Read best Marathi online gudh katha love story free मराठी
(खालील कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून, तिचा कोणाशीही कसलाही संबंध नाही. या कथेतील सर्व नावे हि कथेत वापरण्यापुरती म्हणून फक्त घेतली आहेत. त्यांचा कोणाशीही संबंध नाही.)
लेखक – केदार शिवराम देवधर (पेण – रायगड)
मायासाधना - भाग १
ठिकाण - महामुंबईतील एक प्रसिद्ध हॉस्पिटल,
एक पेशंट - सर, तुम्ही होतात
म्हणून मी वाचलो. नाहीतर अपेन्डिस फुटल्यामुळे माझा मृत्यू नक्की होता.
डॉक्टर अमोद - अहो, जन्म - मृत्यू आपल्या हातात नसते. पण शेवटच्या
क्षणापर्यन्त यशाची खात्री बाळगून नेटाने प्रयत्न मात्र नक्की करायचे. कधी कधी
आपली दुर्दम्य इच्छा शक्ती मृत्युलादेखील मात देऊ शकते. मी प्रयत्न तर केलेच. पण
तुमची जगण्याची इच्छा प्रबळ होती. शिवाय तुमच्या आई - वडिलांची पुण्याई कामी आली.
पेशंट - ते सर्व बरोबर, पण मी हे नक्कीच नाही विसरणार कि तुम्ही मला वाचवले.
थँक यु .
डॉक्टरांना धन्यवाद देऊन तो पेशंट निघून जातो. तो बरा झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
मिळालेला असतो.
डॉक्टर अमोद हा महामुंबई मधील एक प्रख्यात सर्जन डॉक्टर. याचे वडील
देखील डॉक्टरच, डॉक्टर केशव. महामुंबई
येथे त्यांचे मोठे हॉस्पिटल असते. डॉक्टर असून देखील या बाप - लेकाचा देवावर पूर्ण
विश्वास.
आज शनिवार असल्यामुळे ओ. पी. डी. अर्धा वेळच असते. पेशंट तपासणी
देखील पूर्ण झालेली असते. अमोद आता केबिन मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असतो.
खरं म्हणजे अमोदला संध्याकाळच्या किर्तनाला जायचं असतं. कालच
गुढीपाडवा झालेला असतो. त्यामुळे गावातील शिव मंदिरात नऊ दिवस कीर्तन होणार
असते. काल इमर्जन्सी केस आल्यामुळे
पहिल्या दिवशी त्याला कीर्तनाला जाता येत नाही. परंतु सर्व पेशंट तपासून होईपर्यंत
आज देखील थोडा उशीर झालेला असतो. त्यामुळे तो आजचा प्लॅन देखील काहीशा नाराजीने
कॅन्सल करतो.
एवढ्यात, अक्षता केबिनमध्ये शिरते.
अक्षता म्हणजे अमोदची बाल मैत्रीण. ती एम. एस. सी. बॉटनी होऊन,
तेथीलच एका नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरीला लागलेली असते.
अक्षता - हाय..., ड्युटी संपली की नाही?
अक्षता - ए, आज रात्री काय प्लॅन आहे?
अमोद - काही नाही, आता घरी जाणार, फ्रेश होणार, जेवण झाले की
मस्तपैकी झोपणार.
अक्षता - इतका अरसिक कसा तू? मस्तपैकी वीक एंड आहे, तो एन्जॉय करायचा
सोडून जेवुन झोपा काय काढतोस?
अमोद - वीक एंड असला तरी, एखादी इमर्जन्सी केस आली तर आम्हाला ती
घ्यावी लागते.
अक्षता - हो, पण आत्ता तर मोकळा आहेस ना?
अमोद - मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?
अक्षता - रात्री मुव्ही बघायला चल. ए, नाही म्हणू नकोस. हा हॉरर मुव्ही आहे, म्हणून माझ्या बाकीच्या
मैत्रिणी माझ्याबरोबर येणार नाही आहेत. मी एरवी तुला कधी सांगते का? मला कंपनी हवी
आहे.
अमोद - हे बरं आहे हॉरर मुव्ही बघण्यासाठी चांगला बकरा शोधला आहेस.
आत्ता दोन महिन्यापूर्वी तर जाऊन आलो होतो आपण दोघे.
बाकी, कॉमेडी मुव्ही असेल तर मैत्रिणींना घेऊन जातेस आणि हॉरर मुव्ही
बघायला मी काय?
अक्षता - ए भाव नको खाऊ जास्त. मला माहित आहे तुला हॉरर मुव्ही
आवडतात. तसं पण मी आमच्या मैत्रिणींच्या ग्रुप बरोबर एरवी बोलावते तेव्हा येत
नाहीस.
अमोद - बरं बाई, जाऊ आपण दोघे.
अक्षता - मी ऑनलाईन बुकिंग करते. बरोबर नऊ वाजता मला पिक अप कर.
सव्वा नऊ चा शो आहे. सुरुवात जाता कामा नये.
अमोद - मला देखील मुव्हीची
सुरुवात गेलेली अजिबात आवडत नाही. तयार रहा.
संध्याकाळचे साडेसात वाजलेले असतात. अमोद घरी जाऊन अंघोळ करतो.
तोपर्यंत अमोदचे वडील डॉक्टर केशव घरी येतात. अंघोळ झाल्यावर अमोद आपल्या
आई-वडिलांना रात्रीचे प्लॅनिंग सांगतो.
रमा काकू (अमोदची आई) - हे बरं आहे त्या दिवशी मुव्ही बघायला आम्ही
दोघेजण तुला बोलवत होतो तेव्हा आला नाहीस. आता अक्षताने बोलावल्यावर मात्र जात
आहेस.
अमोद - ए आई, ते फॅमिली ड्रामा मुव्ही, रडा रड मला बिल्कूल आवडत
नाही. मला हॉरर, कॉमेडी किंवा सस्पेन्स मुव्ही आवडतात.
रमा काकू - जा रे, मी गंमत केली. तुमची नवीन पिढीची आवड वेगळी.
डॉक्टर केशव - मस्तपैकी मुव्ही बघून ये, उद्या सकाळी मात्र आरामात
उठ. कारण गेले तीन दिवस तुझी दगदग चालू आहे. मी बाहेरगावी गेल्यामुळे तुझ्यावरच
लोड पडला. उद्या काही इमर्जन्सी आल्यास मी बघेन.
जेवण झाल्यावर अमोद तयार होतो. तो त्याची फोर व्हीलर काढतो. अक्षताचा
बंगला बाजूलाच असतो. हॉर्न देऊन तो तिला बोलावतो. दोघेही वेळेवर पोहोचतात.
मुव्ही खूपच इंटरेस्टिंग असतो. इंटरवलला पॉपकॉर्न व कोल्ड्रिंक होते.
मूव्ही संपेपर्यंत साडेबारा वाजतात. दोघेही घरी जायला निघतात. गाडी सुरू होते.
अक्षता - खूपच हॉरर मूव्ही होता. माझ्या मैत्रिणी तर खूपच घाबरल्या
असत्या.
अमोद (हसत) - पण तू तर चुडेल आहेस.
अक्षता - काही पण बोलू नकोस, काकूंना नाव सांगेन.
अमोद (हसत) - बरं बाई, सॉरी. नाहीतर पुढच्या वेळेस मूव्ही बघायला तू
मला नेणार नाहीस.
अक्षता - त्यात काय एवढं, तु तुझ्या मित्रांबरोबर का जात नाही?
अमोद - पूर्वी जायचो. पण आता मित्र तरी ठिकाणावर पाहिजेत ना? बरेचसे
मित्र इंजिनियरिंगला गेल्यामुळे आता बाहेरगावी नोकरीला आहेत. कुणाल इथेच आहे, तो
त्याच्या वडिलांची फॅक्टरी सांभाळतो. पण त्याला मूव्ही फार आवडत नाही.
अक्षता - मग आमच्याबरोबर का येत नाहीस?
अमोद - एवढ्या मुलींबरोबर मी काही येणार नाही.
अक्षता - अरे बऱ्याचशा बारावीपर्यंत आपल्या वर्गातच होत्या की?
अमोद - तू माझी बाल मैत्रीण म्हणून तुझ्याबरोबर येतो. बाकीच्या मुली
असतील तेव्हा मी काही येणार नाही.
अक्षता - ठीक आहे.
तोपर्यंत दोघेही घरापर्यंत पोहोचतात. एकमेकांना गुड नाईट म्हणून ते
निरोप घेतात.
दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे अमोद आरामात उठतो. अमोद बातम्या
बघून झाल्यावर अंघोळ करून घेतो. त्यानंतर नित्यनेमाप्रमाणे थोडेसे नामस्मरण
करतो. तेवढ्यात अक्षता कोथिंबिरीच्या
वड्या घेऊन येते.
रमा काकू - अरे वा अक्षता, तू केल्यास का कोथिंबिरीच्या वड्या?
अक्षता - हो काकू, बघा कशा झालेत?
एवढ्यात अमोद येऊन एक वडी तोंडात टाकतो.
अमोद - व्वा, वड्या एकदम मस्त झाल्या आहेत. अक्षता, स्वयंपाक करायला
शिकलीस बरं.
रमा काकू - अक्षता, आता कॉफी पिऊन जा. अमोद साठी कॉफी करत आहे.
अक्षता - चालेल काकू.
रमाकाकू दोघांसाठी कॉफी घेऊन येतात.
अमोद ( कॉफी पिताना) - अक्षता, मी आज संध्याकाळी कीर्तनाला जाणार
आहे. येणार आहेस का?
अक्षता - आत्ता कसले कीर्तन? आणि अमोद तू कीर्तनाला जात आहेस? तिकडे कंटाळा नाही का
येणार? या वयात देव देव कसलं करतोस?
रमा काकू - अगं, चैत्र महिना सुरू झालेला आहे ना? आपल्या इथे वरच्या
आळीतील शिव मंदिरात रोज नऊ दिवस कीर्तन असते नाही का? चल तू पण. किर्तनाला जाणं
चांगलं असतं. मी आणि तुझी आईदेखील येणार आहोत.
अमोद - कीर्तनामुळे महादोष
जाऊन, उत्तम गती प्राप्त होते.
अक्षता - चालेल काकू मी देखील येईन. अमोद तू मात्र भारीच तत्त्वज्ञान
सांगायला लागलास.
अमोद (हसत) - साडी नेसून यावं लागेल बरं.
रमा काकू - अमोद, तू गप्प बैस रे. अक्षता, तू पंजाबी ड्रेस वर आलीस
तरी देखील चालेल बरं. लहानपणी नाही का तू आमच्याबरोबर ड्रेस वरच यायचीस? नंतर
अभ्यास वाढत गेल्यावर तुम्ही मुलं येत नव्हता.
संध्याकाळी किती वाजता जायचं? असे विचारून अक्षता तेथून जाते.
जेवून, थोडा वेळ वामकुक्षी झाल्यावर अमोद उठतो. आटोपल्यावर अमोद गाडी
काढतो. तिथूनच तो अक्षता आणि तिची आई मालती काकू यांना हाक मारतो. तोपर्यंत
रमाकाकू तयार होऊन बाहेर येतात.
तेवढ्यात आमोदचे लक्ष अक्षताच्या बंगल्याकडे जाते. ती चक्क साडी
नेसून बंगल्यातून बाहेर येत असते. मोरपीशी रंगाची साडी तिच्या गोऱ्या रंगाला उठून
दिसत असते. दोन मिनिटे अमोद तिच्याकडे बघतच बसतो. या रूपात त्याने तिला पूर्वी कधी
बघितलेली नसते.
अक्षता बंगल्याच्या बाहेर येऊन अमोदला हाय करते.
रमाकाकू अमोदच्या शेजारच्या सीटवर आणि त्या दोघी मायलेकी मागच्या
सीटवर बसतात.
गाडी शिवमंदिराचे बाजूला जाऊन थांबते. सर्वजण देवाचे दर्शन घेतात.
किर्तन सुरु होण्यासाठी अजून पाच ते दहा मिनिटे असतात. तबला व पेटी लावण्याचे काम
सुरू असते. खूप गर्दी झालेली असते. कीर्तनाला सुरुवात होते. पूर्वरंग सुरू होतो.
जन्म घेतल्यावर या देहाचे सार्थक कशामध्ये आहे हा विषय कीर्तनकार
बुवा स्पष्ट करून सांगत असतात. शेवटी मोक्ष मिळविण्यासाठी सद्-गुरू शिवाय सोय नाही
असे ते सांगतात. अमोद तल्लीन होऊन कीर्तन ऐकत असतो. त्यानंतर कीर्तनाचा उत्तर रंग
देखील पूर्ण होतो.
अमोदच्या मनात अनेक प्रश्न घोळत असतात. शेवटी तो बुवांची भेट घेऊन
बुवांना काही प्रश्न विचारतो. अजून राम नवमीपर्यंत दररोज कीर्तनाला ये, त्यामध्ये
पूर्व रंगांमध्ये तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे बुवा त्याला सांगतात.
परंतु संध्याकाळी ओपीडी असल्याचे कारण तो बुवांना सांगतो. इच्छा असल्यास मार्ग
नक्कीच मिळतो असे बुवा त्याला सांगतात. प्रयत्न करतो असे सांगून अमोद तेथून बाहेर
पडतो.
अक्षता ( गाडीमध्ये बसल्यावर) - बुवांशी इतका वेळ काय बोलत होतास?
अमोद - सद्-गुरू म्हणजे नक्की काय? ते मला कसे भेटतील? असे प्रश्न
मला कीर्तन ऐकल्यावर पडलेले आहेत. तेच मी बुवांना विचारत होतो
मालती काकू - बघ अक्षता, असे प्रश्न पडावे लागतात बरं. अमोद, तुला
चांगला प्रश्न पडलेला आहे.
अक्षता - ए आई, हे अध्यात्म वगैरे मला फारसं काही कळत नाही. तसं पण
हा अमोद लहानपणापासूनच देव देव करत आहे. याचं पुढे कसं होणार कोणास ठाऊक?
मालती काकू - अक्षता, देवाचं नाव घेऊन कोणाचं कधी नुकसान होत नाही.
झाला तर फायदाच होतो.
थोड्याच वेळात गाडी बंगल्यापाशी पोहोचते. तोपर्यंत डॉक्टर केशव आणि
दामोदर काका (अक्षताचे वडील) दोघेही तेथे पोहोचतात. दामोदर काकांचे फाइव स्टार
हॉटेल असते. आज संध्याकाळी तेथेच सीनियर डॉक्टरांची कॉन्फरन्स असते. त्यामुळे
डॉक्टर केशव तिकडेच असतात. दामोदर काकांचे हॉटेल असल्यामुळे अरेंजमेंट साठी
त्यांना तेथे राहणे भाग असते. कॉन्फरन्स आटोपल्यावर दोघेही एकत्र घरी येतात.
किर्तन कसे झाले वगैरे दोघेही चौकशी करतात. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात.
रात्री झोपताना विचार करतच अक्षता बेडवर आडवी पडते. हा अमोद असा काय
वेड्यासारखा देवाच्या मागे लागलेला आहे हे तिला कळत नसते. अमोद दिसायला गोरा पान
आणि सुंदर असतो. त्याचा स्वभाव देखील मनमिळावू असतो. लहानपणापासून एकत्र
खेळल्यामुळे अक्षता हळूहळू त्याच्या प्रेमात पडू लागलेली असते. दोन्ही घरांमधून
लग्नाला विरोध होणार नाही हे तिला नक्की माहित असते. अमोदच्या मनात मात्र
आपल्याविषयी काय आहे हे तिला अजून कळलेले नसते. मैत्रीण म्हणून त्याला ती नक्कीच जवळची आहे, हे
तिला देखील माहित असते.
इकडे बेडवर पडल्यावर अमोदच्या डोळ्यासमोर देखील अक्षता येत असते.
कारण आज साडी मध्ये त्याने तिला प्रथमच पाहिलेली असते. तसं म्हणायचं तर अमोदला
देखील अक्षता आवडायची. पण आज काही वेगळीच जादू अक्षता करते. त्याचबरोबर राम
नवमीपर्यंत संध्याकाळी कीर्तनाला कसे जायचे याचा विचार देखील अमोदच्या मनात येत
असतो. तेवढ्यात त्याला सुचते की सकाळी लवकर ओपीडी सुरू करावी आणि संध्याकाळी अर्धा
वेळ काम करावे. पुढची ओपीडी बाबा सांभाळतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच अमोद उठतो. अंघोळ, नामस्मरण सर्व काही आटोपून लवकरच तो हॉस्पिटलमध्ये
जाण्यासाठी तयार होतो.
डॉक्टर केशव - अरे हे काय, इतक्या लवकर कुठे निघालास?
अमोद - बाबा, लहानपणी मी कीर्तनाला जायचो, पण तेव्हा मला फारसे काही
कळत नव्हते. मी फक्त गोष्टी ऐकायचो. गेली काही वर्षे मेडिकलच्या अभ्यासामुळे मला
कीर्तनाला जाता आले नाही. पण यावर्षी मात्र मी कीर्तनाला जायचे ठरवले आहे.
त्यामुळे राम नवमी च्या आदल्या दिवसापर्यंत सकाळी लवकर उठून मी हॉस्पिटलमध्ये जाईन
तेथे ओपीडी सांभाळेन. संध्याकाळी मात्र अर्धा वेळच काम करेन. पुढची ओपीडी प्लीज
तुम्ही सांभाळा.
डॉक्टर केशव - एवढेच ना? दरवर्षी काहीतरी ॲड्जस्ट करून संध्याकाळी मी
कीर्तनाला जायचो. यावर्षी तु जा.
अमोद ( आईला हाक मारून) - आई, आज संध्याकाळी मी देखील कीर्तनाला
येणार आहे. लवकर आटोपून तू आणि मालती काकू तयार रहा.
अमोद हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील काम उरकून घेतो. अक्षता चे कॉलेज
सकाळचे असते. त्यामुळे तिला मेसेज करून आज देखील संध्याकाळी किर्तनाला ती येणार
आहे का असे विचारतो. तसे म्हणजे अक्षताला कीर्तन भजन याची आवड नसते. पण कालचे
कीर्तन तिला देखील आवडलेले असते. तसेच अमोद येणार असल्यामुळे ती किर्तनाला येण्यासाठी तयार
होते.
दुपारच्या जेवणासाठी अमोद घरी येतो. परंतु जेवण झाल्यावर लगेचच तो
हॉस्पिटलमध्ये जातो.
ठरल्याप्रमाणे चौघेजण कीर्तनाला जातात. आज अक्षताने गुलाबी रंगाची
साडी नेसलेली असते. कालच्या पेक्षा ती आज जास्त सुंदर दिसत असते. आजचे देखील
किर्तन अमोद मनापासून ऐकतो. अशाप्रकारे राम नवमी पर्यंत चौघेजण दररोज किर्तनाला
जातात. राम नवमीच्या किर्तनाला या चौघांबरोबर दामोदर काका आणि डॉक्टर केशव देखील
येतात.
राम नवमीच्या कीर्तनानंतर अमोद कीर्तनकार बुवांची भेट घेतो. कीर्तनातून
चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल तो त्यांचे आभार मानतो. मला सद्-गुरू कसे भेटतील
असे तो त्यांना विचारतो. वेळ आली की सर्व काही आपोआप घडून येईल, तोपर्यंत तू जमेल
तेवढे नामस्मरण करत रहा असे कीर्तनकार बुवा त्याला सांगतात.
कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण घरी जायला निघतात. डॉक्टर केशव गाडी
चालवत असतात. अमोद मात्र विचारात गर्क असतो.
दामोदर काका - काय रे अमोद कसल्या विचारात गर्क आहेस?
अमोद - आपल्या जवळपास कोणी सद्-गुरू आहेत का या विचारात आहे.
दामोदर काका - सद्-गुरू भेटणे खूप दुर्मिळ असते. आजूबाजूला बघितले तर
भरपूर ढोंगी लोक दिसतात. ते लोकांना आपल्या नादी लावतात. आणि स्वतःचा आर्थिक
स्वार्थ साधून घेतात.
अमोद - मग यातून खरे सद्-गुरू कोण ते कसे ओळखायचे?
दामोदर काका - आपले "भाऊ काका" आहेत ना ते खरे सद्-गुरू
आहेत बघ.
डॉक्टर केशव, रमाकाकू आणि मालती काकू या गोष्टीला दुजोरा देतात.
अमोद - तुम्ही काय सांगताय तरी काय? भाऊ काका चांगले व्यक्ती आहेत हे
मला ठाऊक आहे. पण ते सद्-गुरू आहेत हे जरा जास्तच होतंय.
डॉक्टर केशव - अमोद, असंच असतं. जग झगमगाटाला फसते. सद्-गुरू हे
डोंगर - दरी, जंगल फक्त अशाच ठिकाणी रहात नाहीत. ते समाजात देखील असतात. फक्त
त्यांना ओळखावे लागते.
अमोद - तुमच्यापैकी कोणी भाऊ काकांकडून अनुग्रह घेतलेला आहे का?
मालती काकू - खरं म्हणजे आम्ही कोणी अनुग्रहाचा विचार केलेला नव्हता.
भाऊ काका आपल्या सर्वांच्या चांगलेच परिचयाचे आहेत, तसेच आपल्या दोन्ही कुटुंबाचे
ते लांबचे नातेवाईक आहेत. आपले त्यांच्याकडे घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे गुरु
शिष्य अशा नात्याचा आम्ही कोणी विचारच केलेला नव्हता. तरीपण ते जे काही अध्यात्मिक मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे आपण
वागतो.
रमाकाकू - खरं म्हणजे आपलं चुकलंच. काही लोकांना भाऊ काकांनी
अनुग्रहित केलेले आहे. परंतु भाऊ काका आपल्या परिचयातील असल्यामुळे आपल्या
कोणाच्या लक्षातच आले नाही कि यांना गुरुस्थानी मानावे.
अमोद - भाऊ काकांकडे काही सिद्धी आहेत का?
डॉक्टर केशव - असे तरी कधी जाणवले नाही. परंतु ते जो काही अध्यात्मिक
उपदेश करतात तो नक्कीच फायद्याचा असतो.
अक्षता - अमोद, या वयात तू काय देव देव करतो आहेस? सद्-गुरू वगैरे
विचार आपल्या आई-बाबांनी करायचा. आपण या वयात लाइफ एन्जॉय करायचे असते.
दामोदर काका - अगं, अमोदला असे प्रश्न पडतात हि नक्कीच चांगली गोष्ट
आहे. तू देखील थोडं देवाचं नामस्मरण करत जा. देवाचे नामस्मरण करण्यासाठी वय कधीच
आड येत नाही.
अक्षता - मी फक्त देवाला नमस्कार करते. ते नामस्मरण वगैरे मला जमत
नाही.
मालती काकू - नशीब आमचं, नमस्कार तरी करतेस.
भाऊ काका जरी चांगले व्यक्ती असले तरी ते नक्कीच सद्-गुरू असू शकत
नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही सिद्धी नाहीत. आपल्या घरचे काहीतरी चुकीची माहिती
सांगत आहेत. आजच्या काळात सिद्धपुरुष सापडणे फारच दुर्मिळ आहे. असा विचार अमोद
करतो.
तोपर्यंत गाडी बंगल्यापर्यंत पोहोचते. सर्वजण आपापल्या घरात जातात.
आज सकाळची ओपीडी बंद असते. संध्याकाळी मात्र अमोद आणि डॉक्टर केशव
दोघेजण हॉस्पिटलमध्ये जातात.
रात्रीचे साडेदहा वाजलेले असतात. आज रात्री अमोदला लवकर झोप येत
नसते. तो सोशल मीडियावर जातो. त्याला अक्षता ऑनलाइन दिसते. तो तिला काय करत आहेस
म्हणून विचारतो? ती टेरेसवर शतपावली करण्यासाठी गेलेली असते. अमोददेखील त्याच्या
बंगल्याच्या टेरेसवर जातो.
अमोद - का कुणास ठाऊक पण आज झोप येत नाही आहे? तू अजून झोपली नाहीस
का?
अक्षता - आता झोपायला जाणार होते तेवढ्यात तुझा मेसेज आला म्हणून
थांबले.
अमोद - ओह..., सॉरी
माझ्यामुळे तुला उगाच जागरण नको. तु जा झोपायला.
अक्षता - तू आता पूर्वीचा अमोद राहिलेला नाहीस. पूर्वी कंटाळा आला की
तू स्वतःहून आमच्या घरी यायचास. आता मात्र फॉर्मॅलिटी पाळतोस.
अमोद - इमर्जन्सी केसेस आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कधी कधी बराच वेळ
निघून जातो. त्यामुळे मला इच्छा असून देखील कोणाकडेच जाता येत नाही. पण खरंच सॉरी,
तुला उद्या लवकर उठायचे असेल, कॉलेज आहे ना?
अक्षता - इट्स ओके. मी आज लवकर नाही झोपले तरी चालेल. कारण उद्या मी
लिव्ह टाकलेली आहे. उद्या माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा आहे.
अमोद - कोण ग ?
अक्षता - चित्रा, आपल्याबरोबर बारावीपर्यंत होती ना ती.
अमोद - हो, मला माहित आहे ती. तिचे सासर कुठचे आहे?
अक्षता - कुठे म्हणजे काय, इथेच महामुंबईत. तुला आठवत नाही का?
आपल्या वर्गातील निखिल तिचा मित्र होता.
अमोद - हो पण मला वाटायचं की ते फक्त फ्रेंड आहेत.
अक्षता - तुला ना, काही कळतच नाही.
अमोद - मी मेडिकलला गेल्यापासून निखिलशी माझा फारसा कॉन्टॅक्ट
नव्हता.
अक्षता - पण तुला तुझे मित्र काहीच बोलले नाहीत या दोघांबद्दल?
अमोद (गंमतीने) - मग, माझे सगळे मित्र आहेतच मुळी सिन्सिअर.
अक्षता - काही पण सांगू नकोस. एकापेक्षा एक नग आहेत.
अमोद - तो बारावी नंतर इंजीनियरिंग साठी खूप लांब गेलेला असल्यामुळे
आमचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला होता.
यांचे लग्न सहजासहजी जुळून आले की घरून काही विरोध झाला?
अक्षता - नाही, विरोध झाला नाही. कारण दोन्ही मुले चांगली होती.
यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरच्यांना कल्पना आलेली होती. त्यामुळे निखिलने
त्याच्या वडिलांचा उद्योग सांभाळायला सुरुवात केल्यावर लगेचच लग्नाचा विषय
घरच्यांनी काढला.
अमोद - पण खूपच लवकर लग्न करत आहेत ते.
अक्षता - मला तर यात काहीच गैर वाटत नाही. त्या दोघांचे एकमेकांवर
प्रेम होते. वेळेवर लग्न होत असेल तर उत्तमच आहे.
असाच शाळा कॉलेजच्या गप्पांमध्ये दोघांचा थोडा वेळ निघून गेला. आता
अमोदला झोप येऊ लागली. आता रात्रीचे साडेअकरा वाजलेले होते.
अमोद - बरे झाले तू भेटलीस. तुझ्याशी गप्पा मारून मला बरे वाटले. आता
मला झोप येऊ लागली आहे. पण, तुला जर झोप येत नसेल तर मी थोडा वेळ थांबतो.
अक्षता - मी पण आता झोपते. परत तुला कधी कंटाळा आला किंवा एकट वाटलं
तर मला हक्काने सांग.
अमोद - हो नक्की, गुड नाईट
अक्षता - गुड नाईट
असेच २- ३ दिवस निघून जातात. एके दिवशी अमोद त्याच्या आवडत्या व्लॉगरचा (म्हणजे प्रशांतचा) व्हिडिओ बघत असतो. हा व्लॉगर गुढगोष्टींवर व्हिडिओ बनवायचा. एक नवीन व्हिडिओ आलेला असतो. विद्याधर नावाचे एक मोठे तांत्रिक असतात. त्यांच्याकडे खूप मोठ्या सिद्धी आहेत असा दावा या व्लॉगरने केलेला असतो. उत्तराखंड येथील "नीलमणी" नावाच्या हिमशिखराच्या पायथ्याशी यांचे वास्तव्य असते. तेथील एका गुहेमध्ये त्यांची साधना चालू असते.
अमोद हा प्रशांतचा अगोदर पासून फॅन असतो. योगायोग म्हणजे प्रशांत हा
महामुंबईत काही महिन्यांपूर्वी आलेला असताना, त्याचे एक इमर्जन्सी ऑपरेशन करायची
वेळी येते. ते ऑपरेशन अमोदकडून यशस्वीरित्या पार पाडले जाते. ऑपरेशनच्या वेळी
अमोदच्या लक्षात येते की हा आपला आवडता व्लॉगर आहे. तेव्हा अमोद आणि प्रशांतची
समोरासमोर ओळख होते.
अमोद लगेचच प्रशांतला कॉल करून या व्हिडिओ बद्दल अधिक माहिती
विचारतो. या ठिकाणावर कसे जायचे वगैरे देखील तो विचारून घेतो. प्रशांत त्याला ठाऊक
असलेली सर्व माहिती अमोदला सांगतो. अमोद त्याचे आभार मानतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा