Read best Marathi online gudh katha | Marathi love story free | मराठी गुढ कथा | मराठी प्रेम कथा | मराठी भयकथा | मराठी कथा संग्रह
इच्छा - भाग ३
लेखक - केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
केयुर - आपण त्या हॉटेलात बसुया का? काहीतरी खाऊ आणि सनसेट बघू.
उषा - चालेल जाऊ या.
बीचवर काही चांगली हॉटेल्स असतात. त्यातील एका ३ स्टार हॉटेलमध्ये दोघेजण जातात.
केयुर - काय मागवु?
उषा - काहीपण मागवा, तुम्हाला आवडेल ते.
केयुर २ टोस्टेड सॅन्डविचची ऑर्डर देतो.
दोघेजण हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर बसुन समुद्राकडे बघत असतात.
केयुर - तुमचे सर्व शिक्षण पुण्यातच झाले का?
उषा - हो. आणि तुमचे?
केयुर - माझे शिक्षण ठाण्यात झाले. मी बी.ई. मेकॅनिकल आहे. ४ वर्षांपूर्वी आम्ही दोघे या फूड इंडस्ट्रीत लागलो. आता आमची इकडे ट्रान्स्फर झाली आहे.
उषा - आम्ही म्हणजे कोण?
केयुर - अहो, अनन्या. ती आणि मी लहानपणापासून फ्रेंड आहोत. आमचे शिक्षण एकत्र झाले. फक्त इंजिनिअरिंगला आमची साईड वेगळी होती. ती बी.ई. इलेक्ट्रॉनिक झाली.
तोपर्यंत सॅन्डविच येते. सॅन्डविच खाऊन झाल्यावर केयुर कोल्ड कॉफिची ऑर्डर देतो.
कोल्ड कॉफि पिताना दोघेजण सनसेट बघतात.
आता रात्र होऊ लागल्यामुळे दोघेजण परततात.
केयुर उषाला तिच्या फार्म हाऊसवर सोडतो. परतत असताना एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना देतात.
रात्रीचे जोशी काकांकडे जेवण झाल्यावर अंगणात गप्पा - गोष्टी रंगतात. अंगणात पत्र्याची शेड केलेली असल्यामुळे पावसाचे पाणी आत येत नसते. गप्पांमध्ये भुतांचा विषय निघतो.
केयुर - काका, मला भुताच्या गोष्टी ऐकायला जाम आवडतात. आत्ता अनन्या नाही ते बरच झालं, कारण तिला भुताच्या गोष्टींची फार भीती वाटते. पण माझा यावर विश्वास अजिबात नाही.
पराग - सर, असं म्हणु नका. अहो मी स्वतः भूत पाहिलं आहे.
केयुर (हसत) - अहो पराग, तुम्ही माझी गंमत करता का?
प्राची - सर, ते खरच सांगत आहेत. पूर्वी सासूबाईंनी मला हि गोष्ट सांगितली होती.
पराग - सर, अहो मी एकदा तालुक्याच्या गावावरून येत होतो. तेव्हा मी कॉलेजला होतो. परीक्षा झाल्यामुळे आमच्या मित्रांच्या ग्रुपचे मुव्ही बघायला जायचे ठरले. बरीचशी मुले तालुक्याच्या गावातच रहात. बाजूच्या गावातून येणारे आम्ही थोडेच होतो. आमच्या गावातील मी एकटाच होतो. रात्री ९ ते १२ चा शो होता. मी लवकरच जेवून सायकलवरून निघालो. तेव्हा गावात जास्त बाईक नव्हत्या. आम्ही मुले तर सायकलचं वापरायचो.
मी साडेआठलाच टॉकीजला पोहोचलो. शो हाऊसफुल होता. त्यामुळे आधीच काँट्रीब्युशन काढुन, एका मित्राने तिकिटे आणली होती.
मुव्ही खूपच छान होता. सस्पेन्स मुव्ही होता.
मुव्ही संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी जायला निघाले. काही अंतरापर्यंत माझ्याबरोबर बाजूच्या गावातील मित्र होते. पण पुढे मी एकटाच होतो.
पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्यामुळे चंद्रप्रकाश चांगला पडला होता.
आपले गाव यायच्या आधी काही अंतरावर मला एक गृहस्थ पायी चालताना दिसले. एवढ्या रात्री हे कुठे चालत जात आहेत? असा माझ्या मनात विचार आला. तेव्हड्यात त्यांनी मला आवाज दिला.
गृहस्थ - अरे, थांब ना जरा.
मी (सायकल थांबवून) - काय काका?
गृहस्थ - अरे, नागलोलीलाच चालला आहेस का?
मी - हो काका.
गृहस्थ - मग मला जरा गावात सोडतोस का?
मी - हो, पण तुम्ही कोण? इतक्या रात्री कुठे गेले होतात?
गृहस्थ - अरे मी सदाशिव. मधल्या आळीत जो मनोहर राहतो ना, तो माझा मामेभाऊ. मुंबईतून आलो. बस पंक्चर झाल्यामुळे आज लेट झाली. हि बस आपल्या गावातून जात नाही ना? तालुक्याच्या गावातून थोडे पुढे आल्यावर तिचा मार्ग वेगळा असतो. त्यामुळे त्या पिंपळाच्या पारावरच उतरावे लागले. आता रात्र असल्यामुळे रिक्षा वगैरे काहीच नाही.
मी त्यांना मदत करण्यासाठी माझ्या सायकलच्या मागच्या कॅरिअरवर बसवले. डबलसीट मला जड जात होती. पण तसाच सायकल चालवत राहिलो.
२ मिनिटांतच माझ्या मागुन अजून दोन तरुण सायकलवर आले. ते आमच्या पुढच्या गावातील होते.
ते सुद्धा पिक्चर बघायला आले होते, असे त्यांनी सांगितले. आम्ही दोघेजण दिसल्यामुळे त्यांना बरे वाटले. कारण एवढ्या रात्री रस्त्यावर कोणीच नव्हते.
थोडं पुढे आल्यावर ते दोघे म्हणाले, कि आपण येथील खाडीवरून जी शॉर्टकट जाते तेथून जाऊ.
मी म्हणालो, कि नको. कारण तो एरिया निर्मनुष्य आहे. येथूनच हायवेवरून जाऊ. या वाटेवर थोडी घरे तरी आहेत. पण ते दोघेजण खूपच आग्रह करू लागले. बरोबरचे सदाशिवकाका देखील बोलू लागले कि अरे चल ते एवढे सांगत आहेत तर. लवकर पोचू.
पण मी माझ्या मतावर ठाम होतो. मी सदाशिव काकांना सांगितले कि, तुम्ही जा त्या दोघांबरोबर. मी काही येणार नाही.
सदाशिव काका - अरे, तूच नाही नेले तर मी कसा जाणार. चल मी तुझ्याच बरोबर येतो.
थोड्याच वेळात, खाडीच्या येथून जाणारा फाटा लागला.
सायकलवरील एक तरुण - आम्ही चाललो येथुनच. तुमचे काय ते बघा.
तेवढ्यात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच दोघे सायकलस्वार दिसेनासे झाले. ते दोघे जागच्या जागी गायब झाले. मी जाम घाबरलो. मी सायकलचा वेग वाढवला व देवाचे नाव घेऊ लागलो. तेवढ्यात माझ्या लक्षात आले कि माझ्या मागे सदाशिव काका अजून आहेत. मला घाम फुटला. मी सायकलवरून उडी मारली आणि जीव मुठीत घेऊन पळत सुटलो. सायकलबरोबर सदाशिव काका खाली पडले. ते मला हाक मारू लागले. नंतर तर ते सायकल चालवत माझ्या मागे येऊ लागले. गावचा फाटा अजून थोडा लांब होता. भीतीमुळे मी चक्कर येऊन पडलो.
मला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होतो. मी माझ्या घरी होतो. माझ्यासमोर माझे आई - बाबा, माझे २ सख्खे काका उभे होते. आणि त्यांच्या मागे उभे होते सदाशिव काका. मी परत किंचाळलो.
माझे बाबा हसत म्हणाले - घाबरू नकोस. हा काही भूत नाही आहे. हा सदाशिव आहे. मी ओळखतो याला. काल घडलेला प्रकार याने सांगितलं आम्हाला.
तू रात्री चक्कर येऊन पडलास त्यामुळे तुला घरी कसे आणायचे हा याला प्रश्न पडला. बराच लेट झाल्यामुळे मी व आपल्या बाजूचे दोन्ही काका बैलगाडी जोडून तुला शोधायला बाहेर पडलो. तेव्हा हा सदाशिव काही मदत मिळते का ते बघत रस्त्यावर उभा होता.
तुम्हाला दोघांना खूप लेट झाला होता. सायकलने पाऊण तासाचे आपल्या गावच्या फाट्यापर्यंतचे अंतर कापायला तुम्हाला २ तास लागले होते. त्या भुतांनी बोलण्यात तुमचा वेग कमी केला. नशीब तुम्ही खाडीमार्गे त्यांच्याबरोबर गेलात नाही.
सदाशिव काकादेखील अजून घाबरलेलेच होते.
मला भरपूर ताप भरला होता. डॉक्टरांच्या औषधाबरोबर आईने बाकीचे पण उपचार केले. काहीतरी पुण्याई होती म्हणून आम्ही दोघेजण त्या दिवशी वाचलो.
गोष्ट सांगून संपली होती. केयुरने नीट लक्ष देऊन पूर्ण गोष्ट ऐकली.
केयुर - बापरे, खरच भयानक आहे गोष्ट. मी भरपूर भुताच्या गोष्टी ऐकल्या होत्या. पण प्रत्यक्ष भूत पाहिले म्हणून कोणीच सांगितले नव्हते. आता तू स्वतःच सांगतोस म्हणजे विश्वास ठेवायलाच पाहिजे.
जोशी काका - आपण सावध रहायचे. घाबरायचे नाही. देवाचे नाव घ्यायचे.
आता रात्रीचे ११ वाजतात. त्यामुळे केयुर तेथून निघतो व बंगल्यावर पोहोचतो. तो बेडवर पडतो व त्याचे सोशल मीडिया अकौंट चेक करू लागतो. उषा ऑनलाईन असते. तिच्याशी थोडे चॅटिंग झाल्यावर केयुरला झोप लागते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता केयुरला जाग येते. पटापट आटोपून तो डबा घेऊन (जोशी काकांकडून) प्लॅन्टमध्ये पोहोचतो. प्लॅन्टमध्ये सर्व काही ठीक चालू असते. मध्येच एकदा अनन्याचा कॉल येऊन जातो. थोडावेळ कामासंबंधी बोलणे होते.
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केयुर कामावरून रूमवर परततो. फ्रेश होऊन चहा पिताना न्युज लावतो. तेव्हड्यात उषाचा कॉल येतो.
उषा - आज रात्रीच्या शो ला ऍडलॅबला येणार का?
केयुर थोडा गांगरतो. अनन्या एवढी जवळची मैत्रीण असूनदेखील तो तिच्याबरोबर जास्त कधी फिरायला जात नसे. ह्यांच्याशी तर नुकतीच ओळख झालेली. पण केयुर उषाकडे आकर्षित झालेला असतो.
माझे बाकीचे मित्र - मैत्रिणी एवढे एकत्र फिरतात. मग मीच का लाजतोय. आम्ही दोघे एकत्र फिरलो तर काय बिघडले? अशी तो मनाशी समजूत घालत असतो.
उषा - काय हो, काय झाले?
केयुर - जाऊ या ना. तुम्ही रेडी व्हा. मी तुम्हाला न्यायला येतो. रात्री ८:३० ला निघू.
उषा - पण शो हाऊसफुल आहे. ऍडव्हान्स बुकिंग करावे लागेल.
केयुर - मी करतो ना.
उषा - चालेल.
केयुर ऑनलाईन बुकिंगसाठी ट्राय करतो. पण नेटवर्क प्रोब्लेममुळे ऑनलाईन बुकिंग होऊ शकत नाही.
आता तेवढ्यासाठी तालुक्याला जाऊन परत यावे लागेल, वेळ जाईल - असा विचार केयूरच्या मनात येतो.
म्हणून केयुर उषाला कॉल करतो -
उषा - हॅलो, झाले का बुकिंग.
केयुर - नाही हो. ऑनलाईन बुकिंगसाठी येथील नेटवर्क गेले आहे. आपण असं करू या का?
आधी तालुक्याच्या गावी जाऊन बुकिंग करू, मग तिथेच चांगल्या हॉटेलमध्ये डिनर घेऊ. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?
उषा - एकदम मस्त प्लॅन आहे.
जोशी काकांना फोन करून आज रात्री बाहेर जेवायला जाणार असल्याचे केयुर सांगतो. जोशी काका जास्त काही न विचारता ठीक आहे म्हणून सांगतात.
केयुर पटापट तयार होतो. ब्लु कलरचा चेक्सचा शर्ट व त्यावर मॅचिंग लाईट ब्लु कलरची जीन्स पॅन्ट आज त्याने घातली असते. केयुरला छान छान ब्रँडेड कपड्यांची व उंची सेंट, बॉडी स्प्रे यांची खूप आवड असते.
अनन्याने गेल्याच महिन्यात गिफ्ट दिलेले एक सेंट मारून तो आरशात बघतो. गोऱ्या आणि देखण्या केयुरवर ब्लु कलर अधिकच उठुन दिसत असतो.
आज नजर परत परत आरशावर जात असते.
गाडी उषाच्या फार्म हाऊसवर येते. उषा गेटजवळ उभी असते. आज तिने पिंक कलरची साडी नेसली असते. केयुरला तिच्याकडे पहातच रहावे असे वाटत असते.
ती त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन कधी बसते, ते त्याला कळतच नाही.
उषा - निघायचं का?
केयुर ( भानावर येत ) - हो. मला तयार व्हायला लेट तर नाही ना झाला.
उषा - नाही. मी पण आत्ताच रेडी झाले.
फोर व्हीलर चालू होते. दोघे गप्पा मारू लागतात.
थोड्याच वेळात तालुक्याचे गाव येते. संध्याकाळचे ७ वाजलेले असतात. उषा गाडीतच बसून राहते. केयुर तिकीट काढायला ऍडलॅबच्या काउंटरवर जातो. थोडी गर्दी असते. पण २ प्लॅटिनम तिकिटे मिळतात.
तालुक्याच्या गावाच्या बाहेर हायवेवर एक फाईव्ह स्टार हॉटेल असते. दोघेजण डिनरला तेथे पोहोचतात. केयुर गाडी बाहेर पार्क करतो. दोघेजण टॉप फ्लोअरला जातात. आज दोघेजण खूपच छान नटलेले असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नजरा या दोघांवर असतात.
हॉटेलचे इंटेरिअर खूपच व्यवस्थित असते.
केयुर - काय मागवू?
उषा - आज पंजाबी डिश मागवू या.
तेव्हड्यात वेटर येऊन अदबीने उभा रहातो. मेनू कार्ड समोर ठेवतो.
केयुर - आज तुम्हीच सिलेक्ट करा.
उषा प्रथम स्टार्टर सांगून, मग बाकी पंजाबी डिशची ऑर्डर देते.
वेटर ऑर्डर बरोबर लिहून घेतो व जातो.
केयुर - तुमचा मुक्काम इथे किती आहे?
उषा - सध्या मी इथेच रहाणार आहे. माझे आर्किटेक्ट चे काम मी ऑनलाईन करते. गरज पडल्यास मला पुण्याला जावे लागेल. इथे बागेकडे लक्ष द्यायला हवे आहे. खूप मोठी बाग आहे.
उषा एवढ्यात पुण्याला जाणार नाही हे ऐकून केयुरला बरे वाटते.
क्रमशः
कथेचा पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -
"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा