Read best Marathi online gudh katha love story free मराठी
इच्छा - भाग ६
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
प्राची - या मॅडम, बसा.
अनन्या - वहिनी, तुमच्या लग्नातले फोटो बघताय कि काय?
प्राची - लग्नातले तर आहेतच, पण अजून जुने पण आहेत. माझ्या बालपणीचे. फोटो बघून जुन्या आठवणी कशा ताज्या होतात. थोडे बरेदेखील वाटते. या बघा तुम्हीदेखील.
अनन्यादेखील फोटो बघू लागते. प्राची - परागच्या लग्नातले फोटो अनन्याला फार आवडतात. बघता बघता ती प्राचीचे जुने फोटो देखील बघू लागते. प्राची त्या फोटोंविषयी थोडक्यात सांगत असते. आई बरोबरचे फोटो दाखवताना प्राचीच्या डोळ्यात पाणी येते.
यात माझ्या आईच्या लहानपणीचे सुद्धा काही फोटो आहेत असे प्राची सांगते. प्राची उत्साहाने फोटो दाखवू लागते. एक फोटो बघून अनन्या स्तब्ध होते.
अनन्या - हा फोटो कुणाचा?
प्राची - हि लहान मुलगी म्हणजे माझी आई आहे.
अनन्या - नाही, या लहान मुलीबरोबर हि तरुण मुलगी कोण आहे?
प्राची - ती माझी सावत्र मावशी आहे.
अनन्या - हि तर उषा आहे.
प्राची (आश्चर्याने) - मॅडम तुम्ही यांना कसे ओळखता?
अनन्या - उषा तर केयुरची मैत्रीण आहे.
प्राची - हि केयुर सरांची मैत्रीण कशी असू शकेल? हि तर सरांपेक्षा खूप मोठी असणार नाही का?
अनन्या - पण जेव्हा मी उषाला बघितले, तेव्हा मला तुमच्या दोघींच्यामध्ये साम्य वाटले.
प्राची - एका व्यक्तीसारख्या अजून व्यक्ती असू शकतात.
थोड्याच वेळात सर्वजण जेवायला बसतात. जेवून झाल्यावर अनन्या परत रूमवर जाते. रात्री झोपण्यापूर्वी
सॉरी असा मेसेज ती केयुरला पाठवते.
सोमवारी सकाळी अनन्या लवकरच उठते. सर्व आटोपून ती जोशी काकांनी दिलेली स्तोत्र वाचायला बसते. स्तोत्र वाचताना अंगारादेखील बनवते.
झोपण्यापूर्वी केयुरने अनन्याचा सॉरी असा मेसेज वाचला होता. त्यामुळे सकाळी कंपनीत जाण्यासाठी तो अनन्याला न्यायला आला.
अनन्या तयारच होती. गाडीत बसल्यावर, काल जे भांडण झाले होते त्याचा विषय तिने काढला नाही. नेहमीप्रमाणे ती त्याच्याशी व्यवस्थित बोलत होती. जोशी काकांच्याकडे डबा आणायला गेल्यावर, केयुरने गाडी थांबवली होती. त्यावेळी अनन्याने त्याला अंगारा लावला. हे काय? म्हणून केयुरने तिला विचारले.
अरे, मी स्तोत्र वाचते, त्याचा अंगारा आहे - अनन्या उत्तरली.
तुझी इच्छा आहे ना? मग ठीक आहे.
केयुरशी गोड बोलून त्याच्या हृदयात स्थान निर्माण करायचे, तसेच ह्या उषाने १ आठवड्यात केयुरला कसे गटवले हे शोधण्याचा निर्णय अनन्याने घेतला. त्यासाठी उषाबरोबर मैत्रीचे नाटक करायचे असे तिच्या मनात आले.
संध्याकाळी कामावरून दोघेही परत आले. फ्रेश होऊन अनन्या केयुरकडे गेली. उषा तेथे आगोदरच आलेली होती. केयुरने सर्वांसाठी कॉफि केली. कॉफी घेताना गप्पा होतात. अनन्या दोघांशी चिडचिड न करता बोलत असते. बोलताना अनन्या उषाची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते. उषाचे आडनाव बर्वे आहे व ती आर्किटेक्ट असल्याचे अनन्याला कळते. अनन्याच्या लक्षात येते कि उषा तर स्वभावाला चांगली मुलगी आहे. आपण तिचा उगाचच दुःस्वास करत आहोत. पण केयुर फक्त माझाच आहे, हे अनन्या विसरलेली नसते.
अजुन काहि दिवसांनी अनन्याची, उषा बरोबर मैत्री होते. एक दिवस रविवारी अनन्या, दोघांना सकाळी ब्रेकफास्टला बोलावते. आता अनन्याने थोडे किराणा सामान रूमवर आणून ठेवलेले असते. रोज जरी जेवायला ते जोशी काकांकडे जात असले, तरी एखादी रेसिपी करावीशी वाटल्यास थोडे सामान अनन्या आणून ठेवते. एवढ्या प्रेमाने बोलावल्यामुळे केयुर व उषा तयार होतात.
रविवार असला तरी आज अनन्या लवकर उठते. स्नान वगैरे आटोपून ती स्तोत्र म्हणायला बसते. जोशी काकांनी सांगितलेली स्तोत्र ती दररोज न चुकता म्हणत असते. स्तोत्र व अंगारा करून, ती उपमा करायला घेते.
सकाळी आठ वाजेपर्यंत उषा आणि केयुर येतात. तिघेजण ब्रेकफास्ट करतात. उपमा खुप छान झालेला असतो. नंतर चहा होतो. आज केयुर व उषा बीचवर जाणार असतात.
रोज कंपनीत जाताना अनन्या, केयुरला अंगारा लावायची. आज रविवार असल्यामुळे अंगारा लावायचा राहिलेला असतो. अनन्या पटकन आतल्या खोलीत जाऊन अंगारा घेऊन येते आणि केयुरच्या लावते.
उषा - हे काय अनन्या, तू एवढी शिकलेली असून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस?
अनन्या - माझा देवावर विश्वास आहे.
केयुर - उषा, माझा अंगारे - धुपारे यावर विश्वास नाही. फक्त अनन्याचे मन न मोडण्यासाठी मी हे करतो आहे.
उषा (चिडून) - माझ्याबरोबर बीचवर यायचे असेल तर, मला हे असले चालणार नाही.
केयुर (समजावत) - अग, तू नको लावू अंगारा. मीच फक्त लावतो.
पण उषा रागाने बाहेर निघून जाते. केयुर तिच्या मागोमाग जातो. तिला समजावताना तो सांगतो, कि माझी अंघोळ अजून व्हायची आहे. अंघोळ करताना अंगारा आपोआप पुसला जाईल. उषाला ते पटते. केयुरची अंघोळ होईपर्यंत उषा, अनन्याकडे थांबते. नंतर दोघेजण बीचवर जातात. हि अशी विचित्र का वागते, असे अनन्याला वाटते.
बीचवरील एका हॉटेलात जेवून उषा व केयुर संध्याकाळी परत केयुरच्या बंगल्यावर येतात. अनन्यादेखील संध्याकाळी त्यांचेकडे जाते. चहापाणी, गप्पा रंगतात. वेगवेगळ्या रेसिपींचा विषय निघतो. अनन्या सांगते कि तिला जेवण नीट बनवता येत नाही, पण स्नॅक्सचे बरेच पदार्थ बनवता येतात. उषा सांगते कि तिला जेवण चांगले बनवता येते, विशेषतः आपल्या मराठी सणांना ज्या स्वीट डिश बनवतात, त्या तिला व्यवस्थित जमतात.
केयुर (हसत) - मला फक्त चहा - कॉफी जमते. बाकी डिश खायला तुम्हा दोघींकडे यायला हवे.
अनन्या - उषा, एक दिवस तुझ्या हातच्या स्वीट डिश खायला यायला पाहिजे.
केयुर - उषा, खरंच तुझ्या हातची स्वीट डिश खायलाच पाहिजे. मला स्वीट डिश खुप आवडतात. कधी येऊ ते सांग. तसेपण तुझे फार्म हाऊस आम्ही दोघांनी आतून बघितलेले नाही.
उषा (आनंदाने) - केयुर आणि अनन्या तुम्ही दोघेजण उद्याच या. मी सगळी तयारी करते.
नंतर दोघीजणी आपापल्या घरी जातात.
दुसऱ्या दिवशी कंपनीतून आल्यावर केयुर आणि अनन्या ठरल्याप्रमाणे उषाच्या फार्म हाऊसवर जातात. फार्म हाऊस जुन्या पद्धतीने डिझाईन केलेले असते. उषा दोघांचे स्वागत करते. प्रथम तिघांचा चहा होतो. नंतर उषा, या दोघांना पूर्ण फार्म हाऊस दाखवते. एका खोलीतून वर जाणारा जीना असतो.
केयुर - वरती काय आहे.
उषा - वरती छोटीशी रूम आहे, पण तिथे अडगळ आहे. रूमच्या समोर गच्ची आहे.
केयुर - गच्चीवरून नदीकाठ खुप छान दिसत असेल ना?
उषा - हो.
केयुर - तर मग चला वरती जाऊ.
तिघेजण वरती जातात.
वरच्या रूममध्ये खुप अडगळ असते.
एव्हढ्यात समोरच्या भिंतीवर बघुन अनन्या थबकते.
अनन्या - हा फोटो कुणाचा?
भिंतीवरील एका जुन्या फोटोकडे पाहुन अनन्या विचारते.
उषा - माझा.
अनन्या - तुझ्या बाजुला फोटोमध्ये जी मुलगी आहे, ती कोण आहे?
उषा - ती माझी बहिण आहे.
केयुर - अग, पण हा फोटो तर खुप जुना दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील.
तू तर तुझ्या बहिणीविषयी काहीच सांगितले नाहीस मला.
उषा - ती लहान असतानाच वारली. आणि माझ्या वडिलांना ब्लॅक अँड व्हाईट टाईप फोटो जुन्या आठवणी म्हणून आवडायचे. त्यामुळे त्यांनी आमचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढले होते. थोडावेळ बाजूच्या गच्चीत तिघेजण उभे राहतात. त्यानंतर तिघेजण खाली येतात.
उषा सर्वांसाठी जेवणाच्या डिश वाढते. २- ३ स्वीट डिश केलेल्या असतात.
अनन्याला मात्र तो वरचा फोटो बघितल्यापासून अस्वस्थ वाटत असते. तिला नीट जेवण संपत नाही.
केयुर - स्वीट डिश खरंच मस्त झाल्या आहेत.
उषा - थँक यु. अनन्या तू पण घे ना.
अनन्या - नको, माझे पोट भरले.
थोडा वेळ थांबून अनन्या व केयुर निघतात. अनन्याला तिच्या रूमवर सोडून, केयुर त्याच्या रूमवर जातो.
रात्री केयुर आणि उषाचे ऑनलाईन चॅटिंग सुरु होते. केयुर आणि उषाने लग्न करण्याचे ठरवलेले असते. त्यामुळे आता घरी कळवायचे केयुरने ठरवले असते.
केयुर - उद्या मी, आई बाबांना आपल्याविषयी सांगणार आहे. आपण लवकरच लग्न करू या.
उषा - नको, तू तुझ्या आई - बाबांना नको सांगू.
केयुर - का? ते माझे आई - वडील आहेत. ते आपल्याला काही बोलणार नाहीत. आपल्या लग्नाला परवानगी देतील.
उषा - मला भीती वाटते, जर त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली नाही तर तू मला सोडून जाशील.
केयुर - तू वेडी आहेस का? ते असं कस करतील.
उषा - नाही, तू त्यांना आधी काहीच सांगू नकोस. आपण गुपचूप लग्न करू. त्यानंतर तू त्यांना सांग. एकदा लग्न झाले कि ते मोडणार नाहीत. प्लिज, माझ्यासाठी एवढे तरी कर.
केयुर - सॉरी, ते माझे आई - वडील आहेत. त्यांना मी सांगणारच. तू काही काळजी करू नकोस. तू शांतपणे झोप. गुड नाईट.
उषा - तू ऐकतच नाहीस तर मी काय करू. गुड नाईट.
पुढचा दिवस म्हणजे मंगळवार उजाडतो. आज कंपनीत अनन्याचे लक्ष लागत नसते. कंपनीतून सुटल्यावर अनन्या रूमवर येते. फ्रेश होऊन ती जोशीकाकांकडे जाते. प्राची वहिनी व जोशी काकांना ती काहीतरी
बोलायचे आहे असे सांगते.
अनन्या, जोशी काका व प्राची वाहिनी घरातील एका रुममध्ये बसतात.
जोशी काका - मॅडम, काय झाले?
अनन्या - पूर्वी, योगायोग म्हणून एक गोष्ट मी सोडून दिली, पण हे काहीतरी भलतेच आहे.
प्राची - कोणती गोष्ट मॅडम?
अनन्या मोबाईलमधील एक फोटो दोघांना दाखवते.
प्राची - हा फोटो तुमच्याकडे कसा?
अनन्या - उषाच्या फार्म हाऊसवर मिळाला. तिच्या नकळत मी फोटो काढला. मी तिला मुद्दाम विचारले, कि या फोटोतील लहान मुलगी कोण आहे? तिने सांगितले कि ती लहान मुलगी तिची बहीण आहे व दुसरी तरुण मुलगी ती स्वतः आहे. तिच्या वडिलांना ब्लॅक अँड व्हाईट फोटो स्वरूपात जुन्या आठवणी जपायच्या होत्या. म्हणून त्यांनी हा फोटो काढला.
कारण असाच पण दुसऱ्या पोझमधील फोटो तुम्ही मला दाखवला होतात. तो तुमच्या आई व मावशीचा आहे असे तुम्ही सांगितले होते. तुमची आई लहान व सावत्र मावशी वयाने मोठी होती. मी तुम्हाला सांगितलेदेखील कि तुमच्या मावशी, मी बघितलेल्या केयुरची मैत्रीण उषासारख्या दिसतात. पण नंतर योगायोग म्हणून आपण विषय सोडून दिला होता. पण हा योगायोग नाही. हि उषा आहे तरी कोण?
प्राची - तुम्ही म्हणता ती उषा माझी उषा मावशी असू शकत नाही. कारण माझी उषा मावशी माझ्या जन्माच्या आधीच वारली. म्हणजे तिने आत्महत्या केली होती. असे माझी आई सांगायची. माझी आई सुद्धा आता या जगात नाही. पण हि मुलगी माझ्या मावशीचा फोटो हा तिचा स्वतःचा असल्याचे कसे सांगते?
जोशी काका - प्राची, तुझ्या मावशीने कुठे आत्महत्या केली होती?
प्राची - आपल्या नदीत. मला माझ्या आईने तसे सांगितले होते?
अनन्या - काका, तुम्ही या गावातलेच, तुम्हाला या आत्महत्येसंबंधी काहीच कसे माहीत नाही?
जोशी काका - मी तेव्हा खूप लहान होतो. ७ - ८ वर्षांचा असेन. काहितरी वाईट घडले इतकेच कळले.
मॅडम, केयुर साहेबांनी एका स्त्रीला आपल्या नदीत बुडताना वाचवले होते. ती स्त्री म्हणजे ही त्यांची मैत्रीण उषा तर नाही ना? तुम्हाला काही माहिती आहे का?
अनन्या - हो काका, केयुरने मला सांगितले होते कि त्याने उषाला बुडताना वाचवले.
जोशी काका - बापरे, म्हणजे मी जे कुंडलीत पहिले ते खरेच आहे बहुतेक. हि उषा म्हणजे काळी शक्ती आहे.
प्राची - बाबा, म्हणजे माझी सावत्र मावशीच परत आली आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
अनन्या - तुमच्या मावशीचे पूर्ण नाव काय होते?
प्राची - उषा बर्वे.
अनन्या - मला पण उषाने हेच नाव सांगितले.
जोशी काका - याचा अर्थ प्राचीची उषा मावशी भूत योनीत गेली आहे, ती केयुरच्या आयुष्यात आली आहे.
अनन्या - काका, भूत खरंच असते का हो? म्हणजे मी आणि केयुरने भुताशी मैत्री केली? बापरे कल्पनाच करवत नाही.
जोशी काका - पण आत्ताच्या काळात हे अशक्य वाटणारे आहे. परंतु ९० % तरी आपल्याला वाटते तसेच आहे.
प्राची - पण ती असे का करत असेल?
अनन्या - तिचे केयुरवर प्रेम आहे. ते दोघे लग्न करणार आहेत. मला केयुरच्या आई - वडिलांना काहीतरी सांगायला हवे.
जोशी काका - थांबा मॅडम, मी तुम्हाला रक्षा स्तोत्राने अभिमंत्रून गंडा देतो. तो गळ्यात घाला. कारण आपण सावध झालोय हे तिला कळले असेल. तुमच्या जीवाला धोका आहे.
जोशी काकांनी दिलेला गंडा अनन्या गळ्यात घालते. आजदेखील रात्रीच्या जेवणाला केयुर येणार नसतो. त्यामुळे अनन्या जोशी काकांकडे जेऊन घेते.
नंतर ती तिच्या रूमवर जाऊन लगेचच केयुरच्या आई - वडिलांना कॉल करते.
केयुरचे वडील - हॅलो, अनन्या कशी आहेस?
अनन्या - काका, मी ठीक आहे. पण एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे.
क्रमशः
कथेचा पुढील भाग किंवा इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा