लेखक – केदार शिवराम देवधर (पेण – रायगड)
मायासाधना भाग - ४
शर्मिष्ठा - काही नको, गंमत केली.
अमोद - तू गंमतीत बोललीस. पण मला तुला काहीतरी द्यायला पाहिजे. काय
देऊ?
शर्मिष्ठा - मग आज संध्याकाळी कॉफी पार्टी करू.
कॉफी हाऊसला. आहे का वेळ तुला.
अक्षता हि अमोदची बालमैत्रीण असल्यामुळे तिच्याबरोबर कुठे जायला
अमोदला संकोच वाटत नसे. परंतु दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर तो असा फिरलेला नसतो. पण
शर्मिष्ठाला नाही म्हणणे त्याला जमत नाही.
अमोद - चालेल, जाऊ आज संध्याकाळी. आपण अक्षताला पण बरोबर नेऊ या का?
शर्मिष्ठा - हो चालेल.
अमोद लगेचच अक्षताला मोबाईलवर
कॉल करतो आणि कॉफी हाऊसला संध्याकाळी येशील का असे विचारतो. पण अक्षताच्या
मैत्रिणीचा बर्थडे असल्यामुळे ती संध्याकाळी तिकडे जाणार असते. त्यामुळे ती आज नको
असे सांगते. शर्मिष्ठादेखील बरोबर येणार आहे हे तिला माहित नसते.
अमोद - शर्मिष्ठा, आपण दोघेच जाऊ. अक्षताला आज वेळ नाही. अक्षता आली
असती तर बरे झाले असते.
शर्मिष्ठा - का रे, माझ्याबरोबर यायला तुला आवडणार नाही का? तू मला
मैत्रीण मानत नाहीस का?
अमोद - नाही, मी सहज म्हणालो. ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे
ना. मी येतो संध्याकाळी कार घेऊन. ५ वाजता जाऊ. तयार रहा.
शर्मिष्ठा - ओके
अमोद तेथून बाहेर पडतो. घरी जेवण झाल्यावर थोडी वामकुक्षी करतो.
साडेचार वाजता तो झोपून उठतो. तयार होतो. आई - वडील देवळात गेलेले असतात. त्यामुळे
बंगल्याला लॉक करून तो बाहेर पडतो. एक एक चावी आई - वडीलांकडे नेहमी असे. त्यामुळे
लॉकच्या चावीचा
प्रश्न नव्हता.
अमोद कार काढतो. शर्मिष्ठाच्या बंगल्याबाहेर येऊन हॉर्न देतो.
शर्मिष्ठा सुंदर लाल साडी नेसून तयार असते. ती गाडीत येऊन अमोदच्या बाजूला बसते.
अमोद (कार सुरु करत) - आज चक्क साडी?
शर्मिष्ठा - मला आवडते साडी नेसायला. का रे चांगली नाही का दिसत?
अमोद - तू मुळातच खूप सुंदर आहेस. इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत बघितली नव्हती. त्यात
तुला साडी खुपच उठून दिसते.
शर्मिष्ठा (लाजत) - उगाच खोटी स्तुती करू नकोस.
हे असे मी पटकन काहीतरीच बोलून गेलो असे अमोदला वाटू लागते. परंतु शर्मिष्ठा खरंच खूप सुंदर
असते. त्यामुळे अमोदच्या तोंडून तिची स्तुती होऊन जाते.
अमोद - मी खरं तेच बोलतोय.
दोघेजण कॉफी हाऊसला पोहोचतात. अमोद २ स्पेशल कॉफी ऑर्डर करतो.
अमोद - शर्मिष्ठा, तू जेव्हा पहिल्यावेळी आमच्या घरी आलीस
तेव्हापासून मला असे वाटत आहे कि मी तुला कुठे तरी बघितले आहे. कुठे ते मात्र आठवत
नाही.
शर्मिष्ठा - कसं शक्य आहे? अरे, साधारण एक सारखी दिसणारी माणसे असतात. तू दुसऱ्या कोणत्या तरी
मुलीला बघितले असशील.
अमोद - असेल कदाचित.
दोघेजण गप्पा मारत कॉफी पितात.
२ ते ३ दिवस जातात. अमोद दररोज दुपारी शर्मिष्ठाकडे जाऊन शेअर
मार्केट विषयी शिकत असे. शर्मिष्ठा त्याला आता एक डी मॅट अकाउंट काढायला सांगते.
जे शेअर मार्केट ट्रँझॅकशन साठी आवश्यक असते. पुढे ३ ते ४ दिवसांत अमोदचे डी मॅट
अकाउंट सुरु होते.
आता शर्मिष्ठा त्याला शेअर मार्केट प्रॅक्टिकली शिकवणार असते. अमोद
सकाळी साडेदहाला हॉस्पिटलला जात असे. शेअर मार्केट सकाळी सुरु होत असल्यामुळे
सकाळी ९ ते १० दरम्यान तू माझ्याकडे ये असे शर्मिष्ठा त्याला सांगते.
ठरल्याप्रमाणे आता अमोद सकाळी ९ ते १० यावेळेत शर्मिष्ठाकडे जाऊ
लागतो. थोडे थोडे शेअर ती त्याला खरेदी करायला शिकवते. थोड्याच दिवसात अमोदला चांगला प्रॉफिट होऊ लागतो. शर्मीष्ठाच्या
सल्ल्याने अमोद शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असे. त्यामुळे त्याचा नेहमीच फायदा
होऊ लागला.
आता दोघांमध्ये मैत्री अधिक घट्ट होऊ लागते. वरचेवर दोघांचे बाहेर
फिरणे, कॉफी हाऊस, मुव्ही बघायला जाणे वाढू लागते.
अमोद आणि शर्मिष्ठाची वाढत जाणारी मैत्री अक्षताच्या लक्षात येऊ
लागते. सुरुवातीला ती हे सर्व सिरिअसली घेत नाही. पण आता अमोद आणि शर्मिष्ठाची
मैत्री तिला खटकू लागते. अमोद आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना अशी तिला भीती
वाटू लागते.
एकदा वीक एंडला अमोद आणि शर्मिष्ठा रात्री मुव्ही बघायला जातात.
नेहमीच अमोदचे ड्रायविंग स्लो आणि सेफ असे. परत येत असताना चुकीच्या साईडने येऊन एक बाईक यांच्या फोर व्हीलरवर धडकते.
बाईकवर दारू प्यायलेले दोन तरुण असतात. प्रथम अमोद सामंजस्याने वागतो. तुम्हाला
कुठे लागले तर नाही ना? असे तो विचारतो. परंतु ते तरुण उलट दादागिरी करत
अमोदलाच धमकाऊ लागतात.
आपली चूक नसताना यांची दादागिरी पाहून अमोददेखील चिडतो. तेथे
कडाक्याचे भांडण होते. ते दोन तरुण अमोदला मारायला धावतात. अमोद ताकदवान असतो.
परंतु दोघांपुढे अमोदची ताकद कमी पडू लागते. तेवढ्यात विजेच्या वेगाने शर्मिष्ठा
फोर व्हीलरमधून बाहेर पडते. ती त्या दोन तरुणांवर तुटून पडते. अचानक झालेल्या
हल्ल्यामुळे ते तरुण गांगरतात. पण लगेचच ते प्रतिकार करायला सज्ज होतात. परंतु
शर्मिष्ठापुढे दोघांचे काहीच चालत नाही. ते दोघे तिच्या हातून सपाटून मार खातात.
तिच्या ताकदीचा त्यांना अंदाज येत नाही. त्यांची नशा खाडकन उतरते. अजून इथे
थांबल्यास आपले काही खरे नाही हे ओळखून ते दोघे तरुण बाईक वर बसून पसार होतात.
शर्मिष्ठाचा रणचंडीचा तो अवतार पाहून अमोददेखील आश्यर्यचकित होतो.
अमोद - शर्मिष्ठा, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे. तू
हे सर्व कसे काय केलेस.
शर्मिष्ठा - अरे, मी कराटे ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे.
अमोद - अग, पण हे तुझ्या जीवावर बेतले असते. या लोकांकडे कधी कधी शस्त्रे देखील असतात.
शर्मिष्ठा - अमोद, माझ्यासाठी हे काहीच नाही. मी यापेक्षा जास्त
लोकांशीदेखील फाईट करू शकते. आमचे ट्रेनिंग हार्ड असते. तुझ्यावर कोणी हल्ला केला
तर मी अजिबात गप्प बसणार नाही.
त्यानंतर दोघेजण आपापल्या घरी जातात.
अमोदची साधना दररोज सुरूच असते. तो विचार करत असतो, कि इतकी साधना
करूनदेखील मला अजून काहीच अनुभव कसा आला नाही? मनःशांती पण नाही.
एक दिवस संध्याकाळी मालती काकू आणि दामोदर काका हे दोघेजण
भाऊकाकांकडे जायला निघतात. जाताना मालतीकाकू
अक्षतालादेखील येतेस का असे विचारतात. अक्षतादेखील यायला तयार होते.
दामोदर काका आणि डॉ. केशव यांच्या सर्व कुटूंबाचे भाऊकाकांकडे जाणे
येणे असे. भाऊ काका हे पेशाने प्रोफेसर होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले
होते. ते त्यांच्या पत्नीबरोबर म्हणजे
संध्याकाकूंबरोबर महामुंबईच्या बाजूच्या एका छोट्या गावात रहात असत. लांबच्या
नात्याने भाऊकाका हे दामोदरकाकांचे चुलत काका लागत. तसेच भाऊकाकांची पत्नी
संध्याकाकू या अमोदच्या आईच्या (म्हणजे रमाकाकूंच्या) लांबच्या नात्याने आत्या
लागत.
तिघेजण भाऊकाकांकडे पोहचतात. भाऊकाका आणि संध्याकाकू सर्वांचे स्वागत
करतात. चहापाणी होते. गप्पा रंगतात.
भाऊकाका - अक्षता, तू आणि अमोद हल्ली आमच्याकडे येत नाही. अमोदचे
सध्या काय चालू आहे?
अक्षता - काका, कॉलेजची नोकरी आहे ना! तिथे बराच वेळ जातो. बऱ्याच
दिवसांत तुमच्याकडे आले नव्हते. आज आईने विचारल्यावर मी लगेच तयार झाले. अमोद मात्र त्याच्या हॉस्पिटलमध्ये फार बिझी आहे.
भाऊकाकांच्या बाजूलाच दामोदर काकांचे मित्र रहात असतात. दामोदर
काकांना त्यांच्याकडेदेखील जायचे असते. अक्षता मात्र सांगते कि ती भाऊकाकांकडेच
थांबेल. घरी जाताना हाक मारायला ती सांगते. त्यामुळे दामोदर काका आणि मालती काकू
दोघेजणच त्यांच्या मित्राकडे जातात.
अक्षताचे मन थाऱ्यावर नसते. अमोद आणि शर्मिष्ठाची वाढती मैत्री तिला
खटकत असते. काहीतरी गडबड आहे, हे
भाऊकाकांसारख्या ज्ञानी माणसाच्या लगेच लक्षात येते. ते तिला काही अडचण आहे का असे
विचारतात. ते अमोदची देखील परत चौकशी करतात.
अक्षता - हल्ली अमोद पूर्वीसारखा वागत नाही माझ्याबरोबर.
भाऊकाका - म्हणजे कसा वागत नाही ते जरा नीट सांग.
अक्षता - पूर्वी अमोद मला सर्व काही सांगायचा. आम्ही वरचेवर भेटायचो.
पण आता त्याच्या आयुष्यात ती शर्मिष्ठा आली आहे ना! स्वतःला ती जास्त शहाणी समजते.
भाऊकाका - हि शर्मिष्ठा कोण? तिच्यात आणि अमोदच्यात काही सिरीयस चालू
आहे का?
अक्षता - ती फॅशन डिझायनर आहे. तसेच शेअर मार्केटचे देखील तिला
चांगले नॉलेज आहे. त्या दोघांच्यात नक्की काय चालू आहे ते मला माहित नाही.
भाऊकाका (मुद्दाम) - जाऊ दे ना, दोघांनी लग्न केले तरी आपल्याला काय
करायचे आहे? आपण अशिर्वाद देण्याचे काम करणार. काय संध्या मी बरोबर म्हणतोय ना?
अक्षता - काका तसं नाही, पण....
भाऊकाका (मुद्दाम) - शर्मिष्ठा स्वभावाने चांगली मुलगी नाही का? ती
अमोदला फसवेल का? तसं काही असेल तर सांग. आत्ता अमोदच्या आई - वडिलांना कळवतो.
अक्षता - काका, आता तुम्हाला कसे सांगू?...
संध्याकाकू - अहो पुरे करा आता मस्करी. बिचाऱ्या अक्षताला का त्रास
देत आहात. आपल्याला हि दोन पोर नवीन आहेत काय?
भाऊकाका (हसत) - पण अक्षताच्या मनात काय आहे हे तिने स्वतःहून
आपल्याला नको का सांगायला? आपल्याला नाही, तरी
निदान अमोदला तरी सांगितले पाहिजे.
अक्षता - मी काय त्याला सांगणार?
संध्याकाकू - आता तू एवढी शिकलीसवरलेली मुलगी. तू लाजतेस काय गं
सांगायला त्याला.
भाऊकाका - तू त्याला स्पष्ट सांग, कि तुझे त्याच्यावर प्रेम आहे.
लग्न कर म्हण माझ्याशी.
अक्षता - काका काकू, तुम्हाला कसे कळले?
भाऊकाका - मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो.
अक्षता - आधी अमोद मला सर्व काही सांगायचा. तो तिकडे विद्याधर
महाराजांना भेटून आला, तोपर्यंत मला सर्व काही सांगत होता. पण आता कुठून ती
शर्मिष्ठा आली, अन् सगळी गडबड झाली.
भाऊकाका - तो विद्याधर महाराजांकडे का गेला होता?
अक्षता आता कीर्तनापासून अमोदची अध्यात्माकडे निर्माण झालेली ओढ, पुढे विद्याधर
महाराजांना तो कसा भेटायला गेला हे सर्व थोडक्यात सांगते.
भाऊकाका - विद्याधर महाराज हे चांगले व्यक्ती आहेत. पण अमोदला जे
ध्येय गाठायचे आहे, तिथपर्यंत ते त्याला नेऊ शकत नाहीत. त्यांच्या सर्व साधना या
भौतिक सुखासाठी आहेत.
संध्याकाकू - तो विद्याधर महाराजांना भेटला हे त्याच्या घरी माहित
आहे का?
अक्षता - नाही काकू, हि गोष्ट त्याच्या व माझ्या घरी कोणालाच माहित
नाही. फक्त मला आणि त्याच्या दोन मित्रांनाच माहित आहे. ते सर्वजण फिरायला जात
आहेत असे सांगून तिकडे गेले.
भाऊकाका - हे बघ, तू अमोदला स्पष्ट विचार. जर त्याने आणि शर्मिष्ठाने
पुढे लग्नाचा विचार केला असेल तर मात्र आपण मध्ये न पडणे उत्तम.
अक्षता - पण माझे प्रेम आहे त्याच्यावर.
संध्याकाकू - तुमच्यापैकी एकाने तरी पुढे होऊन प्रेम व्यक्त केले
असते तर आज हि वेळ आली नसती.
भाऊकाका - अक्षता, तू एकदा त्याला माझ्याकडे भेटायला पाठव. बऱ्याच
दिवसांत भेटला नाही म्हणून आठवण काढत होतो असे सांग.
अक्षता - ठीक आहे काका.
तेवढ्यात अक्षताचे आई वडील येतात. भाऊकाका आणि संध्याकाकूचा निरोप
घेऊन सर्वजण बाहेर पडतात.
मध्ये दोन दिवस जातात. शनिवारी अक्षता, अमोदला कॉफी हाऊसमध्ये
भेटायला बोलावते. अमोद तयार होतो.
अमोद अक्षताला पिकअप करतो. त्यानंतर दोघे कॉफी हाऊसमध्ये जातात.
अमोद - ए, तुम्ही भाऊकाकांकडे गेलेले होतात ना?
अक्षता - हो. बऱ्याच दिवसांत आपण कोणीच त्यांच्याकडे गेलो नाही.
त्यामुळे बाबा बोलले एकदा जाऊन येऊ. भाऊकाका आणि संध्याकाकू तुझी आठवण काढत होते.
त्यांनी तुला एकदा बोलावले आहे.
अमोद - हो, मलापण एकदा त्यांना भेटायचे आहे.
तेवढ्यात वेटर येऊन दोघांच्या आवडत्या कॉफीची ऑर्डर घेतो.
अमोद - तू मला काहीतरी महत्वाचे सांगणार होतीस.
अक्षता - खरं तर तू मला काहीतरी विचारायला हवंस. पण तू विचारायला
बरेच दिवस घेतलेस. त्यामुळे मीच आता विचारते.
नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील.
अमोद - तू कशाबद्दल बोलत आहेस?
अक्षता - आपल्या लग्नाबद्दल
अमोद - काय??
अक्षता - हो आपल्या लग्नाबद्दल. आपण दोघेजण लहानपणापासून चांगले
मित्र - मैत्रीण आहोत. आपण एकमेकाना चांगले ओळखतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे.
अमोद - मला काय बोलावे ते कळत नाही आहे.
अक्षता - तुला सर्व काही कळत आहे. पण वळत नाही आहे.
वेटर कॉफी घेऊन येतो.
दोघेजण कॉफी पिऊ लागतात.
अमोद - ए, आपण या विषयावर नंतर बोलू या का?
अक्षता (रागाने) - आधी तू माझ्याशी नीट बोलायचास. पण आता ती
शर्मिष्ठा तुझ्या आयुष्यात आली आहे ना? ती
तुला माझ्यापासून दूर नेत आहे.
अमोद - असं काही नाही आहे.
अक्षता - असंच आहे.
अमोद - लग्नाची बाब आहे. त्यामुळे मला विचार करावा लागेल.
अक्षताचे डोळे आता पाणावतात.
अक्षता - तू पूर्वीचा अमोद असतास, तर लगेचच हो म्हणाला असतास.
दोघेजण आता गप्प बसतात. कॉफी पिऊन झाल्यावर एकमेकांशी न बोलताच गाडीत
बसतात आणि आपापल्या घरी पोहोचतात.
रात्री बेडवर पडल्यावर अमोदला मात्र झोप येत नाही. तो अक्षता आणि
शर्मिष्ठा या दोघींचा विचार करू लागतो. त्याचे एक मन सांगत असते कि अक्षतावर
त्याचे पहिल्यापासून जीवापाड प्रेम आहे. पण लगेचच दुसरे मन शर्मिष्ठाचे नाव घेऊन
त्यावर मात करी. कशीतरी त्याला झोप लागते. तिकडे अक्षताला देखील कशीबशी झोप लागते.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी शर्मिष्ठा अमोदला घेऊन मॉल मध्ये जाते.
तिला काहीतरी खरेदी करायची असते.
त्याच दिवशी कुणाल आणि शेखर इकडे अमोदच्या घरी येतात. रमाकाकू
दोघांचे स्वागत करतात.
रमाकाकू - बऱ्याच दिवसांनी आलात दोघेजण.
शेखर - काकू वेळच झाला नाही.
कुणाल - अमोद कुठे आहे? रविवार असल्यामुळे घरीच असेल वाटले होते.
त्यामुळे त्याला कॉल न करताच आलो.
रमाकाकू - अरे तो त्याच्या एका मैत्रिणीबरोबर मॉल मध्ये गेला आहे.
शेखर - अक्षताबरोबर ना? कारण त्याला तिच्याशिवाय दुसरी जवळची
मैत्रीणच नाही.
रमाकाकू - अरे नाही रे, शर्मिष्ठाबरोबर.
कुणाल (आश्चर्याने) - हि कोण नवीन मैत्रीण?
रमाकाकू - अरे शेजारी रहायला आली आहे. नवीन आहे ना इथे ती. त्यामुळे
कधी कधी अमोद जातो मदतीला.
रमाकाकू - बसा दोघेजण. अमोद येईल एवढ्यातच. मी उपमा केला आहे. तो खा
तोपर्यंत.
रमाकाकू उपमा घेऊन येतात. उपमा खाऊन होईपर्यंत अमोद आणि शर्मिष्ठा येतात.
शर्मिष्ठा गाडीतून उतरून तिच्या बंगल्यावर जाते. शेखर आणि कुणाल दोघांनाही ती
खिडकीतून दिसते. अमोद घरात येतो.
अमोद - अरे तुम्ही कधी आलात?
शेखर - मगाशीच आलो. उपमा खाऊन झाला. काकू, उपमा एकदम मस्त झाला होता.
अमोद - चला टेरेसवर जाऊ. तिथेच निवांत बोलू.
तिघेजण वर जातात.
कुणाल (थट्टेने) - काय रे हि शर्मिष्ठा कोण? तिच्याबरोबर डायरेक्ट
मॉल मध्ये ? काय भानगड काय आहे?
शेखर (थट्टेने) - आणि अक्षताचा पत्ता कट कि काय? शर्मिष्ठा दिसायला
छानच आहे.
अमोद - ए, काहीतरी काय बोलताय. शर्मिष्ठा माझी फक्त मैत्रीण आहे.
कुणाल - हे बघ अक्षता चांगली मुलगी आहे. ती आपली चांगली मैत्रीण आहे.
तिला सोडून तू दुसऱ्या कोणत्या मुलीच्या नादी लागू नको.
शेखर - अमोद, कुणाल बरोबर बोलत आहे. अक्षता काय बोलत आहे?
त्यानंतर अमोद त्या दोघांना अक्षताने केलेल्या प्रपोज बद्दल सांगतो.
तसेच बाकी झालेले बोलणे देखील सांगतो.
कुणाल - अक्षता तुला शर्मिष्ठाबद्दल जे बोलली ते बरोबरच असणार.
शर्मिष्ठा बहुतेक तुला तिच्या जाळ्यात ओढत
असणार.
अमोद - शर्मिष्ठा अशी नाही आहे. ती चांगली मुलगी आहे. आम्ही फक्त
मित्र आहोत.
शेखर - शर्मिष्ठा कदाचित चांगली मुलगी असेल देखील. पण तू आणि अक्षता
आधीपासून चांगले मित्र - मैत्रीण आहात. शर्मिष्ठा तुमच्या दोघांच्या मध्ये येत
आहे.
कुणाल - अमोद, तू आता काय करायचे ठरवले आहेस?
अमोद - मला काहीच कळत नाही आहे.
शेखर - अक्षतासारखी चांगली मुलगी तुला शोधूनदेखील सापडणार नाही.
कुणाल - आमचे ऐक, अक्षताला होकार कळव.
त्यानंतर थोड्या गप्पा मारून झाल्यावर कुणाल आणि शेखर जातात.
अमोदच्या मनात असे वरचेवर येऊ लागते कि, एवढी साधना करूनदेखील हाती
काहीच लागलेले दिसत नाही. उलट मनस्तापच
होऊ लागलेला आहे. अक्षताने त्याला
दिलेला भाऊकाकांचा निरोप आठवतो. एकदा भाऊ काकांना भेटावे असा तो
विचार करु लागतो.
एके दिवशी अमोद भाऊकाकांकडे जायला निघतो. तेवढ्यात शर्मिष्ठाचा कॉल येतो. तिला शहराबाहेरील एका
देवीच्या देवळात दर्शनाला जायचे असते.
भाऊकाकांच्या घराच्या थोडे पुढे देवीचे देऊळ असते. त्यामुळे अमोद
तिलादेखील बरोबर येतेस का असे विचारतो.
आधी दोघेजण देवीच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. त्यानंतर दोघेजण
भाऊकाकांच्या घरी जातात.
भाऊकाका आणि संध्याकाकू दोघांचे स्वागत करतात. दोघांना बसायला
सांगतात.
भाऊकाका - अरे अमोद, बऱ्याच दिवसांनी आलास.
अमोद - हो काका, मी गडबडीत होतो.
संध्याकाकू - अमोद, हि मुलगी कोण?
अमोद - हि शर्मिष्ठा. हि फॅशन डिझाइनर आहे. आमच्या बाजूच्या बंगल्यात
रहाते. इथे पुढे देवीचे देऊळ आहे ना, तिथे हिला जायचे होते. आम्ही दर्शन घेऊन आलो.
संध्याकाकू - बरं झालं. हिला घेऊन आलास. तुझे गाव कोणते गं ?
शर्मिष्ठा - मी उत्तराखंडमध्ये रहाते. पण मूळची महाराष्ट्रातीलच आहे.
भाऊकाका - तू फॅशन डिझाइनर आहेस का, वा वा छान. तुझे वडील काय करतात?
शर्मिष्ठाच्या डोळ्यात पाणी येते. एक वर्षापूर्वी आई - वडील
वारल्याचे ती सांगते.
भाऊकाका - सॉरी हं , मला माहित नव्हतं. अमोद तुझे सध्या काय चालू
आहे?
अमोद - हॉस्पिटलमध्येतर कामाचा भरपूर लोड आहे. पण त्याचबरोबर
साधनासुद्धा सुरु आहे. मी विद्याधर महाराजांना भेटून आलो. त्यांनी काही साधना
सांगितलेल्या आहेत.
त्यानंतर कीर्तन ऐकल्यापासून ते उत्तराखंडमध्ये विद्याधर महाराजांना भेटेपर्यंतचा सर्व
वृत्तांत अमोद भाऊकाकांना सांगतो. मी
विद्याधर महाराजांना भेटून आलो हे घरी माहित नसल्याचेदेखील सांगतो. इतके सर्व करूनसुद्धा मनःशांती अजून
मिळाली नसल्याचे तो भाऊकाकांना सांगतो.
भाऊकाका - अरे अमोद, सिद्धींच्या
मागे लागून कधीच मुक्ती मिळत नाही. याउलट मुक्तीच्या वाटेवर असताना सिद्धी आपोआप
प्राप्त होतात. पण आपण तिकडे लक्ष द्यायचे नाही.
अमोद - काका, मी आत्ता काय करू?
भाऊकाका - विद्याधर महाराज खूप मोठे सिद्ध आहेत. त्यांनी तुला
सांगितलेल्या उपासना चांगल्या आहेत. पण त्यांचा उपयोग या भौतिक जगात जगण्यासाठी
होईल. खरे आत्मसुख वेगळेच आहे. आत्ता मला थोडे काम आहे. मी तुला चार दिवसांनी बोलावतो. सकाळच्या
प्रसन्न वेळेत मी तुला काही गोष्टी सांगेन. त्यामुळे एका निवांत सकाळी मी तुला
एकांतात बोलावेन.
संध्याकाकू दोघांना आग्रह करून चहा नाष्टा देतात. त्यानंतर अमोद आणि
शर्मिष्ठा दोघांना नमस्कार करून तेथून बाहेर पडतात.
अमोद गाडी सुरु करतो. गाडी थोडी पुढे जाते.
शर्मिष्ठा - तू विद्याधर महाराजांना भेटला आहेस का?
अमोद - हो. तू त्यांना ओळखतेस का?
शर्मिष्ठा - मी त्यांना ओळखते. फार मोठे सिध्दपुरुष आहेत ते. त्यांनी
सांगितलेली साधना तू सुरु ठेव. त्यामुळे तुझे कल्याणच होईल.
अमोद - त्यांनी सांगितलेली साधना मी करतच आहे. पण मनःशांती काही
मिळालेली नाही. मला मुक्तीच्या वाटेवर चालायचे आहे.
शर्मिष्ठा - तू वेडा आहेस. तुला शेअर मार्केट मध्ये होणारा फायदा हे
त्याचेच फळ आहे.
अमोद - मला शेअर मार्केटमध्ये होणार फायदा तुझ्यामुळे होत आहे.
शर्मिष्ठा - अरे, तपश्चर्येमुळे पुण्य वाढते. त्याचे फळ कोणत्यातरी
रूपात मिळते. तुला मी भेटले हे निमित्तमात्र आहे. तुझी आणि माझी भेट हे तुझ्या
तपश्चर्येचेच फळ आहे.
गाडी महामुंबईजवळ येते.
शर्मिष्ठा - अमोद, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे.
अमोद - बोल ना.
शर्मिष्ठा - आपण माझ्या घरी जाऊ.
अमोद - ठीक आहे.
शर्मिष्ठाच्या बंगल्याजवळ अमोद गाडी थांबवतो. दोघे बंगल्यात जातात.
शर्मिष्ठा अमोदला सोफ्यावर बसायला सांगते. नंतर ती त्याच्याजवळ जाऊन
बसते. त्याचा हात हातात घेत ती म्हणते कि अमोद, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू
माझ्याशी लग्न करशील का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा