Read best Marathi online story free | Moral story | मराठी कथा | नीति कथा मराठी
(खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही. कथेत रंजकपणा येण्यासाठी जे फोटो ठेवलेले आहेत, त्यांचा या कथेशी काहीही संबंध नाही.)
लेखक - केदार शिवराम देवधर
सासू विरुद्ध सून
वेळ दुपारची जेवणाची (रविवार) -
प्रमिला ताई - आज जेवणात तेल जास्त झाले आहे. महागाई किती वाढली आहे. मानस, तुझ्या पट्टराणीला सांग, हि अशी उधळपट्टी परवडणार नाही.
चित्रा - बाबा सांगा ना तुम्ही, मी यायच्या आधी तुम्हाला चमचमीत पदार्थ खायला मिळत होते का? खायच्या प्यायच्या मध्ये कसली काटकसर?
प्रभाकर राव - अगं प्रमिला राहू दे गं, किती बोलशील? नवीन पिढी आहे थोडं चमचमीत जेवण बनवणारच.
प्रमिला ताई - बघ रे मानस, हे कसे बोलत आहेत ते.
मानस - चित्रा थोडं तेल कमी वापरायचं ना, आईला नाही आवडत जास्त तेलकट जेवण.
चित्रा - त्यांना नाही आवडत तर मी त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवली असती.
प्रमिलाताई - म्हणजे मग अजून खर्च. पूर्वी आम्ही काटकसरी मध्ये दिवस काढले म्हणून आज हा बंगला दिसतो आहे.
प्रभाकर राव - अगं आता आपल्याला काय कमी आहे. मुलाची देखील चांगली नोकरी आहे. थोडा जेवणा-खाण्यासाठी खर्च केला तर काय बिघडलं?
बघता बघता प्रमिलाताई आणि चित्रा दोघींमधील भांडण वाढतच गेली. कशीबशी जेवणं उरकली.
मानस आणि चित्राचा दोन वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. हा विवाह ठरवून झालेला होता. प्रमिलाताई यांचा स्वभाव शिस्तप्रिय आणि काटकसरी होता. चित्रा थोडीशी चंचल होती. नवीन पिढीमधील असल्यामुळे फॅशन आणि थोडीशी उधळपट्टी यात तिला काही गैर वाटत नसे.
चित्राचा ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला होता. त्यामुळे बंगल्याच्या जवळच एका जागेत तिने ब्युटीपार्लर सुरू केले होते. त्यांच्या आळीतीलच नव्हे तर आजूबाजूच्या भागातून देखील बऱ्याच स्त्रिया तिच्या ब्युटीपार्लरमध्ये येत असत.
सासू आणि सूनेचे अजिबात पटत नसे. अधून मधून त्यांची चांगलीच भांडणे होत असत. त्यांच्या आळी मध्ये राहणाऱ्या बाकीच्या लोकांना आता हे चांगलेच माहीत झाले होते.
परंतु लोकांना एका गोष्टीचे आश्चर्य वाटत असे. एवढी भांडणे होऊन देखील, या दोघी जणी हळदी - कुंकू, लग्न समारंभ, खरेदी वगैरे यासाठी एकत्र जात असत. तसेच एकमेकींशी छान बोलत असत.
या दोघीजणी भांडायला लागल्या की प्रभाकर राव आणि मानसला काही सुचत नसे. एकीची बाजू घेतली तर दुसरीला राग यायचा. दोघांनी आपापल्या बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण पालथ्या घड्यावर पाणी.
प्रमिलाताईंच्या बाजूचा बंगला रिकामा होता. एक दिवस एक कुटुंब तिथे राहण्यासाठी आले. शालिनीताई, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून. शालिनीताईंच्या मुलाचे नाव अपूर्व असे होते. वैशाली ही त्यांची सून होती. वैशाली ही अपूर्वची मामेबहीण. दोघांचा प्रेमविवाह होता. आपल्या मोठ्या भावाची मुलगी आपली सून म्हणून आली, म्हणून शालीनीताई तिच्यावर खूष असत. वैशालीला देखील आत्या आवडत असे (परंतु आता सासू). या सासू-सूनेचे एकमेकींशी खूपच चांगले पटत असे. शालिनीताईंचा मुलगा बँकेत होता. त्याची बदली झाल्यामुळे ते सर्वजण इकडे राहण्यासाठी आले होते. सासू - सूना गप्पा मारण्यात पटाईत असल्यामुळे दोघींची आळीमधील बायकांशी लवकरच ओळख झाली. या सासू - सूने मधील घट्ट नाते बघून आळीमधील सर्वांनाच आश्चर्य वाटत असे.
"शालिनीताई - वैशालीची" तुलना "प्रमिलाताई - चित्रा" यांच्याबरोबर होऊ लागली. प्रमिलाताई आणि चित्रा एकमेकींशी किती भांडतात, पण त्यांच्याच शेजारी शालिनीताई आणि वैशाली दोघीजणी कशा छान राहतात असे आळीतील सर्वजण बोलू लागले. आळीमधील बाकीच्या सासू-सूनांमध्ये देखील भांडणे होत असत, परंतु ती खूपच कमी असत.
परंतु आता आळीमधील बाकीच्या घरांमधून देखील भांडणाचे सूर ऐकू येऊ लागले. रोज कुठल्या ना कुठल्या घरामधून तरी सासू - सूनेचे भांडणं होऊ लागले. पुरुष मंडळी वैतागून गेली. अचानक आपल्या आळीमध्ये इतकी भांडणे कशी सुरू झाली याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. थोड्याच दिवसात सर्व पुरुषांच्या लक्षात आले की याला कारणीभूत आहेत नव्याने राहायला आलेल्या शालिनीताई आणि वैशाली. या दोघीजणी जिथे कुठे जातील तिथे काडी टाकून द्यायच्या. इकडले तिकडे आणि तिकडले इकडे करण्यात दोघीजणी पटाईत होत्या. या दोघी जणी मुद्दाम असे काही करत नसत. परंतु स्वभावाला औषध नसते. गप्पा मारता मारता पटकन त्या इकडले तिकडे सांगून मोकळ्या होत. आपल्या अशा स्वभावामुळे लोकांची काय पंचाईत होते याची त्यांना जाणीव नव्हती.
पुरुष मंडळींनी आपल्या घरातील बायकांना शालिनीताई आणि वैशाली पासून सावध राहण्याचा सल्ला दिला. परंतु शालिनीताई आणि वैशाली बोलण्यात अतिशय गोड होत्या. या दोघींनी अशी काही जादू सर्व बायकांवर केली होती, की कुठल्याही बायका त्यांच्याविरुद्ध ऐकायला तयारच नव्हत्या.
त्या आळीतील स्त्रियांचे महिला मंडळ होते. त्याच्या अध्यक्षा प्रमिलाताई होत्या. आता त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आलेली होती. त्यामुळे त्यांचे इलेक्शन होते. शालीनीताईंना या मंडळाच्या अध्यक्षा बनण्याची इच्छा होती. परंतु आळीमधील बायका प्रमिलाताईंना मानत होत्या. आत्तापर्यंत त्या बिनविरोध निवडून येत होत्या. शालिनीताई, वैशाली जवळ याबाबत बोलतात. या दोन्ही सासू-सूनांची, म्हणजे प्रमिलाताई आणि चित्राची इतकी भांडणे होऊन देखील आळीमधील स्त्रिया या दोघींना कसे मानतात याचे त्यांना आश्चर्य वाटते. प्रमिलाताई चित्राला कसा त्रास देतात हे या बायकांच्या समोर आले पाहिजे, असे शालिनीताईंच्या लक्षात येते. शालिनीताई आणि त्यांची सून वैशाली दोघीजणी मिळून एक प्लॅन बनवतात.
एक दिवस सकाळी प्रमिलाताई बंगल्यामध्ये एकट्याच असतात. प्रभाकरराव बाजारात गेलेले असतात. मानस ऑफिसमध्ये आणि चित्रा तिच्या ब्युटीपार्लर मध्ये गेलेली असते. हीच संधी साधून वैशाली, प्रमिलाताईंच्या घरी येते. प्रमिलाताई तिचे स्वागत करतात.
वैशाली - हे काय काकू, घरामध्ये तुम्ही एकट्याच?
प्रमिलाताई - हो अगं, प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून गेला.
वैशाली - सॉरी हं काकू, तुम्हालाच घरातील सर्व कामे करायची आहेत आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केला.
प्रमिलाताई - का? मी कशाला एकटी कामे करेन? चित्रा करते ना.
वैशाली - काकू तसं नाही, ती तिकडे ए. सी. मध्ये बसलेली असणार. आत्ता दुपारचा स्वयंपाक तर तुम्हीच करत आहात ना? या वयात तुमच्यावर अशी कामं टाकून ती आपली तिकडे जाऊन बसते.
प्रमिलाताई - बरं ते जाऊदे, तुझे काम काय आहे ते सांग. माझी कामे काय चालू राहतील.
वैशाली - मला इस्त्री हवी होती. आमची इस्त्री बिघडली आहे. रिपेअरला टाकली आहे. उद्या पर्यंत मिळेल.
प्रमिलाताई - अगं एवढच ना, थांब जरा देते हं.
प्रमिलाताई घरामध्ये जाऊन इस्त्री घेऊन येतात आणि वैशालीला देतात.
वैशाली - काकू थँक यु हं. मला आता माझ्या ड्रेस ला इस्त्री करून ब्युटी पार्लर मध्ये जायचे आहे.
प्रमिलाताई - अगं आपल्या आळी मध्ये तर आहे चित्राचे ब्युटीपार्लर. मग एवढी इस्त्री वगैरे कशाला करतेस?
वैशाली - काकू तुम्ही एवढ्या साध्या कशा? तुमच्या सूनेला ब्युटी पार्लर मधील काहीच काम धड येत नाही. काल मी तिच्याकडे हेअर सेट करण्यासाठी गेले होते. तेव्हा बघा कशी माझ्या हेअर स्टाईलची वाट लावली. आता परत त्या लांबच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हेअर स्टाईल व्यवस्थित करणार आहे. तुमची सून ए. सी. मध्ये बसून आरामात गप्पा मारते. जास्तीत जास्त विषय, तुम्ही तिला कसे टॉर्चर करता याबाबत असतात. मग तिचे कामामध्ये कसे लक्ष लागणार?
प्रमिलाताई - अगं काय सांगतेस तरी काय?
वैशाली - मग काय काकू, खोटं सांगते काय? तुम्हाला इकडे कामाला लावून, ती तिकडे मजा मारत आहे. मी तरी परत तिच्या ब्युटीपार्लरमध्ये कधीच जाणार नाही. तुम्ही पण सांगा तुमच्या मैत्रिणींना तिकडे जाऊ नका म्हणून.
प्रमिलाताई - हो मग, आता मी तरी काय गप्प बसेन की काय?
असेच एक-दोन दिवस जातात. संध्याकाळी चित्रा मॉलमध्ये जायला निघालेली असते. वाटेमध्ये तिला बाजूच्या शालिनीताई भेटतात. इकडले तिकडले बोलून झाल्यावर शालिनीताई, चित्राच्या सासूबाईंची चौकशी करू लागतात.
शालीनीताई - काय ग चित्रा, तुझी सासू फारच बोलते ना ग तुला? पण तू खंबीर पणे उभी असल्यामुळे तुझ्या सासूचे काही जास्त चालत नाही. अशीच धीटपणाने वाग. ब्युटी पार्लर मध्ये काम करतेस आणि त्यानंतर घरी गेल्यावर देखील सगळी घरची कामे तूच करतेस ना?
चित्रा - अहो नाही, सासूबाई थोडी मदत करतात.
शालीनीताई - पण थोडीशी ना? बाकी वेळ घरामध्ये आरामच तर करत असतात. किती वाईटपणे बोलतात तुला त्या! खरं सांग, तुमची भांडणे होतात की नाही?
चित्रा - हो काकु, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे.
शालीनीताई - मग मला सांग, या अशा सूनेला त्रास देणाऱ्या बाईला का महिला मंडळाची अध्यक्षा बनवायची?
चित्रा - काकु, तुम्ही बरोबर बोलत आहात. महिला मंडळाची अध्यक्षा आता दुसरी कोणीतरी झाली पाहिजे.
शालीनीताई - पण हे आपण दोघींमध्ये बोलून काय उपयोग? बाकीच्या बायकांना समजायला नको का? तू एक काम कर. तुझी सासू तुला कसा त्रास देते, ते तू आपल्या आळीतील बायकांना सांगत का नाहीस?
चित्रा - काकु, तुमची आयडिया एकदम मस्त आहे. यावेळी तुम्हीच उभ्या रहा ना अध्यक्षपदासाठी. तुम्ही तुमच्या सूनेला किती सांभाळून घेता. एका बाईनेच दुसऱ्या बाईला समजून नाही घ्यायचं तर कोण घेणार?
शालीनीताई - काय ग तुला वाटतं का, की मला अध्यक्षपदाचे काम जमेल?
चित्रा - हो काकु, तुम्हाला नक्की जमेल.
आता प्रमिलाताई आणि चित्रा यांच्या घरात भांडणाचा भडका उडणार होता. शालिनीताई आणि वैशाली दोघींनी ठिणगी तर टाकून दिलेली होती. दोघींचे भांडण तर होत होते, परंतु नेहमीसारखेच. फार मोठा स्फोट अजून तरी झालेला नव्हता.
एक दिवस शालिनीताई आणि वैशाली यांच्या घरातून दोघींच्या भांडणाचे आवाज येऊ लागले. दोघींचे कडाक्याचे भांडण झाले. या सासु-सुना तर आत्या आणि भाची होत्या. दोघींचे चांगले जमायचं. तरी मग या कशा काय भांडत आहेत असा प्रश्न आळी मधील सर्वांनाच पडला.
या सर्व प्रकाराला प्रमिलाताई आणि चित्रा कारणीभूत होत्या. या सासू-सूने मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न शालिनीताई आणि वैशाली या दोघींनी केला होता. तो आता त्यांच्यावरच उलटला होता. प्रमिलाताई आणि चित्रा दोघीजणी हुषार होत्या. या दोघीजणी जरी एकमेकींशी कितीही भांडत असल्या तरी शेवटी एक होत असत. बाहेरच्या व्यक्तीला तर त्यांच्या भांडणात मध्यस्थी करू देतच नसत. जरी एकमेकींचे भांडण झाले तरीही दुसरा दिवस उजाडायच्या आत परत एकत्र यायचे असे दोघींचे ठरलेलेच होते. त्यामुळेच शालिनीताई आणि वैशाली या दोघींनी आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे, हे प्रमिलाताई आणि चित्राच्या लगेचच लक्षात आले. दोघींनी एकमेकींना या गोष्टीची कल्पना दिली. आता शालिनीताई आणि वैशालीला धडा शिकवायचा असे या दोघींनी ठरविले.
एक दिवस शालिनीताईंची जाऊ त्यांच्याकडे आली होती. शालीनीताई या गावात नवीन आलेल्या असल्यामुळे त्यांचा बंगला तिला लगेच मिळाला नाही. दुपारचे रखरखीत ऊन पडलेले होते. पत्ता विचारत विचारत जाऊ प्रमिलाताईंकडे आली. प्रमिलाताईंनी तिला घरामध्ये घेऊन पाणी दिले. ती दमलेली असल्यामुळे थोडा वेळ प्रमिलाताईंकडेच बसली. प्रमिलाताईंनी तिला चहा दिला. बोलता-बोलता प्रमिलाताईंनी मुद्दामच एक काडी टाकून दिली -
"वैशाली सांगते की शालिनीताई घरामध्ये नुसत्या बसून असतात. सर्व कामे तिलाच करावी लागतात. पण आत्या असल्यामुळे काही बोलता येत नाही."
प्रमिलाताई - शालीनीताई तर घरातील कामे पटापट उरकतात. आता त्यांचे देखील वय झालेले आहे. आता त्यांना कामे थोडी कमी सांगायची की असं काहीतरी बोलायचं? तुम्ही शालिनीताईंना सांगू नका, नाहीतर त्यांना वाईट वाटेल हो.
शालिनीताईंची जाऊ - वैशालीने शालिनीला असे बोलणे योग्य नाही. शालिनीचे आता वय झालेले आहे. आता तिने आराम केला पाहिजे.
प्रमिलाताई - हे सर्व मी तुम्हाला सांगितले म्हणून कुठे सांगू नका बरे. नाहीतर उगाचच त्यांच्यात भांडणे लागतील.
शालिनीताईंची जाऊ - नाही हो, मी कशाला सांगेन शालिनीला. बरं, मी आता निघते. बराच उशीर झालेला आहे. थँक यु, मला पत्ता सांगितलात.
निशाणा अगदी बरोबर लागला होता. सांगू नको म्हटल्यामुळे शालिनीताईंच्या जाऊबाईंनी मुद्दामच शालिनीताईंना सर्व काही सांगितले. आपली सून प्रमिलाताईंना असे काही सांगते हे ऐकून त्यांना खूप राग आला.
त्याच आळीमधील एका सूनेबरोबर, वैशालीची चांगली मैत्री झालेली होती. ती एकदा ब्युटीपार्लरमध्ये आलेली असताना चित्राने बरोबर पिन मारली. बोलता-बोलता वैशालीचा विषय निघालेला होता.
चित्रा - तुला म्हणून सांगते. वैशालीच्या आईचे आणि वैशालीच्या सासूचे एकमेकींशी पटत नाही बघ. खरे म्हणजे दोघीजणी नणंद - भावजय. पण शालिनीताई वैशालीच्या आईला भांडकुदळ म्हणतात. त्या म्हणतात की मी भावाकडे बघून गप्प बसते. नाहीतर आमच्या वहिनीने वैशालीला चांगलं जेवण कसं करायचं ते पण नाही शिकवलं.
वैशालीची मैत्रीण - अगं पण शालिनीताई आणि वैशालीचे तर चांगले पटते ना?
चित्रा - कसलं काय गं. दिसतं तसं नसतं. बिचारी वैशाली. तिच्या नकळत शालिनीताई तिच्या आईला वाट्टेल तसं बोलतात. पण हे मात्र तू वैशालीला सांगू नको बरं. तिला वाईट वाटेल.
इथेदेखील नेम बरोबर लागला. वैशालीच्या मैत्रिणीने वैशालीला, शालीनीताई तिच्या आई बद्दल काय काय बोलतात ते सर्व सांगितले. आपली आत्या (सासु) आपल्या आई बद्दल असे काही बोलते हे ऐकून वैशालीला खूप वाईट वाटले.
आता शालिनीताई आणि वैशाली दोघींच्या मनात एकमेकींच्या बद्दल थोडा थोडा राग उत्पन्न होऊ लागला. त्यामुळे एकमेकींच्या बारीकसारीक चुका त्यांना आता खूप मोठ्या वाटू लागल्या. याच चुकांकडे पूर्वी त्या दोघीजणी आत्या आणि भाची असल्यामुळे दुर्लक्ष करत. गैरसमजामुळे दोघींमध्ये वाद होत गेले. एक दिवस या सर्वाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. इतके भांडण झाले की वैशाली आता घर सोडून जाण्याच्या तयारीला लागली. वैशालीच्या नवऱ्याला तर आता काय करावे ते कळे नाहिसे झाले.
प्रमिलाताई आणि चित्रा दोघींना जे हवे होते ते घडले. परंतु आता झाली तेवढी शिक्षा पुरे झाली, हे सर्व आता थांबवावे असे देखील त्यांना वाटले. त्यामुळे त्या दोघीजणी शालिनीताईंच्या घरी आल्या. शालिनीताईंचा मुलगा डोक्याला हात लावून बसलेला होता. आपल्या घरातील भांडणे बाहेरच्यांना कळली हे पाहून त्याला लाज वाटू लागली. परंतु प्रमिलाताईंनी त्याला आपण भांडण थांबविण्यासाठी आलेलो आहोत असे सांगितले.
प्रमिलाताईंनी पुढे होऊन शालिनीताई आणि वैशालीला शांत बसण्यास सांगितले.
प्रमिलाताई - आता एकेकीने पुढे येऊन मला भांडणाचे कारण सांगा.
शालिनीताई - वैशालीने माझ्याबद्दल तुमच्याजवळ काय काय सांगितले ते तुम्हाला माहीत आहे ना?
प्रमिलाताई - हे सर्व तुम्हाला कोणी सांगितले?
शालिनीताई - माझ्या जाऊ बाईंनी.
प्रमिलाताई - शालिनीताई, वैशाली तर तुमची सख्खी भाची आणि त्यानंतर सून. तुमची सर्वात लाडकी. तिला खरं काय खोटं काय विचारावं असं तुम्हाला नाही का वाटलं?
शालिनीताई - असं बोललेलं कोणी सांगत का?
प्रमिलाताई - पण जवळच्या व्यक्तीला विचारण्याआधी तुम्ही बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास कसा ठेवलात? विचारा पाहू वैशालीला की, ती असं काही बोलली का माझ्याजवळ?
शालिनीताई - वैशाली खरं सांग, मी घरामध्ये काही काम करत नाही असं तू प्रमिलाताईंजवळ बोललीस कि नाही?
वैशाली - आत्या, मी असं कशाला कुणाला सांगू? तू तर घरातली बरीच काम करतेस.
प्रमिलाताई - शालिनीताई ऐकलत का?
शालिनीताई - मग माझ्या जाऊबाईंनी मला असं कसं सांगितलं?
प्रमिलाताई - वैशालीने माझ्याजवळ असे काहीही सांगितलेले नाही.
शालिनीताई - मग हे सर्व काय चालू आहे?
प्रमिलाताई - थांबा जरा, सर्वकाही कळेल. चित्रा आता तू बोल.
चित्रा - वैशाली आता तुझे म्हणणे सांग.
वैशाली - माझ्या आत्याने माझ्या आई बद्दल तुझ्याजवळ काय काय सांगितले ते सर्व तर तुला माहितीच आहे ना?
चित्रा - हे सर्व तुला कोणी सांगितले?
वैशाली - माझ्या मैत्रिणीने.
चित्रा - अगं शालिनीताई तर तुझी सख्खी आत्या, त्यानंतर सासू. बाहेरच्या कुणावरतरी विश्वास ठेवलास. जवळच्या आत्याला खरं काय खोटं काय विचारावं असं नाही वाटलं का?
वैशाली - म्हणजे माझी आत्या तुझ्याजवळ असं काहीच बोलली नाही का?
शालिनीताई - वैशाली अगं मी वहिनी बद्दल असं कशाला बोलू? कधी आमच्यात मतभेद झाले असतील, परंतु आमच्यात कधीच भांडण झालेलं नाही.
वैशाली - मग माझ्या मैत्रिणीने मला उगाच असं सांगितलं?
प्रमिलाताई - हे सर्व आम्ही दोघींनी केलं. मी आणि चित्राने.
शालिनीताई - पण का?
प्रमिलाताई - तुम्ही आम्हा दोघींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलात.
वैशाली - पण ती तर तुमच्यात नेहमी होतातच.
चित्रा - आमची जरी भांडणे झाली तरी, दुसरा दिवस उजाडायच्या आत आम्ही दोघी एकत्र होतो. बाहेरच्या कोणी जर आम्हाला एकमेकींबद्दल काही वाईट सांगितलं तर आम्ही विश्वास ठेवत नाही. प्रथम एकमेकींशी बोलतो. कारण आम्हाला जरी एकमेकींचा राग आला तरी आम्ही एकमेकींची उणीदुणी बाहेर कुणासमोर काढत नाही. आम्ही घरात कितीही भांडलो, तरी बाहेरच्यांविरुद्ध आम्ही एक आहोत.
प्रमिलाताई - कुणी दुसऱ्याबद्दल एक साधा शब्द चुकीचा उच्चारलेला असेल, तर तिसरा व्यक्ती तोच शब्द उचलून धरतो. त्या शब्दाला तिखट मीठ मसाला लावला जातो. नंतर ते वाक्य नको तिथे बोलले जाते. अशाप्रकारे भांडणे वाढत जातात. शालिनीताई आणि वैशाली तुम्ही दोघीजणी खरे म्हणजे चांगल्या आहात. परंतु आपल्या आळी मधील सासू - सूनांमध्ये तुमच्यामुळे जी काही भांडणे लागली आहेत, ती अशाच एखाद्या छोट्याशा शब्दावरून सुरू झालेली असणार. आता बघितलं ना असं इकडल तिकडे सांगितल्यामुळे काय होतं ते?
शालिनीताई आणि वैशालीला आता त्यांची चूक कळून आली. दोघींनी प्रमिलाताई आणि चित्राची माफी मागितली. इकडले तिकडे करणे शालिनीताई आणि वैशालीने आता सोडून दिले. आळीमधील बायकांना देखील प्रमिलाताई आणि चित्राचे खूप कौतुक वाटले.
समाप्त
- मोहिनी विद्या - भाग १
- मोहिनी विद्या - भाग २
- मोहिनी विद्या - भाग ३
- मोहिनी विद्या - भाग ४
- मोहिनी विद्या - भाग ५ (शेवटचा भाग )