लेखक – केदार शिवराम देवधर (पेण - रायगड)
मायासाधना भाग - 3
कुणाल आणि शेखर अमोदला घरापर्यंत सोडायला येतात. अमोदला प्रत्यक्ष
बघितल्यावर त्याच्या आई-वडिलांना हायसे वाटते. अक्षता आणि तिचे आई वडील देखील येऊन भेटून जातात.
रमा काकू - अमोद, आता ४ दिवस तू हॉस्पिटलमध्ये जायचे नाही. इतके श्रम
तरी काय झाले, ज्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले?
अमोद - तिकडे थंडी खूप होती. आम्ही तिघेजण जाम फिरलो. त्यामुळे मी
आजारी पडलो. पण आता मी एकदम ठीक आहे. उद्यापासून मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो.
डॉक्टर केशव - अमोद, आई बोलते आहे ते एकदम बरोबर आहे. जरी तुला बरे
वाटत असले तरी अजून ४ दिवस तू घरीच आराम करायचा आहेस.
अमोद (नाईलाजाने) - ठीक आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल अमोदला भेटून जातो. शेखर मात्र नवी
मुंबईला गेल्यामुळे फोनवरूनच अमोदची चौकशी करतो. संध्याकाळी अक्षता अमोदला परत
भेटायला येते. डॉक्टर केशव हॉस्पिटलमध्ये गेले असतात.
रमा काकू - अक्षता बरं झालं तू आलीस. सकाळी कुणाल आला होता. परंतु
त्याचा उद्योग असल्यामुळे त्याला जास्त वेळ थांबता आले नाही. आज दिवसभर अमोद
कंटाळलेला आहे. आता तुम्ही थोडा वेळ गप्पा मारा म्हणजे त्याला बरे वाटेल.
अमोद - आई दिवसभर घरात बसून कंटाळा आलेला आहे. आम्ही दोघं टेरेसवर
जाऊन गप्पा मारू का?
रमा काकू - जा, पण वर जाऊन खुर्चीत बसा. इकडे तिकडे फिरत बसू नकोस.
तुम्ही बसा, मी थोड्या वेळाने चहा आणते.
अक्षता - काकू, मी खाली आले कि करेन चहा.
रमा काकू - असू दे ग, कॉलेजमध्ये लेक्चर देऊन तू देखील दमली असशील.
बसा आरामात वरती.
अमोद आणि अक्षता टेरेसवर जातात.
अक्षता - अमोद, मी तुला सांगितले होते की कोणत्यातरी बुवांच्या नादी
लागू नकोस. तिकडे काय काय घडले ते मला खरे खरे सांग.
अमोद अक्षताला तिकडे घडलेली सगळी हकीकत सांगतो.
अक्षता - आता मला सांग, तुला एवढे कठीण परिश्रम करून काय मिळाले? तो
प्रकाश दिसणे किंवा सुगंध येणे हे सर्व भास झाले असतील.
अमोद - १२ - १२ वर्ष घोर
तपश्चर्या करावी लागते. कीर्तनकार बुवांनी सांगितलेले आठवत नाही का तुला. आपण तर
आपला रोजचा जीवनक्रम सांभाळून साधना करणार. मग फळ कसे लगेच मिळणार?
अक्षता - कसले फळ मिळते आहे? उलट तू आजारी पडलास. आता तरी या असल्या
गोष्टींच्या मागे धावणे थांबव. तू देवळात जाऊन देवाला नमस्कार कर, पण इतक्या कठीण
गोष्टी करण्याची काय गरज?
तेवढ्यात रमा काकू चहा घेऊन येतात.
रमा काकू - कोण कसल्या कठीण गोष्टी करत आहे?
अक्षता (सांभाळून विषय बदलत) - अहो काकू, हा इतका आजारी आहे तरी
देवळात जायचे बोलत आहे. म्हणून मी बोलले कि बरा झालास कि जा. आत्ता, तुझी तब्येत
बरी नाही त्यामुळे ते कठीण आहे.
रमा काकू - बरोबर बोललीस. आत्ता देवळात जायची गरज नाही. इथून देवाला
नमस्कार केला तरी चालतो. याची तब्येत बरी नाही म्हणून.
रमा काकू दोघांना चहाचे कप देतात व स्वतः देखील एका कपात चहा पितात.
नंतर तिघेजण खाली येतात. अक्षता दोघांना गुड नाईट म्हणून तिच्या घरी
जाते. जाताना रमा काकू तिला उद्या देखील ये असे सांगतात.
असेच ४ दिवस जातात.
अमोद आता हॉस्पिटलमध्ये कामाला जाऊ लागतो. जमेल तितका वेळ जप चालूच
असतो.
पुढचा रविवार उजाडतो.
डॉक्टर केशव काही कामासाठी बाहेर गेलेले असतात. रमाकाकूंचे स्वयंपाक
घरात काम चालू असते. अमोद टिव्ही बघत असतो. इतक्यात डोअर बेल वाजते. अमोद दरवाजा
उघडतो. बाहेर एक सुंदर युवती उभी असते.
युवती - डॉक्टर केशव इथेच रहतात ना?
अमोद - हो, या ना, आत या, बसा.
युवती आत येऊन सोफ्यावर बसते.
स्वयंपाक घरातून रमाकाकू बाहेर बघतात. बाहेर येताना युवतीसाठी एक
ग्लास थंड पाणी आणतात आणि त्या युवतीला पाणी देतात.
त्या युवतीला तहान लागलेली असल्यामुळे ती पाणी पटकन पिते.
रमाकाकू - डॉक्टर केशवांशी
तुझे काय काम आहे? थोडावेळ बस, ते येतीलच इतक्यात.
युवती - काकू, तुमच्या शेजारी विजय काकांचा जो बंगला आहे ना, तिथे मी
भाड्याने राहण्यासाठी येणार आहे. फक्त मला आधी तो बंगला बघायचा आहे. विजय काकांशी
माझे मोबाईल वर बोलणे झालेले आहे. त्यांनीच मला सांगितले की डॉक्टर केशवांकडे
बंगल्याची चावी आहे. विजय काका डॉक्टर केशवांशी याबद्दल बोलणार होते.
रमाकाकू - असं का, मला काहिच
माहित नाहि. पण तू बस. डॉक्टर केशव अर्ध्या तासातच येतील. तोपर्यंत मी तुझ्यासाठी
चहा करते.
युवती - अहो काकू चहा कशाला करत आहात, नको.
त्या युवतीचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच रमाकाकू स्वयंपाक घरात
जातात.
अमोद मात्र त्या युवतीला बघून विचारात पडतो. हिला कुठेतरी बघितलेली
आहे असे त्याला सारखे वाटत असते. पण अनोळखी मुलीला असे एकदम कसे विचारणार, म्हणून
तो गप्प बसतो.
पाच मिनिटांतच चहा घेऊन रमाकाकू बाहेर येतात आणि तिला चहा देतात.
रमाकाकू - तुझं नाव काय? तू कुठून आलीस?
युवती - माझे नाव शर्मिष्ठा. मी उत्तराखंड मध्ये रहाते. मी इंटेरिअर
डिझाईनर आहे. माझी बरीचशी कॉन्ट्रॅक्ट मुंबईमधील असल्यामुळे, मी इकडे भाड्याने
जागा शोधत होते. मुंबईच्या तुलनेत इकडे भाडे देखील थोडेसे कमी आहे. हा एरिया देखील
चांगला डेव्हलप आहे. त्यामुळे मला इथून काम करायला सोपे जाईल.
रमाकाकू - अरे वा, खुपच छान. तु शेजारचा बंगला बघून घे, तुला नक्कीच
आवडेल.
शर्मिष्ठा (चहा पिऊन झाल्यावर) - काकू, चहा खूपच छान झालेला होता.
रमाकाकू - शर्मिष्ठा, तू मराठी एवढे चांगले कसे बोलतेस? कारण तू तर
उत्तराखंड मध्ये रहातेस असे बोललीस.
शर्मिष्ठा - माझे आई-वडिल महाराष्ट्रातीलच. नोकरी निमित्त वडिलांना उत्तराखंडमध्ये
रहावे लागले. त्यामुळे गेली बरीच वर्षे आम्ही तिकडेच आहोत.
तेवढ्यात डॉक्टर केशवांचा रमाकाकूंना मोबाईलवर कॉल येतो. त्यांचे
शेजारच्या विजयकाकांशी मोबाईलवर दोन दिवसांपूर्वी बोलणे झालेले असते. शर्मिष्ठा
नावाची मुलगी रविवारी बंगला बघण्यासाठी येईल, तिला माझा बंगला प्लीज दाखवा, असे
त्यांनी डॉक्टर केशव यांना सांगितले असते. परंतु आज सकाळी बाहेर पडताना डॉक्टर हि
गोष्ट घरात सांगायची विसरून जातात. परंतु डॉक्टर केशव यांचा आता बाहेर कामामुळे
वेळ जाणार असतो. त्यामुळे तू किंवा अमोद त्या मुलीला बंगला दाखवा असे डॉक्टर रमाकाकूंना सांगतात.
रमाकाकू - अहो ती इकडे आलेली आहे. तुमची वाट बघत इथे बसलेली आहे. मला
तरी आत्ता स्वयंपाक घरात भरपूर काम आहे, त्यामुळे मी अमोदलाच तिच्याबरोबर पाठवते.
डॉक्टर केशव - चालेल. तिला आज दुपारी आपल्याकडेच जेवायला बोलावं.
कारण ती लांबून आलेली आहे.
रमाकाकू - हो नक्कीच.
डॉक्टर केशव आणि रमाकाकू दोघांचे मोबाईल वरील संभाषण संपते.
रमाकाकू - अमोद, अरे तुझ्या बाबांना यायला उशीर होणार आहे. त्यामुळे
तूच तिला आपल्या बाजूचा बंगला दाखव. मला स्वयंपाक घरात भरपूर काम आहे.
अमोद - आई ठीक आहे, मी चावी घेऊन जातो.
रमाकाकू - शर्मिष्ठा, बंगला बघून झाला की दुपारी आमच्याकडेच जेवायला
ये.
शर्मिष्ठा - नको काकू, तुम्हाला उगाच त्रास कशाला?
रमाकाकू - अगं त्यात त्रास कसला? आम्ही जेवणार त्यात तुझं एक पान
वाढलं तर काही फरक पडणार आहे का? आणि आता तू तर आमची शेजारी होणार आहेस.
शर्मिष्ठा - काकू, पण माझी दुपारी तीन ची फ्लाईट आहे. मला परत
उत्तराखंडमध्ये जावे लागेल.
रमाकाकू - मला स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही. आत्ता सकाळचे
साडेनऊ वाजलेले आहेत. अजून दोन तासात माझा स्वयंपाक आरामात होईल. तू जेवूनच जा.
शर्मिष्ठा - ठीक आहे काकू.
त्यानंतर अमोद शर्मिष्ठाला घेऊन शेजारी असलेल्या विजयकाकांच्या
बंगल्यामध्ये जातो. चावीने बंगल्याचे कुलूप काढतो. दोघेजण आत जातात.
बंगला सुंदर असतो. गेली काही वर्षे विजय काका आणि त्यांची फॅमिली
नोकरी निमित्त महामुंबई बाहेर असल्यामुळे, बंगला रिकामाच असतो. झाडलोट नसल्यामुळे
थोडीशी धूळ जमा झालेली असते. विजय काकांचे फर्निचर देखील तेथे असते. फॅन,
ट्युबलाईट आणि गिझर देखील असतो. स्वयंपाक घरात एक इलेक्ट्रिक शेगडी देखील असते. या
वस्तू नाशिकला नेण्याची गरज नसल्यामुळे, काकांनी त्या बंगल्यातच ठेवलेल्या असतात.
सध्या विजयकाका नाशिकला रहात होते.
शर्मिष्ठा - बंगला खूपच छान आहे. मला आवडला. फर्निचर आणि बाकीच्या
सोयी असल्यामुळे खूपच चांगले झाले आहे. मी विजय काकांना कॉल करून सांगते तसं.
शर्मिष्ठा (हस्तांदोलनासाठी हात पुढे करत) - थँक्यू सहकार्य केल्याबद्दल. तुझं नाव.... ,
अरे, आपली ओळख करायची राहूनच गेली.
अमोद (चाचरतच हात मिळवितो) -
मी अमोद, मी डॉक्टर आहे. महामुंबईतच आमचे हॉस्पिटल आहे.
अतिशय मुलायम असा तिच्या हाताचा स्पर्श त्याला जाणवतो. असा स्पर्श
यापूर्वी त्याने कधीच अनुभवलेला नसतो. परंतु लगेचच भानावर येत, तो अलगदपणे हात
काढून घेतो.
शर्मिष्ठा (हसत) - बरे झाले, माझ्या शेजारी आता दोन दोन डॉक्टर आहेत.
अमोद - काही मदत लागली, तर नक्कीच सांग.
शर्मिष्ठा - थँक्यू.
बंगला बघून झाल्यावर दोघेजण बाहेर पडतात. अमोद बंगल्याला कुलूप
लावतो. दोघेजण परत घरी येतात.
रमाकाकू - शर्मिष्ठा आवडला का बंगला?
शर्मिष्ठा - हो काकू बंगला मस्तच आहे. मी विजय काकांना कॉल करून तसं
कळवणार आहे.
त्यानंतर शर्मिष्ठा, विजय काकांना कॉल करून बंगला आवडला असल्याबद्दल
कळवते. तसेच एक आठवड्यामध्ये ती तिथे रहायला येणार आहे, असे देखील सांगते. भाडे
आणि डिपॉझिट बद्दल विजय काकांनी आधी कल्पना दिलेली असते. ते शर्मिष्ठाला मान्य
असते. फक्त बंगला बघायचा राहिलेला असतो. तो आज ती बघून घेते.
थोड्याच वेळात डॉक्टर केशव घरी येतात. त्यांची आणि शर्मिष्ठाची ओळख
होते.
डॉक्टर केशव - विजय काकांशी तुझी ओळख कशी? ते तर नाशिकला राहतात.
नोकरी निमित्त एक वर्षापूर्वीच ते इथून
शिफ्ट झाले.
शर्मिष्ठा - मला मुंबईत जास्त कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे, इथेच जवळपास
मी जागा शोधत होते. एका इस्टेट एजंट मार्फत माझी विजय काकांशी ओळख झाली.
तोपर्यंत रमाकाकू स्वयंपाकघरातून सांगतात की जेवण तयार झालेले आहे
सगळ्यांनी जेवायला चला.
सर्वजण जेवायला बसतात.
डॉक्टर केशव - तू एकटीच इथे रहायला येणार आहेस, की तुझे आई - वडिल
कोणी तुझ्याबरोबर येणार आहेत?
शर्मिष्ठा (डोळ्यात पाणी येत बोलते) - एक वर्षापूर्वी एक्सीडेंट
मध्ये माझे आई - वडील दोघेही वारले.
डॉक्टर केशव - सॉरी, मला माहीत नव्हते. तुला काही मदत लागली तर नक्की
सांग. आता तू आमची शेजारी आहेस.
रमाकाकू - अमोद, जेवण झाल्यावर शर्मिष्ठाला एअरपोर्टवर सोडायला तु
जा.
अमोद - ठीक आहे.
जेवण झाल्यावर रमाकाकू शर्मिष्ठाचा मोबाईल नंबर घेऊन सेव करून
ठेवतात.
ठरल्याप्रमाणे अमोद शर्मिष्ठाला घेऊन एअरपोर्टकडे जायला निघतो.
शर्मिष्ठाचे वाटेतीलच एका ऑफिसमध्ये काम असल्यामुळे एअरपोर्टच्या अलीकडेच ती गाडी
थांबवायला सांगते.
अमोद - मी इथेच बाजूला गाडी पार्क करतो. तुझे काम आटोपले कि तू ये.
नंतर आपण एअरपोर्टवर जाऊ.
शर्मिष्ठा - अरे नको. इथून एअरपोर्ट जवळच आहे. तुझा उगाचच वेळ जाईल.
तू जा. माझे काम आटोपले की मी एअरपोर्टवर जाईन.
अमोद - अगं पण तुला असं वाटत सोडून गेलो तर आई मला रागवेल.
शर्मिष्ठा - खरंच तू जा. माझं ऑफिस मधलं काम झालं की, लगेच मी एअरपोर्टला
जाईन. इथून एअरपोर्ट जवळच तर आहे.
अमोद - ठीक आहे मी जातो. तिकडे पोहोचलीस की फोन कर.
शर्मिष्ठा - नक्की करेन.
शर्मिष्ठा गाडीमधून उतरून एका ऑफिसच्या दिशेने जाते. अमोद घरी परत
जातो.
संध्याकाळी घरी पोहोचल्यावर शर्मिष्ठाचा रमाकाकूंना फोन येतो.
विजयकाकांच्या सांगण्यावरून डॉक्टर केशव एक गडी घेऊन, विजय काकांचा
बंगला चांगला साफ करून घेतात.
एक आठवडा निघून जातो. एक दिवस शर्मिष्ठा थोडे सामान घेऊन बंगल्यात
येते. रमाकाकूंकडून कडून ती चावी घेते. आजच आली आहेस, त्यामुळे सामान लावण्यात वेळ
निघून जाईल. म्हणून दुपारी आणि रात्री आमच्याकडे जेवायला ये असे रमाकाकू तिला
सांगतात. शर्मिष्ठा आधी नको असेच म्हणत असते, परंतु रामाकाकू फारच आग्रह करतात
म्हणून ती तयार होते.
दुपारी उशीर झाल्यामुळे डॉक्टर केशव आणि अमोद दोघेही जेवून निघून
गेलेले असतात. रमाकाकू आणि शर्मिष्ठा दोघीजणी एकत्र जेवतात.
रात्रीचे जेवण तयार करण्यासाठी रमाकाकूंना मदत करायला शर्मिष्ठा
संध्याकाळी थोडी लवकरच त्यांच्या घरी येते. तेव्हाच अक्षता देखील नारळाच्या वड्या
घेवून रमाकाकूंकडे येते. आजच अक्षताच्या आईने नारळाच्या वड्या केलेल्या असतात.
अक्षता आणि शर्मिष्ठा दोघींची ओळख होते.
रमाकाकू - अक्षता, आता तू इथेच थांब आणि रात्री जेवूनच जा. शर्मिष्ठा
इथे नवीन आहे. तुम्ही मुलं मुलं येथे एकत्र असलात की तिला देखील बरे पडेल.
अक्षताला देखील ते पटते, त्यामुळे ती लगेचच हो म्हणते.
अक्षता आणि शर्मिष्ठा दोघीजणी रमाकाकूंना स्वयंपाक करण्यासाठी मदत
करतात. आज जेवणात पुलाव, पुरी, छोले असा बेत असतो. चांगल्या क्वालिटीचे श्रीखंड
बाहेरून मागवलेले असते.
रात्री साडेआठ वाजेपर्यंत डॉक्टर केशव आणि अमोद हॉस्पिटल मधून येतात.
सर्वजण जेवायला बसतात. स्वयंपाक खूपच उत्तम झालेला असतो. गप्पा मारत जेवण होते.
अक्षता आणि अमोद, दोघांचाही मोबाईल नंबर शर्मिष्ठा तिच्याकडे सेव करून घेते. नंतर
ती तिच्या बंगल्यावर परत जाते.
अमोदची, विद्याधर महाराजांनी सांगितलेली साधना चालूच असते. रोज थोडा
वेळ तरी न चुकता तो साधना करत असे.
चार दिवसांनी शनिवार येतो. त्यामुळे आज ओपीडी अर्धा वेळ असते.
संध्याकाळी शर्मिष्ठा अमोदला फोन करते. तिला एक स्मार्ट टीव्ही
घ्यायचा असतो. महामुंबईमधील फारशी माहिती नसल्यामुळे ती अमोदला एखाद्या चांगल्या
शोरूम मध्ये बरोबर येशील का म्हणून विचारते.
संध्याकाळी अमोद मोकळाच असतो. त्यामुळे तिला मदत करण्याच्या हेतूने तो हो असे
म्हणतो. ओपीडी मधून बाहेर पडण्यापूर्वी तो घरी आईला फोन करून तसे कळवतो. तसेच
ओपीडी मधून बाहेर पडण्यापूर्वी, तो त्याच्या वडिलांना देखील सांगून बाहेर पडतो.
ओपीडी संपल्यावर तो शर्मिष्ठाच्या बंगल्यावर जाऊन तिला पिकअप करतो.
शर्मिष्ठा - बरं झालं तु आलास. टीव्ही नाही त्यामुळे मी खूपच बोअर
झाले होते.
अमोद - तुझे काम कसे चालू आहे?
शर्मिष्ठा - एकदम मस्त.
अमोद - माझ्या चांगल्या माहितीची तीन ते चार शोरूम आहेत. आपण सर्व
शोरूम मध्ये जाऊन येऊ. त्यानंतर तू ठरव कोणता टीव्ही घ्यायचा.
शर्मिष्ठा - चालेल.
इकडे अक्षता अमोदच्या हॉस्पिटलमध्ये जाते. आज वीकएंड असल्यामुळे तिला
मूवी बघायला जायचे असते. परंतु तिथे पोहोचल्यावर रिसेप्शनिस्ट तिला असे सांगते की
डॉक्टर अमोद तर पंधरा मिनिटांपूर्वीच बाहेर पडून गेले. ती अमोदला फोन करणार
तेवढ्यात तिला डॉक्टर केशव बाहेर पडताना दिसतात.
डॉ. केशव - अक्षता कशी आहेस?
अक्षता - काका, मी बरी आहे. पण अमोद कुठे गेला आहे? तो घरी गेला आहे
का?
डॉ. केशव - नाही, अगं तो शर्मिष्ठा बरोबर शोरूम मध्ये गेला आहे. तिला
नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा आहे. तुझं काही काम होतं का त्याच्याकडे?
अक्षता - हो काका, मूव्ही बघायला येतोस का, असे मी त्याला विचारणार
होते. पण आता जाऊ दे.
डॉ. केशव - तुम्ही उद्या मूव्ही बघायला जा. शर्मिष्ठा येथे नवीन आहे
ना. तिला इथली माहिती नाही. त्यामुळे अमोद तिला मदत करायला गेलेला आहे.
अक्षता - असू दे काका आम्ही नंतर जाऊ.
असं सांगून अक्षता तेथून निघून जाते. खरं म्हणजे अक्षता थोडी नाराजच
होते. शर्मिष्ठा अचानक अमोलला कुठेतरी घेऊन जाईल याची तिला अजिबात कल्पना नसते.
इकडे शर्मिष्ठाला पहिल्याच शोरूम मधील एक टीव्ही पसंत पडतो. शोरूमची
सर्विस त्वरित असते. त्यामुळे तेथील मॅनेजर असे सांगतात की तुम्ही तुमच्या घरी जा,
तोपर्यंत आमची माणसं टीव्ही घेऊन तुमच्या पत्त्यावर येतील. तुम्हाला टीव्ही आणि
डिश सेट करून देतील. शर्मिष्ठा पेमेंट देते आणि त्यानंतर दोघेजण बाहेर पडतात. शर्मिष्ठा तिच्या घरी येण्यास अमोदला सांगते. टीव्ही बसवून झाला कि
तू जा, असे देखील ती सांगते. अमोद ठीक आहे असे सांगतो.
दोघेजण शर्मिष्ठाच्या घरी पोहचतात. शर्मिष्ठा दोघांसाठी चहा बनवते.
दोघेजण चहा पितात. चहा पिताना अमोदचे लक्ष समोर असलेल्या टेबलावर जाते. तिथे एक
पुस्तक असते. पुस्तक शेअर मार्केट संबंधित असते.
अमोद (कुतुहलाने) - शर्मिष्ठा, तू शेअर मार्केटचा अभ्यास करतेस की
काय?
शर्मिष्ठा - अरे, अभ्यास तर बऱ्यापैकी झालेला आहे. आता काम पण करते.
अमोद - मला पण थोडं शेअर मार्केट संबंधी शिकण्याची इच्छा आहे. पण
वेळच मिळत नाही. आणि नीट माहिती सांगणार देखील माझ्या माहितीत कोणी नाही.
शर्मिष्ठा - काळजी कशाला करतोस? मी शिकवेन की.
अमोद - खरंच शिकवशील का मला?
शर्मिष्ठा - अगदी खरंच
अमोद - पण तू तर तुझ्या कामात बिझी असतेस. मग तुला वेळ कधी होईल?
शर्मिष्ठा - मी सकाळी थोडा वेळ शेअर मार्केटचे काम करते. त्याच वेळेस
तुला देखील शिकवेन.
अमोद - माझ्या कधीपासून डोक्यात होतं की शेअर मार्केट शिकायचे.
त्यामुळे आता आपण उद्याच सुरुवात करू चालेल ना?
शर्मिष्ठा - उद्या रविवार आहे. तुला सकाळी वेळ आहे का?
अमोद - हो
शर्मिष्ठा - मग उद्या सकाळी माझ्याकडे ये. पहिले दोन ते तीन दिवस मी तुला बेसिक शिकवेन.
नंतर आपण ऑनलाईन काम करायला सुरुवात करू.
अमोद - चालेल.
अर्ध्या तासाच्या आतच शोरूम मधून माणसे येतात. टीव्ही आणि डिश बसवून जातात. त्यानंतर अमोद तेथून बाहेर
पडतो.
दुसऱ्या दिवशी अमोद सकाळी लवकर उठतो. अंघोळ व साधना करून तयार होतो. तोपर्यंत रमाकाकू त्याला व डॉ. केशवना नाश्ता करायला बोलावतात.
रविवार असूनदेखील अमोद एवढ्या लवकर अंघोळ वगैरे आटोपून तयार झालेला
पाहून डॉ. केशव व रमाकाकूंना आश्चर्य वाटते.
तिघेजण नाश्ता करायला एकत्र बसतात.
रमाकाकू - अमोद एवढ्या लवकर कुठे निघालास?
अमोद - आई, मी आता नाश्ता झाल्यावर शर्मिष्ठाकडे
जाणार आहे. ती मला शेअर मार्केट विषयी शिकवणार आहे.
रमाकाकू - मला तर त्यातले काही कळत नाही.
डॉ. केशव - अमोद, मला देखील त्यातील फारसे काही कळत नाही. पण तुला
आवड आहे ना तर शिकून घे शर्मिष्ठाकडून. ती हुशार मुलगी आहे. फक्त एकदम मोठी आर्थिक
गुंतवणूक करू नकोस. हळूहळू करत जा. तू अजून नवीन आहेस. त्यामुळे
रिस्क नको.
अमोद - हो बाबा.
डॉ. केशव - अरे काल संध्याकाळी अक्षता आली होती हॉस्पिटलमध्ये.
तुम्ही मुव्ही बघायला जाण्याचा प्लॅन केलेला होता का?
अमोद - नाही बाबा तसे काही ठरले नव्हते. तिला
कोणी मैत्रिणी कंपनी द्यायला मिळाल्या
नसतील. आत्ता हॉरर मुव्ही ऍडलॅबला लागलेला आहे.
अशावेळी ती मला कंपनी द्यायला बोलावते. पण शर्मिष्ठाने मला फोन करून आधीच विचारले
होते. त्यामुळे मी तिला मदत म्हणून गेलो. अक्षताने मला आधीच फोन करायला हवा होता.
नाश्ता झाल्यावर अमोद शर्मिष्ठाकडे जातो. जाताना १ नोटबुक आणि पेन
घेऊन जातो. शर्मिष्ठा दरवाजा उघडते आणि अमोदला आत यायला सांगते.
शर्मिष्ठा - अमोद, ५ मिनिटे बस. मी चहा बनवते.
अमोद - अग, आताच माझा चहा नाश्ता झालेला आहे.
शर्मिष्ठा - चहाला काय नाही म्हणतोस. असं म्हणतात कि, चहा हे
पृथ्वीवरचे अमृत आहे. काल मी केलेला चहा
तुला आवडला नाही का?
अमोद - नाहि तसं काही नाही. तू काल खरंच चहा उत्तम बनवला होतास. बरं
चल तुला कंपनी म्हणून अर्धा कप कर.
शर्मिष्ठा - बस, आत्ता आणते.
५ मिनिटांतच चहा तयार होतो. शर्मिष्ठा व अमोद चहा पिऊ लागतात.
अमोद - चहा एकदम मस्त झाला आहे.
शर्मिष्ठा - थँक यु.
चहा झाल्यावर शर्मिष्ठा शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती शिकवायला
सुरुवात करते. शर्मिष्ठाची शिकविण्याची पद्धत अत्यंत सोपी असते. अमोद हुशार
असल्यामुळे पटापट शिकून घेतो. शिकवण्यात दोन तास निघून जातात.
शर्मिष्ठा - अमोद, आज एवढा अभ्यास भरपूर झाला. नाहीतर ओव्हरडोस होईल.
उद्या तुझी ओपीडी असल्यामुळे आपण दुपारी अभ्यासाला बसू.
अमोद - थँक यु शर्मिष्ठा, तू खूप छान शिकवलेस.
शर्मिष्ठा (हसत) - नुसते थँक्यू म्हणून चालणार नाही. गुरुदक्षिणा
दयावी लागेल.
अमोद (हसत) - असं आहे का? मग सांग बरे काय देऊ मी तुला?