्जेक्ट शिकवतेस?
स्वाती - मी फिजिक्स शिकवते.
गप्पा होत रहातात.
तोपर्यँत आई कांदे पोहे करायला आत जाते.
बहीण खुणेने अजयला किचनमध्ये बोलावते.
बहीण - दादा वाहिनी पसंत आहे बर मला.
आई - चित्रा गप्प बैस. काहीतरीच बोलू नको. तिने ऐकले तर काय वाटेल तिला.
बहीण (हसत) - मला आपलं वाटलं. म्हणजे दादाने स्वाती मॅडम बरोबर नदीपुरला काढलेले फोटो पूजा करायला काढलेत. काय दादा?
अजय (मनात) - कुठे माती खाल्ली, आणि आमचे फोटो सोशल साईटवर ठेवले. माझ्या लक्षातच नाही कि चित्रा मला फ्रेंड लिस्ट मध्ये ऍड आहे. पण मी सर्व स्टाफ बरोबर फोटो काढलेत. मग हि काय पचकते ?
अजय - ए चित्रा काय डोक्यावर नाही ना पडलीस? आमचा सर्व स्टाफ आहे माझ्या फोटोमध्ये.
बहिण ( चित्रा ) - आणि तुझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर आहेत त्या देवी कोण?
अजय (जीन्स पॅन्टचा खिसा चाचपडत) - आई हिला माझा मोबाईल द्यायला सांग.
माझा अनलॉक कोड कसा टाकलास?
चित्रा (ठेंगा दाखवत) - मला माहित आहे.
चित्रा आईला मोबाईल दाखवते.
आई (हसत ) - हे रे काय? मला माझ्या पसंतीची सून घरात आणायची होती. पण आता काय करणार?
आई अजयच्या पाठीत धपाटा घालते.
आई - जेव्हा स्वातीने आम्हाला आई बाबा म्हणून व डोक्यावर ओढणी घेऊन नमस्कार केला तेव्हाच आम्हाला संशय आला होता. बाबांनी डोळ्यांनी मला इशारा पण केला होता. पण आम्ही थोडं थांबलो. लगेच कसे विचारणार?
अजय खाली मान घालून उभा राहिला. काय बोलावे ते त्याला सुचेना. त्याने एवढ्यात हे सर्व घरी सांगायचे प्लॅनिंग केले नव्हते.
आई हसतच बाहेर जाऊन - अहो, तुमचा अंदाज खरा ठरला बर . आपली सुनबाई आज घरी आली आहे.
बाबा - काय सांगतेस? अजय काँग्रॅजुलेशन . आम्हाला वाटले हा काय आता दिवे लावणार? कारण कॉलेजला शिकताना नाही ना लावले दिवे. आता आम्हालाच पायपीट करावी लागणार.
स्वाती - अहो आई बाबा तरी याने मान्य करायला २ वर्षे घेतली.
अजय - अग , तुला काही लाज वगैरे वाटते कि नाही? मुलगी असून तू असं ....
बाबा - बोल बोल, अरे गधड्या मुलगी असून ती लाजत नाही, आणि तू का एवढा लाजतोस?
अजय - नाही , म्हणजे मला भीती वाटत होती.
आई - शहाण्या, प्रेमात पडताना नाही विचार केलास?
अजय - जाऊ दे ना आता.
बाबा - पण स्वाती, तुझ्या घरच्यांचे काय?
स्वाती - अहो बाबा, माझ्या आई बाबांनी याला कधीच पसंत केलाय. मी सांगायच्या आधी.
आई - अहो, आता आपल्याला हिच्या घरी जाऊन पुढची बोलणी करायला हवीत.
तोपर्यंत चित्रा कांदे पोहे घेऊन येते.
चित्रा - दादा कांदे पोहे घेऊन जा.
अजय - ए मुलीला बघायला गेल्यावर मुलगी आणते कांदे पोहे.
चित्रा ( हसत) - पण ते नवरदेव लाजत नाहीत तुझ्यासारखे. तूच मुलीसारखा लाजतोस. म्हणून ने आता.
आई - ए भांडू नका दोघे, थांबा मी नेते कांदे पोहे.
कांदे पोहे व नंतर चहा होतो.
अजय - बाबा आपल्या येथे कोणी साने सर रहातात का?
बाबा (आठवून) - कोण ते संस्कृत शिकवतात ते?
अजय - हो.
बाबा - अरे ते आपल्या बाजूच्या आळीत रहातात. मी ओळखतो त्यांना. तुझे काय रे काम त्यांच्याकडे?
अजय (थाप मारून) - मला संस्कृत स्तोत्र वगैरे शिकायची आहेत.
बाबा - स्तोत्र मला पण येतात.
अजय - मला व्याकरण पण शिकायचे आहे.
बाबा चांगले आहे सांगून अजयला साने सरांचा पत्ता देतात.
तोपर्यंत सकाळचे साडे अकरा वाजतात.
अजय व स्वाती दोघेजण दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात.
अजय फ्लॅट ची डोअर बेल वाजवतो.
एक बाई ( प्रतोदची आई ) दार उघडतात.
अजय - नमस्कार मी अजय. मला साने सरांना भेटायचे आहे.
साने सर पुढे येतात व या बस म्हणतात.
साने सर - कोण तुम्ही?
अजय - मी गोविंदरावांचा मुलगा.
साने सर - कोण ते बाजूच्या गल्लीत रहातात व रिटायर्ड बँक ऑफिसर आहेत तेच ना?
अजय - हो सर.
साने काकू तोपर्यंत अजय व स्वातीला पाणी आणून देतात.
अजय - सर मला थोडं संस्कृत शिकायचं होत. म्हणजे मी शाळेत असताना इ. ८वी ते १० वी संस्कृत विषय घेतला होता . पण आता मला डिटेल शिकायचंय.
साने सर - तुम्ही काय करता?
अजय - मी महामुंबईच्या शारदा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. केमेस्ट्री माझा विषय आहे. मी शनिवार रविवार घरी येतो, तेव्हा मला जमेल तुमच्यकडे यायला.
साने काकू - अहो बघा योग कसा जुळतो. मला महामुंबईला जायचेच होते.
साने सर (डोळ्यात पाणी येऊन) - अग आता विसर त्याला. किती आठवण काढशील?
साने काकू - नाही हो , पर्वाचा दृष्टांत चुकीचा नाही.
स्वाती - काकू काय झाले. तुमचे महामुंबईला कोणाकडे काम आहे?
साने काकू - अहो मॅडम, मला माझ्या मुलाला भेटायचे आहे हो?
स्वाती - काय नाव आहे त्यांचे? कुठे राहतात ते?
साने काकू - प्रतोद नाव त्याच.
स्वाती व अजय दचकून एकमेकांकडे पहातात.
साने काकू - मला एका सत्पुरुषाने पर्वा पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला, कि बाई तुझी तपस्या फळाला आली. तुझा मुलगा महामुंबईत आहे.
साने सर - अहो, आमचा मुलगा ३ वर्षांपूर्वी " नदीपुरला " सहलीला गेलेला असताना बुडून मेला. तेव्हापासून हि पूर्ण खचली आहे. पण तिची भक्ती दिवसेंदिवस वाढतच गेली. ती नेहमी बोलते माझा प्रतोद आहे, लवकरच तो नक्की येईल. आणि आता पर्वापासून तर हे नवीनच बोलते आहे.
साने काकू - अजय सर, स्वाती मॅडम मला महामुंबईला न्या. एवढी मदत करा.
स्वाती - काकू तुम्ही चला माझ्या घरी. थोडे दिवस आमच्याकडे रहा.
तेवढ्यात साने काकांचा धाकटा मुलगा आतल्या रूममधून आला. तो आईला समजाऊ लागला.
पण साने काकूंनी ध्यास घेतला होता.
साने सर - स्वाती मॅडम, तुमचा आमचा परिचय नाही. मी कस तुमच्या घरी हिला पाठवू. एकवेळ अजय सरांकडे पाठवले असते. गोविंदराव माझ्या खूप जवळचे आहेत. पण अजय सर कॉलेजात गेल्यावर हिच्याकडे कोण बघणार?
स्वाती - सर, तुम्ही आधी मला व अजयला सर मॅडम म्हणणे सोडून द्या. अजय गोविंदरावांचा मुलगा, म्हणजे तुमच्या मित्राचाच मुलगा. तसेच मी गोविंदरावांची होणारी सून आहे, म्हणजे अजयचे व माझे लवकरच लग्न होणार आहे.
तरीदेखील अशा अनोळखी ठिकाणी बायकोला कसे पाठवायचे म्हणून सर बुचकळ्यात पडले.
शेवटी स्वातीने अजयला हळूच सांगितले, कि आपला येण्याचा उद्देश सरांना थोडक्यात सांग.
अजयने सरांना थोडे खाजगी बोलायचे आहे असे हळूच सांगितले.
सरांनी त्याच्या मुलाला खुणेने आत पाठवले व बायकोला सांगितले, अग या पोरांना काहीतरी खायला देशील कि नाही? भाजणीची मस्त थालीपीठ कर.
साने काकू आता खुश होत्या. त्या थालीपीठ करायला स्वयंपाकघरात गेल्या.
साने सर - बोला आता.
अजय व स्वातीने - मालती मॅडम व विजय सरांबाबत जे काही घडले ते, तसेच " नदीपुरच्या " सहलीतील अनुभव व अविनाशची घेतलेली भेट सर्व थोडक्यात सांगितले.
स्वाती - सर खरं म्हणजे आम्ही खालील प्रश्नांची उत्तरे शोधायला बाहेर पडलो आहोत -
१) विजय सर आणि अविनाश यांचा काय संबंध आहे?
२) त्यांना त्यांची माणसे सोडून फणसवलीची एवढी माहिती कशी आठवते?
३) या सगळ्याशी प्रतोद सरांचा काही संबंध आहे का?
अजय - त्यातच मॅडम असे म्हणत आहेत कि प्रतोद सर महामुंबईत आहेत.
साने सर - हे सर्व माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचे आहे. पण ठीक आहे, तुम्ही माझ्या बायकोला २ दिवस महामुंबईला न्या. नंतर तिला न्यायला मी येतो.
तोपर्यंत साने काकू सगळ्यांसाठी गरमा गरम थालीपीठे घेऊन येतात. जोडीला ताजे लोणी वाढतात.
स्वाती - काकू थालीपीठे मस्तच झाली आहेत.
अजय - हो काकू, मलापण थालीपीठे जाम आवडतात.
थालीपीठ खाऊन झाल्यावर चहा होतो.
अजय - काकू, तुम्ही दुपारी ३ वाजेपर्यन्त तयार रहा. आम्ही दोघेजण जेवून तुम्हाला न्यायला येतो.
३:३० ला आपली बस आहे.
अजय व स्वाती घरी परत येतात. दुपारचा १ वाजलेला असतो.
सर भेटले का? गोविंदराव अजयला विचारतात.
अजय हो म्हणतो, तसेच साने काकूंचे महामुंबईला काम असल्यामुळे त्या स्वातीच्या घरी येणार असल्याचे सुद्धा सांगतो.
बाकी गोष्टी आई वडिलांना माहित नसल्यामुळे तो विस्तृतपणे सांगत नाही.
दुपारी जेवण झाल्यावर,
आई - स्वाती, हे घे.
स्वाती - आई, हे काय हो?
आई - तू पहिल्यांदाच आलीस ना म्हणून छोटीशी भेट.
तुम्ही साने सरांकडे गेलेलात ना, तेव्हा मी आणि चित्रा आमच्या नेहमीच्या दुकानात गेलो होतो. तुझ्यासाठी ड्रेस मटेरिअल आणले आहे. चित्राने चॉईस केले आहे. बघ आवडते ना?
स्वाती (वरचे कव्हर काढून) - आई ड्रेस मटेरियल खरंच छान आहे. मला खूप आवडले. आता तिकडे गेले कि लगेच ड्रेस शिवायला टाकते.
अजय व स्वाती आई बाबांच्या पाया पडून त्यांना अच्छा करतात. चित्राला देखील बाय करतात.
दोघेजण साने काकूंना घेऊन एस.टी. स्टॅण्डवर पोहोचतात.
४ वाजता ए.सी. बस फलाटावर येते.
स्वाती व साने काकू एका सीटवर बसतात. अजय त्यांच्या मागे बसतो. बस वेळेत सुटते.
५:३० पर्यंत बस महामुंबईत पोहोचते.
रिक्षा करून सर्वजण स्वातीच्या घरी जातात.
स्वातीने घरी वडिलांना फोन करून साने काकू येणार असल्याची कल्पना दिली असते.
तसेच परकाया प्रवेश व तत्सम प्रकारबद्दल बोलायचे आहे असे सांगितले असते.
स्वाती घराची डोअरबेल वाजवते.
तिची आई दार उघडते.
आई - या, प्रवासात त्रास तर नाही ना झाला?
अजय - नाही, छान प्रवास झाला.
स्वाती ( ओळख करून देत) - आई बाबा , या साने काकू. अजयच्या वडिलांचे एक मित्र आहेत, त्यांच्या मिसेस. यांचे येथे एक काम आहे. म्हणून मी आमच्याबरोबर त्यांना आणले.
बाबा (हसत) - जावईबापू आमच्या स्वातीने त्रास तर नाही ना दिला प्रवासात?
अजय - काका काकू, अहो जावईबापू वगैरे काय? नुसते अजय म्हणा.
नंतर सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या.
आईने उठून मध्येच चहा आणला व सोबत बिस्कीट आणली.
चहा स्पेशल झाला होता.
स्वातीने वडिलांना आत नेऊन महत्वाचे बोलायचे आहे म्हणून सांगितले.
आईला साने काकूंबरोबर ठेऊन, अजय स्वाती व स्वातीचे वडील बंगल्याच्या वरच्या फ्लोअरवर गेले.
अजयने मालती मॅडमना फोन करून तेथील परिस्थिती विचारली. शक्य असल्यास स्वातीच्या घरी एकट्याने येण्यास सांगितले.
तोपर्यंत सहलीतील व नंतरचा सर्व प्रकार अजय व स्वातीने स्वातीच्या वडिलांना सांगितला.
स्वातीचे वडील - एकंदर प्रकरण गंभीर आहे. काहीतरी गूढ शक्तींकडून हस्तक्षेप झालेला आहे असे मला वाटत आहे.
मी कोणी योगी नाही, पण थोडेफार अध्यात्मिक ज्ञान मला आहे. बघू काही उपयोग होतो आहे का?
मालती मॅडम आई वडिलांना विजय सरांची काळजी घ्या सांगून, स्वातीच्या घरी येतात.
स्वातीच्या घरची डोअरबेल वाजते.
स्वातीची आई दार उघडते.
आई - या मॅडम आत या. बसा.
साने काकू (नीट न्याहाळून) - अग , तू मालती फणसे ना?
मालती - हो काकू. तुमच्या लक्षात आहे अजून?
आता माझे सासरचे नाव मालती काळे.
साने काकू - अग , तुला कस विसरिन? आमच्या प्रतोदच्या वर्गातली ना तू?
मालती - हो काकू. पण प्रतोद सध्या कुठे असतो?
साने काकू - अग , त्यालाच शोधायला तर इकडे आली आहे मी.
साने काकू काय सांगत आहेत, ते न कळल्यामुळे मालती विषय बदलते.
तिघी जणी थोडे जनरल बोलतात.
नंतर ...
मालती - स्वाती आणि अजय कुठे आहेत. मला त्यांनी बोलावले आहे.
स्वातीची आई मालती मॅडमना वरच्या फ्लोअरवर जायला सांगते.
वरच्या फ्लोअर वर -
स्वाती - मॅडम, आत या.
अजय - काल मानसोपचार तज्ञ काय बोलले?
मालती मॅडम - त्यांनी चेक केले. काही औषधे दिली आहेत. त्यामुळे विजय सरांच्या मनावरील ताण कमी झालाय असे वाटते आहे. पण ते अजून सर्वांना ओळखत नाहीत. आत्ता परत औषधांमुळे त्यांना झोप लागली आहे. माझे आई बाबा आहेत तेथे.
अजय - मॅडम, आम्ही आता जे काही सांगतो ते नीट ऐका . आम्ही आत्ता येथे तुमच्या पूर्वायुष्याबद्दल देखील बोलणार आहोत. स्वातीच्या वडिलांची येथील उपस्थिती आवश्यक आहे. आपले बोलणे येथून बाहेर कोणाला कळणार नाही, कारण आम्ही हे सर्व तुमच्यासाठी करत आहोत.
मालती मॅडम - तुम्ही काल फणसवलीला गेला होतात ना? तेथे काय झाले? जे काही असेल ते सर्व सांग.
अजयने फणसवली व आरवलीला घडलेला सर्व प्रकार मालती मॅडमना सांगितला.
प्रतोदबद्दल माहिती कळल्यावर मालती मॅडमना रडू आले. कारण प्रतोद फणसवली सोडून गेल्यानंतर त्याच्याशी मॅडमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता.
मालती मॅडम - या सर्व प्रकारातून, तुम्हाला काय वाटते?
स्वातीचे वडील - मॅडम, हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे झालेले आहे. त्यामुळे कोणताही एक निष्कर्ष आत्ता काढणे कठीण आहे.
पण आम्हाला तिघांनाही वाटते आहे, कि या सर्वांशी प्रतोदचा नक्की काहीतरी संबंध आहे.
मालती मॅडम - पण प्रतोद तर ३ वर्षांपूर्वी वारला, असे अजय तर म्हणाला.
स्वातीचे वडील - अहो मॅडम, तो शरीराने वारला. पण आत्मा अमर आहे.
मालती मॅडम - पण माझा यावर विश्वास नाही. कारण असे मी कधी अनुभवले नाही.
स्वातीचे वडील - पण आता विचित्र गोष्टी अनुभवत आहात ना?
फक्त जरा वेगळ्या बाजूने विचार करून बघा. जीवनात सर्व गोष्टींना समान नियम लावता येत नाहीत.
अजय - मॅडम, एक दिवस विजय सरांना, स्वातीच्या वडिलांकडे आणावे लागेल. ते त्यांच्या मार्गाने प्रयत्न करतील.
मालती मॅडम - खरं म्हणजे या सर्व गोष्टीबद्दल मला माहिती नाही. पण तुमच्या तिघांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे काका, मी विजय सरांना घेऊन तुमच्याकडे कधी येऊ ते सांगा.
स्वातीचे वडील - मॅडम उद्या चांगला दिवस आहे. तुम्ही उद्या या.
परत चहा होतो. मालती मॅडम घरी जातात.
स्वातीचे आई वडील मात्र आज अजयला रात्रीच्या जेवणासाठी आग्रहाने थांबवतात.
रात्री जेवून अजय त्याच्या फ्लॅटवर पोहोचतो.
दिवस दहावा
सोमवार उजाडतो. सर्व दिनक्रम चालू होतो.
संध्याकाळी ५ वाजता, मालती मॅडम, त्यांचे आई वडील व विजय सर स्वातीच्या घरी येतात.
अविनाश अग्निपुत्रेंना देखील अजय सकाळी फोन करून बोलावून घेतो.
स्वाती मॅडमच्या घराच्या वरच्या फ्लोअरवर एका रूममध्ये स्वातीचे वडील, स्वाती, अजय, मालती मॅडम व विजय सर एवढे लोक उपस्थित असतात.
बाजूच्या रूममध्ये स्वातीची आई, साने काकू, अविनाश आणि मालती मॅडमचे आई वडील उपस्थित असतात. ते सर्वजण येथील प्रकार गुपचूप पहात असतात.
स्वातीचे वडील विजय सरांना एका पाटावर बसवतात.
त्यांच्या बाजूने एक वर्तुळ काढतात.
स्वातीचे वडील - तुम्हाला सध्या काय काय आठवत आहे ते सांगा.
विजय सर - मी एक प्रोफेसर आहे.
स्वातीचे वडील - मालती मॅडम तुमच्या कोण लागतात?
विजय सर - एक चांगली मैत्रीण.
मालती मॅडम काही बोलणार, एवढ्यात स्वातीचे वडील त्यांना खुणेने थांबवतात.
स्वातीचे वडील - तुमच्या घरच्यांबद्दल काहीतरी सांगा.
विजय सर थोडे थोडे वर्णन करू लागतात. त्यात सर्व वर्णन फणसवलीचे असते. पण ते अर्धवट असते.
घरच्यांचे वर्णन सुद्धा अर्धवट आणि पूर्ण चुकीचे, म्हणजे विजय सरांच्या आई वडिलांसंबंधी मुळीच नसते.
घरच्यांची नावे आठवत नसतात.
स्वातीचे वडील - तुमच्या मित्र मैत्रीणींबद्दल सांगा.
विजय सर - अविनाश अग्निपुत्रे माझा चांगला मित्र आहे. अजून त्यांना काहीच आठवत नसते.
स्वातीचे वडील - अजून काहीतरी आठवा.
विजय सर - त्या रात्री मला एक दिव्य पुरुष भेटले होते. पण त्यानंतर मला नीट काही आठवत नाही आहे.
स्वातीचे वडील - मी सांगतो तसे करा, म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान होईल.
स्वातीच्या वडिलांनी प्रथम एक स्तोत्र म्हणून अंगारा तयार केला. तो सर्वांच्या लावला. नंतर परत दुसरे स्तोत्र म्हणून विजय सरांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना डोळे बंद करायला सांगितले.
स्वातीचे वडील - आता मी म्हणतो ते मंत्र माझ्या मागोमाग म्हणा.
दोघेही मंत्र म्हणू लागले.
आता स्वातीच्या वडिलांनी विजय सरांना ध्यान धरायला सांगितले.
कोणताही विचार मनात नको. मन एकाग्र करा - स्वातीचे वडील म्हणाले.
जवळजवळ अर्धा तास विजय सर ध्यानात होते.
नंतर स्वातीच्या वडिलांनी पाणी अभिमंत्रून विजय सरांवर शिंपडले.
स्वातीचे वडील - आता सांगा, तुम्ही कोण आहात ?
विजय सर - प्रतोद साने.
मालती मॅडमनी आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. विजय सर व प्रतोद एकमेकांना कधीच भेटले नव्हते.
स्वातीचे वडील - तुमच्याविषयी सांगा.
विजय सरांनी प्रतोदबद्दलची सर्व माहिती सांगायला सुरुवात केली. सांगता सांगता ते रडू लागले.
स्वातीचे वडील ( विजय सरांच्या डोक्यावर हात ठेवून) - रडू नका, घाबरू नका. सर्व काही ठीक होईल. सर्व काही सांगा.
विजय सर - काही वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजची ट्रिप " नदीपुरला " गेली होती. तेथे समुद्रावर पोहोताना आमची एक विद्यार्थिनी बुडू लागली. मी तिला वाचवायला गेलो. तिला वाचवताना तेथे दोन भयानक पुरुष आले. त्यांनी माझा प्राण काढून घेतला. मी जाम घाबरलो होतो. त्यांनी मला कुठेतरी नेले. तेवढ्यात तेथे एक दिव्य पुरुष आले. त्यांनी त्या भयानक पुरुषांना सांगितले कि तुम्ही हे काय केलेत?
तेव्हा त्या भयानक पुरुषांनी सांगितले, हा युवक स्वतःचे प्राण धोक्यात घालून एका मुलीचे प्राण वाचवत होता. त्या मुलीचे प्राण तर वाचले, पण नाका तोंडात पाणी गेल्यामुळे याचा जीवात्मा बाहेर पडला. खरतर आम्ही दुसऱ्या कामासाठी तेथून जात होतो. परंतु हा प्रकार बघितल्यामुळे आता या जीवात्म्याचे काय करावे? म्हणून धरून आपल्या लोकात आणले.
तेव्हा त्या दिव्य पुरुषांनी चिडून त्यांना सांगितले कि तुम्ही मोठा अनर्थ केलात. तुम्हाला जीवात्म्याची ने - आण करायचा किती अनुभव आहे?
भयानक पुरुष म्हणाले - महाराज, पंचमहाभूतांपैकी जे जल तत्व त्याचे सृष्टीतील नियमन करण्याच्या कामात आमची पूर्वीपासून नेमणूक होती.
परंतु, काही मासांपूर्वी आमची या कामात नेमणूक झाली.
दिव्य पुरुष म्हणाले - अरे हा पूर्ण मृत झाला नव्हता. या जीवात्म्याचा त्याच्या शरीराशी असलेला संबंध तुटलेला नव्हता. काही प्रहर उलटताच हा जीवात्मा परत शरीरात प्रवेश करू शकला असता. पण एवढ्या दूरवर, या लोकात आणल्यामुळे या जीवात्म्याचा त्याच्या शरीराशी संपर्क पूर्ण तुटला. आता त्याच्यावर अंत्य संस्कार देखील झाले असतील.
जर तुमच्या जागी जुने जाणते पुरुष असते, तर त्यांना हि गोष्ट सहज समजली असती.
भयानक पुरुष - असं कधी होत, याबद्दल आम्हाला माहित नव्हतं. आता काय करू आम्ही? आम्हाला वाचवा.
दिव्य पुरुष - याला आता माझ्या बरोबर सोडा. पुढे योग्य वेळ येताच याला परकाया प्रवेश करायला मदत करा.
त्यानंतर घडलेला प्रकार त्या दिव्य पुरुषाने मला समजावून सांगितला.
परत मला त्याच समुद्रकिनारी आणले जेथे माझा मृत्यू झाला होता.
काही दिवस या आसपासच्या प्रदेशात रहाण्यास दिव्य पुरुषाने मला सांगितले.
मी भटकत होतो, पण भूत योनीत माझा प्रवेश केलेला नव्हता. त्यामुळे तहान - भूक मला लागत नव्हती.
एक दिवस परत एका कॉलेजची सहल आली.
सहलीत मालतीला बघून मला आनंद झाला.
पण काही वेळातच तिच्या नवऱ्याचे त्याच्या मैत्रिणीशी मोबाईलवर झालेले संभाषण मी ऐकले.
तो मालतीला संपवण्याच्या विचारात होता.
आणि शेवटी मला नको तेच घडले. मी फार काही करू शकत नव्हतो.
विजय सरांनी मालतीला इंजेक्शन दिले. मी त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हतो, पण लोकांना जागे करण्यासाठी मी बाजूच्या रूममध्ये छोट्या प्रमाणात शॉर्ट सर्किट केले. विजय सर पळून पुरुषांच्या लॉजमध्ये जाणार होते. पण तोपर्यंत बरेच जण जागे झाले होते. त्यामुळे ते पळून केवड्याच्या बनाच्या दिशेला गेले.
तोपर्यंत काही लोक मालतीला वाचवायला आले.
केवड्याच्या बनात जायचा संकेत मला दिव्य पुरुषाकडून मिळाला. तेथे ते दुष्ट सर लपून बसले होते. पण त्यांच्या पापाचा घडा भरला होता. एका विषारी नागाने त्यांना दंश केला. त्या विषाच्या प्रभावाने त्यांचा मृत्यू झाला.
पूर्वीच्याच भयानक पुरुषांनी मला त्या देहात प्रवेश करायला मदत केली.
विषाच्या प्रभावाने मी त्या देहात हालचाल करू शकत नव्हतो. त्या दिव्य पुरुषाच्या आशीर्वादाने विजयचे शरीर खराब न होता, डॉक्टरांचे उपाय झाले.
मी शुद्धीवर आलो तेव्हा मला फक्त, मी कोणाचा तरी पाठलाग केला व नंतर नाग चावला असे पुसटसे आठवत होते. ते मी पोलिसांना सांगितले.
सर्व सुरळीत व्हायला थोडा वेळ जाईल हे त्या दिव्य पुरुषाने सांगितले होते.
नंतर मला पुसटसे आठवू लागले. पण वेगळेच शरीर, वेगळे शहर, वेगळी माणसे यामुळे माझ्यावर ताण आला. मला खूप त्रास झाला. मी कोण आहे? मी कुठून आलो? याची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
स्वातीचे वडील - आता हे जे काही घडले आहे, ते फक्त प्रतोदच्या निकटवर्तीयांना कळण्यास हरकत नाही. पण विजयच्या नातेवाईकांना ह्या गोष्टी समजता कामा नये. त्यामुळे मोठा गोंधळ होईल.
आता लोक तुला विजय सर म्हणूनच हाक मारतील.
तुला तुझ्या आई वडिलांबरोबर विजयाच्या आई वडिलांची देखील काळजी घ्यावी लागेल.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खऱ्या विजयला पाप कर्मांमुळे मुक्ती मिळालेली नाही. तोच मालतीवर परत परत हल्ला करत आहे. त्याचे दिवसकार्य गुपचूप करणे आवश्यक आहे.
हा सर्व प्रकार साने काकू व अविनाश बघत असतात. दोघेजण धावत विजय (खरं म्हणजे प्रतोद) जवळ येतात. माय - लेकरांची तसेच दोन मित्रांची भेट होते.
मालती मॅडम (रडत) - पूर्वी माझे पहिले प्रेम प्रतोदने मला नाकारले होते. लग्नानंतर माझे माझ्या नवऱ्यावर म्हणजे विजयवर फार प्रेम जडले. पण काही वर्षांतच त्यांची मती फिरली. पण मी विजयना दूर करू इच्छित नव्हते. त्यामुळे मी त्यांना डिवोर्स देत नव्हते. पण ते माझ्याशी खूप वाईट वागले.
आता प्रतोद, मी तुला मोकळा करते. कारण माझा तुझ्यावर हक्क नाही. माझे लग्न विजय सरांशी झाले होते. प्रतोदने तर मला पूर्वीच नाकारले.
प्रतोद - मालती, तू वेडी आहेस का? तुझ्यावर प्रेम होत म्हणून तर तुला वाचवायला आलो ना तिकडे?
तू पडली श्रीमंताघरची, मला माझे करिअर करणे गरजेचे होते. त्यामुळे मी आपल्यातील प्रेम पुढे नेले नाही.
माझी पि एच डी झाल्यावर मला आरवलीतच प्रोफेसर म्हणून चांगली नोकरी लागली. त्यानंतर तुला मागणी घालायला मी येणार होतो. पण तुझे लग्न झाल्याचे कळले, मग मी तुला विसरण्याचा प्रयत्न केला.
आजही माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आपण लग्न करूया का?
लोकांना वाटेल, विजय सर व मालती मॅडम परत लग्न करत आहेत. हल्ली काही पती - पत्नी तसं करतात.
साने काकू - अग मालती, नाही म्हणू नको बर . माझा प्रतोद तुला सुखात ठेवेल.
मालती मॅडम (लाजत) होकार देतात.
खऱ्या विजय सरांचे दिवसकार्य गुपचूप उरकण्यात येते.
नंतर एका चांगल्या मुहूर्तावर एकाच मांडवात दोन लग्न सोहळे थाटात पार पडतात.
एक म्हणजे अजय व स्वाती
दुसरा मालती मॅडम व विजय..... नव्हे प्रतोद सर.
समाप्त
पुढील नवीन कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
खूप छान
उत्तर द्याहटवाThank You 🙏
हटवाव्वा मस्तच लिहिलय आणि उत्कंठावर्धक आहे. केदार खुपच छान लिहिले आहेस . अभिनंदन 🎊 🎉
उत्तर द्याहटवाThank You 🙏
हटवाखुप छान केदार
उत्तर द्याहटवाHi Kedar..
उत्तर द्याहटवाMastach lihila aahes..
Keep it up dear...