Free cookie consent management tool by TermsFeed Update cookies preferences Katha Kadambari Marathi: Read share best Marathi katha free "मायासाधना भाग - २"

Read share best Marathi katha free "मायासाधना भाग - २"

मायासाधना भाग -

 

लेखककेदार शिवराम देवधर

 

िद्याधरना भेटायची उत्कंठा अमोदच्या मनात वाढू लागते. परंतु आई-बाबा आपल्याला एकट्याला तिकडे पाठवणार नाहीत हे त्याला चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे तो एक योजना आखतो. लगेचच तो त्याच शहरात राहणारा त्याचा मित्र कुणाल आणि नवी मुंबई मध्ये राहणारा मित्र शेखर या दोघांना कॉन्फरन्स कॉल वर घेतो. बऱ्याच दिवसापासून बाहेर कुठेतरी फिरायला जायचे असा विचार शेखर आणि कुणालच्या मनात चालू असतो. हे दोघे अमोदचे फार जवळचे मित्र असतात. दोघेही वडिलोपार्जित उद्योग सांभाळत असतात. आपल्याला उत्तराखंड येथे फिरायला जायचे आहे. सगळी तयारी मी करतो. तुम्ही फक्त तयार व्हा असे अमोद त्या दोघांना सांगतो. तसेच आपले गुप्त काम काय आहे हे देखील तो त्यांना सांगतो. विद्याधर महाराजांना भेटण्यात या दोघांना काहीच स्वारस्य नसते. परंतु एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी जायचे आहे म्हणून ते दोघे तयार होतात.

 

आपला प्लॅन यशस्वी होत आहे हे बघून अमोदला खूप आनंद होतो. आम्ही मित्र मित्र जरा फिरून येत आहोत असे अमोद आई-वडिलांना सांगतो. कुणाल आणि शेखर ही चांगली मुले असतात. त्यामुळे अमोदचे आई वडील त्याला उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी परवानगी देतात. आठ दिवसानंतरचे बुकिंग असते.

 

असेच एकदा भेटल्यावर बोलताना रमा काकू, मालती काकूंना अमोदच्या ट्रिप विषयी सांगतात. मालती काकू हा विषय सहजच त्यांची मुलगी अक्षताला सांगतात. अमोद बाहेर जात आहे हे आपल्याला का बोलला नाही याविषयी अक्षता विचार करू लागते. अमोद जोपर्यंत आपल्याला स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत याविषयी त्याच्याशी बोलायचं नाही असे ती ठरवते.

 

दुसऱ्या दिवशी शनिवार असतो. त्यामुळे आज संध्याकाळी ओपीडी अर्धा वेळच असते. पेशंट तपासून झाल्यावर अमोद अक्षताला कॉल करतो. कॉफी हाऊसला येत आहेस का असे तो तिला विचारतो. ती लगेचच हो म्हणते. अमोद बरोबर कॉफी हाउस ला जात आहे असे घरी सांगून अक्षता बाहेर पडते. ठरल्याप्रमाणे बाजूच्या चौकात जाऊन उभी राहते. अमोद तिथे येऊन तिला गाडीमध्ये घेतो. गाडीमध्ये बोलत बोलत ते दोघे कॉफी हाऊसला पोहोचतात.

 

अमोद दोघांच्या आवडीची कॉफी ऑर्डर करतो.

 

अक्षता - आज काय विशेष?

 

अमोद - तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी ती गोष्ट आई-बाबांना आत्ताच सांगू शकत नाही.

 

हा आपल्याला आता प्रपोज करतो आहे की काय असे अक्षताला  वाटते. ती थोडीशी लाजते देखील. तेवढ्यात भानावर येत अक्षता त्याला काय म्हणून विचारते.

 

अमोद - मी आता तुला जे काही सांगत आहे ते तू माझ्या आई-बाबांना आणि तुझ्या आई बाबांना देखील अजिबात सांगायचे नाही.

 

अक्षता - नाही सांगणार कोणाला. आता काय ते तू मला लवकर सांग.

 

अमोद - मी आणि माझे मित्र उत्तराखंड मध्ये जात आहोत.

 

अक्षता - हो मला माहित आहे.

 

अमोद - तुला कोण बोलले?

 

अक्षता - तुझ्या आईने माझ्या आईला सांगितले. त्यामुळे मला कळले.

 

अमोद - परंतु तुला अर्धीच माहिती कळलेली आहे.

 

अक्षता - अजून काय आहे?

 

अमोद - आम्ही तिकडे फिरायला तर जाणार आहोतच. परंतु मला विद्याधर महाराजांना भेटायचे आहे.

 

अक्षता - हे कोणते महाराज? कोणत्यातरी भोंदू लोकांच्या नादी लागू नकोस.

 

अमोद - ते मोठे सिद्ध पुरुष आहेत. व्लॉगर प्रशांत त्यांना भेटून आलेला आहे.

 

सोशल मीडियावर असलेला प्रशांतचा व्हिडिओ अमोद अक्षताला दाखवतो. हे सर्व काही अक्षताला पटत नसते, परंतु अमोदसाठी ती गप्प बसते.

 

प्रवासाचा दिवस उजाडतो. तिघांनी घरून आठ दिवसांची सुट्टी काढलेली असते. सकाळी दहाची फ्लाईट असते - महामुंबई ते तेजापूर.

 

तेजापूर हे नीलमणी पर्वतापासून पाच किमी अंतरावर असलेले एक छोटेसे शहर. येथीलच एका फाइव स्टार हॉटेलमध्ये अमोदने तिघांचे बुकिंग केलेले असते.

 

फ्लाईट मध्ये बसल्यावर कुणाल आणि शेखर चेष्टा मस्करीला सुरुवात करतात.

 

शेखर - काय अमोद, वहिनी कशा आहेत?

 

अमोद - कोण वहिनी?

 

कुणाल - अक्षता वहिनी.

 

अमोद - ही काय भानगड आहे?

 

शेखर - वेडगाव वरून पेडगावला जाऊ नकोस.

 

कुणाल - तुझ्यात आणि अक्षतामध्ये काय चालू आहे ते आम्हाला सर्वांना ठाऊक आहे.

 

शेखर - लहानपणापासून असलेली तुमची मैत्री कॉलेजमध्ये बऱ्याच जणांना माहीत होती. फक्त तसा सिरीयसनेस आम्हाला कुणाला जाणवायचा नाही. पण आता मात्र जाणवू लागलेले आहे.

 

अमोद - काय जाणवले?

 

कुणाल - तुम्ही दोघेजण मूव्हीज बघायला जाता, कॉफी हाऊसला जाता.

 

अमोद - आपले बरेचसे मित्र तर बाहेरगावी आहेत आणि कुणाल तू फक्त महामुंबईत राहतोस. तुला मात्र मुव्हीज बघायला आवडत नाहीत. नाहीतर तुला देखील बरोबर नेले असते.

 

शेखर - तुमचे दोघांचे मुव्हीजचे आणि कॉफी हाऊस चे फोटो अक्षताने सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

 

अमोद - आमच्यात फक्त मैत्री आहे.

 

कुणाल - मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात होऊ शकते. मला कीर्तीकडून सगळे कळले आहे.

 

शेखर - व्वाह, लेटेस्ट न्यूज. कुणाल लवकर सांग तुला काय कळले कीर्तीवहिनीकडून.

 

अमोद - शेखर, तू सगळ्यांची नाती काय जोडत आहेस?

 

कुणाल - शेखर बरोबर बोलत आहे. आठ दिवसांपूर्वीच मी कीर्तीला प्रपोज केले. ती हो देखील बोलली.

 

शेखर - तसंपण, कॉलेजमध्ये असताना आम्हाला याची कुणकुण लागलेली होती. असं कुणाल सारखं पाहिजे, बिनधास्त. ते सर्व जाऊदे, कुणाल तू लेटेस्ट न्यूज सांग.

 

कुणाल - कीर्ती सांगत होती कि, अक्षता याच्या प्रपोजची वाट पाहत आहे. पण हा ठोंब्या काही बोलायलाच तयार नाही. हा जर काही बोलला नाही तर तीच याला आता प्रपोज करणार आहे.

 

शेखर - अमोद, विचार कर यासाठी भाग्य लागते. आता वेळ वाया घालवू नकोस. आत्ताच्या आत्ता अक्षताला मेसेज कर बरं.

 

अमोद - आपण कुठे जात आहोत आणि तुम्ही काय बोलत आहात?

 

शेखर - कुठे त्या महाराजांच्या मागे लागतो. मला जर कुणाल अक्षताबद्दल  आधी बोलला असता, तर मी या ट्रिपला नकारच दिला असता.

 

कुणाल - खरं सांग अमोद, तुला अक्षता आवडते की नाही?

 

अमोद गालातल्या गालात हसतो.

 

कुणाल - हसला म्हणजे फसला.

 

अमोद - मला आत्ता असल्या कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही आहे. मला महाराजांना भेटायचे आहे.

 

शेखर - ठीक आहे पण घरी गेल्यावर मात्र अक्षताला याबद्दल सांग.

 

आता फ्लाईट लँडिंग ची वेळ होते. तेजापूरच्या विमानतळावर फ्लाईट पोहोचते. बुकिंग केलेल्या हॉटेलवर तिघेजण पोहोचतात. हिमालयाच्या पायथ्याशी आणि झाडी असल्यामुळे येथे गारवा खूपच छान असतो.  तिघेजण आपापल्या घरी इकडे सुखरूप पोहोचल्याबद्दल कळवतात. अमोद अक्षताला देखील फोन करून  खुशाली कळवतो. दुपारचे जेवण उरकले जाते.

 

अमोद - मी तुमच्याबरोबर काही ठिकाणी फिरायला येईन. परंतु मला माझे मुख्य काम पूर्ण करायचे आहे.

 

दुपारची  वामकुक्षी झाल्यावर अमोद एक कार बुक करतो. शेखर आणि कुणालला देखील तो महाराजांच्या दर्शनाला येत आहात का असे विचारतो. परंतु ते आज आराम करून इथे जवळपास फिरणार असतात. त्यामुळे ते नकार देतात.

 

चहा पिऊन दुपारी साडेतीन वाजता अमोद बाहेर पडतो.  वर्षातील चार उत्सवांना इथे गर्दी होते. एरवी फारशी गर्दी नसते, त्यामुळे तुमचे दर्शन चांगले होईल असे ड्रायव्हर अमोदला सांगतो.

 

विद्याधर महाराज इथे प्रसिद्ध असतात. त्यामुळे ड्रायव्हर त्याला बरोबर नीलमणी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपर्यंत घेऊन जातो. दर्शनासाठी थोडीशीच माणसे आलेली असतात. सर्वांचे संभाषण हिंदी मध्ये सुरू असते.

 

बाकी लोकांचे दर्शन घेऊन झाल्यावर अमोद, महाराजांना नमस्कार करतो आणि पाया पडतो.

 

विद्याधर महाराज - अमोद, कसा आहेस तू?

 

अमोद - महाराज, तुम्ही मराठी मध्ये बोलत आहात? कारण तुम्ही तर हिंदी भाषिक आहात.

 

विद्याधर महाराज (हसत) - सिद्धी प्राप्तीमुळे मी समोर आलेल्या व्यक्तीच्या भाषेत बोलू शकतो. मला तुझ्यासारख्या मुलाचीच प्रतीक्षा होती. मला संकेत मिळत होते की कोणीतरी माझ्याकडे येणार आहे. ज्याला मी माझ्या जवळचे सर्व ज्ञान देऊ शकेन.

 

अमोद - महाराज, मी सद्-गुरूंच्या शोधात तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मला तुमचा शिष्य बनवा.

 

विद्याधर महाराज - अवश्य, तू त्यासाठी योग्यच आहे. पण तुला खूप कठीण साधना करावी लागेल.

 

अमोद - महाराज, मी त्यासाठीच आलेलो आहे.

 

विद्याधर महाराज - साधना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून करायची नाही आहे.

 

अमोद - तुम्ही सर्वज्ञानी आहात महाराज. तुम्ही सांगा तसेच मी करेन. परंतु माझ्याकडे आठ दिवसांचा वेळ आहे. आठ दिवसांनी मला परत महामुंबईला जावे लागेल. तुम्ही जी साधना शिकवाल ती मी रोजच्या रोज करेन.

 

विद्याधर महाराज - या गुहेच्या बाजूला एक नदी वाहते. तिथे माझा आश्रम आहे. उद्या पहाटे पाच वाजता या गुहेजवळ तू ये. माझा एक शिष्य तुला इथून आश्रमात घेऊन येईल. येताना तुझे सर्व सामान घेऊन ये. काही दिवस तुला आश्रमातच वास्तव्य करावे लागेल.

 

महाराजांना नमस्कार करून अमोद परत हॉटेलवर परततो. कुणाल आणि शेखर त्याची वाट पहात असतात. अमोद त्यांना सर्व हकिकत सांगतो.

 

कुणाल - आता इथे काय आम्ही दोघेच फिरू?

 

अमोद - आज आपण कुठेतरी फिरून येऊ पण आता थोडं ऍडजेस्ट करा ना माझ्यासाठी प्लीज.

 

शेखर - ठीक आहे पण तुझ्या सेफ्टी साठी आम्हाला त्या महाराजांना भेटावेच लागेल.

 

अमोद - तुम्ही इतक्या पहाटे त्या आश्रमात येऊ शकत नाही.

 

कुणाल - चालेल पण नंतर मात्र आम्ही त्या आश्रमात येऊन जाऊ. तुझ्या आई बाबांनी आमच्या भरवशावर तुला इकडे पाठवलेले आहे.

 

अमोद - मी काय लहान आहे का?

 

शेखर - तुझ्या आई-वडिलांना हा सर्व विषय माहित नाही. त्यामुळे आम्हाला तर काळजी घ्यावीच लागेल.

 

अमोद - जशी तुमची मर्जी.

 

त्या संध्याकाळी ते तिघेजण जवळील काही प्रेक्षणीय स्थळे बघून येतात. गाडी आणि गाईडची व्यवस्था हॉटेलने आधीच केलेली असते. येथील निसर्ग खरंच खूप सुंदर असतो. त्यात भर म्हणजे बाजूला हिमाच्छादित शिखरे असतात. रात्रीचे जेवण होते. अमोद प्रथम त्याच्या घरी फोन करून इकडे मोबाईलला रेंज नाही,  आत्ता रेंज आलेली आहे म्हणून फोन केला. माझा फोन न आल्यास काळजी करू नका अशी थाप मारतो. पहाटे लवकर उठायचे म्हणून अमोद लवकरच झोपी जातो. 

 

पहाटे चारचा गजर लावून अमोद जागा होतो. आंघोळ करून तो तयार होतो. ड्रायव्हरला त्याने बरोबर साडेचारला येण्यास सांगितलेले असते. ड्राइव्हर वेळेत येतो. पाच वाजायच्या थोडे अगोदरच अमोद गुहेपाशी पोहोचतो. महाराजांचा शिष्य तेथे वाट पाहत उभा असतो. अमोद ड्रायव्हरला परत जायला सांगतो. पुढे दहा मिनिटे अंतर चालून गेल्यावर आश्रम लागतो.

 

आश्रम नदीकाठी असतो. आश्रमाचा परिसर सुंदर असतो. तिथे आठ ते दहा शिष्य काम करत असतात. तेथीलच एका पर्णकुटी मध्ये अमोदला नेले जाते. आतील दृश्य बघितल्यावर अमोद थक्क होतो. दोन समया तेवत असतात. त्यांच्या प्रकाशाने पर्णकुटी उजळून निघालेली असते. तिथेच एक आसन ठेवलेले असते. आसनापासून साधारण दोन फूट अंतरावर वरती तरंगत, महाराज डोळे मिटून जप करत बसलेले असतात. अमोद दुरूनच त्यांना नमस्कार करतो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो.

 

साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी महाराजांचा जप पूर्ण होतो. महाराज डोळे उघडून अमोदची विचारपूस करतात. त्यानंतर महाराज हवेतून जमिनीवर येतात.

 

विद्याधर महाराज - अमोद या सर्व सिद्धी आहेत बरं. तुझी साधना एकदा का पूर्ण झाली की अशा कितीतरी सिद्धी तुझ्या पायाशी लोळण घेतील. या सिद्धी मिळण्यासाठी किती वेळ लागेल हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे.

 

अमोद - महाराज मी तर एक डॉक्टर आहे. सामान्य माणूस असल्यामुळे या जप तपापासून खूप लांब आहे. खरंच माझी प्रगती होऊ शकते का?

 

विद्याधर महाराज - अरे मी सुद्धा एक सामान्य माणूसच होतो. माझ्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर मी चालत राहिलो.

 

त्यानंतर विद्याधर महाराज अमोदला एक धोतर नेसायला देतात. नंतर ते त्याला घेऊन बाजूला असलेल्या नदीवर जातात. तेथे नदीपात्रात उतरून त्याला स्नान करावयास सांगतात. महाराज देखील स्वतः नदीपात्रात उतरतात. नदीचे पाणी अत्यंत गार असते. तरीदेखील अमोद त्यामध्ये उतरून स्नान करतो. तिथेच उभे राहून महाराज त्याला एक मंत्र म्हणण्यासाठी सांगतात. या मंत्राचा जप पाण्यात उभे राहूनच दहा हजार वेळा करायचा असतो. त्यानंतर महाराज त्याला एक जपमाळ देऊन पाण्याबाहेर येतात.

 

अमोदच्या कठीण परिश्रमांना आता सुरुवात होते. दहा मिनिटातच त्या थंड पाण्यात उभे राहिल्यामुळे त्याला हुडहुडी भरू लागते. परंतु निश्चयाचा पक्का अमोद तसाच उभा राहून जप चालू ठेवतो. अर्ध्या तासानंतर त्याला दमल्यासारखे वाटू लागते. तरी पण तो जप चालूच ठेवतो. साधारण चार तासानंतर त्याचा जप पूर्ण होतो. त्यानंतर अमोद पाण्याबाहेर येऊन महाराजांसमोर येतो. महाराज त्याला अंग पुसून घ्यायला सांगतात आणि नंतर दुसरे एक धोतर देतात. थंड पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ओव्याची धुरी देखील घेण्यास देतात. नंतर थोडा वेळ आराम करण्यास सांगतात.

 

विद्याधर महाराज - अमोल दुपारी या सर्व शिष्यांबरोबर तू बाजूच्या जंगलात जा. तेथून कंदमुळे आणि फळे जे काही मिळेल ते घेऊन या. तुला एक आठवडा कंदमुळे आणि फळे यावरच काढावा लागेल. सिद्धी मुळे मला इथे धान्याची कमतरता नाही. परंतु तू व्रतस्थ असल्यामुळे आठ दिवस तुला हा नियम पाळावा लागेल.

 

दुपारी इतर शिष्यांबरोबर अमोद जंगलात जातो. तिथे फळे आणि कंदमुळे गोळा करतो. आश्रमात येऊन फळे आणि कंदमुळे खाऊन होतात. याची अमोदला सवय नसल्यामुळे त्याला जास्ती कंदमुळे संपत नाहीत. दुपारी थोडा वेळ वामकुक्षीची परवानगी असते. त्यानंतर महाराज त्याला दुसरा एक मंत्र देऊन परत जपाला बसवतात. आता हा जप पाण्यात उभा राहून करायचा नसतो. परंतु आश्रमात एका शांत जागी बसून सतत करायचा असतो.

 

विद्याधर महाराज मात्र त्यांच्या नेहमीच्या गुहेत जाऊन साधना करत बसतात. संध्याकाळी कुणाला आणि शेखर त्या गुहेपर्यंत अमोदला शोधत शोधत येतात. तेथे त्यांची विद्याधर महाराजांशी भेट होते. यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नसतो. परंतु महाराजांचे तेज पाहून ते दोघं त्यांना नमस्कार करतात. महाराजांना अमोद विषयी विचारतात. महाराज या दोघांना आश्रमात जाण्याची परवानगी देतात. परंतु अमोदशी दुरूनच बोलण्याबाबत सूचना करतात. एका शिष्याला ते या दोघांबरोबर आश्रमात पाठवतात.

 

शिष्य या दोघांना घेऊन आश्रमात येतो. अमोदचा जप चालूच असतो. तो खुणेनेच कुणाल आणि शेखरला आपण ठीक असल्याचे सांगतो. तसेच मी आठ दिवसांनी परत येईन, तुम्ही आता परत जा असे सांगतो. अमोदचा निरोप घेऊन कुणाल आणि शेखर हॉटेलवर परततात.

 

रात्री महाराज आश्रमात परततात. अमोदचा जप चालूच असतो.  महाराज आता अमोदला जप थांबवायला सांगतात आणि थोडा आराम कर असे म्हणतात. आज जसा दिनक्रम झाला तसाच अजून सात दिवस करायचा आहे असे देखील सांगतात. रात्री देखील आमोद फक्त फलाहारच घेतो. आश्रम लोकवस्ती पासून फार दूर नसल्यामुळे तेथे मोबाईलची थोडीशी रेंज असते. घरी फोन करून तो खुशाली कळवितो. अक्षतालादेखील तो फोन करतो.

 

मोबाईलची बॅटरी खूपच उतरलेली असते. आता उरलेले दिवस घरी फोन कसा करायचा असा त्याला प्रश्न पडतो. कारण आश्रमात इलेक्ट्रिसिटी ची सोय नसते. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचते. तो कुणालला फोन करतो. उद्या दोन पॉवर बँक खरेदी कर. रोज मला एक पॉवर बँक आलटून पालटून चार्ज करून देत जा असे तो कुणालला  सांगतो.

 

आज दिवसभराच्या झालेल्या परिश्रमामुळे त्याला लगेचच झोप लागते. झोपण्यापूर्वी आठवणीने तो सकाळी पाचचा गजर मोबाईलवर लावतो.

 

दुसऱ्या दिवशी अमोदची दिनचर्या सुरू होते. संध्याकाळी कुणाल आणि शेखर अमोदला भेटायला येतात. येताना त्याने सांगितल्याप्रमाणे पॉवर बँक घेऊन येतात. अमोदच्या तपश्चर्यत  विघ्न न येण्यासाठी त्यांना तेथे थोडा वेळच थांबायची परवानगी असते.

 

तसेच अजून दोन दिवस निघून जातात. अमोदची साधना जिद्दीने चालू असते. दुपारी जेवणाच्या वेळी  आणि रात्री अमोदला तेथील शिष्यांशी बोलायला वेळ मिळत असे. सर्व शिष्य सभ्य होते आणि ते अमोदला वेळोवेळी मदत करत.

 

अमोदची होत असलेली प्रगती विद्याधर महाराजांना कळत असते.

विद्याधर महाराज (खुश होऊन) -  अमोद, तू म्हणजे हिरा आहेस. फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज होती. तुझ्या भोवतीचे तेजोवलय मी बघितलेले होते. तुझा पाया पक्का होता. परंतु तुझ्या प्रगतीचा वेग हा माझ्या कल्पनेपेक्षा अधिक निघाला.

 

अमोद (नम्रपणे) - महाराज, तुम्ही प्रगती बद्दल बोलत आहात. परंतु मला तर काहीच जाणवत नाही आहे. मला माहित आहे की बारा बारा वर्षे उग्र तपश्चर्या करावी लागते तेव्हा फळ मिळते.

 

विद्याधर महाराज - तू म्हणत आहेस ते अगदी बरोबर आहे. सर्व सिद्धी काही एकदम मिळत नाहीत. परंतु तुझी गेल्या जन्मी साधना नक्कीच चांगली झालेली होती. त्यामुळे तुला थोडे लवकर फळ मिळेल. त्यात भर म्हणजे तुझी एकाग्रता आणि दृढनिश्चय. यामुळे तुझ्या प्रगतीची गती अजून वाढलेली आहे. त्यामुळे हा आठवडा संपेपर्यंत काही सिद्धी तुला नक्कीच प्राप्त होतील. काय सिद्धी मिळेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

 

केवळ फलाहार आणि कंदमुळे तसेच कठोर साधना, यामुळे अमोदला अशक्तपणा येतो. तरीदेखील नेटाने तो साधना चालू ठेवतो. कुणाल आणि शेखर दररोज संध्याकाळी दहा मिनिटेच तेथे येऊन त्याची भेट घेत असत. अमोदची अशी अवस्था बघून ते त्याला हे सर्व बंद कर, नाहीतर आम्ही तुझ्या घरी सर्व काही सांगू असे सांगतात. परंतु आता तीनच दिवस राहिले आहेत. मी ठीक आहे. असे अमोद त्यांना सांगतो. तसेच आता एवढी मदत केलीत, तीन दिवस फक्त थांबा अशी विनंती तो त्यांना करतो.

 

एक आठवडा संपत येतो. आता अमोदला झोपेमध्ये प्रकाश किरण दिसू लागतात. तसेच जपाला बसलेला असताना वेगवेगळे सुगंध येऊ लागतात. अमोद त्याचा अनुभव महाराजांना सांगतो. महाराजांना त्याची प्रगती ऐकून आनंद होतो.

 

एक आठवडा झाल्यावर अमोदचा साधनेचा कालावधी पूर्ण होतो.

 

विद्याधर महाराज - अमोद , आता तुला पाण्यात उभे राहून सकाळची साधना करण्याची गरज नाही. तू जो दुसरा जप करतोस तोच आता चालू ठेव. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मध्येच वेळ मिळाला की येत जा. मला माझ्याकडील सर्व ज्ञान तुला द्यायचे आहे. कारण त्यास तू लायक आहेस.

 

अमोद - महाराज, तुम्ही सांगितलेली साधना मी चालू ठेवेन.

 

अमोद त्यांना नमस्कार करून बाहेर पडतो. आता तो हॉटेलवर पोहोचतो. दुपारची वेळ असते. कुणाल आणि शेखर फिरण्यासाठी बाहेर गेलेले असतात. दुपारचे जेवण उरकून अमोद झोपी जातो. कठीण तपश्चर्येमुळे त्याची तब्येत खूपच खराब झालेली असते.

 

थोड्यावेळातच कुणाल आणि शेखर येतात. अमोदला  खूप ताप आलेला असतो. अशक्तपणादेखील असतो. आता उठून चालण्याची ताकद त्याच्यात नसते. त्याची हि परिस्थिती पाहून कुणाल आणि शेखर त्याला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. अमोदला स्पेशल रूममध्ये ठेवले जाते. उद्याची फ्लाईट रद्द करावी लागते. मात्र भिण्याचे कारण नाही असे डॉक्टर सांगतात. परंतु दोन दिवस अमोदला हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल

असे देखील डॉक्टर सांगतात.

 

आता मात्र कुणाल आणि शेखर दोघेजण अमोदच्या घरी कॉल करून अमोदला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्याचे सांगतात. हे ऐकून रमा काकू आणि डॉक्टर केशव दोघेजण काळजीत पडतात. आम्ही आताच तिकडे येतो असे ते सांगतात. परंतु काळजी करू नका, दोन दिवसात डॉक्टर अमोदला सोडणार असल्याचे कुणाल आणि शेखर त्यांना सांगतात.

 

डॉक्टर केशव लगेचच हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तेथील मुख्य डॉक्टरांशी बोलतात. स्वतःची ओळख सांगून अमोदला नक्की काय झाले आहे असे विचारतात.  अतिश्रमामुळे अमोदची  अशी अवस्था झाली असावी असा अंदाज तेथील डॉक्टर सांगतात. परंतु काळजीचे कारण नाही, असे ते सांगतात.

 

हा तर तिकडे फिरायला गेला होता, मग हे अतिश्रम कुठे केले असा प्रश्न डॉक्टर केशवना पडतो. हि बातमी अक्षताच्या घरी देखील कळते. सर्वजण चिंतेत पडतात. अक्षता गुपचूप कुणालला कॉल करून अमोदने कोणती कठीण साधना तर केली नाही ना असे विचारते. कुणाल तिला सर्व हकीकत सांगतो. तसेच अमोदला धोका नसल्याचे सांगतो. परंतु तू आत्ताच हे कोणाला सांगू नकोस, असे देखील सांगतो.

 

त्या रात्री कुणाल आणि शेखर हॉस्पिटलमध्ये अमोदच्या

जवळच थांबतात. अमोदला कशाचीच शुद्ध नसते. त्याला  सलाईन चालू असते.

 

सकाळी फ्रेश होण्यासाठी म्हणून कुणाल आणि शेखर हॉटेलवर जातात. जाताना हॉस्पिटलमधील स्टाफला लक्ष  ठेवायला सांगून जातात.

 

इकडे अमोद शुद्धीवर येतो. समोर एक सुंदर नर्स त्याला तपासण्यासाठी आलेली असते. सलाईन संपत आल्यामुळे ती त्याचे सलाईन बंद करते. नर्स येताना फळांचे ज्युस घेऊन आलेली असते.

 

नर्स (हिंदीमध्ये) - हे फळांचे ज्यूस प्या.

 

अमोद - मला इच्छा नाही.

 

नर्स (हिंदीमध्ये) - हे ज्यूस तर प्यावेच लागेल, डॉक्टरांनी सांगितलेले आहे. यामुळे तुम्हाला बरे वाटेल.

 

नर्सच्या आवाजात मधुरता असते.

 

नाईलाजाने अमोद उठण्याचा प्रयत्न करतो. अशक्तपणामुळे तो उठू शकत नसतो. नर्स त्याला उठून बसण्यासाठी मदत करते. नर्सने आणलेले ज्यूस अमोद पितो. लवकर बरे व्हा सांगून नर्स निघून जाते. अमोद परत आराम करण्यासाठी आडवा पडतो. परंतु आता त्याला झोप येत नसते. ज्यूस प्यायल्यामुळे त्याला आता तरतरी आलेली असते. अमोद आता उठतो. खिडकीपाशी जाऊन बाहेर बघू लागतो.

 

इतक्यात घाईने कुणाल आणि शेखर अंघोळ वगैरे आटोपून तिथे येतात. अमोदला  उभा बघून त्यांना आश्चर्य वाटते. कारण आज सकाळपर्यंत त्याची परिस्थिती अत्यंत खराब असते.

 

शेखर - आम्ही गेल्यावर नर्स आली होती का? तुझे सलाईन तर काढलेले आहे.

 

अमोद - हो. तिने सलाईन काढले आणि फळांचे ज्युस देखील प्यायला दिले. आता मला फ्रेश वाटत आहे.

 

कुणाल - अरे पण परत दुसरी   सलाईन लावायची नाहीत का?

 

अमोद - त्याबद्दल ती काही बोलली नाही.

 

तेवढ्यात दुसरी एक नर्स तेथे येते.

 

नर्स (हिंदीमध्ये) - यांचे सलाईन कोणी काढले?

 

कुणाल (हिंदीमध्ये) - तुमच्यापैकीच कोणीतरी आले होते.

 

नर्स (आश्चर्याने हिंदीमध्ये) - कसं शक्य आहे? या मजल्यावरील सर्व रूम्स माझ्या देखरेखीखाली आहेत. कदाचित माझी पार्टनर येऊन गेली असेल.

यांना तुम्ही आता चहा बिस्किटे खायला द्या. त्यानंतर मला परत दुसरे सलाईन लावायचे आहे.

 

अमोद - मी फळांचे ज्यूस प्यायलो आहे. त्या मगाशी नर्स आल्या होत्या ना, त्यांनीच दिले.

 

आता मात्र हि नर्स काहीशी गांगरते. कारण तिच्या माहितीप्रमाणे फळांचा ज्यूस घेऊन तिथे कोणी आलेले नसते. तसेच डॉक्टरांची अशी कोणतीही ऑर्डर देखील नसते. ती दुसरे सलाईन लावून निघून जाते.

 

सकाळी दहा वाजता राऊंडसाठी डॉक्टर येतात. इतक्या लवकर अमोद रिकव्हर झाल्याचे बघून त्यांना आश्चर्य वाटते. आत्ता लावलेले सलाईन संपले, की पुढचे सलाईन लावायची गरज नाही असे ते नर्सला सांगतात.

 

डॉक्टर (कुणाल आणि शेखरला हिंदीमध्ये ) - तुम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे. जरी विमानाने जाणार असलात तरी देखील थोडी दग दग होण्याची शक्यता आहे. तसेच यांना देखरेखीखाली ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही यांना उद्या सकाळी सोडू. तुम्ही पर्वा महाराष्ट्रात जाऊ शकता.

 

कुणाल आणि शेखर हो असे म्हणतात.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी अमोदला हॉस्पिटलमधून सोडले जाते. एक दिवस हॉटेलवर आराम करून नंतर तिघेजण महाराष्ट्रात जाण्यासाठी निघतात.

 

क्रमशः

 

या ब्लॉगवरील इतर कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या यादीवर क्लिक करा -





"होम पेज" म्हणजे मुखपृष्ठावर जाऊन या ब्लॉगवरील इतर कथांची यादी वाचण्यासाठी (लिंक बघण्यासाठी) खाली क्लिक करा -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Read share best Marathi katha free "मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग)"

लेखक – केदार शिवराम देवधर ( पेण – रायगड )   मायासाधना – भाग ५ (शेवटचा भाग) अमोद आता चांगलाच गांगरतो. अक्षता कि शर्मिष्ठा या विचारात त...